फ्लॉवरची भाजी करण्याच्या पद्धती

Submitted by भानुप्रिया on 19 August, 2013 - 01:09

मला फ्लॉवर प्रचंड आवडतो, पण एकाच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळाही तितकाच येतो! डब्ब्यात कोरडी भाजीच बरी पडते, आणि कोरड्या भाजीची माझी मजल फक्त किंचित कांदा घालून परतून केलेल्या भाजीपर्यंतच मर्यादित आहे!

रस्सा भाजीसाठी तसे २-३ ऑप्शन्स आहेत, पण ते ही नेहमीचे झाल्याने कधीकधी एकसुरी वाटतात.

इथे पाककलेतली दिग्गज लोकं आहेत आणि पा.कृ शेअर करण्यातही दिलदार आहेत सगळे!

या नव गृहिणीला थोडं ट्रेनिंग हवं आहे, तेवढं द्यायचं बघा! Lol

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. कोबीची करतो तशी भिजलेली हरभरा दाल घालून.
२. ओलिव्ह तेल आणि लसणीच्या पाकळ्यावर परतून.
३. वाफवून (कुकर मध्ये मोठे मोठे तुकडे) मग त्यावर थोडा कुठलाही सौस
४. फ्लॉवर तळून मन्चूरियन सारखे प्रकार
५. फ्लावरचे परोठे

फ्लॉवरचे तुकडे, बटाट्याचे तुकडे, मटार एकत्र फोडणीला (तेलात मोहरी, जिरं, हिंग, हळद, हिरवी मिरची) टाकून थोडं पाणी शिंपडून झाकण ठेवून वाफेवर शिजवायचं. चवीला मीठ, साखर आणि खोबरं कोथिंबीर घालून परतलेली भाजी मस्त लागते.

जरा बदल करायचा असेल तर फोडणीत आल्याचा कीस घालता येतो. कधी टोमॅटोचे तुकडे + थोडा गरम मसालाही मस्त लागतो. फ्लॉवर, बटाटे, मटार, टोमॅटो, सिमला मिरची, आलं-लसूण पेस्ट, गरम मसाला घालून वरीलप्रमाणेच वाफेवर भाजी शिजवली तर एव्हरेस्ट गरम मसाला पावडरच्या खोक्यावर फोटो असतो तसा 'व्हेज ड्राय कुर्मा' तयार होतो.

अजुन एक रेसिपी मास्टरशेफ मधे सांगितली होती काश्मीर साईड्ची.. नाव विसरले
कॄती कढी पकोडा सारखी पण पकोडा न वापरता मीठ नि हळ्द लावुन उकड्लेले फ्लॉवरचे तुकडे घालायचे

नारळाच्या दुधातली रसभाजी-
साहित्य- बारीक तुकडे/फुलं काढलेला फ्लॉवर, फोडणीचं साहित्य, कढिपत्ता, हिरवी मिरची, आलं, जिरं, कोथिंबीर, नारळाचं दूध, मीठ, साखर.

फ्लॉवरचे तुकडे जरा मायक्रोवेवमध्ये शिजवून घ्यावेत. तसं नको असल्यास शिजताना वाफेवरही शिजवता येतीलच.
तेलाची जिरं, हिंग, हळदीची फोडणी करून त्यात कढिपत्ता घालावा. त्यात फ्लॉवरचे तुकडे घालून परतावेत. मिरची, आलं, कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घेऊन फ्लॉवरला लावावं. फ्लॉवर आधी शिजवला नसल्यास थोडं पाणी घालून झाकून शिजवून घ्यावा. मऊ झाल्यासरखा वाटला की नारळाचं दूध घालून शिजवावं. वरून चवीप्रमाणे मीठ, साखर, कोथिंबीर घालावी. भाजीची कन्सिस्टन्सी मिडीयम घट्ट हवी.

मयेकर, तेच लिवायला आल्तो मी.
तुमच्या लिंकेत अक्खा गड्डा भाजलाय त्याने. मोठे मोठे चिकन लेग सारक्या साईजचे तुरे काढून मॅरिनेट करून भाजले, तर जास्त मस्त लागतात.

फ्लॉवर + बटाटे + टमाटे कूर्मा/कोर्मा भाजी ही देखिल माझी आवडती.
आमच्या घरी फ्लॉवर व बटाटे डाईस करून तळून घेतात आधी, अन रस्सा ताकात बनवलेला असतो.

मंजूडीने सांगितलं तशाच फ्लॉवर + बटाटा + मटार फोडणीवर परतून, खरपूस शिजवून वरुन किचन किंग मसाला भुरभुरावयाचा. आवडत असेल तर कोथिंबीर घालायची. किचन किंग मसाला रॉक्स ! पंजाबी भाज्यांतही मस्त लागतो.
( ही कुठलीही जाहिरात नाही Wink )

आम्च्या मावशी [काम करणारी बाई] आधी तेलात धणेपूड व तिखट थोडे फ्राय करतात व मग फोडणीचे साहित्य घालून फ्लॉवर + बटाटे + मटार अशी सुकी भाजी करतात. ही भाजी, गोव्याच्या स्टाईल ची कुठलेही फिश असलेली करी, चपाती, फ्राय फिश, सलाड, गरम भात व सोलकढी असे खाऊन अनेक पाहुणे खुश झाले आहेत.

फ्लॉवर आमच्याकडे गिच्च शिजलेली आवडत नाही.जरा कच्चीपक्कीच आवडते.
म्हणुन आम्ही जीरं-मोहरीची फोडणी दिलेल्या तेलात आधी थोडं लसुण्-आलं ठेचुन टाकतो. नंतर टोमॅटोचे तुकडे टाकुन जरा तिथेच चमच्याने बारीक करुन घेतो.आणि मग त्यात फ्लॉवरची मोठे तुकडे टाकुन व त्यावर हळद,मीठ, तिखट, गरम मसाला टाकुन झाकण ठेवुन (झाकणावर पाणी टाकावे) एक वाफ घेतो. नंतर कढईवर झाकण ठेवायचे नाही.. तसचं परतत रहायचं.
यातच दुसरा प्रकार करता येतो. अशी भाजी परतुन परतुन फ्लॉवरचे (फुलं... :अओ:) तुकडे खरपुस होईपर्यंत त्याला परततो. टोमॅटोमुळे भाजीला जरा वातटपणा येतो. पण अशी खरपुस भाजीही छान लागते. तिकडे उत्तरेकडे असतांना खाल्ली आहे.

<<पराठ्यांची पाकृ टाकलीय का कोणी इथे (मा बो वर)?<<
मला नि माझ्या लेकाला सर्व प्रकारच्या पराठ्यांमधे फ्लॉवर पराठेच अतिशय आवडतात. लेकाला डब्यात तेच देते.
फ्लॉवर किसुन घ्यायचा. धुवुन टाकायचा. नंतर थोड्या तेलात त्यात अद्रक लसुण ठेचुन (मला ठेचलेलच आलं लसुण आवडतं..त्यासाठी खास दगडी खल-बत्ता ही घेतलाय मी) आणि हळद, मीठ, तीखट घालुन त्यातच फ्लॉवरचा कीस वाफवुन घ्यायचा. थोडा गार झाल्यावर पुरणपोळीसारखं कणकेत भरुन पराठे लाटावे.

अंडं फेटून त्यात मीठ, मीरपूड घालावी. त्यात फ्लॉवरचे तुकडे बुडवून काढून मग तळावे. टिश्श्यु पेपरवर काढावेत. हे प्रकरण लै भारी लागतं... मात्र जरा तेलकट होतं.

फ्लॉवर (अथवा फ्लॉवर-मटार)ची खिचडीही मस्त लागते.

~ फ्लॉवरचे लहान-मोठे तुरे वाफवताना किसलेल्या आल्याबरोबर वाफवायचे. वाफवून झाल्यावर किंचित लोण्यात परतायचे. वरून मीठ व मिरपूड.

~ व्हाईट सॉस (१ टेबलस्पून मैदा / तांदळाचे पीठ, १ कप दूध, १ टेबलस्पून लोणी) तयार करून त्यात वाफवलेला फ्लॉवर, वाफवलेले मटार, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, वाफवलेला श्रावणघेवडा, वाफवलेले स्वीट कॉर्न इत्यादी भाज्या घालून वरून किसलेले चीज, मीठ, मिरपूड घालून.

~ फ्लॉवरची सुकी भाजी साजूक तुपाच्या फोडणीत करायची. फोडणीत जिरे, हिरव्या मिरच्या.

~ गोभी टकाटक आणि पुदिनावाले आलू गोभी या दोन्ही भाज्याही मस्त लागतात चवीला!

मी मावेमध्ये फ्लॉवर, मटार, कांदा,गाजर (आवडत असल्यास) कच्ची-पक्की सलाड्सारखी भाजी करते.
हे सर्व मावेमध्ये २ मिनिटे शिजवते मग त्यात तिखट, मीठ, मीरपुड, चाट मसाला, आल्याचे तुकडे, कोथिंबीर, ओवा, जिरे, लसुण, एखादया मिरचीचे तुकडे असे घालून परत ३ मिनिटे मावेमध्ये शिजवते.

आपल्या आवडीनुसार आपण ह्यात अजून वेरिएशन करू शकतो. आमच्याकडे आवडते अशी भाजी, शक्यतो रात्रीच्या वेळी करते, डब्याला कच्ची-पक्की फोडणीची करते.

छान आहेत बर्‍याच पाककृती. मला नीधपने दिलेली कृती मात्र अफाट आवडलीय. मी आठवड्यातुन एकदा तरी करतेच त्या पद्धतीने. फ्लॉवरचा उग्रपणा मिर्चीने खूपच कमी होतो. खूप धन्यवाद नीधप्.:स्मित:

फुलकोबीच्या भाजीच्या रेसिप्यांचा धागा उघडण्याची आयडिया मस्तं आहे. दरवेळी १-२ प्रकारांनी केलेली भाजी खाऊन कंटाळा येतो. सुपरमार्केटात गेलं की ठराविक भाज्यांमधे या कोबीची बटबटीत फुलं समोरच ठेवली असतात, दुसरं काही मिळालं नाही की घ्यावीच लागतात.

मी करते ते भाजीचे प्रकार:
१) तेलात मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करायची. त्यात हवी तेवढी तिखट आणि हवी त्या प्रमाणात हिरवी मिरची बारीक करून घालायची. कांदा घालून परतायचं. मीठ, हळद आणि कोबीचे तुरे घालून परतायचं. झाकण न ठेवता शिजवायचं. वरून भरपूर कोथिंबीर घालायची. भाजी पिवळी दिसायला हवी.

२)फुलकोबी-बटाटा-मटार रस्सा: नारळ-हि.मिरच्या-मिरं-लवंग्-दालचिनी बारिक वाटून हे वाटण तूप किंवा तेलाच्या फोडणीत जिरं घालून कांद्यावर परतायचं. बटाटा उकडून, फुलकोबीचे तुरे जरासं तेल आणि मीठ्-मिरपूड घालून ब्रॉइल करून या मसाल्यात घालायचे. मीठ घालून परतायचं. आधणाचं पाणी घालून उकळी आणायची. आणि शेवटी जराशी आमचूर पावडर
आणि मूठभर मटार उकळत्या भाजीत घालायचे. वरून कोथिंबीर.

३) १ मध्यम आकाराची फुलकोबी
१ कांदा (जमल्यास ग्रिल करून)
१ सिमला मिरची (जमल्यास ग्रिल करून)
दोन पळ्या तेल
१ लहान चमचाभर जिरं
१ टोमॅटो. (मी कॅनमधले डाइस्ड टोमॅटो (पाऊण कॅन) त्यातल्या रसासगट वापरते.)
मीठ
MDHचा कढाई चिकन मसाला एक मोठा चमचा शीगभर.
भरपूर कोथिंबीर.
हवं तर त्यात बारिक चिरलेलं आलं घालू शकता.
*जाड बुडाच्या भांड्यात तेल तापवून जिरं घालायचं.
*त्यात फुलकोबीचे तुरे घालून जरा ब्राऊन होऊ द्यायचे.
*यात आता मसाला आणि मीठ घालून परतायचं.
*फुलकोबी शिजत आली की त्यात मोठे तुकडे केलेला ग्रिल्ड कांदा आणि सिमला मिरची घालायची. (ग्रिल्ड नसेल तर कांदा आधी परतून घेऊन त्यावर फुलकोबीचे तुरे घालायचे. पण सिमला मिरची शेवटी घालायची.)
*पुन्हा एकदा व्यवस्थीत ढवळून घेऊन यावर टोमॅटो कापून घालायचे.
*पाणी आटलं की वरून कसूरी मेथी आणि कोथिंबीर घालायची.

फ्लॉवरला तेलावर एक वाफ आणायची, तुरीचा / मुगाचा शिजवलेला घट्ट गोळा, आणि सांबार मसाला घालुन परत एक वाफ अणायची. हव असल्यास चवीला गुळ घालायचा. पळीवाढ भाजी / वरण होते.

फ्लॉवर, कांदा,बटाटा, टोमॅटो आणी मटार नेहेमीच्या फोडणीत परतून आलं लसूण पेस्ट, धणेपूड, तिखट,मीठ आणी रजवाडी गरम मसाला घालून केलेला रस्सा पण अफलातून लागतो.

मी कच्च्या फ्लॉवरचेच पराठे करते. सकाळी करायचे असतील तर रात्रीच फ्लॉवर फ्रीज मधून बाहेर काढून ठेवायचा. ही एका नॉर्थ ईंडीयन मैत्रिणीची टिप आहे. आयत्या वेळी लागेल तसा किसत जायचा फ्लॉवर. एका वेळी एका पराठ्यासाठी.. एका ताटात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, धणे जिरे पूड, तिखट मीठ्, गरम मसाला, आवडत असल्यास चाट मसाला किंवा आमचूर तयार ठेवायचं लागेल तसं मिसळायचं फ्लॉवरच्या किसात आणी लगेच उंडा भरून पराठे लाटायचे. फ्लॉवरला पाणी सुटतं म्हणून ही खटपट. पण अप्रतीम चवीचे पराठे तयार होतात.

फ्लॉवरचं लोणचं जर भाजी क्याटेगरीत बसत असेल तर त्याचीही वरच्या यादीत भर घालता येईल! Wink

फ्लावरची भाजी सांबार मसाला घालूनही मस्त होते. यात आंबट्पणाकरता मात्र टोमॅटो, टो. सॉस किंवा टो. प्युरी घालावी...

आमच्याकडे पण कच्च्या फ्लॉवरचेच करतात पराठे पण बटाट्याच्या पराठ्यांसारखे उंड्यामध्ये सारण भरून न करता दोन छोट्या फुलक्यांच्या मध्ये सारण ठेवून पराठा लाटतात.

>>दोन छोट्या फुलक्यांच्या मध्ये सारण ठेवून पराठा लाटतात.
+१

अख्खा गड्डा बेक करायच्या २ पाककृती आहेत. एकेकदाच केल्यात. बर्‍या लागल्या.

१)फार भदाड्या कोब्या न घेता शक्य तितक्या लहान घ्यायच्या. पानं आणि धांडे काढून धुवून कोरड्या करायच्या. चक्क्यात तंदूरमसाला मिसळून कोब्यांना फासायचा. मॅरिनेड लावून तासभर मुरू द्यायचं. ४०० डि. फॅ. वर, १ तास, फॉइलनं न झाकता बेक करायच्या. हवं तर १ मिनिट लो ब्रॉइल. पुदिना-कोथिंबीर्-हिरव्या मिर्च्यांच्या चटणीबरोबर खायचं.

२) कोबीला ऑलिव्ह ऑइल, मीठ, मिरं लावून वरच्याच तापमानाला आणि वेळेइतकं बेक करायचं. एका भांड्यात ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस, मध, जाडं मस्टर्ड, मीठ आणि कोथिंबीर एकत्र करून यावर ओतायचं. १० मिनिटं मुरू देऊन खायला घ्यायचं. डिल्-ग्रीक दही-मीठ्-साखर एकत्र करून, यात तुरे बुडवून खायचे.

या दोन्ही पद्धतीनं बेकींग करुन बघणार. बर्‍याचदा आमच्य भाजीवाल्याकडे अगदी छोटे छोटे गड्डे असतात गोबीचे.

अरुंधती यांनी म्हटल्याप्रमाणे फ्लॉवरचे लोणचेपण मस्त होते. मी फ्लॉवर-गाजर ह्या कॉम्बिनेशनचे जास्त करून करते, मटार घालूनपण करतात फक्त मटार घातल्यास लोणचे जरा कमी टिकते, मी केप्र किंवा बेडेकर लोणचे मसाला घालून करते, नवऱ्याला डब्यात न्यायला आवडते हे लोणचे. हे मात्र फ्रीजमध्येच ठेवावे. मी ह्यात फोडणी घालते पण लोणचे मसाला आणि तेल गरम करून गार झाल्यावर घातले तरी चालते. मीठ हवेच.

मी कधीतरी फ्लॉवरची कढी पण करते. पंच फोडण घालून फ्लॉवर चे तुरे परतून घ्यायचे आणि मग कढीचं मिश्रण त्यावर ओतून शिजवायचे.
इथेच कुठेतरे रेसिपी वाचली असं वाटतय.

आमच्या घरातील पदधत :
फ्लॉवर बारीक चिरुन घ्यायचा. त्यावर तिखट, हळद, मीठ, धणे-जीरे पूड आणि तांदूळ पीठ टाकायचे. हे सर्व हाताने एकत्र करयचे.
जास्त तेल घालून फोडणी करायची आणि हे सर्व त्यावर टाकायचे. सतत परतत रहयचे. फ्लॉवरचा खीमा होईपर्यंत परतावे लागते. मस्त खमंग भाजी तयर होते.

वर बर्‍याच छान रेसिप्या दिल्या आहेत. माझे २ आणे. हि मी+कढीपत्ता+ हिंग अशी फोडणी करुन फ्लॉवरचे लहान लहान तुरे त्यात टाकायचे. चांगले परतून घ्यायचे. एक वाफ काढून घ्यायची. परत परतायचे आणि त्यावर भरपूर प्रमाणात डेझिकेटेड कोकोनट पसरवायचे. मीठ आणि हवी असल्यास किंचित साखर घालायची आणि एक वाफ काढायची. परत परतायचे. गॅस बंद करुन कोथिंबीर घालून वाढायचे.

छान छान प्रकार आहेत Happy

कॉलिफ्लॉवर खीमा:

- फ्लॉवर बारीक चिरून घ्यायचा.
- तेलावर बारीक चिरलेला कांदा + आलं लसूण पेस्ट परतुन घ्यायची. त्यात थोडी टॉम पेस्ट घालुन परतायचे.
- यात बारीक चिरलेला फ्लॉवर घालुन परतायचे.
- वरतून कसूरी मेथी हाताने चुरडुन घालायची आणि अगदी शेवटी थोडा चाट मसाला/गरम मसाला/पावभाजी मसाला भुरभुरायचा.

आपण उपमा करतो त्यात ही रवा भाजून घेतला व मग फोड णी घालून आपण पाणी घालून उकळतो. त्यात फ्लोवर चे तुरे बारके आणि मटार गा जरा चे बारीक तुकडे करून जरा शिजवून घ्यायचे. मग रवा घालाय चा. खूप सुरेख लागतो.

पराठे मला पण फार आवडतात. प्रॅडीच्या पद्धतीचे.

फ्लॉवर मधे पाणी खुप सुटत त्यामुळे त्याची कोरडी भाजी करता येत नाही. हा युस च्या फ्लावराचा प्रोबलम आहे अस ऐकल होता खरय का?

आमच्याकडे फूलगोभीका भरवाँ परौंठा खूप आवडतो. प्रॅडीने लिहिल्याप्रमाणे गोभी बारीक किसणीने किसून थोड्यावेळ मीठ लावून ठेवायचं हाताने घट्ट पिळूण पाणी काढून टाकायचं ते पाणी पारीची कणिक भिजवताना वापरायचं.

फ्लावरचे तुरे काढून त्याचे अर्धा सेमी जाडीचे काप करायचे . त्यावर हळद , मीठ , मिरची पूड किंवा मालवणी मसाला, हिंग , आमचूर किंवा लिंबाचा रस घालून सगळ्या कापांना मसाला लागेल असे मिसळून घ्यायचे.
मग तव्यावर मध्यम आचेवर थोडे तेल घालून खरपूस भाजणे.

फ्लावरच्या तुर्‍यांचे तुकडे करून एकावेळी एक मिनिट असे तीन मिनिटे मायक्रोवेव्ह करून घ्यायचे
मग

१, मोहरी, जिरं, कढीपत्ता, ओली मिरची , सुकी मिरची, हिंग , हळद फोडणी करून त्यावर फ्लावर घालून चवी पुरते मीठ घालायचे. मंद आचेवर फ्लावर शिजत आला की गोडा मसाला , पाहिजे असल्यास थोडे ओलेखोबरे घालून वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. झाकण न लावता शिजवल्यास पाणी फारसे सुटत नाही

२. वरील प्रमाणेच , फक्त गोडा मसाला घातल्यावर खोबर्‍या ऐवजी कोरडे परतून घेतलेले बेसन घालायचे.

३. अमेरिकेतल्या इं ग्रो मधे पाटक्स करी पेस्ट मिळतात. गोड्या मसाल्याऐवजी चमचाभर करी पेस्ट घालायची.

४. पांच फोरन ,हळद, हिरवी मिरची घालून फोडणी करायची.( मी अर्धे ऑलिव्ह ऑइल अन अर्धे सरसों तेल घालते) त्यावर फ्लावर , मीठ घालून शि़जू द्यावे. शिजत आले की एक चमचा मोहरीची डाळ थोड्या पाण्यात वाटून भा़जीत घालायची

सॉलीड कृती आहेत एक एक. थेन्क्स भानुप्रिया हा धागा काढल्याबद्दल. नीधपची चक्क वाचलीच नव्हती. आधी आता तीच करणार.

'ट्रि ऑफ लाईफ' - ही शेफ विकास खन्ना ची फेमस रेसिपि फ्लॉवर वापरुन. आणि त्याचे हे मॉडिफाईड व्हर्जन. हे मी केले आहे ट्राय, बदल म्हणुन आवडले होते,

कोबीचं भानोलं विसरलं...
पण मी कधीही केलं वा कुठेही खाल्लं नाही. फक्त ऐकुनच माहीती आहे.

जुन्या साईटवर हे मिळालं पण मला वाचता नाही येत.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/91029.html?1130424143

कुणी नवीन साईट वर आणेल का?

Pages

Back to top