तू...मेघ पावसाचा! मी....चातकाप्रमाणे!

Submitted by सतीश देवपूरकर on 8 July, 2012 - 05:18

रसिक मित्रमैत्रिणिंनो!
आज लिहिलेली, ताजी, पहिल्या वाफेची गझल आपणांस सुपूर्त करतो आहे! पहा कशी वाटते ती......
प्रथम एक माझा खूप जुना शेर मूड लागला म्हणून देत आहे..........
एक केली चूक अन् आयुष्य इतके फाटले......
की, पुन्हा हातून माझ्या ते न गेले टाचले!
...........प्रा.सतीश देवपूरकर
...................................................................
गझल
तू...मेघ पावसाचा! मी....चातकाप्रमाणे!
क्षण एक एक जगलो, एका युगाप्रमाणे!!

जगलो प्रसन्नतेने ठरवून मी परंतू;
कुठलीच गोष्ट नाही घडली मनाप्रमाणे!

मी चाळिशीत होतो; साठीत वाटलो मी!
मज पाहिले न कोणी माझ्या वयाप्रमाणे!!

वारा वहात होता.....तिकडेच जात होतो!
केला प्रवास सारा, मी गलबताप्रमाणे!!

आई, वडील, मुलगे....बोलायचीच नाती!
माझ्या घरामधेही, मी पाहुण्याप्रमाणे!!

सांभाळण्यात मर्जी हा जन्म खर्च झाला.....
होती हयात माझी, जगलो जगाप्रमाणे!

मुलगीच फक्त नाही....ही खाप काळजाची!
सांभाळ यापुढे तू तिजला फुलाप्रमाणे!!

होतो हिरा परंतू, खडतर नशीब होते!
त्यांनी मला निवडले एका खड्याप्रमाणे!!

माझ्यावरीच खेळे; जग, खेळ भाकरीचा!
मी वाटतो जगाला....निश्चल तळ्याप्रमाणे!!

त्यांनी मला बसवले खुर्चीत खूप मोठ्या!
ते वापरीत होते मजला टिळ्याप्रमाणे!!

------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

वारा वहात होता.....तिकडेच जात होतो!
केला प्रवास सारा, मी गलबताप्रमाणे!!

आई, वडील, मुलगे....बोलायचीच नाती!
माझ्या घरामधेही, मी पाहुण्याप्रमाणे!!

हे दोन शेर आवडले. त्यांवरून जगजीत सिंह ह्यांनी गायलेल्या 'अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं..' ह्या गझलेची आठवण झाली.
बाकी गझल विशेष वाटली नाही

सर,...गझल अतिशय आवडली. भन्नाट आहे. वाचुन वाटले गझल असावी तर अशी.
आपला जुना शेर तर अफलातून आहे. त्याची पुर्ण गझल आहे काय?

.....कळावे.

...............................ऑर्फिअस.

चाळा जगास होता पाषाण मारण्याचा ???? म्हणजे नेमके काय

तुम्ही खड्यासाठी पाषाण शब्द वापरला असेल तर मोठी आश्चर्याची बाब ठरेल.

आनंद घेत माझा ते मारती खडे ही
उठती तरंग माझे हतबल तळ्याप्रमाणे... असा पर्याय सुचला आहे

खालची ओळ जशीच्या तशीही ठेवता आली असती मात्र खडा मारल्यास तळे ठरवूनही शांत राहू शकत नाही असे माझे मत आहे..

..... बरेच सानी मिसरे मस्त आहेत. .

गझल नेहमीप्रमाणेच उत्तम आहे
शामजींनी सुचवलेला पर्यायी शेर मूळ शेरापेक्षा जास्त उजवा आहे (...... 'उंची'नेही जास्त आहे )

शामजी! अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
“पाषाण” शब्द मलाही स्वत:ला खटकला होता.
पण कंटाळा केल्याने, घाईत तो तसाच शेरात राहिला.
आपला पर्यायी शेर छान आहे, मला आवडला.
पण मला जास्त भर.........मी स्तब्ध/शांत/स्थिर/निश्चल तळ्यातील पाण्यासारखा असतो/वाटतो, यावर द्यायचा होता.
शिवाय, “हतबल तळ्याप्रमाणे” मला तितकेसे भावले नाही!
सबब, मी संपूर्ण शेर बदलून नवा शेर दिला आहे.
कृपया आपला अभिप्राय कळवावा...........
माझा नवीन शेर खालील प्रमाणे.....पहा उमगतो व भावतो का ते......

“माझ्यावरीच खेळे; जग, खेळ भाकरीचा!
मी वाटतो जगाला....निश्चल तळ्याप्रमाणे!!”
>...........प्रा.सतीश देवपूरकर