मायबोली गणेशोत्सव २०१३: संयोजकांच्या चष्म्यातून

Submitted by संयोजक on 26 September, 2013 - 08:11

|| श्रीगणेशाय नमः ||

एके दिवशी लॉगिन केल्यावर 'मायबोली गणेशोत्सवासाठी संयोजक हवेत' हा धागा दिसला.

''काम करायला आवडेल का'' अशी अ‍ॅडमिनने केलेली विचारणा आणि आम्ही उत्साहाने दिलेल्या होकारातून ५ ऑगस्ट २०१३ला तयार झालेलं हे संयोजक मंडळ.. जगाच्या चार कोपर्‍यात असणार्‍या संयोजकांची एकमेकांशी झालेली ओळख, गप्पा.. एकमेकांना साथ देत सापडलेला सुपंथ... खाच खळगे चुकवत पार केलेला रस्ता... आणि आजचं हे उद्यापन! मायबोली गणेशोत्सव २०१३ मधल्या सार्‍याच संयोजकांचा दिसायला साधा सरळ वाटणारा हा प्रवास आज पूर्णत्वाला पोहचतोय. यात साथ अनेकांनी दिली. त्या प्रवासाचा हा छोटासा मागोवा ..

संयोजक मंडळातील आमच्यापैकी अनेकजण पूर्णपणे नवखे होते. एकमेकांनाही आम्ही तसे अपरिचित होते. प्रत्येकाची बलस्थानं वेगळी होती अन मर्यादाही. ठरलेल्या सभासदांपैकी दोन सभासद कधीच न आल्याने त्यांची नावे रद्द झाली. मायबोलीच्या गणेशोत्सव मंडळातील उरलेल्या कार्यकर्त्यांनी पुढे जायचं ठरवलं. गणेशोत्सवाचे हे १४वे वर्ष. दरवेळी नवे आणि लोकांना रुचतील, आवडतील असा कार्यक्रम सादर करणं हे त्या त्या मंडळापुढे मोठं आव्हान असतं. अशा वेळी वेगवेगळे धागे उघडून, वेळप्रसंगी नेट-मीटिंग करत आमच्या चर्चा सुरू झाल्या.

उपक्रम कुठलाही असला तरी त्यात सादर केलेले संगीताचे, छोट्या दोस्तांचे सगळेच कार्यक्रम अगदी भरभरून प्रतिसाद मिळवतात. या दिशेने आम्ही सुरुवात करायची ठरवली. स्पर्धा, उपक्रम ठरवून झाले, पोस्टर्स बनवायला घेतली. तेवढ्यात अचानक हे काम करणार्‍यांपैकी एक संयोजक- नीलमपरीला -काही अपरिहार्य कारणांमुळे संयोजनातून बाहेर पडायला लागलं. आम्ही सगळेच हवालदिल झालो....! पण काही क्षणच... बाप्पाच्या आशिर्वादाने आमच्यातलेच काही इतर माबोसभासद मदतीला धावून आले आणि सगळी पोस्टर्स विनासायास तयार झाली आणि आम्ही पुढच्या कामाला लागलो. उदयनने आमच्या विनंतीवरुन तब्येत बरी नसतानाही खूप सुंदर माबोचा अक्षरगणेश तयार करुन दिला जो शेवटचं पोस्टर म्हणून वापरण्यात आला. याबद्दल त्याचे, तसेच पोस्टर संकल्पना द्यायला मंजूडीनेही खास मदत केली, याबद्दल तिचेही खूप खूप आभार!

''बाप्पाला पत्र'' आणि ''गणराज 'रंगी' नाचतो ''हे उपक्रम छोट्या दोस्तांसाठी निश्चित केले होतेच. याबद्दल चर्चा चालूच होत्या. त्यातून या कार्यक्रमांच्या रूपरेषा चाचपडत बदलत जाताना प्रत्येक कार्यक्रमाला रेखीव रूप येत होते. हा अनुभव आनंददायक होता. पुढे त्याला मिळालेला प्रतिसाद त्याहून आनंददायक होता. मुलांच्या मागण्या वाचून कधी मन हेलावले तर कधी जाम हसू आले, सोबतच एवढ्याश्या मुलांनी बाप्पाच नाही तर त्याच्या उंदीरमामाबद्दलही दाखवलेली काळजी अंतर्मुख करुन गेली.
आता याला उत्तर काय द्यावं? असा विचार बाप्पाही करत असेल इतक्यात शशांक पुरंदरे यांनी सुंदर शब्दात प्रत्येक बाळाला उत्तर दिलं आणि तिकडे बाप्पाने आणि इकडे संयोजकांनी 'हुश्श!' केलं.
''गणराज 'रंगी' नाचतो '' मध्ये मुलांनी कल्पकता दाखवून रंगवलेले विविध रंगातले बाप्पा बघायला खूप मजा आली. अगदी छोट्या बाळांचा सहभाग बघून भरून आलं.

'बाप्पाला पत्र' च्या निमित्ताने आमचं लक्ष पत्रसंवादाकडे वेधलं गेलं होतं. माणसामाणसातील, कुटुंबातील संवाद आज गतिमान जगात हरवत चालला आहे हे आपण सर्वजण पहातोच. मग 'पत्र' ही थीम पुढे नेण्यासाठी मोठ्यांसाठी 'पत्र सांगते गूज मनीचे' या पत्र-जोडी स्पर्धेची कल्पना साकारली. यावरही प्रतिसादांचा शंकांचाही भडिमार झाला, आम्ही नियम थोडे शिथिल करून अधिक कल्पनारंजनाला वाव दिला. या स्पर्धेलाही शेवटच्या दोन दिवसात सुंदर प्रतिसाद आले, काही विचारप्रवण, काही कल्पनारम्य, काही विनोदी. आम्हाला घेतलेल्या कष्टांचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.

"पूर्णब्रह्म" स्पर्धेचाही अनुभव असाच. चीज आणि/किंवा पनीर या मुख्य गटातील पाककृती स्पर्धेसाठी जाहीर केल्यापासून प्रतिसाद व शंकांचा भडिमार झाला. हे सर्व माबोकरांच्या चिकित्सक वृत्तीचे निदर्शक होते. या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला व चीज-पनीर गटातील तोंपासु पाककृतींचा खजिनाच आपल्यासमोर उघडला गेला.

उपक्रमांची रेलचेल हे यावेळचे वैशिष्ट्य होते. खूप विचार, चर्चा करूनही उपक्रम कमी करावेसे आम्हाला वाटले नाहीत कारण वेगवेगळे आकर्षक उपक्रम कोणाला ना कोणाला आवडतील असेच होते. नेहमी कविता न लिहिणार्‍या पण कवी-वृत्तीच्या तरबेज माबोकरांसाठी 'वस्तूंवर हायकू' हा अभिनव उपक्रम तसेच चारोळ्यांच्या भेंड्या होत्या. सुरेख वाचनीय अन कित्येक गमतीदारही प्रतिसाद आले.

सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात कुठून करायची हा प्रश्न कवठीचाफ्याच्या 'पुनरागमनं करोम्यहं!' ने आणि अवलच्या क्रोशाच्या गणराजाने एका क्षणात सोडवला... भाऊंच्या व्यंगचित्रांनी गणेशोत्सवात धमाल उडवून दिली. योग, रैना आणि मंडळी आणि चैतन्य यांच्या सुरावटीने कान, वातावरण, मन सगळंच तृप्त करुन सोडलं आणि अवंतिकाच्या अथर्वने बोबड्या बोलात बाप्पाला केलेलं नमन ऐकून प्रत्यक्ष बाप्पाचंही मन सुखावलं असेल.

प्रकाशचित्रांच्या झब्बूमध्येही खूप वैविध्य होते, लोकांनी मस्त मजा केली ह्या धाग्यावर. एक से बढकर एक फोटो पहायला मिळाले. यो रॉक्स, आशूचँप, उदयन, अतुलनीय यांनी आम्हाला त्यांच्याकडचा प्रचिंचा खजिना उघडून दिला आणि त्यातले निवडक फोटो वापरायची परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार!

याशिवाय ''माझ्या गावचा गणपती' ,'एकदा गणपतीत ना आमच्याकडे ' व 'निसर्गात/वस्तुमात्रात बाप्पा' अर्थात 'निर्गुण तू निराकार ' हेही उपक्रम होतेच. प्रतिसाद येत राहिले. गणेशोत्सव रंगत राहिला.
सगळे कार्यक्रम अपेक्षेपेक्षा चांगले झाले पण एस. टी .वाय .च्या संयोजनात काही कारणाने थोडा गोंधळ झाला. पण कवठीचाफा यांची 'सेव्ह द अर्थ ' येऊन विघ्नहरण झाले, लोकांनी अप्रतिम कल्पनाशक्ती दाखवून एस. टी .वाय .यशस्वी केला.

अगदी घरच्या अन गल्लीतल्याही गणेशस्थापनेपेक्षा अधिक थरारक असा हा सर्व अनुभव होता. वेगवेगळे टाइमझोन्स, प्रत्येकाच्या अडचणी (अन किती तर्‍हेच्या असतात त्या !) अशा गोष्टींवर मात करत उत्सव सुखाने संपन्न झाला, याचे कारण सर्व अडथळ्यांवर मात करत संयोजकांची कोअर टीम तास-न्-तास काम करत होती. हा अनुभव अविस्मरणीय होता.

शेवटी अ‍ॅडमिनचे, तसेच रूनी पॉटर यांचं सहकार्य... अ‍ॅडमिन यांच्याशिवाय कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. त्यांच्या मोलाच्या सूचना या कार्यक्रमाला लाभल्या.

यात कुणाचा उल्लेख राहिला असल्यास, तसेच उपक्रमादरम्यान नकळत काही कमी-जास्त झालं असल्यास, ते मोठ्या मनानं माफ करावं अशी समस्त मायबोलीकरांना विनंती.

बघता बघता गणेशोत्सव संपन्न झाला आहे. रात्रीचे दिवस करून जपलेल्या व्रताचं हे उद्यापन करत आहोत...

निरोपाचा क्षण नेहमीच चुटपूट लावतो.. आज आम्हालाही निरोप घेताना तीच हुरहुरती भावना व्यापते आहे . पण हा बाप्पांचाच परिपाठ आहे . ते येतीलच ना पुढल्या वर्षी, नव्या उन्मेषांचा, अनुभवांचा खजिना घेऊन , तेव्हा,

गणपती बाप्पा मोरया ! पुढल्या वर्षी लवकर या !! इतिश्री !!!

-संयोजक मंडळ
(सानी, चैत्राली, रिया, साती, पेरु, सुहास्य, चैतन्य दीक्षित, भारती )

श्रेयनामावली -
पोस्टर्स-चित्रे/शब्दयोजना - नीलमपरी, सानी,पेरू, रिया,भारती,सुहास्य,चैतन्य,साती
गणराज 'रंगी' नाचतो' - मूळ चित्र रिया
प्रशंसापत्रे - नीलमपरी, पेरू, सानी

व्यंगचित्रे - भाऊ नमसकर

एस. टी .वाय . - कवठीचाफा, बेफ़िकीर, नंदिनी

सर्व लेखनगायनादि सांस्कृतिक कार्यक्रम-
बासरीवादन तसेच '' जलतरंगी रंगले मन ''(मुलाखत)- चैतन्य दीक्षित
रूप अरूपी(निर्गुणी भजन)- सौजन्य रैना (गायन श्रुती पेंढारकर )
गणेशवंदना ''मातंग वदन आनंद सदन ''-सौजन्य रैना (गायन- पूर्णा,संगीतरचना- वेदवती गोपालस्वामी )
भजनः सगुण स्वरूप (योग)
क्रोशाचा गणपती- अवल
पुनरागमनं करोम्यहं! –कवठीचाफा
गणपती स्तोत्र-अथर्व (अवंतिका)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद !!!
महाराष्ट्रापासुन दुर असल्याने , आपले सण आले की एक हुरहुर/खंत/कमतरता असते मनात..
पण मायबोली गणेशोत्सव २०१३ ने ती कमतरता विसरण्यास भाग पाड्ले Happy
बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या !!! Happy

छान संयोजन होते.
पत्राच्या बाबतीत एक पत्र देऊन त्याला स्पर्धकांनी उत्तरे लिहावी, अशी योजना भविष्यात नक्की ठेवा.
प्रसादाच्या बाबतीत रोज एक तरी पदार्थ असायला हवा होता. एखाद्या दिवशी कुणी नाही पोस्ट केला तर अर्काईव्हमधला एखादा फोटो अवश्य टाकत जा.

उत्तम संयोजन...

यंदा घरचीच गडबड खूप असल्याने फार सहभाग घेता आला नाही..

तेव्हढं वरती स्टायच्या ऐवजी एसटीवाय केलंत तर बरं होईल.. Happy

संयोजक, गणेशोत्सवाचा सोहळा छानच झाला. आता अचानक भरपूर वेळ हाती असल्यासारखं वाटेल. Happy

सगळ्या संयोजकांचे आभार आणि कौतुक! Happy

प्रसादाच्या बाबतीत रोज एक तरी पदार्थ असायला हवा होता. एखाद्या दिवशी कुणी नाही पोस्ट केला तर अर्काईव्हमधला एखादा फोटो अवश्य टाकत जा.

खरं आहे.

सर्व सोहळा अतिशय देखणा, वैविध्यपूर्ण - खूप आवडला,

संयोजक तसेच यात भाग घेणारे मा बो कर, प्रोत्साहन देणारे मा बोकर, पडद्यामागील कलाकार अशा सर्वांच्याच सहकार्याने आणि श्रीकृपेने हे सर्व यथास्थित पार पडले.

त्यामुळे सर्व मा बो कर व संयोजक यांचे आभार, अभिनंदन आणि शुभेच्छाही....

विशेष आवडलेले -
''बाप्पाला पत्र'' आणि ''गणराज 'रंगी' नाचतो ''हे उपक्रम छोट्या दोस्तांसाठी निश्चित केले होतेच. याबद्दल चर्चा चालूच होत्या. त्यातून या कार्यक्रमांच्या रूपरेषा चाचपडत बदलत जाताना प्रत्येक कार्यक्रमाला रेखीव रूप येत होते. हा अनुभव आनंददायक होता. पुढे त्याला मिळालेला प्रतिसाद त्याहून आनंददायक होता. मुलांच्या मागण्या वाचून कधी मन हेलावले तर कधी जाम हसू आले, सोबतच एवढ्याश्या मुलांनी बाप्पाच नाही तर त्याच्या उंदीरमामाबद्दलही दाखवलेली काळजी अंतर्मुख करुन गेली. >>>>>> फारच गोड पत्रे लिहिली होती सार्‍याच छोट्या दोस्तांनी...... अजूनही त्यातली काही वाक्ये आठवत रहातात... या मुलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच ....

मनापासून धन्यवाद .....

छानच झाला गणेशोत्सव!

संयोजकांचे अभिनंदन, कौतुक आणि आभार Happy

संयोजकांचे अभिनंदन, कौतुक आणि आभारही. Happy
नव्या दमाचे तरुण पिढीतील माबोकर संयोजक म्हणून सहभागी होताना पाहूनही आनंद वाटला व त्यामुळेच हा उपक्रम असाच चिरकाल चालत राहील याची खात्री पटली.

अभिनंदन संयोजक मंडळ.

मायबोलीवरील कुठल्याही उपक्रमाचे संयोजन करणार्‍या निरनिराळ्या टाईम-झोन्समधल्या सभासदांची अंतिमत: 'अविस्मरणीय आणि थरारक अनुभव' अशीच प्रतिक्रिया होते.
किंबहुना, अशी प्रतिक्रिया झाली, याचा अर्थ सर्व संयोजकांनी झोकून देऊन काम केलं असं खुशाल समजावं. Happy