खाद्य संस्क्रुती

Submitted by jyo_patil25 on 7 April, 2012 - 03:01

मी मुलांना घेऊन गोव्याला माझ्या पतीकडे गेले होते.आता गोव्याला पंधरा दिवस चंपाबाईच्या हातचे जेवण मिळणार म्हणून मी खूश होते. पंधरा दिवस स्वयंपाक घराशी मला काहीही देणे घेणे नाही असा मी मनाशी ठाम निश्चय केला होता.परंतु सर्वच निश्चय पूर्णत्वास जातीलच असे सांगता येत नाही.माझा हा निश्चय दोन दिवसातच डळमळीत होण्याच्या मार्गावर दिसू लागला.मी गेल्यापासूनच भूपेशने चांगलीच भुणभूण सुरू केली ,"भाभीजी ,तुम्ही आहेत तोपर्यंत चंपाबाईला रजेवर पाठ्वून देऊ ."त्याच्या त्या वक्तव्यावर मी म्हणाले ,"मी गोवा पाहण्यासाठी आले आहे.तुमची स्वयंपाकीन (कूक) म्हणून आलेली नाही." माझ्या उत्तरावर भूपेशकुमार अगदी अजीजीच्या स्वरात म्हणायचा , "भाभीजी ,चंपाबाईच्या हातचे जेवण खाऊन खाऊन इतका कंटाळा आला की आता तिला आम्ही कायमची रजा देऊन टाकतो आणि नवीन गोवियन लडकीच शोधतो नि दिलीप भाऊला गोवेकर बनवून टाकतो." त्याच्या त्या वक्तव्यावर मी ठासून सांगितले , " दिलीप भाऊबरोबर तुम्ही सर्वजण गोवेकर बनून कायमचे गोव्यात रहिले तरी चालेल मला पण मी काही तुम्हांला स्वयंपाक बनवून खाऊ घालणार नाही." अशा वाद संवादाबरोबरच भूपेशकुमार दोन दिवस शांत बसला नि तिसय्रा दिवशी कंपनीत गेले असता संध्याकाळी सहा वाजता चंपाबाईचा फोन आला.भूपेशने फोनवर चंपाबाईला मोठ्या आवाजात सांगितले,"चंपाबाई ,तू आज सुटी घे आणि मजा कर्.आज आमच्या भाभी जेवण बनविणार आहेत." एवढे बोलून पठ्ठ्याने फोन ठेवून दिला. फोनवरचे संभाषण संपताच मी भूपेशला दम दिला. "भूपेश,चंपाबाईला रजेवर पाठवून तू एक चांगले काम केलेस . आता सर्वांनी उपवास करायला हरकत नाही.रात्री नऊ वाजता घरी पोहचल्यावर मी तुमच्यासाठी स्वयंपाक करेल अशा विश्वासावर राहू नकोस." अर्थात भूपेशला माझा दम चांगलाच ठाऊक होता.तो मला चिडवून बेजार करू लागला,"भाभी,आमचे किचन किती दिवसापासून बेचैन होऊन तुमची वाट पाहत आहे.
त्याला पाटोड्यांच्या आमटीच्या झणझणीत मसाल्याच्या फोडणीचा नैवेद्य हवा आहे. " अशा या भूपेशच्या चिकाटीला सलाम करून मला माझा निश्चय मोडण्याशिवाय पर्याय नसे.रात्री घरी गेल्यावर आमटीत सोडलेल्या पाटोड्यांची भाजी करताच भूपेश व त्याचे वडील दोघेही एकदम खूश असत याउलट माझे पती गोव्याला आल्यावर बायकोला स्वयंपाक करावा लागला म्हणून आतल्या आत फुरंगटून बसत.जेवायला बसल्यावर मी एकदा पतीकडे पाहायचे तर एकदा भुरके मारीत आमटी वरपणाय्रा त्या दोघा बापलेकांकडे पाहायचे.त्यात माझे दोघे कार्टून्स (मुले) तर अलगच दुनियेत असत .त्यांना त्यांची आवडती खिचडी व तळलेले पापड मिळण्याशी मतलब आणि जेवणानंतर भूपेश दादाकडून मिळणाय्रा आईस्क्रिमची आवीट गोडी अजून काय पाहिजे. अशा या जेवताना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तर्‍हा पाहिल्या की वाटते देवाने हे जग किती अजब माणसांनी बनविले आहे. याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. एकच पाटोड्यांची आमटी .ती भूपेशला व त्याच्या वडिलांना आवड्ते म्हणून बनविण्यातली मजा अनुभवणारी मी. ती खाऊन त्रुप्त होणारे ते बापलेक आणि आमटी आवड्त असूनही मी गोव्याला आल्यावर स्वयंपाक करते याचे वाईट वाटून माझ्या पतीला बेचव वाटणारी आमटी आणि आमटीशी काहीही देणे घेणे नसलेली माझा मुलगा व मुलगी.त्यातच रात्री जेवणाला उशीर झाल्यामुळे चंपाबाईला आमटी पाठविता आली नाही म्हणून दुसय्रा दिवशी सकाळी सकाळी तिचा ऐकावा लागणारा तोरा.
गोव्याला येणारे जगभरात्ले पर्यटक माश्यांवर ताव मारतात नि याउलट आमचे हे अजब गजब प्राणी प्रत्येक सुटीत माझ्यामागे पाटोड्यांच्या आमटीचा लकडा लावायचे.आता काय म्हणावे या खाद्य संस्क्रुतीला!

गुलमोहर: 
शब्दखुणा: