उद्या म्हणजे ५ मे २०१२ ला नौशादजींना जाऊन ६ वर्षे होतील. ईस्लाम धर्मात पुण्यतिथी वगैरे असते की नाही ते माहिती नाही पण मी आणि माझे काही मित्र दरवर्षी जितक्या श्रद्धेने ३१ जुलैला रफींची पुण्यतिथी साजरी करतो तितक्याच श्रद्धेने गेली ४ वर्षे नौशादजींची पुण्यतिथीही साजरी करतो. साजरी करतो म्हणजे काय, एकत्र जमतो. त्यांची गाणी पहातो, ऐकतो, काही प्रमाणात म्हणण्याचाही प्रयत्न करतो. वैयक्तिक आयुष्यात माझ्यावर नौशादजींच्या संगीताचा जास्त पगडा आहे. मी जे काय थोडं-बहूत (लोकांच्या मानाने थोडं, माझ्या दृष्टीने बहूत :फिदी:) शास्त्रिय संगीत शिकलो त्याला नौशादजींची गाणी (मुख्यतः रफीने गायलेली) गाण्याचा अट्टाहास कारणीभूत ठरला.
हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ ज्याला म्हटलं जातं त्याची सुरवात नौशादजींनी केली. तांत्रीकदृष्ट्या सांगायचं झालं तर १९४२ च्या शारदा पासून १९६८ च्या संघर्ष पर्यंत २६ वर्षात ५ हिरक महोत्सवी (१९४४ - रतन, १९४६ - अनमोल घडी, १९५२ - बैजू बावरा, १९५७ - मदर ईंडीया आणि १९६० - मुघल-ए-आझम), १२ सुवर्णमहोत्सवी आणि तब्बल ३५ रौप्यमहोत्सवी चित्रपटांचं संगीत नौशादजींचं होतं. त्यांच्या हिरक महोत्सवी चित्रपटांची नावं बघीतली तर पहिले दोन चित्रपट आणि बैजू बावरा हे केवळ आणि केवळ नौशादजींच्या संगीताने तारले होते.
हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातला असा एकही राग नाही ज्यावर आधारित नौशादजींचं एकतरी गाणं नाही असं म्हटलं जातं. ही कदाचित त्यांच्या (माझ्यासारख्याच) चाहत्यांची अतिशयोक्तीही असू शकते. पण त्या मागे नौशादजींच्या अलौकीक प्रतिभेचे कौतूक आणि आदर आहे. रफी आणि नौशाद यांच्या स्नेहबंधाबद्दल मा.बो. वरील काही रसिक आणखी प्रभावीपणे लिहू शकतील. म्हणून मी तो भाग शक्यतो टाळतोय. पण नौशादजींच्या संगीतातून रफीला वेगळा काढणे केवळ अशक्य आहे. रफीच्या आवाजाच्या रेंजचा, त्याच्या क्लासिकल वरील हुकुमतीचा, वेगवेगळे प्रयोग करण्याच्या तयारीचा सर्वात जास्त आणि अप्रतिम वापर जर कुणी केला असेल तर तो नौशादजींनीच.
हिंदी चित्रपट संगीतातले काही ठळक आणि वेगळे प्रयोग करण्याचं श्रेय मात्र नौशादजींकडेच जातं. खरंतर शास्त्रिय संगीत हाच त्यांचा पाया असला तरी याही क्षेत्रातले बर्मनदादा, शंकर जयकिशन यासारख्या समांतर संगीतकारांची स्पर्धा त्यांना होतीच. पण या सर्वातूनही आपला बाज न बदलता वर्षानू वर्ष टिकून रहाणे या साठी मेहनत आणि सृजनशिलतेची आवश्यकता असते. पं. पलूस्कर आणि खाँसाहेब आमिरखान यासारख्या दिग्गजांना बैजू बावरा साठी केवळ साडे-सहा मिनीटांच्या जुगलबंदीसाठी ( आज गावत मन मेरो झुमके) तयार करणे, हिंदी चित्रपट संगीतकारांना दारातही उभे न करणार्या खाँसाहेब बडे गुलाम अली खान यांच्याकडून मुघल-ए-आझम साठी चक्क दोन बंदिशी गावून घेणे, महेंद्र कपूर सारख्या गुणी गायकाला पहिली संधी देणे (सोहनी-महिवाल) ही आणि अशीच काही नौशादजींची ठळक योगदानं.
बैजू-बावरा हा चित्रपट तर त्यांनी अक्षरश: निर्धाराने (विडा उचलल्यासारखा) केवळ आपल्या संगीताच्या जोरावर हिरक-महोत्सवी केला. या चित्रपटाचे निर्माते जरी प्रकाश भट असले तरी या चित्रपटाची खरी निर्मीती नौशादजींचीच होती. आपल्या मित्रासाठी त्यांनी दिलेले हे योगदान होते. त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली. उडन खटोला हे त्यातले ठळक नाव. गुलाम मोहम्मद यांनी काही काळ त्यांच्या सहाय्यकाची भुमिका केली होती. त्यामुळेच पुढे स्वतंत्र संगीतकार म्हणून गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेल्या पाकिजाचे पार्श्वसंगीत गुलाम मोहम्मद यांच्या निधनानंतर नौशादजींनी पुर्ण केलं. पाकिजा न पाहिलेल्यांना (माबो वर असा माणूस विरळाच) या पार्श्वसंगीताची गंमत कदाचित कळणार नाही. कारण चित्रपटाच्या संगीताच्या एल.पी. रेकॉर्डस, कॅसेटस, सी.डी.ज वर जितकी गाणी आहेत तितकीच किंबहून थोडी जास्तच गाणी (लताच्या स्वर्गिय आवाजात) या पार्श्वसंगीतात लपली आहेत जी केवळ चित्रपट पाहतानाच ऐकायला मिळतात.
पण नौशादजींच्या प्रयोग करण्याच्या हौसेमुळे काही वेळेला त्यांचं संगीत हे केवळ ऐकायला छान आणि म्हणायला कठिण बनलं. सामान्य संगीतरसिकांना काहीसं अडचणीचं भासू लागलं. रफीला देखील याचा काही वेळेला त्रास झाला. उदा. बैजू बावरा मधलं "ओ दुनिया के रखवाले" गाताना ताण असह्य होऊन रफीच्या नाकाचा घुळणा फुटला आणि रक्त वाहू लागलं. पण त्याही स्थितीत त्याने ते गाणं पुर्ण केलं. तिच गोष्ट मुघल-ए-आझम मधल्या "जिंदाबाद ऐ मुहोब्बत जिंदाबाद" या गाण्याची. त्या गाण्याच्या तिसर्या कडव्यातली शेवटची ओळ - जिसके दिलमें प्यार न हो, वो पत्थर है ईन्सान कहाँ - हे म्हटल्यानंतर रफी अक्षरशः ओरडलाय.
नौशादजींचं निधन जरी २००६ साली झालं असलं तरी १९६८ नंतर त्यांचं संगीतक्षेत्रातलं योगदान नगण्यच होतं. एकाएकी प्रतिभेचा झरा असा कसा आटू शकतो हे एक कोडंच आहे. पण जेवढं काही त्यांनी त्या २६ वर्षात दिलयं ते आणखी १०० वर्षं तरी आनंद देत राहील हे नक्की.
०५.०५.२०१२
मला आज लिहायचं आहे ते नौशादजींच्या आणखी काही वैशिष्ट्यांबद्दल -
१. एखादे गाणे जर ३ कडव्यांचे असेल तर पहिल्या आणि तिसर्या कडव्याची चाल सारखी ठेवून मधले कडवे वेगळ्या चालीत ठेवण्याचा ट्रेंड बर्याच गाण्यांमधून आपल्याला दिसतो. याची पहीली सुरवात करण्याचं श्रेय नौशादजींना जातं.
२. नौशादजींच्या हसर्या, नर्मविनोदी स्वभावाचा उल्लेख वर एका प्रतिसादात आलाय. "कोहिनूर" च्या चित्रीकरणाच्या वेळी नौशादजींचा हा पैलू पाहीला मिळाला. हा चित्रपट (आणि आझाद - सं. सी.रामचंद्र) हा दिलीपकुमार यांना त्यांची ट्रॅजेडीकिंग ह्या त्यांच्या ईमेजमधून बाहेर पडण्यासाठी उपयोगी पडला. हा एक पोशाखी चित्रपट होता (राजे-रजवाड्यांच्या काळातला). पण याच्या संवादांमधे ईंग्लीश शब्दांचा, वाक्यांचा सर्रास वापर केला गेला आहे. त्यामुळे पहिल्या फ्रेमपासून एक हलका-फुलका चित्रपट बनला. यामागे प्रेरणा नौशादजींचीच होती. निर्माता आणि दिलीपकुमार हे दोघेही त्यांचे मित्र असल्याने त्यांनीही ही कल्पना उचलून धरली होती. या चित्रपटातली सगळीच गाणी अप्रतिम. पण त्यातही "ढल चुकी शाम-ए-गम" मला जास्त आवडतं ते त्यातल्या ताल आणि चालीच्या प्रयोगामुळे. तिनही ड्युएट्स, रफीची तीन सोलो आणि उस्ताद विलायतखान यांची सतार - सगळंच दैवी. या चित्रपटासाठी दिलीपकुमार सहा महिने सतार वादन शिकत होते.
३. मुगल-ए-आझम मधले "जिंदाबाद जिंदाबाद" हा एक असाच प्रयोग होता. या गाण्याच्या रेकॉर्डींगचा एक सुंदर फोटो माझ्याकडे होता. तर चाळीस स्त्री-पुरुषांचा कोरस आणि रफी यांच्यासाठी केवळ एकच हँगीग माईक लावून या गाण्याचं रेकॉर्डींग केलं होतं. या गाण्याच्या शेवटी कोरसच्या वरच्या आवाजात रफी जेव्हा "जिंदाबाद जिंदाबाद" म्हणतात तेव्हा अक्षरशः अंगावर शहारे येतात. नौशादजींकडे रफी जेवढा "ओरडलाय" ना तेवढा शम्मी कपूरसाठीही ओरडला नसेल. याचं आणखी एक उदाहरण - गंगा जमनातलं "नैन लड जई है" चा शेवट.
४. "पालकी" हा चित्रपट नौशादजींची स्वतःची निर्मीती होती. या मधे मात्र त्यांनी प्रायोगीकतेचा अतिरेक केला आहे (हे माझं वैयक्तिक मत आहे). याचं उदाहरण म्हणजे रफींचं कधीही न विसरता येणारं सोलो - कल रात जिंदगी सें मुलाकात हो गयी. चाल किती अनवट असावी की ध्रुवपद सोडलं तर एकही ओळ दुसरीसारखी नाही.
५. "आदमी" हा त्यांच्या उतरतीच्या काळातला चित्रपट (असावा). या मधे त्यांनी रफी आणि तलत च्या आवाजात एक अप्रतिम ड्युएट रेकॉर्ड केलं होतं - कैसी हसीन आज यें, तारोंकी रात है. पण दुर्दैवाने शुटींगच्या वेळी काहीतरी गडबड झाली (कोणी म्हणतात की मनोजकुमार ने केली) आणि प्रत्यक्ष पडद्यावर हे गाणं रफी आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात आहे. अर्थात महेंद्र कपूरने ही ते चांगलंच म्हटलं आहे. पण मी जेव्हा ओरीजीनल ऐकतो तेव्हा मला तलतचं जास्त चांगलं वाटतं.
६. राजेंद्रकुमार आणि वैजयंतीमाला-सिमी गरेवाल यांचा "साथी" हा मात्र त्यांची प्रतिभा त्यांना सोडून जात असल्याचा पुरावा देतो. याही चित्रपटातली गाणी चांगलीच होती. पण राजेंद्रकुमार साठी मुकेशचा वापर आणि केवळ शंकर-जयकिशनच्या स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी वापरलेलं अतिरिक्त ऑर्केस्ट्रेशन - ऐका "मेरा प्यार भी तु है, ये बहार भी तु है" हे ड्युएट. एके काळी अगदी कमी वाद्यवापर करून केवळ आपल्या चालींनी रसिकांना खिळवणार्या या प्रतिभावंताची काळाच्या ओघात टिकण्यासाठी केलेली ही धडपड होती.
बाकी नौशादजी स्वतः शायरी करत. त्याचं एक उदाहरण म्हणजे रफींच्या निधनानंतर त्यांनी रचलेले शेर. त्यातला एक साधारण असा होता - गायकी था हुस्न-ए-फन तेरा रफी, तेरे फनपें हमें नाज है, मेरी सांसोमें तेरी आवाज है, मेरे गीतोंमे तेरी आवाज है !
०७.०५.२०१२
चित्रपटसंगीतातील (पडद्यावरील सादरीकरणातील) एका आणखी गोष्टीचा पहिलटकराचा मान नौशादजींकडे जातो. हिंदी चित्रपटातील नायक पहिल्यांदा पियानोवर बसला तो नौशादजींच्या संगीतामध्येच. चित्रपट होता मेहबूबखान यांचा "अंदाज" आणि गाणे होते "तु कहें अगर जिवनभर मै गीत सुनाता जाऊं". अर्थात या मागे मेहबूबखान यांचीच कल्पना होती. पियानोचा त्या चित्रपटातील एका पात्रासारखा वापर केला गेला आहे. ईतके त्याला महत्व आहे. तर सांगायची गोष्ट अशी की त्यापुर्वीही संगीतामधे पियानोचा वापर झालाही असेल. पण या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे पियानो वाजवणारा नायक आणि पियानोच्या दर्शनी भागाचा स्टँड सारखा वापर करत त्यावर दोन्ही हाताची कोपरे टेकवून नायकाकडे कौतूक + प्रेमाने बघणारी नायिका हा रोमँटीसिझमचा नवा फॉर्म्युला एवढा लोकप्रिय झाला की त्यानंतर अनेक वर्षे कोणीही ऐरागैरा नत्थुखैरा उठायचा / उठायची आणि सरळ पियानो "बडवत" सुटायचे. पियानो हे खरंतर कष्टसाध्य वाद्य आहे. पण हिंदी चित्रपटात त्याचा उपयोग ९९% वेळा "सुरवाद्य" नसून "तालवाद्य" असल्यासारखा तो "बडवला" गेला आहे. (पहा - गाणे "दिल का सुना साज तराना ढुंढेगा" - सादरकर्ते श्री. शत्रुघ्न सिन्हा :फिदी:) ! आणि हे अगदी आता-आता पर्यंत चालत आले आहे.
नौशादजींची आणखी एक देणगी म्हणजे गाण्यांमधे त्यांनी अॅडलीब चा केलेला प्रभावी वापर. याची सुरवात झाली "दिदार" मधल्या "हुवे हम जिनके लिए बरबाद" ने. त्या गाण्याच्या सुरवातीचा "असिर पंजाए, अहदे शबाब" ही अॅडलीब गाण्याईतकीच लोकप्रिय ठरली होती. (विषयांतर होईल, पण ऑर्केस्ट्रात गाणार्या कलाकारांसाठी ही एक मोठी देणगी ठरली. साधारणतः व्हॉईस ऑफ रफी म्हणून गाणारे बहुतांश कलाकार एंन्ट्रीला अशी गाणी निवडतात. म्हणजे स्टेजवर काळोख आणि विंगमधूनच वर दिलेली किंवा "चले आज तुम जहांसे" ही "ओ दुरके मुसाफिर" ची अॅडलीब गायची आणि मग स्टेजवर पुढचे गाणे गात-गात यायचे - हमखास टाळ्या वसूल)
(No subject)
(No subject)
व्वा!! पोतडीतल्या एकेक गोष्टी
व्वा!!
पोतडीतल्या एकेक गोष्टी बाहेर निघताहेत तर शैलेंद्र!
मालिका सुरू ठेवावी अशी विनंती...
बैजू बावरा मधील ''मन तडपत हरी
बैजू बावरा मधील ''मन तडपत हरी दरशन को आज'' हे भजन म्हणजे एक लेजंडरी रचना आहे...
विशेष म्हणजे या भजनाचे रचनाकार= मोहम्मद शकील्,गायक= मोहम्मद रफी आणि संगीतकार =नौशाद असे तिघेही मुस्लीम आहेत.
बैजू बावरा साठी केवळ साडे-सहा
बैजू बावरा साठी केवळ साडे-सहा मिनीटांच्या जुगलबंदीसाठी ( आज गावत मन मेरो झुमके) तयार करणे
आताशा गाण्यांमध्ये जुगलबंदी हा प्रकारच नाही. खरं तर जुगलबंदी ऐकायला किती छान वाटते.
नौशाद शायरीही लिहायचे ही एक
नौशाद शायरीही लिहायचे ही एक गोष्ट नमूद करतो जी बर्याच जणांना माहितीही असू शकेल.
त्यांचे 'दास्ताँ-ए-नौशाद' हे
त्यांचे 'दास्ताँ-ए-नौशाद' हे आत्मचरीत्र प्रकाशित झाले आहे. शशिकांत किणीकरांनी त्याचे केलेले मराठीकरण मी वाचलेले आहे.
सुंदर लेख..... नौशादनी अनेक
सुंदर लेख.....
नौशादनी अनेक उत्तम गाणी दिली. मला विशेषत: आवडली ती ’मुगल-ए-आझम’, बैजु बावरा आणि अर्थातच कोहिनुर ची गाणी !
"मधुबन मे राधिका नाचे..., ढल चुकी शाम ए गम, जादुगर कातील, तन रंग लो जी..." सगळीच गाणी उच्च होती.
मला वाटते अकबर खानचा ’ताजमहाल’ त्यांचा शेवटचा चित्रपट होता. कास्ट बंडल असल्याने चित्रपट डब्यात गेला. पण संगीत खासच होतं. विशेषत: हरीहरनची दोन गाणी जानलेवा होती त्यातली..
अपनी जुल्फे मेरी शानोंपे बिखर जाने दो
मुमताझ तुझे देखा...
अर्थात ही गाणी नौशादच्या सर्वोच्च संगीतात मोडत नाहीत. पण आजकालच्या तथाकथीत श्रेष्ठ संगीतकारांपेक्षा लाखपटीने श्रेष्ठ होते ताजमहालचे संगीत
मंदार, विनायक, विदिपा, डॉक,
मंदार, विनायक, विदिपा, डॉक, विशाल - सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद !
नौशाद आवडतेच. दूरदर्शनवर
नौशाद आवडतेच. दूरदर्शनवर त्यांनी काही कार्यक्रम सादर केल्याचेही लख्ख आठवतेय.
पाकिजा बाबत मात्र थोडी दुरुस्ती.
सिनेमासाठी लताची बरीच गाणी रेकॉर्ड झाली होती. पण त्यातली काहि चित्रपटात
नव्हती. अनेक वर्षांनी एच्.एम्.व्ही. ने त्या गाण्यांसकट रेकॉर्ड बाजारात आणली होती.
पण मग ती गाणीही दुर्मिळ झाली. आज पीके चले.. असे लताच्या आवाजातले गाणे
ऐकल्याचे आठवतेय. पण ते तितकेसे आवडले नव्हते.
पर्श्वसंगीतात वाजतात ती गाणी लताची नाहीत. अगदी पहिल्या दृष्यात, आईच्या भुमिकेतली मीनाकुमारी नाचत असते त्यावेळचे आलाप लताचे आहेत. पण बाकी
गाणी आणि गायिका अशा :
कौन गली गये शाम, बतादे कोई (बेगम परवीन सुलताना)
नजरीया कि मारी, मरी मोरी बैया ( राजकुमारी )
मेरा बलम सौतन घर जाये, अब मै कैसे सहू (वाणी जयराम)
हि तिन्ही गाणी उपलब्ध आहेत.
दिनेशदा - धन्यवाद ! मला अगदी
दिनेशदा - धन्यवाद ! मला अगदी हेच अपेक्षित होतं. मुळात मी जे काही आज लिहीतो त्या पाठीमागे अनेक वर्षांपुर्वी कळलेली, ऐकलेली माहिती असते. ईंटरनेट वर शोध घेऊन काही लिहीणे मला जमत नाही. तुम्ही उल्लेखलेली गाणी मी ही वेगळी रेकॉर्ड करून ठेवली होती. पण कालौघात ती कॅसेट गायब झाली. माझ्याकडे चित्रपटाची सी.डी. आहे. आज घरी गेलो की परत एकदा हे काम करूनच टाकतो.
परत एकदा धन्यवाद !
नौशादमियांचे संगीत लाजवाब
नौशादमियांचे संगीत लाजवाब आहे...रफी-नौशाद जोडीची तर कैक गाणी आजही कानात गुंजत असतात.
तू गंगा की मौजमें जमनाकी धारा, मन तडपत,ओ दुनियाके रखवाले, सुहानी रात ढल चुकी,मधुबनमे राधिका,,,,वगैरे गाणी अजरामर आहेत.
मला नौशादचं संगीत फारसं आवडलं
मला नौशादचं संगीत फारसं आवडलं नाही. पण प्रत्येक संगीतकाराची (अगदी १/२ चित्रपट केलेल्या सुद्धा) काही गाणी सुंदर असतातच, कारण थोडी फार प्रतिभा असल्याशिवाय चित्रपट सृष्टीत येणं अशक्यच आहे! मला आवडणार्या गाण्यातलं एक रफीचं गाणं -- सुहानी रात ढल चुकी
छान लिहिलयस
छान लिहिलयस
नौशादजी - जुन्या जमान्यातले
नौशादजी - जुन्या जमान्यातले फार मोठे, प्रतिभावान संगीतकार.........., त्यांच्या गाण्यांना उजाळा दिल्याबद्दल खूप आभार...........
छान
छान
"नौशाद" या उर्दू नावाचा अर्थ
"नौशाद" या उर्दू नावाचा अर्थ होतो "आनंदी" आणि मग या नावाला सार्थ करणारे सारे जीवन ज्या व्यक्तीने संगीताच्या माध्यमातून स्वत:साठी आणि रसिक कानसेनासाठी साकारले ती व्यक्ती केवळ शरीररुपाने आपल्यातून निघून गेली तरी तिच्या असंख्य आठवणी अशा सुंदर लेखाद्वारे ज्यावेळी समोर येतात त्यावेळी या जालीय माध्यमाविषयी मनी कृतज्ञता दाटते.
संगीताची जादू जितकी मोहाची तितकीच तिचा ध्यास घेणे किती कष्टप्रद होऊ शकते याचा अनुभव नौशादसारख्या कट्टर इस्लामी परंपरेत वाढलेल्या व्यक्तीने असा काही घेतला होता की आपला मुलगा कुठल्यातरी मियाँकडे संगीत शिकायला जातो म्हणजे 'आपले घराणे बुडाले' असा हाकाटा करण्यार्या बापाने त्यांच्यासमोर 'घर किंवा संगीत' यातील एकाची निवड कर असे सांगितल्यावर नौशाद यानी संगीतप्रेमाला पसंदी देऊन लखनौ ते मुंबई असा प्रवास केला आणि मग तिथून सुरू झाला एक असा सूरमयी प्रवास त्या वाटेवरील ज्याच्यामुळे पुढील कित्येक दशके संगीतप्रेमींच्या दृष्टीने कधीही रिता न होऊ शकणार्या खजिन्याच्या संगतीत गेली.. आजही जात आहेतच.
वर लेखक म्हणतात त्यानुसार "...२६ वर्षात दिलयं ते आणखी १०० वर्षं तरी आनंद देत राहील हे नक्की....". त्यांच्या चित्रपट संगीताच्या महतेविषयी लिहिण्यास इथली जागा कदाचित अपुरीही पडेल...अन् तसा ह्या लेखाचा उद्देश्यही नाही. आहे ते या महान संगीतकाराच्या स्मृतीचे अवलोकन. हिंदुस्थानी रागपरंपरेवर जीवापाड प्रेम करणार्या नौशाद यांच्या चित्रपटसंगीतातील कारकिर्दीत असा एकही राग नसेल की ज्यामध्ये त्यांची कोणती रचना नसेल. "भैरवी" आणि "पहाडी" रागांचा मनमुराद वापर करताना 'गोरख कल्याण' आणि "कलिंगडा' सारखे क्वचित समोर येणार्या रागांनाही त्यांचा परिसस्पर्श झाल्याचे दिसते.
त्यांचे एखाद्या लहान बालकासारखे हसणे ही फार मोठी जमेची बाजू होती...[मला कोल्हापुरात प्रत्यक्ष त्यांच्या समोर बसून त्यांचे ते खळखळून हसणे अनुभवता आले आहे ही माझ्यादृष्टीने मोठी भाग्याची गोष्ट.]
~~ अशा तुम्हाआम्हा 'अमर' भासणार्या कलाकाराची कबर मात्र जुहूतील मुस्लिमधर्मीयांच्या दृष्टीने जागेबाबत अडचणीची वाटत होती म्हणून चार वर्षाच्या आतच ती नेस्तनाबूद करून टाकण्यात आली ही बातमी ज्यावेळी वाचली होती त्यावेळी काही वेळ अक्षरशः सुन्न होऊन बसलो होती.
असो.
अशोक पाटील
सुंदर लिहिलंय टवाळ लेख
सुंदर लिहिलंय टवाळ
लेख आवडला
अशोकराव,
खरंच आपण लिहिलेलं वाचूनही सुन्न व्हायला झालं
संघर्ष, नंतर पण त्यांनी संगीत
संघर्ष, नंतर पण त्यांनी संगीत दिलेले चित्रपट येत होते.
लव्ह अँड गॉड नावाच्या चित्रपटाला पण त्यांचेच संगीत होते ना ? संजीव कुमार आणि निम्मी होते त्यात. मग धरमकांटा नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात रिना
रॉय होती. आशाचे, के घुंगरु टूट गये.. हे त्यातलेच ना ?
आशाला त्यांनी नेहमी दुय्यम गाणी दिली.
१) तस्वीरे मुहोब्बत थी जिसमे (संघर्ष),
२) सजन तेरी प्रीत रातभरकी, भोर भयी तू कौन कौन मै,
३) हाय रसिया तू बडा बेदर्दी, जियरा मोरा जाने, कपट तोर मनकी
४) तोरा मन बडा पापी सावरीया रे, मिलाये खलबलसे नजरीया रे
ही त्यांचीच ना ?
नौशाद आणि रफी, जोडीची काही वेगळी गाणी
१) नैन लड गयी है, तो मनवामा कसक हूईबे करी
२) ओ दूरके मुसाफिर, हमको भी साथ लेले
३) आज कि रात मेरे, दिलकी सलामी लेलो
४) आयी है बहारे
५) आज पुरानी राहोंसे, कोई मुझे आवाज न दे
लेख आवडला आणि इतर प्रतिसादही.
लेख आवडला आणि इतर प्रतिसादही.
पाकिझा, मुघल्-ए-आझम, अनमोल
पाकिझा, मुघल्-ए-आझम, अनमोल घडी, बैजु बावरा, आन आहेतच. पण शिवाय नौशादसाहेबांचं संगीत असलेले माझे आवडते चित्रपट आणि गाणी
१. लिडर - एक शहनशाह ने बनवाके हसी ताजमहल, तेरे हुस्न की क्या तारीफ करु कुछ कहते हुए भी डरता हू (श्या !! ही अशी खरी ड्युएट्स - जिथे संवाद आहे गाण्यातुन - गेलीच ना सिनेमातून !)
२. मेरे मेहेबूब - सगळी गाणी एक से एक जबरदस्त.
३. दिल्लगी - सुरैया आणि श्याम.
४. कोई सागर दिल को बहलाता नही - दिल लिया दर्द दिया - त्यातला रफी चा 'सागर' च्या 'ग आणि घ च्या मधला उच्चार' निव्वळ नशा !
६. दुलारी - सुहानी रात ढल चुकी किंवा मिल मिल के गायेंगे दो दिल
७. अंदाज- तू कहे अगर किंवा उठाये जा उनके सितम, और जिये जा (क्या बात है)
७. कोहिनूर - महान महान रफी-लता गाणं - दो सितारोंका जमिपर है मिलन आज की रात
मस्त लेख! खूप आवडला!!
मस्त लेख! खूप आवडला!!
नौशाद इतका ग्रेट वाटत नाही.
नौशाद इतका ग्रेट वाटत नाही. मला त्याचे मुघल-ए-आझम चे संगीत जरा जास्तच हाईप्ड वाटते. पण त्याची सुरवातीची गाणी मला जास्त आवडतात. अनमोल घडी, दिल्लगी वगैरे.
त्याने किंवा अन्य कुणी त्याच्या गाण्याविषयी अनेक कहाण्या बनवलेल्या आहेत. मोहे भूल गये सावरिया ह्या गाण्याच्या वेळेस लताबाईंना अश्रू अनावर झाले आणि शेवटी त्या दु:खाने भोवळ येऊन पडल्या अशी एक ष्टोरी प्रचलित होती. खुद्द लताबाईंनी ह्याचा साफ इन्कार केला. त्यांनी साफ सांगितले की मला हे गाणे आजिबात आवडत नाही. दळण दळल्यासारखी चाल वाटते. कदाचित त्या दिवशी पडसेबिडसे झाले असेल म्हणून माझे अश्रू वगैरे दिसले असतील!
महंमद रफीचा घुळणा फुटणे हीही अशीच बनवलेली कहाणी असावी.
लताबाई काय महंमद रफी काय हे प्रतिभावंत, गुणी कलाकार होते. उत्कृष्ट आवाज, जीव ओतून गाणे वगैरे ते वर्षानुवर्षे करत आले आहेत. असे कुठल्या गाण्याने खरोखरचे घायाळ व्हायला लागले तर त्यांचा इतकी वर्षे निभाव लागला असता का? त्या काळात एकटा नौशादच नव्हे तर अनेक एकाहून एक ग्रेट संगीतकार होते. नौशादच्या भलावणीकरता ह्या महान कलावंतांना असे अती हळवे दाखवण्याची काय गरज आहे?
दुनिया के रखवाले हे काही इतके अत्युच्च गाणे वाटत नाही की रफीसाहेबांना असला त्रास होईल. त्या महान गायकाने त्यापेक्षा कितीतरी कस लागेल अशी गाणी समर्थपणे पेलली आहेत. असो.
पण हे खरे की संगीताच्या सुवर्णयुगाच्या शिल्पकारात नौशादचे नाव असलेच पाहिजे.
लेख आवडला. माहीतीपुर्ण
लेख आवडला. माहीतीपुर्ण प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!
लेख माहितीपूर्ण आणि अशोक
लेख माहितीपूर्ण आणि अशोक यांचा प्रतिसाद म्हणजे 'दुधात साखरच!'
मला शास्त्रीय संगित व शास्त्रीय संगितावर आधारीत गाणी आवडायला लागली ती नेमकी कधी आणि कशी तो एक वेगळा अनुभव. एवढे नक्कीच की शास्त्रीय संगितावर आधारीत गाणी ऐकण्याची तहान शमवून स्वर्गीय आनंद मिळवून देण्याचे मुख्य श्रेय नौशादजींचे आणि त्यांनी निवडलेल्या गायकांचे!
@ shendenaxatra ~ 'नौशाद'
@ shendenaxatra ~
'नौशाद' धाग्यावरील आपला प्रतिसाद मी दोनवेळा वाचला. तुम्ही म्हणता तशा काही 'आख्यायिका' हिंदीच काय पण जवळपास प्रत्येक प्रादेशिक चित्रपटासंदर्भात पटलावर येत असतातच. त्यात काही वावगे असत नाही.
सर्वश्री बाबुराव पटेल, राजू भारतन, खुशवंतसिंग, तबस्सुम, अमीन सायानी, इसाक मुजावर, शिरीष कणेकर आदी लेखक, पत्रकार मंडळी (ज्यांची करिअर बहुतांशी असल्या क्षेत्रातील मॅगेझिन्स,, चॅनेल्स, वर्तमानपत्रे यांच्याशी निगडीत होती/आहे) अशा 'हटके' वाटणार्या कथा/दंतकथा रसिकासाठी प्रसृत करीत असतातच. त्यांच्या चमचमीत लिखाणामुळे त्या त्या पब्लिशिंग हाऊसेसचा 'टीआरपी' ही वाढत असल्याने मुख्य संपादक वर्ग त्या बातम्यातील सत्यतेची शहानिशा कधीच करत नसत....थोडक्यात अशा वदंतेचे स्वरूप 'कॉफी वुईथ करण' धर्तीचेच असतात. बरे, ज्याच्या बाजूने अशा कंड्या पिकतात त्याला/तिला ती करीअरच्या दृष्टीन जमेची बाजू वाटते, तर ज्या कलाकाराच्या विरुद्ध काहीसे लिहिले जाते तोही 'कशाला डोकेदुखी करून घ्यायची, इन्कार करून.....' म्हणून तोही तिकडे दुर्लक्ष करतो. थोर मायबाप रसिक वाचकही दोनतीन दिवसांनी असल्या बातम्या विसरूनही जातो आणि नवी कोणती डिश पुढच्या आठवड्यात येईल याची वाट पाहतो.
थोडक्यात अशारितीच्या बातम्या गांभीर्याने कुणी घेतही नाही, घेऊही नये.
[बाकी....तुम्ही प्रतिसादात केलेला 'नौशाद' यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा 'एकेरी' उल्लेख मला फार खटकला हे नमूद करणे आवश्यक वाटते. एकीकडे त्यांचे शिष्य रफी आणि लता मंगेशकर यांचा उल्लेख आदरार्थी तर दुसरीकडे हे दोघे ज्याना आपले गुरु मानत त्यांचा उल्लेख मात्र एकेरी....हे वाचणे जड जाते.... अर्थात, ते तुम्हाला 'ग्रेट' वाटत नाहीत हे सांगण्याचा/लिहिण्याचा तुम्हाला जरूर हक्क आहे. असो.]
@ बेफिकीर आणि दामोदरसुत
~ प्रतिसाद आवडल्याचे आवर्जून कळविल्याबद्दल मी आपला आभारी आहे.
अशोक पाटील
अशोककाकांशी १००% सहमत ! आपले
अशोककाकांशी १००% सहमत !
आपले मत असण्याचा, त्याच्याशी प्रामाणिक असण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण अशोककाकांनी कंसात दिलेल्या मजकुराप्रमाणे किमान वय, अनुभव, ज्ञान आणि कर्तुत्वाला मिळणारा आवश्यक मान ज्या त्या योग्य व्यक्तीला दिला गेलाच पाहीजे.
दिलीप कुमार, शर्मिला टागोर (
दिलीप कुमार, शर्मिला टागोर ( या जोडीचा एकमेव) दास्तान या चित्रपटाला पण त्यांचेच संगीत होते का ?
यात बिंदू सहनायिका होती. लताचे एक गाणे होते ते आठवत नाही पण रफिचे,
ना तू जमींके लिये, है ना आसमा के लिये... आवडते आहे.
राकु आणि वैजयंतीमाला च्या गवार पण त्यांचेच होते ना ?
हमसे तो अच्छी तेरी पायल गोरी, के बार बार तेरा कदम चुमे हे रफी आशाचे गाणे अगदी त्याच शैलीतले
होते.
हे चित्रपट फार नंतरचे, त्यांची आठवण सहसा निघत नाही.
अशोकमामाशी सहमत. नौशाद काय
अशोकमामाशी सहमत.
नौशाद काय होते हे त्यांच्या संगीत कारकिर्दीकडे पाहूनच कळते.
मुगले आझमच्या संगीताच्या जास्तच हाईप्ड असण्याबद्दलच्या मताशीही सहमत व्हावेसे वाटत नाही.
१. मोहे पनघट पे
२. मुहोब्बत की झूठी कहानी
३. जिंदाबाद जिंदाबाद
४. प्यार किया तो डरना क्या
अशी अनेक एक से बढकर एक गाणी असलेल्या संगीताच्या दर्जाबद्दल शंका ती काय घ्यायची? असो, ज्याचे त्याचे मत.
"दास्तान" हा चोप्रा कॅम्पचा
"दास्तान" हा चोप्रा कॅम्पचा चित्रपट (१९५० च्या 'अफसाना' चा रीमेक) असल्याने तिथे नौशाद यांचे संगीत नसणार हे पक्के. तसे पाहिले तर १९७१-७२ मध्ये नौशाद काय पण दिलीपकुमारही उतरणीला लागलेले कलाकार मानले गेले असल्याने त्या काळी चलती असलेले लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीकडे चोप्रानी संगीताची जबाबदारी दिली होती. पण वर उल्लेख केलेले रफींचे एकमेव गाणे सोडले तर बाकी सारी बेसूरच होती. यात लतादिदींचा आवाज नव्हता, आशा भोसले याना दोन गाणी दिली गेली. बिंदूच्या तोंडी 'हाय मै की करा...' हे एक त्यापैकी.
पण लतादिदींच्या आवाजातील १९५० च्या याच कथानकावरील 'अफसाना' मधील "अभी तो मै जवाँ हूं..." हे आजही हमेशा जवाँ गीत मधील सदाबहार गाणे आहे.....हुस्नलाल भगतराम यांचे संगीत होते.
अशोक पाटील
Pages