डबल रंगातले सोफा कव्हर

Submitted by अवल on 23 March, 2012 - 01:41

दोन वर्षांपूर्वी आईच्या मैत्रिणीने एका पुस्तकात या क्रोशाचा पॅटर्न पाहिला, तिला तो खुप आवडला. पण तो कसा करायचा याची कृती त्यात नव्हती.
मग आईने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. दोन दिवस त्या चित्रात डोकं खुपसून बसले, चार वेळा उसवाउसव केली पण अखेर जमवलच ते डिझाइन Happy
त्या वेळेस माझा चांगला कॅमेरा नव्हता. साध्याच मोबाईलवरून त्याचा फोटो घेतला. आता त्या मावशीकडे जाऊन पुन्हा फोटो काढावा म्हणतेय. पण तो पर्यंत याच फोटोवर भिस्त. खुप शार्प नाहीये. पण त्या डिझाईनची गंमत कळतेय.

DSC01087.JPG

अन हो नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा Happy

गुलमोहर: 

धन्यवाद सर्वांना Happy
निंबुडा, पाठीला जिथे डोकं टेकतो तिथे फक्त वरून टाकायचं, मागून हवं तर इलॅस्टिक लावायचं हलू-पडू नये म्हणून Happy प्रत्येक उशीला स्वतंत्र. अशी सहा केलीत.

प्रत्येक उशीला स्वतंत्र. अशी सहा केलीत.
>>>
ओके ओके. आता समजलं. Happy

भारीच आहेत! ते एकमेकांत गुंतलेले २ रंग मस्तच दिसत आहेत. Happy

अवल, काय मस्त बनवलं आहेस. फारच सुंदर दिसतं आहे. तुला काय येत नाही त्याची यादी टाक ना एकदा. Happy छोटीशीच असेल ती यादी. कित्ती म्हणुन लोकांना कॉम्प्लेक्स येतो, माहिते का तुला! Happy

अगं कसलं भारी झालंय....!!
किती गोड डिझाईन आहे. असं क्रोशेमधे पहिल्यांदाच बघितलं.
इतकी डोकेफोड केली आहेसच तर कसं केलंस ते पण सांग ना.... Happy

मनिमाऊ Lol काही तरी काय Happy
धन्यवाद सर्वांना Happy
जयवी, लिहिते, पण मला हे कसं लिहायचं माहिती नाही. प्रयत्न करते.
पिवळ्या दोर्‍याच्या ३० साखळ्या घालून रिंग करायची ( पहिला राऊंड ). त्या रिंग मध्ये ३० खांब घालायचे, पहिल्या खांबात मुखा खांब घालून पिवळ्या रिंगचा दुसरा राऊंड पूर्ण करायचा. आता या दुसर्‍या राऊंडवर मोठ्याखांबांचा तिसरा राऊंड सुरू करायचा एक मोठा खांब, २ साखळ्या असे १५ वेळा करायचे. आता पिवळ्या दोर्‍याची शेवटची साखळी सेप्टीपीनमध्ये काढून ठेवायची.
आता तपकिरी दोरा घेऊन ३० साखळ्या घालायच्या. त्याची रिंग करताना आधी तयार विणलेल्या पिवळ्या गोलाच्या आतून ही तपकिरी साखळी एका बाजूनी काढून मग ती मुक्या खांबाने रिंग करायची.)पहिला राऊंड ) आता या तपकिरी रिंगवर ३० खांब घालायचे. ( पिवळी रिंग मधीन मधून हलत रहतेय ना हे पहावे.) हा दुसरा राऊंड मुक्या खांबाने पूर्ण करावा. आता तिसरा राऊंड सुरू करावा. मोठा खांब, २ साखळ्या असे १५ खांब करावेत.
आता पिवळ्या रिंग मधील तिसर्‍या राऊंडच्या पहिल्या खांबात मुका खांब घालावा. ६ साखळया घालून तिसर्‍या राऊंडमधील पिवळ्या दुसर्‍या खांबावर मोठा खांब घालावा. ( आता खाली पिवळा अन वर तपकिरी असे येईल. ) असे ( ३ साखळ्या, मोठा खांब ) १६ खांब घालावे. ( म्हणजेच खालचे पिवळे खांब संपतील तेथ पर्यंत. ) शेवटी साखळितून दोरा ओवून बंद करावे.
आता सेप्टीपीन मध्ये ठेवलेली पिवळी साखळी सुईत घेऊन
तपकिरी रिंग मधील तिसर्‍या राऊंडच्या पहिल्या खांबात मुका खांब घालावा. ६ साखळया घालून तिसर्‍या राऊंडमधील तपकिरी दुसर्‍या खांबावर मोठा खांब घालावा. ( आता खाली तपकिरी अन वर पिवळा असे येईल. ) असे ( ३ साखळ्या, मोठा खांब ) १६ खांब घालावे. ( म्हणजेच खालचे तपकिरी खांब संपतील तेथ पर्यंत. ) शेवटी साखळितून दोरा ओवून बंद करावे.
असे एक फूल पूर्ण होईल. पुढचे फूल करताना शेवटच्या ( पिवळ्या अन तपकिरी दोन्ही ) राऊंडना शेवटी पहिल्या फूलात अडकवणे.
हुश्श्य ! जमलं का मला सांगायला ? जयवी, भेटूयात एकदा. ते जास्ती सोपं जाईल Happy

अन्शू > नानकटाई विथ चॉकलेट क्रीम < लई भारी, आता हेच नाव देते या वीणीला Happy धन्यवाद Happy
वरचं मी लिहिलेलं, ज्यांनी क्रोश्या केलय त्यांना शक्यता आहे की समजू शकेल, बाकी सर्वांना क्षमस्व, इतकं अवघड लिहिल्याबद्दल Sad

आई गं........किती कष्ट घेतलेस गं....... धन्यु Happy
पण एकंदरीत प्रकरण भारी अवघड दिसतंय. तू म्हणतेस तसं भेटायलाच हवं Wink

Pages