मनमोकळं: प्रवेशिका क्र. ३ : अरुंधती कुलकर्णी

Submitted by संयोजक on 21 February, 2013 - 06:33

विषय क्रमांक २ : लहान मुलांचे मराठी चित्रपट

Mabhadi LogoPNG.png
आजवर पाहिलेले मराठी चित्रपट आठवले की प्रकर्षाने आठवतं ते त्यांमध्ये उभं केलेलं खास मराठमोळं वातावरण! कधी शहरी धाटणीचं तर कधी अस्सल ग्रामीण ढंगाचं! माझ्यापुरतं म्हणाल तर अस्सल ग्रामीण ढंगाचं वातावरण प्रत्यक्ष आयुष्यात मी बर्‍याच उशीरा अनुभवलं. त्याबद्दल फारशी उत्सुकता अशी नव्हतीच! आणि शहरातलं जे मराठी वातावरण माझ्या आजूबाजूला होतं तेच मराठी चित्रपटात पाहताना थोडा कंटाळाच यायचा... तेच ते काय पाहायचं, असा विचार मनात डोकावून जायचाच! किंवा काही वेळा हिंदी चित्रपटांची मराठी आवृत्ती बघतोय की काय असं वाटणारं श्रीमंती, कृत्रिम, भडक व अवास्तव वाटणारं वातावरण... जर मुळात त्या वातावरणाशीच मेळ साधू शकलो नाही तर पुढचे कथानकही कितीही वास्तवकारक असले तरी पचनी पडायला वेळ लागू शकतो.

सध्याच्या मराठी चित्रपटांमध्ये, खास करून लहान मुलांसाठी काढलेल्या चित्रपटांमध्ये काहीशी हीच पुनरावृत्ती होताना दिसून येते. मराठी कुटुंबांमधील अनेक मुलं चित्रपटांतील अस्सल मराठी किंवा शहरी मराठी वातावरणाशी रिलेट करू शकत असतीलही... पण त्यातून त्यांना रोमांचकारी, अद्भुत, चित्तवेधक, साहसपूर्ण, धाडसी, रहस्यपूर्ण, वेगळ्या दुनियेची सफर घडवून आणणारे, नेत्रदीपक असे काही कितपत बघायला मिळते? किंवा त्यांच्या विनोदबुद्धीला जागृत करून त्यांना खदखदा हसायला लावणारे, कोठेही उपदेशपर न वाटता किंवा कंटाळवाणे न होता त्यांना मनोरंजनातून मानवी मूल्यांचा पाठ देणारे असे कितीसे मराठी चित्रपट निघतात? आणि त्याचवेळी हॉलिवूडच्या पोतडीतून आलेल्या हॅरी पॉटरसमान जादुमयी-तरुणाई-गूढ-रहस्य-नीतिमूल्ये-रोमांचक प्रसंगांनी भरलेल्या चित्रपटांना लहान मुलांची तोबा गर्दी लोटते. देशी अवतारात व परदेशी तंत्रज्ञान - तंत्रज्ञांच्या करामतीने अ‍ॅनिमेशन रूपात अवतरलेले हिंदी - इंग्रजी भाषेतील जय गणेश, कृष्णा, बाल हनुमान, छोटा भीमही बाजी मारून जातात. ती भाषा मुलांना आपलीशी वाटते, त्यातील प्रसंग त्यांना खुर्चीत आनंदाच्या उसळ्या मारायला लावतात, त्यातील गाणी त्यांना ठेका धरून गावीशी - नाचावीशी वाटतात.

काय असावं यामागचं कारण? या चित्रपटांचं ग्लोबल किंवा नॅशनल अपील हे असेल का त्यामागे? या चित्रपटांची सर्व माध्यमांद्वारे केली जाणारी मोठ्या प्रमाणावरील प्रसिद्धी, त्यांवर आधारित खेळ, ट्यून्स, रिंगटोन्स, कपडे - वेशभूषा हेही एक कारण असेल? शिवाय हे चित्रपट ज्या व्यक्तिरेखांवर आधारलेले आहेत त्यांत सुष्टांचा विजय, दुष्टांचा नाश ही मध्यवर्ती कल्पना तर आहेच - शिवाय पौराणिक गोष्टीचा आधार आहे त्यांना! अक्कलहुशारी, प्रसंगावधान, व्यवहारचातुर्य, धाडसी वृत्ती आणि हजरजबाबीपणा यांचे बेमालूम मिश्रण आहे त्यांत! या सर्वांमागे लहान मुलांची कार्टून्सच्या जगाशी असणारी प्रचंड जवळीक ही देखील विचारांत घेतली पाहिजे. त्यांचा मुलांवर पडणारा प्रभाव, त्या जगाविषयी मुलांना वाटणारी आत्मीयता आणि कार्टून्सच्या जगात काहीही घडू शकते ही त्यांची धारणा हेदेखील मग महत्त्वाचे ठरते. आणि ह्या भव्य-दिव्य चकाकत्या, चमचमत्या चित्रपटांसमोर त्यांना खास मराठमोळ्या वातावरणात घडलेल्या, मराठी मातीतल्या चित्रपटांचे आकर्षण वाटणार तरी कसे?

अगदी साधे नेहमीच्या पठडीतले उदाहरण द्यायचे झाले तर मॅकडोनाल्डचा बर्गर, पिझ्झा हटचा पिझ्झा आणि उपाहारगृहात मिळणारे कांदेपोहे किंवा मिसळ यांमध्ये निवड करायची झाली तर शहरात राहणारी आजकालची बहुतांशी मुले बर्गर किंवा पिझ्झ्याची निवड करतील हे जसे निर्विवाद वास्तव आहे तसेच एका ठराविक प्रदेशापुरते किंवा भाषेपुरते अपील असणार्‍या चित्रपटापेक्षा ही मुलं जास्त ग्लॅमरस, व्यापक अपील असणार्‍या चित्रपटाची निवड करणार हेही तितकेच वास्तव आहे. त्यांचा समवयस्क गट - त्यांच्या वर्तुळातली मुलंमुली कोणते चित्रपट पाहत आहेत - कोणत्या चित्रपटांची चर्चा करत आहेत हेही एक महत्त्वाचे कारण आहे त्यामागे. जर बहुसांस्कृतिक शाळा-वस्ती-इमारतींमधील मुलांना सामायिक मनोरंजन व रुचीचे चित्रपट पाहायचे असतील तर ते स्थानिक भाषेतील चित्रपट पाहतील की राष्ट्रीय किंवा ग्लोबल अपील असलेले व आपल्या दोस्तांना कळणारे - समजणारे - त्यांच्याशी ज्यांबद्दल गप्पा मारता येतील असे चित्रपट पाहतील?

आणि जर तुमच्या मुलांना बर्गर-पिझ्झा खायचा असेल व तुम्ही त्यांना बळजबरीने कोणत्यातरी उपाहारगृहातले कांदेपोहे खाऊ घातलेत तर त्यांची जशी प्रतिक्रिया होईल तशीच किंवा त्या जवळपासची प्रतिक्रिया तुम्ही त्यांना तुमच्या मते ''त्यांनी पाहायलाच पाहिजेत,'' अशा मराठी चित्रपटांना बळजबरीने दाखवल्यास झाली नाही तरच नवल! तुम्हाला ते चित्रपट भले खूपच प्रेक्षणीय वाटत असतील, तुमच्या मुलांनी नक्की पाहावेत असे वाटत असतील... पण तसे ते तुमच्या मुलांना वाटतात का, हा कळीचा मुद्दा आहे. मुलं जर तो चित्रपट पाहताना कंटाळणार असतील, किंवा त्यांना ''आपण यापेक्षा घरी कॉम्प्युटर गेम खेळत असतो तर किती बरे झाले असते!'' असे वाटणार असेल तर त्याचा अर्थ ते चित्रपट आजच्या मुलांचा, त्यांच्या मनोरंजनाचा विचार करून काढले गेलेले नाहीत असेच म्हणावे लागेल. मुलं त्या चित्रपटाशी रिलेट करू शकतात का? किंवा तो चित्रपट त्यांना रम्य, अनोख्या, अद्भुत दुनियेची सफर घडवून आणतो का? किंवा तो चित्रपट त्यांना खुर्चीच्या टोकावर खिळवून ठेवतो का? तो चित्रपट पाहिला हे मित्रमंडळींमध्ये सांगताना त्यांची छाती अभिमानाने फुलते का? आणि जर तुम्ही स्वतः ''पैसा वसूल'' भूमिकेतून एखादा चित्रपट बघत असाल किंवा तुमच्या आजूबाजूला तसे वातावरण असेल, तर मुलांनी मात्र मूल्ये - संस्कृती - भाषा वगैरे ध्यानात ठेवून तो चित्रपट पाहावा अशी अपेक्षा करणे कितपत बरोबर आहे?

मी पाहिलेले काही चित्रपट मात्र भाषेची सीमारेषा ओलांडून संवाद साधणारे आणि निर्भेळ मनोरंजन करणारे होते हेही मान्य करावेच लागेल. त्यातला एक उल्लेखनीय चित्रपट म्हणजे नाना पाटेकरचा पक पक पकाक, दुसरा म्हणजे शबाना आझमीने ज्यात चेटकिणीची भूमिका केली आहे तो हिंदी भाषिक मकडी आणि पंकज कपूरचा अफलातून अभिनय असणारा द ब्लू अंब्रेला. अनुपम खेरचा तहान हा चित्रपटही असाच काहीसा वाटलेला... पण तरी तो मोठ्यांसाठी काढलेला एका लहान मुलावरील चित्रपट असेच त्याचे वर्णन करू शकेन. हे चित्रपट सर्वच मुलामुलींना आवडतील असेही नाही.

मला वाटतं, सध्याच्या मराठी मुलांना कळतील, समजतील आणि त्यांना ज्यांत रुची वाटेल असे चित्रपट मराठी भाषेत निघू शकतात. परंतु त्यांत मराठी वातावरणाचा, मराठी भाषेचा, मराठी मूल्यांचा दबदबा नको - कारण असे वातावरण मुळात आमच्याच घरांमधून कधीच हद्दपार झालेले आहे. आता जमाना ग्लोबलचा आहे. चित्रपट ग्लोबल अपीलचा आहे का, परदेशातील वेगवेगळ्या नयनमनोहर स्थळांमध्ये चित्रित झाला आहे का, बहुभाषांमध्ये डब झाला आहे का, त्याची गाणी एफएम रेडियो, आयट्यून्सवर आली आहेत का, ''हॅपनिंग'' क्राऊड मध्ये त्याची चर्चा आहे का, यांवर आमच्याकडे चित्रपटगृहात शे-दीडशे रुपये मोजून तो चित्रपट पाहायला जायचे अथवा नाही हे ठरत असेल तर मग मुलांकडून तरी वेगळी अपेक्षा कशी करणार?

- अरुंधती कुलकर्णी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

आवडलं.
लहान मूलांनाच हा चित्रपट का आवडला ? किंवा चित्रपटात काय बघायला आवडेल ? असे विचारत, एक सर्व्हे करायला पाहिजे.

अगदी अचूक प्रश्ण व महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.. चित्रपटाचं माहित नाही पण व्यावसायिक नफा, नुकसान गणितात मुलांचा गट हा शक्यतो टून्स, व्हिडीयो गेम्स, मोबाईल अ‍ॅप्स, यासाठी टारगेट गट असतो. खास मुलांसाठी असे अद्भूत चित्रपट फक्त हॉलीवूड मध्येच बनत आले आहेत- पुनः एकदा ईंग्रजी भाषेचे वैश्विक अपिल, मान्यता हा त्यामागचा कळीचा मुद्दा आहे असे वाटते.

चित्रपटाचे राहू दे- आजकाल केबल वरील किती 'मालिका' मुलांसाठी असतात? १%?
national geo, science हे बर्‍याच प्रमाणात शैक्षणिक कार्यक्रम आहेत.. 'गोट्या', 'मालगुडी डेज', 'फास्टर फेणे' हे त्या काळच्या समाजमन व संस्कृतिक जडण घडणीशी सुसंगत होते.. आता मात्र प्रत्त्येक कुटूंब (निदान शहरातील तरी) 'ग्लोबल' झाले आहे.. तेव्हा संदर्भ बदलले तसे काळानुसार प्रकटीकरणही बदलायला हवे हे ध्यानात घेवून त्या अनुशंगाने 'निर्मिती' आपल्याकडे तरी होताना दिसत नाही.. आणि शेवटी 'डोकेफोड' मार्केटींग चा मुद्दा आहेच!
असो.
"विचार प्रवर्तक" लेख आहे..

उत्तम आढावा घेतला आहे.
बालचित्रपट म्हणजे बालिशचित्रपट नव्हे हे जेंव्हा कळेल तो सुदिन. मुलांच्या सिनेमात प्रत्येक फ्रेममधे लहान मुलेच हवीत, त्यांनी निरागसच वागावे, इतर सर्वांनी भयानक ओव्हरॅक्टींग करावी असे आपल्याकडे संकेत आहेत.
इतर भारतीय भाषांचे माहिती नाही पण बंगालीतल्या गोपी-बाघा मालिकेसारखे चित्रपट आपल्याकडे नक्कीच तयार होउ शकतात. लहान मुलांचा सिनेमा मोठ्यांनाही तितकाच आवडला तरच तो व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरेल. पुन्हा त्यात मूल्य, संस्कार, संस्कृती इ.इ.चे डोस नकोत, कारण पोरांना 'मॉरल ऑफ द स्टोरी' या प्रकाराचा भयंकर वीट आलेला असतो. सर्वप्रथम उत्तम मनोरंजन बाकी सगळे नंतर.

अरुंधती कुलकर्णी, संयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लेख लिहिल्याबद्दल आपल्याला आमच्यातर्फे एक छोटीशी भेट Happy

MMK-Aku.jpg

अकु, फार छान लेख लिहिला आहेस गं. उत्तम आढावा घेतला आहेस.
असेच विचार मनात येतात, पण इतक्या सुस्पष्ट मांडता येणार नाहीत मला Happy

धन्यवाद संयोजक!! Happy पैठणी आवडली हो!

आगावा, खरं तर या विषयावरचा लेख / आढावा तू अधिक छान घेऊ शकशील. जमलं तर बघ ना लिहायला.

दिनेशदा, योग, रुणुझुणू, मंजू... धन्यवाद! Happy

छान मुद्देसूद लेख. आवडलाच.
योग, आगाऊ यांनाही अनुमोदन.
कोणताही अभिनिवेष न आणता, रोचक रंजक पद्धतीने चित्रपट सादर केला तर आवडेलच मुलांना+मोठ्यांना.

अकु, मला या लेखाचं अनुमान काढता येत नाहीये.
विश्लेषण चांगलं आहे, पण त्यावर उपाय सुचवण्याचा प्रयत्न थिटा, लटका वाटला.
उपाय नाहीये हे मान्य करायला अवघड जातंय का - तुलाच असं नव्हे, आपल्याला सगळ्यांनाच - असं वाटतंय एकूण.
तू दिलेलंच उदाहरण वापरायचं तर मुलं पिझ्झा बर्गरच खाणार हे अ‍ॅक्सेप्ट करायचं नाही म्हणून पोह्यांत टोमॅटो केचप घाला म्हणण्यासारखं होतंय का हे?

काही अपवाद वगळता लहान मुलांचे चित्रपट भाषिक, प्रांतिक नसतात असे मला वाटते. ते त्यातील कथानक, स्पेशल एफ़्फ़ेक्ट इ. मुळे आवडतात. गोट्या, चिंटू सारखे पात्र घेऊन मराठी भाषेतील चित्रपट काढता येतिल पण त्यांचे कालबाह्यत्व रोखता येईल असे वाटत नाही.

पोस्ट मॉर्टेम आवडले.

बाई, मला वाटतय कि ठोस उपाय असा सुचवलाच नाहिये. शेवटचा पॅरा फक्त संदर्भानुसार आलाय. " सध्याच्या मराठी मुलांना कळतील, समजतील आणि त्यांना ज्यांत रुची वाटेल असे चित्रपट मराठी भाषेत निघू शकतात. परंतु त्यांत मराठी वातावरणाचा, मराठी भाषेचा, मराठी मूल्यांचा दबदबा नको" ह्यात म्राठी भाषा वगळता काहि उरत नाहिये पण ते परिस्थितीशी सुसंगत होईल एव्हढेच म्हटलय. लेखिका स्पष्टीकरण देईल म्हणा.

स्वाती, वर आगावाने मला जे शब्दांमध्ये पकडता आलं नव्हतं ते मस्त पकडलंय. Proud लहानांबरोबरच मोठ्यांचेही मनोरंजन करणारे चित्रपट असतील तर ते जास्त चालतील. उत्कंठा वाढविणारे, बोधामृताचा फार आग्रह न धरता निर्भेळ मनोरंजन करणारे आणि भाषा-वातावरण-कथा-तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आजच्या काळाला सुसंगत असे चित्रपट असतील तर ते नक्कीच चालतील असे मला वाटते. मी वर लेखात लिहिलेल्या चित्रपटांमध्ये मला या गोष्टी आढळल्या. त्यातल्या पक पक पकाक मध्ये ग्रामीण मराठी वातावरण होते - मकडीमध्ये उत्तर प्रदेशातले टिपिकल वातावरण होते - द ब्लू अम्ब्रेला मध्ये हिमाचल प्रदेशातले वातावरण होते - थोडक्यात प्रादेशिक वातावरण. पण तरी त्या पलीकडे जाऊन त्यांना एक युनिवर्सल अपील आहे असे मला वाटते. त्याचबरोबर ते चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी झाल्याचे वाचले आहे. त्यामुळे उपाय आहेत. जर पाच-दहा वर्षांपूर्वी काढलेले हे चित्रपट आजच्या मुलांना (व मोठ्यांनाही) खिळवून ठेवू शकतात तर ते आजही करता येणे शक्य आहे.

वंदना, जाई., _मून, मामी... धन्यवाद. Happy

छान लेख आहे. अ‍ॅबसोल्यूट सहमत.

फूल नै तर फुलाची पाकळी चालीवर पैठणी नै तर पैठणीचा फोटू हे आवडलं हं @ संयोजक भाऊजी. Wink

लेख आणि स्पष्टीकरण, आणि नंतरचं अ‍ॅनलिसीस ही आवडलं ..

मकडी आणि ब्लू अम्ब्रेला अजून बघितला नाही पण पक पक पकाक् छान होता ..

छान लेख.
मराठीतले लहान मुलाची मुख्य भुमिका असलेले आणि खुप आवडलेले चित्रपट म्हटले की पहिले नाव आठवते 'हा माझा मार्ग एकला'. तो मोठे व छोटे दोघांसाठी बनलेला होता म्हणा. व दुसरा 'देवबाप्पा'. कदाचीत बजेटची कमी व जास्त फायदा करुन देणारे नाहीत म्हणुनही मराठीत बालचित्रपट कमी बनत असतील.

सुनिधी, देवबाप्पाचं नाव वाचल्यावर ''चंदाराणी, चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावाणी'' गाणंच आठवलं पटकन! तेव्हा ते गाणं शाळांच्या गॅदरिंगमध्ये खूप पॉप्युलर होतं... एका बहिणीच्या शाळेत गॅदरिंगला त्यावर नाच बसवल्याचं आठवतंय! नंतर बर्‍याच वर्षांनी कळलं की त्या पिक्चरमध्ये माझ्या आईची जुनी मैत्रीण (व माझ्या बालमित्राची आई) त्या नाचात बालकलाकाराच्या भूमिकेत होती आणि तिच्या तोंडी काहीतरी संवादही होता... ''होच्च मुळी, नाहीच्च मुळी'' असा काहीतरी... पुढे बर्‍याच वर्षांनी अलका थिएटरला हा पिक्चर लागला तेव्हा डोळे फाडफाडून आईची मैत्रीण ओळखू येतेय का हे बघत ते गाणं पाहिल्याचं आठवतंय... Lol

स्वाती... बरोबर, वास्तवदर्शी हाच शब्द हवा!

असामी, सशल, इब्लिस, धन्यवाद! Happy

अकु, चांगला आढावा घेतला आहेस लेखात. खरच जेव्हा लहान मुलांचे चित्रपट मोठ्यांना पण आवडतील, त्या दिवसाचीच वाट बघूयात.

विचार करायला लावणारा लेख.
गंमत म्हणजे तू मराठी चित्रपटाच्या अनुषंगाने लिहीले असले तरी, इथेही तीच दशा आहे. लहान मुलांसाठीचा असा तेलुगु चित्रपट डोकं लढवूनही आठवत नाहीच्चे.

मुले पिझा बर्गरच खाणार हे जरा जनरलायझेशन वाट्ते आहे. मुले कधी कधी आवडीने पोहे कर म्हणून सांगतात. एका वयानंतर पिझा व बर्गर आपण हून बॅन करतात उपलब्ध असले तरी कारण ते तब्येतीला हानिकारक आहे हे त्यांनाच समजते. लगेच नेट वरील रीसर्च पण समोर ठेवतात.

मकडी व ब्लू अंब्रेला छान होते बघितले पण त्यापुढे मुलांचे असे एक वेगळे विश्व आहे. जालावर उपलब्ध कितीतरी सिनेमे, शॉर्ट फिल्म्स अ‍ॅनिमेशन्स मुलांना आवड्तात. तसे काही प्रयोग झाले तर
नक्की बघतील मुले. बालक पालक बघायचा प्लॅन होता पण त्यात दाखविलेल्या मुलांशी रिलेट करता
येइना.
हॅपी फीट वगैरे सारखे काही पर्यावरण वादी दृष्टिकोण समोर ठेवणारे सिनेमे मुलांना आवड्तील, त्यांचे विश्वातले रेफरन्सेस जसे अभ्यासातील स्ट्रेस, जगण्यातील असुरक्षितता, एकटे पणा, गोड मैत्री, असे आले तर किती छान.

पैठणी फार आवडली. किती छान कल्पना.

अमा, माझ्या पाहण्यातल्या वय वर्षे आठ ते पंधरा वयोगटातल्या कितीतरी शहरी मुलामुलींना मॅकडी किंवा पिझ्झा हटच्या बर्गर-पिझ्झासाठी जीव टाकताना पाहिलंय म्हणून ते उदाहरण प्रामुख्यानं डोक्यात आलं. त्यात त्या पदार्थाच्या चवीपेक्षा किंवा न्युट्रिशन व्हॅल्यू पेक्षा आपले दोस्त लोक तिथे जातात, त्या रेस्टॉरंटच्या मोठमोठ्या रंगीबेरंगी जाहिराती - फलक आणि स्कीम्स असतात, खेळणी - टिव्हीवरील जाहिराती वगैरे... तिथे मुलांच्या भाषेत 'चिल आऊट' वातावरण आणि 'हॅपनिंग क्राऊड' असते याचा भाग जास्त असतो.

जालावर कितीतरी सुंदर चित्रपट बघायला मिळतात. पण चित्रपटगृहात चित्रपट पाहणे हा एक 'सोशल' अनुभव असतो. त्यामुळे तसे सुंदर चित्रपट हे चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळणे, ते अनेक भाषांमध्ये उपलब्ध असणे हेही महत्त्वाचे, नाही का?

चिन्नु, गजानन, उजू, धन्स.

अकु, चांगला आढावा घेतला आहेस पण मलाही अनुमान काय काढायचे ते नक्की कळले नाही.

>>>> लहानांबरोबरच मोठ्यांचेही मनोरंजन करणारे चित्रपट असतील तर ते जास्त चालतील. उत्कंठा वाढविणारे, बोधामृताचा फार आग्रह न धरता निर्भेळ मनोरंजन करणारे आणि भाषा-वातावरण-कथा-तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आजच्या काळाला सुसंगत असे चित्रपट असतील तर ते नक्कीच चालतील असे मला वाटते.<<<< हे अनुमान असावे असे प्रतिक्रिया वाचल्यावर वाटले.

रच्याकने, माझ्या मुलाने हल्लीच 'चिंटू' पाहिला आणि तू लिहिलं आहेस तसं त्याने तो खुर्चीतल्या खुर्चीत उड्या मारत, खिदळत पाहिला. मुलांचे आणि आपले विचार जुळतील असं नाही कारण हा चित्रपट बघायला मला अजिबात मजा आली नाही, खरं तर मी तो नीट बघितलाही नाही.
'तार्‍यांचे बेट' सारखा चित्रपट जो मला अतिशय आवडला तो त्याने सलग आणि आवडून बघण्यासाठी आम्हाला विशेष प्रयत्न करावे लागले होते.