समर जॉब

Submitted by स्वाती२ on 19 June, 2013 - 09:05

माझ्या मुलाने मिडलस्कूल पूर्ण केली तेव्हा केलेले हे लेखन. माझा मुलगा 'मोठा' होत होता त्या काळातील आठवणींची पाने. फक्त नावे बदलली आहेत. दुसर्‍या संस्थळावर हे लेखन काही वर्षांपूर्वी प्रकाशित केले होते. बर्‍याच जणांनी लिंक मागितली होती म्हणून मायबोलीवर पुन्हा प्रकाशित करत आहे.

गेल्या आठवड्यात माझ्या मुलाचा समर जॉबचा पहिला दिवस होता. इथे १४ वर्ष पूर्ण झाली की मुलं part-time job करू शकतात. बरीच मुलं १०-११ वर्षापासून छोटी-मोठी कामं करून कमाई करु लागतात. मुलाला पहील्या दिवशी कामावर सोडुन येताना मला त्याने कमाईसाठी केलेल्या उचापती आठवत होत्या.
तो नुकताच सहावीत गेला होता. एक दिवस शाळेतून आला तो ५० सेंट खुळखुळवत. "मॉम मी मोनिकाला ५० सेंटला चित्र विकलं. मला अजुन ४ चित्र करायचेत." हे ऐकून मी उडालेच. मग ले़काने खुलासा केला. मोनिकाने तिच्या बॉयफ्रेंडला ला देण्यासाठी corvette च चित्र काढून घेतलं होतं. ते पाहून तिच्या सख्यांनीही आपापल्या BF च्या आवडीच्या गाड्या खरेदी केल्या होत्या. टेबलावर पडलेल्या ५० सेंटमध्ये १५-२० तर पेनीच होते. अक्षरशः पै पै गोळा केली होती पोरीने. दिवसभर मला प्रीस्कूलमधली मोनिका आठवत राहीली. त्यानंतर ८-१० दिवस चिरंजिव गाड्या विकत होते.
लवकरच गाडीचे खुळ कमी झाले. लेक आता middle school मधे चांगला रुळला होता. त्याच्या मॅथच्या च्या वर्गात एक क्युबीकल होते. त्यात बसण्यासाठी मुलं रोज भांडत. ह्याने सरळ टिचरला विचारले "how about renting it for 25 cents? you keep 20 cents and I will keep 5 as your agent. you can buy stuff for class room." टिचर तयार झाली आणि क्युबिकल चे बुकिंग जोरात सुरु झाले. सुदैवाने १५ दिवसांनी कस्टोडियन ते क्युबिकल घेऊन गेले व धंदा बंद झाला. त्याच्या उचापती पाहता त्याच्या गुणांना वळण लागावे म्हणून त्याला Y-Press ला पाठवायचे ठरले. सर्व सोपस्कार पूर्ण करुन तो Y-Press मधे रिपोर्टर म्हणून जावू लागला.
महिना जरा शांत गेला आणि परत लेकाने नवा धंदा काढला. यावेळेला अजुन एक मुलगा पार्टनर होता. मेकॅनिकल पेन्सिलच्या शिशाची छोटी पेटी आणुन शाळेत हे दोघे शिसे विकू लागले. २-३ महिन्यांनी भांडाभांडी होउन हा धंदा बंद झाला. आता Y-Press चे काम वाढले होते. तसेच सायन्स च्या क्रेडीटसाठी science fair project करावा लागणार होता. उरलेल्या वर्ष कसलाही धंदा न करता पार पडले.
सातवीचे वर्ष सुरू झाले आणि इथे निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली. Y-Press मुळे मुलाची जाण वाढली होती. त्यात ओबामांची उमेदवारी. चिरंजिव आता अमेरिकन लोकशाहीचे धडे गिरवू लागले. हिवाळ्यात स्नो ऐवजी आईसच जास्त पडल्याने त्याला स्नो काढायचेही काम मिळाले नाही. शाळेला सुट्टी लागेपर्यंत इथली इकॉनॉमी बिकट झाली होती. त्याचे वरच्या वर्गातले मित्र समर जॉबसाठी धडपडत होते. ती सुट्टी काही कमाई न होता गेली. नाही म्हणायला त्याला शाळा सुरु झाल्यावर Democratic National Convention साठी युथ रिपोर्टर म्हणून डेनवरला जायला मिळाले. तिथून आल्यावर मात्र त्याने काम शोधायला सुरुवात केली.
माझ्या मुलाने सुरवातीला त्याच्या बाबालाच वेठीला धरले. "डॅड तुझ्या ऑफिसमधल्या जानिटरकडे .."
पण बाबाने सरळ नकारघंटा वाजवली. "ते लोक आधीच कसेतरी तग धरून आहेत."
"तू विचारलस तर हो म्हणतील" लेकाने घोडं दामटवलं.
"म्हणूनच नाही. शोध जरा इकडे ति़कडे." बाबाने विषय संपवला.
ऑक्टोबरमधे त्याच्या ओळखीच्या एका मुलाला ग्रोसरी स्टोअरमधे काम मिळालं. पण वेळ ४ते ९. ह्याने आधीच दोन high school चे course घेतले होते. त्याचा अभ्यास सांभाळून हे जमणार नव्हते. त्याच्या मित्र मंडळींचीही तिच परिस्थीती होती. असाच शोध चालू होता. लोकल लायब्ररीने बजेट कपात केल्याने तिथेही काही चान्स नव्हता. अशात नोव्हेबरचे Y-Press चे न्यु़जलेटर आले. त्यात एक जॉब पोस्टिंग होते. मुलाने लगेच फोन करून चौकशी केली. आधीच ३ जणांनी अर्ज केला होता, हा चौथा. सगळे सोपस्कार पार पडले. पुढील आठवड्यात फोन आला. Dec - Feb अशा ३ महीन्यांसाठी PRX च्या Youth Editorial Board वर त्याची निवड झाली होती. निदान फेब्रुवरी पर्यंत तो कामात राहाणार होता.
डिसेंबर पासून इथली परीस्थिती खुपच बिघडली. सगळी भिस्त वाहन उद्योगावर असलेली इथली सर्वच गावे भरडून निघत होती, त्यातच आमचेही गाव. नेहमी प्रमाणे फुड पॅन्ट्री त गेलो तर तिथे उभ रहायला जागा नव्ह्ती. त्यांनी आम्ही नेलेले canned goods घेतले. त्यांना गरम कपडे मिळाले तर हवे होते. माझा लेक ते बघून रडायचाच बाकी होता. घरी आल्यावर "Lord have some mercy" म्हणत त्याने स्वेटर, जीन्स गोळा करायला सुरूवात केली. पुन्हा एकदा पॅन्ट्रीची वारी झाली. त्याला यावर्षी ख्रिसमस साठी काहीही नको होते. फेब्रुवरी पर्यंत वाईट economy ची ही सवय झाली. मुलं समर साठी परत जॉब शोधू लागली. एक दिवस त्याच्या मैत्रिणीने बातमी आणली. कॉर्न डिटॅसलिंगचा जॉब मिळेल. पहाटे ५ वाजता शाळेत बस येऊन मुलं शेतावर नेइल. चला काहीतरी सोय लागली म्हणून दोघे आनंदले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. लंचला त्याच्या मित्राने सांगितले की मी केलेय हे काम गेल्यावर्षी. खूप कष्टाचे आहे. तुम्हाला झेपणार नाही. मी पण या वर्षी करणार नाहीये. झाले पुन्हा गाडी मूळ पदावर. मार्च अर्धा उलटला तरी काही जमत नव्हते. मोठ्यांनाच काम नव्हते तर या मुलांना कुठे मिळणार. त्याने एकिकडे high school credit साठी CORE40 ची तयारी सुरु केली. एप्रिलमधे त्याच्या अजुन एका मैत्रिणीला गावात जानिटरचे काम मिळाले. लेकाचा इगो कुठेतरी डिचवला गेला होता. "mom, her dad used connection. तू सांग ना डॅडला. " माझ्या लेकाची भुणभुण सुरु झाली. त्याला डॅडची मदत मिळणार नाहीये हे मला माहित होते. मी त्याला समजावून CORE40 वर लक्ष द्यायला सांगितले.
CORE 40 च्या तारखा जाहिर झाल्या. मुलं अभ्यासाला लागली. बरेच जण माझ्या मुलाकडे अभ्यासात मदत मागू लागले पण कोणी tutor म्हणून काम देत नव्हते. पालकांना परवडणारच नव्हते. त्यातच त्याच्या Y-Press च्या प्रोजेक्टला NBC च्या लोकांकडून नकार आला. पण दोनच दिवसात टीम पुन्हा जोमाने नवे नेटवर्क शोधू लागली. त्या गोंधळात जॉब हंटिंगला जरा विश्रांती मिळाली. त्याच्यासाठी ही विश्रांती आवश्यक होती.
मे च्या सुरुवातीला ESPN चा होकार आला. त्याच सुमारास Y-press च पत्रक आलं. IPS school 15 बरोबर प्रोजेक्ट होता. त्यात summer employment opportunity होती. पण या वेळेला हा काही उत्साहाने अर्ज करायला धावला नाही. दोन दिवस वाट पाहून मी परत विषय काढला.
"I don't know mom, those are IPS kids" चिरंजीव गुर्मीत उत्त्तरले.
"म्हणजे?" मी विचारलं.
"hello, inner city"
तो 'inner city' अशा काही टोनमधे बोलला की बस्स! आता माझा संयम संपला होता. "They are just kids. Don't label them. I thought you knew better."
माझा आवाज चढलेला बघून तो जरा वरमला. त्याने सारवासारव सुरु केली. "mom, those kids are tough."
"tough नसतील तर त्यांचा निभाव लागेल का? पण या प्रोजेक्ट मधे भाग घेणार आहेत म्हणजे त्यांना शिकायचय. तुला त्यांना शिकवायला जमणार नसेल तर तसं सांग. पण नेहमीचं stereotype नको."
दोन दिवस तसेच गेले. शनीवारी तो सांगत आला. "mom, this one girl on my team, she is applying." मी काहीच बोलले नाही.
"पण ती मोठी आहे. ती एकटी बसने जाते." २५-३० स्पीड लिमिट असलेल्या गावातील मुलाच्या दृष्टीने इंडियानापोलीसमधे एकटी बसने फिरणारी मुलगी धैर्याची परिसीमा होती. "and pay is not that great, but they will give lunch and snack" त्याची बडबड चालू होती.
"mom, मला जमेल?" त्याच्या प्रश्नाला पटकन 'हो. नक्की जमेल' म्हणायचा मोह झाला. पण आज हे उत्तर चालणार नव्हतं.
"try केल्याशिवाय कसं कळेल? आणि काही चुकलं तर इतर असतील ना ते करतील मदत. चुकत चुकत शिकशील."
माझं उत्तराने त्याच समाधान झालं असावं. अर्धा तास टि. व्ही. बघायची परवानगी मिळवून स्वारी हलली.
चार दिवसांनी त्याने अर्ज केला. एक जागा शिल्लक होती. ती याला मिळाली. १० दिवसाचे काम होते.
परीक्षा पार पडली. दोन दिवसांनी रिझल्ट लागला. हायस्कूलची २ क्रेडीत पदरात पडली होती. शाळा संपताच प्रोजेक्टची तयारी सुरू झाली. बघता बघता कामाचा पहीला दिवस उजाडला. देवाला नमस्कार करुन लेक निघाला. त्याला सोडून येताना इतपर्यंतचा प्रवास आठवत होता.
संध्याकाळी त्याला आणायला गेले. "mom, I am glad I took this job." खांद्यावरच ओझं उतरलं होतं.
आता त्याचं रुटिन सुरु झालं. रोज संध्याकाळी ती वस्ती, मुलं या बद्द्ल भरभरून बोलत होता. त्याच्या वाट्याला आलेल्या ३ मुलांचा उल्लेख आता "my kids" असा होऊ लागला. त्यांच्या छोट्या मोठ्या धडपडीचं कौतुक होऊ लागलं. त्यांची स्वप्न, त्यांच्या अडचणि तीही त्याला सांगू लागली. "most of the people living there are honest, hard working people like us" असं आता तोच आम्हाला सांगू लागला. त्याच्यातला हा बदल सुखावणारा होता. या सुखाची परिसीमा मात्र काल अनपेक्षितपणे झाली.
संध्याकाळी त्याला नेहमी प्रमाणे pickup केले.
"mom, it's nice that I am getting paid but it would have been better if this was a volunteer position" मागच्या सीट वरुन शब्द आले. माझा कानावर विश्वास बसत नव्हता. गाडीतलं पोर आपलच आहे ना म्हणून मी मागे वळून पाहीलं. तो आपल्याच तंद्रीत होता. "helping Izack reach his potential is the right thing to do, and I shouldn't be getting paid for doing the right thing."
बस्स! मला आता इकॉनॉमी कुठे जाईल याची काळजी नव्हती. या सुट्टीत माझ्या लेकाने केलेली कमाई त्याला आयुष्यभर पुरणार होती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"most of the people living there are honest, hard working people like us" असं आता तोच आम्हाला सांगू लागला. >>> स्वाती२ तुझेच मनापासून अभिनंदन!! Happy फार आवडले.

वाह!
किती चांगले संस्कार केलेत तुम्ही मुलावर.
सलाम तुम्हाला.
तुम्ही आणि तुमचा मुलगा दोघेही ग्रेट आहात.

मस्त. आमच्या कन्येने गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत लायब्ररीत वॉलेंटियर म्हणून काम केलं. तो अनुभव आवडला म्हणून यावर्षीही काम करणार आहे.

स्वाती२,अतिशय छान वाटलं हा अनुभव वाचून.
असं लेकरू तयार केलंत म्हणून तुम्हां दोघांचं कौतूक!मुलाचं तर आहेच अर्थातच!

मस्त लिहिलंय. 'डूइंग द राइट थिंग'मधली मजा कळल्याबद्दल लेकाचं आणि तशी निगराणी त्याला दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन! Happy

वा, सुंदर. इथे पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद. किती शहाणं, समजूतदार आहे तुझं पालकत्व.

खूप छान लिहिले आहे.....

असं लेकरू तयार केलंत म्हणून तुम्हां दोघांचं कौतूक!मुलाचं तर आहेच अर्थातच!>>>+१००

सुन्दर. मी ज्या मुलांबरोबर असतो त्यांनाही यावर चर्चा करायला सांगेन.
आम्ही मुद्दामहून teen-agers ना अशा संधी भारतामधे देण्याचा प्रयत्न करतो.

छान लिहीले आहे. तुमच्या मुलाचे कौतुक तर आहेच. पण तुमचे ही अभिनंदन! या वयातला मुलगा आई-वडिलांशी सुसंवाद साधतो याचे श्रेय तुम्हांलाच आहे. कारण मी इथे बर्‍याच पालकांना तक्रार करताना पाहीले की, मुले काही बोलतच नाहीत, काही सांगत नाहीत. पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन!

मंडळी, कौतुकाबद्दल आभार. पण खरे सांगायचे झाले तर यात विशेष असे काही नाहीये. अमेरीकेतील मिडलक्लास कुटुंबातील बहुतेक मुलांचा प्रवास हा साधारणतः असाच असतो. इथल्या जीवनशैलीचाच हा एक भाग आहे.

Pages