शककर्ता शालिवाहन- गौतमीपुत्र सातकर्णी (शतकर्णी) नाणी.

Submitted by ईनमीन तीन on 23 March, 2012 - 06:45

हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले, त्याविषयी मला पुस्तकांतुन, आंतरजालावरुन मिळालेली माहिती व माझ्या संग्रही असलेली काही नाणी खास माबोकरांसाठी गुढीपाडव्याच्या शुभेच्छांसह.

शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले.

याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले याच्या कार्यकाळात सातवाहन राज्याने भरभराटीचा कळस गाठला होता.

नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते.
तसेच सुप्रसिद्ध नाणेघाट यांच्याच शासन काळात घडवला गेला.
एका समकालीन कविच्या अनुसार प्रुथ्वीला दोन भार वहावे लागतात
उत्तरेला हिमालयाचा आणि दक्षिणेला सातवाहनांच्या पराक्रमाचा.

बोरीवली येथील कान्हेरी लेणी हि सुद्धा याच शालिवाहनाची देण आहे आणि हे कळल्यावर तुम्हाला थोडे नवलच वाटेल कान्हेरी लेणी ही त्या काळचे विद्यापिठ होते यावर आजुनही खोल संशोधन चालु आहे.

शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते.
गौतमीपुत्र सातकर्णीचे चांदिचे नाणे

त्या नाण्याची पाठची बाजु.

सातकर्णी तांब्याची नाणि

दक्षिणेचेपहिले सम्राट सातवाहन यांची नाणी महाराष्ट्रात नाशिक, नेवासे , कोल्हापूर, तेर, कऱ्हाड, पैठण,जुन्नर, चांदा व तऱ्हाळे इ. अनेक ठिकाणी सापडली आहेत. सातवाहनानी मुख्यत्वे तांब, जस्त इत्यादी धातूंचा उपयोग केला असून, चांदीचा वापर वसिष्ठीपुत्र पुलुमावी , वसिष्ठीपुत्र सातकर्णी व गौतमीपुत्र श्री यज्ञ सातकर्णी चित्रीत केलेली थोडी नाणी सापडली आहेत. सातवाहन नाण्यांवर बैल, हत्ती व सिंह यासारख्या प्राण्यांच्या कोरलेल्या अक्षरांसहित आकृती एका बाजूला असून दुसऱ्या बाजूला साधारणतः पार बांधलेले झाड, मासा, वृषभ, नदी, नंदीपाडा व उज्जैन पद्धतीचे स्वस्तिक या प्रकारची चित्रे आहेत.
यात जाणकार आजुन भर घालतीलच Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान माहिती. या नाण्यांचं आणखी एक महत्व आहे. सध्या कालनिश्चितीबाबत वेगवेगळे वाद उकरून काढले जात आहेत. अशा वेळी इतिहासाची साधने असलेल्या नाणी, शिलालेख, स्तंभ आदींचे कार्बन डेटिंग करून आजपासून किती वर्षांपूर्वी हा काल निश्चित करता येतो. इथं या विषयातल्या अधिकारी यक्ती आहेत. त्या याबाबत मार्गदर्शन करतीलच..

आयला, या नाण्यावर तर चक्क क्रॉस दिसतो! Uhoh

हे चित्रं बल्गेरियन ऑर्थोडॉक्स क्रॉस सारखे दिसते, नाही ...?
cross.JPG

आ.न.,
-गा.पै.

ईनमीन तीन, तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे. पण या लेखात अनेक त्रुटि आहेत, थोडी चुकीची माहिती आहे. मला आत्ता हे सविस्तर लिहायला वेळ नाहीये. नंतर वेळ होईल तसं लिहेनच.
त्याआधी एक सूचना करू? तुम्ही निदान व्ही. व्ही. मिराशी यांचं सातवाहन-क्षत्रपांवरचं पुस्तक कृपया वाचा (हे मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत आहे)...

आणखी एक - त्या चिन्हाला नंदीपद असं म्हणतात (नंदीपाडा नाही) Happy

युरी गागारिन, नाणी, शिलालेख, स्तंभ यांचं कार्बन डेटिंग होत नाही. बहुतांश शिलालेखांमधे काळाचा उल्लेख असतो. तो शक संवत् मधेच असतो असं नाही, पण राजांच्या नावांमुळे, राजघराण्यांच्या नावांमुळे किंवा अक्षरांच्या/लिपीच्या शैलीवरून लेखाचा/ नाण्याचा काळ ठरवला जातो.

ईनमीन तीन, तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे. पण या लेखात अनेक त्रुटि आहेत, थोडी चुकीची माहिती आहे. मला आत्ता हे सविस्तर लिहायला वेळ नाहीये. नंतर वेळ होईल तसं लिहेनच.>>>.

नक्की लिही वरदा. तुझ्या सविस्तर लेखाची वाट पाहतोयः)

हो रे विशाल. महाराष्ट्राचा आदिम इतिहास चा भाग दोन लिहायचाय. तो सातवाहन आणि आसपासच्या काळावर असेल. पण सध्या काही महिने खूपच कामात आहे/ असेन

वेगळ्या विषयाचा धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद.
चांदीचा वापर वसिष्ठीपुत्र पुलुमावी , वसिष्ठीपुत्र सातकर्णी व गौतमीपुत्र श्री यज्ञ सातकर्णी चित्रीत केलेली थोडी नाणी सापडली आहेत गौतमीपुत्र सातकर्णी व यज्ञश्री सातकर्णी वेगळे आहेत नां!
बाकी ही नाणी कुठे मिळाली हेही वाचायला आवडेल. नाशिकला अंजनेरीजवळ नाणेसंशोधन केंद्र आहे. या एकदा इकडे त्याला भेट द्यायला.. Happy

हो, गौतमीपुत्र, यज्ञश्री, वासिष्ठीपुत्र (हे दोन होते), असे बरेच वेगवेगळे राजे होते Happy

ईनमीनतीन, तुम्ही सातवाहनांच्या नाण्यांविषयीची अगदी मूलभूत माहिती म्हणून अमितेश्वर झा (अंजनेरीच्या नाणेसंशोधन संस्थेचे डायरेक्टर) यांनी हिंदीत लिहिलेलं 'भारतीय सिक्के' हे पुस्तक जरूर वाचा. जर या संस्थेला भेट दिली नसेल तर जरूर द्या. तुमच्या छंदाला थोडी शास्त्रीय बैठक येउद्यात Happy

महाराष्ट्र टाईम्स गुढी पाडवा विशेषंकात आलेला गौतमी सातकर्णी वरिल लेख

लेखक >> संजय सोनवणी

शालिवाहन मुळचा शब्द तो 'सालाहन' असा आहे आणि तसे स्पष्ट उल्लेख करणारी सातवाहनकालीन शिलालेख व नाणीही अस्तित्वात आहेत. सातवाहनांनी शकांचे हनन केले. ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.
..........

आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. पुराणकारांनी प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धामिर्क स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मादेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. परंतु या सणामागे गौतमीपुत्र सातकणीर्च्या नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयामध्ये आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते. गुढीपाडव्याचा व शालिवाहन शकाच्या सुरुवातीचा इतिहासाचा हा थोडक्यात मागोवा.

शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन'असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहन हे नाव मूळचे छातवाहन. म्हणजे पर्वतनिवासी. सातकर्णी हाही मूळचा प्राकृत शब्द 'सादकनी' असाच आहे. तत्कालीन शिलालेखांमध्येही अशीच नोंद आहे, या शब्दांना संस्कृतात कसलाही अर्थ नाही. पण त्याचे रुपांतर सातकर्णी असे केले गेले. संस्कृतीकरणाच्या नादात इतिहास कसा हरवतो याचे हे एक उदाहरण आहे.

सातवाहनांनी महाराष्ट्रावर इसवीसन पूर्व २२० ते २३० अशी जवळपास साडेचारशे वर्ष सत्ता गाजवली. आजचा महाराष्ट्र, त्याची संस्कृती सातवाहनांचीच खरी देणगी आहे. महाराष्ट्रातील असंख्य गिरिकिल्ले त्यांचीच निर्मिती आहे. सातवाहन हे औंड्र वंशीय, पशुपालक, वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेत शूद्र गणले गेलेल्या समाजांतून पुढे येत काण्व राजांचा पराभव करत सत्ता स्थापणारे लोक. छिमुक सातवाहन हा सातवाहन राजघराण्याचा संस्थापक. साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत स्वाभाविकपणे चढ-उताराचेही प्रसंगही आले. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण प्रदेशही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.

परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.' खरे तर गनिमी काव्याचा आद्य जनक गौतमीपुत्र सातकर्णी होय! शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. त्याचे साम्राज्य पुन्हा स्वतंत्र झाले. महाराष्ट्रीय जनतेने स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेतला. ही घटना इसवी सनाच्या ७८ मध्ये घडली. या संपूर्ण विजयाचा दिवस होता तो चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा विजयोत्सव प्रजा साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा दिवस. गौतमीपुत्राने अत्यंत अभिमानाने 'क्षहरात वंस निर्वंस करस' अशी या विजयाची नाशिकच्या शिलालेखात नोंद करुन ठेवली आहे. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. पुढे हाल सातवाहनाने (तोच हाल ज्याची गाथासत्तसई (गाथा सप्तशति) आजही जगभर अमोलिक काव्यभांडार म्हणून प्रसिद्ध आहे!) तर श्रीलंकेवर विजय मिळवून तेथील राजकन्येशी विवाहही केला. त्यावर लीलावती हे महाकाव्यही लिहिले गेले.

अशा अशक्यप्राय विजयाची स्मृती गौतमीपुत्राने स्वतंत्र संवत निर्माण करुन ठेवणे स्वाभाविक होते व तसे सातवाहनांनी केलेही. (याच गौतमीपुत्रासाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे त्याने आपल्या नावाआधी शकारि ही उपाधी लावल्याने सिद्ध होते) अनेक संशोधक शालिवाहन शकाचे श्रेय कनिष्क वा चष्टन या कार्दमकवंशीय लहान सत्ताधाऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात पण ते समूळ चुकीचे आहे. कनिष्क हा मुळात शक नव्हता त्यामुळे तो शक संवत सुरू करण्याची शक्यता नव्हती. चष्टन हा एक सामान्य शक अधिपती होता, त्यामुळे त्याने संवत सुरू करण्याची वा उत्तर ते दक्षिणेतील लोकांनी स्वीकारण्याचीही शक्यता नव्हती. तेवढे मुळात त्याचे राज्यही नव्हते. शालिवाहन नामक कोणताही राजा भारतात कधीही झाला नसल्याने शक संवताला शालिवाहन हे काल्पनिक नांव दहाव्या-बाराव्या शतकात कधीतरी जोडले गेले हा काही विद्वानांचा दावाही निरर्थक असाच आहे. प्राकृत भाषांना भ्रष्ट करत इतिहासही भ्रष्ट करण्याच्या नादात पुराणकारांनी गौतमीपुत्राला पार अदृष्य करुन टाकले आणि या अत्यंत मंगलदायक स्वातंत्र्याच्या दिवसाला ब्रह्मादेवाशी, तर कधी रामाशी भिडवून सोडले.

सत्य हे आहे की शालिवाहन हा मुळचा शब्द नसून तो 'सालाहन' असा आहे आणि तसे स्पष्ट उल्लेख करणारी सातवाहनकालीन शिलालेख व नाणीही अस्तित्वात आहेत. सातवाहन हे माहाराष्ट्री प्राकृताचे भोक्ते होते. संकृत अजून जन्मालाच यायची होती. सालाहन शक हाच मूळचा शब्द असून (साल + हन + शक) 'ज्या साली शकांचे हनन केले ते साल' (वर्ष अथवा संवत्सर)! ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ! म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.

आपण दरवर्षी जी गुढी उभारतो ती गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण म्हणून. गुढी उभारताना गौतमीपुत्र सातकर्णीची आठवणही जरूर ठेवायला हवी

हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात

मराठी नववर्ष? हे काय असते?

वैदिकानी सगळ्या परंपरेला वैदिकी रुप दिले.. त्यातून पाडवा हा सण रामाला जोडून ठेवला... पण रामाची जर याच्घा संबंध आहे, तर रामाच्या गावात अयोध्येत, यु पीबिहारात गुढ्या का उभारत नाहीत? याला या लोकांम्कडे उत्तर नसते

गुणाढ्य कोण होता.. त्याने स्वत: केलेले काव्य स्वतःच जाळून टाकले..त्याबद्दल काही माहिती मिळू शकेल का?

शिल्पा वाळूंज,

>> संकृत अजून जन्मालाच यायची होती.

सातवाहनकाळी संकृत जन्मालाच यायची होती...? संजय सोनावणींनी कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथांचे नाव ऐकले नसावे!

आ.न.,
-गा.पै.