भारतीय सणांचे अनर्थशास्त्र

Submitted by अभय आर्वीकर on 30 August, 2013 - 02:29

भारतीय सणांचे अनर्थशास्त्र

                 त्या दिवशी भल्या पहाटेच चक्रधर माझ्याकडे आला होता. त्याला माझ्याकडून प्रवाशीबॅग हवी होती पंढरपूरला जायला. असा अचानक चक्रधर पंढरपूरला जायची तयारी करतोय हे ऐकून मी उडालोच. आदल्या दिवशीच माझे त्याच्याशी बोलणे झाले होते. एका खासगी कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला चलतोस का म्हणून विचारले तर म्हणत होता की, त्याला निदान एक पंधरवडा तरी अजिबात फुरसत नाहीच. शेतीची आंतरमशागत करायचीय, फवारणी करायचीय, निंदन-खूरपण करायचेय. अर्थात तो खोटेही बोलत नव्हता. त्याचे शेत माझ्या शेतापासून थोड्याशाच अंतरावर असल्याने मला त्याच्या शेतीची आणि शेतीतील पिकांची इत्थंभूत माहिती होती.

                 चक्रधर शेती करायला लागल्यापासून पहिल्यांदाच त्याच्या शेतीत इतकी चांगली पिकपरिस्थिती होती. यंदा त्याने छातीला माती लावून सार्‍या गावाच्या आधीच कपाशीची धूळपेरणी उरकून टाकली होती. पावसानेही आपला नेहमीचा बेभरंवशाचा खाक्या सोडून चक्रधरला साथ दिली आणि त्याची कपाशीची लागवड एकदम जमून गेली. नशीब नेहमी धाडसी लोकांनाच दाद देत असते याची प्रचिती यावी असाच हा प्रसंग होता. त्यामुळे हुरूप आलेला चक्रधर दमछाक होईपर्यंत शेतीत राबायला लागला होता. त्याला विश्वास होता की, यंदा आपली "इडापिडा टळणार आणि सावकाराच्या पाशातून मुक्ती मिळणार". भरघोस उत्पन्न आले आणि कर्मधर्म संयोगाने जर भावही चांगले मिळालेत तर ते अशक्यही नव्हते. त्यामुळे कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला येत नाही म्हटल्यावर मलाही फारसे नवल वाटले नाही. 

                 पण चक्रधर आता असा अकस्मात पंढरपूरला जायची तयारी करतोय हे मला अनपेक्षित होते. नेमके काय गौडबंगाल आहे हे जाणून घ्यायची माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी प्रथम त्याच्या हातात प्रवाशी बॅग दिली, प्रवासाला शुभेच्छा दिल्या, येताना माझ्यासाठी पांडुरंगांचा प्रसाद घेऊन यावा, अशी विनंती केली आणि मग हळूच विचारले होते,

"काय चक्रधर, असा अचानक कसा काय बेत आखला बुवा पंढरपूरचा?"

"आरं, मी कसला काय बेत आखतो पंढरीचा? तो पांडुरंगच मला बोलवायला आलाय ना स्वतःहून" इति चक्रधर.

"स्वतःहून थेट पांडुरंगच आला तुला निमंत्रण द्यायला?" आश्चर्याने डोळे विस्फारून मी विचारले. 

"हं मग? इच्छा त्या पांडुरंगाची. दुसरं काय?" चक्रधर निर्विकारपणे सांगत होता.

"अरे, पण मी तर ऐकलंय की पांडुरंग निर्गुण-निराकार असतो. शिवाय तो बोलत पण नसतो" या विषयातील आपले तुटपुंजे ज्ञान उगाळत मी बोललो.

"तसं नाही रे, पंढरीचा विठोबा स्वप्नात आलाय तो त्या रावसाहेबांच्या" माझ्या प्रश्नाचा उबग आल्यागत चक्रधर बोलत होता. पण आता मला संवाद थांबवणे शक्य नव्हते. माझी उत्कंठा शिगेला पोचली होती.

"रावसाहेबांच्या स्वप्नात? रावसाहेब आणि तुला, दोघांनाही बोलावलं होय?" मी प्रश्न फेकलाच.

"आरं बाबा, तसं नाही रे. आत्ता पहाटेपहाटे विठोबा-रुक्मिणी दोघंबी रावसाहेबांच्या स्वप्नात आलेत आणि रावसाहेबांना आदेशच दिला की चक्रधरला तातडीने पंढरीला पाठवून दे. बिचारे रावसाहेब धावतपळत माझ्याकडे आलेत आणि म्हणालेत की, तू आताच्या आत्ता सकाळच्या गाडीने तातडीने पंढरपूरसाठी नीघ. मी पैशाची अडचण सांगायच्या आधीच रावसाहेबांनी माझ्या हातावर जाण्यायेण्याला पुरून उरतील एवढे पैसे पण ठेवलेत. लई मायाळू माणूस आहे बघा आपले रावसाहेब." माझ्या प्रश्नाच्या सरबत्तीला वैतागलेल्या चक्रधरने एका दमात सगळे सांगून टाकले आणि झपाझप पावले टाकत निघून गेला.

                 पंढरीची वारी करून चक्रधर जेव्हा परतला तेव्हा सारेच काही बदललेले होते. फवारणी अभावी कपाशीची वाढ खुंटून झाड खुरटले होते. मशागत व खुरपणी अभावी तणांची बेसुमार वाढ झाली होती. आल्याआल्या मशागत सुरू करावी तर पाऊस सुरू झाला होता. पाऊस नुसताच सुरू झाला नव्हता तर ठाण मांडून बसला होता. आकाशातील ढग पांगायचे नावच घेईना. म्हणजे झाले असे की, जेव्हा उघाड होती आणि मशागत करण्यायोग्य स्थिती होती तेव्हा चक्रधर पंढरपुरात होता आणि आता चक्रधर शेतात होता तर पावसामुळे मशागतीचे काम करणे अशक्य झाले होते. शेवटी तणाची वाढ एवढी झाली की शेतात जिकडेतिकडे गवतच गवत दिसत होते. कपाशी गवताखाली पूर्णपणे दबून गेली होती. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. एकावर्षात सावकाराच्या म्हणजे रावसाहेबाच्या कर्जाच्या पाशातून मुक्त व्हायची गोष्ट दूर, उलट कर्जबाजारीपणाचा डोंगरच वाढत जाणार होता. 

                 रावसाहेब सावकार मात्र आनंदी होते. त्यांनी स्वप्न पडल्याची मारलेली थाप त्यांना मस्तपैकी कामी आली होती. ऋणको जर स्वयंपूर्ण झाला तर धनकोची दुकानदारी कशी चालेल? त्यासाठी ऋणको नेहमीच कर्जात बुडूनच राहावा, हीच धनकोची इच्छा असते. त्यासाठीच नाना तर्‍हेच्या कॢप्त्या लढविण्याचे कार्य धनकोद्वारा अव्याहतपणे चाललेले असते. 

                 मी जेव्हा ही गोष्ट अनेकांना सांगतो तेव्हा त्यांना सावकाराचाच राग येतो. कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याचीही भाषा केली जाते मात्र शेतीच्या ऐन हंगामातच पंढरपूरची यात्रा का भरते? याचे उत्तर कोणीच देत नाही. पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तवर्गामध्ये शेतकरी समाजच जास्त आहे. ज्या वेळी शेतकर्‍यांनी आपल्या शेतीतच पूर्णवेळ लक्ष द्यायची गरज असते, नेमकी तेव्हाच आषाढी किंवा कार्तिकीची महिमा का सुरू होते? याचा धार्मिक किंवा पुराणशास्त्रीय विचार करण्यापेक्षा तार्किक पातळीवर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

                 संपूर्ण भारतवर्षात शेतीचा हंगाम सर्वसाधारणपणे जून महिन्यामध्ये सुरू होतो आणि डिसेंबर मध्ये मुख्य हंगाम म्हणजे खरीप हंगाम संपतो. विचित्र गोष्ट अशी की, भारतातील सर्व मुख्य सण याच काळात येतात. जून मध्ये हंगाम सुरू झाला की शेतीच्या मुख्य खर्चाला सुरुवात होते. आधीच कर्ज काढून शेती करणार्‍याला हे सण आणखीच कर्जात ढकलायला लागतात. या सणांच्या खर्चातून शेतकर्‍याला बाहेर पडताच येणार नाही, अशी पुरेपूर व्यवस्था झालेली आहे, हेही ठळकपणे जाणवते. या काळात येणार्‍या सर्व सणांचे त्या-त्या सणानुरूप करावयाच्या पक्वान्नाचे मेनू ठरलेले आहेत. नागपंचमीला करंजी, लाडू, चकल्या कराव्या लागतात. रक्षाबंधनाला राखी बांधायला भावाने बहिणीकडे किंवा बहिणीने भावाकडे जायचेच असते. मग एकाचा खर्च प्रवासात होतो तर दुसर्‍याचा पाहुणचार करण्यात. पोळा आला की बैलाला सजवावेच लागते. घरात गोडधड रांधावेच लागते. त्यातही एखाद्या चाणाक्ष काटकसरी शेतकर्‍याने पोळ्यानिमित्त घरात पंचपक्वान्न करून खाण्यापेक्षा तेवढ्याच पैशात शेतामध्ये दोन रासायनिक खताची पोती घालायचे ठरवले तरी ते शक्य होत नाही कारण या दिवशी शेतकर्‍याने आपल्या घरी गडीमाणूस जेवायला सांगणे, हा रितिरिवाज लावून दिल्या गेला आहे. परका माणूस घरात जेवायला येणार असल्याने पंचपक्वान्न करणे टाळताच येत नाही. अशा तर्‍हेने शेतकर्‍याला खर्चापासून परावृत्त होण्याचा मार्गच बंद करून टाकल्या गेला आहे. शिवाय पोळा हा तीन दिवसाचा असतो. वाढबैल, बैल आणि नंदीपोळा. हे तीन दिवस बैलाच्या खांद्यावर जू देता येत नाही. मग होते असे की जेव्हा उघाड असते आणि शेतात औतकाम करणे शक्य असते, त्यावेळेस पोळा असल्यामुळे काम करता येत नाही. पोळा संपला आणि जरका लगेच पाऊस सुरू झाला तर मग पावसामुळे काम करता येत नाही. कधी कधी या तर्‍हेने आठवडा किंवा चक्क पंधरवडा वाया जातो. मग त्याचे गंभीर परिणाम पिकांना भोगावे लागतात.

                 हरितालिका, ऋषिपंचमी, मंगळागौर, कान्होबा, महालक्ष्मी-गौरीपुजन, श्रावणमास याच काळात येतात. आखाडी व अखरपख(सर्व पितृदर्श अमावस्या) या सणांचा मारही खरीप हंगामालाच सोसावा लागतो. गणपती बाप्पा आले की ठाण मांडून बसतात. शारदादेवी, दुर्गादेवी यांचे नवरात्र पाळायचे नाही म्हटले तर त्यांचा प्रकोप होण्याची भिती मनात घर करून बसली असते शिवाय यांना यायला आणि जायला गाजावाजा व मिरवणूक लागते. बाप्पांना दहा-पंधरा दिवस मोदक पुरवावेच लागतात. बदाम, नारळ खारका द्याव्याच लागतात. दुर्गादेवीची ओटी भरावीच लागते. ते संपत नाही तोच दसरा येतो, दसर्‍याची नवलाई संपायच्या आधीच भुलोजी राणाच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या भुलाबाई येतात. भोंडला, हादग्याला जुळूनच कोजागरी येते. 

                 शेतीचा हंगाम अगदी भरात असतो. ज्वारी हुरड्यावर, कपाशी बोंडावर आणि तुरी फ़ुलोर्‍यावर येण्याला सुरुवात झालेली असते. अजून पीक पक्व व्हायला, बाजारात जायला आणि शेतकर्‍याच्या घरात पैसा यायला अजून बराच अवकाश असतो आणि तरीही आतापर्यंत डबघाईस आलेल्या शेतकर्‍याचे कंबरडे मोडण्यासाठी मग आगमन होते एका नव्या प्रकाशपर्वाचे. दिव्यांची आरास आणि फटक्याच्या आतषबाजीचे. एकीकडे कर्ज काढून सण साजरे करू नये म्हणून शेतकर्‍याला वारंवार आवाहन करणार्‍या शहाण्यांचे पीक येते मात्र दुसरीकडे हे सर्व सण शेतकर्‍यांच्या दारासमोर दत्त म्हणून उभे ठाकत असते. दिवाळी जसा प्रकाश आणि आतषबाजीचा सण आहे तसाच पंचपक्वान्न व वेगवेगळे चवदार पदार्थ करून खाण्याचा सण आहे. शेतकर्‍याने जरी सण साजरा करायचे नाही असे ठरवले तर शेजार्‍याच्या घरातून खमंग वासाचे तरंग उठत असताना शेतकर्‍याच्या मुलांनी काय जिभल्या चाटत बसायचे? दिवाळीला नवे कापड परिधान करायचे असते. नवीन कापड खरेदीसाठी पुन्हा कर्ज काढायचे किंवा कापड दुकानातून उधारीवर खरेदी करायची. लक्ष्मीपूजनासाठी स्पेशल दिवस नेमला गेला आहे. शेतीत पिकविलेला कोणताच शेतमाल जर विक्रीस गेला नसेल तर शेतकर्‍याच्या घरात लक्ष्मी तरी कुठून येणार? मग लक्ष्मीपूजन तरी कोणत्या लक्ष्मीचे करायचे? शेतकरी ज्या लक्ष्मीचे पूजन करतो, ती लक्ष्मी उसणवारीची असून तिचे मालकीहक्क सावकार किंवा बॅंकेकडे असतात. त्याच्या घरावर झगमगणार्‍या आकाशदिव्यांचे कॉपीराईटस जनरल स्टोअरवाल्याच्या स्वाधीन आणि घरात तेवणार्‍या दिवावातीतील तेलाचे सर्वाधिकार किराणा दुकानदाराच्या ताब्यात असतात. शेतीचे खर्च आणि या सर्व सणांचे खर्च भागवण्यासाठी शेतातील उभे पीक शेतकर्‍याच्या घरात पोचायच्या आधीच गहाण झालेले असते. या सर्व सणांनी शेतकर्‍याला पुरेपूर कर्जबाजारी करून त्याच्या कमरेला धडूतही शिल्लक ठेवायचे नाही, असा निर्धारच केलेला दिसतो.

                 आणि सर्वात महत्त्वाची आणि उपराटी बाब अशी की डिसेंबरमध्ये माल बाजारात जायला लागला आणि शेतकर्‍याच्या घरात पैसा यायला लागला की अचानक सणांची मालिका खंडीत होते. गाढवाच्या सिंगाप्रमाणे सण नावाचा प्रकारच गायब होतो. डिसेंबर नंतर जे सण येतात ते निव्वळच बिनखर्चिक असतात. "तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला" असे म्हणत तिळगुळाच्या भुरक्यावरच तिळसंक्रांत पार पडते. बारा आण्याच्या रंगामध्ये होळीची बोळवण केली जाते. तांदळाची खीर केली की अक्षय तृतीया आटोपून जाते. खरीप हंगामात येणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी घराघरात साजरी केली जाते. मात्र उन्हाळ्यात येणारी रामनवमी व हनुमान जयंती केवळ मंदिरातच साजरी केली जाते आणि शेतकर्‍यांना पदरचा खडकूही न खर्च करता फुकटातच प्रसाद खायला मिळतो. म्हणजे असे की शेतकर्‍याच्या घरात जेव्हा त्याच्या कमाईचा पैसा येतो, तेव्हा त्याने त्या पैशाने सण वगैरे साजरे करण्याची अजिबात सोय नाही. स्वतः मिळविलेल्या मिळकतीतून नवीन कपडे खरेदी करायचे नाहीत. स्वत:च्या मिळकतीच्या पैशाने गोडधड-पंचपक्वान्ने करून मुलाबाळांना खाऊ घालायची नाहीत. बहिणीने भावाच्या घरी किंवा बापाने पोरीच्या घरी जायचे नाही. केवळ आणि केवळ माल विकून पैसा आला की त्याने किराणा, कापड दुकानाची उधारी फेडायची. बॅंका किंवा सावकाराची कर्जफेड किंवा व्याज फेड करायची आणि पुढील हंगामातील शेतीसाठी नव्याने कर्ज घ्यायला तयार व्हायचे. अजबच तर्‍हा आहे या कृषिप्रधान म्हणवणार्‍या देशातील सणांच्या संस्कृतीची.

                 सणांच्या निर्मितीमागचे ऐतिहासिक महत्त्व विशद करणारे पुराणशास्त्री काहीही म्हणोत, परंतु शेतीमधल्या मिळकतीचा संचय शेतकर्‍याच्या घरात होताच कामा नये, शेतकरी कायमच कर्जबाजारी राहावा हा उद्देश स्पष्टपणे डोळ्यासमोर ठेवूनच सणांची निर्मिती आणि रीतिरिवाज अगदी प्राचीन काळापासून नियोजनबद्धरितीने आखल्या गेले आहे, हे उघड आहे. ज्या हंगामात शेतीमध्ये शेतकर्‍याने स्वतःला झोकून देऊन कामे करायची असतात त्याच काळात इतक्या सणांचा बडेजाव शेतीव्यवसायाला उपयोगाचा नाही. उत्पादनासंबंधी आवश्यक तो खर्च करावयाच्या काळात सणासारख्या अनुत्पादक बाबीवर अनाठायी खर्च करणे, शेतीव्यवसायाला कधीच फायदेशीर ठरू शकणार नाही. सणांचे अनर्थशास्त्र शेतीच्या अर्थशास्त्राला अत्यंत मारक ठरले आहे, ही खूणगाठ मनाशी बांधूनच पुढील वाटचाल होणे अत्यंत गरजेचे आहे.

                                                                                                                             - गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------
(पूर्वप्रकाशित - देशोन्नती दिवाळी अंक-२०१२)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुटेजी ,
आपला या विषयातला अभ्यास दांडगा आहेच . पण
शेतकरी कायमच कर्जबाजारी राहावा हा उद्देश स्पष्टपणे डोळ्यासमोर ठेवूनच सणांची निर्मिती आणि रीतिरिवाज अगदी प्राचीन काळापासून नियोजनबद्धरितीने आखल्या गेले आहे, हे उघड आहे. >> एवढा विचार खरच कुणी केला असेल हे काही पटत नाही .

सहीच विनोदी लेख. 'आपण शेतकर्‍यांचे एकमेव तारणहार' आहोत हा प्रचार चालू ठेवायचा असेल तर अशा प्रकारचे विनोदी, निव्वळ भंपक का असेनात, मुद्दे शोधायलाच हवेत. सगळं जग शेतकर्‍यांविरुद्ध कट करतंय, सगळं जग शेतकर्‍याला जगू देत नाहीय, अशी काल्पनिक भुतं उभी करायचे उद्योग सगळे.

सणावारांना पैसा खर्च होतो ना, मग कशाला करायचे आहेत सणवार कर्ज काढून? प्रबोधन करा की त्यावर लोकांचं! तो माणूस पंढरपुराला शेतीची कामं टाकून जायला निघाला तर तिथेच त्याला का नाही अडवलंत? तिथे त्याला 'माझ्यासाठी पण पांडुरंगाचा प्रसाद आण' म्हणायचं आणि नंतर त्याच्या झालेल्या नुकसानाबद्दल असले भंपक लेख लिहून हळहळ व्यक्त करायची.

म्हणजे असे की शेतकर्‍याच्या घरात जेव्हा त्याच्या कमाईचा पैसा येतो, तेव्हा त्याने त्या पैशाने सण वगैरे साजरे करण्याची अजिबात सोय नाही. <<<< पैशाला काय एक्स्पायरी डेट असते का? तेव्हा पैसा राखून नंतर सणांना वापरता येत नाही का? एखाद्या वर्षी पैसा आला की कर्जफेड करा, त्या वर्षी कुठल्याही सणाला कर्ज काढू नका, पुढच्या वर्षी आलेला पैसा स्वतःसाठी, पोराबाळांसाठी वापरा. पण हे शेतकर्‍यांनी सुरू केलं तर तुम्हांला गळे काढायला कारण काय उरणार?

वीट आला असले भंपक, खोटे गळे काढणारे लेख वाचून.

शेतकर्‍यांचे सुख आणि दु:ख [यातही अधिकपणे दु:खच] या दोन्ही घटकांविषयींचा श्री.गंगाधर मुटे यांचा अभ्यास वादातीत असाच असल्यामुळे 'चक्रधरा' चे रुपक त्यानी वापरून भारतीय सणांतील पोकळपणा अभ्यासू लिखाणातून दाखविला आहे. पण दुर्दैव असेही आहे की सर.....मी देखील गेली कित्येक वर्षे ग्रामीण भागात हिडत असतोय....अर्थात सरकारी कामाचा एक भाग म्हणून....आणि तिथेही सणांसमवेत मांसाहारी जेवणाचा महत्वाचा भाग असलेल्या 'जत्रा' नामक प्रकार पाहिलाय, आणि त्यावर अक्षरशः पाण्यासारखा उधळला जाणारा पैसाही पाहिलाय. पण याला कुणी 'रावसाहेब' सावकार जबाबदार असत नाही. जरूर एखादा रंगराव वा शामराव चार जादाचे पैसे कर्जाऊ आणत असेल, पण तो थेट सावकाराकडून न आणता गावातीलच पतसंस्थेकडून घेत असतो...[अर्थात हे मी पश्चित महाराष्ट्रापुरते बोलतोय]. ३६५ दिवसाच्या रखरखीत आयुष्यातील चार दिवस थंडाईचे, गोडधोडीचे असावेत हीच मूळ कल्पना आहे सणासुदींमागे.

मुद्दा असा की केवळ पंढरपूरला गेलेल्या चक्रधरालाच नव्हे तर या देशातील १ अब्ज लोखसंख्येला "देवाची सावली असावी आपल्या अंगणी' ची आस लागलेली असतेच. त्यामुळे प्रसंगी कर्जाऊ होऊनसुद्धा तो विठूरायाच्या दर्शनाला पाळीत उभारतोच. त्यात मला काही गैर वाटत नाही. कथेतील चक्रधराचे शेत वाळून मोडून गेले असे तुम्ही म्हणता.... म्हणजे याचा अर्थ त्याच्या घरी तो एकटाच आहे का ? तो पंढरपूरला जाणार म्हणजे त्याने शेतीबाबत काही पर्यायी सोय केली नसेल ?

असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात या विषयाच्या अनुषंगाने. पण सणाचे अर्थशास्त्र एकूणच गावकीचे अनर्थशास्त्र ठरू पाहात आहे हा युक्तीवाद स्वीकारण्यासारखा नाही.

अशोक पाटील

चक्रधराने उगाच विठोबावर आंधळी श्रद्धा ठेवण्यापेक्षा सावतामाळ्यासारखी आपल्या शेतातच उभ्या असलेल्या विठ्ठलाची सेवा करायला हवी होती.

दाढी मिशा, भगवी वस्त्रे घालून फसवणार्‍या आणि रावसाहेबासारख्या भोंदू मध्ये काय फरक?

सणावारांना पैसा खर्च होतो ना, मग कशाला करायचे आहेत सणवार कर्ज काढून?
>> +१

अगदी बरोबर! गाडगेबाबांनीदेखील सांगितले होते की कर्ज काढून सण करु नका, सत्यनारायण घालून गावजेवण घालू नका म्हणून.
सत्यनारायणाला काय हो, सव्वा किलो नाही तर सव्वा मूठ रव्याचा प्रसादही चालतो, पण नुसते तीर्थप्रसाद दिला तर लोक हसतील ना! मग काय काढा कर्ज आणि उधळा पैसे.

हे झाले सणावारांचे अनेक लोक असेही आहेत जे मुलांचे वाढदिवस कर्ज काढून साजरा करतात. तालुक्याला जावून केक, चिप्स, टोप्या असे काहीबाही आणून गावभर वाटतात.

लोक कर्जबाजारी होतात ते सण पाळून नव्हे तर उगाच सणावार थाटामाटात साजरे करुन बडेजाव करण्याच्या नादात.

.

तिथे त्याला 'माझ्यासाठी पण पांडुरंगाचा प्रसाद आण' म्हणायचं आणि नंतर त्याच्या झालेल्या नुकसानाबद्दल असले भंपक लेख लिहून हळहळ व्यक्त करायची.
<<< +१.

मुळात आपण ज्याच्याकडून कर्ज घेतलंय त्याच्या स्वप्नात विठ्ठल आला तर आपण कशाला हुरळून जावे? माझे शेत सोडून मी जाणार नाही, तुमचे स्वपन तुम्हाला लखलाभ असे म्हणायला काय जाते?

लेखाचा बराचसा रोख लक्षात येतोय, पण मुटेजी कदाचित विसरलेत की, यातले बरेचसे सण "शेतकरी कुटुंबातूनच" साजरे होतात. तिखटे सण, मटणाची जेवणं वगैरे कुठल्या समाजात असतात? नाहीत पैसे तर नका सण साजरे करू. कुणी जबरदस्ती केलीये? का कुणी घरी येऊन पाळत ठेवली आहे तुमच्यावर. जेव्हा पैसे असतील तेव्हा करा की खर्च.

कोकणातले दोन्ही मोठे सण गणपती आणि शिमगा शेतीच्या कामांच्या आड येणार नाहीत असेच साजरे केले जातात. कोकणात कुठल्याही सणांना कर्ज काढायची पद्धत मी आजवर पाहिली नाही. (कोकणात कर्ज कढणे हा प्रकार एकूणात कमी!!) आणि कोकणाइतका थाटात घरचा गणपती साजरा करणारा समाजदेखील आजवर पाहिला नाही. शिमगा हा तर बर्याचदा गावकीचा सण असतो.

कोकणाइतका थाटात घरचा गणपती साजरा करणारा समाजदेखील आजवर पाहिला नाही.
>>
हो, कोकणात थाटात गौरी-गणपती आणतात, सजावट देखील फार नाही करत. मागे आणि बाजूला पडदे, एक दोन तोरणे वर माटोळी बांधली की झाले.

बाप्पांना दहा-पंधरा दिवस मोदक पुरवावेच लागतात. बदाम, नारळ खारका द्याव्याच लागतात. दुर्गादेवीची ओटी भरावीच लागते.
>> मोदक करायला असे कितीसे पैसे लागतात. २१ मोदक केले की झाले.
ओटीचे सामान (नारळ, खण आणि थोडे तांदूळ, चिमूटभर हळदी-कुंकू)जास्तीत जास्त ५० रुपयात येते.
मला नाही वाटत की यासाठी पण कर्ज काढावे लागत असेल.

अजुनही ऑरगॅनिक शेती करावी, पैसे जमवुन आधी कर्ज फेडावं आणि मगच बाकी गोष्टी कराव्या, हे ज्याला कळत नाही, आणि कळलं तरी वळत नाही, त्यासाठी संघटनेतले लोकंही प्रयत्न करत नाही, (किमान वरच्या कथेतले), तर उगाच त्याच्या मुर्खपणाचे किस्से सांगुन शेतकरी कसा भोळाभाबडा, अडाणी वगैरे सांगतात. आणि मटणाच्या पार्ट्या पाहिजेच यासाठी गाडगेबाबांचा हवाला देउन त्यापासुन आणि कर्जापासुन प्रवृत्त करण्याऐवजी सणवार म्हणजे शेतकर्‍यांविरुद्ध कारस्थान लिहिताय सर.

प्लिज जरा हे चष्मे उतरवा. आम्ही नाही काही करत शेतकर्‍यांसाठी, खरं तर कोणाचसाठी, पण घरात पैसे नसताना, ऋण काढुन कधीच सण साजरे केले नाही हेही खरच. बरेचदा मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं आमच्याकडे, पण सणासाठी मुळीच नाही.

उगाच असे नकारात्मक लेख लिहिण्यापेक्षा काय सकारात्मक होतय ते लिहा, वाचायला नक्कीच आवडेल. ही टीका तुमच्या कामावर नसुन लेखातील सुरावर आहे.

रक्षाबंधनाला राखी बांधायला भावाने बहिणीकडे किंवा बहिणीने भावाकडे जायचेच असते. मग एकाचा खर्च प्रवासात होतो तर दुसर्‍याचा पाहुणचार करण्यात. >> मुटेजी , तुम्ही खरच सिरियसली लिहिताय ? हे खर्च वाचवायचे असतील तर मग कराय्चे कशावर ?

एकूणच सण साजरा करायला पैसे लागत नाहीत तर तो साजरा केला हे "दाखवायला" पैसे लागतात हे तुम्हाला कळत नाही , ये बात कुछ हजम नही हुई .

इंटरेस्टिंग आहे. Happy

चक्रधराचे उदाहरण हे सणांशी संबंधित नसून शोषणाचे आहे. त्यामुळे पुढील लेखाशी त्याचा संबंध नाही.
आषाढी वारीच्या बाबतीत मुटे सांगतात तो मुद्दा पटण्यासारखा आहे. कामाची तजवीज करायचे दिवस असतात ते. पण इतर सण हे मुटेंना वाटते त्याप्रमाणे शेतकर्‍यांना ' नडणारे ' नाहीत. इन फॅक्ट, जवळपास सगळेच भारतीय सण कृषिसंस्कृतीच्या भोवती गुंफलेले आहेत. पेरणी यशस्वी झाल्याची कृतज्ञता म्हणून पोळा येतो. पीक हाताशी आल्याचा आनंद दसरा-दिवाळी द्विगुणीत करते. बदललेल्या आर्थिक चक्रामुळे खर्च-कमाई आणि सणवारांचा क्रम एकमेकांशी मेळ खात नाही ही गोष्ट खरी असली, तरीही कुणीतरी 'जाणूनबुजून' असे काही षडयंत्र रचले आहे हा दावा हास्यास्पद आहे.

दुसरे असे, की हाडाचा शेतकरी कधीच कामापुढे इतर गोष्टींची पर्वा करत नाही. "घरात मढं झाकून पेरणीला निघायची" कुणब्याची रीत आहे. (कामधाम सोडून) गणपतीला मोदक वगैरे कौतुके शेतकरी कधीही करणार नाही. हे मी तर्काने नाही, अनुभवाने सांगतो आहे. माझे दोन्ही काका शेतकरी आहेत. वडील प्राध्यापक आहेत, शेतीही बघतात आणि कीर्तनकारही आहेत. त्यामुळे या विषयाची 'फर्स्ट हॅन्ड' माहिती माझ्याकडे आहे. Happy
(मुटेंच्या उदाहरणातला तो चक्रधरसुद्धा वारीपेक्षा कामाला प्राधान्य देतांना दिसतो. सावकाराने त्याला फसवले नसते तर तो वारीला गेला नसता !)

मायबोलीकर शेती आणि शेतकर्‍यांबद्दल अगदीच 'ढ' असावेत असा लेखकाचा समज दिसतो.

मुटे, तुमचं काहीतरी बिनसलय का ?
वरती नंदिनीने लिहिल्याप्रमाणे कोकणात अशी प्रथा नाहीच. लग्नासाठी / वरदक्षिणेसाठी पण तिथे कर्ज
काढले जात नाही सहसा. लग्न ठरल्यास वधुपिता गावकर्‍यांसमोर जातो आणि सगळे गावकरी मिळून लग्न पार पाडतात. पुर्वीसारखी चाकरमान्यांच्या मनीऑर्डरवर अवलंबून राहण्याची पण वृत्ती कमी झालीय.

अंथरुण पाहून हातपाय पसरावे, हेच बरे. नाही का ?

गोष्ट नाटकी वाटली, पण काही गोष्टींना समर्थन

सणावर किती खर्च करावा हा ज्याचा त्याचा व्ययक्तिक प्रश्न आहे,
आपले सण केवळ धर्माचा उदो उदो करणारे नाहीत त्यामध्ये काही वेज्ञानिक गोष्टी आहेत, जसे
श्रावणात होणारे वातावरणातील बदल हे शारिरिक आजारास कारणीभूत ठरतात,,या काळात चिकन मटणासारख्या पदार्थामध्ये जंतूसंसर्ग असण्याची शक्यता वाढते, याऐवजी पुरणपोळीमध्ये असलेला गूळ प्रकृती चांगली ठेवण्यास मदत करतो, तीच गोष्ठ मकरसंक्रांतीत असते सुर्याचा एका राशीतून दूस-या राशीत प्रवेश होत असताना.

शेतक-यांच्या कर्जाबाबत बोलाव तितक कमीच पडेल...............
पण कर्जमाफी हा त्यावर उपाय असू शकतो असे मला वाटत नाही

तूम्ही कापूस लावा किंवा द्राक्षाच्या बागा लावा त्यातून चांगले उत्पन्न मिळाले तर किती टक्के टॅक्स भरता ?
मग अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई का मागता ?
सरकार तुम्हाला पीककर्ज किंवा इतर भरपाई देत असेल तर राज्यात इतर छोटे व्यवसाय करणा-यांनी काय घोड मारलय त्यांच नुकसानही द्याव भरुन

आणि दुसरं म्हणजे केवळ एकाच कामावर (शेतीवर) विसंबुन राहणारा शेतकरी अजुनही बदलायला तयार नाही? अजुनही शेतकरी संघटना स्वतः धान्याचे भाव सरकारकडुन ठरवणे, यापलिकडे जात नाही आहे काय?. आणि कर्जात बुडू नये आणि कर्जमुक्त व्हावं म्हणुन काय करत आहे, हे नक्की लिहा. ते वाचायला अधिक आवडेल.

तूम्ही कापूस लावा किंवा द्राक्षाच्या बागा लावा त्यातून चांगले उत्पन्न मिळाले तर किती टक्के टॅक्स भरता ?

>> अप्रत्यक्ष कर भरतात ते. Happy

कोकणात वरदक्षिणा (हुंडा) ही पद्धतच नाहीय.
>> +१. मी मूळची कोकणातली नाही, पण गेली २५ वर्ष कोकणात राहून तिथल्या काही गोष्टी खरंच आवडल्या, त्यापैकी ही एक.

जवळपास सगळेच भारतीय सण कृषिसंस्कृतीच्या भोवती गुंफलेले आहेत.>>> +१.

<मायबोलीकर शेती आणि शेतकर्‍यांबद्दल अगदीच 'ढ' असावेत असा लेखकाचा समज दिसतो.> +१
रुमाल टाकुन जातोय , निवांत लिहितो

शेवटचा निष्कर्ष काहीच्या काही वाटला. डिसेंबरानंतर हाती आलेला पैसा पुढच्या पावसाळी सणाकरता ठेवावा. किंवा एकूणच पावसाळी सण शेतीला अडथळे ठरत असतील ते अजिबात साजरे करू नयेत** / नावापुरते साजरे करावेत. तर डिसेंबरानंतरचे सण धूमधडाक्यात साजरे करावेत. सगळ्यांची समान समस्या आहे म्हटल्यावर यासाठी सगळ्यांचे झटकन एकमत होण्यास काही अडचण येऊ नये.

ऋण काढून सण साजरे करणे, ही प्रवृत्ती विदर्भात फार आहे. <<< हे माहीत नव्हते. माझा गाव पण अठ्ठ्याण्णव टक्के शेतकर्‍यांचा आहे. (उरलेले दोन टक्के किराणामालाचे दुकान, दुग्धव्यवसाय, शिवणकाम, पिठगिरणी इ. व्यवसाय चालवतात.) पण असे डोईजड होईल असे कर्ज काढून सण साजरे केलेले कधी आजवर ऐकले/पाहिले नव्हते. त्यामुळे हे सणापायी कर्जबाजारी होणे मला नवीन होते.

** असे केल्यास सणांच्या तिथीनिश्चितीत (किमान शेतकर्‍याच्या हिताचे) काही चांगले लॉजिक असलेच तर तेही समजेल.

नुसत्या विदर्भात नाही, विदर्भ आणि मराठवाड्यातही आहे.

ज्ञानेशची पोस्ट या लेखापेक्षा जास्त पटली. मी पण शेतकर्‍याच्याच घरातून आलेय. त्यामूळे परिस्थिती अगदीच माहित नाही असं नाहीये.

ऋण काढून सण साजरे करणे, ही प्रवृत्ती विदर्भात फार आहे>>> सहमत. महालक्ष्म्यांचा थाटमाट.... जेवणावळी बघून कसं काय परवडत ..... ?

मुटेजी आप राह भुल गया मुसाफीर हो.:स्मित: मलाही दिनेशजींसारखाच प्रश्न पडलाय की तुमचे खरच कुठे बिनसलयं? आणी वर श्रद्धाने म्हणल्याप्रमाणे तुम्ही खरच चक्रधरचे प्रबोध/ विचार प्रवर्तन केले असते तर तुम्हालाच पांडुरंग आधी पावला असता.

त्याचे इतके नुकसान झाले तरीही तो सुधारणार नसेल तर काय उपयोग? खुलभर दुधाची कहाणी माहितीय ना? त्या म्हातारीने आधी घरच्या पोराबाळांना, गाई वासरांना तृप्त केले मग उरलेले वाटीभर दुध महादेवाच्या पिंडीवर ओतले. देव तिलाच प्रसन्न झाला.

तुम्ही त्या सणांना नावे ठेवताय पण त्यातुनच असे शिका ना जे मी वर म्हातारीच्या गोष्टीतुन सांगीतले. कुठलाही देव असे कुणाला सांगत नाही की ऋण काढुन सण साजरे करा. मी तर म्हणेन की गावजेवण ही प्रथाच बंद झाली पाहीजे, कशाला हवेत हे सोपस्कार?

तर म्हणेन की गावजेवण ही प्रथाच बंद झाली पाहीजे, कशाला हवेत हे सोपस्कार?>>> रश्मी, अगं असं कसं? उलट गावजेवणामधे अख्खा गाव एकत्र येऊन सहभागी होतो. देवळाच्या धुण्यापासून ते आराशीपर्यंत प्रत्येक कामामधे गावातली सर्व माणसं एकत्र येऊन काम करतात. त्यातूनच काही विधायक कामेदेखील घडतात की. शिवाय प्रत्येकालाच शिधा द्यायला जमला नाही तरी प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कामामधे मदत करता येते की. अख्खा गाव त्यावेळेला एकत्र लोटतो, एरवीचे भांडणतंटे थोड्या वेळासाठी तरी तेव्हा विसरले जातात.

मजेशीर लेख आहे. ओढून ताणून लॉजिक लावलेय सगळेच. अहो तुम्ही तर तिकडे चार चार लेख लिहून गळे काढताय विंचू उतरवण्याची जुनी परंपरा नष्ट होतेय म्हणून, मग आता सण वारांची परंपरा नष्ट झाली तर चालेल का तुम्हाला ?! Happy

मुटेजी, शेतकर्‍यांना तुम्ही संत सावता माळी यांची गोष्ट सांगता की नाही? पंढरीच्या वारीला लोकं बोलवायला लागले तेव्हा सावता माळी म्हणाले,

कांदा, मुळा, भाजी अवघि
विठाबाई माझी

तुमचे शेतकर्‍यांसंबंधीचे लेख वाचून शेतकरी म्हणजे कोणी गरीबबिच्चारी, बावळट जमात आहे आणि इतर (म्हणजे अर्थात जे जे शेतकरी नाहीत ते सर्व) सर्वजणांचा आयुष्यात एकच अजेंडा असतो - तो म्हणजे शेतकर्‍यांना पिडणे, असा कोणाचा समज झाला तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल.

सण साजरे करणं काही कंपलसरी नाही. अंथरूण पाहून पाय पसरले तर टुकीत राहता येतं.

Pages