कारल्याची भाजी

Submitted by श्रद्धादिनेश on 28 February, 2013 - 04:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ किलो कारली
३ मोठे कांदे
१०-१२ कढिपत्याची पाने
१ लहान चमचा मोहरी
१ लहान चमचा जिरे
१/२ लहान चमचा हिंग
४/५ हिरव्या मिरच्या
१ वाटी ओल्या नारळाचा चव
भरपुर कोथिंबीर
१ लहान चमचा साखर
मीठ चविनुसार
तेल

क्रमवार पाककृती: 

कारली धुवून मधोमध उभी कापून घ्यावीत व बिया काढून टाकाव्यात.
कारली उभी धरुन, स्लायसर वर त्यांचे पातळ काप करून घ्यावे.
कापलेल्या कारल्याला चमचाभर मीठ चोळून तासभर तरी बाजूला ठेवून द्यावी.
तासाभराने कारली घट्ट पिळून त्यातले पाणी काढून टाकावे.
एका पॅन मधे ३-४ मध्यम चमचे तेल घेऊन त्यात कारली परतून घ्यावी. आपल्याला कारली तळायची नाहीत तर खरपुस परतून घ्यायची आहेत. त्यामुळे तेलाचे प्रमाण कारल्याच्या हिशोबाने कमी-जास्त करावे. कारली मस्त कुरकुरीत आणि काळपट झाली पाहीजेत.

कांद्याचेही स्लायसरवर पातळ उभे काप करुन घ्यावे.
मिरच्यांचे तुकडे करुन घ्यावे.
पॅन मधे चमचाभर तेल गरम करुन घ्यावे.
त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढिपत्याची पाने व मिरच्या टाकून नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्यावी.
१-२ मिनीटे परतल्यावर त्यात कांदा घालावा व छान गुलाबी रंगावर परतून घ्यावा.
साखर घालावी.
आता ह्या परतलेल्या कांद्यात कुरकुरीत कारली टाकून एकत्र करावीत.
आधी लावलेल्या मीठाच्या अंदाजाने गरज असेल तरच थोडेसे मीठ वरून घालावे.
२-३ मिनीटांनी ओले खोबरे व कोथिंबीर घालून एकत्र करुन घ्यावे.
एक छोटीशी वाफ काढल्यावर भाजी तयार.

वाढणी/प्रमाण: 
कारले आवडीने खाणार्या ३-४ जणांना पुरेल.
अधिक टिपा: 

कारली कुरकुरीत करण्याच्या प्रक्रियेला थोडा जास्त वेळ लागतो. मावे च्या मदतीने काम जलद होते. परतल्यावर कारली आकसून जवळपास अर्धी होतात.
कुरकुरीत कारली नुस्तीच मीठ मसाला लावूनही छान लागतात.
जास्त साखरेची गरज नसते कारण कांद्याचा गोडवा कारल्याचा कडुपणा बराच कमी करतो.
मि स्वतः कारले कधीच खायचे नाही पण अशा प्रकारची भाजी अगदी आवडीने खाल्ली जाते.

माहितीचा स्रोत: 
आई...जी इतकी वर्ष ही सुंदर भाजी बनवतेय आणि मी आत्ता आत्ता चव घेऊन ह्या भाजीची पंखी झाले :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे हा प्रकार.
कारल्यांना खुप मिस करतोय. इथे रस्त्याच्या कडेने, कुंपणावर, जंगलात भरपूर कारल्याचे वेल आहेत आणि त्यांना भरपूर कारली लागलेली असतात. पण बाजारात नसतात Sad