पिकलेल्या केळ्याच्या गोड पुर्‍या

Submitted by निंबुडा on 15 March, 2012 - 05:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरात एक अधिक झालेलं (जास्त पिकलेलं) केळं होतं. केळं घालून शिरा नुकताच करून झाला होता. त्यमुळे परत शिराच नको वाटला करायला. बरं ते केळं टाकूनही देववेना. त्यामुळे ह्या केळ्याचं काय करावं या प्रश्नाला उत्तर म्हणून ही रेसिपी स्वतःच्या मनाने ट्राय करून पाहिली.

१ केळं
गव्हाची कणीक (अंदाजाने)
मीठ
किसलेला गूळ
तूपाचे मोहन
तळण्याकरीता तेल

क्रमवार पाककृती: 

१) केळं चांगलं कुस्करून त्यात थोडी कणीक घातली.
२) अंदाजाने गूळ किसून घातला (माझ्या मते कुस्करलेले केळे जितके असेल त्याच प्रमाणात गूळ घ्यावा.) + मीठ + तूपाचे मोहन
३) पुर्‍यांकरीता भिजवतो तशी जरा घट्टसर कणीक भिजवली. कणीक भिजवताना लागेल तसतसे पीठ घालत गेले.
४) जाडी पोळी लाटून वाटीने पुरीचे आकार कापून पुर्‍या कढईत तळून काढल्या.

वाढणी/प्रमाण: 
१ केळ्याच्या साधारण १० ते १२ पुर्‍या झाल्या.
अधिक टिपा: 

लाल भोपळ्याच्या गोड पुर्‍याही अशाच करायच्या. भोपळा चांगला शेंदरी असला पाहिजे. पिवळा नको. आणि भोपळा उकडून घ्यायचा व पाणी चांगलं निचरून मगच पीठ घालून कणीक मळायला घ्यायची. कारण थोडे जरी पाणी राहिले तरी जितके पीठ घालू तितके त्यात बसतच जाते. तितकाच मग गूळही जास्त घालावा लागतो.

माहितीचा स्रोत: 
स्वतःचे डोके. :-) लाल भोपळ्याच्या गोड पुर्‍या करतो तीच कृती केळ्याच्या बाबतीय ट्राय करण्याचा प्रयत्न केला.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भोपळ्याच्या पुरया खाल्ल्यात मी..मस्त लागतात.
आता केळीच्या पुरया ट्राय करेन पण समप्रमाणात गुळ घातले तर पुरया जास्त गोड लागतील ना??

समप्रमाणात गुळ घातले तर पुरया जास्त गोड लागतील ना??
>>>
अंदाजाने घाल गं. मी नक्की किती घातला आठवत नाही. पण माझ्या पुर्‍या अगोड झाल्या होत्या. त्यामुळे पुढच्या वेळी एकास एक प्रमाण घेऊन करेन म्हणतेय.