(आमच्या बालपणीच्या पोहोण्याच्या आठवणींवरचा एक लेख २००८ साली मी लिहिला होता. ही त्याची लिंक. )
http://www.maayboli.com/node/1759
----------------------------------------------------------------------------------
लेडिज टाईम
काही अपरिहार्य कारणांनी संध्याकाळचा ब्रिस्क वॉक मला काही काळापुरता तरी बंद करावा लागला. म्हणून इथल्या उन्हाळ्याचा फ़ायदा घेऊन मध्यंतरी काही वर्षं बंद पडलेलं पोहोणं परत चालू केलं. त्यातही घराजवळचा नगरपालिकेचा पूल मॅनेजमेंट बदलल्याने पहिल्यापेक्षा जरा बराच ऊर्जितावस्थेत आल्याचं समजल्याने, नेहेमीच्या क्लबच्या पूलमधे न जाता इथेच नगरपालिकेच्या पूलवर लेडीज टायमात जाण्याचं ठरवलं.
आधी प्राथमिक चौकशी करावी म्हणून गेले तर पूलच्या मेन गेटमधून आत एन्ट्री केल्यावर हा बोर्ड दिसला.
पोहोण्याचा सुट बंधनकारक आहे.
मद्य(दारू) पिऊन, गुटका खाऊन पोहोण्यास येऊ नये.
आपली वर्तनूक सभ्य असावी.
असभ्य वर्तनूक केल्यास दंड करन्यात येईल.
तेल लावून तलावात उतरू नये.
(पूल दर सोमवारी व अमावास्येला बंद राहील)
तर या सर्व नियमात आपण बसतो का याची मनातल्या मनात चाचपणी करून आत शिरले.
तिथे कोच/वॉचमन महाशय एका आसनावर विराजमान झालेले होते.
मी आत गेल्यावर त्यांनी विचारलं,"क्लास लावायचा आहे? की मुलांना शिकवायचं आहे?"
तर मीच स्वता:(स्वता:साठी) पोहायला येणार आहे आणि मला पोहायला येतं असं कोच महाशयांना सांगितलं. त्यांना ते ऍक्सेप्ट करायला जरा वेळ लागला. पण शेवटी ते कन्विन्स झाले.
हळूहळू इथल्या कॅटॅगरीज लक्षात येत गेल्याच. साधारणत: जर ती स्त्री(मी मुलगी किंवा तरुणी म्हटलं नाहीये!) असेल तर ती स्वता: तरी शिकायला येते किंवा मुलांना पोहोणे शिकवण्यासाठी म्हणजेच कोचच्या हवाली करण्यासाठी येते.
म्हणजे पोहोणे आधीपासूनच येत असणारी स्त्री(त्यातही माझ्या वयाची) ही कॅटॅगरी इथे नव्हती.
तर मी महिन्याचा पास काढला. आणि यथावकाश माझं पोहोणं मस्त सुरू झालं.
जसजश्या बालगोपालांच्या शाळा संपून सुट्ट्या सुरू झाल्या तशी गर्दी वाढू लागली.
आणि मी लेडीज टायमात जात असल्याने आपापल्या मुलामुलींना हौसेने पोहायला शिकवण्यासाठी घेऊन येणार्या तरुण मातांची गर्दीही वाढू लागली.
यात स्वता: आपल्या पाल्याला शिकवणार्या मातांची संख्या अगदीच अल्प....हाताच्या बोटावरही मोजायला लागू नये इतकी. बहुतेक आयांनी मुलांना कोचवर सोडलेले होते.
साधारण ५ वाजता सगळ्या आया आपापल्या पाल्यांना पुढे घालून तलावावर येत. सुरवातीला एकदा या आमच्या कोच महाशयांशी एकदा विचार विनिमय झाला की मग या सर्व आया तलावाच्या काठावर मस्तपैकी विसावायच्या. मुलांचं पोहोणं....सुरवातीला डुंबणं, रडारड वगैरे....सुरू झालं की यातल्या ७५% आया आपापल्या सेलफ़ोनवर असायच्या. सगळ्याच्या सगळ्या इतका वेळ, रोज, कुणाशी आणि काय बोलत असतील असा मला प्रश्न आहे! उरलेल्या आपापसात गप्पात मग्न! एकंदरीत कोलाहल म्हणजे काय ते जाणून घ्यायचं असेल तर या पूलला भेट द्या.
सगळी शिकाऊ गॅन्ग मात्र ३ ते ५ फ़ुटात तलावाच्या कडेकडेने कडेच्या बारला धरून फ़क्त पाय मारण्याची प्रॅक्टिस करायची. तर हे दृश्य वरून कसे दिसत असेल याचा मी मनातल्या मनात एक एरियल व्ह्यू पहाते.
एखादा चौकोनी ब्रेडचा तुकडा आहे...त्याला कडेकडेनी असंख्य मुंग्या लागल्यावर कसं दिसेल तस्संच हे दृश्य वरून दिसत असणार. यात कडेच्या मुंग्यात तलावच्या कडेला पाय मारणारे शिकाऊही आले आणि काठावरच्या त्यांच्या माताही आल्या!
यातही काही आया एकंदरीत सगळं आलबेल आहे हे लक्षात आल्यावर स्वता:ही पोहोणं शिकण्याचा निर्धार करून तलावात उतरू लागल्या.
इथल्या कोचमहाशयांचा अगदी तात्यापंतोजी खाक्या आणि छडी लागे छमछम हे ध्ययवाक्य आहे. "दयाक्षमाशांती" वगैरे काही नसतं यावर या कोच महाशयांचा नितांत विश्वास आहे.
एकदा ते कडेच्या लोखंडी बारला धरून पाय मारणं झालं, विद्यार्थी थोडा तरंगायला लागला/ली की या ट्रेनीला ते थोडं खोल पाण्यात घेतात. आणि आपण त्याच्या समोर त्याच्याकडे तोंड करून उलटं चालत रहातात आणि ट्रेनीला पोहायला लावतात. सुरवातीला ट्रेनी बिचारा/री तरंगतो....पण मग हळूहळू दम संपत जातो आणि जगबुडीची खात्री पटून तो जिवाच्या आकांताने ओरडायला लागतो, पाण्यातच धडपड करायला लागतो, नाकातोंडात पाणी जाऊन तोंडातून चित्रविचित्र आवाज काढायला लागतो ....पण आमचे तात्यापंतोजी कसे ते बधत नाहीतच. आणि ते उलटं चालतच रहातात आणि हा मागून रडत भेकत बुडत, डुबक्या खात ......आपणही जरा घाबरतो...पण शेवटी आपले तात्यापंतोजीच जिंकतात. ट्रेनीची नैय्या किनार्याला(शब्दश:) लागते! आपण चकित होतो की.... अरे, पोचला की हा किनार्याला! शिकला की पोहायला! व्वा!
पूलवर अधून मधून एखाद्या दिवशी कोच महाशय शिकाऊ मेंबरांना उड्या मारण्यासाठी डायव्हिंग बोर्डवरून उड्या मारायला घेऊन जातात.
मग सगळी शिकाऊ गॅन्ग ३/५ फ़ुटातून वर येते आणि डायव्हिंग बोर्डच्या दिशेने चालू लागते.
असाच काल शिकाऊ मंडळींचा सर्वात वरच्या डाइव्हिंग बोर्डवरून उड्या मारण्याचा सेशन होता. अर्थातच यात फ़क्त मुलं आणि मुलीच होत्या. शिकणार्या मोठ्या(यात तरुणीही आल्या) बायका का नव्हत्या उड्या मारत ते नाही कळलं. हो......... कारण आपल्या उडीची स्वता:वर काहीही जबाबदारी नसून ती सर्वस्वी कोचची जबाबदारी होती.
या बोर्डच्या खाली कोच उभा होता. आणि बोर्डच्या खालपासून एक मुलामुलींची लाइन लागलेली. ती बोर्डखालच्या जिन्यावरून खाली बरीच पुढे गेली होती. ज्यांच्यात हिम्मत आणि उत्साह होता ती मुलं आधीच पुढे नंबर लावून उभी होती. आत्यंतिक उत्साहाने सळसळत हसतखिदळत आणि एकमेकात गप्पा मारत! जणू आता एव्हरेस्टवरच निघाली आहेत. बाकीची मागे मागेच होती. काही आपण घाबरलो नाही असं दाखवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होती. काहींनी आपापल्या मातांना धरून ठेवलं होतं. डिपात(खोल पाण्यात) पोहोणार्या आम्हा ३/४जणींना जरा लांब जायला सांगितलं. कारण तिथेच वरून उड्या पडणार होत्या.
मग मी मात्र पटापट माझा पोहोण्याचा कोटा पूर्ण करून ५ फ़ुटातली एक शिडी पकडते. हा मस्त इव्हेंट मला अनुभवायचा असतो. ही सगळी मुलं/मुली मोठी गोड दिसतात वरून उड्या मारताना!
मग धीराच्या आणि उत्साही कॅन्डिडेट्सनी भराभर उड्या मारल्या. एव्हानापर्यंत मांड्या ठोकून गप्पा मारणार्या किंवा सेलफ़ोनवर बोलणार्या मातांचा कंपू आता जागेवरून हलला आणि त्या सगळ्याजणी डायव्हिंग बोर्डच्या खाली जमून घोळक्याने कलकल करायला लागल्या.
यातल्या काही काही आया आपलं अपत्य उडी मारणार हे लक्षात आलं की जिवाच्या आकांताने डोळे "गच्चिम" मिटून कानावर हात दाबून घ्यायच्या....जणू आता बॉम्बस्फ़ोटच होणार.
काही आया आपापल्या मोबाईलवरचं बोलणं बंद करून आपल्या पाल्यांच्या छब्या मोबाइलच्या कॅमेर्यात कैद करण्याच्या खटपटीला लागल्या. डायव्हिंग बोर्डवर उभं असलेलं आपलं अपत्य कॅमेर्यात कैद करण्याची इतकी घाई काही मातांना झाली होती की इतर माताभगिंनीना बाजूला सारून त्याच जणू हवेतल्या हवेत डाइव्ह मारत होत्या. आपल्या शूर वीर लेकराची छबी कॅमेर्यात पकडण्यासाठी त्यांना योग्य जागा मिळवायची होती ना!
आधी खूप उत्साहाने बोर्डवर चढलेले काही स्विमर्स डायव्हिंग बोर्डच्या कडेवर आले की खालचा धोका त्यांच्या अचानक लक्षात यायचा. हो ना...प्रत्यक्ष पाण्यात(तेही ३ किंवा ५ फ़ुटात) पोहताना वेगळं वाटतं आणि डायव्हिंग बोर्डच्या टकमक टोकावरून हा जो समग्र तलावाचा आणि खालच्या खोलीचा(depth)एरियल व्ह्यू मिळतो त्याने एखादा स्विमर अचानकच पिछे मुड करून उलट्या दिशेने पळू लागतो. पण डायव्हिंग बोर्डवरचे लायनीतले मागचे त्याला पलायन करू देत नाहीत. कारण मागे एकदम दाटीवाटीने सगळे बोर्डवर उभे असतात, उड्या मारण्यासाठी नंबर लावून.
मग आता कोच दृग्गोचर होतात. इकडे वर पलायनवाद्याला बाकीच्यांनी बोर्डवरच धरून ठेवलेले असते. तो बिचारा आत्तापर्यंत "वव्वीSSSSS वव्वाSSSSSS" अशी आपल्या मात्यापित्यांची आठवण काढत रडत असतो.
म्हणत असतो "मम्मी पप्पा" पण तो जिवाच्या आकांताने रडत रडत म्हणत असल्याने ते आपल्याला "वव्वी वव्वा" असं ऐकू येत असतं. "म"आणि "प" या ओष्ठ्य वर्णाच्या जागी त्याच्या तोंडून "व" हा वर्ण बाहेर पडत असतो...काय करणार? त्यावी "वव्वी" तिथेच असते. "वव्वा" मात्र इथे उपस्थित नसतात कारण हा लेडीज टाइम असतो.
तर आता फ़्रेममधे आलेले कोच खालूनच डायव्हिंग बोर्ड हलवतात. मग काय तो वरचा पलायनवादी अलगद पाण्यात पडतो. २/३ सेकंदात तो वर येतोच ....जाणार कुठे? पण तोपर्यंत इकडे त्याच्या मातेच्या जिवाचं पाणी पाणी झालेलं! अश्या काही माता आपापलं अपत्य उडी मारून पाण्यात पडलं की त्याच्या मदतीसाठी म्हणून पाण्यात फ़ेकण्यासाठी हातात हवा भरलेली ट्यूब घेऊन नेम धरून उभ्या होत्या. त्यांचं ट्यूबा नेम धरून पाण्यात फ़ेकण्याचं कसब अगदी वाखाणण्यासारखं!
अशी बरीच पार्सलं पाण्यात अलगत पडल्यानंतर काही अगदीच छोटी आणि अगदीच शिकाऊ पार्सलं आपापल्या आयांना चिकटून ...काही मुसमुसत, काही भेदरून....अशी उभी असतात. त्यांचीही रवानगी डायव्हिंग बोर्डवर होते. आता कोच स्वता: बोर्डवर चढतात आणि एकेक पार्सल उचलून सरळ एकामागोमाग खाली पाण्यात टाकतात. अश्या रितीने उडी सोहळा यशस्वी रित्या संपन्न होत असतो.
एक आजीबाई.....(अहो, आताच्या काळातल्या आजीबाई......अगदी मॉडर्न....केसांचा बॉयकट, आधुनिक कपडे, गॉगल केसांवर चढवलेला....)
आपल्या नातवाला घेऊन आल्या होत्या. नातवाचं वय असेल ५/६ वर्षं. आजीबाईंना खूपच घाई झाली होती नातवाला स्वीमिंग एक्सपर्ट बनवण्याची.
आता इकडे उड्यांचा सेशन चालू असतानाच उपर्निदिष्ट आजीबाई आणि त्यांचा नातू हे जलतरण तलावावर पकडापकडी खेळतानाचं दृश्य दिसायला लागतं! नातू नखशिखांत ओला, गळ्यात ट्यूब असा पुढे पळतोय...अर्थातच केविलवाणा रडत रडत....आजीबाई आपल्या स्पीडने त्याच्या मागे. खूप कणव आली नातवाची!
शेवटी आजीबाईंनी पकडलंच नातवाला! आता केविलवाण्या रडण्याचं रूपांतर हंबरड्यात झालं होतं. आधी पकडापकडी चालू होती तेव्हा आजीबाई हसत होत्या. आता मात्र त्यांचा पेशन्स संपला. त्यांनी नातवाला एक धपाटा घातला आणि त्या त्याला फ़रपटत डायव्हिंग बोर्डच्या दिशेने नेऊ लागल्या. आता भावी संकटाच्या चाहुलीने नातवाच्या अंगात एका दैवी शक्तीचा संचार झाला (असावा!)
कारण त्याने एक जबरदस्त हिसडा दिला आणि त्याने पूलच्या छोट्या गेटच्या (कारण मोठं गेट या अश्याच कारणांसाठी बंदच असतं) दिशेने एक (हवेतच!)जबरदस्त सूर मारला आणि तो रस्त्यावर दिसेनासा झाला.....तसाच ओला आणि गळ्यातल्या ट्यूबसह! रस्त्यावरची माणसंही या गळ्यात ट्यूब अडकवून ओल्या उघड्या अवस्थेत सुसाट पळणार्या मुलाकडे पहात होती.
आता आजीबाई घाबरल्या. मग पूलवरच्याच एका मुलाला त्याच्या मागे पाठवला आणि त्याला धरून बाबापुता करून परत आणला.
मग मात्र मी आजीबाईंना वर काठावर गाठलं. आणि सांगितलं की जरा दमानं घ्या. जर याला पाण्याची कायमची भीति बसली तर तो कधीच पोहू शकणार नाही.
या पूलवर आणखीही एक कॅटॅगरी आहे: वय किंवा आकारमान, किंवा दोन्ही जरा जास्ती असल्याने, ज्यांना काही शारीरिक व्याधी जडलेल्या आहेत अशा काही महिला. त्यांना डॉक्टरांनी कंबरभर पाण्यात चालायला सांगितलेलं आहे. यात दोघीजणी खरंच वयस्कर आहेत. त्यातल्या एक तर नऊवारी नेसून डोक्यावर पदर घेऊन पाण्यात उतरतात आणि १ तास चालतात. त्यांचा डोक्यावरचा पदरही हलत नाही की कपाळावरचा कुंकवाचा बंदा रुपयाही पुसट होत नाही!
आता वरचा पोहोण्याच्या पोषाखाचा नियम बर्याच जणींसाठी शिथिल केलेला दिसतो.
असो........
अश्या रितीने मी हा रोजचा पोहोण्याचा एक तास इतका एन्जॉय करते की काही विचारू नका!
(No subject)
भन्नाट पूल दर सोमवारी व
भन्नाट![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
पूल दर सोमवारी व अमावास्येला
बंद राहील
सोमवारचं कळालं पण अमावस्येचं लॉजिक नाही आलं ध्यानात !
मस्त लिहिलं आहे तुम्ही मानुषी
मस्त लिहिलं आहे तुम्ही मानुषी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काठावर उभं राहून कोचला सूचना
काठावर उभं राहून कोचला सूचना देणार्या आया नाहीत का तुमच्याकडे.
"तिचे १०० पाय मारून झाले. आता तिला जरा बटरफ्लाय वगैरे शिकवा" असं रोज ओरडून सांगणारी आई, त्या ओरडण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणारी कोच आणि अजून जेमतेम तरंगायला शिकणारी त्या आईची मुलगी असे भारी दृश्य बघितलं मी नुकतंच स प च्या टँकात.
धम्माल .....
धम्माल .....![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
(No subject)
सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं.
सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. मस्त.
चिन्नू, अगो, मंदार, सिंडरेला,
चिन्नू, अगो, मंदार, सिंडरेला, मामी दिनेशदा सर्वांना खूप धन्यवाद!
किरण अमावास्येला पूल बंद यामागे अंधश्रद्धा हेच कारण असावे! जसं अमावास्येला प्रवास करत नाहीत इ.इ.
अगं नीधप तो पुण्यात "सप"ला येणार्या मातांचा क्लास वेगळा. इथे मी वर म्हटल्याप्रमाणे आमच्या क्लबात येणारा एक क्लास वेगळा आणि इथे नगरपालिकेच्या तलावावर येणार्या माता ....मूल पूर्णपणे कोचवर सोडतात. बर्याच जणींनी पूल हा प्रकारच पहिल्यांदा अनुभवलेला असण्याची शक्यता!
फक्त काही आया स्वता: काठावर बसून पाल्यांना, ... हात मार, डोकं वर काढ अश्या बेसिक सूचना देत असतात.
आणखीनही खूप विचित्र गोष्टी आहेत, पण एकदम स्ट्रॉन्ग डोस नको म्हणून फक्त गमती लिहिल्या आहेत.
धमाल आहे.
धमाल आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
लोला ठमादेवी धन्यवाद!
लोला ठमादेवी धन्यवाद!
हा हा. छान लिहीले
हा हा. छान लिहीले आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अमावस्येचे वाचुन जरा दचकलेच!! अमावस्येला स्विमिंग पुलात ओहोटी वगैरे लागत असेल का काय असे वाटले
मस्त. सावली +१
मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सावली +१
अमावस्येला स्विमिंग पुलात
अमावस्येला स्विमिंग पुलात ओहोटी वगैरे लागत असेल का काय असे वाटले >>>>
सावली गुड वन! अगं अजूनही खूपच तुमच्या पिढीच्या कल्पनेच्या बाहेरच्या आणि दचकण्यासारख्या गोष्टी आहेत..........असो!
रैना आणि सावली धन्यवाद!
हसून हसून पुरेवाट झाली.......
हसून हसून पुरेवाट झाली....... फारच मस्त, भन्नाट लिहिलंय - सगळं डोळ्यासमोर उभं रहातंय अगदी.......
हे कुल मॉम ! मस्त धमाल
हे कुल मॉम !
मस्त धमाल लिहिलं आहेस. अगदी डोळ्यासमोर चित्र दिसलं आणि प्रचंड हसु आलं. तुझं ऑब्जर्वेशन आणि त्याला विनोदाची फोडणी देवुन ते सांगण्याची हातोटी फार मस्त. मज्जा आली.
धम्माल लिहीलेय.
धम्माल लिहीलेय.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
शशांक मनू आणि अनघा
शशांक मनू आणि अनघा कौतुकाबद्दल धन्यवाद!
ओह.......कूल मॉम! ...मस्त वाटतं गं मनू ऐकताना!(विसरली नाहीस !!)
"तिचे १०० पाय मारून झाले. आता
"तिचे १०० पाय मारून झाले. आता तिला जरा बटरफ्लाय वगैरे शिकवा" असं रोज ओरडून सांगणारी![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मानुषी मस्त लेख. ए पण काठावरुन सुचना देणार्या सगळ्याचा आया पोहणे या विषयात अशिक्षीत असतील असे नाही हा. (स्वगतः च्यामारी मी पण लेकाला काठावरुन पाय हलव असे सांगत असते, त्यामुळे या आशयाचा भाग एकदम रिलेट झाला :डोमा:. पण आमच्या इथे नविन शिकणार्यांच्या वेळेत इतरांना पाण्यात उतरायला बंदी असते
)
मस्त लिहिलंय..
मस्त लिहिलंय..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मोनाली सूचना देणे आणि वरती मी
मोनाली सूचना देणे आणि वरती मी लिहिलेय तशी अतर्क्य सूचना देणे यात फरक आहे की नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण आमच्या इथे नविन
पण आमच्या इथे नविन शिकणार्यांच्या वेळेत इतरांना पाण्यात उतरायला बंदी असते )>>> मोना अगं "मुन्शिपाल्टी"च्या तलावात असले नियम नाही गं परवडत.
पण बाकी तुझ्या स्वगतासह सगळ्या पोस्टला +१००.
खरं म्हणजे आमच्या नगरात एक पूल आहे आणि त्यात आपल्याला पोहायला मिळते हीच लग्झरी!
पण हल्ली पाणी टंचाईच्या भीषण बातम्या ...एस्पेश्यली....पाण्याविना तडफडून १० हत्तीणींचा/ काळविटांचा मृत्यू असल्या बातम्या पाहिल्या की पोहायला जाताना गिल्टी फीलिंग येतं.
मनीष धन्यवाद!
मानुषी, विसरते कसली. सॉल्लिड
मानुषी, विसरते कसली. सॉल्लिड इम्प्रेस्ड आहे मी.
पण तिथल्या कोचला तु सांगितलंस कि पोरांना स्विमिंगला नाही आणलंस तर तु स्वतःच स्विमिंग करणार आहेस तेव्हा त्याला पण तेच वाटलं असेल - कुल मॉम !
अर्रे मनू ...आता मात्र माझा
अर्रे मनू ...आता मात्र माझा आक्रोडच झाला बाई!(ऑकवर्ड!हाहाहाहा!)
स प च्या टँकला पोहायला येत
स प च्या टँकला पोहायला येत नसेल तर कोच कंपलसरी आहे. पालकांपैकीच कोणी पास काढून शिकवतंय हे अलाउड नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण माझ्यापेक्षा शेलाट्या आणि वयाने लहान अश्या सूचनाळू आया का उतरत नाहीत पाण्यात ते नकळे.
मुंबईतल्या काही मैत्रिणींना मला बेसिक का होईना पोहता येतं याचंही भारी वाटतं (टू आणि फोर व्हीलर चालवणे.. किंवा ड्रायव्हिंगचा चस्का असणे याचंसुद्धा!) त्यांना ते भारी वाटतं हे मला गमतीशीर वाटतं
मानुषी, मस्त लिहिलं आहे! धमाल
मानुषी, मस्त लिहिलं आहे! धमाल आली वाचायला.
हे हे हे! किती छान लिहिलंय.
हे हे हे! किती छान लिहिलंय. अगदी डोळ्यासमोर आलं सगळं.
शाळेत असताना उन्हाळी सुट्ट्या लागल्या की आई घाटकोपरच्या महानगरपालिकेच्या तरण तलावात घेऊन जात असे मला व धाकट्या बहिणीला. ते दिवस आठवले. २-३ वर्षे सलग जात असू. अर्थात पोहणे शिकणे सीरीयस्ली काही झाले नाही. पाण्यात मनसोक्त खेळणे हाच एकमेव उद्देश असे. ट्रेन ने कल्याण ते घाटकोपर जाणे, येताना घाटकोपर स्टेशनच्या बाहेर बसणार्या काकडीवाल्या भैय्या कडून '४ चिरा पाडून त्यात तिखट-मीठ लावलेल्या काकड्या' विकत घेऊन खाणे, कधी कधी गारेगार गोळा किंवा गाडीवरचे लिंबू सरबत आणि तिखटाचे किंवा बिनतिखटाचे फ्रायम्स (ते अधिक चिन्हाच्या आकारात मिळतात ते!) हे आमचे अॅट्रॅक्शन आयटम्स होते!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हल्ली पाणी टंचाईच्या भीषण
हल्ली पाणी टंचाईच्या भीषण बातम्या ...एस्पेश्यली....पाण्याविना तडफडून १० हत्तीणींचा/ काळविटांचा मृत्यू असल्या बातम्या पाहिल्या की पोहायला जाताना गिल्टी फीलिंग येतं.>>> +१![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
नी हो ग फरक आहे. पण तरी आता यापुढे त्याला सुचना देताना जरा काळजी घेईनच म्हणते
टू आणि फोर व्हीलर चालवणे.. किंवा ड्रायव्हिंगचा चस्का असणे याचंसुद्धा>>> अग हो कारण इथे लोकल सर्व्हीस अशी आहे की गाडी येणे मस्ट नव्हते कधीच. तरी आता हे चित्र बरेच बदलले आहे. मुंबापुरीतही आता मुली झ्याक चालिवतात गाड्या.
लहान अश्या सूचनाळू आया का उतरत नाहीत पाण्यात ते नकळे.>>> हे मात्र खरय. नाहितरी काठावर १ तास बसतात ना मग स्वतःपण का नाही शिकत
Pages