फॉर्म्युला काकू

Submitted by सई केसकर on 15 March, 2012 - 21:30

लहान असताना नेहमी आयुष्य म्हणजे एक मोठ्ठीच्या मोठ्ठी फॅक्टरी आहे असं वाटायचं. अजूनही वाटतं.
आमच्या ओळखीत एक काकू आहेत. त्यांचं नाव मी फॉर्म्युला काकू ठेवलंय. फॉर्म्युला काकू ना, सगळ्यासाठी फॉर्म्युले तयार करतात. आयुष्यात यशस्वी व्हायचे एकशेएक फॉर्म्युले त्यांच्याकडे आहेत. त्यांची मुलं शाळेत नेहमी खूप अभ्यास करायची. कारण खूप अभ्यास करणे हा त्यांच्या फॉर्म्युल्यातील मोठा घटक होता. तो नेहमी न्यूमरेटरमध्ये जायचा. त्यामुळे जितका जास्ती अभ्यास, तितकं जास्ती यश. आणि यात फक्त खूप अभ्यास करून मागल्या वर्षीपेक्षा जास्त मार्कं मिळवायचे अशी अट नव्हती. खूप अभ्यास करून मागल्या वर्षी जो पहिला आला होता, त्याच्यापेक्षा जास्त मार्कं मिळवायचे. आणि मग त्यांच्या आजूबाजूला जमणार्‍या सगळ्या सवंगड्यांपेक्षा ती किती पुढे आहेत यांचे अडाखेपण असायचे. आणि अभ्यास पण कसा? तर आठवीपासूनच दहावीच्या प्रश्नपत्रिका कशा असतात ते तपासून, त्याच साच्यात बसणारा अभ्यास करायचा. अवांतर अभ्यास बारावी नंतर. आणि मैत्री सुद्धा अभ्यासू मुलांशीच करायची. कारण ढ मुलांशी मैत्री केली तर ती डिनॉमिनेटरमध्ये जायची. आणि त्यामुळे आयुष्यातील अंतिम यशात कपात व्हायची.

नाटक, वक्तृत्व, वादविवाद वगैरे असायचे फॉर्म्युल्यात पण त्यांच्या आधी अपूर्णांकातले, एका पेक्षा कमी असलेले कोएफीशीयंट्स असायचे. त्यामुळे या गोष्टी खूप जास्ती केल्यानी आयुष्यातील अंतिम यशात फारसा फरक पडायचा नाही. आणि नेहमी या क्षेत्रात पुढे असलेल्या मुलामुलींचा अभ्यासाचा आकडा दाखवून, अभ्यास कसा श्रेष्ठ आहे याचं उदाहरण देण्यात यायचं. अवांतर वाचन अभ्यासाच्या आकड्यानुसार न्यूमरेटर नाहीतर डिनॉमिनेटर मध्ये जायचं. पण आठवीनंतर ते खालीच असायचं. दहावीनंतर भाषाकौशल्याला सुद्धा खालच्या मजल्यावर धाडण्यात यायचं. आणि आठवी ते दहावी सायन्सला जाणं कसं महत्वाचं आहे यावर खूप प्रवचन व्हायचं. त्यामुळे फॉर्म्युला काकूंची मुलं फॅक्टरीच्या असेम्बली लाईनवर छान टिकून राहिली. प्रत्येक व्यंगचाचणीतून फॉर्म्युला काकूंची मुलं अगदी माशासारखी सुळकन पुढे जायची. अशी कांगारूसारखी उड्या मारत मारत फॉर्म्युला काकूंची मुलं कुठच्या कुठे गेली! आम्ही बघतच राहिलो. आम्हीपण होतो फॉर्म्युला काकूंच्या मुलांच्या सवंगड्यांमध्ये. पण आम्हाला तसा फारसा भाव नव्हता. कारण आम्ही नेहमी त्यांच्या आलेखाच्या मुळाशी बरोब्बर पंचेचाळीस अंशाचा कोन करून उड्डाण करणार्‍या त्या लायनीच्या खाली, नाहीतर वर असायचो. जिथे आम्ही वर असायचो ना, ती क्षेत्रं फॉर्म्युल्यात खाली असायची. आणि वर असलीच तर नगण्य असायची.

मग जशी जशी स्पर्धा वाढू लागली, तसं अर्थातच आमच्यात आणि फॉर्म्युला काकूंच्या मुलांच्यात असलेलं अंतर वाढू लागलं. फॉर्म्युला काकूंची मुलं नेहमी आमच्या पुढे असायची. आणि कधीही त्यांना भेटायला गेलं की आम्हाला सहानुभूतीपर भाषण मिळायचं. त्यात एकदा आयुष्यात अभ्यासातील यशाचा कसा कमी वाटा आहे यावर भाषण देताना, धीरुभाई अंबानींचं उदाहरण आम्हाला देण्यात आलं. मग अर्थात आमच्या नापास झालेल्या, दु:खी (पण चाणाक्ष) मनात असा विचार आला, की फॉर्म्युला काकू त्यांच्या मुलांना अंबानी व्हायला का नाही शिकवत? आणि कदाचित आपण इतके गटांगळ्या खातोय म्हणजे कधीतरी आपणही अंबानी होऊ शकू काय , अशीही एक सुखद शंका आली. पण फॉर्म्युला काकूंच्या फॉर्म्युल्यात जोखीम पत्करणे हे भल्या मोठ्या लाल अक्षरात खालच्या मजल्यावर आहे. खालच्या मजल्यावरच्या बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत. पण कुठल्याही प्रकारची जोखीम घेणे म्हणजे काकूंचा फॉर्म्युला अस्थिर करण्यासारखं आहे. आणि यात त्या फॉर्म्युल्यातील इतर घटकांना तपासून बघण्याची जोखीमही धरलेली आहे. अशा प्रकारे फॉर्म्युल्याचा पाया अगदी पक्का करण्यात आलाय. फॉर्म्युला काकूंच्या गणितांनी बिल गेट्स किंवा अंबानीकडे नोकरी मिळवणे हे बिल गेट्स किंवा अंबानी होण्यापेक्षा जास्त यशस्वी मानलं जातं. याचं कारण म्हणजे फॉर्म्युला काकूंच्या स्पर्धेत अंबानी कुठेच येत नाहीत. कारण त्यांनी फॉर्म्युला काकुंचे सगळे नियम अगदी लहान वयातच झुगारून टाकले. पण याला फॉर्म्युला काकू नशीब असं गोड नाव देतात. आणि त्यांच्या मते नशीबवान नसणार्‍या माणसांनी अशी जोखीम पत्करू नये. आणि त्यांच्या मुलांनी मात्र काही झालं तरी पत्करू नये.

फॉर्म्युला काकूंची मुलं जेव्हा घासून, पुसून चकचकीत होऊन फॅक्टरीबाहेर पडली तेव्हा त्यांनी मोठ्ठा, हसरा श्वास घेऊन इकडे तिकडे पाहिलं. आणि त्यांचं यशस्वी फॉर्म्युला जीवन जगायला सुरुवात केली. पण आता करायला अभ्यास नव्हता आणि आजूबाजूला असलेली गर्दी वेगवेगळ्या क्षेत्रातून, देशांतून, भाषांतून आणि अनुभवांतून आली होती. त्यातील फॉर्म्युला काकुंसारख्या आयांची मुलं सोडता बाकी सगळ्यांनी वेगळेच मार्ग घेतले होते. काही जण फॉर्म्युला काकूंच्या मुलांपेक्षा लहान असूनही खूप पुढे गेले होते. काही जण खूप वेळा हरून आले होते. पण प्रत्येक तोट्याचा अभ्यास करून मस्त टगेपण बाळगून होते. काहीजण असं काही व्यक्तिमत्व घेऊन आले होते की फॉर्म्युला काकूंच्या लायनीच्या दोन्ही बाजूंचे लोक त्यांच्यामागून मंत्रमुग्ध होऊन चालू लागायचे. काही जण कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता, अन्यायाविरुद्ध पेटून उठायचे. काही जण आयुष्यभर तपस्या करून निवडलेला मार्ग अचानक सोडून देणारे, आणि नवीन मार्गावर त्याहीपेक्षा वेगाने पुन्हा प्रगती करणारे. काही लोक फॉर्म्युला काकूंच्या फॉर्म्युल्यात कणभरही नसलेल्या एखाद्या गुणावर आयुष्य बहाल करणारे. कुणी जैविक भाजीवाला, कुणी सात्विक खानावळवाला, कुणी लोकांच्या भिंती स्वत:च्या कल्पनेनी रंगवणारा असे अनेक यशस्वी लोक बघून फॉर्म्युला काकूंची मुलं पार भांबावून गेली. आणि आयुष्यातल्या लहान अपयशानेदेखील त्यांना कानठळ्या बसू लागल्या.

फॉर्म्युला काकूंच्या सगळ्या फुटपट्ट्या खर्‍या जगात तुलनेसाठी अपुर्‍या पडू लागल्या. कारण खर्‍या जगातील सगळी खरी माणसं काही फॉर्म्युला काकूंच्या फॅक्टरीतून आली नव्हती. आणि जी फॉर्म्युला काकूंच्या फॅक्टरीतून आली होती ती सगळी काहीतरी एकसारखं करत होती. पण फॉर्म्युला काकूंचा एक फॉर्म्युला मात्र खरा उतरला बरंका. त्यांच्या मुलांना खूप लवकर, खूप जास्ती पैसा मिळाला. लगेच काकूंनी त्यांना मिळालेला पैसा वाढवण्याचाही फॉर्म्युला दिला. आणि मग अभ्यासाची जागा पैशांनी घेतली.

फॉर्म्युला काकूंच्या सुना, जावई आणि मुलं यांनी इतर फॉर्म्युला दांपत्यांशी स्पर्धा सुरु केली. पण यामुळे काय झालं की फॉर्म्युला काकूंच्या मुलांसारख्या मुलांचा एक बुडबुडा तयार झाला. त्या बुडबुड्यात एक छोटी शाळाच तयार झाली जणू. आणि इतर फॉर्म्युला लोकांशी तुलना करता करता फॉर्म्युला मुलांचे फॉर्म्युला आई बाबा झाले. अणि असा एक मोठ्ठा संघ तुलना करण्यात मग्न झाल्यामुळे सगळेच हळू हळू दु:खी होऊ लागले. असं कसं बरं झालं? लौकिक यश विरुद्ध आनंद असा आलेख केल्यावर मात्र फॉर्म्युला लोक अत्यंत यशस्वी परंतु कमी आनंदी निघू लागले. आणि फॉर्म्युला काकूंना अचानक आपला फॉर्म्युला चुकला की काय असं वाटू लागलं. पण अर्थात त्यांनी हे कुण्णालाही बोलून दाखवलं नाही. पण आतल्या आतच त्यांना सारखी हुरहूर लागून राहिली. आपल्या मुलांनी तर सगळे बॉक्सेस टिक केले होते. मग त्यांना असं अपुरं अपुरं का वाटतंय?

पण काकूंचा फॉर्म्युला चुकला नव्हता. फॉर्म्युला यशस्वी आयुष्याचा होता. आणि तो त्याच्या सगळ्या परिमाणांवर चोख उतरला होता. पण काकूंचं एक असमशन चुकलं होतं. ते म्हणजे, या सगळ्या यशाच्या पलीकडे गेलं की आपण आनंदी होऊ. आणि दुसर्‍यांपेक्षा यशस्वी झाल्याने आपण त्यांच्यापेक्षा जास्त आनंदी होऊ. आनंद नेहमी भविष्यकाळात कुठेतरी मृगजाळासारखा धावत सुटणारा, कधीही हाताला न लागणारा पदार्थ आहे असं फॉर्म्युला काकूंचा फॉर्म्युला सांगतो. आणि अचानक धावता धावता धाप लागून असं लक्षात येतं, की आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी करणारे, कुठल्याही प्रथापित गणितांना भीक न घालणारे, मनाला वाटेल ते, वाटेल तेव्हा आणि वाटेल तस्सं करणारे, अपयशाची फिकीर न करता हृदयाला भिडणर्‍या सागरात उडी मारणारे लोक कधी कधी जास्ती आनंदी असतात. कारण कदाचित आपली आता कुणाशीच तुलना होऊ शकत नाही, आणि कुणाच्याही तुलनेत आपण आनंदी किंवा दु:खी असू शकत नाही, या जाणीवेतच त्यांना आनंद मिळतो.

हा टेड नक्की ऐका!
http://www.ted.com/talks/shawn_achor_the_happy_secret_to_better_work.html
http://www.ted.com/talks/shawn_achor_the_happy_secret_to_better_work.html

गुलमोहर: 

आमच्या इथे पण होत्या डिट्टो फॉर्म्युला काकू....आणि त्यांची दोन्ही मुले पण फॉर्म्युला मुले...
धाकटा मुलगा माझ्यापेक्षा ३ वर्षांनी मोठा...दहावीत त्याला ८९ टक्के मिळाल्यावर अभिनंदन करायला गेलो तर घरी सुतकी कळा..काकूंचा चेहरा रडून सुजलेला...कारण काय तर थोडक्या मार्कांनी बोर्ड हुकले होते...
याच मुलाने नंतर नोकरी लागल्यावर आयुष्यात बर्याच गोष्टी करायच्याच राहील्या याची खंत बोलून दाखवली होती..
शाळेत दंगामस्ती, रात्र-रात्र गप्पा, सायकवर मित्रांबरोबर हुंदडणे या वाया गेलेल्या कार्ट्यांच्या गोष्टी तर सोडा अभ्यास सोडून दुसर्या कुठल्याही कप्प्यात तो एकदाही डोकावला नव्हता...
"आता पैसा खूप मिळतोय रे..पण ते दिवस परत नाही मिळत आहेत कितीही पैसा ओतला तरी.."
हे त्याचे वाक्य

सर्व formuala based यशस्वी माणसे एका टप्प्यावर दु:खी होतात आणि सर्व formula-less माणसे खुप आनंदी असतात,ह्या formuala ला वापरुन सोडवलेले गणित आहे हा लेख म्हणजे. >>>> बापरे Uhoh

लेख पटला नाही. यशस्वी व्हायचेच असे ठरवले की त्याचा स्वतःपुरता काही ना काही फॉम्युला ठरवून घ्यावा लागतो. आणि प्रयत्न करावे लागतात. यशस्वी म्हणजे काय, आणि त्यासाठी काय करायचे हे आपापले ठरवून घ्यावे. अंबानींच्या धोरणाविषयी वाचले तर त्यातले फॉर्म्युलेही दिसतील. (आणि कदाचित आवडणार नाहीत.)

पैसा मिळाल्यावर मनुष्य यशस्वी असे नसते.
पैसा मिळाल्यावर मनुष्य सुखी असेही नसते.
पैसा नसला तर अयशस्वी/ दु:खी वाटण्याची शक्यता वाढते, इतकेच.

मला आवडला लेख. अशा फॉर्म्युला काकू आणि काकाही आजूबाजूला दिसत असल्याने आणि त्यांच्या फॉर्म्युल्याने, सदैव बाकी मुलांशी तुलना करून झालेले बाकी मुलांचं नुकसानही पाहिलं आहे. थोडीफार झळ मला स्वतःलाही बसली आहे त्यामुळे व्यवस्थित रीलेट करू शकले.

नी, त्या कुटुंबाचे पुस्तक इतकं डोक्यात जातं. गंमत म्हणजे दोन्ही मुलांच्या इंग्रजी आणि मराठीचा अभ्यास आईवडिलांनीच केला होता! भाषेचे निबंध लिहून काढले होते, प्रश्न-उत्तरं लिहून काढली होती आणि मुलांनी गणित, शास्त्रावर भर देऊन भाषेचा त्या प्रश्नोत्तरांचा अभ्यास करावा असं मुलांना सांगितलं होतं आणि हे सगळं त्या पुस्तकात आहे.

सदैव बाकी मुलांशी तुलना करून झालेले बाकी मुलांचं नुकसानही पाहिलं आहे. थोडीफार झळ मला स्वतःलाही बसली आहे त्यामुळे व्यवस्थित रीलेट करू शकले. <<<
अगदी अगदी. मी पण याच बोटीत.

आणि हो त्या पुस्तकाबद्दल अगदी अगदी. मुलांना बंद डोक्याचे पाठांतरकरी बैल कसे बनवले अशी टॅगलाइन घेता आली असती त्यांना इतकं टुकार फॉर्म्युला पुस्तक होतं ते.

मला बहुतेक सातार्‍यासारख्या लहान शहरात असल्याचा फायदा झाला. पाठांतर, १०वी, १२वी वगैरेचा बाऊ करणारे फारसे कोणी नव्हते. त्यामुळे ह्या लेखाशी रिलेट करता आले नाहीये.

I am not positing that taking a calculated approach towards life is wrong. We all need that. Neither am I saying that people who follow no rules and do not create structure in their life always become successful. We all already know that having a plan is safer than not having one.

But what I want to highlight, which I observed in myself as well as others as I was growing up (and which I observe now even amongst people from other cultures) is that
1. We hate uncertainty
2. We like control
3. We *love* having more control over situations than people around us

Peer envy is an unavoidable part of human life. And it is also the cause of a lot of unconscious bias and prejudice. It is reflected around us, both in personal and professional environment. Peer envy is also the cause of a lot of unhappiness.
When you are a positive or a negative outlier, i.e., you fall way below or way above the average, you enter a sort of less dense zone, which is subject to less peer envy. That does not mean what you have done is right. Nor does it mean that the formula is wrong. It just means that either you have given up on comparisons long ago (because you were never on the line anyway) or you have realized that there are many things in life that are completely random.

And as human beings, both in the East and the West, we definitely do live under the general assumption that success=happiness. And even if we fight it from the inside, the fact that we are judged (by a giant group of unrelated people) on the basis of our success makes us take this correlation as the ultimate truth.

But what would happen if we are taught to be happy first and then successful?
If we are taught to be curious before smart, to explore before plan, to collaborate before compete. I think it would move the entire average up in terms of happiness.

सई फोर्मुला लिहायचा फोर्मुला गडबडला पण भा.पो.

Peer envy पासून ह्या It just means that either you have given up on comparisons long ago (because you were never on the line anyway) or you have realized that there are many things in life that are completely random विचारापर्यंत्ची विचार साखळी पटली नाही.

तसे बघायला गेले तर हा सुधा एक फोर्मुलाच आहे Happy

मूळ लेखापेक्षा इंग्लीशमधील प्रतिसाद(प्रकटन) अधिक वाचनीय/मननीय वाटले. कदाचित फॉर्मुला शब्दाचा अतिरेक हे एक कारण असू शकेल.

मून +१.
जजमेंटल होऊ नये. आडाखे प्रत्येक व्यक्ती बांधते, आयुष्याचे, वर्तनाचे, इ.इ. If we are taught to be happy म्हणजे काय? हे सुद्धा गृहितकच आहे ना असे शिकवले की असे होणार. आयुष्याची उत्तरं समीकरणात सापडत नाहीत. कुठल्याच. Check your premises असे अँन रँड म्हणते. बरे जाले देवा निघाले दिवाळे! असे तुकोबा म्हणतात.
त्यांच्यालेखी ते यशस्वी असतील. त्यांची नावं आता कुठे झळकत नाहीत म्हणून ते यशस्वी नाहीत असे कुठे आहे. त्यांना आयुष्याचा तेवढाच अर्थ समजतो. Its OK.

नी, पुस्तकाबद्दल +१०.
"पुस्तक तू हे असं काही करायचं मनातही आणलं नाहियेस ना? चुकूनमाकून वेळ काढून केलंस तर मी करतेय तेवढाही अभ्यास करणार नाही" असं आईला सांगून ठेवलं होतं. नशिबाने जातिवंत शिक्षकी पेशातले आई-बाबा असल्यामुळे निभावलं माझं. Proud

मला आठवतच नाहिये आई-बाबांनी शंका सोडवण्यापलिकडे आमचा कुणाचाही अभ्यास घेतलेला! धडपडा, विचार करा, चुका होतील त्यातून शिका, नुसतं पुस्तकी ज्ञान मिळवू नका, चांगलं माणूस व्हा, नुसत्या स्पर्धेत धावू नका, स्वतःला ओळखा...हे नुसते उपदेश न करता स्वतःच्या वागण्यातूनही त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यामुळे विनाकारण होणारी तुलना -इतरांशी सोडाच, आम्हा बहिणींची एकमेकींशीसुद्धा- झालेली नाही!
"चला आता थोडे संस्कार करूया" असं न म्हणता त्यांनी बरंच काही दिलं.

लेख मात्र नेहमीपेक्षा जर्रा कमी वाटला.

लेख छानच आहे पण मलाही जरा पटला नाही. कारण आयुष्यात "हॅपीनेस" असं काही "कॉन्स्टंट" नसतं, it's an illusion . फॉर्म्युला लाइफमध्येही तो असतो अन विना फॉर्म्युला आयुष्यातही असतोच. कशात आनंद "मानायचा" यावर सगळं अवलंबून आहे.

खालीलपैकी काहीच खरं तर खरं नाही. सगळेच असमशन्स:
१. खुप पैसा म्हणजे खुप आनंद
२. खुप पैसा म्हणजे खुप दु:ख
३. कमी पैसा म्हणजे खुप आनंद
४. कमी पैसा म्हणजे खुप दु:ख

पण त्यातल्या त्यात ४ नं चं असमशन आपण "रिस्क नको" म्हणून खरं मानून चालतो (कशाला विषाची परिक्षा?) म्हणून मग बाकी काही असो वा नसो, पैसा तरी असावाच असा विचार सुरु होतो. पण जेव्हा २ नं कॅटेगरीतले लोक ३ नं कॅटेगरीकडे बघतात तेव्हा त्यांना अचानक "फेल्युअर/अयशस्वी" वाटत असावं. आणि ३ नं मधल्यांना २ नं कडे बघून उगाच "यशस्वी" वाटत असावं Happy
असो. मलाच लिहिता लिहिता बोअर झालं.

बरं कुणी ते ओपल मेहता वालं पुस्तक वाचलंय का? फारच विनोदी. How Opal Will Get Into Harvard and How Opal Will Get A Life वाचून फार मज्जा आली होती.

रैनाला अनुमोदन. मला जे म्हणायचे होते पण मांडता आले नव्हते ते तीने अगदी योग्य तऱ्हेने मांडले आहे.

नीधप, ते पुस्तक वाचलं नाहीये पण कोण असावेत ते दोघे हे लक्षात आलंय बहुतेक माझ्या Happy कसली हवा होती तेव्हा त्या दोघांची, माझ्यासारख्या १० वी/१२वी ची दिल्ली दूर असणा-यांपर्यंत पण पोचली होती,अर्थात झळ बसली नाही कधीच Happy फॉर्म्युलाचा कळस असणार आहे ते पुस्तक असं वाटतंय Happy

Happy भापो

ह्यावरुन मला "गोष्ट एका खर्‍या इडियटची" हे संयुक्ता ह्या लेखीकेने लिहिलेलं आणि उषप्रभा पागेंनी अनुवादित केलेलं राजहंस प्रकाशनचं पुस्तक आठवलं. खुपच सुरेख आहे हे पुस्तक.

विनया, आनंद हातवळणेंच्या "यशवंत व्हा " का अशाच नावाच्या पुस्तकाबद्दलच बोलत असाल तर..
पुस्तक काहीतरीच आहे.तरी..
BJ,COEP अशा ठिकाणी जायचे असेल तर प्रचंड स्पर्धा असते ,अगदी आरक्षण असेल तरी.मुले जर का पुरेशी motivated असली तरच तिथे पोहचु शकतात्.बर्‍याच वेळा मुलांचेच स्वप्न असते तिथे जायच, आइवडील फक्त motivate करतात,कधी अभ्यासात active participation असते.त्यात गैर ते काय?
मुलांवर त्यांची कुवत नसेल तर जबरदस्ती करु नये ह्यात वादच नाही, पण motivate करण्यात काहीच हरकत नसावी.
ज्यांना BMCC मधुन BCOM करायचे असते त्यांना कदाचीत इतक्या motivationची गरज नसते. आजकाल engg. साठी पण सरकारी कोलेजशिवय बरेच पर्याय आहेत पण अ‍ॅलोपथीचे तसे नाही ,खासगी शिक्षण प्रचंड महाग असल्याने फक्त दोनएकहजार सीटससाठी लाखो मुले प्रयत्न करत असतात.प्रचंड तयारीने स्पर्धेत उतरावे लागते.आणि नियोजन हा त्या तयारीचाच एक भाग असतो.
बाकी विनयाने बीजे तुन MBBS केले .पुढे PG नंतर अस्थिरोग तज्ञाशी विवाह होवुन चांगली practice करत आहे असे त्यांच्या एका स्नेह्यांकडुन ऐकले आहे.रुग्नांना औषधोपचार देउन बरे करणे कदाचित खुप creative काम नसेलही, पण ती समाजासाठी एक अत्यावश्यक सेवा आहे.
गिरिश कुलकर्णी/नीता लुल्ला/विक्रम गायकवाड सारखे national award मिळवण्याइतकी देदिप्यमान कामगिरी मात्र नाही तीची.

लेख वाचला. आवडला. प्रतिसाद ही वाचले.

लेख वाचताना आपण आपल्या घरातिल गोष्ट तर वाचत नाहीना असेच वाटत होते. माझ्या नवर्‍य च्या घरातही असेच फॉर्मुला वातावरण होते. कारण मध्यम वर्गीयांना करता येण्या सारखी एकच गोष्ट म्हणजे शिक्षण, हे पक्के डोक्यात होते. मग हुशार मुलगा एन्जीनीअर किंवा डॉक्टर च होणार ह्यात शंका नाही. जेंव्हा माझा नवरा कोमर्स चा फॉर्म घेवुन आला तेंव्हा घरात धरणी कंप झाला. तीन महीने घरात सुतकी वातावरण होते. नंतर ही अनेक टोमणे, कुजके शेरे एकुलत्या एक मुलाला ऐकवले जायचे. तो जेंव्हा त्या क्षेत्रात ही चमक दाखवायला लागला आणि बी कोम व्हायच्या आत आय.सी.डब्लु.ए. झाला तेंव्हा मग मत परिवर्तन झाले ( थोड़े थोड़े) ह्याही क्षेत्रातही मानसे पुढे येवू शकतात, डॉक्टर होणे वा न होणे म्हणजे आयुष्य न्हव्हे. तेच फ़क्त आयुष्य नाही.

आर्थात अजुनही ते पूर्ण गेलेल नाही. सचीन तेंडुलकर आज १० सी.ए. कामाला ठेवू शकतो असा विषय चालला होता. इकडे प्रतिक्रया अशी की ' उपयोग काय स्वत: बारावी!!! ज़रा शिकला असता तर!!!!!" म्हणजे पीळ अजुनही आहे. माझ्या मुलीच्या बाबतीत दूर ठेवले आहे. नाहीतर अत्ता पर्यन्त ती संन्यास घेवुन हिमालयात गेली असती, एवढा उपदेश झाला असता.

बाकी लेख आवडला. फ़क्त प्रत्येकाचा आनंद प्रत्येकाने शोधायचा. त्या करिता प्रत्येक जन स्वत: शीच कायम झगडत असतो. आनंदाच ओझ होता कामा नये.

Pages