मृत्युदंड - असावा का नको? आपले मत..

Submitted by mansmi18 on 18 February, 2013 - 09:38

नमस्कार,

काही जणांचा मृत्युदंड या संकल्पनेला विरोध आहे. त्यांची यामागची कारणे काय आहेत हे जाणुन घ्यायची इच्छा आहे.
आपली मते लिहाल का?

धन्यवाद.
(या विषयावर आधी बाफ उघडला गेला असेल तर अ‍ॅडमिन साहेब कृपया हा बाफ बंद करावा).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर........मृत्युदंड बंद करायला हवा..........
.
.
फाशी इतकी सोपी शिक्षा देउ नये...

... त्यापेक्षा दगडांनी ठेचुन अथवा...गोळ्या मारुन तडफडुन मेले पाहीजे अशी शिक्षा देण्यात यावी

फाशीच्या शिक्षेचा प्रश्न नंतर येतो.
खरंतर अफजल ने संसदेवर हल्ला नाही करायला हवा होता. कसाब ने देखिल मुंबईवर हल्ला नाही करायला हवा होता. कित्येक निष्पाप प्राण वाचले असते. नाही का?

अफझलचा उल्लेख काढुन टाकला आहे. मृत्युदंडाच्या बाबतीत सर्वसाधारण चर्चा अपेक्षित आहे. (फक्त अफझल किंवा कसाबच्याच संदर्भात नाही)
धन्यवाद.

मृत्युदंड देऊ नये असे म्हणण्याची दोन कारणे:

- ते माणुसकीला सोडून आहे,
- भ्रष्टाचार, खोट्या साक्षी असे नसले तरी तांत्रिक मुद्द्यावर (जसे पुरेसा पुराव गोळा न केल्याने, किंवा अमेरिकेत ज्यूरी लोकांकडून) चुका होऊ शकतात नि चुकीच्या माणसाला मृत्युदंड होउ शकतो.

अमेरिकेत गोर्‍या लोकांनी कित्येक काळ्या लोकांना केवळ वर्णद्वेषापायी असे मारले आहे असे म्हणतात.

देण्याची कारणे म्हणजे

- माणसाचे गुन्हे इतके भयंकर असतात, की न्यायालयात कस्सून चौकशी करून सुद्धा तो माणुस गुन्हेगारच ठरतो मग इतरांना धाक बसावा म्हणून, किंवा सूडाच्या भावनेने.

- न मारता कैदेत खितपत ठेवण्यास खर्च येतो, त्याचा बोजा शेवटी जनते वरच.

दो आँखे बारह हाथ सारखे बरेचसे सिनेमे आहेत हिंदी नि इंग्रजीत पण तशी उदाहरणे विरळाच.

आता वैयक्तिक रीत्या प्रत्येक फाशीची शिक्षा झालेल्या माणसाची मानसिक तपासणी करून त्याचा समाजाला किंवा कुणाला तरी काहीतरी उपयोग होईल का याचा भरपूर अभ्यास करून निर्णय घेता येईल, की याला मारावे की जिवंत ठेवावे, पण .....

पण......

पण काय आहे, या सगळ्या गोष्टींना पैसा लागतो!!

नि जगात आजकाल पैशाचे महत्व इतके वाढले आहे की माणुसकी, दया माया वगैरे सारखे विचार 'परवडत' नाहीत. झट निकाल, फट फाशी यात सूड उगवला याचे समाधान जास्त.

मग 'कठोर, धाडसी' निर्णय घेतल्या जातात. नि त्याची वाहवा होते!, त्यामुळे निवडणूक जिंकायला मदत होते,
मग पैसा की आयुष्याचे सार्थक!! यशस्वी जीवन! आदर्श!

- इति

मनस्मी ,
इथे फक्त मृत्युदंड नको म्हणणार्यांचेच विचार अपेक्षित आहेत का ?
तसे नसेल तर शीर्षक "मृत्युदंड -असावा का नको? आपले मत.. " असे बदलता येईल का ?
माझ्या मते तरी असे अनेक गुन्हे आहेत की ज्याना मृत्युदंडाची शिक्षा असायलाच हवी .
उदा . थंड डोक्याने घ्ररातल्या ५-१० माणसाना (तान्ह्या मुलांसकट) मारणार्या माणसाला दया दाखवायच काही कारण नाही अस माझ मत . अर्थात मी एका मर्यादेपलिकडे मानवतावादी हो शकत नाही हे ही खरे , असेही लोक असतील की आता त्याला मारून काय मिळणार , त्याला सुधारायची संधी द्यावी असेही म्हणत असतील . शेवटी हे प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून आहे .

झक्की धन्यवाद.

केदार,

दोघांच्या विचारांचे स्वागत पण मृत्युदंड का हवा ही मते साधारण माहिती असतात. (माझेही मत एक Deterrent म्हणुन मृत्युदंड हवा असेच आहे आणि आपण लिहिलेल्याशी मी सहमतच आहे). मला याच संदर्भात अशा गुन्ह्यातील मृत्युदंडही जे नकोच असे म्हणतात त्यामागे काय विचार असतात ते पहायचे आहे.

धन्यवाद.

मनस्मी,
तुमच्या प्रश्नात एक विचारू इच्छीतो.
मृत्युदंड - असावा का नको? : भारतात, की अमेरिकेत??
मग पुढचे लॉजिक विचार करू.

कसाब अन गुरूचे रेफरन्सेस काढल्याबद्दल धन्यवाद.
तुमच्या प्रस्तावावरून तुमचे या शिक्षेस समर्थन आहे असे वाटते. त्यामागची भूमीका जरा 'बीजभाषण' करून लिहिणार काय??

इब्लिस,

मी जनरल प्रश्न विचारला आहे. तो जिथे जिथे मृत्युदंड आहे त्या सगळ्याना लागु पडतो.

सर्वसाधारणपणे माणसाला भय फक्त एका गोष्टीचे असते..स्वतःच्या मृत्युचे. (सुसाईड बाँबर इ. सोडुन)
किमान त्या भयाने तरी एखादे निर्घ्रुण क्रुत्य करताना माणसे थोडा विचार करुन स्वतःला आवरु शकतात. त्या न्यायाने 'Deterrent' म्हणुन म्रुत्युदंड असावा हे माझे मत आहे. (ते बरोबर आहे, चुक आहे.. आपल्या जागी आहे).

मला विचारलेत तेव्हा आपलेही स्पष्ट मत लिहाल ही आशा.

धन्यवाद.

नक्कीच. माझे मत 'नसावा' असे आहे.
तुम्ही तुमच्या मताचे बीजभाषण केलेत, तर मी ही विस्तृत उत्तर लिहीनच.

इब्लिस,

आपले उपरोधिक शेरे माझ्या लक्षात येत नाहीत. मला काय वाटते ते मी स्वच्छ शब्दात लिहिले आहे, आपल्याला नीट चर्चा करायची असेल तर लिहा. नसेल तर आपल्याशी शाब्दिक खेळ खेळण्याची माझी इच्छा नाही. आणि तेवढा माझ्यात संयम नाही. स्पष्ट लिहिल्याबद्दल राग नसावा.

धन्यवाद.

गुन्हा काहीही असला तरी मृत्युदंड देवु नये... त्याचे राजकारण व्हायचे जास्त चांसेस. त्यापेक्षा त्यांना चेनै मध्ये तामिळ शिकायला पाठवावे, त्याने जास्त जरब बसेल.

मृत्युदंड असु नये.

कारण मृत्युदंड देणे म्हणजे कोणत्या तरी व्यवस्थेप्रमाणे (दूसरा शब्द नसल्याने त्याला न्यायव्यवस्था म्हणू या) कुणाला तरी दोशी ठरवून त्याचा पत्ता कट करायचा. खरेतर त्यानेही कोणत्यातरी व्यवस्थेप्रमाणेच (कदाचीत कट्टर धार्मीक, कदाचीत अ‍ॅव्हरेज पासून ३-४ सिग्मा दूर असलेला मेंदू - ज्याला वेडेपणा म्हंटल्या जाते) काहीतरी गुन्हा केला असतो.

एक व्यवस्था ही दूसर्‍या व्यवस्थेपेक्षा जास्त योग्य आहे हे कोण ठरवणार? त्यापेक्षा मूळ नष्ट करता आले तर जास्त चांगले (लक्षात घ्या की धार्मीक कट्टरता ही कोणत्या धर्माविरुद्ध असायची शक्याताच जास्त. उदा. हिंदु धर्मच नसता तर मुसलमान हिंदुंविरुद्ध अत्याचार करुच शकणार नाहीत).

मूळ नष्ट करणे म्हणजे तशा गोष्टी होणार नाहीत याची काळजी घेणे - योग्य शिकवणीद्वारे. तरीही 'गुन्हे' झालेच तर ते कोलॅटरल डॅमेज. भगवंतही पर्फेक्ट नाहीच.

नाही, मला फक्त धार्मीक मुद्द्यांबद्दल म्हणायचे नाही - बलात्कारासारख्यापण. मनोवृत्ती बदलायची गरज जास्त आहे. ते बदल एका रात्रीत होणार नाहीत म्हणून काही दिवस मृत्युदंड चालेल, जर, ते बदल होण्यासाठी लगोलग तजवीज केली जाणार असेल, आणि ते नियम न पाळणार्‍यांनाही तितकीच कडक शिक्षा होणार असेल. उदा. पोलीसांना, नेत्यांना मृत्युदंड, गुन्हा घडत असलेला दिसत असतांना काणाडोळा करणार्‍यांना मृत्युदंड ...

मृत्युदंड असावा.

सध्याची न्यायव्यवस्था आणि प्रणालीत तृटी आहेत असं मलातरी वाटत नाहि. सरसकट सगळ्या गुन्हेगारांना फाशी दिली जात नाहि; ती गुन्ह्याच्या तीव्रतेवर/स्वरुपावरुन ठरवली जाते.

माणुस म्हणुन जगण्यास लायक नसलेल्या प्राण्याला देहदंडाचीच शिक्षा योग्य आहे.

उदा . थंड डोक्याने घ्ररातल्या ५-१० माणसाना (तान्ह्या मुलांसकट) मारणार्या माणसाला दया दाखवायच काही कारण नाही अस माझ मत . >> आणि प्रिमेडिटेटेड खूनाचा प्रयत्न केलेल्या माणसालाही.
७ वर्षानंतर सुटून येऊन तो माणूस पुन्हा काहीतरी करेल म्हणून निरपराध माणसाच्या डोक्यावरची टांगती तलवार, त्यानं सहन केलेले मनावरचे घाव चालतात, पण खूनाचा प्रयत्न करणारा सुधारू शकतो म्हणून त्याला मारायचं नाही.

मृत्यूदंड असावा कि नसावा याबद्दलचं मत ठरवता येत नाही.
नसावा या पक्षाचं (पाश्चिमात्य देश) म्हणणं एकतर माणुसकीच्या आधारावर आहे किंवा न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर आधारीत आहे. निरपराध व्यक्ती फासावर गेल्यास ती शिक्षा अनडू करता न येणे हा प्रबळ आणि सोदाहरण युक्तीवाद त्यामागे आहे. ही कारणं पटतात.

दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करून हत्या करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांत आपल्या देशात फाशीची सोडा कसलीच शिक्षा होत नाही, गुन्हेगारही सापडत नाहीत. फादर स्टेन्सला त्याच्या लहान मुलांसमवेत जाळण्याचं प्रकरण असो किंवा अशा काही इतर घटना. या गुन्ह्यांचं समर्थन करणारेही आहेत. प. बंगालमधल्या एका मुलीच्या चेह-यावर अ‍ॅसिड फेकूनही गुन्हेगार खुलेआम फिरत असल्याचं अलीकडेच गाजलेलं उदाहरण आहे. सुदैवाने ती मुलगी वाचली. अशा लोकांना फाशीची शिक्षा असली काय नसली काय, फरक पडेल असं वाटत नाही.

>>एक व्यवस्था ही दूसर्‍या व्यवस्थेपेक्षा जास्त योग्य आहे हे कोण ठरवणार? त्यापेक्षा मूळ नष्ट करता आले तर जास्त चांगले (लक्षात घ्या की धार्मीक कट्टरता ही कोणत्या धर्माविरुद्ध असायची शक्याताच जास्त. उदा. हिंदु धर्मच नसता तर मुसलमान हिंदुंविरुद्ध अत्याचार करुच शकणार नाहीत>><<<

याचा तीव्रतम निषेध. तुम्हाला धर्म नाही/तुम्ही धर्म मानत नाही म्हणून हिंदू धर्माबद्दल "तो नसताच तर अत्याचार झालेच नसते मुसलमानांकडून" अशा प्रकारचे निषेधार्ह, अश्लाघ्य, अपमानास्पद, आणि घाणेरडे उद्गार काढल्याबद्दल करावी तितकी निंदा थोडी आहे. तुम्ही तुमचे बघा. कृपया पुन्हा अशा प्रकारचे उल्लेख करु नका.

रच्याकने, धर्म न माननार्‍यांवर "त्यांनी" आजवर इतिहासात काय काय अत्याचार केले आहेत ते खोदून पहा आणि मग असली हास्यास्पद विधाने करा.

राज यांना अनुमोदन.

त्यापुढे जाऊन असे मत मांडू इच्छितो की premeditated खुनासाठी मृत्युदंड हीच योग्य शिक्षा आहे.
इतर कारणांनी केलेले खून असतात त्यासाठी कदाचित सौम्य शिक्षा योग्य असेल, पण अतिशय थंड डोक्याने दुसर्‍याचा जीव घेणे (आणि त्याच्या कुटुंबियांना आणि इतर सुहृदांना मानसिक यातना देणे) यासाठी फक्त आणि फक्त मृत्युदंड हेच योग्य. यात दहशतवाद देखिल आलाच.

मनस्मी ,
शीर्षकात बदल केल्याबद्द्ल धन्यवाद .
वर प्रतिसादात नमूद केल्याप्रमाणे फाशीच्या शिक्षेचा क्वचित दुरूपयोग होतही असेल , पण कायद्याचा कधीतरी misuse होतो म्हणून कायदा नसावा असे कसे म्हणता येईल ?

त्याहीपेक्षा माझा आक्षेप या मुद्द्याला आहे की , सामान्यतः असा माणूस मरायला तयार असतो त्यामुळे ही शि़क्षा त्याला डिटरंट होणार नाही . मुळात हा मुद्दाच गैरलागू आहे . हाच तर्क पुढे नेल्यास चोर ही तुरूंगात जाणार हे माहीत असूनही चोरी करत असतो , मग त्याला शि़क्षा करण्यात तर काय अर्थ आहे ?
पोटच्या पोरीवर बलात्कार करून तिचा खून करणार्याला फाशी झालीच पाहिजे ,यात मानवतावाद येतो कुठून ?
वादासाठी अस मानल की इतर मुलांच्या जबाबदारीसाठी त्याला दया दाखवली , पण त्याच्या भागातील पालकाना काय धास्तीत जगाव लागेल याचा विचार कोण करणार ?

>>वादासाठी अस मानल की इतर मुलांच्या जबाबदारीसाठी त्याला दया दाखवली , पण त्याच्या भागातील
पालकाना काय धास्तीत जगाव लागेल याचा विचार कोण करणार ?<<

..........आणि तो त्याच्याच इतर मुलांवर असा अत्याचार करणार नाही कशावरून?
अनुमोदन केदार जाधव.

aschig
सेन्सिबल पोस्ट. अनुमोदन.

सावरकर,
अर्धवट कॉपी पेस्ट करून अर्धवट पोस्ट लिहीण्याआधी त्यांनी काय लिहिलंय ते नीट वाचा.

नीट वाचूनच लिहीलंय डॉ. इब्लिस. धर्माचा उल्लेख करण्याची आवश्यकताच नव्हती. खोडसाळपणा दिसला म्हणून बोललो. धन्यवाद.

कि फर्क पैंदा ?
(एकदा मत दिलं आणि त्यावर कारवाई झाली नाही तर थेट रामलीला मैदान गाठावे लागेल. )

चांगला म्हणण्यापेक्षा महत्वाचा विषय आहे. येथे मतप्रदर्शन केल्याने काही खास होणार असते असे नाही, पण लोक आपापली मते देतात, जोखून पाहतात, थोडी मजाही घेतात, थोडे चांगल्या दिशेने परिवर्तनही होते. एकुण परिणाम छान होतो.

या प्रक्रियेत आपणही सहभागी व्हावे अशी इच्छा मनात आली म्हणून आमचेही एक मत देत आहोत.

आमच्यामते मृत्यूदंड नसावा व त्याची दोन कारणे आहेतः

कारण क्रमांक एक - ती शिक्षा रिव्हर्सिबल नाही. उद्या दोनपाच वर्षांनी मारला गेलेला निरपराध असल्याचे कळले, किंवा त्याला गुन्हा करण्याचे सबळ कारण असल्याचे कळले जे आधी कळलेले नव्हते किंवा कायदेच बदलले (चांगल्यासाठी) तर निदान जिवंत असलेल्या माणसाच्या शिक्षेत बद्ल तरी करया येतो, जसे त्वरीत सुटका, कमीजास्त कालावधी करणे, कठोरता कमी जास्त करणे वगैरे!

कारण क्रमांक दोन - जिवंत ठेवूनही गुन्ह्याच्या प्रमाणातच यातना होतील अश्या शिक्षा देणे शक्य असते. त्यात माणूस निदान जिवंत राहतो व पश्चात्तापात जगत राहतो. याचा प्रभाव इतर होऊ घातलेल्या गुन्हेगारांच्या मनांवरही होऊ शकतो व जरब बसण्यास मदत होते.

ही आमची मते असून इतर कोणाच्याही मतांना आम्ही चूक म्हणत नाही व तसा अधिकारही नाही. आमची मते न पटणारेही अनेक सदस्य असतील व त्यांच्याही मतांचा आम्ही मनापासून आदर करतो.

कळावे

गं स

सर्वसाधारणपणे माणसाला भय फक्त एका गोष्टीचे असते..स्वतःच्या मृत्युचे. (सुसाईड बाँबर इ. सोडुन)
किमान त्या भयाने तरी एखादे निर्घ्रुण क्रुत्य करताना माणसे थोडा विचार करुन स्वतःला आवरु शकतात. त्या न्यायाने 'Deterrent' म्हणुन म्रुत्युदंड असावा हे माझे मत आहे. (ते बरोबर आहे, चुक आहे.. आपल्या जागी आहे).

<<
मनस्मी,
"इ." मधे काय काय येते? सगळ्यांनाच हे भय नसते.
कायदेशीर खून केला तर त्याला 'मृत्यूदंड' म्हणतात. जर चुकून, न्यायव्यवस्थेतील तृटींमुळे हा दंड दिला गेला, तर?
तुमच्यावर खोटे बालंट आणून तुम्हालाच दिला गेला तर?
डीटेरंट कितीही मोठा असला, तरी माणूस असले उद्योग केल्याशिवाय रहात नाही, हे इतिहासात जरा पाहिले तर दिसते.

दुसरे, मी उपरोधाने लिहिलेले नाही. तुम्ही एकोळी धागा टाकला आहात. तुमची भूमीका थोड्या डीटेलमधे, 'प्रास्ताविक' अथवा बीजभाषण या स्वरूपात ठेवलीत तर चर्चेस उपयोग होतो, इतकेच सांगत होतो. तिथे मीदेखिल एका शब्दात माझी भूमीका सांगीतलेली आहे.

***
असा,
त्यांनी उदाहरण म्हणून एका धर्माचे नांव घेतले आहे, त्यात कसला खोडसाळपणा? ते वाचून धार्मिक भावना वै दुखावणे हे फक्त तुमच्या मनात आहे, असे सुचवतो.

***

ता.क.

वरील गं.सं यांची मते योग्य आहेत. सहमत.

७ वर्षा पेक्षा जास्त शिक्षा असेल तर फाशी द्यावी. ह्या असिड टाकणार्‍या, दरोडे घालणार्‍या, बलात्कार करणार्‍यांना अजिबात जीवंत ठेवू नये. जमले तर शरिरात बॉम्ब लपवून पाकिस्तानात सोडावे

धर्माबद्दल काही लोक (नाईलाजाने का होईना) मानतील की त्यामुळे खून-खराबा व्हायची आवश्यकता नसते.
पण देशाबद्दलचा प्रश्न आला की लोक जास्तच भावूक होतात. योगायोगाने ज्या धर्मात जन्मलो त्या ही पेक्षा योगायोगानी ज्या देशात जन्मलो त्याला (काही) लोक जास्त महत्व देतात. खरेतर देश ही संकल्पना पण तेवढीच काल्पनीक आहे, अनावश्यक आहे. सर्व लोक एकाच धर्माची असती आणि देशांच्या सीमाच नसत्या तर हे जग किती जास्त आनंददेयी असते!

याचा मृत्युदंडाशी काय संबंध? अनेक गुन्हे, आणि त्याकरताच्या शिक्षा या अशाच बिनबुडाच्या संकल्पनांमुळे अस्तित्वात असतात.

पण आहे ते आहे ते आपण बदलु शकत नाही या भावनेने लोक पुढे सरकत राहतात. कारण जिवनाइतकाच प्रीय इनर्शीया असतो. करप्शन स्टार्ट्स अ‍ॅट होम! पण मी भरकटतोय, चढवा मला सुळीवर.

चढवा मला सुळीवर.
<<
आशिष भाऊ,
बिरबल बादशहाची जावायांचा सूळ आठवला.
सुळावर चढवणे ही काय फारशी सुखद शिक्षा नव्हती. अत्यंत हाल करणारी शिक्षा आहे ती.
असो..

आताच बातमी वाचली..
भंडारा जिल्ह्यातील एका गावात ३ वर्षे वयाच्या मुलींवर बलात्कार करुन त्यांचा खुन करुन त्यांची प्रेते विहिरीत फेकली.

यातील दोषी व्यक्तीना समजा मृत्युदंड सुनावला तर ते अन्यायकारक होइल का?

@गंभीर समीक्षक >>>>>>>>> आतापर्यंत गंभीर गुन्हा केलेल्या व्यक्तींनाच मृत्युदंड दिलेला आहे, तुम्ही मृत्युदंड न देण्याबद्दलचे मत दिलेत, जर रेप क्रुरपणे खुन, अशा प्रकारचा 'गंभीर गुन्हा' तुमच्या अथवा तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत घडला तरी देखिल तुमचे मत तेच राहील का? उत्तर देताना प्लिज व्हिक्टीमच्या नजरेतुन या प्रश्नाकडे पहा

aschig,

>> खरेतर देश ही संकल्पना पण तेवढीच काल्पनीक आहे, अनावश्यक आहे. सर्व लोक एकाच धर्माची असती
>> आणि देशांच्या सीमाच नसत्या तर हे जग किती जास्त आनंददेयी असते!

हे वाक्य म्हणून ठीक आहे. पण हे सारे भेकडकसाबला कसे समजावून सांगायचे? सीमा नसाव्यात, धर्मभेद नसावा, इत्यादि विचार स्तुत्य आहेत. मात्र ते वस्तुस्थितीशी जुळतात का नाही ते पाहायला पाहिजे ना? जो माणूस माझं डोकं फोडायला माझ्या घराच्या दारात हाती कुर्‍हाड घेऊन उभा आहे, त्याला मी वसुधैवकुटुंबकम्‌ समजावीत बसायचं का?

तद्वत ज्याने थंड डोक्याने खून केला आहे त्याला जिवंत ठेवण्यात काय मोठे मानवतावादी तीर मारले जाणार आहेत? एकतर त्याला जन्मठेपेच्या शिक्षेखाली आयुष्यभर पोसायचा, नाहीतर तो सुटून समाजातल्या निरपराध्यांच्या उरी नसता घोर लावणार! वेळच्यावेळी दोरावर लटकला पाहिजे. अर्थात मृत्युदंड हा सांगोपांग विचार करून, सगळे पुरावे पाहून मगच देण्यात यावा.

आ.न.,
-गा.पै.

Pages