चिकन बिर्याणी

Submitted by सामी on 4 March, 2013 - 05:44
chicken biryani
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

एक किलो चिकन, 7/8 कांदे , ४/५टॉमेटो, आले, लसूण 15-20 पाकळ्या, 5-६ लवंग, 7-8 मिरी, ३ बडी वेलची, 4 लहान वेलची, दालचिनी १ इंच, 2 लहान चमचा धणे, खसखस 1/2 चमचा, तमालपत्र, लाल मिरची पूड , कोथींबीर, पुदीना, तेल, तूप, ४ वाटी बासमती तांदूळ.

क्रमवार पाककृती: 

ही रेसिपी मी वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये ब्रेक करून टाकत आहे. माझ्या बहुतेक मैत्रीणीना मी कृती अशीच सांगितली आणि त्यांना अश्या प्रकारे सोप्पी वाटली.

माझ्या बरयाच मैत्रीणी/मित्र चिकन बिर्याणी ही हॉटेल मध्येच जाऊन खायची किंवा घरी मागवायची या मतावर ठाम होते. इव्हन नवर्याला ही घरी हॉटेल सारखीच किंवा अजून चांगली बिर्याणी बनू शकते यावर विश्वास न्हवता. पण घरी केलेली चिकन बिर्याणी खाल्ल्यापासून महिन्यातून एकदा तरी बिर्याणी होतेच.

१. चिकन ला दोन चमचे चमचे मिरची पूड , हळद , मीठ , अर्धी लहान वाटी दही लावून ठेवावे
01_1.jpg

२. नॉर्मल साईझ चे 7/8 कांदे उभे कापून घेउन तेलात गोल्डन ब्राउन रंगावर फ्राय करून वेगळे ठेवणे. कढईत तेल न टाकता कापलेले कांदे मंद आचेवर ठेवावेत .थोड्यावेळाने तेल घालावे. हे सारखे बघावे लागत नाही. थोड्यावेळाने मध्ये मध्ये परतावे.
कांदा व्यवस्थित फ्राय व्हायला १ तास लागतो. पण मंद आचेवरच फ्राय करून घ्यावा. ज्या दिवशी बिर्याणी बनवायची त्यादिवशी उठल्या उठल्या कांदा फ्राय करायला गॅस वर ठेवून द्यावा .
फूड प्रोसेसर मध्ये कापलेला कांदा.
onion.jpgफ्राय केल्यावर
onion1.jpg

३. ४/५ टोमॅटो कुकर मध्ये शिजवून घ्यावेत . २ शिट्या काढाव्यात. थंड झाल्यावर सालं आणि बिया काढून मिक्सर मधून प्युरी करून घ्यावी. ती वेगळी ठेवावी.
टोमॅटो प्युरी/वाटलेला मसाला
tometo.jpg

४. खाली दिलेला गरम मसाला तेलात थोडा परतून त्याची मिक्सर वर बारीक पूड करावी.
2 1/2 इंच आले , लसूण 15-20 पाकळ्या , 5-६ लवंग , 7-8 मिरी , 2 बडी वेलची, 4 लहान वेलची, दालचिनी १ इंच , 2 लहान चमचा धणे , खसखस 1/2 चमचा

वरील प्रमाणात मी नॉर्मल साईझ च्या चार वाट्या बासमती तांदूळ घेते. अर्धा तास आधी बासमती तांदूळ धुऊन पाण्यात बुडवून ठेवावे. टोमेटो प्युरी , गरम मसाला , कांदे फ्राय करून झाले कि भात कारायला घ्यावा.

५. एका मोठ्या पातेल्यात थोडे तेल तापवून त्यात तमाल पत्र टाकावे . तांदूळ पाण्यातून गाळून घेऊन तेलावर परतावेत . तांदळाच्या चौपट पाणी दुसर्या टोपात उकळायला ठेवावे . पाणी उकळल्यावर तांदळात टाकावे . आच मोठी ठेवावी. मीठ टाकावे. थोड्या वेळाने तांदूळ अर्धा कच्चा शिजला असे वाटले कि गॅस बंद करून मोठ्या चाळणीतून भात गाळून घ्यावा. भात ताटात मोकळा करून ठेवावा .भात लगेच गाळून घ्यावा नाहीतर चिकट होतो
rice.jpg
आता फायनल स्टेप.

६. ज्या टोपात बिर्याणी करायची त्या टोपात प्रथम तूप आणि तेल टाकावे. शक्यतो जाड बुडाचा टोप घ्यावा. नुसत्या तुपातली बिर्याणी अप्रतीम होते .

तेलात 2 मोठी वेलची कुटून , तमाल पत्र, दालचिनी , वाटलेला मसाला, लाल मिरची पूड २ चमचे , मीठ टाकून परतावे . मग त्यात चिकन टाकून परतावे. मग टॉमेटो प्युरी टाकून नीट परतून घ्यावी. चिकन ला सगळा मसाला लागेल अश्या पद्धतीने परतावे. मग फ्राय केलेला कांदा . पुन्हा परतून त्यात एक वाटी कापलेली कोथिम्बीर , एक वाटी पुदिना , आवडी प्रमाणे काजू टाकावेत . आणि नीट मिक्स करून टोप खाली उतरावा. हे सगळे मोठ्या आचेवर करावे.

टोप खाली उतरल्यावर चिकन एकसारखे करून त्यावर अर्धाकच्चा शिजवलेल्या भाताचा थर लावावा . भातावर हवे असल्यास केशराचे पाणी शिंपडावे. थर लावल्यावर अर्धा वाटी पाणी भातावर शिंपडून , कडेने तूप सोडावे .
layers.jpg

टोपावर अ‍ॅल्युमिनिअम फॉईल लावावी . किंवा गव्हाच्या पिठाची पेस्ट लावावी. दोन चमचे पिठात थोडे पाणी घालून पातळ पेस्ट करावी . टोपावर निट बसणारे झाकण लावून टोपाची कडा आणि झाकणाच्या मध्ये जी गॅप असेल तिथे ही पेस्ट भरावी.
गव्हाची पेस्ट
paste0.jpgटोपाला पेस्ट लवल्यावर
paste.jpg

45 मिनिटे मंद गॅस वर अ‍ॅल्युमिनिअम फॉईल लावून टोप ठेवून द्यावा .

बिर्याणी अजून मुरण्यासाठी तवा तापवून त्यावर २० मिनिटे मंद गॅस वर भांडे ठेवावे .

अ‍ॅल्युमिनिअम फॉईल काढून मस्त बिर्याणीचा आस्वाद घ्यावा. Happy

बिर्याणी करणे मला मनापासून आवडते कारण सगळे खूप आवडीने खातात . कुणी जर पहिल्यांदाच बिर्याणी करणार असेल आणि काही अडल्यास मला फोन वरून मार्गदर्शन करायला आवडेल.

याचे कारण . माझी ताई अप्रतीम बिर्याणी करते. तिने मला पहिल्यांदा जेव्हा मला घरी (सासरी ) बिर्याणी करण्यास सांगितले तेव्हा मी हसण्यावर नेले कारण तोपर्यंत मी फक्त खाण्यातच एक्स्पर्ट होते . पण आता मी बर्यापैकी बिर्याणी करण्यामध्ये एक्स्पर्ट झाले आहे, आणि जर मी एक्स्पर्ट झाली आहे तर इतर कुणीही होऊ शकेल .
biryaanee.jpg

वाढणी/प्रमाण: 
६ /७ जणांना व्यवस्थित पुरते.
अधिक टिपा: 

१. कांदा कढईत तळून घेतल्यास बिर्याणी अजून चविष्ट होते पण खूप तूपकट होते. आवडत असल्यास कांदा तळून घेऊ शकता.
२. बिर्याणी आणि भाताचा थर लावताना सगळ्यत खाली बटटायाच्या कापांचा थर लावल्यास खाली करपत नाही आणि यातले बटाटे छान लागतात. पण खूपसा मसाला बटाटयामधे अ‍ॅब्सोर्ब होतो.
३. जाड बुडाचे भांडे नसल्यास १५ मिनिटांनी टोप तव्यावर ठेऊन बिर्याणी शिजवावी.
४. बिर्याणी वाढताना वरतून तळलेला कांदा , तळलेले काजू टाकावे.
५. अश्याच पद्ध्तीने मटण बिर्याणी करावी पण मटण आधी शिजवून घ्यावे.
६. कांदे फ्राय करून फ्रिज मधे ठेवू नका. चव बदलते. फूड प्रोसेसर मधे उभे कापून फ्रिज मधे ठेवल्यास चालेल.

माहितीचा स्रोत: 
माझी ताई (कल्पना)
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढेच............हा तर मला ब्रेकफास्ट ला पण नाही पुरणार......जरा जास्त बनव Happy
.
.
मस्त आहे

एवढेच............हा तर मला ब्रेकफास्ट ला पण नाही पुरणार......जरा जास्त बनव > Happy खाऊन झाल्यावर ऊरलेल्या बिर्याणी चा फोटो आहे हा.

म्हणजे तुम्ही आधी चांगल झाले की नाही ते बघतात........मगच रेसीपी माबो वर टाकतात का ? > हो तर माबो करांना चांगलीच रेसीपी द्यायला पाहीजे ना?

एकदम मस्त. सातत्याने चांगली बिर्याणी बनवता येणे हे माझ्यासाठी तरी खूप अप्रूप आहे कारण मी केलेली बिर्याणी रशियन रूलेच्या नियमानुसार कधी चांगली, कधी बरी, कधी टाकाऊ होते.
ही नक्कीच करून पाहू.

सामी ला अनुमोदन चिकन फक्त ३-४ शिटित आरामात शिजते. ४५ मिनीट मंद आचही जास्त होते. बिर्यानीत चिकनचा फेंद झाला तर खायला मज्ज नाही येणार. थोडे कडकच छान लागते. म्हणुनच मला कधीच पॅकड नॉनवेज फुड नाही आवडत कारण ते फार रबरासारख लागत. एक घाव दोन तुकड्यातच खरी मज्जा आहे.
आणि अविगा चिकन मेरीनेट केलेले असल्याने आधीच ते थोडे गळते.
(ईथे गळणे म्हणजे मउसर होते किंवा लवकर शिजते हा अर्थ घ्यावा.)

मस्त. मी ऑलमोस्ट अशीच करते. फक्त भात पाणी गाळून घेत नाही. इलेक्ट्रिक राईस कुकरात भार अर्धवट शिजवते मग अर्धा भात काढून खालच्या भातावर तळलेल्या कांद्याचा थर मग तुम्ही लिहिलेल्या मसाल्यातच परत्लेल्या चिकनचा थर परत कांद्याचा थर व मग वर काढून ठेवलेला भात घालते. नंतर वॉर्म मोडवर कुकर ठेऊन देते तासभर.

खूप कष्टाची(खूप जिन्नस गोळा, खूप स्टेप्स असलेली कुठलीही पाकृ) पाकृ दुसर्‍याच्या हातचीच खाण्यात मजा असते.

कांदा आधीच कापून वाळवून ठेवलेला असेल, तर लवकर अन क्रिस्प तळला जातो असा अणुभव आहे > हो इब्लिस बरोबर.

किती व्यवस्थित साग्रसंगीत लिहिली आहे रेसिपी!
मलाही एकदा धीर करावासा वाटतो आहे. > थँक्स स्वाती. करुन बघाच. हेच प्रमाण घेउन करा. बिघडणार नाही याची खात्री देते. हवे असल्यास मापाच्या भांड्यांचे फोटो टाकते.

साती भातातले पाणी काढून टाकले की भात मोकळा शिजतो.

खूप कष्टाची(खूप जिन्नस गोळा, खूप स्टेप्स असलेली कुठलीही पाकृ) पाकृ दुसर्‍याच्या हातचीच खाण्यात मजा असते.> झंपी मला पण आधी असेच वाटायचे. पण एकदा घरी केल्यावर मस्त कॉन्फिडन्स येतो. मग बघा किती झट्पट होते बिर्याणी. हवे असल्यास मसाले आदल्या दिवशी एकत्र करून ठेवा. कान्दे कापून ठेवा. फक्त फ्राय आयत्या वेळीच करा.

धन्यवाद लाजो.

जबरी यार..... मी सुद्धा धीर करेनच म्हणते Wink कारण बिर्यानी मनापासून आवडते पण फक्त खायला.... !! पण आता करुन बघेन !!

छान रेसिपी. धन्यवाद.
कांही हॉटेलात मसाल्यामधे जायपत्ती व धणे-जिरे पूडही वापरतात व त्याचा स्वादही छान येतो. भात करताना त्यांत एखादी वेलची व दोनतीन लंवगाही टाकतात व त्यामुळे भातालाही मंदसा स्वाद येतो.मटण खूप शिजवावं लागत असल्याने मसाल्यामधे त्याचा रस उतरतो पण चिकन फार शिजवावं लागत नाही त्यामुळे वरची पद्धत अधिक योग्य वाटते.
<< पाकृ दुसर्‍याच्या हातचीच खाण्यात मजा असते.>> झंप्पीजी, निवृत्तिनंतर वेळेची अडचण गेली व माझादेखील हा गैरसमज दूर झाला. खूपच गंमत असते स्वतः करून दुसर्‍याला खाऊं घालण्यात[ अर्थात जमलं नाही तर धोकाही असतोच !] ; शिवाय, मनासारखे प्रयोग करायलाही वाव असतो व सर्व घटक व टायमिंग याचं व्यवस्थापन करण्यातही समाधान असतंच. व सर्वात महत्वाचं, निदान मला वाटलेलं, आपण आवडीने चाखलेल्या पदार्थांमागची मेहनत व कसब लक्षांत येऊन जाणवणारी कृतज्ञता !! [ असो, कोंबडीपेक्षां हा मसालाच जास्त झाला ! :डोमा:]

हायला, बिर्याणी वीक पॉईंट
पाककलेचा आनंदच आहे, पण रेसेपी छान सविस्तर दिलेली आहे. करुन बघण्याचा मोह होतोय.

.

.

Pages