तूच तर आहेस या धरणीचा चित्रकार...!!!

Submitted by स्मितहास्य on 17 May, 2012 - 01:31

झालं! अंगाचा चिकचिकाट संपण्यात आलाय, पाठीवर घामाने थबथबणारे शर्ट मिरवणारे जीव आतूर झालेत, पोरं पार वैतागलीत...... पण एक अनाहूत हूरहूर मनात दाटलीये, तू येण्याची.

कसे-बसे बाबा हे महीने काढलेत आम्ही. आता अजून फक्त दोन आठवडे. असा काही ये की, ढगांचे नगारे आणि विजांच्या ताशांचा हलकल्लोळ माजावा. टपरीवरच्या टपटपणार्‍या थेंबांनी असा काही लेझीमताल धरावा की बास. असा काही बरस की, मन चिंब होऊदे, आम्हाला पार भिजवून टाक, सगळं काही जिथल्या-तिथे फेकून तुझ्यात सामावंस वाटूदे.

तू येण्याची वर्दी आम्ही रोज वाचत आहोतंच. आता येशील तर रहा चांगला काही महिने. अशी काही बैठक मांड की रस्त्यावर झाडांच्या पानांचा अन् फुलांचा सडा पडूदे. ट्रॅफिकचा प्रश्न काही केल्या सुटणारे नाहीए त्यामुळे तू त्याची काळजी करू नकोस. रस्ते तुंबव, चिखलात गाड्या माखूदेत.

सगळीकडे मग रंगीबेरंगी छत्र्या दिसू लागतील, कडे-कडेनं जाणारी माणसं मधून-मधून तुझ्या जोराची कल्पना घेतील, आम्ही आमच्या वस्तू कसल्याश्या पिशवीत गुंडाळून ठेवू.

कोपर्‍यावर ती त्याला बिलगून उभी असेल. काही जागा फक्त "त्यां" च्यासाठीच राखीव असतील. त्यांच्या चिंब मिठीच्या कवेत शिरायला मुंगीलापण जागा नसेल. मधेच कुठेतरी भज्यांचा वास घुमेल, रटरटणार्‍या विस्तवावर भुट्टे भाजत असतील.

सबंध धरणीवर तू कोसळशील, डोंगर हिरवी शाल पांघरण्यास सरसावतील, धुक्याचा अंमल दर्‍यांवर असेल. शांत असलेले धबधबे आपल्या जलप्रपात दाखवतील. मग आमच्यासारखे काही भटके सह्याद्रीच्या हाकेला ओ देतील, फक्कड बेत जमतील, तिथेच तळ ठोकला जाईल. कॅमेरे सरसावतील, पुन्हा एकदा सह्याद्रीची पोरं एकमेकांना भेटतील.

या सगळ्यांना एकत्र बांधणारा एकुलता एक दिवा म्हणजे तूच की रे.... आलास की ठोक चांगला तळ, जीवांना शांत कर, कधी संततधार बनून तर कधी हलकीच एक सर मारून.

ये आता लवकर, फार वेळ वाट बघवंत नाही... तूच तर आहेस या धरणीचा चित्रकार...!!!

=============================================================================

गुलमोहर: 

<<<<ये आता लवकर, फार वेळ वाट बघवंत नाही... तूच तर आहेस या धरणीचा चित्रकार...!!!>>>अगदी , अगदी.
सहि जमलाय लेख. जागु म्हणते तस खरच उन्हाळ्यात गारवा आणला.