कॅप्टन लक्ष्मी सेहगल

Submitted by विजय आंग्रे on 24 July, 2012 - 01:01

23_lakshmi_sehga_1153311g_0.jpg

डॉक्टर लक्ष्मी सेहगल यांचा जन्म १९१४ साली एका परंपरावादी तामीळ परिवारात झाला. लहानपणापासूनच राष्ट्रीय आंदोलनांनी त्या प्रभावित होत असत. महात्मा गांधी यांनी विदेशी वस्तूंच्या बहिष्कार करणारे आंदोलन केले तेव्हा लक्ष्मी सेहगल त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. देशसेवेची आवड असणार्‍या सेहगल यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी मेडिकल विषयात शिक्षण घेऊन त्या डॉक्टर झाल्या.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील राणी झाशी रेजिमेंटच्या प्रमुख कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतीत केलं. स्वातंत्र्यसमरात आणि नंतर समाजकारणात मोठे योगदान देणार्‍या या कर्तृत्वशाली वीरांगनेने जगासमोर स्वत: चा आदर्श निर्माण केला.

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी जपानी सेनानी सिंगापूरमध्ये ब्रिटिश सैन्यावर हल्ला केला तेव्हा लक्ष्मी सेहगल सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये सहभागी झाल्या. १९४३ साली आझाद हिंद सरकारच्या कॅबिनेटमध्ये पहिली महिला सदस्या होण्याचा मान त्यांनी पटकाविला. आझाद हिंद सेनेच्या राणी झाशी रेजिमेंटमध्ये लक्ष्मी सेहगल या नेहमीच सक्रिय राहिल्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना कर्नल हे पद देण्यात आले.

l1.jpg

१९४५ साली आजाद हिंदच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत इंफाळ सीमेकडून माघार घेताना त्यांना इंग्रजांनी कैद केले व हिंदुस्थानात आणले. १९४६ च्या सुप्रसिद्ध 'सेहगल, धिल्लाँ, शाहनवाज म्हणजेच आजाद हिंद विरुद्ध ईंग्रज सरकार या लाल किल्ला अभियोगात त्या मुक्त झाल्या. मार्च १९४७ मध्ये त्या कॅप्टन प्रेम सेहगल यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी समाजसेवेला वाहुन घेतले. त्यांना १९९८ मध्ये पद्मविभूषण या सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले होते.

आझाद हिंद सेनेतील पहिल्या महिला रेजिमेंटच्या प्रमुख कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचे काल सोमवारी हृदयविकाराने निधन झाले. वयाच्या ९७ वर्षीही महिलांच्या प्रश्नांवर झगडणाऱ्या झुंजार सेहगल यांच्या देहदानाच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव 'गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल कॉलेज'ला सुपूर्द करण्यात येणार आहे.

कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांना विनम्र श्रध्दांजली.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
*सर्व प्रकाशचित्रे आंतरजालवरुन साभार.

गुलमोहर: 

सुभाषचंद्र बोस यांच्यावर लिखीत पुस्तक वाचताना कॅप्टन लक्ष्मी सेहगल या कर्तुत्वशालीनीबद्द्ल माहीती मिळाली होती. त्यांना विनम्र श्रद्धांजली.........

छान

जग पाहण्याचे लाभले भाग्य!
कॅ. लक्ष्मी यांच्या नेत्रदानाने दोघांना दृष्टी
कानपूर। दि. ३१ (वृत्तसंस्था)
स्वातंत्र्यलढय़ातील रणरागिणी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील अधिकारी कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी दान केलेल्या डोळ्यांनी दोन नेत्रहिनांच्या आयुष्यात प्रकाश आणला आहे. कालपर्यंतचा आयुष्यातील काळोख दूर सारत त्या दोघीही आता हे सुंदर जग बघत आहेत.
स्वातंत्र्याचा लढा ज्या डोळ्यांनी प्रत्यक्षात बघितला, त्याच डोळ्यांनी बबली आणि रामप्यारी या दोघींना हे सुंदर जग बघण्याचे भाग्य लाभले आहे. कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे २३ जुलैला निधन झाले होते. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार, त्यांच्या डोळ्यांची बुबुळे काढून ती नेत्र विशेषज्ञ डॉ. महमूद रहमानी यांनी १५ वर्षांची बबली आणि ५५ वर्षांच्या रामप्यारी नामक महिलेच्या डोळ्यांत प्रत्यारोपित केली. लक्ष्मी सहगल यांचे पार्थिव त्यांच्या इच्छेनुसार अनुरूप वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आले होते. बुबुळांच्या प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे सात हजार नेत्रहिनांची यादी आपणाकडे असल्याचे ते म्हणाले. डॉ. रहमानी म्हणाले, सहगल यांचे निधन होताच त्यांच्या कन्या सुभाषिनी अली यांनी आपणास बोलावून कॅप्टन सहगल यांची अंतिम इच्छा पूर्ण करण्याबाबत सुचविले. त्यानुसार त्यांच्या डोळ्यांची बुबुळे सुरक्षित काढली. त्यानंतर नेत्ररुग्णांच्या प्रतीक्षा यादीनुसार, हरदोईच्या सांडी क्षेत्रात राहणार्‍या गुड्ड नामक दूध विक्रेत्याला दूरध्वनी करून त्याची १५ मुलगी बबली हिच्यासह ताबडतोब कानपूरला येण्याचा निरोप दिला. कानपूर येथील रामप्यारी या महिलेलाही असाच निरोप दिला. नेत्र प्रत्यारोपणानंतर काल सायंकाळी बबली आणि रामप्यारी यांच्या डोळ्यांवरील पट्टी सोडली, तो त्या दोघींसाठी आयुष्यातील आनंदाचा सर्वोच्च क्षण ठरला. कारण, त्याच क्षणी त्यांनी कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या डोळ्यांनी हे जग बघितले. दोघींच्याही डोळ्यांना नेत्रज्योती लाभल्याने त्या आणि त्यांचे कुटुंबीय अतिशय आनंदी होते. तीन दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून सुटी मिळणार असल्याची माहिती डॉ. रहमानी यांनी दिली.

(लोकमत.कॉम वरून साभार)