माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा –भाग ११ (समारोप)
२०११ सालच्या जून-जुलै महिन्यात कैलास-मानसची पवित्र यात्रा करण्याचा योग आला. त्या नितांतसुंदर अनुभवाचे मी माझ्या तोकड्या भाषेत केलेले हे वर्णन.
ह्या आधीचे भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा!
भाग १ : पूर्वतयारी: http://www.maayboli.com/node/30416
भाग २ : दिल्ली ते नारायण आश्रम: http://www.maayboli.com/node/30637
भाग ३: नारायण आश्रम ते लीपुलेख खिंड: http://www.maayboli.com/node/30799
भाग ४: मुक्काम तिबेट : http://www.maayboli.com/node/31261
भाग ५: महाकैलासची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31407
भाग ६: मानस सरोवराची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31704
भाग ७: तकलाकोट ते लीपुलेख खिंड : http://www.maayboli.com/node/31889
भाग ८: लीपुलेख खिंड ते गाला : http://www.maayboli.com/node/32246
भाग ९: गाला ते पुणे: http://www.maayboli.com/node/32565
भाग १०: यात्रेची तयारी: http://www.maayboli.com/node/34063
समारोप
खरच, मला का यावस वाटल असेल कैलास-मानसला यावस? मी तिथे असताना आणि परत आल्यावरही ह्यावर बराच विचार केला. मी तशी देव-धर्म, उपास-तापास करणाऱ्यातली नाही. पाप-पुण्य ह्या कल्पनांवर माझा विश्वास नाही. समाज नीट चालावा म्हणून परलोकातील सुखाचा मोह दाखवलेला आहे, अस मला वाटत. म्हणजे कस की भुकेल्याला अन्न द्यावेसे वाटावे, म्हणून ते ‘पुण्याच काम’ करून मृत्युनंतरच्या फायद्याची लालूच. वाईट वागल्यास ‘पापाची’ भीती दाखवणे. भूतदया नक्कीच चांगली, पण त्याला ‘पुण्य’ मिळवण्याची झालर कशाला? असा माझा विचार. त्यामुळे धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे अनेक जन्मातील पापे धुवायचं आकर्षण वाटण्याच काही कारणच नाही.
गिर्यारोहण किंवा प्रवासाची आवड म्हणावी तर, अनेक हिमालयातले ट्रेक किंवा परदेशातील प्रवास मी खर्च केलेल्या पैशात आरामात झाले असते. आजही युथ होस्टेल किंवा तश्या संस्थांच्या ट्रेकला, दिल्ली पर्यंतचा विमानाचा खर्च पकडूनही, १२-१५ हजारापेक्षा जास्त खर्च येत नाही. ह्या यात्रेला १-१.२ लाखापर्यंत खर्च येतो. म्हणजे त्या खर्चात १० ट्रेक मी आरामात करू शकले असते.
मग का? इतकी जवळजवळ २० वर्ष मी हे स्वप्न का पाहिलं असेल? युरोप ट्रीपला जावे किंवा नायगारा फॉल बघावासा मलाही वाटतो. पण ह्या इच्छेची तीव्रता काहीच्या काहीच का होती? खर सांगायचं तर ‘का जावस वाटल?’ ह्याच उत्तर पूर्णपणे अजून मलाही मिळाल नाहीये! कर्मकांड बुद्धीला पटत नसली तरी हिंदू धर्माचा पगडा माझ्या अंतर्मनावर असेल का? अश्या वेळेला पु.ल.देशपांडे म्हणतात ते,’गड्या, तू वंशाचा दिवा नसून निव्वळ दुवा आहेस’, हे खर वाटायला लागत.
आमच्या बॅचच्या इतर यात्रींच्या बोलण्यातून मी ‘ते’ का आले असतील? ह्याचा अंदाज घेत होते. शेकडा ७०-७५ % यात्री हे पुण्यप्राप्तीचा स्पष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून आले होते. उरलेले लोक माझ्यासारखे कुंपणावर बसलेले होते. शारीरिक क्षमता वाढवणे, अप्रतीम सुंदर निसर्गाचा आस्वाद घेणे, मनाच्या ‘वस्तुनिष्ठपणा’ कडून ‘भक्तीमार्गाला’ जाण्याचा प्रयत्न अशी अनेकविध उत्तरे ह्या शोधातून मिळाली.
वयाने मोठ होऊन ह्या जगाच्या रुक्ष धकाधकीत तगून राहणे अवघडच असते. त्या मोठ होण्याबरोबर अपरिहार्यपणे गळ्यात येणाऱ्या कर्तव्य -जबाबदाऱ्यांच्या जडशीळ माळा, यश-अपयशात होणारी रस्सीखेच, वेळोवेळी मनाला घालावी लागणारी मुरड हे सगळ बाजारात फेरफटका मारण्याइतक सोप असेल कस? ह्या सगळ्यातून थोड थांबून वेगळ्या वातावरणात जाणे, आपल्या मनाला ‘आपल्याला नक्की हवय तरी काय?’ हा विचार करायला भाग पाडणे, असा काहीसा हेतू माझ्या मनात होता.
शिक्षण, विवाह, अर्थाजन, अपत्य संगोपन हे ठराविक टप्पे घेताना जगण्याचा वेग प्रचंड वाढला. मधेच अचानक वाटायचं,’ पण आपण का धावतोय इतक? आणि कशासाठी? नक्की पोचायचय तरी कुठे?आपल नक्की ध्येय तरी काय आहे?’ पण हा शोध घेण्याइतकीही फुरसत मिळत नव्हती. गेली काही वर्षे ह्या कुतरओढीने मी अगदी गळून गेले होते. परिस्थितीने दिलेले काही घाव सांभाळत, कुरवाळत रहात होते. पूर्वी स्वभावात नसलेला एक कडूपणा आला होता. त्याचा त्रास व्हायचा.
मी आनंदी / सुखी/ समाधानी होण्यासाठी स्वतःकडे पाहण्याऐवजी मला बाह्य परिस्थितीकडे बोट दाखवण सोप वाटत होत. मला अमुक इतके पैसे मिळाले की, माझ्या भोवतालचे लोक अश्या अश्या पद्धतीने बदलले की, समाज असा असा झाला की, मी समाजासाठी- कुटुंबासाठी ह्या गोष्टी केल्या की मग मला छान वाटेल, सगळे मला नक्की नावाजतील, अशी भावना मनात प्रबळ झाली होती. ह्या भावनेला धक्का बसला, की निराश वाटायचं.
ह्या सगळ्यातून बाहेर पडायला मला ह्या महिन्याची फार मदत झाली. आत्मशोधाच्या ह्या प्रक्रियेसाठी अत्यंत पोषक अस वातावरण ह्या यात्रेत मिळाल. एकतर संगणक, आंतरजाल, दूरध्वनी आणि कुटुंबीय ह्या सगळ्यापासून मी खूप दूर होते. इतर कुठल्याही ट्रेकपेक्षाही जास्त शारीरिक-मानसिक क्षमतेचा, अनिश्चितता झेलण्याचा तयारीचा कस ह्या यात्रेत रोजच्या रोज लागत होता.
रोजच्या चरितार्थासाठीच्या गडबडीत माझा माझ्यासोबतचा संवाद केवळ रोजचे अन्न-वस्त्र-निवाऱ्याच्या प्रश्नांपर्यंतच राहिला होता. ती तुटलेली साखळी जोडायला मला इथे वेळ आणि मोकळीक मिळाली. आपल्या स्वतःच्या मतांची चिरफाड करणे, म्हणजे एक शल्यकर्मच! ते काम मी नेहमीच मागे टाकत होते. आता मात्र ते आपोआपच होत होत. धार्मिकतेकडे माझा कल नव्हता, आणि आजही नाही. परंतु माझ्यातल्या अध्यात्मिकतेचा परिचय ह्या महिन्याभरात झाला. मात्र ती अध्यात्मिकता माझ्या स्वतःच्या आत्मिक प्रगतीसाठी असेल, बाह्य प्रदर्शनासाठी नाही.
ह्या यात्रेत ‘दिव्यत्वाची प्रचिती’ घेतल्यावर ‘कर माझे’ नक्कीच जुळले. पण मी नास्तिकतेकडून आस्तीकतेकडे गेले का? तर नाही. मी त्या बाबतीत होते तिथेच आहे. कैलास पर्वतावर किंवा मानस सरोवराच्या काठी कोणतेही देऊळ नाही. अर्थातच त्याबरोबर येणारा ‘देव’ नावाचा व्यवसाय नाही, धातूशोधक यंत्रे नाहीत, प्रसाद-माळांची दुकानेही नाहीत. ‘निर्गुण-निराकार’ असे ते रूप अनुभवून आल्यावर तर मला गर्दीने गजबजलेली, स्वतःची जाहिरात करणारी देवळे आणखीनच आवडेनाशी झाली.
पण कैलास-मानस च्या रौद्र अनुभूतीचा परिणाम माझ्या मनावर नक्कीच झाला.
मी काहीशी शांत झाले, अस मला वाटत. कपडे – दागिने हा माझा प्रांत पहिल्यापासून नव्हताच. आता मी त्यापासून अजून काही अंतर लांब गेले आहे. माझी विचार करायची पद्धत काहीशी सखोल झाली. आपल्या दिशेने येणारी काही वाक्य किंवा घटना मी थोड्या अलिप्तपणे पाहू लागले. वाद घालणे, शब्दाने शब्द वाढवणे हे टाळण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न करायला लागले.
म्हणजे मी क्रोध, लोभ, मोह, माया सगळ जिंकल का? नाही, आजिबात नाही. मी अजूनही एक माणूसच आहे, साधू- सन्यासी झाले नाही. पण तिथल्या अपूर्व अश्या शांतीचा अनुभव मन शांत करून गेला, हे मात्र खर!!
तिथे येणाऱ्या यात्रीमध्ये भाविक, श्रद्धाळू लोक मोठ्या प्रमाणात असतात. संपूर्ण यात्रेत उपास करण्यापासून ते चालताना मौन पाळणारे लोक असतात. त्यांच्या मनोबलाची कमाल वाटते. पण हेच लोक लहान-सहान कारणावरून आपल्या सहयात्रींबरोबर किंवा पोर्टरबरोबर भांडताना, अद्वातद्वा बोलताना दिसले, की धक्काच बसतो. ह्या लोकांची ही व्रत-वैकल्य शरीरापर्यंतच राहतात, मनापर्यंत झिरपत नाहीत, ह्याची खंत वाटते.
पूर्वी लोक काशीयात्रेला जात, ते घरादारावर तुळशीपत्र ठेवूनच. प्रवासाच्या, संपर्काच्या कोणत्याही सोयी नसताना ह्या यात्रेला जात असत. जाताना आपल्या घराचा, कुटुंबाचा शेवटचा निरोप घेण्याची मानसिक तयारी आपोआपच होत असेल. जगून-वाचून कोणी परत आला, तर तो त्याचा पुनर्जन्म मानत असत. त्या आलेल्या माणसाला आपला जीव ज्यात गुंतला आहे, त्या सगळ्याकडे साक्षी भावाने पाहणे शक्य होत असेल. ह्या सगळ्या पसाऱ्याचा केंद्रबिंदू ‘मी’ आहे, ही समजूत किती पोकळ आहे, ह्याची जाणीव होणे, हाच तीर्थयात्रांमागचा उद्देश असेल का?
महाविद्यालयात असल्यापासून मी ह्या यात्रेची स्वप्न बघितली होती. पुढे घर-संसार-व्यवसाय ह्या जबाबदाऱ्या महिनाभर कश्या बाजूला टाकणार, अस वाटून मी खूप वर्षे ती इच्छा कोपऱ्यात सरकवली होती. पण प्रत्यक्षात मी नसतानाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू राहिल्या. माझ्या परीने मी सगळी ओळ नीट लावायचा प्रयत्न केला होता. तरीही, मनाच्या एका कोपऱ्यात ‘माझ्या वाचून सगळ्यांच खूप अडेल’ अशी एक भावना होती. पण तो एक अहंभाव होता, अस आता वाटत. आपल घर, व्यवसाय, कुटुंब ह्या सगळ्यात गुंतून पडलेल्या मनाला थोड बाजूला जाण्याची संधी मिळाली. निसर्गाचे ते भयचकित करून टाकणारे ते रूप बघून माझ्या सुखरूप परत येण्यामागे थोडा योगायोग, थोड नशीब, थोड्या सगळ्यांच्या सद्भावना आहेत ह्याची प्रखर जाणीव झाली.
हे लक्षात आल्यावर मनात असलेल्या, पण करायची हिंमत न केलेल्या असंख्य गोष्टी वर आल्या. मला चित्र काढायला शिकायची आहेत, भरपूर प्रवास करायचा आहे, नवीन भाषा शिकायच्या आहेत. जी गोष्ट खरच मनापासून करावीशी वाटते, ती परिस्थितीचा फार बाऊ न करता करून टाकायचा एक आत्मविश्वास मला ह्या प्रवासातून मिळाला. आपल्या वागण्यातून जर हे काही करायची तेवढी असोशी दिसली, तर आपले कुटुंबीय सुद्धा भरपूर सहकार्य करतात, हे लक्षात आले.
आपल्या दिनक्रमाशिवाय वेगळी गोष्ट करायला, शिकायला ‘अत्यंत आदर्श’ अशी परिस्थिती कदाचित कधीच निर्माण होणार नाही. ‘आता दोन महिने मला ऑफिसला सुट्टी आहे, मुलगा आजीकडे गेलाय, खिशात भरपूर पैसे आहेत, घरच्या कोणत्याही जबाबदाऱ्या नाहीयेत, आता मी माझ्या मनातली ही गोष्ट करते/ शिकते’ अस व्हायची शक्यता जवळपास नाहीच!!
आणि वर वर्णन केलेली आदर्श परिस्थिती नसताना काही ठरवल, तर माझ्यावर विश्वास ठेवा, आभाळ कोसळत नाही’!! सगळ व्यवस्थित रांगेला लागत! तेव्हा ‘त्यागमूर्ती’ होण्याची नशा सोडून ‘आनंदमूर्ती’ व्हायचा निश्चय मी करून टाकला आहे.
ही यात्रा मी स्वतः केली, हे जरी खर आहे, तरी त्यामागे अनेकांचे सहकार्य असते. सासर- माहेरचे कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, सहकारी, सहयात्री तर असतातच. पण मी नसताना एकही दिवस सुट्टी न घेणाऱ्या आमच्या घरकामाच्या बाई, ‘तिकडून फोन करा, मी तुमचा फोन इथून रिचार्ज करेन.’ अस म्हणणारा दुकानदार, न सांगता मला भरपूर सुट्टे पैसे आणून देणारी माझी रेल्वेत काम करणारी जिवलग मैत्रीण, असे असंख्य. किती जणांची नवे घेऊ?
मी लहान असल्यापासून भरपूर वाचत आले. लिखाणाची हिंमत मात्र कधीच केली नव्हती. माझ्या मोठ्या भावाने मला हे अनुभव लिहिण्याचा खूप आग्रह केला. देवनागरी लिखाणासाठीचा फॉन्ट देण्यापासून ते मला लिहिता न आलेले काही शब्द इ-मेलने पाठवण्यापर्यंत सगळी मदत त्याने मला केली.
त्याच्यामुळेच ही लिखाणाची झिंग मला अनुभवता आली. माझेच अनुभव लिहिताना कितीतरी वेळा माझे डोळे भरून आले. यात्रा संपताना झालेली घालमेल लिहिताना मी परत तशीच अस्वस्थ झाले. पण मला नक्की काय वाटल, तेव्हा नक्की काय विचार आले, ह्या सगळ्याचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर काही परिणाम झाला का? ह्याची उत्तरे मला लिहितानाच मिळाली. प्रत्यक्ष प्रवासात असताना आपल लक्ष ‘आपली तब्येत, आपल सामान, ऊन/पाऊस/थंडी, उद्याच्या चढ/उताराची – चालण्याच्या अंतराची काळजी, घरची आठवण’ अश्या असंख्य ठिकाणी असत. घरी संगणकासमोर बसून शांतपणे टंकताना, हे कोणतेही ताण नव्हते. त्यामुळे स्वतःला तपासायला योग्य वेळ मिळाला. लिहील नसत, तर ह्या माझ्या ‘स्व’च्या शोधाला मी नक्कीच मुकले असते.
ह्या लिखाणाबरोबरची सर्व छायाचित्रे मी काढलेली नाहीत. मला यात्रेत गवसलेली माझी मैत्रीण नंदिनी, तसेच आमच्या बॅचचे कलाकार श्री.शरद तावडे ह्यांनी ती मला विनातक्रार, विनाअट दिली. त्यामुळे माझ्या लेखांची खुमारी खुपच वाढली.
काळ-काम-वेगाची गणिते सोडवताना ज्यांच्याशी संपर्क कमी झाला होता, किंवा पार तुटलाच होता, अश्या काही मित्र-मैत्रीणींशी किंवा नातेवाईकांशी मी ह्या निमित्ताने परत एकदा जोडली गेले. आंतरजालावर माझे लिखाण वाचून, ज्यांची माझी काहीही ओळख नाही, अशांनी मला भरघोस प्रोत्साहन दिले. त्या सर्वांची मैत्री ही मला ह्या लिखाणाने दिलेली अपूर्व अशी भेट आहे.
शेवटी काय सांगू? आता शब्द अपुरे पडत आहेत. ह्या संपूर्ण यात्रेत निसर्ग सौंदर्याने, आव्हानाने, आश्चर्याने नटलेली धरतीमाता आपल्यासमोर असते. ह्या अलौकिक सौंदर्याचा अनुभव प्रत्येक भारतीयाला मिळावा, इथे प्रत्यक्ष जाऊन येण्याची ओढ निर्माण व्हावी, यासाठी आपण काहीतरी करावे, हा एक हेतू ह्या लिखाणामागे आहेच!
इच्छुक आनंदयात्रींना हिमालयाचा यात्रिक होण्याचे भाग्य लाभलेल्या आमच्यासारख्या भाग्यवंताच्या हार्दिक शुभेच्छा!
ॐ नमः शिवाय......... ॐ नमः शिवाय.........
मागच्या लेखनानंतर बऱ्याच
मागच्या लेखनानंतर बऱ्याच दिवसांनी हे समारोपाचे भाग लिहिते आहे. थोडा आळस, लेकाची दहावीची परीक्षा ही हमखास यशस्वी कारणे तर होतीच.
पण यात्रेच वर्णन लिहिण्यापेक्षा हा भाग वेगळा होता. आपल्या मनोव्यापारांकडे इतक लक्षपूर्वक बघणे, त्यांना शब्दात मांडणे.... विलक्षणच अनुभव होता.
ह्या सगळ्या लेखनप्रवासात तुम्ही सर्वांनी मला जे प्रोत्साहन दिलेत, शाबासकी दिलीत, काही चुका दाखवल्यात, त्याबद्दल मी तुमची सदैव ऋणी राहीन. आभार!
अनया, अतिशय सुरेख लेखमाला
अनया, अतिशय सुरेख लेखमाला होती. लिहीण्याची शैली मस्तच. त्यामुळे तुझे अनुभव वाचताना मजा आली.
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद :).
अनया, समारोपाचा हा लेख
अनया, समारोपाचा हा लेख वाचताना मी पण नकळत हळवी झाले. याआधिचे दहा भाग वाचताना नंतर येणा-या लेखासाठी शोधमोहिम चालू असायची. आता हे लेख वाचायला मिळणार नाहीत का?
हे ११ भाग खूपच छान लिहिलेत. अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळाली.
घरबसल्या कैलास मानस सरोवर यात्रा घडवून आणली.
सुंदर लिहिलं आहात.
सुंदर लिहिलं आहात.
अतिशय सुंदर लिहिलंय हे मनोगत
अतिशय सुंदर लिहिलंय हे मनोगत तुम्ही !! काही काही वाक्य लिहून ठेवावी अशी ! << तेव्हा ‘त्यागमूर्ती’ होण्याची नशा सोडून ‘आनंदमूर्ती’ व्हायचा निश्चय मी करून टाकला आहे.>> फार आवडलं !! आवडत्या दहात
अनया, अतिशय सुरेख झाली
अनया, अतिशय सुरेख झाली लेखमाला. हा समारोपाचा भाग तर अगदी मनापासून आलाय आणि मनापर्यंत
पोचला. खूप्खूप ध्न्यवाद!
खुपच सुंदर लेखमाला. धन्स
खुपच सुंदर लेखमाला.
धन्स अनया इथे शेअर केल्याबद्दल.
मस्त लिहिलेत. तुमच्या ह्या
मस्त लिहिलेत.
तुमच्या ह्या लिखाणामुळे मनाशी इच्छा तरी केलीय की कधीतरी हे करायचे.. बघुया कसे जमते ते!
अनया, 'स्व'चा शोध आवडला.
अनया, 'स्व'चा शोध आवडला.
समारोपाचा लेख फारच सुरेख झाला
समारोपाचा लेख फारच सुरेख झाला आहे. अतिशय प्रामाणिक आणि सहजस्फूर्त.
तुमची ही शोधयात्रा सफल झाल्याचा मनापासून आनंद झाला.
समारोप सुरेख झालाय. मालिकाही
समारोप सुरेख झालाय. मालिकाही मस्तच होती.
सुंदर लिहिलं आहात.
सुंदर लिहिलं आहात.
संपूर्ण लेखमाला अतिशय सुंदर व
संपूर्ण लेखमाला अतिशय सुंदर व हा तर कळसच - प्रत्येक परिच्छेद दोन दोनदा वाचत होतो - अतिशय पारदर्शी, प्रामाणिक, ओघवते, नेमके, हृदयस्पर्शी लेखन - कौतुक करायला शब्दच नाहीत माझ्याकडे....
तुमचे कितीही आभार मानले तरी कमीच आहे, तुमची लेखनशैली व निरीक्षण शक्ती पाहता तुम्ही दररोजच्या जीवनातील गोष्टींवरही सुरेख लिहू शकाल असे वाटते - ते ही कृपया मनावर घ्या व लिहित्या व्हा - त्यासाठी मनापासून शुभेच्छा.
आपल्या दिनक्रमाशिवाय वेगळी
आपल्या दिनक्रमाशिवाय वेगळी गोष्ट करायला, शिकायला ‘अत्यंत आदर्श’ अशी परिस्थिती कदाचित कधीच निर्माण होणार नाही. ‘आता दोन महिने मला ऑफिसला सुट्टी आहे, मुलगा आजीकडे गेलाय, खिशात भरपूर पैसे आहेत, घरच्या कोणत्याही जबाबदाऱ्या नाहीयेत, आता मी माझ्या मनातली ही गोष्ट करते/ शिकते’ अस व्हायची शक्यता जवळपास नाहीच!! >>>> जेब्बात अनया.
किती प्रेरणादायी होती माहितीये तुमची लेखमालिका.
हिमालय पाहिल्यावर इतकी फेंफे उडाली तरी सुद्धा इच्छा बाळगून आहे की ही यात्रा करायची.
शूम्पी +१
तिनवर्षांपूर्वी विपश्यनेला नाव नोंदवले. सगळी पर्यायी व्यवस्था केली. पण अचानक गोळा केलेली हिमंत संपून गेली, ऐनवेळेस रद्द केले. मुलगी लहान होती. तिला सोडुन राहता येईल असे वाटेना. नवर्याने पुन्हापुन्हा 'जा' असे सांगीतले. कॉलेजातला सहाध्यायी म्हणाला तुला गेली १२ वर्षे सांगतोय की जाऊन ये. प्रत्येक वेळी न करायला कारणं सापडतात, याचा एकदा विचार कर, या सगळ्या पळवाटा आहेत. फार लागलं. त्यांच दोघांचही अर्थातच बरोबर होतं. त्यानंतर जाणीवपूर्वक शिकतेय 'माझं माझं यमाचं ओझं' कमी करायला.
अप्रतिम लिहिलय. सगळेच भाग
अप्रतिम लिहिलय.
सगळेच भाग जबरदस्त, अप्रतिम, मस्त , सुंदर झाले आहेत.
सोने पे सुहागा! सर्व मालिकाच
सोने पे सुहागा!
सर्व मालिकाच सुंदर होती पण हा भाग एखाद्या सुंदर मंदिरावर सोन्याचा कळस चढवावा तसा झाला आहे. त्या मानस सरोवराच्या पाण्याइतकाच नितळ झालाय हा भाग. मागचा भाग वाचल्यावर 'अरे आता संपली ही मालिका' अशी चुट्पुट लागली होती. हा भाग वाचल्यावर काहीतरी पूर्ण झाल्यासारखे समाधान वाटले.
प्रवास खूप घडतात पण अंतर्यात्रा महत्वाची.
सुरेख लेख आहे
सुरेख लेख आहे समरोपाचा.
संपूर्ण मालिका आवड्ली. ़ ही यात्रा कधी केली तर त्याचं श्रेय ह्या मालिकेलाच.:)
संपुर्ण लेखनमालाच
संपुर्ण लेखनमालाच आवडली..:)
ओळखीच्या सर्वांना आता link forward करणार..
ही यात्रा कधी केली तर त्याचं श्रेय ह्या मालिकेलाच>>>> अनुमोदन..
ॐ नमः शिवाय.. ॐ नमः शिवाय..
अशा तर्हेने ही साठा
अशा तर्हेने ही साठा उत्ताराची कहाणी सफळ संपुर्ण झाली.......
अनया खरच हे निरुपण जास्त आवडले. काहीतरी परिपुर्ण वाचते आहे हे जाणवले. ह्या लेखातुन तु तुझे मन मोकळे केलेस. तुझ्यातल्या "तु" ला स्वतःची ओळख पटली... खरच असा अनुभव खरोखरच सुदैवी. फार अभावानेच असे अनुभव येतात.
तुझं लिखाण खुपच जवळच आणि सोप्या शैलीत आहे. आधी कधीच लिहिले नाहीयेस ऐकुन आश्चर्य वाटले.
ॐ नमः शिवाय !!!!
सुंदर लिहिल्रेय. आयूष्यात जे
सुंदर लिहिल्रेय.
आयूष्यात जे जे करावेसे वाटतेय, ते करावयास मिळो. या शुभेच्छा.
ही सर्वच मालिका, अत्यंत प्रामाणिकपणे, मनापासून लिहिली आहे, याची जाणीव अगदी पहिल्या
भागापासूनच झाली होती.
संपुर्ण लेखमाला आवडली,
संपुर्ण लेखमाला आवडली, समारोपातील मनोगतासकट .....
सुंदर, अनया! लिहिती झालीयेस,
सुंदर, अनया!
लिहिती झालीयेस, लिहिती रहा..
ही यात्रा कधी केली तर त्याचं
ही यात्रा कधी केली तर त्याचं श्रेय ह्या मालिकेलाच>>> डिट्टो. सुरेख लेखन.
जरा तेवढे fast facts टाकाल का plz ? यात्रेसाठी कमितकमी वयोमर्यादा काय आहे?
राजसी, मी तो भाग वेगळा पोस्ट
राजसी, मी तो भाग वेगळा पोस्ट केला आहे. वर आधीच्या भागाच्या लिंक दिल्या आहेत, त्यात बघाल का?
अनया,मानसयात्रेइतकाच तुझा
अनया,मानसयात्रेइतकाच तुझा 'स्व'चा प्रवास मनाला भावला.
फार सुंदर उतरलाय हा भाग.
फार सुंदर उतरलाय हा भाग.
बा़कीचे भाग वाचताना तुमच्या पाठी पुढेच मी आहे, मी सुद्धा स्वतः सर्व काही पाहते ,अनुभवते आहे असे वाटत होते. पण हा भाग वेगळाच , फार सही झालाय.
या यात्रेतून जे काही तुम्हाला मिळालंय त्याचा पैशांत, दिवसांत हिशोब करता येणार नाही .
आता जे काही नवीन शिकाल, करुन पहाल ते पण मायबोलीकरांना सांगत रहा !
झकास... वाद घालणे, शब्दाने
झकास...
वाद घालणे, शब्दाने शब्द वाढवणे हे टाळण्यासाठी , मी आनंदी / सुखी/ समाधानी होण्यासाठी, स्वतःकडे पाहण्यासाठी, मन शांत करून घेण्यासाठी, घर, व्यवसाय, कुटुंब ह्या सगळ्यात गुंतून पडलेल्या मनाला थोड बाजूला जाण्याची संधी देण्यासाठी, त्यागमूर्ती’ होण्याची नशा सोडून ‘आनंदमूर्ती’ होण्यासाठी ................खरच fantastic ............खूपच जिवंत लिहिले आहे ...........एखद्या खूप दिवसापासून लिहित असणाऱ्या writer ला पण मागे टाकणारे लिखाण आहे....................The Great
Ashlesha
अतिशय सुरेख !
अतिशय सुरेख !
अनया तुझ्या लेखांतून आम्हीपण
अनया तुझ्या लेखांतून आम्हीपण घरबसल्या कैलास-मानसला जाऊन आलोय.
तुझ्यासारखंच मलाही ही यात्रा केव्हांपासून करायचं मनात आहे. त्यावेळेस एवढे पैसे जमवणं ही कठीण गोष्ट वाटत होती. आता पैशांचा प्रश्न खूप सतावत नाहीये पण शरीर साथ देईल कां याचीच खात्री वाटत नाहीये.
सुंदर मालिका. काहि भाग
सुंदर मालिका. काहि भाग वाचायचे राहुन गेलेत, आवर्जुन वाचणार. वडिलांनी आवडिने ठेवलेल्या नावाखातर तरी मानसरोवराची यात्रा करायची इच्छा आहे, पाहुया कधी योग येतो. तुम्हाला नायाग्रा पाहायची संधी लवकर यावी हि शुभेच्छा!
Pages