एकांकिका : न संपलेली कहाणी

Submitted by दिनेश. on 17 April, 2009 - 07:33

( पडदा उघडल्यावर एका हॉस्पिटलमधली स्पेशल रुम दिसते. उजव्या बाजुला एक कॉट, त्याच्या मागे एक खिडकी. डाव्या बाजुला रुममधे यायचा दरवाजा. त्याचा बाजुला विंगेत जाणारा बाथरुमचा दरवाजा. दोन खुर्च्या. एक छोटेसे टेबल. कॉटच्या बाजुला, हॉस्पिटलमधे असते तसे औषधे ठेवायचे टेबल. टेबलावर काहि फळे आणि वर्तमानपत्र. खिडकीच्या बाजुला एक छोटासा फोन आणि बेलचे बटण. कॉटच्या मागे दिवा.

कॉटवर एक पन्नाशीतला माणुस, अमर, पडलेला. उजवा हात आणि उजवा पाय प्लॅष्टरमधे. डावी बाजु प्रेक्षकांकडे. डाव्या मनगटावर सलाईनसाठी पट्टी. सलाईनची अर्धी बाटली हुकला अडकवलेली. ट्युब गुंडाळून ठेवलेली.

अमर पन्नाशीतला असला तरी देखणा. केस भरपुर. दाढी वाढलेली पडदा उघडतो त्यावेळी तो डाव्या हातात कसेबसे धरुन एक पुस्तक वाचतो आहे. तो दोन उश्या पाठीमागे ठेवुन अर्धवट बसला आहे. उश्या थोड्या अस्ताव्यस्त आहेत. अंगात हॉस्पिटलचा ढगळ ड्रेस. कुडत्याची पुढची बाजु बरीच उघडी.

तो थोडासा बेचैन, डाव्या हातात पुस्तक नीट धरता येत नाही. उश्या अस्ताव्यस्त असल्याने, त्याला त्रास होतोय. तेवढ्यात फ़ोनची बेल वाजते. ती बेल अत्यंत हळुवार असावी. त्या आवाजाने तो जरा गडबडतो. ती बेल फोनची आहे हे त्याच्या आधी लक्षात येत नाही. मग कळल्यावर तो इकडे तिकडे बघतो. डाव्या हाताने फोन घेणे त्याला जमत नाही. त्या प्रयत्नात असताना बेल बंद होते. तो निराश होतो. हात झटकायला जातो, पण हाताला पट्टि असल्याने, हात आवरता घेतो. परत बेल होते.

तो दोनतीन बेल झाल्यानंतर फोन उचलायला जातो, तेवढ्यात फोन बंद होतो. परत काहि सेकंदाने फोन वाजतो. परत अवघडत तो उचलतो. त्याच्या हातातील पुस्तक कॉटखाली पडते. )

अमर : हॅलो, हो हो ठिक आहे. - - - - - नाही झोपलो नव्हतो - - - -- - नाही सध्या काहि नकोय - - -- - - कोण आलय म्हणालात - - - - -- हो हो येऊ द्या त्याना.

( अमर थोडेसे सावरुन बसायचा प्रयत्न करतो. खाली पडलेल्या पुस्तकाकडे हताशपणे बघतो. डाव्या हाताने कुडता सावरायचा प्रयत्न करतो. केसावरुन हात फ़िरवतो. तेवढ्यात दारावर टकटक कोते. दार हळुच उघडून एक स्त्री आत येते. साधारण पंचेचाळीशीतली. अंगावर उंची साडी. साडिचा रंग फ़िक्कट. हातात फ़ुलांचा छोटा गुच्छ. काहि फ़ळे, पर्स आणि एक छोटीशी बॅग. )

अमर : ये ना. तसा बरा आहे मी. दोन दिवस ऑब्झर्वेशनखाली रहा म्हणाले ना डॉक्टर. तु सेमिनार अर्धवट टाकुन आलीस का ?

मानसी : अरे थांब थांब. सगळे सांगते.

( ती हातातली बॅग़ नीट ठेवते. त्यातुन एक व्हास काढून हातातली फ़ुले त्यात ठेवते. त्यात पाणी ओतून तो व्हास टेबलवर ठेवते. फ़ळे नीट रचून ठेवते आधीची वर ठेवते आणि ताजी खाली ठेवते. खाली वाकुन औषधाचे टेबल उघडून त्यात बाकिचे सामान ठेवते. तेवढ्यात तिला खाली पडलेले पुस्तक दिसते, ते ती नीट बंद करुन ठेवते.टेबलवरच्या वर्तमानपत्राची नीट घडी घालते. अमर तिच्याकडे बघत असतो, ती पण त्याच्याकडे बघत असते. मग खुर्ची ओढून ती बसते. )

मानसी : सेमिनार संपला आजच. मग घरी फोन केला तर गिरिजाबाईनी सांगितले, कि तू इथे आहेस. लगेच टॅक्सी पकडून आले. अरे कळवायचेस तरी. निदान अश्यावेळी तरी कळवायला नको का ?

अमर : सांगितलं ना तसा ठिक आहे मी. दुपारी जरा ऑफ़िसमधे चक्कर आली. मग ई सी जी वगैरे काढला. तसा ठिक होता पण बी पी जरा लो होते, म्हणुन इथे आणले. गिरिजाबाईना कळवले होते. संजु, मीना ला नाही कळवले अजुन, काळजी करतील ना. तसे तूला पण कळवु नका असेच सांगितले होते बाईना मी.

मानसी: हो ना त्या सांगत नव्हत्याच. मीच विचारले कि साहेबांचा फोन येऊन गेला का, तर त्या पटकन बोलून गेल्या. पण मला का नव्हते सांगायचे ? आणि बी पी लो झाले कि हातापायाला बॅंडेज बांधतात हे नव्हतं माहित मला. निदान डोळ्याने बघतेय, ते तरी नाकारु नकोस.

अमर: आं ( फ़क्त कण्हतो )

मानसी : ( काळजीच्या स्वरात ) दुखतय का खुप ? फ़्रॅक्चर आहे का ? खाली डोक्टर नाही भेटले. रात्रीच्या राऊंडला येतील त्यावेळी विचारीन. पण कुठे पडलास ? गाडी चालवत होतास का ?

अमर : हाताला थोडा क्रॅक आहे म्हणाले डोक्टर. पायाला आहे फ़्रॅक्चर. ऑफ़िसमधेच चक्कर येऊन पडलो. बाजुच्या कठड्यावर आपटलो.

मानसी : एक्स् रे कुठे आहेत ? इथे व्यवस्थित ट्रीटमेंट आहे ना, नाहीतर जसलोकला जाऊ.

अमर : बघ ठेवलेस माझ्या वर्मावर बोट. मला कुठे परवडणार आहे जसलोक ?

मानसी : सॉरी, मला तसे नव्हते सुचवायचे. परवडण्याचा प्रश्न नव्हता. तिथल्या ऑर्थोपीडिक डॉ. सिंघानिया माझ्या ओळखीच्या आहेत म्हणुन म्हणाले. हवे तर मी त्याना रिपोर्ट्स दाखवुन आणते. सेकंड ओपिनियन घ्यावे नेहमी. त्या मला चार्ज नाही करणार.

अमर : पण हा सल्ला तु स्वतःसाठी कुठे मागते आहेस ?

मानसी : ( एकदम चिडते, काहितरी लागट बोलायला जाणार, तेवढ्यात थांबते पण उपरोधाने बोलतेच ) सांगेन ना मी, ज्या माणसापासून मला मुलगा झाला, त्यापुर्वी ज्याच्याशी लग्न करून बसले होते, त्याच्यासाठी विचारतेय म्हणून. तूला माझे एवढेही उपकार नको असतील तर सांग तसे.

अमर : तसे नव्हते म्हणायचे मला. एवढ्या मोठ्या सर्जन. त्यांच्याकडे काय सल्ला मागायचा ?

मानसी : मला एक खात्री पटली बघ आता, तुझ्या हातापायाला मार बसलेला दिसतोय खरा, पण डोके मात्र नक्कीच शाबूत आहे. बघ ना या अवस्थेत देखील तूला, विषयाचा ट्रॅक बदलायचे कसे बरोबर सूचले.

अमर : तू उगाच काळजी करतेस बघ.

मानसी : ( उपहासाने ) मी आणि काळजी ? कसं शक्य आहे ? मी म्हणजे एक बेजबाबदार आई, बेजबाबदार बायको. आणि ( तिचा आवाज नकळत चढतो. ती उठुन उभी राहते, पण ती एकदम भानावर येते. गप्प बसते, काहि क्षण तसेच जातात. )

अमर: ( स्वर दूखरा ) मला वाटतं आपण परत कधीतरी याबद्दल बोलु शकु, म्हणजे अर्थात तूझी बोलायची इच्छा असेल तर आणि मी बरा होवून घरी आलो कि. - - - - - आलो तर.

मानसी : असं नको रे बोलूस. तूला काहि झालेले नाही. साधारण आठ दिवसात प्लॅस्टर काढतील. नर्सला विचारले ना मी. मी कुठेच जाणार नाही. थांबेन तूझ्याजवळ. ईथेच. ( खुर्चीवर बसते, स्वत:च्या केसावरून हात फ़िरवते, अमर उठायचा प्रयत्न करतो, तिच्या दिशेने हात पुढे करतो. पण तिचे लक्ष नाही. ती खुर्चीवर मान मागे टाकून बसते. )

अमर : दमली आहेस बघ अगदी. तिथे समोर वॉश रुम आहे. स्वच्छ आहे. आत्ताच साफ़ करुन करुन घेतलीय.

( मानसी मागे बघते. केसावरून हात फ़िरवते. पर्स उचलून ती वॉशरुममधे जाते. अमर त्या दिशेने बगह्त राहतो. जरा सावरून बसायचा प्रयत्न करतो. त्याला ते नीट जमत नाही. तो हात लांब करुन फोन घेतो. थोडावेळ वाट बघून, दोन चहा पाठवून द्या. असे सांगतो. पलिकडून थोडी विचारणा, जेवणाचे मग सांगतो, चहात साखर कमी, किंवा वेगळीच पाठवा, असे सांगतो. तेवढ्यात दारावर थोडी ठकठक होते. हळुहळु त्याचा आवाज वाढत जातो. आणि मग बाहेरून धाड्कन दार उघडून, तरुणपणीची मानसी आत येते. ती वेगळी साडी नेसलेली, वेगळी पर्स घेतलेली. हातात एक मोठा फ़ोल्डर, काहि पुस्तके. केस थोडेसे विक्स्कटलेले. ती आल्यावर तिच्यावर प्रकाशझोत हवा. तसेच प्रकाशयोजनेचा भर रंगमंचावर जी बैठकव्यवस्था आहे तिच्यावर हवा. अमरचा पलंग अंधुक प्रकाशात. )

मानसी : अरे आहेस ना घरात ? कधीची दार वाजवतेय. दार का नाही उघडलस ? आणि गिरिजाबाई कुठाहेत ? संजुमीनाला घेऊन गेल्या आहेत का ? इतका उशीर थांबतात त्या बाहेर ?

अमर : ( आता तो व्यवस्थित सावरुन बसला आहे ) अग हो हो, जरा दम तर घेशील. मी जरा फोनवर बोलत होतो म्हणुन उशीर झाला, दार उघडायला. गिरिजाबाईंकडे चावी असतेच ना, आणि शिवाय तू इतक्या लवकर येशील अशी कल्पना नव्हती.

मानसी: एक छान बातमी आहे बघ. मला स्कॉलरशिप मिळालीय. तीन वर्षं जर्मनीत असणार मी.

अमर : तीन वर्षं ?

मानसी: अरे हो रे, तेवढा वेळ लागणारच ना. मधे दीड वर्षाने येऊ शकेन ना, नाहीतर असे करुया का, तुम्हीच या सगळे तिथे. मुलाना पण छान वाटेल.

अमर : तू होकार दिला आहेस का

( ती त्याच्या बेडजवळ जाते, फ़ोल्डरमधून काहि कागदपत्रे काढुन त्याला दाखवते. खुप उल्हासित झालेली असते ती. )

मानसी : अशी संधी परत का मिळणार आहे मला ? कित्ती वर्षांचं स्वप्नं होतं माझं. आपल्याकडे कुठे अश्या सोयी असतात. माझा विषय तर इथे कुणाला धड कळणारच नाही. आणि अर्थातच तुझ्या सहकाराशिवाय कुठे शक्य होतं ? संजुच्या वेळेस सोडावीच लागली होती नोकरी. मिनी पण आली घरात नंतर, त्या दोघांचे करण्यात मी पुर्ण बुडुन गेले होते. तूच तर आठवण करुन दिलीस. अगदी मागेच लागलास, कि पुढे शिक, एवढी शिकलीस त्याचा उपयोग कर. ग़िरिजाबाईना तर तूच आणलेस. माझी तयारीच नव्हती, दोघाना त्यांच्यावर सोपवुन बाहेर पडायची. पहिल्यांदा बाहेर गेले तरी, दर तासाला फोन करत असे मी.

अमर : अगं हो. हो. किती एक्साईट झाली आहेस. नीट सांग तरी सगळे. आपण नीट सगळे बोलून ठरवू या. ( तो आता नीट सावरून बसलेला आहे. )

मानसी : अरे मला तर हो म्हणायच्या आधी तूझ्याशी बोलायचे होते. पण आल्फ़्रेड परत चालले होते आजच. ते म्हणाले आजच सांग. तुझ्या ज्या काहि शंका असतील त्या आपण नंतर सोडवू. व्हीसा वगैरेची तयारी आत्ताच करायला हवी. अरे मी म्हणाले, माझा तर पासपोर्टही तयार नाही तर आमचे शर्मासाहेब म्हणाले, एक आमदार त्यांच्या ओळखीचे आहेत. ते देतील, पत्र. मग काय अगदी दोन आठवड्यात सगळे होवून जाईल.

अमर : तू तर सगळे ठरवूनच आली आहेस.

मानसी : दुखावलास तू ? तूझ्याशी बोलायला हवे आधी. मला कळतेय रे. पण

अमर : अगं तसे नव्हते म्हणायचे मला. पण सगळे मॅनेज करायचे म्हणजे. शिवाय संजु एकटा नाही आता. मीनुचा पण प्रशण आहे. माझे काय, मी करेन मॅनेज.

मानसी : तू सहकार्य करणार याची खात्री होतीच मला. पण मुलांची सोय करता येईल. आताश्या माझ्याकडे कुठे असतात दोघे. गिरिजाबाईंचा छान लळा लागलाय. मी म्हणाले होते त्याना, कि रात्रीच्या तरी कशाला घरी जाता, रहा इथेच. मला वाटते तयार होतील त्या. तसे झाले तर तुला काहिच त्रास नाही व्हायचा.

अमर : पण काय गं, तूला खरोखरीच जमेल, आम्हाला सोदून रहायला ?

मानसी मीनुचापण खुप लळा लागलाय रे. बोलते कित्ती छान आता. पण दीडदोन वर्षाचा तरच प्रश्न आहे. तूम्ही सगळे येणारच आहात ना तिकडे ?

अमर : तू मीनुला इतक्या छान रितीने स्वीकारलेस ना ?

मानसी : अरे आपल्या दोघांचा निर्णय होता ना तो. पण तूला करमेल का माझ्याशिवाय ?

अमर : खरं उत्तर देऊ कि खोटं ?

मानसी : मला पटेल असे उत्तर दे ?

अमर : खरं सांगू, नाही करमणार. पण तूझा अभिमानही वाटतोय. मीनूच्या बाबतीत तु जे सहकार्य केलेस, ते मी कधीच विसरणार नाही.

मानसी : अरे कित्ती गोड छोकरी होती ती. आपल्या घरात कशी साखरेसारखी विरघळलीय. पण तूला खरेच जमेल ना हे सगळे.

अमर : माझी सोड काळजी. मी एकटा नाही इथे. तुझी काय सोय होणार आहे ते सांग, राहणार कुठे, खर्चाचे काय ? आणि थंड हवामान सोसणार आहे का तूला ? भाषा शिकावी लागेल. शिवाय तुझे काम आहेच. किती आघाड्यावर एकटी लढणार आहेस तू.

मानसी : अरे सगळी सोय केलीय त्यानी. तश्या अडचणी येतील थोड्याफ़ार, पण काढेन मार्ग त्यातूनही. राहण्याची पण सोय झालीय. छोटेसे किचन असेल, माझ्यापुरते करुन खाईन मी. इथे मात्र तू आबाळ करुन घेऊ नकोस रे. हवं तर आईला सांगते येऊन रहायला. आईनापण सांगीन. दोघी अधनं मधं येऊन राहतील. शेजारच्या नाईकमामीना पण सांगते.

अमर : अगं हो हो. किती जणींवर जबाबदारी टाकणार आहेस माझी. मीच हवे त्यावेळी, त्याना बोलावून घेईन. बरं मला सांग, पासपोर्टचा फ़ॉर्म आणला आहेस का ? फोटो काढले आहेस का ? बरेच लागतात, माहित आहे ना ? तूझी सगळी सर्टिफ़िकेट्स आहेत का इथे, कि आईकडून मागवावी लागतील. रेशनकारडाची कॉपी लागेल.

मानसी : अरे हो बरी आठवण केलीस ? बाकि सगळे आहे, फोटो तेवढे नसतील.

अमर : अगं मग जा बघू. तो कोपर्‍यावरचा स्टुडिओ उघडा असेल अजून. आणि गिरिजाबाई पण भेटतील तूला वाटेतच.

मानसी : जाऊ अशीच, तशी बरी दिसतेय ना मी ? जरा फ़्रेश होते आणि जाते.

अमर : आता जातेस आहेस तर काहितरी गोड घेऊन ये.

मानसी : हो, हो आणते.

( असे म्हणत ती आणलेले सगळे सामान उचलून, त्याच वॉशरुममधे शिरते.
दार बंद करते. अमर परत कॉटवर अवघडून बसतो. मुख्य दारावर हळुवर टकटक होते. दार हळुच उघडून एक माणुस आत येतो. त्याच्या हातात एक चहाचा ट्रे. त्यात एक थेर्मॉस. दोन कपबश्या. साखरेचे वेगळे भांडे. तो ट्रे नीट टेबलावर ठेवतो. चहाची तयारी करतो. कप सुलटे ठेवतो. साखरेचे भांडे उचलून अमरकडे बघतो. अमर त्याला हातानेच खूण करत, चहा करु नकोस, मी घेईन असे सांगतो. तो माणुस कोण करुन देईल असे विचारतो. अमर वॉशरुमकडे हात करतो. तो माणुस, समजलं अश्या अर्थाने मान हलवतो, आणि हळुहळु चालत बाहेर निघुन जातो. अमर चहाकडे आणि रुमच्या दाराकडे जरावेळ बघतो. )

अमर : ( जरा मोठ्याने. वॉशरुमच्या दिशेने बघत ) मानसी चहा आलाय. तू घेणार आहेस ना ?

मानसी: अरे थांब आलेच मी.

( वॉशरुमचे दार उघडून आधीच्या, म्हणजे वयस्कर वेशातील मानसी बाहेर येते. हातातल्या टॉवेलने, ती चेहरा टिपते. केस नीट मागे घेते. परत आता जाऊन टॉवेल ठेवते. आणि बाहेर येते. आता प्रकाशयोजना पुर्वीप्रमाणेच म्हणजे नैसर्गिक असावी. )

अमर : बस, चहा मागवलाय. खायला हवेय का काही ? इथे बिस्किट्स असतील बघ.
सिल्व्ही आणि सायमन आले होते. त्यानी आणली. ( औषधाच्या टेबलाच्या दिशेने बघतो )

( मानसीच्या चेहर्‍यावर किंचीत नाराजी. मानसी चहा करते. साखर घालताना त्याला विचारते. तो एक चमचा असे सांगतो. ते दोघे चहा पितात )

मानसी : नको बिस्किटे नको. सध्या चहाच घेऊ. तूला हवीत का बिस्किटे ?
सिल्व्ही काय म्हणतेय ? खुष आहे ना आता. ? अजुन तुझ्या ऑफ़िसातच जॉब करते का ?

अमर: नाही, तिने कधीच सोडला जॉब. अधुनमधुन फ़ोन करते ऑफ़िसात, त्यावेळी कळले तिला. म्हणुन आली. खुष आहे आता. ती बॅंगलोरला असते आता. तुला जेवायचे असेल ना ? काय मागवू ?

मानसी : छे इतक्यात नको. तसे घरी खाल्लेय मी थोडेसे. तुला काहितरी आणायला हवे होते. पण म्हंटलं तूला काय आवडेल, शिवाय डॉक्टर परवानगी देतील का ते माहित नव्हतं ना ? इथे मिळते का जेवण ? कि मी घेऊन येऊ बाहेरुन काहीतरी ?

अमर : नको. मिळेल इथे. आज बर्‍याच दिवसानी असे समोरासमोर बसलो आहोत आपण. जरा गप्पा मारु या.

मानसी : दिवसानी ? वर्षं झाली असतील. मला तर आठवतच नाही, आपण कधी एकत्र बसून बोललोय असे. मुले त्यांच्या व्यापात, मी माझ्या.

अमर : तरी आपण एकाच घरात राहतोय. विचित्रच आहे ना हे सगळे ?

मानसी : कधी केलास का विचार ? कि नेमक्या कशामूळे आपल्यातला संवाद तूटला.

अमर : आता विचार करुन काय फ़ायदा ? गेलेले दिवस का परत येणार आहेत ?

मानसी : नाहीच यायचे. पण यापुढच्या दिवसांसाठी तरी.

अमर: तूला वाटतय कि परत पहिल्यासारखे होईल.

मानसी : पहिल्यासारखे म्हणजे कसे ? लग्नानंतरचे काहि महिनेच ना ? खुप प्रश्न पडायचे मला त्यावेळी.

अमर : एक विचारू ?

मानसी: ठिक आहे मग मीही विचारीन म्हणते. पण तूला त्रास नाही ना व्हायचा. तू तर नुसता जखडला आहेस बिछान्याला ?

अमर : नाही तसा त्रास नाही व्हायचा. मारामारी थोडीच करायची आहे आपल्याला ?

( तेवढ्यात दारावर ठकठक होते, थोड्यावेळापुर्वी चहा घेऊन आलेला माणूस आत येऊ का विचारतो. अमर त्याला ये म्हणुन सांगतो. तो बेडजवळ आल्यावर अमर त्याला टॉयलेटकडे घेऊन जा, असे सांगतो. तो आधार देतो. मानसी उठुन उभी राहते. अमर लंगडत लंगडत वॉशरुमपर्यंत जातो. मधे त्याचा थोडासा तोल जातो. मानसी आधार देण्यासाठी पुढे होते, पण तो हाताने नको सांगतो. तो वॉशरुममधे जातो, दार बंद करून घेतो. चहा आणायला आलेला माणुस चहाच्या ट्रेची आवरा आवर करतो. मग बेडवरची चादर नीट करतो. चहाचा ट्रे घेऊन जातो. जाताना मानसीला जेवण आणायचे का ते विचारतो. ती मग सांगीन असे म्हणते. मानसी खुर्चीत सैलावुन बसते. क्षणभर अंधार. तेवढ्यात मानसी बेडवर जाऊन आडवी होते. पाठमोरी. आता प्रकाशझोत मुख्य दारावर. त्या दारात तरुणपणीचा अमर उभा आहे. दारातून मोठ्याने हाक मारायला सुरवात करतो. )

अमर : मानसी, ए मानसी. कुठे आहेस ? ( असे म्हणत आत येतो. मानसी बेडवर पाठमोरी पडलेली. ती सावकाश सरळ होते )

मानसी : अरे हळु. बाळ उठेल ना ? आत्ताच झोपलाय.

अमर : ओह. साहेब झोपलेत का ? भरपूर त्रास देतो का तुला तो, दिवसभर. रात्री कसा छान गाढ झोपतो.

मानसी : अरे तुला कळते तरी का तो उठतो ते. तीन चार वेळा तरी उठवतो मला तो. तु इतका गाढ झोपलेला असतोस ना, कि तूला उठवायचा धीर होत नाही. पण आता कमी झालेय उठणे त्याचे. तसा गुणी आहे राजा माझा.

अमर : हो तू म्हणणारच तसे. तुला मुलगाच हवा होता ना.

मानसी : अरे ते काय आपल्या हातात असतं ?

अमर : तसे नाही. पण मला ना एक गोड छोकरी हवी होती. मुलगे सगळे आईला फ़ितुर असतात. लेकी कश्या बापाच्या असतात.

मानसी: अरे मग आणखी एक चान्स घेऊ ?

अमर : नाही गं. परत त्या सगळ्या व्यापातून जायचे म्हणजे. अजुन तुझ्या डिलिव्हरीच्या वेळचे आठवतेय. डॉक्टरानी मला आत बोलावले होते ना.

मानसी : अरे ते सगळे नॉर्मल असते. तेवढ्या पेन्स होतातच.

अमर : शिवाय तुझे खुप नुकसान झाले ना. तुझा अभ्यास राहिला. आता लवकर लाग बघु अभ्यासाला. मी आईला बोलावुन घेईन इथे. मग बाळाचे काही तूला करावे लागणार नाही.

मानसी: अरे आईना कशाला त्रास ? मी एक बाई बघून ठेवल्यात. पुढच्या आठवड्यापासून येतील. त्याना कुणी नाही. इथेच राहतील. मुले संभाळायचा बराच अनुभव आहे त्याना. तू म्हणत असशील तर आणखी दोन चार बाळं संभाळतील त्या.

अमर : मानसी एक विचारू ?

मानसी : अरे त्यात काय विचारायचे ? बोल कि. काही खास ?

अमर : तूला नाही वाटत कि आपल्याला आणखी एक मुलगी असावी.

मानसी: आवडेल रे, पण परत या सगळ्यातून जायला नको वाटतय. म्हणजे म्हणाले मगाशी मी तसे. पण ..

अमर : नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं.

मानसी : मग काय म्हणायचे होते ?

अमर : आपण एखादी मुलगी दत्तक घेऊ या का ?

मानसी : ( जरा विचार करते ) तशी कल्पना वाईट नाही. एखादी संस्था आहे का तूझ्या बघण्यात. कुठे चौकशी केली आहेस का ?

अमर : नाही संस्थेतील नाही. माझ्या ओळखीत आहेत त्या बाई. खरे तर त्यांचे लग्न ठरले होते पण त्या मुलाचा अपघाती मृत्यु झाला. त्या बाईला एकटीला ती मुलगी संभाळणे जमणार नाही. मी विचार करत होतो.

मानसी : अरे पण त्या बाईची तयारी आहे का ? सगळे कायदेशीर असेल ना ?

अमर : तूझा होकार आहे ना ? सगळे कायदेशीर करुन घेऊ. मी बघायला गेलो होतो त्या मुलीला. गोड छोकरी आहे. तिच्या आईची तिला संभाळायची अजिबात तयारी नाही, तिच मला म्हणत होती कुठल्यातरी अनाथाश्रमात सोडून या, हिला म्हणून. त्याचवेळी मनात विचार आला. पण म्हंटलं, आधी तूला विचारून बघू.

मानसी : छान विचार केलास रे. तसं आपल्याला जड नाही जाणार, दोघाना संभाळायला.

अमर : मग मी तूझा होकार आहे, असं समजू ना ?

मानसी : हो. अगदी.

अमर : थांब आत्ताच जाऊन सांगतो, त्या लोकाना. नाहीतर ती छोकरी कुठल्यातरी अनाथाश्रमात जाईल. आणि हो नाव मात्र तू सांगशील ते.

( अमर लगबगीने दाराबाहेर निघून जातो. मानसी थोडावेळ पलंगावर सैलावते. प्रकाश थोडा मंद होतो. तेवढ्यात वॉशरुमच्या आतून अमरच्या हाका ऐकु येतात. ती लगबगीने दरवाज्याजवळ जाते. अरे दार उघड तरी असे म्हणते. आतून थोडे कण्हण्याचे आवाज. ती मुख्य दरवाजा उघडून, नर्सला हाका मारते. तिची धावपळ. आधी जेवण घेऊन आलेला माणुस परत येतो. तो वॉशरुमच्या दरवाज्याजातून आत जातो. मानसी बाहेर उभी. त्याच्या आधाराने अमर बाहेर येतो. परत पुर्वीचाच म्हणजे सध्याचा गेटप. मानसी त्याच्या मागेमागे जाते. बिछान्यावरची चादर नीट करते. त्याला झोपवून तो माणुस निघून जातो. तो गेल्यावर अमर मानसीकडे बघून ओशाळवाणे हसतो. )

अमर : अगं सवय नाही ना अजुन झाली, म्हणुन तोल गेला.

मानसी : आता ठिक आहे ना ?

अमर : हो नक्किच. आत जरा तोल गेला एवढच.

मानसी : चक्कर वगैरे येतेय का ? नर्सला बोलवू ?

अमर : नको. ठिक आहे मी. डॉक्टर येतीलच ना रात्री.

मानसी : काहि हवय का ? चहा, कॉफ़ी ?

अमर : नको, आत्ताच तर झाला चहा. चल आपण गप्पा मारु या.

मानसी : किती दिवसात आपण बोललेलो नाहीत.

अमर : हो ना, आठवतच नाही असे कधी निवांत बसून बोललो ते.

मानसी : वाद होतेल अशी भिती असायची, मूलांसमोर.

अमर : हो ना, आता ती भिती नाही. शिवाय निदान दयाबुद्धीने तु माझे ऐकुन घेशील आता. म्हणजे या अवस्थेत.

मानसी : आणि तू ऐकशील माझे ?

अमर : अर्थात.

मानसी : नेमके कुठे बिनसले रे आपले ? इतक्या वर्षानी काहि आठवतच नाहीये आता.

अमर : आपण दोघेही कसलीतरी अढी मनात धरून बसलो होतो.

मानसी : हो रे. नाहितर आपण दोघेही बर्‍यापैकी सुशिक्षित.

अमर : तू जरा जास्तच. नाही का ?

मानसी : हे मनापासून म्हणतो आहेस का उपरोधाने ?

अमर : (ओशाळत ) मला वाटते आपण दोघेही मनापासूनच बोलू. मी हे जरा उपरोधाने बोललो हे खरे आहे, पण ते सत्यही आहे.

मानसी : हो अमर, आपण शक्यतो सत्य बोलू या. मला वाटतय, बोलणे गरजेचे आहे आता.

अमर: अगदी खरे सांगायचे तर तुझ्या उच्चशिक्षणाची थोडीशी भिती वाटत आलीय मला.

मानसी : मलाहि थोडा गर्व होताच. अजुनही आहे. पण मला पुढे शिकायला प्रोत्साहन तर तूच दिलेस.

अमर : पण तू त्याची जाणीव ठेवली नाहीस. निदान माझा असा ग्रह झाला.

मानसी : मी कधी नेमक्या शब्दात बोलले नाही तूला. पण जाणीव नक्कीच होती.

अमर : तूला नाही वाटत, बोलणे गरजेचे होते. निदान माझ्या समाधानासाठी. निदान माझा इगो सुखावण्यासाठी.

मानसी : नाही जाणवलं ते मला.

अमर : तूला आठवतय आपण टिव्हीवर आनंदी गोपाळ नाटक बघत होतो. त्यावेळी तिच्या आजारपणात, तिचा नवरा तिला कसलेतरी चाटण चाटवतो आणि त्यातच तिचा जीव जातो. तो प्रसंग बघून तू मला म्हणाली होतीस, कि तूपण मला असेच करशील का ?

मानसी : तू लगेच उठून गेलास. दुखावला गेला असशील ते मग जाणवलं मला.

अमर : दुखावलो होतो हे खरेच. म्हणजे आधीच तूझ्या हुशारीची भिती वाटायची.

मानसी : आपण एकमेकाना अनुरुप नव्हतो का रे ? खरे तर बघायला आला होतात, त्याचवेळी म्हणाला होतास, कि पुढे शिकायची इच्छा असेल तर माझी हरकत नाही.

अमर : हो ते खरेय. तूझ्या बाबानी तूझ्या हुशारीची तारिफ़ केली होती. बडेजाव म्हणुन बोलून गेलो.

मानसी : म्हणजे मनापासून नव्हते ते.

अमर : अगदी खरे सांगायचे तर त्यामूळे, आपल्या आयुष्यात काय बदल घडेल हे त्यावेळी लक्षातच आले नव्हते.

मानसी : मी कुठे कमी पडले का ?

अमर : नाही नाही, कमी नाही पडलीस. पण

मानसी : माझी बरिच दमछाक व्हायची. अभ्यास, नोकरी, दोन मुलांची जबाबदारी. स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात, कदाचित तूझ्याकडे दुर्लक्ष झाले असेल. नव्हे झालेच.

अमर : तू मीनाला ज्या तर्‍हेने आपलेसे केलेस, त्याला खरेच तोड नाही. त्यासाठी जन्मभर मी ऋणी राहीन.

मानसी : अमर एका प्रश्नाचे खरे खरे उत्तर देशील ?

अमर : विचार ना ?

मानसी : नको जाऊ दे, तू रागावशील.

अमर : अगं विचार ना.

मानसी : खुप दिवसानी आपल्यात संवाद होतोय. तो थांबेल.

अमर : पण मनात काही शंका असतील, तर त्या संवादाला काय अर्थ उरणार आहे ?

मानसी : मीना तूझी मुलगी आहे का ?

अमर ( क्षणभर गप बसतो. )

मानसी : तूला उत्तर द्यायचे नसेल तर नको देऊस.

अमर : नाही तसे नाही. मीना माझी मुलगी आहे, हि शंका तूला का यावी, याचा विचार करतोय. आणि तू इतक्या वर्षात विचारले का नाहीस, याचा विचार करतोय.

मानसी : शंका येण्यासारखी परिस्थिती होती कि नाही ते सांग. तू ज्या तर्‍हेने निर्णय घेऊन टाकला होतास, माझा होकार गृहितच धरला होतास, त्याने मी खुपच दुखावले गेले. तो दिवस मला लख्ख आठवतोय. मी जरा आजारीच होते. संजु पण त्या दिवशी किरकिर करत होता, तू उशीरा आलास आणि म्हणालास, कि आपण एक बाळ दत्तक घ्यायचे. खरे तर त्या दिवशी मी खुप थकले होते. काहि विचार करायचे त्राणच नव्हते. तूला माझ्या होकाराची गरजही वाटली नाही.

अमर : सिल्व्ही माझ्या ऑफ़िसमधे होती. तिचे आणि तिच्या बॉयफ़्रेंडचे प्रकरण आम्हा सगळ्याना माहित होते. ते लग्न करणार होते, पण तो गल्फ़ला निघून गेला. मग त्यांचा संपर्कच राहिला नाही. तिला मुलगी झाली होती, त्यावेळी आम्ही सगळे बघायला गेलो होतो, त्याचवेळी ती मुलीचे तोंड बघायला तयार नव्हती. तिथल्या काही बायका म्हणाल्या, कि आम्ही मदत करु, तर ती म्हणाली आत्ताच घेऊन जा हिला. मुलगी खुप गोड होती, मला तिला अनाथाश्रमात ठेवायची कल्पनाच सहन झाली नाही.

मानसी : मी विश्वास ठेवु ना ?

अमर : मानसी, खरे तर तूझा मीनाला इतका लळा लावलास, कि तूझ्या मनात असे काहि असेल, याची मला शंकाही आली नाही.

मानसी : तू म्हणतोस तशी मीना गोडच आहे रे. तिचा राग करण्याचा प्रश्नच नव्हता. पण ज्या तर्‍हेने तू निर्णय घेतलास, ते मला सलत होते. तू ते मला कसे सांग़ु शकला असतास, याचा खुप विचार करत असते मी. अगदी आताहि तो प्रसंग डोळ्यासमोर येतो माझ्या.

अमर : पण अशी शंका येण्याचे काहि खास कारण ? माझ्या बोलण्यात तर कधी सिल्वीचा उल्लेख नसायचाच. मीना आपल्याकडे आल्यानंतर महिनाभरातच तिने लग्न केले.

मानसी : तूझ्याच ऑफ़िसमधल्या एका व्यक्तिच्या बोलण्यात असे आले कि, सिल्वी आणि तिच्या बॉयफ़्रेंडमधे वितुष्ट यायला, तू कारणीभूत झालास.

अमर : कोणी सांगितले तूला असे ? आणि तू विश्वास कसा ठेवलास ?

मानसी : त्या व्यक्तिचे नाव घेण्यात काहिच अर्थ नाही आता. पण मी विश्वास ठेवायला नको होता. निदान तूला विचारायला तरी हवे होते. सिल्वीसारख्या चीप बाईबद्दल काय, अश्या वावड्या असणारच.

अमर : परत तू घाईने निर्णय घेतेस. तिच्याबद्दल काय माहित आहे तूला ? खरे तर तिने तिच्या नवर्‍याला सगळे प्रामाणिकपणे सांगितले होते. त्याने तिचा स्वीकार केलाच शिवाय, मीनाला पण घरी आणू या, असे म्हणाला. ते दोघे माझ्या ऑफ़िसमधे आले होते. पण तोपर्यंत मीना वर्षाची झाली होती, संजु मीनाचा छान गट्टि झाली होती. मला कठिण झाले त्यांचा प्रस्ताव स्वीकारणे. तर ते दोघे म्हणाले, तूमच्या घरात तिला काहि कमी पडणार नाही. आम्ही तिची चौकशी करत राहु.

मानसी : अरे, किती समजुतदार आहे माणुस हा.

अमर : आपणही असे असतो तर.

मानसी : सगळ्यांचे विचार नसतात रे सारखे. आता खरेच मोकळे वाटायला लागलेय. मी खरेच तूझा राग राग करत असे.

अमर : खरे तर माझ्याकडूनही दुरावा होताच.

मानसी : म्हणजे माझ्याबद्दल पण असेच काहितरी तूझ्या मनात होते.

अमर : काहीतरी मनात धरुन बसलो होतो खरे.

मानसी : आता बोलायला बसलो आहोतच तर विचारून टाक.

अमर: खरे तर तूझा, आम्हा सगळ्याना सोडून जायचा निर्णय मला पटला नव्हता.

मानसी : पण मी पुढे शिकावे, अशी तुझीच तर इच्छा होती ना.

अमर : अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर, तशी इच्छा होती, पण त्यासाठी स्वतःला काहि त्याग करावा लागेल अशी कल्पना नव्हती.

मानसी : अरे पण त्यासाठी सगळी तयारी मी करुन गेले होते, तसा तूला फ़ारसा त्याग नाही करावा लागला.

अमर : लग्नानंतर सहवासाची अपेक्षा करणे, म्हणजे फार मोठी अपेक्षा आहे का ?

मानसी : ( गप्प बसते )

अमर : जसा तूझ्या मनात सल आहे तसा माझ्याहि मनात आहेच. तूही सर्व परस्पर ठरवून मोकळी झाली होतीस. खरे तर परदेशी जाण्यामागे आणखी काहि कारण असावे, असेच मला वाटत राहिले.

मानसी : म्हणजे मी आणि. . .

अमर : बघ बरोबर ओळखलस, म्हणजे आपण एकाच ट्रॅकवर विचार करत होतो तर.

मानसी : खरे तर ती संधी मलाहि अनपेक्षित होती. वेळ अगदी थोडा होता. पहिला विचार आला तो मुलांचा. त्यांच्याकडे कोण बघेल, या विचारात पुरती अडकली होते.

अमर : आणि माझा विचार नाही करावासा वाटला ?

मानसी : मला वाटले तूझा पर्याय तू निवडला होतास. म्हणजे फक्त मलाच तसे वाटले. पण वाटले. खरे आहे. तूझा विचार नाही केला मी. नाही करावासा वाटला. अगदी खरे सांगू, मी पण माझे निर्णय घेऊ शकते, हे सिद्ध करायचे होते.

अमर : म्हणजे तुझ्यावाचून काहि अडले नाही, असे दाखवायचे होते.

मानसी : अगदी विचित्र तर्‍हेने तूझा तिरस्कार करायला लागले होते मी. अगदी कृर वागले मे तूझ्याशी.

अमर : तूझ्या हुशारीचा त्यावेळीही अभिमानच वाटत होता मला. तू तूझा निर्णय घेताना, माझा सल्ला नाही म्हणणार मी पण विचार घेतला असतास तर…. जसा तूझ्या मनात तो प्रसंग घर करुन राहिलाय तसाच माझ्या मनातही.

मानसी : एखादा निर्णायक क्षण आपले अगळे आयुष्यच बदलून टाकतो नाही ? त्यावेळी केलेली एखादी कृति, पुढे सगळ्या आयुष्यावर परिणाम करुन जाते. मग पुढे आल्यावर कळते कि त्यावेळी आपण तसे वागायला नको होते. पण मग काळ उलटे फ़िरवणे कुणाला जमणार ? मग त्या एका क्षणाचे ओझे पाठीवर घेत आयुष्य ढकलायचे.

अमर : आता सांगायला हरकत नाही, पण तुझ्याबाबतही वेगळाच संशय मी घेतला होतो. म्हणजे आल्फ़्रेड आणि तू.

मानसी : खोटे नाही सांगत. त्याच्या पर्सनालिटीची छाप माझ्यावर नक्कीच पडली होती, पण भुरळ नव्हती. शपथ घेते.

अमर : छे, शपथ वगैरे नको घ्यायला. तूला नाही वाटत कि आपण एकमेकांबाबत खुपच पझेसिव्ह होतो, म्हणून असे झाले असेल. खरे तर सगळे आपल्या मनाचेच खेळ होते. इतकी वर्षे, एका घरात राहुन अनोळखी माणसासारखे जगत राहिलो. मुलांसमोर नाटक करत राहिलो.

मानसी : हो रे, खरे तर तसे मुलांसमोर नीट वागायचे असे काहि ठरले नव्हते आपले, पण एका जाबाबदारीने वागत राहिलो.

अमर : ते नाटक नसून वास्तव असावे, असे अनेकवेळा वाटत राहिले. नव्हे खुपदा ते तसेच वाटत राहिले.

मानसी : हो माझीपण तिच भावना होती.

अमर : फ़ार ताण येत होता का, त्या खोट्या वागण्याचा ?

मानसी : ते वागणे खोटे नव्हते रे, इतरवेळी तूझ्यापासून दूर राहणे खोटे होते, त्याचा ताण येत होता.

अमर : अर्धे आयुष्य या ताणात घालवले, आधी कधी एकमेकांशी असे मनमोकळे बोललो असतो तर !

मानसी : बघ ना त्याच्यासाठी तूला धडपडावे लागले.

अमर : मग यापुढे नाटक थांबवायचे का ?

मानसी : अर्धे आयुष्य तर अजून बाकि आहे ना ?

अमर : हो ना !

( मानसी अमरच्या बेडवर जाऊन बसते. त्याच्या केसातुन हात फ़िरवते, पाठच्या उश्या नीट करते. आणि त्याच्या गळ्यात हात घालते. इथेच पडदा पडतो. )

गुलमोहर: 

दिनेशदा...
अमर आणि मानसी ह्यांच्यात समेट होतानाचे संवाद अजून जास्त हवे होते असे वाटले.. समेट घडताना तो ठामपणे झाल्यासारखा नाही वाटला...
========================
नूतन वर्षाभिनंदन..

वा छान.. खूप दिवसांनी एक चटकदार मराठी नाटक पाहिल्यासारख वाटल.. Happy
एकदम मस्त.. एका दमात वाचून काढलं..:)

हिम, सुचना पटली, पण संवाद होणे यालाच जास्त महत्व होते. मनातले किल्मीष दूर झाले ना.

दिनेश,

मला आवडली एकांकीका. एकदम प्रोफेशनल..

मला "नीर्-क्षीर" म्हणुन टीवी वर नाटक दाखवले त्याची आठवण झाली. (विक्रम गोखले आणी इला भाटे होते त्यात त्यातही दोघांच्या संवादातुन अनेक व्यक्तीरेखा उभ्या केल्या होत्या).
यातही दोघांच्या संवादातुन त्या सगळ्या इतर व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या राहिल्या..खुप छान!

-मनोज

हम्मम्म!

आजकालच्या काळात पण होतात असे गैरसमज! आणि दोघांच्याही (गणगोतांनी भडकवलेल्या) ईगोमुळे अजुन होतात.

तरी नशिब की पोरांपर्यन्त नाही पोहोचले ते!

दिनेश मला ती फ्लॅशबॅक दाखवायची कल्पना फार आवडली.

तरी नशिब की पोरांपर्यन्त नाही पोहोचले ते!>> अनुमोदन jaaijuee

जरासं विषयांतर,
वी द पिपल मधे 'कभी अलविदा ना कहना' वर वादविवाद झाला, तेव्हा एका बाईंनी प्रश्न विचारला होता "How do unhappy parents raise happy children?" सुन्न व्हायला होतं विचार करकरुन.

मस्त जमलिये रे एकांकीका...

खुपच मस्त आहे कथा... गैर् समज होउन किति आयुश्यआ तिल सुखद क्शण आपण वाया घआलवतो
हे कळते. वाचाय् ला आन् द वाट्ला.
अश्यआच कथा लिहित रहा.
शुभेच्छा.

अदिती.

अहाहा!!... विषय सुंदर आणि हाताळणी सुरेखच!
दिनेश मला ती फ्लॅशबॅक दाखवायची कल्पना फार आवडली.>> SRK अनुमोदन!
एकदम प्रोफेशनल..>> manasmi18.. तुलाही मोदक!

आभार सगळ्यांचे. माझा पहिलाच प्रयत्न होता हा.
खरे तर त्या प्रसंगाना फ्लॅशबॅक नाही म्हणता येणार. त्या प्रसंगी जोडीदाराने कसे वागायला हवे होते, याचे स्वप्न आहे ते. वास्तवातले ते प्रसंग वेगळेच होते.

कथा-कल्पना छानच आहे पण मला अजूनही वाटते की हा विषय कादंबरीचा होता, एकांकिकेचा नव्हता.पण शेवटी लेखकाचा निर्णय अंतिम!
बापू करन्दिकर

व्वा, छानच लिहिल्ये
मलाही ती फ्लॅशबॅक दाखवायची कल्पना फार आवडली.

सुधीर

नमस्कार दिनेश,
तुम्ही लिहीलेली एकांकीका खुपच आवडली!! फ्लॅशबॅकची कल्पना मस्तच आहे!!

त्या प्रसंगी जोडीदाराने कसे वागायला हवे होते, याचे स्वप्न आहे ते. वास्तवातले ते प्रसंग वेगळेच होते.>> असं होतं होय? मला तो फ्लॅशबॅकच वाटला. आणि फ्लॅशबॅक म्हणूनच भावला खरं तर. आताचे दोघांचेही संवाद प्रामाणिक वाटले.. मनापासून आलेले वाटले. समरसून लिहिलंत दिनेशदा अगदी. कधी कधी वयाबरोबर येतं शहाणपण असं म्हणायला हरकत नाही एकंदरीत. छान मांडलीत एकांकीका. आवडली!

दिनेशदा तुमची एकांकीका मला फार आवडली. माझे ही या वषी कि॑वा पुढच्या वषी लग्न होईल. मी खुप काही गोष्टी मनात ठेवते. आपल्या मनात कोणत्याही व्यती बद्द्ल काही श॑का असतील तर त्या विचारल्याने त्याला त्रास होईल कि॑वा त्याला वाईट वाटेल. हा विचार मी करत असते. thanks a lot माझ्या विचारात थोडा बद्द्ल केल्यामुळे या गोष्टीचा माझ्या भावी आयुष्यात खुप उपयोग होईल.

त्या प्रसंगी जोडीदाराने कसे वागायला हवे होते, याचे स्वप्न आहे ते. वास्तवातले ते प्रसंग वेगळेच होते.>> असं होतं होय? मला तो फ्लॅशबॅकच वाटला. आणि फ्लॅशबॅक म्हणूनच भावला खरं तर. >> अनुमोदन!!!

खरंय... वाद होतील म्हणून मीही संवाद टाळत असते... पण त्याने संवादच हरवला तर??? भविष्याची सैरच घडवून आणली या एकांकिकेने... ते ते गैरसमज त्या त्या वेळेस दूर करणे आधिक फायदेशीर असते सगळ्या कुटुंबासाठी! ते गैरसमज मनात घेऊन ते ओझं जन्मभर घेऊन जगायचं म्हणजे...

धन्स दिनेशदा! एक अतिशय तरल विषय, उत्कृष्ट मांडणी! पण संवाद होणे यालाच जास्त महत्व होते. मनातले किल्मीष दूर झाले ना.>> १००% पटले! Happy

दिनेशदा मस्त लिहिली आहे. प्रासंगिक फ्लॅशबॅक ही संकल्पना आवडली. त्यामुळे पात्र समजुन घ्यायला मदत झाली.