सुवर्ण आवरणात झाकलेल सत्य

Submitted by विवेक पटाईत on 29 June, 2012 - 08:40

हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं l
तत त्वं पुषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये l
[ईशोपानिषद (मंत्र १५) ]

शाब्दिक अर्थ :

सोनेरी तेजाने (आवरणाने) सत्याचे मुख झाकलेले आहे. हे पूषण (पालनकर्ता) कृपया सोनेरी आवरण दूर करा सत्य रुपी धर्म पाहण्या करिता.

सूर्योदयाच्या वेळी सोनेरी रंगाचा सूर्य आपण नेहमीच पाहतो. आज सकाळी बगीच्यात फिरायला गेलो होतो. सूर्योदयाची वेळ होती, बागीच्यातल्या कुर्सीवर बसून पूर्व दिशेला सोनेरी रंगात रंगलेल्या सूर्य नारायणाला पहात होतो, दहा-पंधरा वर्षांपूर्वी वाचनात आलेला ईशोपनिषदातला हा मंत्र आठवला. मनात विचार आला, सूर्याला आपण क्षणभर ही पाहू शकत नाही. हा मंत्रदृष्टा ऋषी तर चक्क सोनेरी आवरण दूर करण्याची विनिती देवाला करीत आहे, सत्यरूपी तळपळणारा सूर्य पाहण्यासाठी. सत्यमार्गावर चालणारा हा मंत्रदृष्टा ऋषी सूर्याचे तेज सहन करू शकत होता.

सत्य हे नेहमीच सुवर्ण आवरणाखाली दडलेल असत. मोह, माया, ममता लालसा, स्वार्थ इत्यादी अनेक गोष्टी सत्याचा आड नेहमीच येतात. या सुवर्णाच्या लोभापायी लोक खऱ्याच खोट करतात किंवा सत्याचा पक्ष घ्यायला घाबरतात. राजा हरिश्चंद्राचे आपण गुण गातो पण हरिश्चंद्र बनण्याची कुणाचीही इच्छा नसते.

भर दरबारात द्रोपदीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न सुरु होता. द्रोपदी न्याय मागित होती. धर्माचे जाणकार भीष्म पितामह एवम् इतर मंत्री व दरबारी शांत बसून होते किंवा दुर्योधनाला रुचणारी धर्माची व्याख्या करण्यात मग्न होते. (मिळणारा पगार, दरबारातले स्थान, विरोध करण्याचा परिणाम व आपल्याला काय करायचे आहे, त्यांनी जुगार खेळला, भोगू द्या त्यांना त्यांच्या कर्मांची फळे). राजा ही आंधळा होता, गांधारीने चक्क डोळ्यांवरती पट्टी बांधलेली होती. (राजसुखाची लालसा आणि पुत्र मोहामुळे सत्य आणि न्याय मार्गापासून दूर अशा राजा साठीच ‘आंधळा’ हे बिरूद कदाचित व्यासांनी धृतराष्ट्रासाठी वापरले असेल आणि पत्नीतर पतीची अनुगामिनी असतेच) जिथे भर दरबारात कुलवधूचे वस्त्र हरण होत असेल त्या राज्यात सामान्य जनतेवर काय आत्याचार होत असतील त्याची कल्पना करणे शक्य नाही. त्या काळी स्त्रीयांच अपहरण आणि जबरन विवाह तर क्षत्रिय राजांसाठी सामान्य बाब होती. प्रजाही प्रारब्ध मानून असले अत्याचार निमुटपणे सहन करीत होती. परिणाम, महाभारताचे युद्ध झाले, कित्येक अक्षोहिणी सैन्य रणांगणात ठार झाले. हस्तिनापूरचे राज्य धुळीस मिळाले. प्रजाजानाना ही त्याचे परिणाम भोगावे लागले. युद्धानंतरच्या भीषण वास्तव्याचे महाभारतात जे चित्रण आहे ते दुसऱ्या कुठल्याही ग्रंथात सापडणार नाही. (ब्राह्मस्त्राच्या प्रभावामुळे दुष्काळ, अतिवृष्टी विकृत प्राणी आणि संततीचे जन्म इत्यादी). जर त्याच वेळी भीष्मपितामह आणि राजा धृतराष्ट्राने पुत्र मोह आवरून सत्य आणि धर्मानुसार निर्णय घेतला असता तर महाभारत घडले नसते. असो.

आज आपण काय पाहतो. जन्म प्रमाणपत्र, जातप्रमाण पत्र, शाळा, कॉलेज मध्ये अडमिशन, नौकरीसाठी लोकांना ‘सुवर्ण’ मोजावे लागतात. व्यापार धंद्या साठी ही नेता आणि दरबार्याना खुश करावे लागते. न्याय दरबारी तर परिस्थिती आणखीनच विचित्र. १० रुपये रिश्वत घेणाऱ्या चपरासी जेल मध्ये जातो आणि करोडों बुडविणार्याना जेल नव्हे तर सरकार दरबारात मान मिळतो. ही वस्तुस्थिती.

देशाला चालविणारे सरकारी अधिकाऱ्यांना ही त्यांना मिळणारे प्रमोशन, सरकारी नौकरीतून निवृत्तीनंतर मिळणारे ‘बक्षिस’ यातच रस असतो. शिवाय वाहत्या गंगेत हात धुवण्याचा मौका ते का सोडणार. त्या मुळे सर्वकाही जाणूनही ते मूक राहतात, न्यायपूर्ण व जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला घाबरतात. आज देशाची परिस्थिती महाभारत काळासाराखीच आहे. परिणाम काय होणार हे जाणून ही सर्व चूप बसलेले आहे. कारण सत्य रूपी सूर्याचे तेज पाहण्याची हिम्मत कुणा मध्ये ही नाही. मनात विचारांचे काहूर माजलेले होते. सूर्याचे उन आता बोचू लागले होते. वर आकाशाकडे लक्ष गेल सोनेरी आवरण दूर झालेले होते सूर्याला क्षणभर पाहणे ही आता शक्य नव्हते. मला माझेच हसू आले. सूर्य उजेडापासून दूर सुरक्षित व थंड अश्या सुरक्षित घराच्या दिशेने चालू लागलो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: