रूपे जराया भयम। अर्थात रुपाला वार्धक्याचे भय असते आणि देवाने तारुण्यात दिलेले रुप आणि सौष्ठव नाहिसे होते म्हणुन मनुष्यालादेखील वार्धक्याचे भय असते. अँटी एजिंग क्रीम्स च्या जमान्यात आज आपल्याला ते असते तर पुराणकालातील ययातीला ते असल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा. वार्धक्याची भिती वाटण्यासाठी त्याच्याकडे पुरेशी कारणे होती आणि नेमके हेच ओळखुन शुक्राचार्यांनी त्यांच्या मुलीची उपेक्षा केल्याबद्दल त्याला वार्धक्याचा शाप दिला. गयावया केल्यावर ययातीला उ:शाप मिळाला की तो त्याच्या वार्धक्याची त्याच्या कुठल्याही मुलाच्या तरुणपणाशी अदलाबदल करु इच्छितो. विषयवासनेच्या आहारी गेलेल्या ययातीने १००० वर्षांच्या कालावधीसाठी यदु, तुर्वसु, द्रह्यु, अनु आणि पुरु या आपल्या पाचही पुत्रांकडे तारुण्याची याचना केली. १००० वर्षांत सर्व सुखे उपभोगुन निश्चिंतमनाने निवृत्ती स्वीकारता येइल असे त्या बिचार्याने ठरवले होते.
पहिल्या चार पुत्रांनी पित्याच्या क्षोभाची तमा न बाळगता या असमान आणि अन्य्याय्य मागणीला चक्क नकार दिला. त्यांनी पदोपदी विषयवासना उपभोगाने शमत नाही तर वाढतच जाते. भोग हे यज्ञात आहुतीत पडलेल्या तूपाचे काम करतात आणि विषयवासनांची वन्ही वाढवतच जातात हे त्या अभाग्याला समजावण्याचे प्रयत्न केले पण सदसद्विवेकबुद्धी गमावलेल्या त्या राजाने उलट त्या चौघांनाच शाप दिले. यदुला शाप मिळाला की त्याचे वंशज कधीही राजे बनु शकणार नाहीत तर तुर्वसुला लवकरच अधोगती होउन निर्वंश होण्याचा शाप मिळाला. द्रह्युला नामधारी राजेपण मिरवण्याचा शाप मिळाला तर अनुकडून आणि त्याच्या वंशजांकडुन यज्ञयाग करण्याचा अधिकार काढुन घेतला गेला. पाचवा पुरु मात्र पहिल्या चार जणांची अवस्था बघुन शहाणा झाला असावा आणि त्याने नम्रपणे पित्याचे वार्धक्य स्वीकारले. त्याला मात्र १००० वर्षांनंतर राज्य मिळाले आणि समृद्ध राज्याचा वारसा देखील.
यदुच्या वंशातच पुढे यादव आणि यादव वंशात कृष्ण जन्मला तर द्रह्युच्या वंशात पुढे भोज आणि त्याच्या वंशात पुढे नामधारी राजे जन्मले ज्यांना कधी कंस / जरासंधांनी खुळ्खुळ्यासारखे स्वार्थासाठी वापरले तर कधी त्यांनी राजे असुनही कृष्ण / बलरामाच्या सावलीत नामधारी बनून राहणे पसंत केले. तुर्वसुचे वंशज नंतर यवन म्हणुन हिणवले गेले तर अनुचे वंशज म्लेंच्छ म्हणुन. पुरुच्या वंशात मात्र पौरव (अथवा कौरव ) जन्माला आले आणि त्याचे वंषज कुरु म्हणुन प्रसिद्ध झाले. ययातीच्या विषयलालसेने यदु आणि पुरु वंशात एक तेढ मात्र निर्माण केली.
असंमजस अविवेकी अविचारी पित्याच्या शापाने एकुणच यदुवंशीयांवर जी संक्रांत कोसळली ती नंतर शतकानुशतके तिचा प्रभाव दाखवत राहिली. यादव वंशाशी वैवाहिक संबंध जोडणे एकुणच आर्यवंशात कमीपणाचे मानले जाउ लागले. यादवस्त्रियांचा सूना म्हणुन स्वीकार तर केला गेला पण यादववंशीय पुरुषांना स्त्रिया भार्या म्हणून देणे हे अधोगतीचे लक्षण मानले जाउ लागले. म्लेच्छ आणि यवन तर देशोधडीला लागलेच पण यादव आणी भोज देखील त्यांच्या १६ इतर प्रजातींसमवेत दुर्लक्षिलेले आणि तुच्छ वागणुकीचे जीवन कंठु लागले.
आणि अश्यातच त्या यादववंशात देवकी आणी वासुदेवाच्या पोटी कृष्णाचा जन्म झाला. कुमारवयातच त्याने कंसाची बीमोड केला. विस्कळीत झालेल्या, स्वाभिमान हरपलेल्या भोज, वृष्णी, अंधक इत्यादी १८ यादवजमातींना एकत्र आणुन त्यांची एकत्र मोट बांधुन त्याने एक बलशाली साम्राज्य उभे केले. अर्थात तो या साम्राज्याचा अधिपती नव्हता केवळ एक सूत्रधार होता. पण ययातीच्या शापाला उलथवुन टाकण्याचा त्याने जणू चंग बांधला होता.
वासुदेवाचा मुलाने राजेपद नाही घेतले. ययातीच्या शापामुळे तो राजा बनूही शकत नव्हता. असेही भोजराजांना असलेल्या शापामुळे त्यांच्याकडे नामधारी राजेपद होते आणि सुत्रे सगळी कृष्णाकडे. अलौकिक बुद्धिमत्ता घेउन जन्माला आला होता वासुदेवाचा पुत्र. त्याला मोहुन टाकणार्या वाणीची जोड लाभली. त्याला मल्लविद्येची साथ मिळाली आणि सुदर्शनाचे वलय. थोड्याच काळात कृष्णाने स्वत:चा दबदबा निर्माण केला. शाल्वाला मारले , जरासंधाला वेळोवेळी पिटाळुन लावले, युक्तीचे मुचकुंदामार्फत अजेय अश्या कालयवनाला सुद्धा परास्त केले आणि तरीसुद्धा सर्वंकष सत्ता मिळवण्यापासुन तो कोसो दूर होता कारन मद्र, मत्स्य, पांचाल आणि हस्तिनापुर अशी बलिष्ठ राज्य अजुन जगावर राज्य करित होती.
त्यातील मद्र, मत्स्य आणि पांचाल तरी अजेय नव्हते पण हस्तिनापुरात भीष्मरुपी खंदक रक्षणार्थ होता त्याच्या साह्यार्थ अस्त्रविद्येत निपुण झालेले पाच पांडव आणि १०० कौरव होते. आताशा कर्ण नावाचा एक अजोड धनुर्धरही दुर्योधनाला मिळाला होता. त्यांना शिक्षण साक्षात परशुरामांकडुन अस्त्रविद्या शिकुन आलेल्या द्रोणांकडुन मिळाले होते. त्यांचा मुलगा अश्वत्थामा हा देखील काही कमी सामर्थ्यवान नव्हता. त्यांचा मेव्हणा कृप तर चिरंजीवीच होता. एकुण तिथे खंद्या महावीरांची रांग लागली होती त्या सगळ्यांना भेदून राज्य मिळवणे केवळ अशक्य. तशीही कृष्णालादेखील फार घाई कधीच नव्हती.
यथावकाश १०० कौरव आणि ५ पांडवांमध्ये द्वेषाची ठिणगी पडलीच. सत्तासंघर्ष तीव्र झालाच. हीच संधी साधुन क्रुष्णाला त्याच्या कुंतीबरोबरच्या नात्याची आठवण झाली आणि द्रौपदी स्वयंवरात त्याने त्याच्या ५ आत्येभावांना आपले समर्थन दिले. हस्तिनापुरच्या गुप्तहेरांमार्फत ही बातमी यथोचित धृतराष्ट्रापर्यंत पोचली आणि पांडव + पांचाल + यदु या त्रिकुटाशी कलह टाळण्याचा योग्य निर्णय घेत धृतराष्ट्राने हस्तिनापुरचे विभाजन केले. इंद्रप्रस्थ निर्माण झाले. एक नविन सत्तास्थान निर्माण झाले जे त्यापुढे कायमचे यादवांचे ऋणी राहिले आणि खंदे समर्थक देखील. मग याच पांडवांकडुन कृष्णाने राजसूय करवुन घेतला आणि त्यात बरेच राजे जरी जिवंत राहिले तरी कृष्णाच्या सर्वात प्रबल शत्रुचा घास मात्र कृष्णाने भीमाकरवी घेतलाच. जरासंधाच्या जागी कृष्णाच्या आज्ञेतला जरासंधाचा मुलगा सहदेव बसला. त्या राजसूयाच्या सांगता समारंभात कॄष्णाने त्याच्या मार्गातला दुसरा काटा शिशुपाल देखील काढला.
उरता उरले हस्तिनापुर जिथे एक नविनच सत्ताकेंद्र उदयास आले होते. दुर्योधन + कर्ण + शकुनी + ९९ इतर कौरव ही काही भीष्मासारखी सहिष्णु नव्हती. आपल्या राज्याची सीमांचे रक्षण करणे एवढेच काही त्यांचे उद्देश नव्हते. त्यांना देखील राज्यविस्तार करायचा होता आणि आज ना उद्या तो यादवांना तापदायक ठरणार होता. कौरवांनी पहिला घास त्यांच्या चुलत्यांच्या राज्याचा इंद्रप्रस्थाचाच घेतला आणि कृष्णाकडे कपाळावर हात मारुन घेण्याव्यतिरिक्त दूसरा काही उपायदेखील नव्हता. पांडव वनवासात गेले पण त्यापुर्वीच कृष्णाने सुभद्रेमार्फत पांडवांशी आपले नातेसंबंध प्रस्थापित करुन घेतले होते. कौरवांपेक्षा नात्यातले आणि आज्ञेतले पांडव त्याला जास्त जवळचे होते. सत्तासंघर्षाचे राजकारण न कळणारे बलरामादि यादव अजुनही पौरव घराण्याच्या प्रतिष्ठेने दिपुन जात होते. हस्तिनापुरच्या राज्याची वैभवशाली परंपरा त्यांना खुणावत होती. पण कृष्णाला हे पक्के कळुन चुकले होते की सर्वंकष अधिकार गाजवायचा असेल तर सत्ता पांडवांकडे केंद्रित होणे गरजेचे आहे , कौरवांकडे नाही. आपली सर्व शक्ती त्याने पांडवांकडे वळवली पण बलरामादि प्रभावशाली यादवांचे मन त्याला वळवता आले नाही. अखेर जेव्हा समरप्रसंग उद्भवला तेव्हा आपल्या चतुरंगी सेनेचे उदक त्याला कौरवांच्या पारड्यातच टाकावे लागले. तो स्वत: मात्र पांडवांकडे गेला. सात्यकी त्याच्या सेनेसह त्याला जाउन मिळाला. त्यानंतर झालेले अद्भूत समर सर्वांना ज्ञातच आहे. पांडव विजयी ठरले.
पण त्या १८ दिवसात म्त्स्य आणि पांचालांचा पुर्ण निर्वंश झाला. भीष्मादि सर्व कुरुवंशीय मृत्यु पावले. हस्तिनापुर होत्याचे नव्हते झाले. त्यांचा शेवटचा राजा धृतराष्ट्र वानप्रस्थात निघुन गेला आणि राज्य पांडवांकडे आले. तो जिवंत राहिला असता तरी नामधारीच असला असता कारण त्याची सामरिक ताकद पुर्णपणे संपुष्टात आली होती. त्याचा शेवटचा आणि एकमेव जिवंत यौद्धा अनंत कालासाठी वणवण भटकण्यासाठी निघुन गेला होता. एकमेव जिवित अनौरस मुलगा असुन नसल्यासारखा होता. विजयी पांडव जिंकुनही पुर्णपणे परावलंबी झाले होते. त्यांचाही निर्वंश झाला. या सर्व समरातुन एकच पांडववंशीय कूळ पुढे चालवण्यासाठी जिवंत राहिला तो अर्जुनाचा नातू परीक्षित होता आणि तो कृष्णाच्या भाच्याचा मुलगा होता. अर्धा पुरु आणि अर्धा यदु वंशीय.
युद्धानंतर ३६ वर्षे पांडवांनी आणि त्यांच्या मार्फत कृष्णाने निरंकुश सत्ता उपभोगली. या काळात द्वारका हे तत्कालीन समाजातले सर्वात प्रगत आणि संपन्न राष्ट्र बनले. जगातली सर्व राज्ये लयास गेली मात्र त्याची थोडीशी झळही यादवांना बसली नाही. यादवांचे ३ अक्षौहिणी सैन्य कामी आले मात्र ज्या रणांगणावर जमा झालेले झाडुन सगळे अतिरथी महारथी शहीद झाले त्या रणभूमीवर लढलेल्यांपैकी पाच पांडव वगळता जिवंत राहणार्या ४ वीरांपैकी २ यादव होते. कृतवर्मा आणि सात्यकी दोघेही जिवंत राहिले. युद्धानंतर स्वतः कृष्ण, बलराम, प्रद्युम्न, अनिरुद्ध, गद, सारण, सात्यकी, कृतवर्मा, सांब अश्या महारथी / अतिरथींनी सजलेले यादव सर्वात सामर्थ्यशाली ठरले. ३६ वर्षांनंतर यादवीत तेही संपुष्टात आले. पांडवही स्वर्गारोही झाले पण निर्नायकी झालेल्या धरेवर राज्य करण्यासाठी एक परीक्षित उरला ज्याने हस्तिनापुरावर राज्य केले आणि त्याच्या जोडीला पांडवांनी व्रजनाथाला इंद्रप्रस्थाचे राज्य दिले. व्रजनाथ क्रुष्णाचा पणतू होता.
अर्धे राज्य यदुवंशाकडे आले तर उरलेल्या अर्ध्या राज्यावर राज्य करणार्या राजाच्या अंगात अर्धे रक्त पुरुचे तर अर्धे यदुचे होते. आणि अश्या प्रकारे एक वर्तुळ पुर्ण झाले. पुरुमुळे यदुचे राज्ये गेले आणि त्याच यदुच्या एका वंशजाने पुरुवंशीय सत्ता उलथवुन टाकत सत्ताकेंद्र परत यादवांकडे वळवले.
असा विचार आधी केला नव्हता.
असा विचार आधी केला नव्हता.
वर्तुळ.. नवीन दृष्टीकोन, छान
वर्तुळ.. नवीन दृष्टीकोन, छान ,सोप्या भाषेत सांगितलंस.
नवीन दृष्टीकोन>>> खरोखर....
नवीन दृष्टीकोन>>> खरोखर....
महाभारत हे जर फक्त काव्यनसून
महाभारत हे जर फक्त काव्यनसून खरच घडलेला इतिहास असेल तर त्याचा निश्चित काल कोणता? महाभारत ते सम्राट अशोक या मधल्या काळात भारतात कोण राज्य करत होते?
वेगळाच आणि पटण्यासारखा
वेगळाच आणि पटण्यासारखा विचार.
जगातली सर्व राज्ये लयास गेली मात्र त्याची थोडीशी झळही यादवांना बसली नाही. यादवांचे ३ अक्षौहिणी सैन्य कामी आले >> ही दोन्ही वाक्ये परस्पर विरोधी नाहीत का? त्या ३ अक्षौहिणी सैन्यात अनेक छोटे मोठे यादववीर असतीलच ना?
उत्कृष्ट लिहीले आहे. सर्व
उत्कृष्ट लिहीले आहे.
सर्व पटले नाही तरी असंख्य बाजूपैकी वेगळी बाजू दिसली.
हम्म.. चांगला लेख आहे. विचार
हम्म..
चांगला लेख आहे. विचार करण्यासारखा !
छोटे मोठे यौद्धे अर्थातच कामी
छोटे मोठे यौद्धे अर्थातच कामी आले पण सर्व मोठे यौद्धे जिवंत राहिले. दोनच मोठ्या यौध्यांनी युद्धात भाग घेतला होता. ते होते कृतवर्मा आणि सात्यकी. सात्यकीचे १ अक्षौहिणी सैन्य होते, कृतवर्म्याचे १ अक्षौहिणी सैन्य होते आणि कृष्णाची चतुरंगी सेनादेखील १ अक्षौहिणी होती. या तिघांचेही संपुर्ण सैन्य कामी आले पण तिघे मोठे यौद्धे जिवंत राहिले. बाकिच्यांचे तेवढेही उरले नाहित. शिवाय हे ३ अक्षौहिणी या तिघांचीही खाजगी सेना होती. थोडेफार पेशवेकालीन मराठ्यांसारखे. शिंदे, होळकर, भोसले, गायकवाडांची स्वतःची सेना होती आणी पेशव्यांची आणि छत्रपतींचीदेखील. युद्धकाळात सर्व एकत्र यायचे आणि छत्रपतींच्या झेंड्याखाली लढायचे. एरवी ते स्वतःचे मुखत्यार. यादवांची स्वतःची सेना युद्धात उतरलीच नाही. ती तटस्थ राहिली.
एका वेगळ्या वाटेने विचार
एका वेगळ्या वाटेने विचार करायला लावणारा लेख. आवडला
महाभारताचा वेगळा पैलु
महाभारताचा वेगळा पैलु दाखवणारा लेख. आवडला.
ह्म्म..... कृष्ण उत्कृष्ट आणि
ह्म्म..... कृष्ण उत्कृष्ट आणि धोरणी राजकारणी होता हा पैलू छान मांडला आहे. अगदी नविनच इंटरप्रिटेशन.
बापरे!!
बापरे!!
सात्यकी बद्दल फार वाचनात आलं
सात्यकी बद्दल फार वाचनात आलं नाही, पण जेवढं वाचलं त्यावरून तो कृष्णाचा एकदम 'एस हिटमॅन' असावा असंच वाटलं. सगळ्या युद्धांवरून तो सहीसलामत परत येतो. अगदी सांबाला मिळालेल्या शापानंतर लव्हाळ्यांनी घडवून आणलेल्या यादवीनंतरही तो बहूतेक जिवंतच असतो.
परिक्षितानंतर - तक्षक-जन्मेजय प्रकरण माहितीये पण व्रजनाथाचे काय झाले?
त्याचा शेवटचा आणि एकमेव जिवंत यौद्धा अनंत कालासाठी वणवण भटकण्यासाठी निघुन गेला होता. >> अश्वत्थामा का? कृपाचार्यही वानप्रस्थाश्रमाला गेले ना?
एकमेव जिवित अनौरस मुलगा असुन नसल्यासारखा होता >>>युयुत्सु का?
प्रत्येक ठिकाणी 'वासुदेव' च्या जागी 'वसुदेव' हवे आहे का?
ययातीने केलेली चूक पुन्हा पुरूवंशीय शंतनूने केलीच ना! भीष्मप्रतिज्ञा झाली नसती तर त्याचे पर्यवसान अजून एका शापपर्वात झाले असते का? अजेय असूनही भीष्माने जो समजुतदारपणा(?) दाखवला तो कृष्णाला दाखवता आला असता का?
वर्तूळाचे ययाती- यदु आणि पुरू पर्यंतचा आणि पंडू-देवकी-वसुदेवासून, परिक्षित-जन्मेजयापर्यंतचे आर्क्स माहित होते. मधला आर्क तुमच्यामुळे कळाला. पण म्हणजे यदु आणि यदुवंशाचे हक्काचे चक्रवर्ती सम्राटपद ययातीच्या शापानंतर पुरूला मिळाले आणि यदुवंशीय कृष्णाने ते लढून परत मिळवले. असे? जरा पटायला जड जातंय.
विषयांच्या आहारी जाऊन अविचाराने दिलेल्या शापाचे पर्यवसान अक्षौहिणी लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले..... असे म्हणता येईल का? विश्वास बसत नाही.
पण गांधारीच्या शापाने
पण गांधारीच्या शापाने वृष्णीकुलाचा नाश झाला म्हणजे सात्यकीही त्या यादवीत संपलाच असेल ना?
पुन्हा गांधारीचा शाप म्हणजे पुत्रवियोगातून केलेला अजून एक अतिरेकी विचार. पण गांधारीने सर्वनाशासाठी कृष्णास जबाबधार धरले.. ते मात्र तुमच्या वर्तुळाच्या लॉजिकमध्ये बरोबर बसतंय.
शुक्राचार्यांचा शाप मग ययातीचा शाप मग भीष्मप्रतिज्ञा मग अंबिकेचा शाप मग गांधारीचा शाप आणखीही आधेमधे छोटेमोठे शाप होतेच
हे सगळे शाप देण्यापाठी काय नेमकं लॉजिक होतं कळत नाही सगळॅच 'रेज ऑफ अँगर' मध्ये दिल्यासारखे वाटतात.
सात्यकी यादवीत मारला गेला.
सात्यकी यादवीत मारला गेला. त्याने आणि प्रद्युम्नाने मिळुन कृतवर्म्याला मारले आणि त्यावर चिडुन कृतवर्माच्या पाठिराख्यांनी त्या दोघांना मारले.