लाल भाजी..

Submitted by सुलेखा on 27 May, 2013 - 04:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुमारे ३० वर्षांपुर्वी ऐन पावसाळ्यात बिलासपूरला-आताचे छत्तीसगढ पण तेव्हा मध्यप्रदेश मधे - स्वरुप लॉज मधे १० दिवस रहाण्याचा योग आला.जवळच त्यांचे स्वरूप हॉटेल होते तिथे जेवण मिळायचे.तेव्हा तिथे अगदीच मोजक्या भाज्या मिळायच्या.सकाळी सुखे आलू,तर संध्याकाळी तरीवाले आलू,मूग- चणा- चवळी पैकी एक उसळ व दाल ,लाल भाजी,हिरवी भाजी [माठ] असे आलटुन -पालटुन मिळायचे.तेव्हाच या पद्धतीने लाल भाजी करायचे..आपण नेहमी पालेभाजी कांदा,लसुण घालुन करतोच.इथे मुख्य जिन्नस हेच आहेत पण तरी थोडा अजुन बदल आहे.
lal bhajee-333.JPG
अशी ही लाल भाजी तिथे पावसाळ्यात खूप मिळते.
एक जुडी लाल भाजी.
२ पातीचे कांदे,
१ मोठा टोमॅटो व ५ ते ६ लसुण पाकळ्या एकत्र वाटुन केलेली प्युरी,
१ वाटी दाण्याचे कुट ,
२ टेबलस्पून घणेपुड,
१ टेबलस्पून गरम मसाला,
चवीप्रमाणे तिखट -मीठ,
२ टेबलस्पून तेल एकुण ,
फोडणीसाठी मोहोरी-जिरे-हिंग्-हळद,
एखादी हिरवी मिरची बारीक चिरलेली,
१ मध्यम कांदा जाडसर चिरुन त्याच्या पाकळ्या सुट्या करुन घ्यायच्या.
कोथिंबीर .

क्रमवार पाककृती: 

लाल भाजी व पातीचा कांदा पातीसकट बारीक चिरुन घ्या.
१ टेबलस्पून तेल गरम करुन त्यात मोहोरी-जिरे-हिंग व हळद ,हिरवी मिरची घालुन फोडणी करा.त्यात पातीचा कांदा परतुन त्यावर लाल भाजी घालुन परता .झाकण ठेवुन एक वाफ आणा त्यात टोमॅटो प्युरी घालुन परता.दाण्याचे कुट.धणेपुड,गरममसाला,आणि साधारण एक ते दिड वाटी पाणी घाला .दाटसर भाजी तयार होते. हे मिश्रण छान ढवळुन त्यात चवीप्रमाणे तिखट-मीठ घाला.मिश्रण उकळायला लागले कि त्यात चिरलेला व पाकळ्या सुट्या केलेला कांदा घाला .छान परता.व गॅस बंद करा्.अर्धवट शिजलेला कांदा भाजीला वेगळी चव देतो तसेच दाण्याच्या कुटामुळे भाजी मिळुन येते .
lal bhaji--11.JPG
अशी ही तयार लाल भाजी.मी त्यावर थोडे अमुल बटर घातले आहे .
पण आवडत असल्यास उरलेल्या १ टेबलस्पून तेलाची फोडणी करुन त्यात चिरलेला लसूण व थोडेसे लाल तिखट घालुन भाजीला झणझणीत व खमंग करता येते.तिथे अशी फोडणी एका वाटीत वेगळी आणुन देत होते.या भाजीसोबत गरम करारा घी वाला करारा फुलका असायचा.
lal bhajee roti.JPG
बिलासपूर ची ही आठवण लक्षात ठेवुन खास बेत केला आहे जेवायला.लाल भाजी,गरम फुलका ,तोंडी लावायला नाशिकचा पांढरा कांदा,खास सोलापुरी पद्धतीची दाण्याची घरी केलेली खमंग चटणी..

अधिक टिपा: 

दाणे कुट बारीक हवे.
दाणे कुट नको असल्यास पिवळी मुगडाळ भिजवुन, वाटुन घालावी.किंवा ही मुगडाळ शिजवुन ,घोटुन घालावी.
हिरवा पातीचा कांदा नसल्यास नेहमीचा कांदा बारीक चिरुन घालावा.पण वरुन घालायला मोठ्या फोडी-पाकळ्या वेगळ्या केलेल्या- मात्र हव्यातच्.कारण या अर्धवट कच्च्या शिजलेल्या कांद्याची चव वेगळी येते.
पनीर/किसलेले चीज तयार भाजीवर घालायचे .त्याआधी भाजीवर चवीप्रमाणे थोडेसे टोमॅटो सॉस/चिली सॉस-तिखट आवडत असेल तर घालुन घ्यावे.
वरील बदल करायचा असल्यास तयार भाजीला वरुन लसणीची फोडणी घालु नये.

माहितीचा स्रोत: 
अर्थात बिलासपूर.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा ,होय दाण्याचे कुट बारीक करुन घेतले आहे.ही भाजी खाल्ल्यापासुन चवळी ,पालक किंवा तत्सम पालेभाजी मी या प्रकारे करते.यात बदल म्हणुन तयार भाजीला वरुन लिंबाचा रस घालते.तसेच पथ्याची भाजी करताना दाण्याच्या कुटाऐवजी पिवळी मुगडाळ भिजवुन [किंवा शिजवुन ] वाटुन घालते.वरुन थोडी तूप-जिर्‍याची फोडणी..अशीही चव छान येते.

मस्त आहे.

आपल्या पद्धतीने केलेली कोरडी पालेभाजी खायला मुलगी नाक मुरडते, असे काहीतरी करुन दिले तर कळणारही नाही पालेभाजी आहे ते Happy

वेगळी रेसिपी. लाल माठाची नेहमीच्या चवीची भाजी खाऊन कधी कधी कंटाळा येतो. आता अशा पद्धतीने भाजी करून पाहायला हवी. थँक्स सुलेखा.

खूप छान, वेगळी पध्दत! दोन वर्ष छत्तीसगढमध्ये होते तेव्हा खूप खाल्ली ही भाजी! तिथल्या सारखी कोवळी न चविष्ट लाल भाजी मिळाली नाही. आम्ही लोखंडाच्या खाणी असलेल्या भागात राहायचो तिथली लालभाजी खासच कारण तिथल्या जमिनीत असलेल्या लोहामुळे असेल कदाचित्. काही मसाले न घालता नुसती परतली तरी चविष्ट .....नॉस्टेलजिक झाले .... नक्कीच अश्या पध्दतीने करुन बघण्यात येईल

साधना,मंजु
या लाल भाजीत लोह तत्व भरपूर असते पण मुलं अन मोठे सुद्धा ही भाजी आपल्या पद्धतीची ,साधी कोरडी परतलेली केली तर खायला तयार नसतात.पण अशी केली तर छान घोटल्यासारखी मिळुन येते.या तयार भाजीत अमुल बटर बरोबर पनीर वा चीज घातले तर मस्त टँगी भाजी तयार..
हिरवा पातीचा कांदा नसला तर नेहमीचा कांदा बारीक चिरुन घालायचा.
धनुअमिता,फुलके म्हणजे आधी तवा आणि नंतर गॅसवर भाजुन केलेली पोळी ग !!!

व्वॉव! यम्मी दिसत्येय भाजी Happy

इथे लाल माठ मिळत नाही...:( इन्फॅक्ट फक्त पालक आणि शेपूच मिळतो. एकदाच राजगिरा सापड्ला होता एशिअन शॉप मधे. मला पालेभाज्या अतिशय आवडतात... शेपू सोडुन Proud