रहस्य चिंतामणी

Submitted by सई केसकर on 5 April, 2012 - 15:39

चिता आणि चिंता यात फक्त एका टिंबाचा फरक आहे असं मला माझ्या आजीनी फार लहानपणीच सांगितलं होतं. अर्थात माझ्या आजीनी स्वत: चिंतेत पीएचडी केली होती हे सांगायला नको. आजोबादेखील त्याच वर्गवारीतले. मी पहिल्यांदा अमेरिकेला आले तेव्हा मी पंधरा वर्षांची होते. तो प्रवास मी एकटीने केला. पण मी मुंबईहून कॅलिफोर्नियाला पोहोचेपर्यंत माझ्या बाबाला एकीकडे बायको आणि दुसरीकडे सासरेबुवा असा चिंता टेनिसचा सामना बघावा लागला होता. आईदेखील भयंकर चिंता करते. आमच्या घरात वारसाहक्काने चिंता दिली जाते. मी अगदी लहानपणीपासूनच खूप चिंता करायचे. लहान असताना आईला यायला उशीर झाला की मला तिला अतिरेक्यांनी पकडून नेलंय अशी (ती परत येईपर्यंत) खात्री असायची. मग मी दारात भोंगा पसरून बसायचे. बाबामुळे आपल्याला शाळेला पोहोचायला उशीर होईल या चिंतेतदेखील मी कैक सकाळी वाया घालवल्या. गणितात नापास होण्याची चिंता तर मी अजूनही करते. एकूणच नापास होण्याची चिंता ही माझ्या आयुष्यातील महाचिंता आहे. पण चिंता करणार्‍या लोकांचा एक गुण असा आहे की ते इतर चिंतामाणींना अगदी ठामपणे चिंतेवर मात करायचे उपाय सुचवू शकतात. आणि "मला हे आयुष्यात खूप उशिरा कळलं म्हणून मी तुला सांगते", असंही असतं वरती.

ध्यान करणे (मराठीत मेडीटेशन) हा चिंतेवर जालीम उपाय आहे असं मला लहानपणापासून सांगण्यात आलं होतं. ध्यान करायचा पहिला प्रयोग मी चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात केला. तो अत्यंत असफल झाला हे सांगून काम होणार नाही. ध्यान करायच्या शिशुगटात जाण्याऐवेजी मी सरळ पीएचडीला बसले. दोन तास वेगवेगळे अवयव ढिले करत काय झालं पुढे काही समजलं नाही. अचानक एका फिरंगी तरुणीने "उठ आणि घरी जाऊन झोप" असं हलवून सांगितलं. उठल्यावर आजूबाजूचे इतर लोक तजेलदार झालेले दिसले. मी मात्र रात्री जास्त झालेल्या हवालदारासारखी उठले. माझं ते ध्यान बघून आजूबाजूच्या लोकांची चांगली करमणूक झाली असावी. मग आता यापुढे घरी सराव केल्याशिवाय अशा वर्गांना जायचं नाही असा मी पण केला. मग चिंतेवर मात करण्यासाठी मी सगळ्या प्रकारच्या ध्यानधारणेचा अभ्यास करू लागले.

फिरंगी लोक भारतीय संस्कृतीचं फिरंगायझेशन करण्यात तरबेज आहेत. जरा गुगलवर टिचकी मारली आणि माझ्या आजूबाजूला किती फिरंगी भारतीयांचा बुजबुजाट आहे हे लगेच माझ्या लक्षात आलं. ध्यान करणं उत्तम पण त्याजोडीला योगासनं करावीत असा मतप्रवाह दिसला. म्हणून मी आधी योगासनांच्या वर्गात गेले. भारतात मी दोनच प्रकारचे योगा असतात असं बघितलं होतं. पहिला प्रकार म्हणजे आजी योगा. हा प्रकार मी लहानपणी सकाळी उठल्या उठल्या आजीबरोबर करायचे. आणि दुसरा प्रकार म्हणजे छळ योगा. हा प्रकार सकाळी साडेपाचला उठून मी आई बाबांचे टोमणे झेलत करायचे. आमच्या ओळखीत एक काका योगासनांचे क्लास घ्यायचे. मिलिटरी मधून रिटायर झाल्यानंतर त्यांनी हे वर्ग सुरु केले होते. त्यामुळे योगासनं म्हणजे दर दहा मिनिटांनी बारा सूर्यनमस्कार असं मला वाटायचं. असे सूर्यनमस्कार घालून घरी आल्यावर बोलायचीही शक्ती राहायची नाही.

पण ऑस्ट्रेलियात "हाथा" योगा, "विन्यासा" योगा, "अष्टांगा" योगा, "कुंडलिनी" योगा, झालच तर "हॉट" योगा आणि पावर योगा असे विविध प्रकार ऐकायला मिळाले. माझे पुण्यातले योगा काका कधीही मृदु आवाजात,"कनेक्ट टु युवर इनर पीस" वगैरे म्हणायचे नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची योगासनं करायला मला फार मौज वाटू लागली. त्याच दरम्यात भारतात करीना कपूर पावर योगा करून हडकुळी झाली होती. या सगळ्याचा परिणाम म्हणून मला योगासनं करायची सवय लागली. ती सवय अजूनपर्यंत नशिबानी टिकून आहे.

दुसर्‍यांसमोर इज्जतीचा फालुदा होऊ नये म्हणून मी मेडिटेशनची पॉडकास्ट ऐकू लागले. सुरुवातीला वातावरण निर्मितीसाठी मी भारतीय सुगंधाच्या उदबत्त्या लावून, भारतीय रजई अंथरून पद्मासन घालून ध्यान करायला बसायचे. मग एक एक सूचना ऐकून त्याप्रमाणे मनाला वळवण्याचा प्रयत्न करायचे.
श्वास आत कसा जातो, बाहेर कसा जातो याचं निरीक्षण करता करता कधी कधी माझं विमान भलतीकडेच उडू लागायचं.

हम्म..आता मला माझं हृदय ऐकू येतंय..कसं ना! हृदय कायम चालू असतं. कुणी डिझाईन केलं असेल? असे पंप जर मनुष्य प्राण्याला बनवता आले तर सर्विसिंग नाही काही नाही! भारी.
शू!! चला आता परत ध्यान.
श्वास आत श्वास बाहेर. एक, दोन, तीन, चार..
जेवायला काय बरं करावं? किसलेल्या कोबीची कोशिंबीर? नको. कंटाळा आलाय डांएट करायचा. माझ्याच बाबतीत देवानी असं का केलं? कितीतरी लोक काय वाट्टेल ते खाऊन हडकुळे राहतात. माझ्याच नशिबी वजनवाढ का?
श्या. परत लिंक तुटली. श्वास आत, बाहेऽऽऽर! एक, दोन, तीन ..
कसला आवाज आहे हा? फ्रीज वाजतोय. कमाल आहे. हे जागेपणी कधीच लक्षात येत नाही. कशानी बरं वाजत असेल फ्रीज? शी! आणि टीप टीप काय आवाज येतोय? मला नळ गळलेले अजिबात आवडत नाहीत. बंद करावा का नळ? त्यापेक्षा टीप टीप तालावर श्वास घेऊया.
शुश! श्वास आत बाहेर. एक, दोन, तीन...

काही दिवसांनी या अशा फुटकळ ध्यानधरणेच्या जोडीला पॉझीटीव थिंकिंग सुरु केलं.
क्षमा, दया, शांती वगैरे जुन्या मराठी सिनेमातल्या नट्यांची जोपासना करायला सुरुवात केली. वाटतं खरं, पण या सगळ्या सात्विक विचारांनी अगदी दमायला होतं. मग कधी कधी माझं मन बुद्ध धर्माची ही कैद फोडून वाट्टेल तसा गोंधळ घालू लागायचं. लहानपणी एकदा आम्ही मांजराला कपाटात कोंडून ठेवायचा एक खेळ सुरु केला होता. त्यात अर्धा तास कपाटात कोंडलेलं मांजर बाहेर आल्या आल्या दिसेल त्या पहिल्या व्यक्तीला बोचकारायचं. तसंच माझं मनही या सात्विक विचारांच्या पिंजर्‍यातून बाहेर आल्यावर दिसलेल्या पहिल्या व्यक्ती अगर वस्तूला नांगी मारायचं. मग काही दिवस मी त्याच्यावर संस्कार करायचे नाही. पण मग पुन्हा चिंताबाई सकाळच्या एसटीत बसून डोक्यात राहायला यायच्या. पुनश्च ध्यानधारणेचा निश्चय व्हायचा. पुन्हा उदबत्त्या बाहेर यायच्या.

हिंदू/बुद्ध धर्मात सांगितलेल्या पुनर्जन्माला सगळे नास्तिक पहिल्यांदा आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करतात. पण अशी किती वर्तुळं पुन्हा पुन्हा आपल्या एकाच आयुष्यात येत असतात. आणि अशी कित्येक छोटी वर्तुळं छेदून आपल्या आयुष्यातले छोटे छोटे मोक्ष आपल्या वाट्याला येत असतात. चुकांचे, चिंतांचे, संभ्रमाचे, आसक्तीचे असे कित्येक पुनर्जन्म या एकाच आयुष्यात पाहायला मिळतात. आणि दोन विचारांमधल्या त्या रिकाम्या जागेला लांबवण्यातच ध्यान करायची पहिली छोटी पायरी लपलेली असते. पण त्या जागा पकडायला नक्की मनाला चपळ बनवावं की त्याच्याकडे दुर्लक्ष करावं हेच कळत नाही. पण जेव्हा त्या जागा सापडतात तेव्हा अगदी नॅनो सेकंद का असेना, पण प्रार्थनेचं एक छोटंसं प्रतिबिंब आपल्या अंतरंगात दिसतं.

कधी कधी मनाला यशस्वीपणे गप्प बसवल्यावर आपण जेव्हा "मी" म्हणतो, तेव्हा आपण नक्की कशाला मी म्हणतो असा प्रश्न पडतो. मी म्हणजे अव्याहतपणे धडधडणारं हृदय आहे, माझ्या या जगातील अस्तित्वाला लय देणारा माझा वफादार श्वास आहे, की मला हे सगळं पुन्हा पुन्हा साठवून, गोठवून लिहायला लावणारं मन आहे? असे सुंदर, शांत विचार करताना जे मन माझी साथ देतं ते कधी कधी चिंतेच्या भोवर्‍यात कसं काय अडकतं? आणि जसं माझ्या श्वासावर, हृदयावर मला बोट ठेवता येतं तसं माझ्या मनावर का बरं ठेवता येत नाही? आणि तरीही अदृश्यपणे माझ्या सगळ्या जाणिवांना, आनंदाला, चिंतेला आणि विचारला ते कसं काय स्वत:च्या काबूत ठेवतं?

गुलमोहर: 

मस्त ललित........ Happy
<<मनही या सात्विक विचारांच्या पिंजर्‍यातून बाहेर आल्यावर दिसलेल्या पहिल्या व्यक्ती अगर वस्तूला नांगी मारायचं. >> Lol
<<पहिला प्रकार म्हणजे आजी योगा. हा प्रकार मी लहानपणी सकाळी उठल्या उठल्या आजीबरोबर करायचे. आणि दुसरा प्रकार म्हणजे छळ योगा. हा प्रकार सकाळी साडेपाचला उठून मी आई बाबांचे टोमणे झेलत करायचे. >> Biggrin

Biggrin मस्तंच! हे फार आवडलं!

>>>असे सुंदर, शांत विचार करताना जे मन माझी साथ देतं ते कधी कधी चिंतेच्या भोवर्‍यात कसं काय अडकतं?
बेटा ब्लॉकर खा, सुखी व्हा! Proud

मजा आली. मस्त जमलय हे. जेव्हा तू तुझ्या आई, बाबा, आजी, आजोबांबद्दल लिहितेस ना तेव्हा ते एकदम छान उतरतं (you are in your own element then)

अगं आणि कुंडलिनी योगा, अनुसार योगा, रिस्टोरेटिव्ह योगा, अष्टांग योगा, अय्यंगार योगा राहिलच की Happy

आता एकदा ओशो ध्यान प्रकार करून बघ. अजूनच मजा मजा आहे तिथे.

हाहाहा,

मेडीटेशन चे तीन चार वर्ग केल्यावर कळले की आपल्याला उभ्या आयुष्यात हे जमायचे नाही. तरी एक महिना काढलाच.

ऑफीसवरून पळत पळत, गाडी हाकत तिथे पोचायचो. पण आमची स्थिती पण झोप जरा ज्यास्त झाली अशीच असायची. अर्धा तास सुस्त झोप मग उठल्यावर इतरांना न्याहळणे असे प्रकार झाले. मास्तर खूपच चिकाटीचा होता. तो माझ्याबद्दल माझ्यापेक्षाही आत्मविश्वासी होता की , हे मला जमेलच.

मास्तराची जो गोरा होता तो मग मनाशी कसे कनेक्ट व्हायचे धडे द्यायचा, तोवर झोपेने काबीज केले असल्याने तो प्रकार काही कधी जमलाच नाही.
एक दिवशी मास्तराला सांगितले की हे काही जमत नाही व तो पेटून उठला व म्हणाला मी एकटीचा क्लास घेवून तुला फोकस करायला शिकवतो. मनात आलेले विचार कसे परतवून लावायचे सांगतो.
तो डोळे वगैरे मिटून बसायचा आणि मी , इथून जाईपर्यंत किती उशीर होइल, जेवायला काय करायचे.. जातानाच पिकअप करु की घरी जावून काय खावू, नवर्‍याला आधीच फोन करून सांगून आणायला सांगितले पाहिजे होते, त्याने काहीच आवरले नसेल... असलाच आहे तो.. असे विचार.
Proud

उदबत्या समोर लावून बसले की घुसमटायला होते. व झोप येते लवकरच. Proud (स्वानुभव)
घरी असले प्रकार केले की घरच्या प्राण्यांना उत येतो चेष्ट करण्याचा त्यामुळे शक्य होत नाही.

खासच सई ! ..
मी परत एकदा वाचणाराय .. चिंतनीय लेख. [चिंतानीय नोहे Proud ]
बाकी चिंता ही केवळ आपल्या हातात असणार्‍या गोष्टींचीच करावी.

हातात असलेल्या गोष्टींची कशाला करायची चिंता, आपल्या हातातच आहेत गोष्टी.
हातात नाही त्यांची करून उपयोग काय? म्हणजे कशाचीच चिंता करू नये. Happy

मस्त गं सई...एकदम टकाटक...
तुझ्या लिस्टमध्ये बिक्रम योगा राहिला....:)

शुम्पी मी बिक्रमचं फ़क्त नावच ऐकलंय..माझ्याबरोबर इकडे जिममध्ये भेटणार्‍या गोर्‍यांना बिक्रम जास्त माहित असेल....:)

सईने म्हटलंय नं...फिरंगी लोक भारतीय संस्कृतीचं फिरंगायझेशन करण्यात तरबेज आहेत त्याला माझं दोनशे टक्के अनुमोदन आहेत.....योगचं "योगा" करुन पाहिलं नं कसं सगळीकडे झकास मार्केटींग केलंय ते......

शूम्पी = धनश्री?
मला हे माहितीच नव्हतं.
सॉल्लिड आनंद झाला हा शोध लागल्यामुळे!

आमच्या ओळखीत एक काका योगासनांचे क्लास घ्यायचे. मिलिटरी मधून रिटायर झाल्यानंतर त्यांनी हे वर्ग सुरु केले होते. त्यामुळे योगासनं म्हणजे दर दहा मिनिटांनी बारा सूर्यनमस्कार असं मला वाटायचं. असे सूर्यनमस्कार घालून घरी आल्यावर बोलायचीही शक्ती राहायची नाही.>>सगळ्यांना असेच 'काका' असतात बहुधा :(. चांगले लोळायच्या वेळेला 'ओम मित्राय नमः' करायला लावायचे Happy

त्याच दरम्यात भारतात करीना कपूर पावर योगा करून हडकुळी झाली होती. या सगळ्याचा परिणाम म्हणून मला योगासनं करायची सवय लागली. >> cause लिहिले पण effect लिहिला नाहि हे सगळ्यांच्या लक्षात आलेले दिसत नाहि Lol

शेवटून दुसरा पॅरा झक्कास आहे.

@असामी

हा हा काय पण इनोद केलाय! *कुत्सित हास्य*
ईफेक्ट मी स्वतःच्या तोंडानी कसा सांगावा?
आज मी माबोवर लईच पडीक आहे.

शेवटून दुसरा पॅरा झक्कास आहे.
+१
पण जेव्हा त्या जागा सापडतात तेव्हा अगदी नॅनो सेकंद का असेना, पण प्रार्थनेचं एक छोटंसं प्रतिबिंब आपल्या अंतरंगात दिसतं.
आणि त्या वेळी अनुभवलेला आनंद अद्वितीय असतो.

>>>चिंता करणार्‍या लोकांचा एक गुण असा आहे की ते इतर चिंतामाणींना अगदी ठामपणे चिंतेवर मात करायचे उपाय सुचवू शकतात. आणि "मला हे आयुष्यात खूप उशिरा कळलं म्हणून मी तुला सांगते", असंही असतं वर>>>१००% सहमत. आत्तापर्यंत बरेच भेटलेत असे. : )
बाकी मस्त लिहिलय , सई !

जमेल, जमेल, ध्यान जमेल नक्की तुला! कधी, कसे ते माहित नाही.... पण एक क्षण तुझे मन नेहमीच्या चिंतासुराने व्यापले असेल तर दुसर्‍या क्षणी बूम..... मग पुन्हा विचार, पुन्हा चिंतासुर.... Happy हे असे नॉर्मल आहे! Wink

ललित छान जमलंय!

Pages

Back to top