भारतीय सणांचे अनर्थशास्त्र
त्या दिवशी भल्या पहाटेच चक्रधर माझ्याकडे आला होता. त्याला माझ्याकडून प्रवाशीबॅग हवी होती पंढरपूरला जायला. असा अचानक चक्रधर पंढरपूरला जायची तयारी करतोय हे ऐकून मी उडालोच. आदल्या दिवशीच माझे त्याच्याशी बोलणे झाले होते. एका खासगी कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला चलतोस का म्हणून विचारले तर म्हणत होता की, त्याला निदान एक पंधरवडा तरी अजिबात फुरसत नाहीच. शेतीची आंतरमशागत करायचीय, फवारणी करायचीय, निंदन-खूरपण करायचेय. अर्थात तो खोटेही बोलत नव्हता. त्याचे शेत माझ्या शेतापासून थोड्याशाच अंतरावर असल्याने मला त्याच्या शेतीची आणि शेतीतील पिकांची इत्थंभूत माहिती होती.
चक्रधर शेती करायला लागल्यापासून पहिल्यांदाच त्याच्या शेतीत इतकी चांगली पिकपरिस्थिती होती. यंदा त्याने छातीला माती लावून सार्या गावाच्या आधीच कपाशीची धूळपेरणी उरकून टाकली होती. पावसानेही आपला नेहमीचा बेभरंवशाचा खाक्या सोडून चक्रधरला साथ दिली आणि त्याची कपाशीची लागवड एकदम जमून गेली. नशीब नेहमी धाडसी लोकांनाच दाद देत असते याची प्रचिती यावी असाच हा प्रसंग होता. त्यामुळे हुरूप आलेला चक्रधर दमछाक होईपर्यंत शेतीत राबायला लागला होता. त्याला विश्वास होता की, यंदा आपली "इडापिडा टळणार आणि सावकाराच्या पाशातून मुक्ती मिळणार". भरघोस उत्पन्न आले आणि कर्मधर्म संयोगाने जर भावही चांगले मिळालेत तर ते अशक्यही नव्हते. त्यामुळे कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला येत नाही म्हटल्यावर मलाही फारसे नवल वाटले नाही.
पण चक्रधर आता असा अकस्मात पंढरपूरला जायची तयारी करतोय हे मला अनपेक्षित होते. नेमके काय गौडबंगाल आहे हे जाणून घ्यायची माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी प्रथम त्याच्या हातात प्रवाशी बॅग दिली, प्रवासाला शुभेच्छा दिल्या, येताना माझ्यासाठी पांडुरंगांचा प्रसाद घेऊन यावा, अशी विनंती केली आणि मग हळूच विचारले होते,
"काय चक्रधर, असा अचानक कसा काय बेत आखला बुवा पंढरपूरचा?"
"आरं, मी कसला काय बेत आखतो पंढरीचा? तो पांडुरंगच मला बोलवायला आलाय ना स्वतःहून" इति चक्रधर.
"स्वतःहून थेट पांडुरंगच आला तुला निमंत्रण द्यायला?" आश्चर्याने डोळे विस्फारून मी विचारले.
"हं मग? इच्छा त्या पांडुरंगाची. दुसरं काय?" चक्रधर निर्विकारपणे सांगत होता.
"अरे, पण मी तर ऐकलंय की पांडुरंग निर्गुण-निराकार असतो. शिवाय तो बोलत पण नसतो" या विषयातील आपले तुटपुंजे ज्ञान उगाळत मी बोललो.
"तसं नाही रे, पंढरीचा विठोबा स्वप्नात आलाय तो त्या रावसाहेबांच्या" माझ्या प्रश्नाचा उबग आल्यागत चक्रधर बोलत होता. पण आता मला संवाद थांबवणे शक्य नव्हते. माझी उत्कंठा शिगेला पोचली होती.
"रावसाहेबांच्या स्वप्नात? रावसाहेब आणि तुला, दोघांनाही बोलावलं होय?" मी प्रश्न फेकलाच.
"आरं बाबा, तसं नाही रे. आत्ता पहाटेपहाटे विठोबा-रुक्मिणी दोघंबी रावसाहेबांच्या स्वप्नात आलेत आणि रावसाहेबांना आदेशच दिला की चक्रधरला तातडीने पंढरीला पाठवून दे. बिचारे रावसाहेब धावतपळत माझ्याकडे आलेत आणि म्हणालेत की, तू आताच्या आत्ता सकाळच्या गाडीने तातडीने पंढरपूरसाठी नीघ. मी पैशाची अडचण सांगायच्या आधीच रावसाहेबांनी माझ्या हातावर जाण्यायेण्याला पुरून उरतील एवढे पैसे पण ठेवलेत. लई मायाळू माणूस आहे बघा आपले रावसाहेब." माझ्या प्रश्नाच्या सरबत्तीला वैतागलेल्या चक्रधरने एका दमात सगळे सांगून टाकले आणि झपाझप पावले टाकत निघून गेला.
पंढरीची वारी करून चक्रधर जेव्हा परतला तेव्हा सारेच काही बदललेले होते. फवारणी अभावी कपाशीची वाढ खुंटून झाड खुरटले होते. मशागत व खुरपणी अभावी तणांची बेसुमार वाढ झाली होती. आल्याआल्या मशागत सुरू करावी तर पाऊस सुरू झाला होता. पाऊस नुसताच सुरू झाला नव्हता तर ठाण मांडून बसला होता. आकाशातील ढग पांगायचे नावच घेईना. म्हणजे झाले असे की, जेव्हा उघाड होती आणि मशागत करण्यायोग्य स्थिती होती तेव्हा चक्रधर पंढरपुरात होता आणि आता चक्रधर शेतात होता तर पावसामुळे मशागतीचे काम करणे अशक्य झाले होते. शेवटी तणाची वाढ एवढी झाली की शेतात जिकडेतिकडे गवतच गवत दिसत होते. कपाशी गवताखाली पूर्णपणे दबून गेली होती. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. एकावर्षात सावकाराच्या म्हणजे रावसाहेबाच्या कर्जाच्या पाशातून मुक्त व्हायची गोष्ट दूर, उलट कर्जबाजारीपणाचा डोंगरच वाढत जाणार होता.
रावसाहेब सावकार मात्र आनंदी होते. त्यांनी स्वप्न पडल्याची मारलेली थाप त्यांना मस्तपैकी कामी आली होती. ऋणको जर स्वयंपूर्ण झाला तर धनकोची दुकानदारी कशी चालेल? त्यासाठी ऋणको नेहमीच कर्जात बुडूनच राहावा, हीच धनकोची इच्छा असते. त्यासाठीच नाना तर्हेच्या कॢप्त्या लढविण्याचे कार्य धनकोद्वारा अव्याहतपणे चाललेले असते.
मी जेव्हा ही गोष्ट अनेकांना सांगतो तेव्हा त्यांना सावकाराचाच राग येतो. कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याचीही भाषा केली जाते मात्र शेतीच्या ऐन हंगामातच पंढरपूरची यात्रा का भरते? याचे उत्तर कोणीच देत नाही. पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तवर्गामध्ये शेतकरी समाजच जास्त आहे. ज्या वेळी शेतकर्यांनी आपल्या शेतीतच पूर्णवेळ लक्ष द्यायची गरज असते, नेमकी तेव्हाच आषाढी किंवा कार्तिकीची महिमा का सुरू होते? याचा धार्मिक किंवा पुराणशास्त्रीय विचार करण्यापेक्षा तार्किक पातळीवर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
संपूर्ण भारतवर्षात शेतीचा हंगाम सर्वसाधारणपणे जून महिन्यामध्ये सुरू होतो आणि डिसेंबर मध्ये मुख्य हंगाम म्हणजे खरीप हंगाम संपतो. विचित्र गोष्ट अशी की, भारतातील सर्व मुख्य सण याच काळात येतात. जून मध्ये हंगाम सुरू झाला की शेतीच्या मुख्य खर्चाला सुरुवात होते. आधीच कर्ज काढून शेती करणार्याला हे सण आणखीच कर्जात ढकलायला लागतात. या सणांच्या खर्चातून शेतकर्याला बाहेर पडताच येणार नाही, अशी पुरेपूर व्यवस्था झालेली आहे, हेही ठळकपणे जाणवते. या काळात येणार्या सर्व सणांचे त्या-त्या सणानुरूप करावयाच्या पक्वान्नाचे मेनू ठरलेले आहेत. नागपंचमीला करंजी, लाडू, चकल्या कराव्या लागतात. रक्षाबंधनाला राखी बांधायला भावाने बहिणीकडे किंवा बहिणीने भावाकडे जायचेच असते. मग एकाचा खर्च प्रवासात होतो तर दुसर्याचा पाहुणचार करण्यात. पोळा आला की बैलाला सजवावेच लागते. घरात गोडधड रांधावेच लागते. त्यातही एखाद्या चाणाक्ष काटकसरी शेतकर्याने पोळ्यानिमित्त घरात पंचपक्वान्न करून खाण्यापेक्षा तेवढ्याच पैशात शेतामध्ये दोन रासायनिक खताची पोती घालायचे ठरवले तरी ते शक्य होत नाही कारण या दिवशी शेतकर्याने आपल्या घरी गडीमाणूस जेवायला सांगणे, हा रितिरिवाज लावून दिल्या गेला आहे. परका माणूस घरात जेवायला येणार असल्याने पंचपक्वान्न करणे टाळताच येत नाही. अशा तर्हेने शेतकर्याला खर्चापासून परावृत्त होण्याचा मार्गच बंद करून टाकल्या गेला आहे. शिवाय पोळा हा तीन दिवसाचा असतो. वाढबैल, बैल आणि नंदीपोळा. हे तीन दिवस बैलाच्या खांद्यावर जू देता येत नाही. मग होते असे की जेव्हा उघाड असते आणि शेतात औतकाम करणे शक्य असते, त्यावेळेस पोळा असल्यामुळे काम करता येत नाही. पोळा संपला आणि जरका लगेच पाऊस सुरू झाला तर मग पावसामुळे काम करता येत नाही. कधी कधी या तर्हेने आठवडा किंवा चक्क पंधरवडा वाया जातो. मग त्याचे गंभीर परिणाम पिकांना भोगावे लागतात.
हरितालिका, ऋषिपंचमी, मंगळागौर, कान्होबा, महालक्ष्मी-गौरीपुजन, श्रावणमास याच काळात येतात. आखाडी व अखरपख(सर्व पितृदर्श अमावस्या) या सणांचा मारही खरीप हंगामालाच सोसावा लागतो. गणपती बाप्पा आले की ठाण मांडून बसतात. शारदादेवी, दुर्गादेवी यांचे नवरात्र पाळायचे नाही म्हटले तर त्यांचा प्रकोप होण्याची भिती मनात घर करून बसली असते शिवाय यांना यायला आणि जायला गाजावाजा व मिरवणूक लागते. बाप्पांना दहा-पंधरा दिवस मोदक पुरवावेच लागतात. बदाम, नारळ खारका द्याव्याच लागतात. दुर्गादेवीची ओटी भरावीच लागते. ते संपत नाही तोच दसरा येतो, दसर्याची नवलाई संपायच्या आधीच भुलोजी राणाच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या भुलाबाई येतात. भोंडला, हादग्याला जुळूनच कोजागरी येते.
शेतीचा हंगाम अगदी भरात असतो. ज्वारी हुरड्यावर, कपाशी बोंडावर आणि तुरी फ़ुलोर्यावर येण्याला सुरुवात झालेली असते. अजून पीक पक्व व्हायला, बाजारात जायला आणि शेतकर्याच्या घरात पैसा यायला अजून बराच अवकाश असतो आणि तरीही आतापर्यंत डबघाईस आलेल्या शेतकर्याचे कंबरडे मोडण्यासाठी मग आगमन होते एका नव्या प्रकाशपर्वाचे. दिव्यांची आरास आणि फटक्याच्या आतषबाजीचे. एकीकडे कर्ज काढून सण साजरे करू नये म्हणून शेतकर्याला वारंवार आवाहन करणार्या शहाण्यांचे पीक येते मात्र दुसरीकडे हे सर्व सण शेतकर्यांच्या दारासमोर दत्त म्हणून उभे ठाकत असते. दिवाळी जसा प्रकाश आणि आतषबाजीचा सण आहे तसाच पंचपक्वान्न व वेगवेगळे चवदार पदार्थ करून खाण्याचा सण आहे. शेतकर्याने जरी सण साजरा करायचे नाही असे ठरवले तर शेजार्याच्या घरातून खमंग वासाचे तरंग उठत असताना शेतकर्याच्या मुलांनी काय जिभल्या चाटत बसायचे? दिवाळीला नवे कापड परिधान करायचे असते. नवीन कापड खरेदीसाठी पुन्हा कर्ज काढायचे किंवा कापड दुकानातून उधारीवर खरेदी करायची. लक्ष्मीपूजनासाठी स्पेशल दिवस नेमला गेला आहे. शेतीत पिकविलेला कोणताच शेतमाल जर विक्रीस गेला नसेल तर शेतकर्याच्या घरात लक्ष्मी तरी कुठून येणार? मग लक्ष्मीपूजन तरी कोणत्या लक्ष्मीचे करायचे? शेतकरी ज्या लक्ष्मीचे पूजन करतो, ती लक्ष्मी उसणवारीची असून तिचे मालकीहक्क सावकार किंवा बॅंकेकडे असतात. त्याच्या घरावर झगमगणार्या आकाशदिव्यांचे कॉपीराईटस जनरल स्टोअरवाल्याच्या स्वाधीन आणि घरात तेवणार्या दिवावातीतील तेलाचे सर्वाधिकार किराणा दुकानदाराच्या ताब्यात असतात. शेतीचे खर्च आणि या सर्व सणांचे खर्च भागवण्यासाठी शेतातील उभे पीक शेतकर्याच्या घरात पोचायच्या आधीच गहाण झालेले असते. या सर्व सणांनी शेतकर्याला पुरेपूर कर्जबाजारी करून त्याच्या कमरेला धडूतही शिल्लक ठेवायचे नाही, असा निर्धारच केलेला दिसतो.
आणि सर्वात महत्त्वाची आणि उपराटी बाब अशी की डिसेंबरमध्ये माल बाजारात जायला लागला आणि शेतकर्याच्या घरात पैसा यायला लागला की अचानक सणांची मालिका खंडीत होते. गाढवाच्या सिंगाप्रमाणे सण नावाचा प्रकारच गायब होतो. डिसेंबर नंतर जे सण येतात ते निव्वळच बिनखर्चिक असतात. "तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला" असे म्हणत तिळगुळाच्या भुरक्यावरच तिळसंक्रांत पार पडते. बारा आण्याच्या रंगामध्ये होळीची बोळवण केली जाते. तांदळाची खीर केली की अक्षय तृतीया आटोपून जाते. खरीप हंगामात येणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी घराघरात साजरी केली जाते. मात्र उन्हाळ्यात येणारी रामनवमी व हनुमान जयंती केवळ मंदिरातच साजरी केली जाते आणि शेतकर्यांना पदरचा खडकूही न खर्च करता फुकटातच प्रसाद खायला मिळतो. म्हणजे असे की शेतकर्याच्या घरात जेव्हा त्याच्या कमाईचा पैसा येतो, तेव्हा त्याने त्या पैशाने सण वगैरे साजरे करण्याची अजिबात सोय नाही. स्वतः मिळविलेल्या मिळकतीतून नवीन कपडे खरेदी करायचे नाहीत. स्वत:च्या मिळकतीच्या पैशाने गोडधड-पंचपक्वान्ने करून मुलाबाळांना खाऊ घालायची नाहीत. बहिणीने भावाच्या घरी किंवा बापाने पोरीच्या घरी जायचे नाही. केवळ आणि केवळ माल विकून पैसा आला की त्याने किराणा, कापड दुकानाची उधारी फेडायची. बॅंका किंवा सावकाराची कर्जफेड किंवा व्याज फेड करायची आणि पुढील हंगामातील शेतीसाठी नव्याने कर्ज घ्यायला तयार व्हायचे. अजबच तर्हा आहे या कृषिप्रधान म्हणवणार्या देशातील सणांच्या संस्कृतीची.
सणांच्या निर्मितीमागचे ऐतिहासिक महत्त्व विशद करणारे पुराणशास्त्री काहीही म्हणोत, परंतु शेतीमधल्या मिळकतीचा संचय शेतकर्याच्या घरात होताच कामा नये, शेतकरी कायमच कर्जबाजारी राहावा हा उद्देश स्पष्टपणे डोळ्यासमोर ठेवूनच सणांची निर्मिती आणि रीतिरिवाज अगदी प्राचीन काळापासून नियोजनबद्धरितीने आखल्या गेले आहे, हे उघड आहे. ज्या हंगामात शेतीमध्ये शेतकर्याने स्वतःला झोकून देऊन कामे करायची असतात त्याच काळात इतक्या सणांचा बडेजाव शेतीव्यवसायाला उपयोगाचा नाही. उत्पादनासंबंधी आवश्यक तो खर्च करावयाच्या काळात सणासारख्या अनुत्पादक बाबीवर अनाठायी खर्च करणे, शेतीव्यवसायाला कधीच फायदेशीर ठरू शकणार नाही. सणांचे अनर्थशास्त्र शेतीच्या अर्थशास्त्राला अत्यंत मारक ठरले आहे, ही खूणगाठ मनाशी बांधूनच पुढील वाटचाल होणे अत्यंत गरजेचे आहे.
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------
(पूर्वप्रकाशित - देशोन्नती दिवाळी अंक-२०१२)
सॉरी नंदिनी अगं मला ते
सॉरी नंदिनी अगं मला ते गावजेवण नव्हते म्हणायचे. जेव्हा घरातल्या मुला मुलीचे लग्न ठरते तेव्हा बरेचसे गरीब थरातील लोक ( आर्थिकदृष्ट्या गरीब मग ते शेतकरी, कामगार कुठलेही का असेना) अख्ख्या गावाला त्या लग्नाला बोलवतात, भलेही ऐपत असेल नसेल आणी त्यांना आधी कुणी बोलावले असेल नसेल तरीही. हे मी पाहिलय म्हणून लिहीले की असे गावजेवण नको की जे लग्नाच्या खर्चाबरोबर इतरही खर्चाचा बोजा त्या कुटुंबावर टाकेल.
मामी एखाद्या शेतकर्याला आता
मामी
एखाद्या शेतकर्याला आता मायबोलीचे सदस्यत्व घ्यायला लावू आणि त्याची मुटेसाहेबांना सहमती किती आहे ते पाहू असे वाटायला लागलेले आहे.
जेव्हा घरातल्या मुला मुलीचे
जेव्हा घरातल्या मुला मुलीचे लग्न ठरते तेव्हा बरेचसे गरीब थरातील लोक ( आर्थिकदृष्ट्या गरीब मग ते शेतकरी, कामगार कुठलेही का असेना) अख्ख्या गावाला त्या लग्नाला बोलवतात, भलेही ऐपत असेल नसेल आणी त्यांना आधी कुणी बोलावले असेल नसेल तरीही. >> ओह, आले लक्षात. पण असे बोलावण्यामागचे कारण काय असावे?
बाकी, मुटेजींची कारणमीमांसा सॉलिड आहे. "मेडिकल उपचारांनी एका तसानंतर सर्पदंशावर परिणाम होत नाही" म्हणून जादूटोणा कायदा अवानश्यक, निरूपद्रवी आहे.
"शेतकरी कर्ज काढून सण साजरे करतात" म्हणून सणच बंद करायला हवेत. '
कधीतरी मूळ समस्येचा विचार करून बघा.
लेखातला काही भाग आवडला.
लेखातला काही भाग आवडला. ब-याचदा इतरांकडे बोटं दाखवून आपण आपलंच समाधान करत असतो किंवा कसं यावर मला स्वतःलाही विचार करायला आवडेल. यातला काही भाग असा आहे कि इथे सरळसरळ सांस्कृतिक युद्ध होईल. त्याची आवश्यकता वाटत नाही. जो भाग पटला नाही तो लगेच विनोदी कसा होईल ? बलिप्रतिपदा हा दिवाळीचा सण बळीराजाच्या पाडावाचा उत्सव आहे. शेतक-याला बळीराजा म्हणतात. या सणासाठी शेतकरी कर्ज काढतो. सण करतो. हा एक वादाचा विषय आहे. संघर्षाच्या ठिणग्या पडणारा भाग आहे. पण म्हणून दुर्लक्ष पण करता येत नाही. इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो असं म्हणणा-या शेतकरी कुटुंबातल्या बाया पहाटे उठून बलिप्रतिपदा सणाला करायची शात्रसंमत कर्तव्ये विधीवत करतात. दोन संस्कृतींचा संकर आहे हा. शिक्षण नाही, विद्याभ्यास हा धर्म नाही म्हटल्यावर शेतीच्या कामातून मिळणारा विरंगुळा आणि सणानिमित्ताने होणारं मनोरंजन हा काही शे वर्षे चालत आलेला मोठा भाग असणार. याबद्दल कुणालाच काही ठाम मत सांगता येणार नाही असं वाटतं. दीडशे वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती ही जवळ जवळ अपरिवर्तनीय ( अतिशय संथ गतीने बदलणारी) असल्याने त्या काळचं सामाजिक परिस्थितीबद्दलचं भाष्य हे त्याआधीच्या काही शतकांना लागू पडत असावं असं वाटतं. अनावश्यक प्रथांना फाटा देण्यासाठी सध्याच्या युगात कुणीही हात धरलेले नाहीत. आपले आपणच बदल घडवलेले बरे.
म्हणजे असे की शेतकर्याच्या
म्हणजे असे की शेतकर्याच्या घरात जेव्हा त्याच्या कमाईचा पैसा येतो, तेव्हा त्याने त्या पैशाने सण वगैरे साजरे करण्याची अजिबात सोय नाही. स्वतः मिळविलेल्या मिळकतीतून नवीन कपडे खरेदी करायचे नाहीत. स्वत:च्या मिळकतीच्या पैशाने गोडधड-पंचपक्वान्ने करून मुलाबाळांना खाऊ घालायची नाहीत. बहिणीने भावाच्या घरी किंवा बापाने पोरीच्या घरी जायचे नाही. केवळ आणि केवळ माल विकून पैसा आला की त्याने किराणा, कापड दुकानाची उधारी फेडायची. बॅंका किंवा सावकाराची कर्जफेड किंवा व्याज फेड करायची आणि पुढील हंगामातील शेतीसाठी नव्याने कर्ज घ्यायला तयार व्हायचे.
>>> हे म हा न विनोदी आहे.
मुटे, तुम्ही प्रांतवार
मुटे,
तुम्ही प्रांतवार शेतकर्यांची समृद्धी ह्यावर एखादा लेख लिहा बघू
म्हणजे,
१. विदर्भातला शेतकरी
२. कोकणातला शेतकरी
३. मराठवाड्यातला शेतकरी
४. पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी
इ.इ.
चक्रधराचे उदाहरण हे सणांशी
चक्रधराचे उदाहरण हे सणांशी संबंधित नसून शोषणाचे आहे. त्यामुळे पुढील लेखाशी त्याचा संबंध नाही.
>>> वा! शाब्बास. ज्ञानेश + १
नंदिनी, रश्मी म्हणतायत ते एका
नंदिनी, रश्मी म्हणतायत ते एका माणसाने स्वखर्चाने घातलेले गावजेवण.
लिंबूकाकांना धरा.........या
लिंबूकाकांना धरा.........या सर्वांना तेच जवाबदार आहेत.........
.
.
.
.
( नेहमी ते ओढवुन घेतात स्वतः वर..... म्हणुन आज त्यांच्यावर ढकलले ) ... :मुंब्रा: :कळवा: :ठाणे:
आणि त्या चक्रधराचं शेत
आणि त्या चक्रधराचं शेत तुमच्या शेतापासून जवळ आहे, त्यातल्या पिकावर तुमचं एरवी लक्ष असतं म्हणताय तर तो पंढरीच्या वारीला गेल्यावर तुम्ही का नाही लक्ष दिलं त्या पिकावर? शेजार्याला मदत करत नाहीत का शेतकरी? मग नंतर गळा का काढताय आता?
साती, ते नंतर आले लक्षात.
साती, ते नंतर आले लक्षात. माझ्या डोक्यात आधी ते शिमग्यातून किंवा जत्रेला वगैरे देवळांतून जेवण असतं तसं वाटलं होतं.
अख्ख्या गावाला बोलावून जेवायला घालायची ऐपत नाहीच आमची, तसला विचारदेखील करणार नाही.
लिंबुकाकांना धरा.
लिंबुकाकांना धरा.:हहगलो:
आणि त्या चक्रधराचं शेत
आणि त्या चक्रधराचं शेत तुमच्या शेतापासून जवळ आहे, त्यातल्या पिकावर तुमचं एरवी लक्ष असतं म्हणताय तर तो पंढरीच्या वारीला गेल्यावर तुम्ही का नाही लक्ष दिलं त्या पिकावर? शेजार्याला मदत करत नाहीत का शेतकरी?
>>
आता याला उत्तर म्हणून एक भाग अजुन येईल की "आम्ही किती एकमेकांना मदत करतो. मी अनेकजण कुठे कुठे जातात तेव्हा त्यांच्या शेतात पाणी, खत, फवारणी करतो." इ.
मुटे आता काहीही लिहायला
मुटे आता काहीही लिहायला लागलेले आहेत.
आगामी लेखांची शीर्षके:
१. देश स्वतंत्र झाल्यामुळे शेतीचे नुकसान
२. राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे साखरेचा भाव वाढतो
३. गझल अक्षरछंदात करणे मान्य न झाल्यामुळे जास्तीचा गहू फेकून द्यावा लागला.
मामी,तुम्ही नेहमी आउट ऑफ द
मामी,तुम्ही नेहमी आउट ऑफ द बॉक्स विचार करता.
भारीच प्रश्न!
१. देश स्वतंत्र झाल्यामुळे
१. देश स्वतंत्र झाल्यामुळे शेतीचे नुकसान
२. राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे साखरेचा भाव वाढतो
हे सत्यच आहे. यात अ आणि अ काय्ये?
राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे
राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे साखरेचा भाव वाढतो >> चुकल
सुट्ट्या असल्या की लोक ऑफिसमधे चहा पित नाहीत . त्यामुळे साखरेची मागणी कमी होते . त्यामुळे साखरेचा भाव पडतो . त्यामुळे ऊसाला भाव मिळत नाही आणी शेतकर्यांच नुकसान होत. त्यामुळे सगळ्या सुट्ट्या बंद केल्या पाहिजेत . अरे जमतय की मला पण
२. राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे
२. राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे साखरेचा भाव वाढतो >>>>>> चुक आहे..यात
भारतीय सणांमुळे साखरेचा भाव वाढतो
आणि
राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे लोक आळशी बनतात
मुटेजी तुमचा तबला डग्गा चालु
मुटेजी तुमचा तबला डग्गा चालु आहे. तुम्हाला सणही नकोत आणि सावकारही,
तुम्ही किंवा इतरांनी सण साजरे करायचे असतील तर ऐपती प्रमाणे करा किंवा नका करु जर तुमच्या जवळ सर्व सण झाल्या नंतर म्हणजे साधारणतः नोव्हेंबर / डिसेंबर मधे पैसा येईल . (जो काय येईल तो) त्यातील सावकाराची देणी झाल्यानंतर उरलेला येणार्या वर्षी काढु ;शकता. आणि सण साजरे करु शकता
सावकाराचेही बाबतीत आज बरेच शेतकरी आलेल्या पिकातुनच चांगले वाण काढुण पुढील वर्षासाठी घरीच बियाणे करीत आहेत. काही अंशी शेतकरी सावकारी पेचात अडकलेला आहे. बहुतेक शेतकरी जोडव्यवसाय करुन सधन आहेत. व आनंदाने सणही साजरे करीत आहे.
१४ फेब्रुवारीचा जो सण येतो
१४ फेब्रुवारीचा जो सण येतो त्याने प्रेम वाढीस लागतं. त्यासही लोकांचा विरोध आहे. लोकसंख्यावाढीची बीजं त्यात रोवली गेलीत असं एक प्रमेय एका खख (खळ्ळ खट्याक) विचारवंताने मांडलं होतं. आम्हाला तर आवडायचा हा सण. या सणाच्या अर्थशास्त्रासंबंधी बरेच लेख वर्तमानपत्रातून प्रसृत झाल्याचे आठवते. सणाचं काही अर्थशास्त्र असते हे त्या वेळी पहिल्यांदा कळाले.
चाकरमानी तरी वेग्ळे काय करतो
चाकरमानी तरी वेग्ळे काय करतो हो. क्रेडिट कार्डाची बिलेच भरत असतो आपण की.
साहेब मिड लाइफ क्रायसिस मधून जात आहेत का? उरीपोटी जपलेली सर्व गृहितके मोडून नवेच काही सुचते अश्यावेळी.
क्रेडिट कार्डाची बिलेच भरत
क्रेडिट कार्डाची बिलेच भरत असतो आपण की. >>>>> +१
राजाला दिवाळी माहीतच नाही
एलियन्ससुद्धा शेतकर्यांच्या
एलियन्ससुद्धा शेतकर्यांच्या विरुद्धच आहेत. पहा, साईन्स हा सिनेमा. त्यात एलियन भोळ्याभाबड्या ग्रॅहॅम हेसच्या शेतातच यान उतरवून पिकाचे नुकसान करतात. शेतकर्यांचे नुकसान करणे ही वैश्विक प्रवृत्ती आहे. त्याचा आपण निषेध करायला हवा.
. देश स्वतंत्र झाल्यामुळे
. देश स्वतंत्र झाल्यामुळे शेतीचे नुकसान
२. राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे साखरेचा भाव वाढतो
३. गझल अक्षरछंदात करणे मान्य न झाल्यामुळे जास्तीचा गहू फेकून द्यावा लागला.
>>> भारीये.
राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे साखरेचा भाव वाढतो >> चुकल स्मित
सुट्ट्या असल्या की लोक ऑफिसमधे चहा पित नाहीत . त्यामुळे साखरेची मागणी कमी होते . त्यामुळे साखरेचा भाव पडतो . त्यामुळे ऊसाला भाव मिळत नाही आणी शेतकर्यांच नुकसान होत. त्यामुळे सगळ्या सुट्ट्या बंद केल्या पाहिजेत . अरे जमतय की मला पण
>>>> जमलं जमलं. वेगळा धागा काढून चर्चा पुढे चालू ठेवा.
सण झाल्या नंतर म्हणजे
सण झाल्या नंतर म्हणजे साधारणतः नोव्हेंबर / डिसेंबर मधे पैसा येईल . (जो काय येईल तो) त्यातील सावकाराची देणी झाल्यानंतर उरलेला येणार्या वर्षी काढु ;शकता. आणि सण साजरे करु शकता
>> कायतरीच काय? असा शिळा पैसा वापरतं का कोणी? तुम्ही दर महिन्याला मिळणारा ताजा पैसा वापरणार आणि बिचार्या शेतकर्यांना आदल्या वर्षीचा शिळा पैसा वापरायला सांगता होय? लबाड कुठले!
ह्यातील एकही सण समजा
ह्यातील एकही सण समजा शेतकर्याने साजरा केला नाही तर काय होईल? देवीदेवता कोपतील की गावकरी वाळीत टाकतील? की बदनामी होईल? की आणखी काही? सक्तीने, ओढून ताणून, मारून मुटकून केलेल्या सणाची काय मजा? जर शेतकर्याला ही बळजबरी वाटत असेल तर त्याला सण साजरा करण्यापासून कोणी रोखले आहे? समजा नाही केला सण तर त्याला पोलिस येऊन अटक करतील की त्याची जमीन जप्त करतील की त्याला गावातून हाकलून लावतील?
ज्या गोष्टींबद्दल मुटे बोलत आहेत त्या सामाजिक रुढी आहेत. अनेक रुढी-परंपरा कालबाह्य झाल्या. आता त्या कित्येकांच्या स्मरणातही नाहीत. जर या रुढींनी शेतकर्याला त्रास होतो आहे तर त्याला त्या रुढींना अटकाव करण्यापासून कोणी अडवले आहे? पण जर त्याच्याच मनात असा कोणता बदल घडवून आणायची हिंमत किंवा तयारी नसेल तर कोणीही त्याच्या परिस्थितीत बदल घडवून आणू शकणार नाही. कर्ज काढून सण-लग्नकार्य-जेवणावळी, जत्रेतली अनाठायी उधळपट्टी, तमाशाच्या फडांवर - व्यसनात पैसा घालविणे या गोष्टी शेतकरी समाजात नाहीत का? पैसे कोठे वाचविता येतील? कशा प्रकारे नियोजन केल्यास त्याचा शेतकर्याला अधिकाधिक लाभ होईल? मनुष्यबळ, संसाधनांचे नियोजन कसे करता येईल? कोणत्या अनावश्यक बाबींना फाटा देता येऊ शकतो? कशा प्रकारे शेतकरी समाजाचे या बाबतीत प्रबोधन करता येऊ शकते... याबद्दलचे विचार वाचायला आवडतील.
लेखाच्या शिर्षकावरुनच अंदाज
लेखाच्या शिर्षकावरुनच अंदाज आला होता काय लिहीले असेल त्याचा.
मुटेजी, तुम्हाला प्रगत शेतकरी समजत होते. तुमच्या रुपाने एखाद्या का होईना भारतीय शेतकर्याच्या हातात इंटरनेटचे प्रभावी माध्यम आल्याचे बघुन खुप बरें वाटले होते. पण वर म्हटलय तसं तुमचं काहीतरी बिनसलय!
शुभेच्छा!
(No subject)
पूर्ण लेख वाचवला नाही.
पूर्ण लेख वाचवला नाही. प्रतिसादच वाचायला घेतले.
ज्ञानेश यांनी प्रतिसादात जे लिहिले आहे, तेच (सण-ऋतुचक्र-कृषीजीवनाची सांगड) एका मराठी कवितेच्या (लोककवी वामन कर्डक यांची थुई थुई धारा) संदर्भाने आत्ताच विद्यार्थ्यांना सांगितले.
मे महिन्यात दुष्काळी वातावरणात सण साजरे होत नाहीत असेही सांगितले.
कदाचित ऋतू सरकत असतील किंवा शेतीची पद्धत/ सायकल बदलत असेल त्यामुळे शेतकर्यांना स्वतःच्या पैशाने सण साजरे करता येत नसेल का?
पंढरीच्या वारीचं म्हणाल, तर सावता माळ्याचं उदाहरण आहे. संतांच्या रचनांमध्ये नाममाहात्म्यावरच भर आहे.
'तिकडे' पाठिंब्याचे प्रतिसाद देणारे 'इकडे' काय म्हणणार?
< गणपती बाप्पा आले की ठाण
< गणपती बाप्पा आले की ठाण मांडून बसतात. शारदादेवी, दुर्गादेवी यांचे नवरात्र पाळायचे नाही म्हटले तर त्यांचा प्रकोप होण्याची भिती मनात घर करून बसली असते शिवाय यांना यायला आणि जायला गाजावाजा व मिरवणूक लागते. बाप्पांना दहा-पंधरा दिवस मोदक पुरवावेच लागतात. बदाम, नारळ खारका द्याव्याच लागतात. दुर्गादेवीची ओटी भरावीच लागते. ते संपत नाही तोच दसरा येतो, दसर्याची नवलाई संपायच्या आधीच भुलोजी राणाच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या भुलाबाई येतात. भोंडला, हादग्याला जुळूनच कोजागरी येते.>
या परिच्छेदातील अनेक वाक्यांनी काही लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता आहे बरं!
Pages