मिनी मसाला इडली.

Submitted by सुलेखा on 7 June, 2012 - 02:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

इडलीचे वाटलेले मिश्रण.
३:१ तांदुळ व उडिद डाळ्.इथे मी साधा तांदुळ व उकडी तांदुळ अर्धा-अर्धा भाग घेतला आहे.उकडीच्या तांदुळामुळे इडली छान फुगते व आतुन मऊ-लुसलुशीत होते.दोन्ही तांदुळ वेगवेगळे भिजवुन ठेवायचे.भिजवताना त्यात अर्धा चमचा मेथीदाणा घालायचा.मेथीदाण्यामुळे इडलीला छान चव येते.मिक्सर मधे वाटताना थोडे रवाळ वाटायचे आहेत.तसेच उडिद डाळ अगदी बारीक वाटुन घ्यायची .दोन्ही एकत्र करुन ५-६ तास ठेवायचे.
मसाला-
२ चमचे प्रत्येकी चणाडाळ,मुगडाळ
१ चमचा उडिद डाळ.
२ चमचे तीळ,
१ चमचा जिरे.
पाव चमचा हिंग.
कढीलिंबाची पाने.५-६.
१/२ चमचा काळे मिरे.
१ चमचा लाल तिखट/लाल सुक्या मिरच्या.
मीठ चवीनुसार.
फोडणीसाठी २ चमचे तेल व पाव चमचा जिरे.

क्रमवार पाककृती: 

इडली पिठाला खमीरा आला कि त्यात मीठ घालुन मिनी इडली पात्रातुन इडल्या तयार करुन घ्याव्या.किंवा नेहमीच्या इडल्या करुन एकाचे चार तुकडे सुरीने कापुन घ्यावे.
ह्या पहा तयार मिनी इडल्या.
idalee paaMdharee.JPG
आता मसाला करायचा.त्यासाठी कढईत चणाडाळ्,मुगडाळ व उडिद डाळ खमंग भाजुन घ्यावी.तीळ भाजुन घ्यावे.जिरे थोडेसे गरम करावे.
मिक्सर मधे भाजलेल्या डाळी,तीळ,जिरे,मिरे,कढीलिंबाची पाने ,हिंग किंचित रवेदार वाटुन घ्या.अगदी पिठी नको.[लाल सुक्या मिरच्या घालणार असाल तर त्याही बरोबर वाटुन घ्या.]हे मिश्रण एका बाऊल मधे काढुन त्यात आवडीप्रमाणे तिखट,मीठ घाला.मसाला तयार आहे.
idalee masala...JPG
आता कढईत तेलाची फोडणी करुन पाव चमचा जिरे घाला.गॅस बंद करा.त्यात मिनी इडल्या घाला .वरुन अंदाजाने थोडा-थोडा मसाला पसरवा आणि झार्‍याने हळुवार,इडल्या मोडणार नाहीत व मसाला सर्व इडल्यांना लागेल अशा रितीने हलवा.
idalee masaalrdaar.JPG
मसाला इडली तयार आहे.

वाढणी/प्रमाण: 
आवडीप्रमाणे.
अधिक टिपा: 

अशा मसाला इडल्यांमधे पाण्याचा वापर नाही त्यामुळे प्रवासासाठी टिकाऊ.थंड मसाला इडली जास्त छान लागते.स्टार्टर,मुलांची पार्टी,डबा,पिकनिक साठी उत्तम.
हा मसाला पराठा,ब्रेड वर पसरुन खाता येतो,दह्यात कालवुन चटणी /रायते करता येते.
प्रत्येक वेळी ताजा केलेला मसाला जास्त छान लागतो.जास्त केला तर घट्ट झाकणाच्या डब्यात/बाटलीत ठेवावा.

माहितीचा स्रोत: 
माझी वहिनी.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुलेखा सही दिसत आहेत त्या इडल्या. तोंपासू एकदम. त्या मसाल्याला मुळगापोडि का काय म्हण्तात ना.

Pages