आयुष्याला वळण देणारी मायबोली

Submitted by अभय आर्वीकर on 23 May, 2012 - 04:56

आयुष्याला वळण देणारी मायबोली

नातीगोती अनेक तर्‍हेची असू शकतात.
नातीगोती माणसांची माणसांशीच असतात असेही नाही.
ऋणानुबंध चकोराचे चंद्रकिरणांशी किंवा ....
चातकाचे मृग नक्षत्रात बरसणार्‍या पहिल्या-पहिल्या टपोर थेंबाशीही असू शकतात.
नाते कधी रक्ताचे तर कधी स्नेहबंधनातून निर्माण झालेले असू असतात.

            नात्याचा लौकिक प्रकार कोणताही असला तरी ज्या ॠणानुबंधनातून आत्मिक अलौकिकतेचा आनंद झिरपून मनाला नि:स्पृह निर्माल्यतेची अवस्था प्राप्त होत असते, त्या स्नेहबंधाचे धागे मनामध्ये फार खोलवर गुंतलेले आणि अतूट असतात, शब्दातीत असतात.

            माझाही असाच एक धागा जुळलाय मायबोलीशी. शब्दात न सामावू शकणारा.

या कहाणीची सुरुवात तशी फार जुनी नाही. उण्यापुर्‍या दोन-अडीच वर्षातली; पण माझे अख्खे आयुष्य बदलून टाकणारी. आयुष्याला नवे वळण देऊन कलाटणी देणारी. 

        तसा मी स्वतःला फार भाग्यवान समजतो कारण जे आयुष्य माझ्या वाट्याला आलं ते फारच चित्रविचित्र विविधतेने नटलेलं आहे. दु:ख, वेदना, यातना मिळाल्यात त्या पराकोटीच्याच; पण सौख्य, आनंद, सन्मान मिळाला तोही पराकोटीचाच. अवहेलना झाली ती पराकोटीची; पण आदरभाव मिळाला तोही पराकोटीचाच. साडेसातीने आयुष्याच्या पूर्वार्धात घेतलेली कसोटी पराकोटीचीच; पण उत्तरार्धात जे छप्परफ़ाड दान दिले तेही पराकोटीचेच. मध्यम किंवा सरासरी स्वरूपाचे जीवन कसे म्हणून माझ्या वाट्याला आलेच नाही. अगदी दैवाने दिला तो रक्तगट सुद्धा अत्यंत तुरळक वर्गवारीत मोडणारा आहे.

             मी आज सांगणार आहे त्या कहाणीची सुरुवात झालीय २५ नोव्हेंबर २००९ रोज मंगळवार या दिवशी. रात्री ९ वाजून २८ मिनिटांनी मी "औंदाचा पाऊस" ही माझी कविता मायबोलीवर प्रकाशित केली आणि लगेच केवळ ४ मिनिटात 'श्री' यांचा पहिला प्रतिसाद पाहायला मिळाला. माझ्या संबंध आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या कवितेला चांगले म्हटले होते. तो माझ्यासाठी अभूतपूर्व क्षण होता. पाठोपाठ चंपक, कौतुक शिरोडकर, मुकुंददादा कर्णिक, गिरीश कुळकर्णी यांचे प्रतिसाद आलेत आणि याच प्रतिसादांनी माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. माझ्यातला आत्मविश्वास जागवला आणि आजपर्यंत माझ्या शरीराच्या कोणत्या तरी कप्प्यात उतानाचीत झोपून असलेला कवी खडबडून जागा झाला.

      मी त्यापूर्वी कविता लिहिल्याच नव्हत्या असे नाही. मी मॅट्रिकमध्ये असताना १९७८ मध्ये श्री सती जाणकुमातेवर आणि श्री संत गजानन महाराजांवर काही भजने लिहिली होती. ती भजनी मंडळींना एवढी आवडली होती की त्यांनी वर्गणी करून ”गजानन भजनावली" नावाचे पुस्तक प्रकाशित केले होते. पहिल्या आवृत्तीत १००० प्रती मुद्रित करण्यात आल्या होत्या. पैकी काही प्रती आपसात वाटून घेतल्यानंतर उरलेल्या सहा-सातशे प्रती शेगाव येथे विक्रीला दिल्या. आश्चर्याची बाब अशी की, त्या सर्व प्रती केवळ एका पंधरवड्यात विकल्या गेल्या. नंतर ”गजानन भजनावली" ची मागणी करणार्‍या ऑर्डर पोस्टाव्दारे नियमितपणे येतच होत्या. पण दुसरी आवृत्ती काही निघाली नाही आणि तो विषय तेथेच संपला.

       त्यानंतर १९८४-८५ च्या सुमारास मी “बरं झालं देवा बाप्पा” ही पहिली कविता लिहिली. ती कविता शेतकरी संघटनेचे मुखपत्र असलेल्या शेतकरी संघटकच्या “ग्रामीण अनुभूती विशेषांक” (२६ जुलै १९८५) मध्ये प्रकाशित झाल्यानंतर वेगवेगळ्या शेतकरी आंदोलनात कार्यकर्त्यांकडून त्या कवितेचे थोडेफार वाचन/गायनही झाले. श्री विनय हर्डीकर यांनी लिहिलेल्या “जग बदल घालुनी घाव” आणि “विठोबाची अंगी” या दोन पुस्तकात त्या कवितेचा उल्लेख झाला, दोन वृत्तपत्रीय स्तंभलेखात सुद्धा त्या कवितेचा उल्लेख झाला. आणि महत्त्वाचे म्हणजे मा. शरद जोशींनी “आठवड्याचा ग्यानबा” (०५ ऑक्टोबर १९८७) या साप्ताहिकात लिहिलेल्या एका लेखाचे शीर्षकही “बरं झालं देवा बाप्पा” असेच होते. माझ्या पहिल्याच कवितेची एवढी दखल घेतली गेल्यामुळे तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मात्र ही रचना कवितेपेक्षा गीताकडेच अधिक झुकणारी असल्याची मला जाणीव असल्याने मी कविताही लिहू शकतो, असा विश्वास काही मला मिळाला नाही. 

       त्यानंतरच्या काळात मी १०-१२ कविता लिहिल्या. त्यातील काही कविता लोकमत, लोकसत्ता व तरुण भारत यासारख्या नामांकित वृत्तपत्रात छापूनही आल्यात. ज्यांनी वाचल्यात त्यांनी मला कविता वाचल्याबद्दल आवर्जून सांगितले पण अगदी निर्विकार चेहर्‍याने. त्यांचा चेहरा वाचताना माझी कविता बरी असावी असा मात्र पुसटसा सुद्धा अंदाज न आल्याने माझी कविता अगदीच सुमार दर्जाची असावी, अशी माझी खात्री पटत गेली. त्यानंतर माझी कविता फुलायच्या आतच करपून गेली कारण भाकरीचा शोध घेण्यातच त्यानंतरचा सर्व काळ खर्ची पडला. आणि काळाच्या वाहत्या प्रवाहाच्या उसळत्या लाटांमध्ये कविता लिहिण्याची प्रेरणा व ऊर्मी कशी दबून गेली ते कळलेच नाही.

“शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली 
स्वप्नेच वांझ झाली, तारुण्य जाळताना” 

       आयुष्याची अशी अवस्था चक्क दोन तपापेक्षाही अधिक काळ तशीच कायम होती. मात्र २५ नोव्हेंबर २००९ रोजी “औंदाचा पाऊस” ही कविता ‘मायबोली’ वर प्रकाशित झाली. त्या कवितेवर मिळालेल्या अभूतपूर्व अभिप्रायानेच कदाचित माझ्यातला कवी पुन्हा जागृत झाला असावा आणि इतका प्रदीर्घ काळ कोंडमारा झालेली मनातील भावना शब्दबद्ध होवून कवितेचा आकार घेत अवतरीत झाली असावी. कारण त्यानंतर कविता लिहिण्याचा वेग इतका जास्त होता की...... ते माझ्यापेक्षा माबोकरांनाच जास्त माहीत आहे. नोव्हेंबर २००९ ते ऑगष्ट २०१० या नऊ महिन्याच्या काळात माझ्या हातून ८० पेक्षा जास्त कविता लिहिल्या गेल्यात.....

आणि नोव्हेंबर २०१० मध्ये प्रकाशित झाला माझा पहिलावहिला काव्यसंग्रह - "रानमेवा" 

रानमेवाच्या प्रास्ताविकात मायबोली आणि माबोकरांचा मी अगदी प्रांजळपणे ऋणनिर्देश केलेला आहेच.

         वयाच्या ४६ व्या वर्षी मी मायबोलीवर आलो, कवितेचा श्रीगणेशा केला आणि ४७ व्या वर्षी अधिकृतपणे कवी झालो.

             मायबोलीने मला भाषेची शुद्धता शिकवली, व्याकरण शिकवले, वृत्त शिकवले, गझलेचा आकृतिबंध शिकवला आणि १५ दिवसाच्या कालावधीत मी चक्क गझलकार झालो. गझलेच्या प्रवासात मला सर्वांचा नामनिर्देश करणे शक्य नसले तरी छाया देसाई, शरद, चिन्नु, ......... या माबोकरांचे जे भरीव सहकार्य लाभले आणि मिलिंद छत्रे "मिल्या" यांचा मानसिक आधार मिळाला, ते मी विसरायचे ठरवले तरी विसरूच शकणार नाही.

            मायबोलीवर माझा झालेला चंचुप्रवेशही थोडा मजेशीरच म्हणावा लागेल. नोव्हेंबर २००९ च्या पहिल्या आठवड्यात मी घरी संगणक आणला, इंटरनेट कनेक्टीव्हीटी घेतली. तेव्हा विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या हा ज्वलंत प्रश्न झालेला होता. आंतरजालावर या संबंधात कुणी काही लिहिले आहे काय? हे शोधायचे म्हणून मी गूगल सर्च बॉक्समध्ये मी "शेतकरी आत्महत्या" हा शब्द टाकला आणि क्लिक केले. मला दोन लेख मिळालेत. पहिला होता ब्लॉगवरील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी लिना मेहेंदळे यांचा आणि दुसरा होता मायबोलीवरील लक्ष्मण सोनवणे यांचा. मी दोन्ही लेख वाचले पण समाधान झाले नाही. माझ्या मनात जे खदखदतेय ते व्यक्त करायलाच हवे, या एकमेव प्रेरणेने मायबोलीचे सदस्यत्व घेतले; आणि माबोवर पहिला लेख लिहिला, 'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे' .या लेखाची माबोकरांनी दखल घेतली. धमासान चर्चा झाली. आपण वाचकांचे लक्ष वेधून घेण्याइतपत किंवा वाचकांना चर्चेस प्रवृत्त करण्याइतपत चांगले लेखन करू शकतो, असा आत्मविश्वास मला या लेखाने दिला. चर्चेच्या ओघात एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी माझा एक स्वानुभव कथन केला आणि अनपेक्षितपणे जन्माला आला "वांगे अमर रहे!" हा माझ्या जीवनातला पहिला ललितलेख. हाच लेख मला एका स्पर्धेमध्ये पुरस्कार देऊन गेला.

          माबोकर नानबा यांनी "एखाद्या माणसानं कधीच शेती केली नसेल - आणि त्याला शेती करायची असेल तर कुठले मुद्दे विचारात घ्यावेत?" असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर द्यायचे म्हणून मी जे काही खरडले, ती खरड म्हणजे "शेतकरी पात्रता निकष". हा लेख श्री श्रीकांत उमरीकर यांना एवढा आवडला की त्यांनी भरसभेत त्या लेखाचे कौतुक करून "शेतकरी संघटक" मध्ये प्रकाशित केला.

      सध्या मी औरंगाबादवरून प्रकाशित होणार्‍या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोचणार्‍या पाक्षिक "शेतकरी संघटक" मध्ये नियमितपणे "वाङ्मयशेती" या सदराखाली लेखमाला लिहितोय. कोल्हापूरवरून प्रकाशित होणार्‍या "शेतीप्रगती" या मासिकात, ठाण्यावरून प्रकाशित होणार्‍या "अमृत कलश" आणि राज्यातल्या इतर ३० दैनिक/साप्ताहिकात माझे लेखन नियमित प्रकाशित होत आहेत.

       एका मोठ्या दैनिकाने दिवाळी विशेषांकासाठी पत्र पाठवून माझा लेख मागवून घेतला तर काहींनी कविता. मुद्रित माध्यमातील दिवाळी विशेषांकात माझे साहित्य प्रकाशित झालेली यंदाची माझी पहिली दिवाळी ठरली आहे. यंदाच्या लोकमत, पुण्यनगरी, सकाळ, शेतीप्रगती, तरुण भारतच्या दिवाळी अंकात कविता आणि देशोन्नती व  शेतीप्रगतीच्या दिवाळी अंकात माझे लेख प्रकाशित झालेले आहेत.

      आज मी कवी, गझलकार आणि लेखक म्हणून नावारूपास आलो असेल तर ती केवळ मायबोलीची किमया आहे.  मी जर मायबोलीवर आलो नसतो तर काय झाले असते, ठाऊक नाही पण मी कवी, गझलकार आणि लेखक नक्किच झालो नसतो.

                                                                                                                      - गंगाधर मुटे
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
टीप - हा लेख मी ऑक्टोंबर - ११ मध्ये लिहून "मायबोली हितगूज दिवाळी विशेषांका"साठी पाठवला होता. पण मुदत निघून गेल्यावर बराच उशिरा पाठवल्याने संपादक मंडळाला दिवाळी अंकात प्रकाशित करता आला नसावा.

गुलमोहर: 

अवघ्या २ वर्षात कुठच्या कुठं पोचलात मुटे.... खूप खूप अभिनंदन!!
आय्ला १० वर्ष झाली आम्ही कविता खरडतोय... कुण्णी छापत नाय्य ओ...काही आयडिया द्या ना !!

मायबोली म्हणजे आनंदाचा ठेवा !
मायबोली म्हणजे प्रोत्साहन !
मायबोली म्हणजे आधारवड !
मायबोली म्हणजे पाठीवर थाप !
मायबोली म्हणजे निर्मल प्रेम !

मायबोली म्हणजे तुम्ही आम्ही , सर्वच, छोट्याशा जगाचे प्रवासी

आणि १५ दिवसाच्या कालावधीत मी चक्क गझलकार झालो.>>

अभिनंदन

(अवांतर- मायबोलीने आता 'सदस्यत्व घ्या आणि केवळ पंधरा दिवसात गझलकार व्हा' असे पॅकेज काढायला हरकत नाही. मुटे, माझे हे वाक्य कटू वाटू नये याचा मी फार प्रयत्न केला. पण तुमच्या एकेकाळच्या कवितेवर माझंही प्रेमंच आहे आणि त्यामुळेच तुमच्या काव्यावर लिहिलेला लेख पुनर्प्रकाशित करत आहे. पण हा सदर लेख मात्र अनावश्यक आहे असे माझे मत. )

फार आनंद झाला श्री.गंगाधर मुटे यांचा हा "लेखनप्रवास" वाचताना. इथे त्यांचे अन्य लेखन वाचण्यापूर्वीही एकदा त्यानी 'बळीराजा' इथे शेतकरी संघटनेचे अग्रणी नेते श्री.शरद जोशी यांच्यावर वाढदिवसानिमित्य लिहिलेला लेख वाचला होता. त्या लेखातील
"सरकारच्या धोरणापायी, छक्के-पंजे आटले
बरं झालं देवाबाप्पा, शरद जोशी भेटले..."

या ओळींनी पटकन लक्ष वेधून घेतले आणि त्यानंतर मला बळीराजा आणि स्वत: मुटेसरांचा ब्लॉग वाचण्याचा छंदच लागला. त्यानंतर मी जेव्हा 'मायबोली'चा सदस्य झाला त्यावेळी येथील सदस्यांत 'गंगाधर मुटे' नाव दिसल्यावर हर्षभरीतच झालो....प्रतिसादातून ओळखही झाली. पण मी स्वतः शेतकरी नसूनही मुटेंच्या शेतीविषयक प्रश्नांच्या, समस्येंच्या पिकात असा काही घुसलो की वाटू लागले किती सखोल अभ्यास आहे या व्यक्तीचा या विषयातील अनेकविध बाबींशी ! त्यातही त्यांची ते विचार मांडण्याची हातोटी विलक्षण आहे. सरस्वती प्रसन्न झाली आहे त्यांच्या बोटात; तर हृदयी वसली आहे शेतकर्‍याविषयीची तळमळ.

'मीमराठी' च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या मराठी गझलेला ("कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?") प्रथम पारितोषिक मिळाले आणि त्याच्या पुण्यातील पारितोषिक वितरण समारंभास अगदी थेट वर्ध्याहून खुद्द गंगाधर मुटे हजर राहाणार असल्याचे संघटकांचा मला फोन आला, त्याच क्षणी हे निमित्त साधून मुटेसरांना कडकडून भेटण्याची संधी घ्यायचीच असे ठरविले....आणि जेव्हा ते प्रत्यक्षात घडले त्यावेळी झालेला आनंद आगळाच.

श्री.गंगाधर मुटे आपल्या साहित्यसफरीचे श्रेय 'मायबोली' ला देत आहेत ते अत्यंत योग्य आणि उचीतच आहे असे म्हणावे लागले. लेखक कवी चित्रकार छायाचित्रकार आपल्या कृती शब्दरूप करतात खरे, पण त्याला वेळीच योग्य ते स्थान तसेच योग्य ती दाद मिळाली तरच त्यांच्या प्रज्ञेला नवे धुमारे फुटतात, त्यांची प्रतिभा बहरून येण्यास मदत होते....नेमके मायबोलीकरांनी श्री.मुटे यांच्याबाबतीत केले आहे असे ते स्वत:च मानतात यात त्यांची विनयशीलता जितकी मोठी तितकेच मोठे श्रेय 'मायबोली'लाही दिले पाहिजे.

श्री.गंगाधर मुटे यांच्या लेखनप्रवासास अनेक शुभेच्छा.

अशोक पाटील

हे चक्क पोझिंग आहे.

लेख लिहीण्याचा उद्देश मायबोलीचे ऋणनिर्देश करण्याचा नक्कीच नाही. गेल्या दोन तीन दिवसांत मायबोलीला नावे ठेवून झालेली ही उपरती आहे हे स्पष्ट आहे.

अनावश्यक!!

कणखर आणि बेफिकीर यांना मुटेंचे यश पाहवत नसल्याचे स्पस्ट दिसते आहे... या गोष्टीचा निषेध..!!

अवांतर : कमाल आहे, जर करतंय कुणी व्यक्त ग्रॅटिट्यूड तर तेही करण्याची सोय नाही..? जिथे तिथे "असेल हो.....पण, मला काय वाटतं" करत मते थोपण्यास सरसावायला हवेच आहे का.

अशोकजी तुमची पोस्ट लेखाला अगदी साजेशी आहे Happy
मुटेजी, पुन्हा एकदा अभिनंदन, कायम असा प्रगतीचा आलेख आपुलकीने वाचण्यासही आवडेल. धन्यवाद Happy

-शाम | 23 May, 2012 - 15:13 नवीन
कणखर आणि बेफिकीर यांना मुटेंचे यश पाहवत नसल्याचे स्पस्ट दिसते आहे... या गोष्टीचा निषेध..!!>>

Lol

मुटेजी, पुन्हा एकदा अभिनंदन, कायम असा प्रगतीचा आलेख आपुलकीने वाचण्यासही आवडेल>>>> १००% अनुमोदन.... ऑटोअपडेट हे एक ऑप्शन अ‍ॅडमीन पुरवतात असे ऐकून आहे.

असेच लिहित रहा.>>> दक्षिणा, मग कविता, गझल , लेख केव्हा लिहणार ते.

मुटेजी......... बेफिकीर...... कणखर........ शाम............

असेच लिहित राहा Happy

मुटेजींना पुढील लेखनास आणि बेफी, कणखर आणि शाम यांना पुढील प्रतिसादांस शुभेच्छा !!!! Happy

सत्यमेव जयते....!!!

मुटेजी

तुमचा वरिल लेख प्रामाणिक वाटला. तुम्ही मनापासुन मायबोलीचे आभार मानले आहेत. तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा.

>>> आपल्याला ज्यातले काही माहीत नाही त्यात 'कमाल आहे, हे करायला हवेच आहे का' वगैरे मतपिंका टाकणे विनोदी आहे.<<<<

बेफिकिर साहेब,
तुम्हाला सारेच काही कळते, असे गृहीत जरी धरले तरी प्रत्येक ठिकाणी तुम्ही आपल्या दर्पोक्तीपूर्ण भाषेत नाक खुपसले पाहीजे, हे तरी आवश्यक आहे काय?

बेफिकिर साहेब,
तुम्हाला सारेच काही कळते, असे गृहीत जरी धरले तरी प्रत्येक ठिकाणी तुम्ही आपल्या दर्पोक्तीपूर्ण भाषेत नाक खुपसले पाहीजे, हे तरी आवश्यक आहे काय?<<< +१००

Pages