और नही बस और नही…

Submitted by अतुल ठाकुर on 10 December, 2013 - 03:19

mahendra_kapoor-300x280.jpg

काहींच्या आयुष्यात परीघावरच राहण्याचा योग असतो. केंद्राकडे त्यांना गुणवत्ता असुनही जाता येत नाही. हिन्दी चित्रपट सृष्टीत महेंद्र कपूरच्या बाबतीत असंच घडलं असं मला वाटतं. एक नम्र स्वभावाचा अतिशय सभ्य माणुस यापलिकडे मी त्याच्या बद्द्ल काही वाचलेलं नाही. स्वतः महेंद्र कपूरला त्याची उपेक्षा झाली असं कधी वाटलं का याचा देखिल मला अंदाज नाही. पण माझं स्वतःचं मत या अतिशय गुणी गायकाबद्द्ल हेच आहे की गुणवत्ता झाकली गेली. कलेचं चीज पुरेसं झालं नाही. या लेखात त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न आहे. रफीसारखा प्रचंड गुणवत्तेचा गायक सर्वसाधारणपणे चार दशकं हिन्दी चित्रपट संगीताच्या सिंहासनावर विराजमान होता हे चटकन सुचणारं कारण असलं आणि त्यात तथ्य असलं तरी तेवढं पुरेसं नाही. कारण रफीमुळे मन्ना डे, मुकेश, तलत यांची गुणवत्ता झाकली गेली असं म्हणता येत नाही. या तिघांनीही रफीसमोर आपापली वेगळी साम्राज्यं उभारली आणि त्या साम्राज्यांचे ते शेवटपर्यंत सम्राट राहीले. नावाजलेल्या संगीतकारांनी रफीसमोर, रफी ऐन भरात असताना मन्ना डे, मुकेश व तलत यांना अविस्मरणीय गाणी दिलेली आहेत. खरंतर त्यांच्या स्वतःच्या साम्राज्यात रफीलाही प्रवेश नव्हता असं म्हटल्यास वावगं ठरु नये. शास्त्रीय बाज असलेल्या गाण्यात मन्ना डे, दर्दभर्‍या गीतांत मुकेश आणि गझलमध्ये तलत यांना दुसरा पर्याय नव्हताच. महेंद्र कपुरचं यातिघांप्रमाणे रफीसमोर वेगळं साम्राज्य निर्माण झालं नाही. रफी, किशोर, मुकेश हे अनुक्रमे दिलीप, देव व राज या दिग्गजांसाठी गायिले. हा योग महेंद्र कपुरच्या भाग्यात नव्हता. महेंद्र कपुरची अप्रतिम गाणी ही सुनील दत्त (गुमराह, हमराज), शशी कपुर (वक्त, प्यार किये जा), राजेंद्र कुमार (गीत, संगम), विश्वजीतसाठी (किस्मत), होती. अर्थातच ही यादी आणखि वाढवता येईल पण त्यात ते त्रिकुट नसणार. शेवटी दिलीपकुमार जेव्हा “रामचंद्र कह गये सिया से” हे महेंद्र कपुरच्या आवाजात गाऊ लागला तेव्हा उशीर झाला होता. महेंद्र कपुरवर शिक्का बसलाच असेल तर तो मनोजकुमारचा आवाज म्हणुन. “मेरे देश की धरती” हीट झाल्याने महेंद्र कपुर आणि देशभक्तीपर गाणी हे जणु समिकरणच बनलं. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला रामप्रहरी महेंद्र कपुरचा आवाज दुमदुमु लागला. “चलो इकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो” सारखं अजरामर गाणं देणार्‍या महेंद्र कपुरच्या वाट्याला “देशभक्तीपर” गीतांचा गायक म्हणवुन घेण्याची पाळी आली. ते ही यश निर्भेळ नव्हतंच. “जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा” हे फार पुर्वी रफी गाऊन गेला होता. शिवाय मनोज कुमारला दिलीप, राज आणि देव आनंदचं ग्लॅमर कधीही लाभलं नाही.

आम्ही महेंद्रकपुरच्या प्रेमात केव्हा पडलो ते नीट लक्षात नाही पण बहुधा “तुम अगर साथ देनेका वादा करो” या गाण्यापासुन. “चलो इकबार फिरसे” मनात रुजायला थोडासा वेळ लागला. “ऐ जाने चमन तेरा गोरा बदन” खुप आवडतं. विशेषतः “ऐ हुस्ने बेखबर” पासुनची सुरुवात खासच. प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियकराची गाणी गावी ती महेंद्र कपुरनेच. “ऐ जाने चमन” आहेच. शिवाय “दिल लगाकर हम ये समझे”, “मेरा प्यार वो है के”, “किसी पत्थरकी मुरत से मुहब्बत का इरादा है”, “यारों कि तमन्ना है”, “तुम्हारा चाहनेवाला, खुदा की दुनिया में”, “जिसके सपने हमे रोज आते रहे”, “इन ह्वाओं मे इन फिजाओं में”, “झुके जो तेरे नैना”, “तेरे प्यार का आसरा चाहता हुं”, “तुम अगर साथ देनेका वादा करो”, “आ भी जा आ भी जा”, “मेरी जान तुमपे सदके एहेसान इतना करदो”, “छोडकर तेरे प्यार का आलम”, “आजकी मुलाकात बस इतनी”, “हमने जो देखे सपने”, “धडकने लगी दिलके तारों की दुनिया”, “आखोंमे कयामत के काजल”, “रफ्ता रफ्ता वो हमारे” पासुन ते अगदी अलिकडल्या “ये पहले प्यार की खुशबु” पर्यंत अशी कितीतरी अप्रतिम गाणी महेंद्र कपुर गाऊन गेला आहे. महेंद्र कपुरच्या आवाजाची जातच मुळी प्रियकराचं आर्जव, आर्तता आणि समर्पणाची भावना घेउन येते असं मला वाटतं. मात्र इतर काही गाण्यांचा वेगळ्याने विचार व्हायला हवा. काही चिंतन करायला लावणारी गाणी महेंद्र कपुरने गायिली आहेत. दोन उदाहरणं मला चटकन आठवतात. “नीले गगन के तले धरती का प्यार पले”, “संसार की हर शय का” ही अनुक्रमे “हमराज” व “धुंद” मधील गाणी. दोन्ही चित्रपट काहीश्या चाकोरीबाहेच्या “बोल्ड” विषयावरचे. दोन्ही बी. आर. चोप्राचेच. बी. आर. चोप्रा, साहीर लुधियानवी आणि महेंद्र कपुर या टीमने दिलेली गाणी ही मनोजकुमार, महेंद्र कपुर, कल्याणजी आनंदजी पेक्षा मलातरी फार उजवी वाटतात. देशभक्तीची भावना हा काही चांगल्या गाण्याचा निकष होउ शकत नाही. आणि भलत्या बाबतीत भावनावश होण्यात अर्थही नाही. बाकी बी. आर. चोप्राने महेंद्र कपुरला शेवटपर्यंत साथ दिली. मला तर “अथ श्री महाभारत कथा” फार आवडायचं. विशेषतः एपिसोड संपताना “भारत कि ये काहानी सदीयों से है पुरानी” या ओळींनी केलेली सांगता तर छानच होती. त्यानंतर “चलो इकबार फिरसे”, “आप आये तो खयाले दिले नाशाद आया” यासारख्या गाण्यांवर बोलावं लागेल. अगदी नवीन वाटेवरची ही गाणी आहेत प्रेयसी आता दुसर्‍याची झालेली आहे पण सूडाची भावना नाही. वैफल्याचा तळतळाट नाही. कुठल्याही तर्‍हेचा उरबडवेपणा तर नाहीच नाही. अतिशय समंजस, प्रौढ, प्रगल्भ भाव या गाण्यांमधुन व्यक्त होतो. “निकाह” च्या “बीते हुए लमहों की कसक साथ तो होगी” मध्ये जुना महेंद्र कपुर पुन्हा त्याच तेजाने तळपला होता. महेंद्र कपुरच्या हिर्‍यामोत्यांचा असा हिशोब दिल्यावर मला “ठंडे ठंडे पानी से” सारख्या गाण्यांचा फारसा विचार करावासा वाटत नाही.

महेंद्र कपुरच्या गायकीला न्याय दिला असेल तर तो दोघांनी. एक संगीतकार रवी आणि दुसरा ओ.पीं. नैयर. बी. आर. चोप्रा, साहिर लुधियानवी, महेंद्र कपुर आणि रवी या चमुची गाणी हा एकंदर हिन्दी चित्रपट संगितातलाच वैभवशाली अध्याय आहे. ओ.पी ने दिलेल्या संगीतात “किस्मत” चित्रपटातील गाणी आजदेखिल महेंद्र कपुरच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांमध्ये गणली जातात. “आखों मे कयामत के काजल” सारखं अप्रतिम गाणं ओ.पी ने या चित्रपटात दिलं. मात्र अभिनेता विश्वजीतला या गाण्यांचं चीज नाही करता आलं. दिलीपकुमार सारखे अभिनेते उत्कृष्ट गाण्याला त्याच तोडीचा अभिनय करुन गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवत असत. याबाबतीत महेंद्र कपुर दुर्दैवीच म्हणायला हवा. जिज्ञासुंनी “लाखों है यहां दिलवाले” सारखं गाणं जरुर पाहावं. पडद्यावर हे गाणं गाताना विश्वजीतने गिटारचा वापर एखाद्या हत्यारासारखा करत, कंबर, मान आणि तंगड्या नको तिथे हलवुन गाण्याचं पार मातेरं करुन टाकलं आहे. गाणं एकीकडे आणि विश्वजीतसाहेब भलतीकडे असा प्रकार या गाण्याच्या नशीबी आलाय. रफीलाही त्याच्या अनेक उत्कृष्ट गाण्यांसाठी भारतभुषण, प्रदिपकुमारसारख्या अभिनेत्यांसाठी गावं लागलं. हे अभिनेते अभिनयात ग्रेट नसतीलही पण रफीच्या गाण्यांचे त्यांनी असे बारा वाजवले नाहीत. कुठेतरी मला महेंद्र कपुरच्या अपयशात त्याला पडद्यावर त्याच तोडीचे कसलेले अभिनेते मिळाले नाहीत हे देखिल कारण महत्त्वाचं आहे असं वाटतं. येथे महेंद्र कपुरच्या काही मर्यादांही विचार करावा लागेल. यात दुमत होण्याची शक्यता आहे. रफीचा आवाज दिलीप, देव, धर्मेंद्र, शम्मी कपुरला फीट्ट बसला. मुकेश तर राज कपुरचा दुसरा आवाजच बनुन गेला. मन्नाडेचा सुद्धा आवाज राज कपुरला चपखल बसला. राजेश खन्ना आणि किशोर कुमारने एक नवीन युगच चित्रपट सृष्टीत आणलं. महेंद्र कपुरच्या बाबतीत आवाज चपखल बसण्याचं उदाहरण दिसुन येत नाही. मनोजकुमारचा अपवाद देखिल सणसणीत म्हणता येणार नाही. मुकेश (दिवानोंसे ये मत पुछो), रफीने (भरी दुनिया में आखिर दिल को समझाने कहां जाये) मनोजकुमारसाठी काही अजरामर गाणी गायिली आहेत. मला महेंद्र कपुरचा आवाज हा नेहेमी शुचिर्भुत, शुद्ध, सुस्नात असाच वाटला. त्यात किशोरकुमारच्या आवाजातलं सळसळतं तारुण्यं, टारगटपणा, रफीची धार येण्याचा संभव कमी त्यामुळे या आवाजाला उपजतच काही मर्यादा आहेतसं वाटत राहतं. तलत जेव्हा “जाये तो जाये कहां” म्हणु लागतो, किशोर जेव्हा “मै शायर बदनाम” म्हणत अयशस्वी कवीची वेदना बोलुन दाखवतो, रफीच्या तोंडुन जेव्हा “याद ना जाये बीते दिनों की” बाहेर पडतं तेव्हा सारं वातावरणच झाकोळुन गेल्यासारखं वाटतं. ही किमया महेंद्र कपुर कडुन फारशी घडलेली नाही. मुकेश तर या क्षेत्रातला राजाच. त्याच्याबद्दल काय बोलणार? मात्र याला महेंद्र कपुरची तीन गाणी अपवाद आहेत. एक “संबंध” चित्रपटातलं “अंधेरे में जो बैठे है”, दुसरं “संगम” चित्रपटातलं “हर दिल जो प्यार करेगा” आणि तिसरं मनोजकुमारच्या “रोटी कपडा और मकान” मधलं “और नही बस और नही” . या गाण्यातला प्रचारकी थाटाचा भाग सोडल्यास “कोई आग मचल जाये, सारा आलम जल जाये” या ओळी महेंद्र कपुरने अशा तर्‍हेने म्ह्टल्या आहेत कि जाळुन टाकणार्‍या थंडगार अ‍ॅसिडचा स्पर्श त्या ओळींना झाल्यासारखा वाटतो.

महेंद्र कपुरच्या मराठी चित्रपटातील योगदानाबद्दल स्वतंत्र लिहावं लागेल. त्याचे मराठी उच्चार इतके उत्कृष्ट होते कि मुळात एक अमराठी माणुस मराठी गाणं गातोय असं कधी वाटलंच नाही. “सुर तेच छेडीता”, “सांग कधी कळणार तुला”, “हे चिंचेचे झाड दिसे मज”, “रात्रीस खेळ चाले” पासुन ते ” ती येते आणिक जाते” पर्यंत कितीतरी ग्रेट गाणी महेंद्र कपुरच्या नावावर आहेत. मात्र येथे महेंद्र कपुरला गृहीत धरलं गेलं असं मला वाटतं. घरकी मुर्गी दाल बराबर या न्यायाने प्राचीन काळापासुन मराठी गात असलेला महेंद्र कपुर जणु काही विसरलाच गेला आणि “शोधीसी मानवा राऊळी मंदीरी” ने मराठीतही रफी युग आणलं. रफीची मराठी गाणी गुणगुणताना लोकांची ब्रह्मानंदी टाळी लागु लागली. पुढे “आश्विनी ये ना” ही आरोळी ठोकुन किशोर कुमारने येथे प्रवेश केला तेव्हा ” माझ्यापासुन दुर नको जाउ गंगुबाय” हे अस्सल गावरान ठेक्यात दादांच्या चित्रपटात अनेक वर्षे गाणारा महेंद्र कपुर आमच्या खिजगणतीतही नव्हता. रफी, किशोरचं अमराठी म्हणुन मराठीत जेवढं उदंड कौतुक झालं तेवढं महेंद्र कपुरचं कधीही झालं नाही असा तर माझा आरोपच आहे. या लेखाचा प्रपंच महेंद्र कपुरच्या गाण्यांची जंत्री देण्यासाठी केलेला नाही. बरीचशी चांगली गाणी राहुन गेल्याचा संभव आहे. या गुणी गायकाच्या कारकिर्दीचा एका विशिष्ठ दॄष्टीकोणातुन मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. महेंद्र कपुर प्रति रफी झाला नाही याचं दु:ख नाही. मात्र या अतिशय गुणी गायकात तलत, मुकेश, मन्ना डे सारखं साम्राज्य निर्माण करण्याची कुवत नक्कीच होती. महेंद्र कपुरचं असं वेगळं साम्राज्य झालं नाही याचंच फार वाईट वाटतं. मर्यादा सर्व गायकांना होत्या. पण त्यांना त्यांच्या आवाजाला सजेशी गाणी दिली गेली. महेंद्र कपुरच्या आवाजाला खुलवणारी गाणी रवी, साहीर, ओ.पी. नेच दिली. ती परंपरा पुढे चालली नाही. “और नही बस और नही, गम के प्याले और नही” हा मला महेंद्र कपुरचा आक्रोशचं वाटतो. केव्हातरी मी आठवणीने “दिल लगाकर हम ये समझे” हे माझं अत्यंत आवडतं गाणं लावतो. कानावर मोरपीस फिरवल्यासारखं होतं. पण मनात आत कुठेतरी “और नही बस और नही” म्हणणार्‍या महेंद्र कपुरचं दु:ख विसरता येत नाही.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अतुल ! मला परत माझ्या विश्वात आणल्याबद्दल ! लेख खरोखरच अप्रतिम आहे ! अभ्यासपुर्ण आहे ! महेंद्र कपूरची एक आठवण - वक्त चित्रपटाच्या टायटल साँग बद्दलची. बी. आर. चोप्रा आणि रफीमध्ये काही बेबनाव निर्माण झाला होता. नया दौरच्या यशाबद्दल ओ.पी. नय्यर, बी. आर. चोप्रा आणि रफी यांच्यात काही तेढ निर्माण झाली होती. त्यामुळे ओ.पी. ने आणि बी. आर. चोप्रा यांनी रफीला गाणी न देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मधल्यामधे संगीतकार रवी यांची गोची झाली. एक तर टायटल साँग तेही भैरवी मधे बांधलेले. या गाण्यासाठी ही चोप्रांनी महेंद्र कपूरलाच वापरायचं ठरवलं. मन्ना डे चा पर्याय असतानाही. पण महेंद्र कपूरच्या मनाचं मोठेपण हे की त्याने आग्रह धरून या गाण्यासाठी रफीलाच पाचारण करायला लावलं. आणि ते गाणं रफीच्या अनेक अजरामर गाण्यांपैकी बनलं. असाच काहीसा प्रकार "बहारें फिर भी आयेंगी" च्या वेळी. त्या चित्रपटाच्या म्युझीक लाँचच्या वेळी सगळ्यांनी महेंद्र कपूरची तारीफ केली. फक्त ओ.पी. बोलून गेला की "मेरा रफी होता तो और भी मजा आता". कुठलाही यशस्वी गायक हे ऐकून घेऊ शकला नसता. पण महेंद्र कपूरने एकट्याने त्याला जाहिर दुजोरा दिला होता. "कहां रफीसाब और कहां मै". तो होताच मुळात अतिशय सभ्य आणि डाऊन टू अर्थ माणूस. Happy

शेरलॉक ला अनुमोदन, लेख अतिशय अभ्यासपूर्ण आहे अगदी मन लावून वाचला मी.
पण कधी कधी ३-४ गोष्टी समोर असल्यावर एखाद्या गोष्टीत नक्की काय कमी आहे ते आपण नेमकं सांगू शकत नाही तसं काहीसं महेंद्र कपूर यांच्याबाबतीत झालं असावं.
मला ही व्यक्तिशः त्यांचं गायन फारसं आवडत नाही. फक्त एक गाणं आवडतं. चलो एक बार फिर से अजनबी ...... त्यातही शेवटचं कडवं. तरिही ऐकताना राहून राहून वाटतं की रफीने या गाण्याचं चीज केलं असतं. अर्थात हा माझा बायसनेस असेल.
पण चित्रपटसृष्टीतलं त्याचं योगदान नक्कीच वाखाणण्याजोगं आहे.

फार सुंदर लेख.

रफी, किशोरचं अमराठी म्हणुन मराठीत जेवढं उदंड कौतुक झालं तेवढं महेंद्र कपुरचं कधीही झालं नाही असा तर माझा आरोपच आहे.>>>>>>अगदी खरे आहे पण त्याने इतकी सुंदर गाणी म्हटली आहेत कि ती एखादा अमराठी गायक गातोय असे वाटतच नाही इतका तो मराठीत मिसळुन गेला.

काही आवडती गाणी:
अंजनीच्या सुता
अडला नारायण धरी..
ती येते आणिक जाते..
तेरे प्यार का..
है प्रीत जहां की रीत सदा..

मनातला लेख. मनकवडे आहात. आम्हाला जमले नाही ते अगदी योग्य शब्दात तुम्ही उतरवलेत. हे ही खरे आहे की महेन्द्र कपूर हे जमिनीवर पाय असणार्‍यातलेच होते. मला त्यान्ची मराठी गाणी जास्त आवडतात. अगदी दादा कोन्डके यान्ची सुद्धा.( चावट असली तरी). जयवन्त कुलकर्णी यान्च्यानन्तर महेन्द्र कपूर हेच योग्य गायक दादान्साठी.

महेंद्र कपूरची गाणी मला आवडतात. खास करून रवीच्या संगीतातली.
मध्यंतरी त्यांनी काही गैरफिल्मी गाण्यांचे अल्बम पण काढले होते.

वह कौन थी मधे मदनमोहनने पण एक गाणे दिले होते ना ?
छोडकर तेरे प्यार का दामन.. तेही आवडते आहे माझे.

मराठीत, संत निवृत्ती ज्ञानदेव मधे पण एक छान गाणे होते.

काय करू मी ते सांगा, अगा पांडुरंगा.. ( दोन्ही गाण्यांचे शब्द व डिटेल्स बरोबर असावेत. )

एकदम अभ्यासपूर्ण लेख आणी एकदम पटला. महेंद्र कपूरची काही गाणी हि फक्त त्यांच्याच आवाजात ऐकाविशी वाटतात.

त्याचे मराठी उच्चार इतके उत्कृष्ट होते कि मुळात एक अमराठी माणुस मराठी गाणं गातोय असं कधी वाटलंच नाही. >> दादांची गाणी ऐकताना मुद्दामहून काही ठिकाणी ह चा उच्चार अह केले कि ते नेहमी खटकत आले. पण ह्या वाक्याला प्रचंड अनुमोदन.

तो होताच मुळात अतिशय सभ्य आणि डाऊन टू अर्थ माणू >> +१०००.

अतुल, लेख तर आवडलाच.. प्रत्येकाचे योग असतात, संगीत सृष्टीत तर अशी अनेक गुणवत्तेची माणसे विस्मृतीच्या वाळवंटात फेकली गेलेली दिसतात.महेंद्र कपूर हे ठळक उदाहरण .तुम्ही दिलेली त्यांची सर्वच गाणी अभिजात दर्जाची आहेत तरीही..त्यांच्या मर्यादांचाही तुम्ही यथार्थ उहापोह केला आहे.

इथे तुमच्या या एका निरीक्षणासाठी तुम्हाला दाद द्यावीच लागेल ->>त्यानंतर “चलो इकबार फिरसे”, “आप आये तो खयाले दिले नाशाद आया” यासारख्या गाण्यांवर बोलावं लागेल. अगदी नवीन वाटेवरची ही गाणी आहेत प्रेयसी आता दुसर्‍याची झालेली आहे पण सूडाची भावना नाही. वैफल्याचा तळतळाट नाही. कुठल्याही तर्‍हेचा उरबडवेपणा तर नाहीच नाही. अतिशय समंजस, प्रौढ, प्रगल्भ भाव या गाण्यांमधुन व्यक्त होतो.>> १००% सहमत.यात महेंद्र कपूर यांच्या संयत स्वराविष्कारासोबतच हा भाव मुळात या दोन्ही गीतांमध्ये आणणारे कवी साहीर लुधियानवी यांचे श्रेय मोठेच आहे. विशेषत: '' आप आये तो दिले नाशाद आया '' चा खास उल्लेख भावला कारण त्यातली प्रगल्भता ''चलो इक बार फिरसे '' इतकीही जनमानसात ठसली नाही..

छान आहे लेख .. मलाही स्वतःला महेन्द्र कपूर फारसा कधी भावला नाही पण एव्हढा अभ्यासपूर्ण लेख वाचून हा माझ्या कानांचाच दोष की काय असं वाटायला लागलं .. Happy

अत्यंत सुंदर, अभ्यासपूर्ण लेख.
मला स्वतःला महेंद्र कपूर फारसे आवडले नाहीत. विशेष्तः महाभारत मालिकेत आवाज लागत नसताना त्यांनी गाणे.
काही काही गाणी मात्र अगदी खास त्यांचीच आहेत. चलो इकबार हे मलाही अत्यंत आवडतं.

लेख अतिशय आवडला. महेंद्र कपूर यांची गाणी, खरच कधी आवर्जून ऐकली नाहीत. पण जेव्हा कधी ऐकली तेव्हा आवडली.
धन्यवाद या लेखासाठी. Happy

लेख आवडला. पण.. मला महेंद्र कपूर यांची काही गाणी आवडतात. पण म्हणजे संपूर्ण महेंद्र कपूर गायक आवडतो असे नव्हे.
'चलो इक बार'च्या संयत आविष्काराबद्दल सविस्तर लिहिलेले आहे. महेंद्र कपूर यांनी बरेच नंतर दुसर्‍या एका कंपनीच्या अल्बमसाठी गायलेले तेच गाणे पूर्ण ऐकवतही नाही. (बहुतेक एक पब्लिक पर्फॉर्मन्सचे रेकॉर्डिंग करून हा अल्बम काढलेला आहे. )मग संयत अविष्काराचे श्रेय कोणाला द्यायचे? डिट्टो तेरे प्यार का आसरा(लता) आणि हाथ आया है जबसे तेर हाथ में (आशा) दुर्दैवाने एफेम वर चलो इकबारचे हे नंतरचे व्हर्शन ऐकू येते.
काही काही गाण्यांसाठी महेंद्र कपूर यांनी एक खास सॉफ्ट आवाज लावला असे जाणवते. वरच्या लेखात न आलेले असे एक गाणे म्हणजे : सूर तेच छेडिता गीत उमटले नवे.
किशोरकुमारच्या मराठी गाण्यांचे कौतुक करावे असे त्यात काय आहे असा प्रश्न मला कधीचाच पडला आहे. कौतुक करणारे ती गाणी किशोरकुमारनी म्हटलीत यापेक्षा दुसरे काही बोलताना दिसत नाहीत.

@भरत मयेकर - मीही तो अल्बम ऐकलाय. मला वाटतं टी सीरीज ने तो काढला होता. खरोखरच ती गाणी ऐकवत नाहीत. स्वत:च्याच गाण्यांचं असं विडंबन त्याने का केलं असावं ? पैसा हा घटक असू शकेल त्याही पेक्षा कुणालाही "नाही" म्हणायचे नाही हा ही घटक असावा. हाच अनुभव मला मराठीतील प्रसिद्ध भावगीत गायक अरुण दाते यांनी पुर्वी एच. एम. व्ही. साठी गायलेली गाणे टी सीरीज साठी परत रेकॉर्ड केली ती ऐकताना आला. मुळात अरुणजींची पट्टी वरची आहे. त्यातही ऐन भरात असताना गायलेली गाणी आणि वयाच्या या टप्प्यावर ती गाताना होणारी दमछाक - वाईट वाटतं. सुरेश वाडकर ही माझे आवडते गायक. पण आजकाल वेगवेगळ्या समारंभात ते जेव्हा स्वतःची गाणी स्टेजवर सादर करतात तेव्हा बेसुर होतात, साथीदारांना तर - विशेषतः तालवादकांना - अक्षरशः त्यांना सांभाळायला तारेवरची कसरत करावी लागते.
यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही ! Happy

फार सुंदर लेख आहे. मला आवडतात महेंद्र कपूर. सर्वात आवडतं गाणं 'पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी'.