मायबोलीच्या संपर्कातून समाजसेवा (सन २०१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 February, 2013 - 10:31

सन २०११ मध्ये मायबोलीच्या संपर्कातून डॉ. कैलास गायकवाड यांची मेडिकल टीम व आमचा इनरव्हिल क्लब ऑफ उरण यांच्या वतीने उरण येथील महिलांसाठी गर्भपिशवीचा कर्करोग व हिमोग्लोबिन चेकअपचे मोफत शिबीर आयोजीत केले होते. त्यात एका उरण मधील महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ह्या शिबिरामुळे तिच्या हा आजार लक्षात येऊन तिने तातडीने उपचार घेतले.

ह्याच शिबीरामध्ये काही ग्रामीण भागातील स्त्रियाही आल्या होत्या. परंतू लांब असल्याने बर्‍याच स्त्रिया येऊ शकत नाहीत म्हणून असे शिबीर आमच्या ग्रामीण भागात घ्यावा अशी विनंती उरणमधील पिरकोण ह्या गावातील जनवादी महिला संघटना ह्या सेवाभावी संस्थेतील एका कार्यकर्ती महिलेने इनरव्हिल क्लब ऑफ उरण व डॉक्टर कैलास गायकवाड यांच्याकडे केली होती.

काही तांत्रिक अडचणींमुळे सन २०१२ मध्ये शिबिर होऊ शकला नाही. पण डॉ. कैलास गायकवाड यांनी ह्या शिबीराची गरज लक्षात घेऊन २७ जानेवारी २०१३ हा दिवस तपासणी साठी निश्चित केला. जनवादी महिला संघटनेच्या महिलांना तारीख नक्की सांगितली. तपासणी उरण येथील पिरकोण ह्या गावी करायची होती. त्यासाठी त्यांनी पिरकोण शाळा उपलब्ध करून दिली.

पिरकोण हे एक खेडेगावच आहे. तेथे शहराप्रमाणे किंवा सुधारीत गावांप्रमाणे सेवा-सुविधा उपलब्ध नाहीत. गावात दवाखानाही नाही. बाजूच्या कोप्रोली ह्या गावात सरकारी दवाखाना आहे. तेथे त्यांना जावे लागते अशी आम्हाला माहिती मिळाली. ही परिस्थिती डॉक्टर कैलास यांना सांगितल्यावर त्यांनी जनरल तपासणी करण्याचेही ठरवले. त्यासाठी त्यांनी गोळ्या औषधेही घेऊन येण्याचे ठरविले.

दिनांक २७ जानेवारी रोजी ईदची सुट्टी होती. पण डॉ. कैलास गायकवाड यांच्या शब्दावरून त्यांचे डॉक्टर मित्र डॉ. रत्नेश म्हात्रे, डॉ. सारीका म्हात्रे हे त्यांची ५ महिन्यांची मुलगी घरी ठेवून तपासणी साठी हजर झाले होते. तसेच आपल्या इदच्या हक्काच्या सुट्टीवर पाणी सोडून डॉ. शबिना शेख, स्वतः डॉक्टर, कैलास, डॉक्टरांचा स्टाफ, नर्स, आया ह्या देखील आल्या होत्या.

कार्यक्रमाची सूत्रे आमच्या हातात असल्याने थोडी सामानाची जमवाजमव करण्यात आम्हाला उशीर झाला. त्यात माझी श्रावणी व ५ महिन्यांची राधाही माझ्या बरोबर होती. आमच्या आधीच डॉक्टर व त्यांची टीम आली होती. खरे तर आम्ही त्यांच्या स्वागताला आधी जाणे गरजेचे होते पण आम्हालाच उशीर झाल्याची खंत आम्ही इनरव्हिल क्लब, रोटरी क्लब व जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांना वाटत होती.

आम्ही पोहोचलो तेव्हा मात्र उशीर झाल्याबद्दल डॉक्टरांच्या टीम पैकी कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. इथे नक्की तपासणी आहे की नाही अशी परिस्थिती तेव्हा वाटत होती. रूम उघडलेले नव्हते, महिलाही जमल्या नव्हत्या. मलाही महीला येतील की नाही, हे शिबिर यशस्वी होईल की नाही ह्याबद्दल शंकाच वाटू लागली होती. १० ची वेळ ११.३० वर गेली व ६-७ महीला जमल्या. तेव्हा माझे मिस्टर रो. अ‍ॅड. पराग म्हात्रे यांनी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. सुरज पाटील, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सौ. स्नेहल म्हात्रे यांच्याशी विचार विनिमय सूत्र हातात घेऊन डॉक्टरांच्या टीमचे स्वागत केले व डॉक्टरांनीही आपण ह्या महिलांपासून तपासणी चालू करू असा निर्णय घेतला.

डॉक्टर कैलास ह्यांनी जमलेल्या समूहाला काही वैद्यकीय सूचनाही दिल्या.

तपासणी चालू केली आणि अजून ७-८ महिला जमल्या. आम्ही त्यांचे स्वागत करून त्यांची नाव नोंदणी चालू करून बसायला सांगितले.

जवळ जवळ १ वाजता अचानक जादूची काडी फिरविल्याप्रमाणे महिलांची गर्दी झाली. डॉक्टरांना व आम्हाला ह्या घोळक्याला कंट्रोल करणे कठीण जाऊ लागले. माझ्या मिस्टरांनी आमच्या छोट्या राधाला व श्रावणीला तिथून बाहेर फिरायला नेले. त्यामुळे मला तिथे थांबता आले. एकच कल्लोळ चालू झाला होता. इतक्या वेळाने ह्या महिला का आल्या त्याचे कारण आम्हाला तेव्हा सापडले. तेथील बायका मोल-मजुरी
करण्यासाठी गावांमध्ये, शेतावर जातात. त्या जेवायला १ वाजता येतात तेव्हा त्या बिचार्‍या आल्या होत्या. आम्ही कसे बसे समजावत, ओरडत सगळ्यांची लाइन लावून डॉ. रत्नेश व डॉ. कैलास यांच्याकडे जनरल तपासणीला तर डॉ. सारीका व डॉ. शबिना ह्यांच्याकडे गर्भाशयाच्या तपासणीला महिलांना पाठवू लागलो. अगदी शाळेत शिक्षकांना जी वर्ग शांत ठेवण्यासाठी भूमिका वठवावी लागते तिच आमचा ग्रुप करत
होता.

]

पण डॉक्टर्स वेळ निघून गेली व गर्दी आहे म्हणून कोणतीही घाई न करता प्रत्येक पेशंटला त्यांची विचारपूस करून काळजीपूर्वक प्रश्न विचारून त्यांना सल्ले देऊन योग्य ती औषधे देत होते
.

डॉक्टर गावात आलेत म्हणून काही आजारी पुरुषही आपली समस्या घेऊन आले होते. केवळ महिलांची तपासणी आहे म्हणून चाल ढकल न करता ह्या पुरुषांच्या आजारावरही डॉक्टरांनी औषधे दिली. साधारण २ वाजेपर्यंत डॉक्टरांनी पेशंटना तपासले नाव नोंदणी करून घेतली. त्यानंतर औषधांचा स्टॉक संपत आला हे पाहून मात्र पुन्हा असे शिबिर काही दिवसांनी घेऊ असे जाहीर करून नोंदणी थांबविली.

३ वाजे पर्यंत तपासणी संपली व आम्ही जनवादी महिला संघटने तर्फे गावातील बायकांनी केलेल्या चिकन-भाकरीचा आस्वाद घेतला. ३.३० ला आभार प्रदर्शन वगैरे आटोपून डॉक्टर्स व आम्ही निघण्याया बेतातच होतो तेवढ्यात एक वृद्ध महिला काठी टेकत टेकत आली. मी तिला डॉ. कैलास यांच्याकडे नेले तेव्हा डॉ. मला काहीतरी औषध द्याच हो म्हणून विनवणी करू लागली. डॉक्टरांनी तिचीही विचारपूस करून
तिला औषधे लिहून दिली. आमच्या क्लबच्या महिलांनीही तिला औषधे घेण्यासाठी पैसे दिले. हे झाल्यावर आम्ही व डॉक्टर्सनी कुठलीली फी न घेता गावकर्‍यांचे भरभरून आशीर्वाद घेऊन पिरकोण गाव सोडले.

खरंच मला मनापासून ह्या डॉक्टर्सच्या टीमचे कौतुक करावंस वाटत. आपला सुट्टीतील वेळ काढून, कुटुंबीयांच्या सुट्टीतील हक्काच्या सहवासावर पाणी सोडून एकाही पैशाची अपेक्षा न करता केवळ गरीब लोकांच्या (पेशंटच्या) समस्या दूर करण्यासाठी हे डॉक्टर्स कोणतीही सेवा सुविधा नसलेल्या गावात आनंदात आले. गावकर्‍यांनाही त्यांनी आपलेसे केले. व्हिजिटिंग कार्ड देऊन आपली जाहीरात न करता
कोणाला जर दुसर्‍या तपासणीची आवश्यकता असेल तर माझ्या दवाखान्यात या म्हणून न सांगता तुमच्या सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्या व औषधे घ्या असे सांगणारी ही डॉक्टर्सची टीम आजच्या जगात खरंच दुर्मिळ अशीच आहे.

४ फेब्रुवारीच्या सकाळ ह्या वर्तमान पत्रात ह्या कॅम्पची बातमी छापून आली होती.

डॉ. कैलास यांनी प्रतिसादात आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्यांनी दिलेली गर्भाशयाच्या कर्करोगाची माहीती ही फारच मौलीक असल्याने ती मेन पेजवर देत आहे.
सर्वांचे मनापासून आभार. स्मित

=======================================================

हेच शिबिर का घेतलं? असा प्रश्न बर्‍याच जणांना असू शकतो,त्याकरिता मी खालील माहिती देत आहे....सर्वांना उपयोगी पडेल.

नाते जपणे, मग ते कुटुंबाशी असो वा जीवनाशी, हा स्त्रीत्वाचा विशेष गुण आहे. मात्र गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी असे नाते जपणे खूपच धोकादायक ठरू शकते.

भारतात स्तनाच्या कर्करोगापेक्षाही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडणा-या स्त्रियांची संख्या जास्त आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग:

गर्भाशयाचे मुख (सर्व्हिक्स) गर्भाशयाला होणारा जंतुसंसर्ग रोखण्यास मदत करते. या मुखाला झालेला कर्करोग म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सर.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग कसा होतो?

हा कर्करोग आनुवंशिक नसतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा एका विषाणूच्या संसर्गामुळे होतो. त्या विषाणूचे नाव आहे: ह्युमन पापिलोमाव्हायरस (एचपीव्ही). हा विषाणू गर्भाशयाच्या मुखास जंतुसंसर्ग करतो. हा विषाणू सामान्य आहे आणि गुप्तांगांच्या संपर्कामधून त्याचा प्रसार होतो. या विषाणूचा संसर्ग थांबविणे आता लसीमुळे शक्य झाले आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग कोणाला होऊ शकतो?

तरूण स्त्रियांमध्ये एचपीव्हीचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो व याच संसर्गाचे रुपांतर नंतर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगात होऊ शकते. मात्र कोणत्याही वयोगटातील स्त्रीला हा कर्करोग होण्याचा धोका आहे. म्हणूनच मुलींना लवकरात लवकर या संसर्गापासून वाचविणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान कसे केले जाते?

अंतिम टप्प्यात पोहोचेपर्यंत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची फारशी लक्षणे दिसून येत नाहीत. पॅप स्मीअर चाचणीद्वारे या कर्करोगाचे सुरूवातीचे टप्पे ओळखता येतात. मात्र पॅप स्मीअर चाचणी केवळ एचपीव्हीचा संसर्ग झाल्यानंतरच निदान करू शकते, मुळातच संसर्ग होण्यापासून रोखू शकत नाही.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आता रोखता येऊ शकतो.

लसीकरणामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याच्या खूप आधीच रोखता येतो.
लसीकरण शरीराला विषाणूच्याविरोधात ऍण्टीबॉडीज बनविण्यास उद्युक्त करते. जेव्हा एचपीव्ही गर्भाशयाच्या मुखावर आक्रमण करतो तेव्हा या ऍण्टीबॉडीज शरीराचे त्यापासून संरक्षण करतात.
गर्भाशयाच्या मुखाचे एचपीव्हीपासून संरक्षण करून ही लस गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यास मदत करते.

लस कोणी टोचून घ्यावी?

पौगंडावस्थेतील मुलींना लवकरात लवकर ही लस द्यावी कारण त्यांचे शरीर या लसीला उत्तम प्रतिसाद देते.मात्र सर्व वयोगटातील स्त्रियांना या कर्करोगाचा धोका असल्याने तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून ही लस तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे विचारावे.

लस कशी दिली जाते? ती सुरक्षित आहे का?

ही लस ६ महिन्यांच्या कालावधीत ३ डोस/ इंजेक्शन्सच्या स्वरूपात दिली जाते. ती पूर्णपणे सुरक्षित आणि सह्य आहे. इतर लसींसारखीच ही लस घेतल्यावरही थोडीशी प्रतिक्रिया (उदाहरणार्थ ताप येणे, सूज येणे) होऊ शकते.

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु खरोखरंच खूप कौतुक वाटलं तुम्हा सर्वांच्या प्रयत्नांचं.. तुम्हा सर्वांचं,डॉक्टर्स च्या टीम चं आणी तपासणीकरता आपणहून आलेल्या बायकांचं मनःपूर्वक अभिनंदन Happy

अभिनंदन आणि पुढील कामासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

महिला दिनाच्या निमित्ताने असे वैद्यकीय शिबिर गरजूंसाठी आयोजित करण्याची नंदिनीची कल्पना आवडली.

जागू तुम्हा सर्वांचं आई डॉ. कैलास आणि त्यांच्या टीमचं खूप कौतुक! आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

जागू, डॉक _________/\____________

अभिनंदन आणि सलाम!!!!!

अरे, हा धागा वाचला नव्हता. ह्या आधी एक लिहिला होतास ना तो वाचला होता. थँक्स नंदिनी, इथे यायला लिहिल्याबद्दल.
जागु, डॉ. कैलास व सर्व कार्यकर्त्यांचे खुप अभिनंदन. फार फार उपयुक्त उपक्रम. फार आवडले.

उपक्रमात सहभागी झालेल्या सगळ्यांचेच हार्दीक अभिनंदन. तुम्ही सगळे कौतुकास्पद कामगिरी करताहात.

उपक्रमात सहभागी झालेल्या सगळ्यांचेच हार्दीक अभिनंदन. तुम्ही सगळे कौतुकास्पद कामगिरी करताहात. >>> +१

सर्वांचे मनापासून आभार. Happy

जागू आणि जागूचे अहो Happy अ‍ॅड.पराग म्हात्रे,हे सामाजिक अंग असलेलं एक सुशिक्षित दांपत्य या सगळ्या कार्यक्रमाचे कर्ताधर्ता आणि आधारस्तंभ आहेत. नोकरी,घर आणि लहान बाळ हे सारं काही सांभाळून जागू आपल्या सामाजिक जाणीवांना आणि समाजकार्यास इतका वेळ देते हे फारच कौतुकास्पद आहे.

जागूने कल्पना दिल्यावर मी जुळवाजुळव केली आणि हा उपक्रम चांगल्यापैकी जमून आला.

उमेश कोठीकर यांनी अश्या उपक्रमात मदतीची तयारी दाखविली आहे. आपले मनःपूर्वक आभार.

नंदिनी यांनी........ महिला दिनानिमित्त श्रमदानाचा जो उपक्रम मांडला आहे त्यामधेदेखील असा एखादा तपासणी शिबिराचा उपक्रम करता येइल का? अशी विचारणा केली आहे. .. यावर मी म्हणेन की नक्कीच असा कार्यक्रम करता येईल.

Pages