कश्मिरी अंगूर- गोड- पौर्णिमा

Submitted by पूनम on 16 September, 2013 - 02:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

ग्रूप- पनीर + फळ

साहित्यः
१) पनीर २०० ग्रॅम
२) साखर- २ वाट्या (साधारण पाव किलो)
३) मैदा- २ टटीस्पून
४) सफरचंद- दोन
५) मिल्क पावडर- ५० ग्रॅम
६) खजूर, काजू, बदाम- सर्व मिळून एक वाटी
७) दूध- एक लिटर
८) केशर- १५-२० काड्या

क्रमवार पाककृती: 

रसगुल्ले:

१) पनीर किसून घेणे (मी विकतचे पनीर आणले आहे. मूळ बंगाली पद्धत अर्थातच दूधात लिंबू पिळून पनीर घरी करायची आहे)
२) किसलेले पनीर मोकळे करून घेणे आणि भरपूर मळून घेणे. मळताना त्यात दोन चमचे मैदा घालणे. सगळा मिळून एक मऊ गोळा करून घेणे. त्याचे छोटे छोटे रसगुल्ले करणे. रसगुल्ला अगदी छोटा असावा.
३) पाणी उकळायला ठेवणे. सहा वाट्या पाण्याला एक वाटी साखर घालणे. साखर विरघळवून घेणे. पाणी उकळले की त्यात रसगुल्ले घालून भांड्यावर झाकण ठेवणे. पाच-सात मिनिटानी झाकण काढून बघणे. रसगुल्ले आकाराने जवळपास दुप्पट झाले असतील आणि पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तरंगत असतील.

सफरचंद रबडी:
१) खजूर, काजू, बदाम- भिजवून ठेवणे. पाव वाटी दुधात केशराच्या काड्या भिजत घालणे.
२) दोन सफरचंदांची सालं काढून त्याचा कीस करून घेणे. कीसात दोन चमचे साखर घालून कीस शिजवून घेणे.
३) दूध उकळायला ठेवणे. सतत ढवळत रहाणे. दूध निम्म्यापर्यंत आटले की त्यात साखर घालून परत उकळवणे.
४) थोड्या दुधात दूध पावडर एकत्र करून ते मिश्रण दुधात घालणे.
५) पाण्यात भिजवलेल्या खजूर, काजू आणि बदामाची पेस्ट करून घेऊन ती दुधात घालणे.
६) दूध पुरेसे आटले की गॅस बंद करणे आणि रबडी रूम टेम्परेचरला थंड होऊ देणे.
७) रबडी किंचीत गार झाली की किसून शिजवलेले सफरचंद त्यात एकत्र करून नीट एकजीव करणे.
८) रबडी जशी निवत जाईल, तशी घट्ट होत जाईल. रूम टेम्परेचरला आली, की फ्रीजमध्ये ठेवणे.

सर्व्ह करताना:
१) रसगुल्ल्यातील साखरेचा पाक/ पाणी चमच्याने दाबून काढून टाकणे. ते रसगुल्ले बाऊलमध्ये ठेवणे.
२) वरून गार सफरचंद रबडी घालणे.

कश्मिरी अंगूर आस्वाद घेण्यासाठी तयार आहेत.

angoor1.jpg

वाढणी/प्रमाण: 
२०-२५ रसगुल्ले होतील
माहितीचा स्रोत: 
रसगुल्ल्यांची कृती इन्टरनेटवरून घेतली. सफरचंद रबडी- कॉमन सेन्स आणि स्वयंपाकाच्या अनुभवातून.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतोय हा प्रकार! तू ज्या सहजतेनं लिहिलंयस त्यावरून तर जमतील असं वाटतंय. पण गोड पदार्थ करताना आत्मविश्वास पळून जातो. तरी पण प्रयत्न करून बघायला पाहिजे एकदा.

पौर्णिमाला हसताय का? संयोजकांनीच ती स्वतःचं वर्णन करवून घ्यायची सोय केलेली आहे >>>>
सहमत!
असो............पण पदार्थही गोडच हं अगदी!

पोर्णिमा,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पूर्णब्रह्म' असं लिहा.

रसगुल्ल्याच्या आतापर्यंत पाहिलेल्या रेसिपीज खूप किचकट वाटल्या होत्या. तुम्ही दिलेली कृती सोपी वाटतेय.
रसगुल्ले भारी दिसताहेत.
रबडी पण मस्त .

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383

अभिनंदन, पूनम.

मुंबई-पुणे अंतर काही फार नाही. एखाद दिवशी निगुतीनं कश्मिरी-अंगूर करून माझ्याकडे घेऊन आल्यास लाल सतरंजी अंथरून स्वागत केले जाईल.

धन्यवाद धन्यवाद Happy

ज्या ३८ लोकांनी मला मत दिलं त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. आपल्या मताचा स्क्रीनशॉट मला पाठवल्यास, एक बाऊल कश्मिरी अंगूर प्राप्त करण्यास आपण पात्र ठराल Proud

मामी Lol मुंबई-पुणे हे अंतरही फार नाही. तूच माझ्याकडे ये. कश्मिरी अंगूर + हिरवी सतरंजी असे तुझे स्वागत करेन Proud

कश्मिरी अंगूर + हिरवी सतरंजी असे तुझे स्वागत करेन फिदीफिदी>>> Lol

आपल्या मताचा स्क्रीनशॉट मला पाठवल्यास, एक बाऊल कश्मिरी अंगूर प्राप्त करण्यास आपण पात्र ठराल >>>> हे आधी जाहिर केले नव्हते. ये न्याव नहीं अन्याव हय. Proud

Pages