लहान असताना नेहमी आयुष्य म्हणजे एक मोठ्ठीच्या मोठ्ठी फॅक्टरी आहे असं वाटायचं. अजूनही वाटतं.
आमच्या ओळखीत एक काकू आहेत. त्यांचं नाव मी फॉर्म्युला काकू ठेवलंय. फॉर्म्युला काकू ना, सगळ्यासाठी फॉर्म्युले तयार करतात. आयुष्यात यशस्वी व्हायचे एकशेएक फॉर्म्युले त्यांच्याकडे आहेत. त्यांची मुलं शाळेत नेहमी खूप अभ्यास करायची. कारण खूप अभ्यास करणे हा त्यांच्या फॉर्म्युल्यातील मोठा घटक होता. तो नेहमी न्यूमरेटरमध्ये जायचा. त्यामुळे जितका जास्ती अभ्यास, तितकं जास्ती यश. आणि यात फक्त खूप अभ्यास करून मागल्या वर्षीपेक्षा जास्त मार्कं मिळवायचे अशी अट नव्हती. खूप अभ्यास करून मागल्या वर्षी जो पहिला आला होता, त्याच्यापेक्षा जास्त मार्कं मिळवायचे. आणि मग त्यांच्या आजूबाजूला जमणार्या सगळ्या सवंगड्यांपेक्षा ती किती पुढे आहेत यांचे अडाखेपण असायचे. आणि अभ्यास पण कसा? तर आठवीपासूनच दहावीच्या प्रश्नपत्रिका कशा असतात ते तपासून, त्याच साच्यात बसणारा अभ्यास करायचा. अवांतर अभ्यास बारावी नंतर. आणि मैत्री सुद्धा अभ्यासू मुलांशीच करायची. कारण ढ मुलांशी मैत्री केली तर ती डिनॉमिनेटरमध्ये जायची. आणि त्यामुळे आयुष्यातील अंतिम यशात कपात व्हायची.
नाटक, वक्तृत्व, वादविवाद वगैरे असायचे फॉर्म्युल्यात पण त्यांच्या आधी अपूर्णांकातले, एका पेक्षा कमी असलेले कोएफीशीयंट्स असायचे. त्यामुळे या गोष्टी खूप जास्ती केल्यानी आयुष्यातील अंतिम यशात फारसा फरक पडायचा नाही. आणि नेहमी या क्षेत्रात पुढे असलेल्या मुलामुलींचा अभ्यासाचा आकडा दाखवून, अभ्यास कसा श्रेष्ठ आहे याचं उदाहरण देण्यात यायचं. अवांतर वाचन अभ्यासाच्या आकड्यानुसार न्यूमरेटर नाहीतर डिनॉमिनेटर मध्ये जायचं. पण आठवीनंतर ते खालीच असायचं. दहावीनंतर भाषाकौशल्याला सुद्धा खालच्या मजल्यावर धाडण्यात यायचं. आणि आठवी ते दहावी सायन्सला जाणं कसं महत्वाचं आहे यावर खूप प्रवचन व्हायचं. त्यामुळे फॉर्म्युला काकूंची मुलं फॅक्टरीच्या असेम्बली लाईनवर छान टिकून राहिली. प्रत्येक व्यंगचाचणीतून फॉर्म्युला काकूंची मुलं अगदी माशासारखी सुळकन पुढे जायची. अशी कांगारूसारखी उड्या मारत मारत फॉर्म्युला काकूंची मुलं कुठच्या कुठे गेली! आम्ही बघतच राहिलो. आम्हीपण होतो फॉर्म्युला काकूंच्या मुलांच्या सवंगड्यांमध्ये. पण आम्हाला तसा फारसा भाव नव्हता. कारण आम्ही नेहमी त्यांच्या आलेखाच्या मुळाशी बरोब्बर पंचेचाळीस अंशाचा कोन करून उड्डाण करणार्या त्या लायनीच्या खाली, नाहीतर वर असायचो. जिथे आम्ही वर असायचो ना, ती क्षेत्रं फॉर्म्युल्यात खाली असायची. आणि वर असलीच तर नगण्य असायची.
मग जशी जशी स्पर्धा वाढू लागली, तसं अर्थातच आमच्यात आणि फॉर्म्युला काकूंच्या मुलांच्यात असलेलं अंतर वाढू लागलं. फॉर्म्युला काकूंची मुलं नेहमी आमच्या पुढे असायची. आणि कधीही त्यांना भेटायला गेलं की आम्हाला सहानुभूतीपर भाषण मिळायचं. त्यात एकदा आयुष्यात अभ्यासातील यशाचा कसा कमी वाटा आहे यावर भाषण देताना, धीरुभाई अंबानींचं उदाहरण आम्हाला देण्यात आलं. मग अर्थात आमच्या नापास झालेल्या, दु:खी (पण चाणाक्ष) मनात असा विचार आला, की फॉर्म्युला काकू त्यांच्या मुलांना अंबानी व्हायला का नाही शिकवत? आणि कदाचित आपण इतके गटांगळ्या खातोय म्हणजे कधीतरी आपणही अंबानी होऊ शकू काय , अशीही एक सुखद शंका आली. पण फॉर्म्युला काकूंच्या फॉर्म्युल्यात जोखीम पत्करणे हे भल्या मोठ्या लाल अक्षरात खालच्या मजल्यावर आहे. खालच्या मजल्यावरच्या बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत. पण कुठल्याही प्रकारची जोखीम घेणे म्हणजे काकूंचा फॉर्म्युला अस्थिर करण्यासारखं आहे. आणि यात त्या फॉर्म्युल्यातील इतर घटकांना तपासून बघण्याची जोखीमही धरलेली आहे. अशा प्रकारे फॉर्म्युल्याचा पाया अगदी पक्का करण्यात आलाय. फॉर्म्युला काकूंच्या गणितांनी बिल गेट्स किंवा अंबानीकडे नोकरी मिळवणे हे बिल गेट्स किंवा अंबानी होण्यापेक्षा जास्त यशस्वी मानलं जातं. याचं कारण म्हणजे फॉर्म्युला काकूंच्या स्पर्धेत अंबानी कुठेच येत नाहीत. कारण त्यांनी फॉर्म्युला काकुंचे सगळे नियम अगदी लहान वयातच झुगारून टाकले. पण याला फॉर्म्युला काकू नशीब असं गोड नाव देतात. आणि त्यांच्या मते नशीबवान नसणार्या माणसांनी अशी जोखीम पत्करू नये. आणि त्यांच्या मुलांनी मात्र काही झालं तरी पत्करू नये.
फॉर्म्युला काकूंची मुलं जेव्हा घासून, पुसून चकचकीत होऊन फॅक्टरीबाहेर पडली तेव्हा त्यांनी मोठ्ठा, हसरा श्वास घेऊन इकडे तिकडे पाहिलं. आणि त्यांचं यशस्वी फॉर्म्युला जीवन जगायला सुरुवात केली. पण आता करायला अभ्यास नव्हता आणि आजूबाजूला असलेली गर्दी वेगवेगळ्या क्षेत्रातून, देशांतून, भाषांतून आणि अनुभवांतून आली होती. त्यातील फॉर्म्युला काकुंसारख्या आयांची मुलं सोडता बाकी सगळ्यांनी वेगळेच मार्ग घेतले होते. काही जण फॉर्म्युला काकूंच्या मुलांपेक्षा लहान असूनही खूप पुढे गेले होते. काही जण खूप वेळा हरून आले होते. पण प्रत्येक तोट्याचा अभ्यास करून मस्त टगेपण बाळगून होते. काहीजण असं काही व्यक्तिमत्व घेऊन आले होते की फॉर्म्युला काकूंच्या लायनीच्या दोन्ही बाजूंचे लोक त्यांच्यामागून मंत्रमुग्ध होऊन चालू लागायचे. काही जण कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता, अन्यायाविरुद्ध पेटून उठायचे. काही जण आयुष्यभर तपस्या करून निवडलेला मार्ग अचानक सोडून देणारे, आणि नवीन मार्गावर त्याहीपेक्षा वेगाने पुन्हा प्रगती करणारे. काही लोक फॉर्म्युला काकूंच्या फॉर्म्युल्यात कणभरही नसलेल्या एखाद्या गुणावर आयुष्य बहाल करणारे. कुणी जैविक भाजीवाला, कुणी सात्विक खानावळवाला, कुणी लोकांच्या भिंती स्वत:च्या कल्पनेनी रंगवणारा असे अनेक यशस्वी लोक बघून फॉर्म्युला काकूंची मुलं पार भांबावून गेली. आणि आयुष्यातल्या लहान अपयशानेदेखील त्यांना कानठळ्या बसू लागल्या.
फॉर्म्युला काकूंच्या सगळ्या फुटपट्ट्या खर्या जगात तुलनेसाठी अपुर्या पडू लागल्या. कारण खर्या जगातील सगळी खरी माणसं काही फॉर्म्युला काकूंच्या फॅक्टरीतून आली नव्हती. आणि जी फॉर्म्युला काकूंच्या फॅक्टरीतून आली होती ती सगळी काहीतरी एकसारखं करत होती. पण फॉर्म्युला काकूंचा एक फॉर्म्युला मात्र खरा उतरला बरंका. त्यांच्या मुलांना खूप लवकर, खूप जास्ती पैसा मिळाला. लगेच काकूंनी त्यांना मिळालेला पैसा वाढवण्याचाही फॉर्म्युला दिला. आणि मग अभ्यासाची जागा पैशांनी घेतली.
फॉर्म्युला काकूंच्या सुना, जावई आणि मुलं यांनी इतर फॉर्म्युला दांपत्यांशी स्पर्धा सुरु केली. पण यामुळे काय झालं की फॉर्म्युला काकूंच्या मुलांसारख्या मुलांचा एक बुडबुडा तयार झाला. त्या बुडबुड्यात एक छोटी शाळाच तयार झाली जणू. आणि इतर फॉर्म्युला लोकांशी तुलना करता करता फॉर्म्युला मुलांचे फॉर्म्युला आई बाबा झाले. अणि असा एक मोठ्ठा संघ तुलना करण्यात मग्न झाल्यामुळे सगळेच हळू हळू दु:खी होऊ लागले. असं कसं बरं झालं? लौकिक यश विरुद्ध आनंद असा आलेख केल्यावर मात्र फॉर्म्युला लोक अत्यंत यशस्वी परंतु कमी आनंदी निघू लागले. आणि फॉर्म्युला काकूंना अचानक आपला फॉर्म्युला चुकला की काय असं वाटू लागलं. पण अर्थात त्यांनी हे कुण्णालाही बोलून दाखवलं नाही. पण आतल्या आतच त्यांना सारखी हुरहूर लागून राहिली. आपल्या मुलांनी तर सगळे बॉक्सेस टिक केले होते. मग त्यांना असं अपुरं अपुरं का वाटतंय?
पण काकूंचा फॉर्म्युला चुकला नव्हता. फॉर्म्युला यशस्वी आयुष्याचा होता. आणि तो त्याच्या सगळ्या परिमाणांवर चोख उतरला होता. पण काकूंचं एक असमशन चुकलं होतं. ते म्हणजे, या सगळ्या यशाच्या पलीकडे गेलं की आपण आनंदी होऊ. आणि दुसर्यांपेक्षा यशस्वी झाल्याने आपण त्यांच्यापेक्षा जास्त आनंदी होऊ. आनंद नेहमी भविष्यकाळात कुठेतरी मृगजाळासारखा धावत सुटणारा, कधीही हाताला न लागणारा पदार्थ आहे असं फॉर्म्युला काकूंचा फॉर्म्युला सांगतो. आणि अचानक धावता धावता धाप लागून असं लक्षात येतं, की आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी करणारे, कुठल्याही प्रथापित गणितांना भीक न घालणारे, मनाला वाटेल ते, वाटेल तेव्हा आणि वाटेल तस्सं करणारे, अपयशाची फिकीर न करता हृदयाला भिडणर्या सागरात उडी मारणारे लोक कधी कधी जास्ती आनंदी असतात. कारण कदाचित आपली आता कुणाशीच तुलना होऊ शकत नाही, आणि कुणाच्याही तुलनेत आपण आनंदी किंवा दु:खी असू शकत नाही, या जाणीवेतच त्यांना आनंद मिळतो.
हा टेड नक्की ऐका!
http://www.ted.com/talks/shawn_achor_the_happy_secret_to_better_work.html
http://www.ted.com/talks/shawn_achor_the_happy_secret_to_better_work.html
आईवडिलांनी चालना जरूर द्यावी
आईवडिलांनी चालना जरूर द्यावी पण हे अमूक केले नाहीस तर आयुष्य व्यर्थ जाईल असे बिंबवू नये, असे वाटते. एखादा COEP मधून Engineer झाला पण जर त्याला कलेची आवड असेल तर त्या पदवीला काही अर्थ राहिल का? हेच जर एखाद्याला खरेच engineering ची आवड आहे तर एखाद्या दुय्यम कॉलेजातून पदवी घेऊनसुद्धा तो चमकेल.. सर्व डॉक्टर/Engineer थोडेच COEP/ बी जे मधून पदव्या घेतात?
'But what would happen if we
'But what would happen if we are taught to explore before plan'' < मुलांना त्यांच्या परी ने करु ध्या हे खरयं पण कमी वेळ आणि भयानक स्पर्धा ह्या मुळे पालकांचा सहभाग वाढतोय. ऑफिसात बसून IIT च्या क्लासेसची माहीती / entrance exams चे प्रश्ण / sample papers / इतर लोकांचे अनुभव विचारणे इ. प्रोजॅक्ट वर काम करण्यार्या आया मी बघितल्या आहे. आणि अगदी पहिली / दुसरीतल्या मुलांच्या आया पण पळापळी करताना बघितल्या आहे.
arc << +१ (पहिल्या पॅरा साठी)
आजकाल च्या अति स्पर्धेच्या युगात मोठ्या मुलांना मदत लागते. पालक सुद्धा plan ठरवण्यात सहभागी होतात. किती सहभाग द्यायचा आणि किती मुलांवर सोडायचे ह्याचे काही निकष नसतात ते experiment च करावे लागते. कधीतरी अतिरेक होतो हे खरयं..
काही पालक अभ्यास एके अभ्यास आणि जास्ती मार्क या वर खूप जोर देतात, जे चुकीचे आहे. त्यांना आजुबाजुचे आणि नातेवाईकांमधली well to do मुलं बघून ही उर्मी (?) येत असावी.
वा! मस्त लेख!
वा! मस्त लेख!
ते 'पुस्तक' बारावीत असताना
ते 'पुस्तक' बारावीत असताना प्रचंड स्फुर्तीदायक वाटलेल मला. घरी कुणाची अभ्यास करण्याची जबरदस्ती कधीच नव्हती. पण arc म्हणतात तस motivation साठी त्या वयात ते उपयोगी पडलेल नक्की.
आता कदाचीत अजिब्बात आवडणार नाही.
लेख लिहिलाय चांगला. पण लेखातले विचार अजिब्बात पटले नाहीत सई. फॉर्म्युला असणारे सगळेच दु:खी आणि नसणारे सुखी असा काहीसा सुर वाटला.प्रत्यक्षात अस "काळं पांढर" काही नसत.(म्हणजे नसाव अस मला वाटत.)
पालकांनी मुलांच्यातले पोटँशिअल ओळखुन त्यानुसार , मुलांच्या इच्छेने त्यांना थोडफार पुश करण्याला काहीच हरकत नसावी.
मध्ये टायगर मॉमची चर्चा चालू होती ते यानिमित्ताने आठवले.
ते पुस्तक मायबोलीवर आहे...
ते पुस्तक मायबोलीवर आहे... http://kharedi.maayboli.com/shop/Yashavant-Vha.html
' हट्टी कट्टी गरीबी आणि लुळी
' हट्टी कट्टी गरीबी आणि लुळी पांगळी श्रीमंती' या वळणावर गेलेला लेख वाटतोय. अतिरेक कशाचाही वाईट्च.
या लेखात 'अति' करणा-या
या लेखात 'अति' करणा-या पालकांविषयी फॉर्म्युला शब्द वापरला आहे असे वाटतंय.हां.आता 'अति' ची व्याख्या व्यक्तीनुसार बदलते हे खरेच.वरती लंपन यांची पोस्ट पुरेशी बोलकी वाटते यासंदर्भात.
<<< हृदयाला भिडणर्या सागरात उडी मारणारे लोक कधी कधी जास्ती आनंदी असतात>>> हे लेखातील वाक्य खूप महत्त्वाचे वाटते.हो आणि यातील ' कधी कधी ' हा शब्द तर फार महत्त्वाचा.
मी स्वतः या फॉर्म्युल्याच्या जंजाळात २ वर्षांपूर्वी अडकले होते माझ्या ४ वर्षांच्या मुलाच्या शाळा प्रवेशासाठी आणि खूप मनस्ताप करून घेतला होता, ते आठवले आता.लिहीन वेळ मिळाला तर
शिल्पा << +१ ए आर सी, त्या
शिल्पा << +१
ए आर सी, त्या पुस्तकात हे आणि अस्संच म्हणजे ग्रेट आणि असं केल्याशिवाय अॅडमिशन मिळतच नाही असा सूर आहे. परत ध्येय अॅडमिशन मिळण्याचेच नसून बोर्डात येण्याचे आहे. आम्ही जे केले तेच्च ग्रेट आणि योग्य असा सूर इरिटेटिंग आहे त्यातला.
परत शास्त्र आणि गणित सोडून इतर विषयांचा अभ्यास आईवडिलांनी केला आणि मुलांनी फक्त घोकंपट्टी केली असे स्पष्ट लिहिले आहे. हा प्रकार मोटिव्हेशन म्हणूनही माझ्यामते धोकादायक आहे.
मी त्या दोघाही भावंडांना ओळखत नाही पण ज्यांच्यावर शास्त्र आणि गणित समजून घ्या बाकी इतिहास-भूगोल-भाषा असे सगळे विषय हे केवळ घोकंपट्टी करून सोडून द्यायचे असतात असे संस्कार असतील त्यांच्या एकूण माणूस म्हणून घडण्याबद्दल मला नक्कीच शंका आहे.
इतकं झापडबंद आणि चौकट व्यक्तीमत्व घडवणार्या पुस्तकाचा गवगवा म्हणूनच माझ्या कमालीचा डोक्यात गेला.
बाकी असं काही न करताही हसतखेळत अभ्यास करून मेडिकलला अॅडमिशन मिळालेल्या किंवा बोर्डात पहिल्या आलेल्या मुलांची संख्या या दोन भावंडांपेक्षा बरीच जास्त आहे. मी स्वतः अश्या अनेकांना ओळखते.
नाही आवडला फॉर्म्युला, सई!
नाही आवडला फॉर्म्युला, सई!
>>परत शास्त्र आणि गणित सोडून
>>परत शास्त्र आणि गणित सोडून इतर विषयांचा अभ्यास आईवडिलांनी केला आणि मुलांनी फक्त घोकंपट्टी केली असे स्पष्ट लिहिले आहे. > कठीण आहे! परीक्षा मुलांची की आईवडीलांची? हे मोटिव्हेशन नाही, स्पून फिडिंग झाले.
>>परत ध्येय अॅडमिशन
>>परत ध्येय अॅडमिशन मिळण्याचेच नसून बोर्डात येण्याचे आहे.
मला तरी असे कुठे जाणवले नाही त्या पुस्तकात. मला त्या पुस्तकातून फायदाच झाल्याचे आठवते आहे. वेळेचे नियोजन, उत्तर पत्रिका लिहीणे, समास, परिक्षेसाठीची स्टेशनरी आणि तयारी यामागील विचार, त्यातील सुधारणा, भाषेचे अलंकारीकरण (रस्त्याचे उदाहरण, निबंधाची आखणी वगैरे) हे काही वानगीदाखल भाग, जे मला अजूनही आठवतात.
लुना मिळावी यासाठी पण वापर केला होता मी पुस्तकाचा.
तो मात्र काही चालला नाही.
ह्म्म हा लेख नेहमीइतका आवडला
ह्म्म हा लेख नेहमीइतका आवडला नाही..
नंद्या, मायबोली खरेदी विभागात
नंद्या,
मायबोली खरेदी विभागात या पुस्तकाची जाहिरात करताना सुद्धा " दहावी -बारावी मेरीट लिस्टमध्ये येण्याचा राजमार्ग नियोजनपूर्वक अभ्यास आणि परिश्रम !" अशी केली आहे :). शिवाय भाषेचा अभ्यास आईवडिलांनी करून त्यांनी तयार केलेल्या प्रश्नोत्तरांचं मुलांनी फक्त घोकंपट्टी करणं मला खरंच पटलं नाही. या फॉर्म्युल्यानं मुलं बोर्डात आली तरी त्यांच्या जाणिवा, अनुभव विश्व प्रगल्भ होतील का? मुलांची संशोधन करण्याची वृत्ती, विषय मुळापासून समजून घेणे, एखाद्या विषयाची मुलांना आवड निर्माण होणे वगैरे गोष्टी साध्य होतील का?
वेळेचे नियोजन आदी गोष्टी ज्या तू सांगितल्या आहेस, तेवढ्यापुरतंच पुस्तक सिमीत असतं तर मग हा वरचा मुद्दाच आला नसता ना?
आता इथे लेकीच्या शाळेत ज्या पद्धतीनं मुलांना निबंध-कविता लिहीणे, अवांतर वाचन, प्रोजेक्ट, संशोधन वगैरे साठी प्रोत्साहन देतात आणि पालकांनी प्रोजेक्ट मधे मर्यादीत मदत करावी (Odyssey of the mind)असं सांगतात हे पाहिल्यावर आणि आपण किती साचेबंद शिकलो असं मला तरी वाटतं. आपलं ध्येय 'ज्ञान मिळवणे' असं नसून ' चांगले मार्क मिळवणे' असं होतं असं मला वाटतं. यात शिक्षणपद्धतीचा दोष असू शकेल पण किती पालकांनी थोडा वेगळा विचार करून मुलांना 'तू मार्कांची काळजी करू नकोस, विषय समजून घे' असं सांगितलं असेल? असो.
ए, काय याड लिहिलय... भयंकर
ए, काय याड लिहिलय... भयंकर आवडलं. (सई, कुठे गायबतेस मधे मधे? असं करू नये...)
(No subject)
Pages