आज्जीचा बत्तासा.. (फक्त छोत्या पिल्लांसाठी)

Submitted by सत्यजित on 18 February, 2008 - 07:23

आ़जीने दिला बत्तासा वर आभाळात फेकला
आभाळातच अडकून त्याचा चांदोमामा झाला

वाटत चोरुन बप्पा रोज, माझा बत्तासा खातो
तरीच रोज चंद्र अस्सा छोटा छोटा होतो

हळुहळू करत त्याने सगळाच गटम केला
थांब म्हणालो, तुझ नाव सांगतो आज्जीला..

आजीच नाव घेताच एकदम गेला घाबरुन
देईन म्हाणाला बत्तासा पण थोडा थोडा करुन

एकच बत्तासा बप्पा, पुरवुन पुरवुन खातो.. बिच्चारा....!!
एकच बत्तासा बप्पा, पुरवुन पुरवुन खातो
थांब हं.. आज्जी कडुन मी अजुन एक घेतो

Sad "प्रसाद आहे" म्हणाली आज्जी, "एकच बत्तासा मिळेल"
अरे पण बप्पासाठीच घेतोय ना, हे तिला कसे कळेल?

आज्जी म्हणाली..

अर्धा पण खात नाहीस पण दोन बत्तासे घेतोस
तुझा उष्टावलेला अर्धा बप्पा समोर का ठेवतोस?

अगं आज्जी..
रोज चंद्र खाण्यापेक्षा त्याला बत्तासा खाऊ दे
फसवतोस मला म्हातारीला? चल मला जाउ दे..

आज्जी देत नाही म्हणुन हा, रोज चंद्र खातो
नाव सांगु का आज्जीला? म्हणताच, सगळा परत देतो... :))

हा.. हा घाबलला...

-सत्यजित

गुलमोहर: 

छोत्यांसाठी का मोठ्यांसाठीही चालेल की. छान आहे कविता.

मस्तच कविता रे सत्या. :))

पण काहीच्या काही कविता कशासाठी बर म्हटलय :))

आवडली कविता.. बालगीताला हवी तशी निरागस आहे Happy

मस्त नाटुकलं होइल रे हे , पिल्लांसाठी Happy
आवडलं

एकदम छान लिहिलंय. लहानपणी शाळेत असताना 'चंद्राच्या बदलत्या कला' ही संज्ञा पक्की व्हावी म्हणून आम्हाला 'चांदोबाचा अंगरखा' ही गोष्ट सांगितलेली बाईंनी, त्याची आठवण झाली ही कविता वाचून.

कित्ती मस्त कल्पना. आणि शब्द पण फार छान आहेत. शेवटचं वाक्य म्हटलं की मग तर छोट्याचा गालगुच्चा नक्की. Happy

सत्यजित, कसलं गोड लिहिलं आहेस रे!! एकदम मस्त!!

सत्यजीत

इतकी गोड निरागस कविता...पिल्लेच नाहीत...आम्ही मोठ्या पिल्लांनी पण खूप मजा घेतली...काहीच्या काही नाही हं... Happy

दीपिका जोशी 'संध्या'

मस्त निरागस कल्पना. माझ्या आजीकडुन एक उखाणा ऐकला होता. सुपभर लाह्या आणि मधे बत्तासा, त्याची आठवण झाली.

तुम्हा सगळ्यांचे खुप आभार !!! आभाळतला चंद्र बघताना निरगस डोल्यातल कुतुहल काही केल्या शब्दात मांडता येत नाही... देवबप्पा ही आपण रुजवलेली कल्पना आणि त्या बद्दलची पिल्लांची अत्मियता मला थक्क करते म्हणुन हा प्रयत्न. अजुन एक जुनी कविता येथे पोस्त करतो. आणि काही जुन्या बालकविता इथे सापडतील,
http://satyajit-m.blogspot.com आवडल्या तर नक्की कळवा...

मोठ्ठा पाउस लागला
धो धो पडायला
आभाळातला देवबप्पा
लागला असेल रडायला

देवबप्पाने हट्टाचा
लावला असेल सपाटा
मग बप्पाच्या आईने
घातला असेल धपाटा

जोरात रडला देवबप्पा
आणि नद्या लागल्या वहायला
बप्पाला हसवायला
वारा लागला गायला

रडताना काढला फ़ोटो
म्हणून देवबप्पा चिडला
धडामकन आवज करून
आभाळातच पडला

पाणीच पाणी चोहीकडॆ
शाळेला दिली सुट्टी
तेव्हा पासून बप्पाशी
माझी जमली आहे गट्टी . . .

-सत्यजित

पाउस... मला फार आवडतो.

सत्यजित फारच गोड आणि निरागस झालीये कविता..... !
पावसाचं गाणं पण खूप सही आहे......छान बालगीत होईल Happy

आज सगळे जुने थ्रेड्स वाचतेय... खुप्पच गोड लिहितात तुम्ही. छोट्यांना नक्कीच आवडेल असे Happy

-प्रिन्सेस...

सत्याभाय .... येकदम फस्ट क्लास ! बेश्ट जमली आहे.

परागकण

मस्त बालगीत

अमोल
-----------------------------
काही बालगीत इथे पहा

अरे व्वा ! सुरेखच !! मायबोलीवर २००८ मधे येणंजाणं क्वचित व्हायचं त्यामुळे नजरेत आली नव्हती.

वा सुरेख!!! अतिशय गोड बालगीत..गोजिरवाणे, निरागस भाव जसेच्या तसे उतरलेत

इतके दिवस मायबोलीवर येत नसल्याचा पश्चात्ताप होतोय! किती किती मिसलंय मी Sad
सत्या, लै भारी.
मला पण खायचा बत्तासा, आजीनं लपवुन ठेवलेला, माझ्या डोळ्यात पाणी पाहुन दिलेला....