कोवळ्या फणसाची भाजी...

Submitted by परदेसाई on 25 March, 2013 - 14:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फणसाची कोवळी भाजी (पाकीट).
अर्धा वाटी भिजवलेले काळे वाटाणे (चवळी).
खोबरे: २ टेबल. चमचे.
हिरव्या मिरच्या २/३
मिरी दाणे ५/६
धणे १ चमचा.
हळद, मीठ
फोडणी: हिंग, मोहरी, तेल.

क्रमवार पाककृती: 

हल्ली अमेरिकेत Daily Delight ची फणसाची कोवळी भाजी मिळते (Young JackFruit)
एक पाकीट घ्या. त्यात असलेला फणस आणि अर्धी वाटी भिजवलेले काळे वाटाणे (चवळी) थोड्या पाण्यात टाकून कुकरला लावा. फार शिजवायची नाहीय, एक दोन शिट्ट्या काढा..
थंड झाल्यावर हाताने/चमच्याने त्यातल्या फणसाच्या फोडी कुस्करा.. (जास्त पाणी झाल्यास पाणी काढून टाका. भाजी ओलसर हवी पण अगदीच गिच्चा नको).

मसाल्यासाठी: ओलं खोबरं २ टे.चमचे, २/३ हिरव्या मिरच्या, ५/६ मिरी दाणे आणि १ चमचा भर धणे वाटून घ्या.
मसाला, चवीला मीठ, आणि थोडी हळद भाजीला फासून ठेवा.

फोडणी: हिंग, मोहरीची फोडणी करा. त्यात ही भाजी टाका. आणि एक चांगली वाफ काढा..

(या भाजीला आलं, लसूण वगैरे नसतं)
पारंपारीक...

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फणसाची भाजी बंगाली पद्धतीने आणि बिहारी पद्धतीने केलेली खाल्ली आहे. घरी कधी केली नाही. आता मुहुर्त लागतील तसे ही आणि सायोची पद्धत वापरुन करण्यात येइल.

छान.

गोंधळ झालाय... ही पाकिटे, भारतीय सामानाच्या दुकानात मिळतात की नेहमीच्या अमेरिकन दुकानात पण मिळतात?

स्वाती, कुठला ब्रँड? मी मागे दोनदा आणले. ब्रँड आठवत नाही. पण दोन्हीवेळा अत्यंत भयाण वास. आणि एकदा कडवट चव.

Chaokoh ब्रॅन्ड. हिरवा कॅन.
मला तरी कधी वास नाही आला. आणि मी त्यातलं पाणी काढून टाकून फोडी धुवून घेते.

छान!
मध्यंतरी कोकणात ही भाजी खाल्ली होती. (अर्थातच दारातल्या ताज्या कच्च्या फ़णसाची.)
ही अगदी सोपी रेसिपी आहे.
आधी थोड्या तेलात ५/६ सांडगी(भरल्या) मिरच्या तळून त्या कुस्करून बाजूला ठेवा.
मग यातल्याच थोड्या तेलात मोहोरी, जिरं, हिंग, हळद, कढिलिंब याची फ़ोडणी करा. यात फ़णस घाला. भरपूर ओलं खोबरं घाला. मीठ आणि चवीपुरती साखर घालून, झाकण ठेऊन चांगली वाफ़ काढा. मग बाजूला ठेवलेल्या तळलेल्या सां.मिरच्यांचा कुस्करा घाला. वाफ़ काढा. भाजी चांगली शिजल्यावर वरूनही ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून वाढा.
पुण्यात, रत्नागिरीत "विजय" ब्रॅन्डचा, साफ़ केलेला, कॅन्ड कोवळा फ़णस मिळतो. त्याची भाजी मी या पद्धतीने करते.

कालच केली होती फणसाची भाजी.
आधी दिवसभर आईच्या नावाने,"का? का, दिलास तु मला फणस? "(कसली ही खुन्नस -- हे मनातल्या मनात :प) शेवटी संध्याकाळी धीर एकवटला अन हाताला तेल चोपडुन, घातली फणसात सुरी! अडकली ना!! कसाबसा जोर लावत दोन तुकडे केले. म्ह्ट्ल हे काही खरं नाही. इथे विळीच पाहीजे. पण विळीची सवय नाही. मातोश्रींचे स्मरण केले अन घेतली कोयरी कोरायला.. जमल!!
मग फणसाचे तुकडे आणि काळे वाटाणे कुकर मध्ये वाफवले. फणस बत्त्याने चेचला. मोहरी, जीरं, हिन्ग, ह्ळद, किंचित तिखटाची फोड्णी करुन त्यात फ,का.वा. परतले. झाकण ठेवुन वाफ काढली. मग मीठ, गुळ, थोड तिखट अन भरपुर खोबर घालुन पुन्हा एक वाफ काढली. वरुन सुक्या लाल मिर्च्या, ठेचलेल्या लसणाच्या भरपुर पाकळ्या आणि थोड्याश्या लाल तिखटाची खमखमीत/ चरचरीत फोडणी दिली.
फणसाची भाजी तय्यार!

फणस बत्त्याने चेचला <<< बापरे... कडक होता का? Proud
(कोकणात त्याला चेचकुवरीच म्हणतात)..

ठेंकु स्वाती... (अवांतर: टीनमधे बीपीए असते म्हणुन काहीजण वापरत नाहीत असे हल्लीच कळले.)

सोप्पा आहे.. पण चिकट आहे. डिंकामुळे..
विळीवर खोबरेल तेल (हाताला आणि विळीच्या पात्याला) लावून चार भाग करायचे..
माधोमध दांड्यासारखा घट्ट भाग असतो, तो पूर्ण पणे काडून टाकायचा.
बाहेरचे कवच (मालवणीच चारखांड) आणि जवळपास १/२ ईंच घट्ट भाग असतो तो ही फेकायचा.
उरलेल्या भागाची भाजी होते... Happy

मस्त आहे Happy
मी पण सायोच्या पद्धतीने पण चणे घालून आणि मानुषींनी सांगितल्याप्रमाणे सांडगी मिरची फोडणीत घालून करते. आता ह्या पद्धतीनेही करुन बघेन.

देसाई, आज तुमच्या पद्धतीने भाजी करुन पाहिली. खोबर्‍याबरोबर मिर्‍या वाटल्यामुळे जरा वेगळी चव आली आणि आवडली. तुम्ही गुळ सांगितलेला नाही पण मी घातला. फोडणीत थोड्या लाल मिरच्याही घातल्या.

Pages

Back to top