मका - पुदिना राईस

Submitted by स्वरमुग्धा on 21 December, 2012 - 01:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मसाले भात आणि पुलावाला कंटाळून मी हा भाताचा नवीन प्रकार आईकडून शिकले.
साधारण दोन जणांसाठी -
मक्याचे दाणे ( अमेरीकनच पाहिजेत असं काही नाही, भारतीय पण चालतात. ) - १ वाटी
आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर - सगळं अंदजानुसार
पुदिन्याची ताजी पानं
शिजवलेला बासमती तांदळाचा भात - ( तयार भात २ १/२ वाट्या )
जिरं
मीठ - चवीनुसार
बटर किंवा तेल

क्रमवार पाककृती: 

मक्याचे दाणे वाफवून घ्यावेत. फार मऊ करु नयेत. आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर आणि पुदिना एकत्र वाटून घ्यावं.

कढईत थोडं बटर / तेल गरम कराव. जिरं घालावं. ते तडतडलं की शिजलेला भात घालून आपण जिरा राईसला जसं परततो तसं परतावं. नंतर पुदिन्याचं वाटण घालावं आणि पुन्हा परतावं. हे वाटण भाताला वरूनच घालावं. फोडणीत घातलं तर कढईला खाली लागायची शक्यता आहे. शिवाय आपल्या आवडीनुसार ते कमी / जास्त तिखट करता येतं. सगळ्यात शेवटी मक्याचे दाणे घालावेत आणि भात परतावा.

माझा बटर वर फार जीव आहे. त्यामुळे मी भात तयार झल्यावर मधे मधे थोडं बटर घालते आणि वरती झाकण ठेवते. भाताची वाफ आतच रहाते आणि त्याला चकाकी पण येते.

कमी वेळात एकदम वेगळ्या चवीचा भाताचा प्रकार होतो.

वाढणी/प्रमाण: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगेश... अहो फोटोचं पार विसरले मी.

प्रसाद... "कधीही ये जेवायला!" ( असं म्हणण्याइतपत धीट झालीये आता मी. )

अगं आई मला जमेल अशाच रेसिपी सांगते. माझ्यापे़क्षा जावयची फार काळजी अहे तिला. स्मित

एकदम जमणेबल आहे. बिनधास्त कर.

मी करुन बघितला. पट्कन होणारी मस्त रेसिपी आहे. माझ्या बागेतल्या पुदिनाचा चटणी व पापुचं पाणी यापेक्षा वेगळा उपयोग झाला. आभार्स!