कैरीचा छुंदा आणि मोरांबा.

Submitted by सुलेखा on 28 May, 2012 - 03:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

३ किलो मोठ्या कैर्‍या.[लाडु कैरी ,हापुस कैरी चालेल्.शक्यतो आतुन कडक व पांढरी पाहुन घ्यावी.]
ही अशी मोठी लाडु कैरी .एकुण ७ कैर्‍या होत्या.chundaa-1.JPG
मी सरसकट ३ किलो कैर्‍या आणुन त्याचा फु.प्रो. वर एकसाथ किस केला व या किसाचा छुंदा व मोरांबा दोन्ही केले त्यामुळे एकाच ठिकाणी या दोन्हीची कृति लिहीत आहे.दोन्हीचे साहित्य वेगवेगळे दिले आहे.
३ किलो कैरीचा साले काढुन केलेला किस..
छुंद्यासाठी साहित्य-
हा आहे ५ वाट्या किस.
chunda 2.JPG
८ वाट्या साखर.
प्रत्येकी २ चमचे लाल तिखट[मी रामदेव वापरले आहे.याचा रंग छान आहे],मीठ,मिरे,लवंग आणि भाजलेले जिरे.
दालचीनी काड्या २-३
लाल मिरच्या सुक्या ७-८.
मोठी मसाल्याची वेलची ४-५ नग.हे आहे मसाला सामान्.पण यात लाल सुकी मिरची ठेवली नाही.
chundaa33.JPG

मोरांबा-
कैरीचा किस २ वाट्या.
साखर ३ १/२ वाट्या.
लवंग ४
हिरवी वेलची ४ ,दाणे सोलुन जाडसर पुड .
केशर काड्या एक चिमुट .

क्रमवार पाककृती: 

छुंदा-
कैरीचा किस ५ वाट्या व साखर त्याच्या दिड पट ८ वाट्या एका पॅन मधे घेवुन छान मिक्स करावी व मिश्रण गॅसवर ठेवावे.
कैरीच्या आंबटपणावर साखरेचे प्रमाण ठरते .इथे कैरी आंबट होती त्यामुळे मी दिड पटीपेक्षा थोडी जास्त ७ १/२ऐवजी ८ वाट्या साखर घेतली आहे.जर गोडसर असेल तर दिड पटीपेक्षा अर्धी वाटी कमी साखर घेतली तरी चालते.
गॅस मध्यम आचेवर ठेवुन मिश्रण ढवळत रहायचे आहे.
आता मसाला साहित्यातील अर्ध्या साहित्याचे म्हणजे लवंग,दालचीनी,वेलदोडा दाणे ,जिरे यांची बारीक पुड करुन घेणे.
मिश्रणातली साखर विरघळलेली दिसली कि त्यात मसाला पुड्,तिखट,मीठ घाला.लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे घाला.छान ढवळा .गॅस कमी करा.उरलेल्या लवंग्,दालचीनीचे तुकडे,मिरे त्यात मिसळा .मिश्रण थोडे पळीवाढ झाले कि गॅस बंद करा.कारण थंड झाल्यावर घट्ट होईल.
असा छुंदा तयार झाला.त्याची चव घेवुन "सब कुछ ठिक-ठाक है" याची खात्री करा.
हा असा तयार छुंदा -chunda 55.JPG

मोरांबा-
२ वाट्या किस एका स्टीलच्या दब्यात ठेवुन डब्याचे झाकण लावावे.
हा डबा कुकर मधे थोडे पाणी घालुन त्यात ठेवावा.कुकरचे झाकण व शीटी लावुन २ शिट्या काढाव्या .कुकरची वाफ दबली कि डब्यातला किस एका पॅन मधे काढावा त्यात ४ वाट्या म्हणजे किसाच्या दुप्पट साखर घालुन मिश्रण छान ढवळुन मध्यम गॅस वर ठेवावे .साखर विरघळली कि गॅस कमी करुन वेलची पुड,लवंग व केशर घाला.मिश्रण पळीवाढ झाले कि गॅस बन्द करा.हा आहे तयार झालेला मोरांबा.
moramba1.JPG
थंड झाल्यावर बरणीत भरा.
मोरांबा थंड झाला कि त्यात केशर एसेन्स ही घालता येईल्.त्याची चव व वास छान येतो.

अधिक टिपा: 

छुंदा व मोरांबा साखर मिसळुन उन्हात ठेवावा .बरणीला झाकण न लावता ,वर पातळ कापड बांधावे.७-८ दिवसात साखर विरघळली .कि त्यात इतर मसाला पदार्थ घालुन पुन्हा उन्हात ठेवावे.रोज उन्हात ठेवण्यापुर्वी मिश्रण चमच्याने ढवळुन ठेवावे.१२ ते १५ दिवसात उन्हातला ,टिकाऊ छुंदा वा मोरांबा तयार होतो.अर्थात उन्हाचे व त्याचबरोबर साहित्याचे प्रमाण यावर किती दिवस लागतील ते अवलंबुन आहे. कमी प्रमाणात लगेच खायला करायचा असेल तर मावेत /ओव्हन मधे ही सुंदर होतो.
छुंद्यामधे चव व वास आवडत असेल तर सबंध बडीशोप ही घालता येईल.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!! मी शोधतच होते रेसेपी.
गुजराथी/ मारवाडी पद्धतीचे बडीशेप घालून गोड लोणचे असते, त्याची रेसेपी आहे का तुमच्याकडे?

वा छानच.

मी दर वर्षी छुंदा करते पण फोटो काढायचे विसरते. Lol

मी शिजवत नाही. कैरीच्या किसाच्या दिड पट साखर घेऊन एकत्र करून त्यात थोडी मिरची पुड टाकून उन्हात ५-६ दिवस बरणी ठेवते. झाला छुंदा. चवही सुंदर लागते.

भरत मयेकर ,ते दरोडेखोर जर तुम्हीच असाल तर काहीच हरकत नाही.
बादवे काल "लोकसत्ते" मधे "पडसाद" या सदरात सत्यमेव जयते वर तुम्ही लिहीलेले लिखाण खुपच आवडले.तुमची लेखणी प्रखर आणि प्रगल्भ आहे.
स्वाती ,गुजराथी गोड लोणचे आता उद्या लिहीते.
जागु,उन्हातला छुंदा/मोरांबा खरंच वेगळ्या चवीचा असतो.सोलर कुकर मधे ही खुप छान होतो पटकन होतो.

सुलेखा.........
दोन्ही पदार्थ मस्त!
१)मी छुंदा मिश्रण काचेच्या बरणीत भरून त्याला दादरा लाऊन काही दिवस कडक उन्हात गच्चीत ठेऊन देते. मात्र मी यात तिखट मीठ आणि जिरे अर्धे बोबडे कुटलेले घालते....बस!

२) आणि काल गुळांबा केला. कोल्हापूरहून आणलेली काकवी होती. त्यात कैरीच्या फोडी शिजवल्या. वेलदोडा, केशर घातलं. फोडी मऊ होईपर्यंत शिजवल्या...काकवीत. लगेचच शिजतात.
अप्रतीम लागतो हा गुळांबा. पोळीबरोबर खाताना थोडं पातळ तूप घालायचं या गुळाब्यात.
(नंतर २ राउंड जास्ती मारायचे....जॉगिंग, वॉकिंग, स्वीमिंग जे काही करत असाल त्याचे! ).

माझाही छुंदा झाला. गु. बायकांसारखे स्टीलच्या पातेल्याला पातळ दादरा लावून ८-१० दिवस वर ठेवते. मग शेवटच्या दिवशी ति.मी.जिरे(आक्खे),वेलदोडा भरड्,लवंगा टाकते. एका वर्षी दालचिनी तुकडे पण टाकले होते. मस्त लागतात. पण उपासाला मग छुंदा चालत नाही म्हणून आता टाकत नाही.

साखरांबा आम्ही आधी गॅसवरच करायचे. पण आता छुंदयासारखाच करून पाहिला. खूप मस्त होतो. वेगळीच चव येते. एकदा २ दिवस जास्त ठेवला गेलता साखरांबा उन्हात तर कोरडा जास्त झाला अन बर्फीसारखा तोंडात विरघळू लागला. Happy

यम्मी! दोन्ही आवडते...

मोरम्बा + तूप त्याबरोबर गरम गरम फुलका.... आहाहा... स्वर्ग!!!! Happy

आई पण छुंदा उन्हात बरणी ठेऊनच करायची....

फोटो आणि दोन्ही पाककृती फारच मस्तं!

ऊन्हं आहेत, पण हवेत आर्द्रता खूप, अशा ठिकाणी ही छुंद्याची पाककृती परफेक्ट!

मस्त फोटो! मी असाच करते छुंदा. पण फक्त जीरे पूड आणि तिखट घालते. आता तुमच्यासारखा मसाले घालुन करेन!

बाजारच्या छुंद्यात जिरे,तिखट-लाल तिखट/सुक्या मिरचीचे तुकडे ,मिरे असतात.पण माझ्या मते वर दिलेल्या मसाल्याची पुड व थोडा अख्खा मसाला घातला तर मुरल्यानंतर लवंग ,मिरे दालचीनी तुकडा,वेलची दाणा यांची मस्त चव येते.तसेच पुड घातल्याने रंग व स्वाद वाढतो.
ज्यांच्याकडे सोलर कुकर आहे त्यांनी त्यात मो,छु. करुन पहा.अपेक्षेपेक्षा कमी वेळात अन सगळ्यात नं१ चवीचा,रंगाचा तयार होतो.

स्लर्रप!!! जीवाचा मोरांबा व छुंदा झाला फोटो पाहून! >> एकदम, तुमने तो बचपन याद दीला दीया..
मी १-२ वेळा मुराम्बा करायचा प्रयत्न केला पन .....पाकात बारीटाक टाकल्यासारखे वाटत होते
आता परत एकदा करते....तुमच्या शुभेच्छा असाव्यात

मुरांबा कुकरमधे शिजवायची आयडिया चांगली आहे. ट्राय करायला हवी. Happy
छुंदा आम्हीही उन्हात ठेवून करतो. शिजवून नाही केला कधी.