Submitted by नंदिनी on 11 August, 2011 - 08:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
सज्जिगे म्हणजेच रवा
१ वाटी भाजलेला रवा
१/४वाटी दही
१ कांदा बारीक चिरून
२ हि. मिरची बारीक चिरून
थोडी कोथिंबीर आणि कढीपत्ता
मीठ चवीनुसार
तेल
आणि एखादे केळीचे अथवा तत्सम पान.
क्रमवार पाककृती:
प्रथम रवा आणि इतर सर्व साहित्य (तेल आणि केळीचे पान सोडून) एकत्र करून घ्या.
त्यामधे लागेल तसे पाणी (असल्यास ताक) घालून घ्या. कन्सिस्टन्सी साधारणपणे घट्ट पिठल्यासारखी आली पाहिजे. खूप पातळ करू नका. सुमारे अर्धा तास पीठ तसेच ठेवून द्या.
नंतर केळ्याच्या पानाला थोडेसे तेल लावून त्याची छोटी तळहाताएवढी रोटी थापून घ्या. (फार मोठे थापल्यास तव्यावर टाकताना मोडेल.)
आता केळ्याचे पान तव्यावर उलटवून घ्या. केळीचे पान काढून घ्या. आणि रोटी दोन्ही बाजूने खरपूस शेकवून घ्या.
नारळाच्या चटणीबरोबर सर्व करा,
वाढणी/प्रमाण:
अंदाजे १० रोटी होतील.
अधिक टिपा:
१. खूप जाड रवा वापरू नका.
२. सॉस किंवा लोणच्याबरोबर पण मस्त लागतात.
माहितीचा स्रोत:
सौ. राव आंटी. मी याच्याकडे तुळू पदार्थ बनवायला शिकतेय. :)
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे खुप सुंदर लागत ... मी हे
हे खुप सुंदर लागत ... मी हे उत्तपा सारख करते/... त्यात वरुन कांदा टोमटो ,कोथिबिर मिरचि, बारिक चिरुन टाकते.... खुप छान लागत.. नंदिनी.. बर झाल तु आठ्वण करुन दिलीस
नंदिनी, पाकृ सार्वजनिक करशील
नंदिनी, पाकृ सार्वजनिक करशील का?
छान वाटते आहे.
अंजली सूचनेबद्दल धन्यवाद.
अंजली सूचनेबद्दल धन्यवाद.
छाने ह्याचे मला दोन धागे
छाने
ह्याचे मला दोन धागे दिसताएत.
मस्त. अशाच तांदुळाच्या
मस्त.
अशाच तांदुळाच्या पिठीच्या पानग्या लावतात केळीच्या पानावर. दूधसाखरेतल्या किंवा मीठ-मिरची लावून दोन्ही सुंदर लागतात.
हे मस्त आहे. करणार नक्की
हे मस्त आहे. करणार नक्की करणार.
माझी स्वैपाक बाई ज्वारीच्या पिठाचं असलं प्रकरण करते. ते ती डायरेक्ट तव्यावरच थापते.
नंदिनी, ही रोटी तव्यावर
नंदिनी, ही रोटी तव्यावर टाकल्यावर केळीचे पान काढून घ्यायचे ना? ती पायरी प्लिज जरा विस्कटून सांगतेस का?
मंजू, उशीरा पाहिला तुझा
मंजू, उशीरा पाहिला तुझा प्रतिसाद.
केळीच्या पानावर थापलेली रोटी पानासकट उचल आणि तव्यावर उलटी कर. आता केळीचे पान वर येइल ते काढून घे. आलं का लक्षात?
नी, गरम तव्यावर कसं काय थापू शकते??
थालिपिठासारखं थापत असणार
थालिपिठासारखं थापत असणार डायरेक्ट तव्यावर.
हे थोडं पातळ केलं तर धिरड्यासारखंही घालता येईल.
मस्त! करून पाहणार.
मस्त! करून पाहणार.
छान आहे हा प्रकार. सध्या
छान आहे हा प्रकार. सध्या आप्पेपात्र आणि इडलीपात्र दोन्ही नसल्याने ह्याचा लवकरच नंबर लागेल
नी, गरम तव्यावर कसं काय थापू शकते?? >>> पहिले थालिपीठ गार तव्यावर थापून मगच गॅस चालू करायचा. त्यानंतर प्रत्येक थालिपीठ लावण्याआधी तवा गार पाण्याखाली धरायचा आणि पुसून घ्यायचा आणि थालिपीठ थापायचे.
तवा गार पाण्याखाली धरायचा आणि
तवा गार पाण्याखाली धरायचा आणि पुसून घ्यायचा आणि थालिपीठ थापायचे.>>> हाताला पाणी लावुन / लावत लावत गॅस कमी ठेवुन थापायचे काही होत नाही. हा थालिपीठ मात्र जरा जाड रहाते. जास्तच सवय असली तर पातळ पण थापता येईल पण मी कधी प्रयत्न नाही केला.
अगो, या रेसिपीसाठी तव्यावर न
अगो, या रेसिपीसाठी तव्यावर न थापता केळीच्या पानावर थाप. फार पातळ थापू नकोस. केश्विने लिहिलंय तसं धिरडं पण मी एकदा घालून पाहिलं पण मझा नही आया.
केळीच्या पानावर अगदी तळहातापेक्षा थोडं मोठं इतकंच थापायचं आणी लगेच तव्यावर उपडं करायचं. शिरांचं डीझाईन मस्त येतं. आमच्याकडे सकाळी भाजीवाली येते रोज तिच्याकडून मी एक चतकोर केळीचं पान मागून घेते खास या रोटीसाठी.
अगो +१
अगो +१
>> त्यानंतर प्रत्येक थालिपीठ
>> त्यानंतर प्रत्येक थालिपीठ लावण्याआधी तवा गार पाण्याखाली धरायचा आणि पुसून घ्यायचा
अगो, हा प्रकार पाहिला आहे. तव्यांची वाट लागते असं करून.
एखादंच करायचं असेल तरच डायरेक्ट तव्यावर थापावं.
तव्यांची वाट लागते असं
तव्यांची वाट लागते असं करून.<<< खरंय. त्यावर माझा ऊपाय म्हणजे, मी झिपलॉकच्या पिशवीला तेलाचा हात लावून त्यावर थालिपीठ थापते.
प्रॅडी, हो. किंवा इथे
प्रॅडी, हो. किंवा इथे डाळी/पोहे इत्यादींच्या जरा जाड प्लॅस्टिकच्या पिशव्या येतात. त्या धुवून वापरता येतात.
केळीचं पान अॅव्हेलेबल असेल तर नंदिनीचा मूळ उपाय आहेच!
पहिले थालिपीठ गार तव्यावर
पहिले थालिपीठ गार तव्यावर थापून मगच गॅस चालू करायचा. >> मी थालिपीठ लावताना लोखंडी तवा, नॉन्स्टिक तवा आणि कढई डायरेक्ट यांवरच थापून लावते. तीन थालिपीठं आम्हाला दोघांना पुरेशी होतात.
पण या रोटी बर्याच छोट्या बनत असल्याने अशा थापून नाही बनवता येत. केळीचे पान नसेल तर मलमलचा रूमाल वापरावा, प्लास्टिकच्या पिशवीवर थापून गरम तव्यावर उलटायला गेलं तर पिशवी विरघळते (स्वानुभव!!)
नंदिनी, पिशवी तव्यावर नाही
नंदिनी, पिशवी तव्यावर नाही टाकायची! तेलाचा हात लावून त्यावर थापलं तर व्यवस्थित सोडवून तव्यावर टाकता येतं.
दोन तवे वापरायचे जास्त रोट्या
दोन तवे वापरायचे जास्त रोट्या करायच्या असतील तर. एका तव्यावरची होईपर्यंत दुसरा थापण्याजोगा गार होईल. म्हणजे एकावर रोटी होत असेल तेव्हा दुसरा तवा गॅसवर नाही ठेवायचा. त्याला विश्रांती द्यायची. घरच्यांचा थालिपिठं खाण्याचा स्पीड आणि माझा करण्याचा स्पीड मॅच होत नाही म्हणून मी असं करत असते.
स्वाती, ही रोटी तितकी घट्ट
स्वाती, ही रोटी तितकी घट्ट होत नाही. उचलतानाच मोडते. कर के देखो.
फोटो...??????... कोनि केलि
फोटो...??????... कोनि केलि तर फोटो टाकाना...
दुसरा थापण्याजोगा गार होईल>>>
दुसरा थापण्याजोगा गार होईल>>> तव्यावरच थापण्याचा एवढा अट्टहास कशासाठी? तेवढा गॅसही वाया जात नाही का?
केळीचं पान नसेल तर वर लिहिलंय त्याप्रमाणे जाड प्लॅस्टीकच्या पिशव्यांवर थापता येते. किंवा नंदिनी म्हणालीय तसा रूमाल. रूमाल पाण्याने चिंब भिजवून पोळपाटावर पसरायचा. पूर्ण पोळपाट झाकला गेला पाहिजे, आणि थालिपीठ/ रोटी पाण्याच्या हाताने थापायची. तव्यावर टाकण्यासाठी रूमालाची कड उचलून रूमालासकट थालिपीठ हातावर घ्यायचं आणि तव्यावर टाकायचं, रूमाल सोडवून घ्यायचा.
मी असं खाली थालिपिठ थापून
मी असं खाली थालिपिठ थापून हातात घेऊन तव्यावर टाकायला गेले तर वाटेत पडतं
थालिपीठ नाही हातात घ्यायचं,
थालिपीठ नाही हातात घ्यायचं, रूमाल किंवा पिशवी हातात घ्यायची, आणि तव्यावर टाकल्यावर सोडवून घ्यायची.
ते पण केलं होतं. सोडवून
ते पण केलं होतं. सोडवून घेताना परत त्याला चिकटून आलं आणि तिरळलं किंवा घडी पडली. परत ट्राय करेन.
हे मी वर लिहिलंय त्याची
हे मी वर लिहिलंय त्याची कन्सिस्टन्सी थालीपीठाच्या पीठाइतकी घट्ट नसणारे. शिवाय फक्त रवा असल्याने ते पीठ चिकट देखील नसतं त्यामुळे डायरेक्ट तव्यावर घालायचे असेल तर उत्तप्याच्या पिटाइतकं पातळ करून घालावं लागेल. पण मग तो रवाडोसा होईल.
रोटी करायची असेल तर थापून मग करावी लागेल. केळीच्या पानावर्/रूमालावर/(ज्यांना जमत असेल त्यांना प्लास्टिकच्या कागदावर) थापून मग तव्यावर उलटलं तर एकदम पातळ थापता येईल, जेणेकरून ते एकदम कुरकुरीत आणि खमंग लागेल. आणि म्हणजे उप्प्पीट भाजून खाल्ल्याचं फील येणार नाही.
मी तवा उपडा करून पाण्याखाली
मी तवा उपडा करून पाण्याखाली धरते. तवा गार होतो आणि अजून non-stick coating तरी गेलेल नाही.
खुपच छान मला वाटत अगदी
खुपच छान मला वाटत अगदी लहान [पुरीच्या आकाराचे]केल्यास एका वेळेला तव्यावर ३-४ करता येतील.व तव्यावर टाकतांना तुटणार नाही. मध्यभागी एखादी लहानशी गाजर किंवा कांद्याची चकती ठेवावी.
अरे, इथल्या नवीन प्रतिक्रिया
अरे, इथल्या नवीन प्रतिक्रिया पाहिल्याच नाहीत.
रुमालावर/ केळीच्या पानावर थापून तव्यावर घालणे ही स्टेप मला कठीण वाटते. शिवाय आई आणि सासूबाई दोघीही तव्यावरच थापत असल्याने कधी बघितलेही नाही. एकदा प्रयत्न करुन बघेन जमतंय का.
मी पीठही बरेचदा जास्तच मऊसर भिजवते थालिपीठ कोरडे होऊ नये म्हणून आणि शक्य तितके पातळ थापते म्हणून मग तवाच सोयीचा वाटतो. गेल्या आठ वर्षांत दर वेळी नवीन घरात नवीन तवा घेतला गेल्याने केवळ ह्या पद्धतीने लवकर खराब होईल का ह्याचा अनुभव नाही पण राजसी ह्यांनी सांगितलेली आयडिया आवडली
Pages