ख्रिस एव्हर्ट... एक टेनिस सम्राज्ञी.
सालाबादपणे याही वर्षी मे महिना उजाडला व मला पॅरिसला जाण्याची स्वप्ने पडु लागली आहेत... हे जग सोडुन जाण्यापुर्वी पुरी व्हावीत अशी माझी काही माफक स्वप्ने आहेत... उदाहरणार्थ...एखादे तरी ऑलिंपिक्स याची देही याची डोळा पाहावे(हे स्वप्न मात्र अॅट्लांटा ऑलिंपिक्सला पुर्ण झाले अहे!),तसेच विंबल्डनला जाउन एकतरी विंबल्डन फायनल पाहता यावी.. झालच तर लंडनला जाउन लॉर्ड्स वर जाउन टेस्ट मॅच बघावी.. आणी ऑगस्टा.. जॉर्जिया ला एकदा तरी फायनल राउंडमधे.. अझेलिया व र्होडेडेंड्रॉन फुलांच्या पार्श्वभुमीवर... टायगर वुड्सला गॉल्फची.. मास्टर्स टुर्नामेंट जिंकताना पाहायला मिळावी...इत्यादी इत्यादी.. हे पॅरीसला जाण्याचे स्वप्नही त्यातलेच एक! कशासाठी? तर रोलँड गॅरसच्या तांबड्या मातीवर फ्रेंच ओपन फायनल बघायला मिळावी म्हणुन!...तसे जरी मी तिथे प्रत्यक्ष गेलो नसलो तरी..१९७४ च्या ख्रिस एव्हर्ट -ओल्गा मॉरिझोव्हा मधील फायनल्स पासुन ते गतवर्षिच्या रॅफिएल नादाल्-रॉजर फेडररच्या फायनल पर्यंतच्या असंख्य लढती टिव्हिसमोर बसुन पाहताना मी रोलँड गॅरसशी एकरुप होउन गेलेलो आहे. त्या तांबड्या मातीशी व त्या सर्व खेळाडुंशी माझे घनिष्ट नाते आहे असेच मला वाटते...तसे वाटण्याचे कारणही माझ्याजवळ आहे... कारण त्या सगळ्या लढती बघत असताना मी ख्रिस एव्हर्ट, मार्टिना नवरातिलोव्हा,अरांचा सँकेज व्हिकारिओ,मॉनिका सेलेस्,स्टेफी ग्राफ,जस्टिन हेनन व झालच तर आपले बिऑर्न बोर्ग साहेब्,इव्हान लेंडल्,खुद्द जॉन मॅकेन्रो,मॅट्स विलँडर्,बोरिस बेकर,सर्जे ब्रुगेरा,गुस्टॉव्ह क्युरेटन्,रॅफिएल नादाल व नन अदर दॅन.. रॉजर फेडरर.. या सर्वांना.. .. न मागीतलेले.. मनातल्या मनात... कसे जिंकावे किंवा कसे हरु नये ... याबाबत फुकटचे सल्ले दिलेले आहेत!:)
तसे मला सगळेच खेळ प्रिय आहेत पण क्रिकेट,स्विमिंग व टेनिस हे माझे सगळ्यात आवडते खेळ.. मुंबईत जन्म झालेला असल्यामुळे व लहानपण सुनिल गावस्करच्या कारकिर्द्रित गेले असल्यामुळे क्रिकेटचे वेड अंगात भिनले नसते तरच नवल... पण टेनिस? माझ्या लहानपणी मुंबईत(एकंदरीत सर्व भारतातच) टेनिस तसे फारसे खेळले जात नसे. पण लहानपणचे कित्येक रविवार शिवाजी पार्कवर टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यात घालवले असल्यामुळे नाही म्हटले तरी शिवाजी पार्क जिमखान्यावर असलेल्या ४ टेनीस कोर्टवर.. उच्चभ्रु घरातल्या माणसांना व मुलांना.. पांढर्या शुभ्र अर्ध्या विजारी व टि शर्ट घालुन.. हातात टेनिसची रॅकेट घेउन खेळताना.. अलबत कोर्टला चारी बाजुने लावलेल्या झावळ्यांच्या मागुन लपुन लपुन... पाहीलेले मला आठवते. तसेच रेडिओवर प्रेमजित लाल, जयदिप मुखर्जी, विजय अमृतराज व आनंद अमृतराज यांच्या डेव्हिसकपच्या जॉन न्युकोंब व केन रोझवॉल सारख्या ऑस्ट्रेलियन टेनिसपटुंबरोबर होत असलेल्या सामन्यांचे धावते समालोचन सुद्धा ऐकलेले आठवते. त्या कुतुहलाचे मग ख्रिस एव्हर्ट्,जिमी कॉनर्स्,बोर्ग व मार्टिना नवरातिलोव्हा यांच्या टेनिसच्या जागतिक रंगमंचावरच्या आगमनाने प्रेमात कधी रुपांतर झाले ते मला कळलेच नाही..त्याच दरम्यान माझा मोठा भाउ १९७२ मधे अमेरिकेत गेला व तिथुन तो मला १९७३-७४ पासुन नियमित टेनिस व ऑलिंपिक्सच्या व्हिडिओ टेप्स पाठवु लागला.. मला वाटते व्हिडिओवर पाहिलेल्या त्या पहिल्या वहिल्या टेनिस मॅचेस सुद्धा मी टेनिसच्या प्रेमात पडण्यास जरुर कारणीभुत असाव्यात्.खासकरुन मला आठवते.. १९७४ मधली विंबल्डन फायनल..त्यात नव्या दमाच्या तरुण जिमी कॉनर्सने.. कुठलीही दयामाया न दाखवता.. आपल्या फ्लँबॉयंट खेळाने.. पिकल्या केसांच्या केन रोझवॉलला हरवले..हरवले कसले? धुव्वा उडवला त्याने रोझवॉलचा... व त्याच वर्षी फ्रेंच ओपनमधे एका तरुण ब्लाँड मुलीने माझे हृदय काबीज केले व माझ्या टेनिसप्रेमावर तिने रितसर शिक्कामोर्तब केले...रशियाच्या ओल्गा मोरोझोव्होला त्या वर्षी फ्रेंच ओपन मधे (व त्याच वर्षी नंतर विंबल्डन फायनललासुद्धा तिलाच!) हरवणारी १८ वर्षाची ती मुलगी होती.. ख्रिस एव्हर्ट! हिच मुलगी पुढे जाउन.. माझ्या मते तरी क्ले कोर्टची व रोलँड गॅरसची अनभिषिक्त सम्राज्ञी झाली...
तर मंडळी.. या वर्षीची रोलँड गॅरसवरची फ्रेंच ओपन स्पर्धा पुढच्या सोमवारी सुरु होत आहे. त्यानिमित्त हे लेखनपुष्प ख्रिस एव्हर्टच्या चरणी...
टेनिसच्या इतिहासात महिलांमधे जी नावे अजरामर झाली आहेत त्यात अग्रगण्य नाव घेण्याचा मान मी ख्रिस एव्हर्ट हिलाच देइन. मला माहीत आहे की कुठल्याही खेळात लेजेंडरी खेळाडुंमधे अग्रगण्य नाव कोणाचे घ्यायचे यात दुमत असु शकते. आता हेच पाहाना.. क्रिकेटमधे कोणाला ब्रॅडमनचा धावांचा पाउस
पाडायचे कौशल्य भाउन जाते तर कोणाला गार्फिल्ड सोबर्सचा अष्टपैलु खेळ आवडुन जातो तर अजुन कोणाला विव्ह रिचर्ड्सचा घणाघाती झंझावात मोहीत करतो तर कोणाला तेंडुलकर्-गावस्करची विक्रमी कारकिर्द्र तोंडात बोटे घालवणारी वाटते. टेनिसच्या बाबतीतही महिला खेळाडुंमधे कोणाला मार्टिना नवरातिलोव्हा,इव्हॉन गुलगाँग कॉलि ,बिली जिन किंग व विलिअम्स भगिनींचा वेगवान्,ताकदी व सर्व्ह अँड व्हॉलीचा खेळ आवडुन जातो तर कोणाच्या मते स्टेफी ग्राफचा सर्वांगीण खेळ तिला अग्रगण्य ठरवण्यास पुरेसा ठरतो.पण आज या लेखात ख्रिस एव्हर्टला मी तो मान का देत आहे याचा मी उहापोह करणार आहे.
वडिलांकडुन टेनिसचे जिन्स घेउनच ख्रिस एव्हर्ट जन्माला आली. तिचे वडिल एक उत्तम टेनिसपटु होते त्यामुळे लहानपणापासुनच तिला टेनिसचे बाळकडु मिळाले नसते तरच नवल होते. बघता बघता वडिलांच्या प्रशिक्षणाखाली तिने वयाच्या १५ व्या वर्षि प्रोफेशनल टेनिसपटु बनण्यापर्यंत मजल मारली व वयाच्या १७ व्या वर्षी १९७३ मधे तिने फ्रेंच ओपन व विंबल्डन फायनल्सस पर्यंत धडक मारली. त्या वर्षी त्या दोन्ही फायनल्समधे ती हरली .. पण कोणाकडुन? फ्रेंच ओपन मधे मार्गारेट कोर्टकडुन(जिने २४ ग्रँड स्लॅम सिंगल्स जिंकल्या आहेत) व विंबल्डनमधे बिलि जिन किंग कडुन...(जिने १२ ग्रँड स्लॅम्स जिंकल्या आहेत) . पण त्या वर्षी तिच्या या कामगिरीमुळे या चिमुरड्या मुलीने सगळ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधुन घेतले.
पुढच्या वर्षी.. १९७४ मधे मात्र तिने फ्रेंच ओपन व विंबल्डन या दोन्ही स्पर्धा जिंकुन आपल्या दिर्घ व यशस्वी कारकिर्द्रीची तोफ डागली. तिच्या १७ वर्षाच्या प्रदिर्घ कारकिर्द्रित तिने करुन ठेवलेल्या सगळ्या विक्रमांची जंत्री जर इथे मी दिली तर ३ पानेही पुरायची नाहीत.. किंबहुना या लेखामागचा उद्देशही तो नाही. पण तिच्या खेळातल्या सातत्याची जाणिव व्हावी म्हणुन तिच्या कारकिर्द्रितली काही निवडक आकडेवारी इथे नमुद करणे मला क्रमप्राप्त वाटते. आपल्या कारकिर्द्रित ती जवळ जवळ १४५० सामने खेळली व त्यातले १३०० च्या वर सामने.. म्हणजे ९० टक्के.. ती जिंकली. हा जिंकण्याच्या टक्केवारीचा विक्रम.. पुरुष व महिला.. या दोघातही अजुन अबाधित आहे. तसेच तिने एकुण २९० स्पर्धांमधे भाग घेतला होता व त्यातल्या १५७ मधे ति विजयी ठरली .. म्हणजे कुठलिही स्पर्धा ती जिंकण्याची शक्यता ५०% असायची. त्याहीपेक्षा अमेझिंग म्हणजे २९० पैकी २२५ स्पर्धात् ती उपांत्य फेरीत पोहोचली होती.. सातत्य म्हणजे काय याचे ती मुर्तिमंत उदाहरण होती. ग्रँड स्लॅम स्पर्धेतले तिचे विक्रम तर तोंडात बोटे घालण्यासारखेच आहेत.. तिने भाग घेतलेल्या ४९ ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी ४८ मधे ती कमीत कमी सेमि फायनल पर्यंत पोहोचली होती(फक्त १९८३ च्या विंबल्डनच्या क्वार्टर फायनलमधे फुड पॉइझनिंग झाल्यामुळे तिला सामना फोरफिट करावा लागला होता:() व ३४ मधे फायनल्समधे! त्यातल्या १८ ग्रँड स्लॅम फायनल्स तिने जिंकल्या व १६ मधे ती हरली. त्या हरलेल्या १६ पैकी १० ग्रँड फायनल्स ती एकट्या मार्टिना नवरातिलोव्हाकडुन हरली.. आणी क्ले कोर्टवरचा तिचा विक्रम ऐकाल तर चाटच व्हाल.. १९७३ पासुन १९८१ पर्यंतच्या ९ वर्षात ती क्ले कोर्टवर फक्त एकदाच हरली.. त्या दरम्यान तिचा क्ले कोर्टवरचा रेकॉर्ड होता...१९७-१! आता बोला..!
पण या आकडेवारीपेक्षा मला तिच्या खेळातली नजाकत व तिचे ते धिरोदात्त टेंपरमेंट खुप आवडायचे. फक्त ५ फुट ६ इंच व ५७ किलो वजन असलेल्या या नाजुक मुलीने मार्टिना नवरातिलोव्हा,इव्हॉन गुलगाँग व बिली जिन किंग सारख्या तगड्या व पॉवरफुल प्लेयर्सशी मुकाबला करता यावा म्हणुन डबल हँडेड बॅक हँडचा शॉट पर्फेक्ट केला होता. तसेच तिच्याइतके हलक्या हाताचे व अचुक ड्रॉप शॉट्स मी अजुन परत पाहीले नाहीत. विंबल्डन व खासकरुन फ्रेंच ओपन स्पर्धेत तिने तश्या ड्रॉप शॉट्सचा सढळ हस्ते उपयोग करुन मार्टिनाला व इतरांना.. नेट ते बेसलाइन व परत नेट.. असे मागेपुढे नाचवलेले... मी असंख्य वेळा पाहिले आहे.
तिच्या त्या अमेझिंग कारकिद्रित तिने बहुतेक सगळ्यांना पराभवाची धुळ चाखवली. फक्त इव्हॉन गुलगाँग व मार्टिना नवरातिलोव्हा.. या दोघींनीच काय ती तिला बर्यापैकी टक्कर दिली. एक मार्टिना सोडली तर बाकी सगळ्यांबरोबर तिचे विनिंग रेकॉर्ड आहे. तिच्यात व इव्हॉन गुलगाँग मधे विंबल्डन व यु एस ओपन मधे..मिड ७० मधे झालेल्या चुरशीच्या लढती माझ्याच काय पण असंख्य टेनिसप्रेमिंच्या कायमच्या लक्षात राहिल्या आहेत... पण ख्रिस एव्हर्ट बद्दल लिहीताना.. तिच्यात व मार्टिनामधे झालेल्या असंख्य लढतींबद्दल व त्यांच्यातल्या रायव्हलरीबद्दल लिहीले नाही तर ते रास्त होणार नाही... इट वॉज सिंपली अ प्लेजर्,हॉनर अँड फॅसिनेटिंग टु वॉच दिज टु लेजेंडरी टेनिस प्लेयर्स.. विथ टोटली काँट्रास्टिंग यट इक्वली कंपेलिंग स्टाइल्स... गोइंग अॅट इच अदर! या दोघी तब्बल १४ ग्रँड स्लॅम फायनल्समधे एकमेकांविरुद्धा खेळल्या. त्या प्रत्येक फायनल सामन्यांबद्दल एक एक स्वतंत्र पोस्ट होउ शकेल अश्या त्या अविस्मरणिय लढती होत्या...
तर मंडळी.. या वर्षीच्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या निमित्ताने.. व ख्रिस एव्हर्टला आदरांजली म्हणुनही...या दोन लेजेंडरी टेनिसपटुंमधे झालेल्या.. रोलँड गॅरसवरच्या.. तश्याच एका अविस्मरणिय अंतिम सामन्याच्या रजत जयंतिप्रित्यर्थ.. त्या अंतिम सामन्याबद्दल मी तुम्हाला माझ्या पुढच्या पोस्टमधे सांगणार आहे.. स्टे ट्युन्ड!:)
व्वा! मस्त
व्वा! मस्त सुरूवात. पुढच्या पोस्टची वाट पाहाते.
पण बॉस्टनला येऊन ग्रीन मॉन्स्टरचे दर्शन घ्यायचे स्वप्न तुझ्या लिस्टमध्ये नसल्याचे पाहून फार वाईट वाटले.
वा, वा
वा, वा मुकुंद, तुझे लिखाण यायला लागले का परत! छान
आता घरी जाऊन वाचते निवांत. कालच खेळाच्या धाग्यावर वाचले होते तुझा लिहायचा बेत आहे म्हणून.
मस्तच लिहिले आहेस! पुढील भाग लवकर लिही.
झक्कास!!! कं
झक्कास!!!
कंटाळवाणी सोमवार सकाळ ह्या पोस्टाने मस्त ताजीतवानी आणि सुखद झाली. आता दिवस कसा मस्त
जाईल!
मागच्या
मागच्या वर्षी मी इथे आलो तेंव्हा तुमचे 'ऑलिंपिकच्या गोष्टी' मुखपृष्ठावर होते. खूप आवडल्या होत्या त्या गोष्टी वाचायला (त्यावेळी प्रतिसाद द्यायलाही सुधरत नव्हते.त्यामुळे रहुन गेले)
अजुन येउदेत !
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
~ प्रकाश ~ GET CONNECTED
मुकुंद ,
मुकुंद , मस्त विषय . नेहमीप्रमाणेच हे लेख सुद्धा माहितीपूर्ण असतील ह्यात शंका नाही .
स्टेफी ग्राफच्या खेळण्याच्या स्टाईलवरसुद्धा एखादा लेख लिहा ना . पूर्वी लिहिला असल्यास मी वाचला नाहीये . स्टेफीच्या पहिल्या ग्रँडस्लॅम फायनलपासून नंतर तिच्या अनेक मॅचेस अगदी भक्तिभावाने बघत आलेय . तुमच्या अनेक स्वप्नांसारखेच माझे सुद्धा स्वप्न होते , जर्मनीत असे पर्यंत एकदा तरी स्टेफीला प्रत्यक्ष पाहता यावे. खेळ पाहायला मिळाला तर उत्तमच . ते स्वप्न पूर्ण झालेच आणि त्यात आणखी दोन खेळांडूंचा खेळ अनपेक्षितरीत्या पाहायला मिळाला . ते म्हणजे आंद्रे अगास्सी आणि गोरान इव्हानसेविच . अक्षरशः ५० मीटर अंतरावरून ह्या सगळ्यांना पाहिले . अविस्मरणीय अनुभवच म्हणावा लागेल .
मस्त
मस्त सुरुवात मुकुंद..
हे जग सोडुन जाण्यापुर्वी पुरी व्हावीत अशी माझी काही माफक स्वप्ने आहेत >> अगदी.. विंबल्डन, लॉर्डस्, MCG आणि इडन गार्डन्स ही माझी लिस्ट..
अत्यंत
अत्यंत आवडता विषय आणि सुरेख लिखाण.
ख्रिस एव्हर्ट आणि मार्टिना च्या लढती टि.व्ही. वर पाहिल्या आहेत. त्यावरच्या पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.
मस्तच आहे
मस्तच आहे हा लेख.. पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघ्तेय.. टेनीस पहिल्यादा पाहिलं ते ख्रिस एव्हर्ट आणि मार्टिना खेळ्ताना.. and ofcourse always love Kris..
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
छान लिहिले
छान लिहिले आहे, मुकुंद... पुढचे भाग वाचायला खरंच मजा येईल...
अरे वा
अरे वा मुकुंद परत लिहायला सुरुवात केलीत. सहीच आणि धन्यवाद सुद्धा. तुमच्या लिखाणाच्या मेजवानीची वाट बघतोय.
वाह... परत
वाह... परत मस्त लेखमाला सुरू होणार म्हणजे! ख्रिस एव्हर्टचे नुसतेच नाव ऐकले आहे.. खेळ व्हीडीओवरही पाहीला नाहीये.. आता उत्सुकता निर्माण झाली .. शोधून बघेन..
www.bhagyashree.co.cc
मुकुंद
मुकुंद तुला टेनिस वाल्यांनी किंवा ईसपीएन वाल्यांनी कमिशन द्यायला पाहिजे. उठून या मॅचेस बघायला लावणारे लेखन आहे हे!
ख्रिस एव्हर्ट ("लॉईड" नंतर आला का नावात तिच्या?) व मार्टिना ची बहुधा विम्बल्डन मधली मॅच पाहिलेली आठवत आहे. का कोणास ठाऊक पण बघणार्या प्रत्येकाला तिलाच पाठिंबा द्यावासा वाटेल अशी स्टाईल होती तिची. या मॅचेस बद्दल वाचायला आवडेल.
सह्हीच!!
सह्हीच!! मुकुंद आता स्टेफी, आंद्रे, नदाल, मोनिका, मेरी, मार्टिना (दोन्ही) आणि रॉजर ह्यांच्या वरही लिहाच. अन् एखाद चित्र नाही का टाकता येणार?
*********************
आपण प्रेमात पडतो म्हणजे नक्की कुठे पडतो?
खुपच छान
खुपच छान लिहले आहे!
स्टेफी,मोनिका, मेरी, मार्टिना बद्दल पण वाचायला आवडेल!!
व्वा मस्त
व्वा मस्त मुंकुंद, खुप छान लिहीले आहेत. मी मार्टिनाचा (नवरातिलोवा) पंखा आहे, पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ख्रिसच्या खेळातली नजाकत कुठल्याच टेनिसपटुमध्ये नव्हती .धन्स... आता त्या तुम्ही आश्वासन दिलेल्या पुढील पोस्टची आतुरतेने वाट पाहातो आहे.
तुमच्या
तुमच्या शब्दाशब्दातून खेळावरचे प्रेम जाणवते. लिहीत रहा.
आम्ही वाचतोय.
मस्त आहे
मस्त आहे
>> पण या
>> पण या आकडेवारीपेक्षा मला तिच्या खेळातली नजाकत व तिचे ते धिरोदात्त टेंपरमेंट खुप आवडायचे
काय योग्य बोललात मुकुंद.
मी नऊ - दहा वर्षांचा असताना पाहिलेल्या त्या दोघींच्या लढती मनात घर करून राहिल्या आहेत.
निव्वळ आकडेवारी मार्टिना सरस ठरेल पण खरी राणी ख्रिस एव्हर्ट लॉईड.
जसं निव्वळ आकडेवारीमधे एलन बॉर्डर सरस असला तरी देखणी होती ती डेव्हिडी गावरची फलंदाजी
अश्विनि...
अश्विनि... अग ते इत्यादि इत्यादि वाचले नाहीस का माझ्या यादीमधे?
अमोल.
सगळ्यांचे अभिप्रायाबद्दल धन्यवाद.. उद्यापासुन सुरु होणारी फ्रेंच ओपन स्पर्धा टेनिस चॅनलवर हाय डेफिनेशनवर बघायला विसरु नका.. लाल मातीचा कण न कण दिसतो हाय डेफ टिव्हीवर.. फेडररने नादालला क्ले कोर्टवर गेल्या रविवारी हरवुन रोलँड गॅरसच्या फायनलमधे त्या दोघांमधे होउ शकणार्या ऑल आउट वॉरची तोफ डागली आहे... होप त्या दोघांमधली अजुन एक अविस्मरणिय फायनल टेनिसप्रेमींना बघायला मिळेल..
संदिप.. गॉवरबाबत सहमत.. बॉर्डर माझ्या मते सगळ्यात कंटाळवाणा डावखुरा फलंदाज होता.. पण मी पाहिलेल्या डावखुर्या फलंदाजात मला वेस्ट इंडिजचा आल्विन कालिचरण खुप आवडायचा.