माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा –भाग ११ (समारोप)
२०११ सालच्या जून-जुलै महिन्यात कैलास-मानसची पवित्र यात्रा करण्याचा योग आला. त्या नितांतसुंदर अनुभवाचे मी माझ्या तोकड्या भाषेत केलेले हे वर्णन.
ह्या आधीचे भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा!
भाग १ : पूर्वतयारी: http://www.maayboli.com/node/30416
भाग २ : दिल्ली ते नारायण आश्रम: http://www.maayboli.com/node/30637
भाग ३: नारायण आश्रम ते लीपुलेख खिंड: http://www.maayboli.com/node/30799
भाग ४: मुक्काम तिबेट : http://www.maayboli.com/node/31261
भाग ५: महाकैलासची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31407
भाग ६: मानस सरोवराची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31704
भाग ७: तकलाकोट ते लीपुलेख खिंड : http://www.maayboli.com/node/31889
भाग ८: लीपुलेख खिंड ते गाला : http://www.maayboli.com/node/32246
भाग ९: गाला ते पुणे: http://www.maayboli.com/node/32565
भाग १०: यात्रेची तयारी: http://www.maayboli.com/node/34063
समारोप
खरच, मला का यावस वाटल असेल कैलास-मानसला यावस? मी तिथे असताना आणि परत आल्यावरही ह्यावर बराच विचार केला. मी तशी देव-धर्म, उपास-तापास करणाऱ्यातली नाही. पाप-पुण्य ह्या कल्पनांवर माझा विश्वास नाही. समाज नीट चालावा म्हणून परलोकातील सुखाचा मोह दाखवलेला आहे, अस मला वाटत. म्हणजे कस की भुकेल्याला अन्न द्यावेसे वाटावे, म्हणून ते ‘पुण्याच काम’ करून मृत्युनंतरच्या फायद्याची लालूच. वाईट वागल्यास ‘पापाची’ भीती दाखवणे. भूतदया नक्कीच चांगली, पण त्याला ‘पुण्य’ मिळवण्याची झालर कशाला? असा माझा विचार. त्यामुळे धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे अनेक जन्मातील पापे धुवायचं आकर्षण वाटण्याच काही कारणच नाही.
गिर्यारोहण किंवा प्रवासाची आवड म्हणावी तर, अनेक हिमालयातले ट्रेक किंवा परदेशातील प्रवास मी खर्च केलेल्या पैशात आरामात झाले असते. आजही युथ होस्टेल किंवा तश्या संस्थांच्या ट्रेकला, दिल्ली पर्यंतचा विमानाचा खर्च पकडूनही, १२-१५ हजारापेक्षा जास्त खर्च येत नाही. ह्या यात्रेला १-१.२ लाखापर्यंत खर्च येतो. म्हणजे त्या खर्चात १० ट्रेक मी आरामात करू शकले असते.
मग का? इतकी जवळजवळ २० वर्ष मी हे स्वप्न का पाहिलं असेल? युरोप ट्रीपला जावे किंवा नायगारा फॉल बघावासा मलाही वाटतो. पण ह्या इच्छेची तीव्रता काहीच्या काहीच का होती? खर सांगायचं तर ‘का जावस वाटल?’ ह्याच उत्तर पूर्णपणे अजून मलाही मिळाल नाहीये! कर्मकांड बुद्धीला पटत नसली तरी हिंदू धर्माचा पगडा माझ्या अंतर्मनावर असेल का? अश्या वेळेला पु.ल.देशपांडे म्हणतात ते,’गड्या, तू वंशाचा दिवा नसून निव्वळ दुवा आहेस’, हे खर वाटायला लागत.
आमच्या बॅचच्या इतर यात्रींच्या बोलण्यातून मी ‘ते’ का आले असतील? ह्याचा अंदाज घेत होते. शेकडा ७०-७५ % यात्री हे पुण्यप्राप्तीचा स्पष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून आले होते. उरलेले लोक माझ्यासारखे कुंपणावर बसलेले होते. शारीरिक क्षमता वाढवणे, अप्रतीम सुंदर निसर्गाचा आस्वाद घेणे, मनाच्या ‘वस्तुनिष्ठपणा’ कडून ‘भक्तीमार्गाला’ जाण्याचा प्रयत्न अशी अनेकविध उत्तरे ह्या शोधातून मिळाली.
वयाने मोठ होऊन ह्या जगाच्या रुक्ष धकाधकीत तगून राहणे अवघडच असते. त्या मोठ होण्याबरोबर अपरिहार्यपणे गळ्यात येणाऱ्या कर्तव्य -जबाबदाऱ्यांच्या जडशीळ माळा, यश-अपयशात होणारी रस्सीखेच, वेळोवेळी मनाला घालावी लागणारी मुरड हे सगळ बाजारात फेरफटका मारण्याइतक सोप असेल कस? ह्या सगळ्यातून थोड थांबून वेगळ्या वातावरणात जाणे, आपल्या मनाला ‘आपल्याला नक्की हवय तरी काय?’ हा विचार करायला भाग पाडणे, असा काहीसा हेतू माझ्या मनात होता.
शिक्षण, विवाह, अर्थाजन, अपत्य संगोपन हे ठराविक टप्पे घेताना जगण्याचा वेग प्रचंड वाढला. मधेच अचानक वाटायचं,’ पण आपण का धावतोय इतक? आणि कशासाठी? नक्की पोचायचय तरी कुठे?आपल नक्की ध्येय तरी काय आहे?’ पण हा शोध घेण्याइतकीही फुरसत मिळत नव्हती. गेली काही वर्षे ह्या कुतरओढीने मी अगदी गळून गेले होते. परिस्थितीने दिलेले काही घाव सांभाळत, कुरवाळत रहात होते. पूर्वी स्वभावात नसलेला एक कडूपणा आला होता. त्याचा त्रास व्हायचा.
मी आनंदी / सुखी/ समाधानी होण्यासाठी स्वतःकडे पाहण्याऐवजी मला बाह्य परिस्थितीकडे बोट दाखवण सोप वाटत होत. मला अमुक इतके पैसे मिळाले की, माझ्या भोवतालचे लोक अश्या अश्या पद्धतीने बदलले की, समाज असा असा झाला की, मी समाजासाठी- कुटुंबासाठी ह्या गोष्टी केल्या की मग मला छान वाटेल, सगळे मला नक्की नावाजतील, अशी भावना मनात प्रबळ झाली होती. ह्या भावनेला धक्का बसला, की निराश वाटायचं.
ह्या सगळ्यातून बाहेर पडायला मला ह्या महिन्याची फार मदत झाली. आत्मशोधाच्या ह्या प्रक्रियेसाठी अत्यंत पोषक अस वातावरण ह्या यात्रेत मिळाल. एकतर संगणक, आंतरजाल, दूरध्वनी आणि कुटुंबीय ह्या सगळ्यापासून मी खूप दूर होते. इतर कुठल्याही ट्रेकपेक्षाही जास्त शारीरिक-मानसिक क्षमतेचा, अनिश्चितता झेलण्याचा तयारीचा कस ह्या यात्रेत रोजच्या रोज लागत होता.
रोजच्या चरितार्थासाठीच्या गडबडीत माझा माझ्यासोबतचा संवाद केवळ रोजचे अन्न-वस्त्र-निवाऱ्याच्या प्रश्नांपर्यंतच राहिला होता. ती तुटलेली साखळी जोडायला मला इथे वेळ आणि मोकळीक मिळाली. आपल्या स्वतःच्या मतांची चिरफाड करणे, म्हणजे एक शल्यकर्मच! ते काम मी नेहमीच मागे टाकत होते. आता मात्र ते आपोआपच होत होत. धार्मिकतेकडे माझा कल नव्हता, आणि आजही नाही. परंतु माझ्यातल्या अध्यात्मिकतेचा परिचय ह्या महिन्याभरात झाला. मात्र ती अध्यात्मिकता माझ्या स्वतःच्या आत्मिक प्रगतीसाठी असेल, बाह्य प्रदर्शनासाठी नाही.
ह्या यात्रेत ‘दिव्यत्वाची प्रचिती’ घेतल्यावर ‘कर माझे’ नक्कीच जुळले. पण मी नास्तिकतेकडून आस्तीकतेकडे गेले का? तर नाही. मी त्या बाबतीत होते तिथेच आहे. कैलास पर्वतावर किंवा मानस सरोवराच्या काठी कोणतेही देऊळ नाही. अर्थातच त्याबरोबर येणारा ‘देव’ नावाचा व्यवसाय नाही, धातूशोधक यंत्रे नाहीत, प्रसाद-माळांची दुकानेही नाहीत. ‘निर्गुण-निराकार’ असे ते रूप अनुभवून आल्यावर तर मला गर्दीने गजबजलेली, स्वतःची जाहिरात करणारी देवळे आणखीनच आवडेनाशी झाली.
पण कैलास-मानस च्या रौद्र अनुभूतीचा परिणाम माझ्या मनावर नक्कीच झाला.
मी काहीशी शांत झाले, अस मला वाटत. कपडे – दागिने हा माझा प्रांत पहिल्यापासून नव्हताच. आता मी त्यापासून अजून काही अंतर लांब गेले आहे. माझी विचार करायची पद्धत काहीशी सखोल झाली. आपल्या दिशेने येणारी काही वाक्य किंवा घटना मी थोड्या अलिप्तपणे पाहू लागले. वाद घालणे, शब्दाने शब्द वाढवणे हे टाळण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न करायला लागले.
म्हणजे मी क्रोध, लोभ, मोह, माया सगळ जिंकल का? नाही, आजिबात नाही. मी अजूनही एक माणूसच आहे, साधू- सन्यासी झाले नाही. पण तिथल्या अपूर्व अश्या शांतीचा अनुभव मन शांत करून गेला, हे मात्र खर!!
तिथे येणाऱ्या यात्रीमध्ये भाविक, श्रद्धाळू लोक मोठ्या प्रमाणात असतात. संपूर्ण यात्रेत उपास करण्यापासून ते चालताना मौन पाळणारे लोक असतात. त्यांच्या मनोबलाची कमाल वाटते. पण हेच लोक लहान-सहान कारणावरून आपल्या सहयात्रींबरोबर किंवा पोर्टरबरोबर भांडताना, अद्वातद्वा बोलताना दिसले, की धक्काच बसतो. ह्या लोकांची ही व्रत-वैकल्य शरीरापर्यंतच राहतात, मनापर्यंत झिरपत नाहीत, ह्याची खंत वाटते.
पूर्वी लोक काशीयात्रेला जात, ते घरादारावर तुळशीपत्र ठेवूनच. प्रवासाच्या, संपर्काच्या कोणत्याही सोयी नसताना ह्या यात्रेला जात असत. जाताना आपल्या घराचा, कुटुंबाचा शेवटचा निरोप घेण्याची मानसिक तयारी आपोआपच होत असेल. जगून-वाचून कोणी परत आला, तर तो त्याचा पुनर्जन्म मानत असत. त्या आलेल्या माणसाला आपला जीव ज्यात गुंतला आहे, त्या सगळ्याकडे साक्षी भावाने पाहणे शक्य होत असेल. ह्या सगळ्या पसाऱ्याचा केंद्रबिंदू ‘मी’ आहे, ही समजूत किती पोकळ आहे, ह्याची जाणीव होणे, हाच तीर्थयात्रांमागचा उद्देश असेल का?
महाविद्यालयात असल्यापासून मी ह्या यात्रेची स्वप्न बघितली होती. पुढे घर-संसार-व्यवसाय ह्या जबाबदाऱ्या महिनाभर कश्या बाजूला टाकणार, अस वाटून मी खूप वर्षे ती इच्छा कोपऱ्यात सरकवली होती. पण प्रत्यक्षात मी नसतानाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू राहिल्या. माझ्या परीने मी सगळी ओळ नीट लावायचा प्रयत्न केला होता. तरीही, मनाच्या एका कोपऱ्यात ‘माझ्या वाचून सगळ्यांच खूप अडेल’ अशी एक भावना होती. पण तो एक अहंभाव होता, अस आता वाटत. आपल घर, व्यवसाय, कुटुंब ह्या सगळ्यात गुंतून पडलेल्या मनाला थोड बाजूला जाण्याची संधी मिळाली. निसर्गाचे ते भयचकित करून टाकणारे ते रूप बघून माझ्या सुखरूप परत येण्यामागे थोडा योगायोग, थोड नशीब, थोड्या सगळ्यांच्या सद्भावना आहेत ह्याची प्रखर जाणीव झाली.
हे लक्षात आल्यावर मनात असलेल्या, पण करायची हिंमत न केलेल्या असंख्य गोष्टी वर आल्या. मला चित्र काढायला शिकायची आहेत, भरपूर प्रवास करायचा आहे, नवीन भाषा शिकायच्या आहेत. जी गोष्ट खरच मनापासून करावीशी वाटते, ती परिस्थितीचा फार बाऊ न करता करून टाकायचा एक आत्मविश्वास मला ह्या प्रवासातून मिळाला. आपल्या वागण्यातून जर हे काही करायची तेवढी असोशी दिसली, तर आपले कुटुंबीय सुद्धा भरपूर सहकार्य करतात, हे लक्षात आले.
आपल्या दिनक्रमाशिवाय वेगळी गोष्ट करायला, शिकायला ‘अत्यंत आदर्श’ अशी परिस्थिती कदाचित कधीच निर्माण होणार नाही. ‘आता दोन महिने मला ऑफिसला सुट्टी आहे, मुलगा आजीकडे गेलाय, खिशात भरपूर पैसे आहेत, घरच्या कोणत्याही जबाबदाऱ्या नाहीयेत, आता मी माझ्या मनातली ही गोष्ट करते/ शिकते’ अस व्हायची शक्यता जवळपास नाहीच!!
आणि वर वर्णन केलेली आदर्श परिस्थिती नसताना काही ठरवल, तर माझ्यावर विश्वास ठेवा, आभाळ कोसळत नाही’!! सगळ व्यवस्थित रांगेला लागत! तेव्हा ‘त्यागमूर्ती’ होण्याची नशा सोडून ‘आनंदमूर्ती’ व्हायचा निश्चय मी करून टाकला आहे.
ही यात्रा मी स्वतः केली, हे जरी खर आहे, तरी त्यामागे अनेकांचे सहकार्य असते. सासर- माहेरचे कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, सहकारी, सहयात्री तर असतातच. पण मी नसताना एकही दिवस सुट्टी न घेणाऱ्या आमच्या घरकामाच्या बाई, ‘तिकडून फोन करा, मी तुमचा फोन इथून रिचार्ज करेन.’ अस म्हणणारा दुकानदार, न सांगता मला भरपूर सुट्टे पैसे आणून देणारी माझी रेल्वेत काम करणारी जिवलग मैत्रीण, असे असंख्य. किती जणांची नवे घेऊ?
मी लहान असल्यापासून भरपूर वाचत आले. लिखाणाची हिंमत मात्र कधीच केली नव्हती. माझ्या मोठ्या भावाने मला हे अनुभव लिहिण्याचा खूप आग्रह केला. देवनागरी लिखाणासाठीचा फॉन्ट देण्यापासून ते मला लिहिता न आलेले काही शब्द इ-मेलने पाठवण्यापर्यंत सगळी मदत त्याने मला केली.
त्याच्यामुळेच ही लिखाणाची झिंग मला अनुभवता आली. माझेच अनुभव लिहिताना कितीतरी वेळा माझे डोळे भरून आले. यात्रा संपताना झालेली घालमेल लिहिताना मी परत तशीच अस्वस्थ झाले. पण मला नक्की काय वाटल, तेव्हा नक्की काय विचार आले, ह्या सगळ्याचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर काही परिणाम झाला का? ह्याची उत्तरे मला लिहितानाच मिळाली. प्रत्यक्ष प्रवासात असताना आपल लक्ष ‘आपली तब्येत, आपल सामान, ऊन/पाऊस/थंडी, उद्याच्या चढ/उताराची – चालण्याच्या अंतराची काळजी, घरची आठवण’ अश्या असंख्य ठिकाणी असत. घरी संगणकासमोर बसून शांतपणे टंकताना, हे कोणतेही ताण नव्हते. त्यामुळे स्वतःला तपासायला योग्य वेळ मिळाला. लिहील नसत, तर ह्या माझ्या ‘स्व’च्या शोधाला मी नक्कीच मुकले असते.
ह्या लिखाणाबरोबरची सर्व छायाचित्रे मी काढलेली नाहीत. मला यात्रेत गवसलेली माझी मैत्रीण नंदिनी, तसेच आमच्या बॅचचे कलाकार श्री.शरद तावडे ह्यांनी ती मला विनातक्रार, विनाअट दिली. त्यामुळे माझ्या लेखांची खुमारी खुपच वाढली.
काळ-काम-वेगाची गणिते सोडवताना ज्यांच्याशी संपर्क कमी झाला होता, किंवा पार तुटलाच होता, अश्या काही मित्र-मैत्रीणींशी किंवा नातेवाईकांशी मी ह्या निमित्ताने परत एकदा जोडली गेले. आंतरजालावर माझे लिखाण वाचून, ज्यांची माझी काहीही ओळख नाही, अशांनी मला भरघोस प्रोत्साहन दिले. त्या सर्वांची मैत्री ही मला ह्या लिखाणाने दिलेली अपूर्व अशी भेट आहे.
शेवटी काय सांगू? आता शब्द अपुरे पडत आहेत. ह्या संपूर्ण यात्रेत निसर्ग सौंदर्याने, आव्हानाने, आश्चर्याने नटलेली धरतीमाता आपल्यासमोर असते. ह्या अलौकिक सौंदर्याचा अनुभव प्रत्येक भारतीयाला मिळावा, इथे प्रत्यक्ष जाऊन येण्याची ओढ निर्माण व्हावी, यासाठी आपण काहीतरी करावे, हा एक हेतू ह्या लिखाणामागे आहेच!
इच्छुक आनंदयात्रींना हिमालयाचा यात्रिक होण्याचे भाग्य लाभलेल्या आमच्यासारख्या भाग्यवंताच्या हार्दिक शुभेच्छा!
ॐ नमः शिवाय......... ॐ नमः शिवाय.........
नमस्कार वाचताना स्वतः प्रवास
नमस्कार वाचताना स्वतः प्रवास करत असल्याचा अनुभव येत होता अतिशय रोमांचक वर्णन ,तुमच्या धैर्याला दाद द्यावी तेवढी कमीच ,१ प्रश्न मला विचारावा वाटतो आहे नक्की किती खर्च झाला त्याची कल्पना द्यावी .
आम्ही २००९ साली अमरनाथ पायी जाऊन आलो असल्याने पुढचे लक्ष्य कैलाश मानसरोवर यात्रा होती तुमच्या मुले त्याला बळआणि उभारी येत आहे ....!
सगळे भाग सुंदर होते पण हा भाग
सगळे भाग सुंदर होते पण हा भाग म्हणजे कळस ठरलाय या लेखनमालिकेचा. इतकं आतून आलय सगळं.
अनया: सगळे भाग अतिशय सुरेख
अनया: सगळे भाग अतिशय सुरेख लिहलेत.
वरती कुणी म्हटलय तसं कधी ही यात्रा केलीच तर त्याचं श्रेय या मालिकेलाच.
संपूर्ण लेखमाला अतिशय सुंदर.
संपूर्ण लेखमाला अतिशय सुंदर.
ॐ नमः शिवाय.. समारोप सुंदर
ॐ नमः शिवाय.. समारोप सुंदर झालाय... आज मोकळा वेळ मिळाल्याबरोबर संपूर्ण मालिकाच वाचून काढली आणि आता कैलास-मानस यात्रेचे भुत माझ्या डोक्यावर पूर्णपणे चढलेले आहे. २०१३ साठी तयारी सुरू..
सुरेख ! फार सुंदर लेखमालिका
सुरेख !
फार सुंदर लेखमालिका आहे अगदी प्रेरणादायी !
अभिनंदन !
सचिनजी, मी एक ‘तयारी’चा भाग
सचिनजी, मी एक ‘तयारी’चा भाग लिहिला आहे. त्यात खर्चाचा अंदाज वगैरे दिला आहे. वरच्या लिंकवर टिचकी मारा.
अनया समारोपाचा हा लेख अगदी
अनया
समारोपाचा हा लेख अगदी लेखमालेचा कळस आहे.
सुंदर!
अनया, तुमची ही संपूर्ण मालिका
अनया,
तुमची ही संपूर्ण मालिका वाचली.
शेवटचा भाग तर निव्वळ अप्रतिम झाला आहे.
सुंदर लेखमाला! भावपूर्ण
सुंदर लेखमाला! भावपूर्ण समारोप!
आज सगळी मालिका सलग एका दमात
आज सगळी मालिका सलग एका दमात वाचून काढली. आधी प्रत्येक भाग वेगवेगळा वाचला होता. समारोपाचा भाग खरच या सगळ्यावर कळस आहे. प्रत्येक भाग वाचतांना तुमच्यासोबतच प्रवास करतोय असे वाटत होते. इतकी नितांतसुंदर मालिका लिहील्याबद्दल आभार.
खरच सुंदर लेखमाला.. छान
खरच सुंदर लेखमाला..
छान समारोप केलाय
तुमची लेखनशैली खास आहे... असेच लिहित राहा ...
अनया, अतिशय प्रेरणादायी होती
अनया, अतिशय प्रेरणादायी होती ही लेखमाला आणि हा समारोप चा भाग पण सुरेख झालायं
काही काही भाग तर श्वास रोखुन वाचले होते!
ही एक अत्यंत सुंदर,
ही एक अत्यंत सुंदर, प्रामाणीकपणे लिहिलेली, मनाला थेट भिडलेली व खुप खुप आवडलेली लेखमालिका आहे.
खरंच प्रवास वर्णन संपताना असं
खरंच प्रवास वर्णन संपताना असं वाटतंय कि आपण १ जवळच्या माणसापासून दूर जातोय ,शेवटचा स्व चा शोध त्याचे वर्णन अविस्मरणीय आहे शब्दांची मांडणी अप्रतिम . प्रथमचा प्रयास खरंच खूप चांगला .एक विनंती असच लिहित चला स्वतः साठी आणि आमच्या सारख्या वाचकासाठी . पुढील आयुष्य साठी तुम्हाला हार्दिक शुभेछा ओम नमः शिवाय ....!
।। ॐ नमः शिवाय ।। फार सुंदर
।। ॐ नमः शिवाय ।।
फार सुंदर आणि ओघवते लिहिल आहे... तुम्ही लिहिणार्याच आहात आणि कॉम्पुटर वर लिहायची सवय असलेल्या आहात असाच वाटल.
शिवाच्या कृपेने यात्रा आणि लेख सर्वच फार चं जुळून आल आणि आम्हाला वाचायलाही मिळाल.
माझी यात्रेला जाण्याची ओढ वाढवलीत मात्र
जमल्यास बायकोला ही तयार करेन पण नाही तर मी तर जाणारच.
शिवाची अनुभूती घ्यायलाच हवी.
एवढा छान अनुभव आमच्या पर्यंत आणल्याबद्दल धन्यवाद.
।। ॐ नमः शिवाय ।।
असामि-असामि : तुमच्या
असामि-असामि : तुमच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! आज बऱ्याच दिवसांनी धागा वर आल्यामुळे आश्चर्य वाटले. तुमच्या यात्रेच्या कल्पनेला जोरदार पाठींबा. कुठलीही मदत लागली तर कळवा. दोघे बरोबर जाऊ शकलात तर सोन्याहून पिवळ! इतका विलक्षण अनुभव आपल्या जोडीदाराबरोबर घेता आला, तर अजून काय पाहिजे?
खुपच सुंदर फोटो आहेत. पुस्तक
खुपच सुंदर फोटो आहेत. पुस्तक रूपाने प्रकाशित करावेत हि परत एकदा नम्र विनंती.
समारोप अतिशय उत्तम साहित्य मुल्ये असलेला आहे. फारच छन उतरला आहे.
तसेच तयारी विषयीचे मार्गदर्शन पण मुद्देसूद आहे.
भविष्यातल्या बरेच यात्री आपणास नक्किच दुवा देतील.
आमच्या सारखे जे काहमुआर्थिक अथवा वयाच्या कारणा मुळे जाऊ शकत नाहीत त्यांना प्रत्यक्ष यात्रा केल्याचे समाधान हे लिखाण वाचून नक्किच मिळेल.
पुनश्च एकदा कौतूकाची थाप अन शाबासकी आणि मनःपूर्वक धन्यवाद.
साने साहेब, तुमचे खूप आभार.
साने साहेब, तुमचे खूप आभार. इथे लिहिल्यानंतर बऱ्याच दिवसांनी प्रतिक्रिया आली. छान वाटल!
अनयाताई, एक अतिशय सुन्दर,
अनयाताई,
एक अतिशय सुन्दर, सचित्र, सुरेख लेखमाला लिहिली आहे. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनन्दन. लिहीण्याची शैली भावली. तुमचे अनुभव वाचताना लेखांद्वारे आम्हीपण घरबसल्या कैलास-मानसला जाऊन आलो... यात्रावर्णन शेअर केल्याबद्दल शतशः धन्यवाद...! समारोपातील मनोगत आणि 'स्व'गतचा प्रवास मनाला भिडला. . . ! अनुभवासह, चित्रासह हा प्रवास उत्तम दर्जेदार लिहिला गेलाय . . .!
वडिलांनी अनेकवेळा कैलास्-मानस विषयी आम्हास सान्गितले होते, त्यान्ची चारधामयात्रा झाली होती आणि हिमालयाच्या भीषण रौद्ररूपाची वर्णने ही ते खूपदा आम्हास सान्गायचे पण कैलास्-मानसदर्शनाची त्यान्ची इच्छा काही आम्ही पूर्ण करू शकलो नाही मात्र त्यान्चे इच्छेखातर आम्ही सर्व कुटुम्बीयानी वर्षभरापूर्वीच बद्रीविशाल आणि गन्गोत्री यात्रा त्यान्चेसह केली. तुमचा हा अपूर्व, अलौकीक, प्रदीर्घ लेख वाचण्यास आता ते आपल्यात नाहीत पण निश्चितच त्या कैलासनाथाच्या पायथ्याशी आणि मानस-परिसरात विहरत असतील.
मानसरोवराची यात्रा आणि कैलासदर्शनाची इच्छा तर खूप आहे, पाहुया कधी योग येतो ते आणि कधी तो मनावर घेतो ते . . .!
हा प्रतिसाद खूप उशीराने पाठवित आहे कारण मी नुकताच मायबोलीकर झालोय.
पुन्हा एकदा धन्यवाद.
कैलास्-मानस यात्रेला जाण्यापूर्वी आपले मार्गदर्शन मिळेल का?
आपला बन्धू -
श्रीनंद, खूप दिवसांनी धागा वर
श्रीनंद, खूप दिवसांनी धागा वर आल्याने आश्चर्य आणि आनंद वाटला. आपल्या अभिप्रायाबद्दल आभार! मदत करायला सदैव तयार आहे. तुमच्या बाबांना श्रद्धांजली.
अतिशय सुंदर, समग्र, पद्धतशीर
अतिशय सुंदर, समग्र, पद्धतशीर आणि सचित्र लेखन मालिका. शब्द मनातून पानावर उतरले आहेत.
मी पहिल्यांदा लेख वाचतोय. लेख जरी जुना असला समग्र वाचताना यात्रेचा रोमांच अनुभवला.
शब्द आणि फोटो रुपी कैलास-मानस सरोवरची यात्रा घडवल्या बद्दल आपल्याला धन्यवाद.
नमस्कार तै! खुपच छान लिहिलय
नमस्कार तै! खुपच छान लिहिलय तुम्ही.
सध्यतरी बाळ लहान आहे माझ. बघुयात कधि जमतय ते.
जय भोले!
अनयाताई, संपुर्ण लेखमालिका
अनयाताई, संपुर्ण लेखमालिका वाचली. मनापासुन लिहिले आहे याचे प्रत्यंतर ह्या लेखमालिकेतील प्रत्येक शब्दात उतरलंय.
ही कठीण आणि दुर्गम अशी यात्रा पुर्ण केल्याबद्दल आपले अभिनंदन. तुमच्या ह्या लेखमालिकेतील प्रकाशचित्रांमुळे आणि तुमच्या लेखनशैलीमुळे ही यात्रा जणुकाही तुमच्या सोबत आम्हा वाचकांची सुध्दा घडली असे वाचताना पदोपदी जाणवले.
लेखमालिका पुर्ण करताना लिहिलेला हा समारोपाचा भाग म्हणजे एका सुंदर लेखमालिकेचा तितकाच सुंदर शेवट.
।। ॐ नमः शिवाय ।।
तुम्ही मांडलेल्या या
तुम्ही मांडलेल्या या प्रामाणिक मनोगताने या सुंदर मालिकेचे शिखर गाठलेला आहे. खुप काही शिकायला मिळालं आणि अजुन बरच काही शिकायच बाकी आहे.. हे जाणवलं. खुप खुप धन्यवाद
अनयाताई, तुमची लेखमाला वाचली
अनयाताई, तुमची लेखमाला वाचली आणी एका वेगळ्याच जगाची सफर घडली. खुपसं रिलेट करू शकलो. धन्यवाद!!
तेव्हा ‘त्यागमूर्ती’ होण्याची
तेव्हा ‘त्यागमूर्ती’ होण्याची नशा सोडून ‘आनंदमूर्ती’ व्हायचा निश्चय मी करून टाकला आहे -> Masterstroke!!!!
I am reading your writing now in 2022, its simply amazing. Kiti wela maze dole bharun aale sangtach yet nahi
आज खूप म्हणजे खूपच दिवसांनी
आज खूप म्हणजे खूपच दिवसांनी धागा वर आल्यावर आश्चर्य वाटलं. मी चुकतमाकत १० वर्षांपूर्वी केलेलं लिखाण आजही आवडतं आहे, ही प्रतिक्रिया वाचून फार आनंद झाला.
ॐ नमः शिवाय
ॐ नमः शिवाय|
ॐ नमः शिवाय|
Pages