माबो ज्युनिअर शेफ्स १ - 'जस्ट स्टर अँड बेक चॉकलेट केक' (फोटोसहित)

Submitted by लाजो on 2 July, 2012 - 22:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

'माबो ज्युनिअर शेफ्स'

मायबोलीवरच्या बच्चेकंपनींचा पाककलेचा उत्साह बघुन त्यांच्यासाठी पाककृती लिहाव्यात असा विचार मनात आला. तुम्हाला आवडले तर ५-१४ वर्षाच्या मुलामुलींसाठी काहि सोप्या, आई/बाबांच्या मार्गदर्शनाखाली करता येण्याजोग्या पाककृती या सिरीजमधे द्यायचा विचार आहे.

तर मग बच्चेलोक्स, करायची सुरुवात?

पहिला नंबर अर्थातच तुमच्या आवडत्या 'चॉकलेट केक' चा Happy

choc04.JPG'जस्ट स्टर अँड बेक चॉकलेट केक'

लागणारे जिन्नस:

१ कप मैदा / कणिक / सेल्फ रेझिंग फ्लार
१ टीस्पून बेकिंग पावडर (से रे फ्लार वापरणार असाल तर बेपाची गरज नाही)
अगदी छोटी चिमुट बेकिंग सोडा (फक्त जर कणिक वापरणार असाल तर)
१/२ कप साखर (** टीप नं २ पहा)
२ अंडी
१/२ कप दूध
१/३ कप + १ टबलस्पून पातळ बटर / मार्गरीन
१/२ कप मायलो / बोर्नव्हिटा किंवा २ टीस्प्पुन कोको पावडर
व्हॅनिला / बटरस्कॉच इसेन्स (ऐच्छिक आणि आवडीप्रमणे)
सजावटीसाठी चॉकलेट सॉस, मेल्टेड चॉकलेट, आयसिंग, व्हिप्ड क्रिम, स्प्रिंकल्स इ इ पैकी जे आवडेल ते Happy

क्रमवार पाककृती: 

सुरुवात करण्याआधी काही साध्याच पण महत्वाच्या गोष्टी:

स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यापूर्वी आणि करताना ज्युनिअर शेफ्सनी घ्यायची काळजी:

१. हात स्वच्छ साबण लावुन धुवुन घावेत.
२. केस नीट बाधुंन घ्यावेत.
३. साधे, अंगासरशी कॉटनचे कपडे घालावेत.
४. सूरी, कात्री, किसणी इ इ धारधार वस्तु वापरताना आई बाबांची मदत घ्यावी. बाजारात कमी धार असलेल्या मुलांना वापरता येण्याजोग्या सुर्‍या/कात्र्या मिळतात त्या वापराव्यात.
५. कुकटॉप वरुन भांडे उतरवताना/ ओव्हनमधुन केक काढताना/ मायक्रोवेव्ह मधुन बोल काढताना आई/बाबाची मदत घ्यावी.
६. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन - अर्धे लक्ष इथे अर्धे टीव्ही वर चालु असलेल्या कार्यक्रमात असे नको - अ‍ॅक्सिडंट्स होण्याची शक्यता जास्त.
७. आई/बाबांना आपल्यापेक्षा थोडे जास्त कळते आणि जास्त अनुभव आहे तेव्हा त्यांचे ऐकावे Happy

स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यापूर्वी आणि करताना ज्युनिअर शेफ्सच्या मोठ्या असिस्टंट्सनी (अर्थात आई/बाबांनी) घ्यायची काळजी:

१. मुलं स्वयंपाकप्रयोगात बिझी असताना त्यांना स्वयंपाकघरात अजिबात एकटे सोडु नका...

स्वत: आपल्या हाताने केलेला पदार्थ खाण्यात आणि खिलवण्यात आगळीच मजा आहे तेव्हा यंग शेफ्स, बी अलर्ट, बी सेफ आणि एंजॉय!!! हॅप्पी कुकिंग Happy

--------------------

choc06.JPGक्रमवार पाककृती:

१. सर्वप्रथम आपल्या असिस्टंटला ओव्हन १८० डिग्री सेंटीग्रेडला तापत ठेवायला सांगा. तोपर्य्म्त तुम्ही केक टीन ला बटर / ऑइलस्प्रे लावुन त्यावर थोडा मैदा / कणिक भुरभुरुन टीन तयार ठेवा.

२. आता एका मोठ्या भांड्यात मैदा/ कणिक/ सेरे फ्लार + बेपा/बेसो + साखर + मायलो/कोको एकत्र करा. हलक्या हाताने नीट मिक्स करुन घ्या. गुठळ्या अजिबात रहायला नकोत.

३. या कोरड्या मिश्रणात एका वेळेस एक अशी २ अंडी फोडुन घाला. त्यात दूध आणि पातळ केलेले बटर घाला. कुठला एसेन्स घालणार असाल तर तो ही घाला. आता हे मिश्रण लाकडी चमच्याने/स्पॅट्युलाने नीट एकत्र करा. हवे तर असिस्टंटची मदत घ्या.

४. हे मिश्रण आता तयार केलेल्या केक टीन मधे ओता. केक टीन हलकेच एक दोन वेळा ओट्यावर आपटा म्हणजे मिश्रण सगळीकडे नीट पसरेल.

५. आता हा टीन गरम ओव्हनमधे ठेवायला असिस्टंटची मदत घ्या.

६. २०-२५ मिनीटात केक तयार होइल केक तयार होईपर्यंतच्या मधल्यावेळात ओट्यावरचा पसारा आवरा. (वेळ उरला तर एक कार्टुन बघा / मित्रमैत्रिणीशी एक फोन कॉल करुन घ्या Wink ). केक तयार आहे का हे चेक करायला आणि झाला असेल तर बाहेर काढुन ठेवायला असिस्टंटची मदत घ्या.

७. तयार केक जाळीवर काढुन ठेवा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या.

choc02.JPG

८. थंड केकवर आपल्या आवडीपनुसार चॉकलेट आयसिंग / सॉस / स्प्रिंकल इ इ लावुन डेकोरेट करा आणि असा मस्त तुम्ही स्वत: बनवलेला केक गट्टम करा. तुमच्या असिस्टंटला त्याच्या मदतीच्या मोबदल्यात केकचा एखादा तुकडा द्यायला विसरू नका हां Happy

choc03.JPG

हा आमचा मि. चॉकीवॉकी Happy

choc08.JPG

आणि हे बाबासाठी चॉकहार्ट Happy

choc07.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल तेव्हढा :)
अधिक टिपा: 

लेकीला कुकिंगमधे इंटरेस्ट निर्माण करणे ह्या उद्देशाने केलेले हा पहिला प्रयोग, तिच्या आवडीचा चॉकलेट केक - अल्टिमेटली तिला वेगवेगळे पदार्थ खाण्यात इंटरेस्ट निर्माण करणे हा खरा उद्देश Wink

१. हा केक करायला अगदी सोपा पण तितकाच खायला यम्मी आहे. यात कुठलेही इलेक्ट्रिकल उपकरण, सुर्‍या/कात्र्या वापरल्या नसल्यामुळे अगदी ५-७ वर्षाच्या मुलांना देखिल अई/बाबांच्या कमीतकमी मार्गदर्शन आणि मदतीने हा केक करता येण्यासारखा आहे Happy

२**. साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमीअधिक करु शकता. मी मायलो वापरले आहे म्हणुन साखर कमी घातली आहे. कोको वापरल्यास साखर थोडी जास्त लागेल.

३. मी पहिल्यांदा हा केक प्रयोग म्हणून बनवला तेव्हा मैदा + कोको वापरला होता. या वेळेस कणिक + ब्राऊन शुगर + मायलो वापरले आहे.

४. आवडत असेल तर यात सुकामेवा / नट्स घालु शकता. मी चॉकचिप्स घातल्या आहेत.

choc05.JPG

५. हा केक मधे आडवा कापुन त्यात आयसिंग घालुन सँडविच केक बनवता येइल. फ्रेश स्ट्रॉबेरीज आणि व्हिप्ड क्रिम देखिल मस्तच लागेल Happy

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल ! ए तू माझ्या लहानपणी ही पाककृती का टाकली नाहीस गं ? Happy कित्ती छान अन सोपं लिहिलयस तू ! शाब्बास लाजो Happy
मुलांसाठी आणि पालकांसाठीच्या सूचनाही बेस्ट !

लाजो,नेहमीप्रमाणे लाजवाब आहेस तू!!!!! केक पेक्षा त्याखाली लिहीलेल्या सर्वात उपयुक्त टिपा खुपच विचारपूर्वक आणि सगळ्या बाबींचा समावेश करणार्‍या आहेत.त्याबद्दल तुझे कौतुक!!!!!!

मस्त आहे रेसीपी लाजो. मुलीला दाखवते.
शक्य असेल तर मुलाना करण्यासारख्या रेसीपीज असा वेगळा धागा काढ. टिप्स पण लिही तिथे.

धन्स लोक्स Happy

फोटो खास आले नाहियेत. बाहेर अंधारुन आलेल रिपरिप पाऊस, प्रचंड गारठा अश्या मरगळलेल्या रविवारच्या दुपारी मुलीचा कंटाळा पळवायला हा केक केला आणि त्यामुळे सगळेच फोटो आर्टिफिशीयल लाईटमधे काढलेले आहेत.

@ सीमा,

धागा काढला Happy धन्स गं Happy

फोटो मस्त!
लिहायची स्टाईल तर आणखीनच मस्त.
आता हे सगळे पदार्थ आमच्या गावात मिळतील का कुणास ठाऊक?

पातळ बटर ऐवजी घरचे लोणी / तूप वापरलेले चालेल का
की केकच्या टेक्षरमध्ये काही फरक पडेल?

आणि एक प्रश्न- ते सजावटीसाठी वापरलेले मोती साखरेचे आहेत का ?विकत मिळतात का?

ग्रटच गं................मस्त आहे हा केक, मी पन ट्राय करते लेकाबरोबर आयुष्यातला घरी बनवलेला पहिला केक................. Proud

कस्लं सही न यम्मी!! Happy लाजो, तुमच्या सगळ्याच रेसिपीज एकदम मस्त असतात.. फारच कल्पक आणि आकर्षक!! मी माझ्या मुलाबरोबर, आदित्यबरोबर, आता हे नक्किच करुन पाहणार. खूप धन्यवाद! Happy

लाजो तुझे शतशः धन्यवाद. माझी मुलगी सध्या स्वयंपाकघरात रुची दाखवते आहे. त्यातही केक वैगरे करण्यातच. त्यात मला का ही ही गती नाही किंवा मैदा असे बघितले की माझा त्या कृतीतला इंटरेस्ट संपतो. तुझ्या बाकीच्या पण रेसीपी बघितल्या. प्रत्येक शनिवारी/रविवारी काहीतरी करुन बघण्याचा विचार आहे Happy

जमल्यास बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ह्यातला फरक सांगशील का?

आज हा केक करायला घेतला. मैदा+बे.पावडर्+मायलो+बटर्+दूध्+साखर सगळे एकत्र करून झाले. मग अंडी काढायला फ्रिज उघडला आणि लक्षात आले की घरात अंडीच नाहीयेत. Proud मग १८० डि. से. ला प्रिहीट केलेल्या ओव्ह्न मधे तसेच मिश्रण ठेवले. २० मि. झाली तरी मिश्रण तसेच लिक्विड होते. मग ओव्ह्नचे टेंप. ३२५ वर ठेवले. अजून २० मि. नी मस्त केक तयार झाला. Happy