'लिंगनिरपेक्ष ओळख - मैत्री' चर्चा

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 March, 2012 - 14:00

महिला दिन २०१२ च्या निमित्ताने घडवलेला निरभ्र : लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री परिसंवाद विशेषांक तुम्ही वाचला असेल किंवा वाचत असालच.

अंकामधे जाहिर केल्याप्रमाणे या विषयाच्या सर्व पैलूंवर सर्व बाजूने चर्चा होणे अतिशय गरजेचे आहे. त्याशिवाय विशेषांक पूर्ण होणार नाही.

या धाग्यावर लिंगनिरपेक्ष मैत्री - ओळख (आयडेन्टिटी) या विषयाची चर्चा करूया. चर्चा करताना काही थोडीशी पथ्ये पाळूया.
१. विशेषांकातल्या लेखांतले, लेखांबाहेरचे सर्वच मुद्दे घेऊन अवश्य चर्चा करू. विशेषांकामधे काय बरोबर नाही, संपादक मंडळाचे कुठे चुकते आहे याचा उहापोह इथे नको. तो त्या त्या लेखाच्या धाग्यावर करू.

२. आपली भाषा, आपण वापरत असलेली उदाहरणे या सगळ्यांचा सभ्यतेच्या संदर्भातून विचार करणे अतिशय गरजेचे. धागा मॉडरेटेड असणार आहे याची कृपया नोंद घ्यावी.

- संपादक मंडळ

विषय: 

चर्चेला सुरूवात करताना मला बेफिकिर यांनी प्रतिक्रियांमधे मांडलेला एक मुद्दा विचारात घ्यावासा वाटतो. त्यांनी २ ठिकाणी लिंगनिरपेक्षता व स्त्री पुरुष समानता यामधला फरक विसरला गेलाय किंवा तत्सम अर्थाचे विधान केले आहे. हे विधान मला विचारात पाडते.

लिंगनिरपेक्षता व स्त्री पुरूष समानता हे दोन शब्द समानार्थी नाहीत हे झालेच पण त्या दोन्हीचा एकमेकांशी संबंध नाहीच असेही नाही. लिंगनिरपेक्षता या संकल्पनेची व्याप्ती जास्त सर्वसमावेशक आहे हे नक्कीच पण समानतेच्या विचारातून सुरू झालेला प्रवास लिंगनिरपेक्षतेकडे पोचू शकतो हे ही तितकेच खरे आहे नाही का? तसेच अनेक पातळ्यांवर मानसिक-सामाजिक लिंगनिरपेक्ष विचार हा समानतेसाठी महत्वाचा असतो असे मला वाटते.

>>> स्त्रीपुरुष समानतेच्या विचारातून सुरू झालेला प्रवास लिंगनिरपेक्षतेकडे पोचू शकतो हे ही तितकेच खरे आहे नाही का? <<<<

खरय, पण असे पोचणे हे बर्‍याचश्या अंशी "अनैसर्गिक" असेल असे मला वाटते.
लिन्गसापेक्षता हा निसर्गाचा नियम आहे, मात्र लिन्गसापेक्षता कशा पद्धतीने व्यक्त व्हावी, हे मानवाबाबतीत त्याच्या "बुद्धी(?) अक्कलेच्या क्षमतेनुसार" ठरते, अन अशा "व्यक्त" होण्यातल्या बहुधा पुरुषी रानटी/रासवट दुय्यम वागणुक देण्याच्या सार्वकालिक सर्वदूर पद्धतीमुळेच स्त्रीपुरुष समानतेची आवश्यकता भासू लागली.
पण तरीही, लिन्गनिरपेक्षता हवीच का असे विचारता मी सपशेल नाही असे उत्तर देईन.
त्याचवेळेस, लिन्गनिरपेक्ष सहजीवन असू शकते का असे विचाराल, तर प्रसन्गोपात तसे नक्कीच असते असे सान्गेन. Happy
सध्या इतकेच.

व्हेरी गूड!
ही चर्चा सुरू केल्याबद्दल अभिनंदन आणि आभार!

कारण या अंकाची जाहिरात वाचल्यापासून मला फारच बेसिक प्रश्न पडला होता, त्याचे उत्तर मिळेल अशी आशा आहे.

तो प्रश्न हा होता, की लिंगनिरपेक्षता हा काही जाहीररित्या चर्चा करायचा विषय आहे का? निसर्गाने जे भेद निर्माण केले आहेत त्यावर चर्चा/संवाद कसला करायचाय? इथे कितीही उदात्त विचार मांडले गेले, लिंगनिरपेक्षता हवी, असते, नको, नसते इ इ मतं मांडली गेली, तरी प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, अनुभव वेगळे. मर्यादा वेगळ्या, स्वातंत्र्य वेगळे. (this is pure common sense!) असं असताना, प्रत्येकाची लिंगनिरपेक्षतेकडे पाहायची व्याख्या, धारणा वेगळीच असणार, असायलाच हवी.

वाचताना हे टोकाचे मत वाटत असेल... किंवा 'हेच! हेच! अपेक्षित होतं लेखकांकडून' असंही उत्तर असेल... पण जे काही अपेक्षित होतं ते जाहिरातींमधून स्पष्ट झालं नाही! आणि 'हे तर अगदी obvious आहे, यात मुद्दाम लिहिण्यासारखं असं काय आहे' ही धारणा झाल्यामुळे मी तरी यात भाग घेतला नाही. भाग न घेतल्याचं दु:ख नाहीये, पण लिंगनिरपेक्षता आहेच किंवा नकोच ही अगदी स्वाभाविक मते असणार आहेत! जर सर्व काही 'वैयक्तिक' (पक्षी: relative) आहे हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट असताना, काही निवडक (किंवा आलेले सगळेच) लेख प्रसिद्ध करून काय साधलं गेलं?

माझ्याकडून ही चर्चा वैचारिकच होईल हे नक्की!

तसेच अनेक पातळ्यांवर मानसिक-सामाजिक लिंगनिरपेक्ष विचार हा समानतेसाठी महत्वाचा असतो असे मला वाटते.>> नक्कीच दोन्ही एकमेकांना पूरक गोष्टी आहेत असे माझे मत आहे. इतक्या वर्षांच्या सवयींनुसार आपल्या मनात्/समाजात जो एक साचा दिसतो पडून गेलेला त्याच्या चौकटी रुंदावायला किंबहूना मोडायला (किंवा अशा ठाम पडलेल्या चौकटी असण्याची मानसिकता बदलायला) लिंगनिरपेक्षता नक्कीच महत्वाची भुमिका बजावतं.

बाईला देवी म्हटलं - की झाला त्यागाचा/तिच्या देवीपणाचा उदोउदो त्या प्रमाणे जिला वागायचय तिचं ठिक पण बाकीच्या साच्या बाहेरच्या बायांचं काय? की आला संघर्ष

पुरुषाकडूनही साचे बद्द अपेक्षा आपल्या - मुलाने पालकांची जबाबदारी उचलावी, कुटूंबा करता कमावलच पाहिजे (बायक कमावत्या नसल्या तरी समाजाचा आक्षेप नसतो तसच पुरुष नोकरी/व्यवसाय व्यतिरिक्त घरगुती अशा जबाबदार्‍या उचलणारा नसला तरी "साचा" त्याला दोष देत नाही)

जबाबदार्‍या, अपेक्षांचे साचे बदलायचे तर कुठे तरी लिंगनिरपेक्षतेचा विचार करावाच लागेल अर्थात हे माझं मत (सध्या पुरते येव्हढेच, वेळ मिळताच अजून टंकेन Wink )

माझी मते:

लिंगनिरपेक्षता आणि स्त्री पुरुष समानता हे दोन 'थोडेसेही संबंधीत' नसलेले असे मुद्दे आहेत.

स्त्री पुरुष समानतेला सामाजिक व कौटुंबिक कोन आहे तर लिंगनिरपेक्षतेला मानसिक व व्यक्तीच्या खासगी विचारप्रवाहाशी निगडीत असा.

उदाहरण:

कोणत्याही क्षेत्रात स्त्री कार्यरत असणे ही एक प्रकारे स्त्री पुरुष समानता ठरते. जसे, विमान चालवणे, श्रमाची कामे करणे इत्यादी. (बसमध्ये अथवा लोकल ट्रेनमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा असणे ही स्त्री पुरुष समानता नसून स्त्रीला सुरक्षेचे वातावरण व हक्काची जागा देण्याचे शासनाचे इनिशिएटिव्ह ठरेल)

मात्र लिंगनिरपेक्षता ही पूर्णपणे व्यक्तीच्या मनात असू शकते.

येथे पुन्हा नोंदवायला आनंद होत आहे की लिंगनिरपेक्षता असू शकत का वगैरे मुद्दे येतील याचे भान ठेवूनही संयोजकांनी हा अत्यंत नावीन्यपूर्ण व आव्हानात्मक मुद्दा चर्चेस आणला. मनःपुर्वक अभिनंदन.

यावर लिहावे तेवढे कमी. मी तर प्रेमातच पडलो या मुद्याच्या.

लिंगनिरपेक्षता नक्कीच अस्तित्वात असू शकते व असेलही. असे लोक आपल्याला माहीत नसतील इतकेच.

लिंगनिरपेक्षता म्हणजे स्वतःचा वा दुसर्‍याचा नैसर्गीक लैंगीक परिचय लक्षात न घेता स्वतःशी अथवा दुसर्‍याशी केलेले वर्तन! (स्वतःशी वागणे म्हणज काय हा मुद्दा निघणार नाही अशी आशा).

एखाद्या पुरुषाने लिंगनिरपेक्षता अंगीकारली किंवा अंगी बाणली आहे याचा अर्थ तो एखाद्या स्त्रीशी तिचा नैसर्गीक लैंगीक परिचय (म्हणजे ती एक स्त्री आहे) हा अडथळा पार करून तिच्याशी नाते ठेवतो. (अर्थातच, यात शरीर संबंध जवळपास नष्ट होतील आणि निसर्गावर मिळवलेला तो नकोसा विजय ठरू शकेल हे वेगळे, पण ते लिंगनिरपेक्षतेचे तोटे या सदरात चर्चिता यावे).

आता असे एखादा माणूस करू शकतो का या प्रश्नाचे उत्तर 'नक्कीच' असेच असायला हवे कारण अशा अनेक गोष्टी मानवाला माहीतच नव्हत्या पण त्या अस्तित्वात आहेत हे संशोधनांती समजले.

आता एखादी व्यक्ती लिंगनिरपेक्षपणे वागत असेल तर ती चोवीस तास वागू शकेल किंवा नाही हा मुद्दा वेगळा. पण एका सेकंदासाठी जरी वागली तरी श्रेष्ठ समजली जायला हवी.

अगदी तान्ह्या मुलाचे आपल्या आईशी असलेले नाते काही क्षणी तरी नक्कीच लिंगनिरपेक्ष असते असे मला वाटते.

लिंगनिरपेक्षतेच्या संकल्पनेला कडाडून विरोध करणार्‍यांना मला खोडून काढावेसे वाटत आहे याचे कारण तो मुद्दा हवेसारखा आह, दिसत नसला तरी असू शकतो.

धन्यवाद

-'बेफिकीर'!

नीधप | 9 March, 2012 - 09:35
चर्चेला सुरूवात करताना मला बेफिकिर यांनी प्रतिक्रियांमधे मांडलेला एक मुद्दा विचारात घ्यावासा वाटतो. त्यांनी २ ठिकाणी लिंगनिरपेक्षता व स्त्री पुरुष समानता यामधला फरक विसरला गेलाय किंवा तत्सम अर्थाचे विधान केले आहे. हे विधान मला विचारात पाडते.

लिंगनिरपेक्षता व स्त्री पुरूष समानता हे दोन शब्द समानार्थी नाहीत हे झालेच पण त्या दोन्हीचा एकमेकांशी संबंध नाहीच असेही नाही. लिंगनिरपेक्षता या संकल्पनेची व्याप्ती जास्त सर्वसमावेशक आहे हे नक्कीच पण समानतेच्या विचारातून सुरू झालेला प्रवास लिंगनिरपेक्षतेकडे पोचू शकतो हे ही तितकेच खरे आहे नाही का? तसेच अनेक पातळ्यांवर मानसिक-सामाजिक लिंगनिरपेक्ष विचार हा समानतेसाठी महत्वाचा असतो असे मला वाटते.>>>>>

या उतार्‍यावरून असे म्हणावेसे वाटत आहे की संपादक मंडळाला या अंकातील अनेक उतारे स्त्री पुरुष समानतेवर लिहिले गेले आहेत हे मान्य झालेले आहे. ही टीका मुळीच नसून केवळ एक मत आहे ज्याबाबत मी तरी (आत्तापर्यंत तरी) ठाम आहे.

असे असल्यास ही संकल्पना मुळात मंडळाने कशी पाहिली हे जाणून घ्यावेसे वाटेल.

-'बेफिकीर'!

मुळात लिंगनिरपेक्षता ही विचारांमधे आली पाहिजे ही गोष्ट लक्षात घेता ही एक अशक्य कोटीतील बाब आहे असेच वाटते.

कुठलीही गोष्ट यशस्वी होण्याकरीता त्यामागचा विचार अगदी मुळापर्यंत रुजणे आवश्यक असते. मन परीवर्तन होऊन एखादा विचार रुजणे जवळजवळ अशक्यच!

केवळ लिंगनिरपेक्षता चांगली की वाईट ह्या विषयावर चर्चा करून वेळ दवडण्यापेक्षा

१. ती कशी आणता येईल?
२. सद्या या विषयावर काम करणार्‍या लोकांची/संस्थांची काही माहीती आहे काय?
३. कुणाच्या पाहण्यात एखादे उदाहरण आहे काय?
४. सद्य काळात अपेक्षित लिंगनिरपेक्षता येणे/न येणे कितपत शक्य आहे/का शक्य नाही

ह्या गोष्टींचा उहापोह झाल्यास बरे वाटेल.

मी बेफिंशी सहमत आहे. हे दोन वेगळे मुद्दे आहेत.
स्त्रीला माणूस म्हणून वागवण्यात यावे, याबद्दल मी ठाम आहे. एक माणूस म्हणून ओळख मिळाल्यावर, दुसर्‍या माणसाची ओळख, मैत्री होणे अगदी सहज आहे.
आणि हा माणूस म्हणून दर्जा, केवळ मित्राने नव्हे, तर समाजाने देणे आवश्यक
आहे.

हि बंधने नेमकी कुठल्या काळात आली, ते बघावे लागेल. बायकांनी गाणे म्हणायचे नाही, पुढच्या दाराने घरात यायचे नाही, चपला घालायच्या नाहीत, शिकायचे नाही,
नाटकात काम करायचे नाही, नारळ फोडायचा नाही अशी सत्राशेसाठ बंधने, अगदी
काल परवापर्यंत होती, अगदी आपल्या राज्यातच..

कुठलेही कार्यक्षेत्र केवळ स्त्रीचे वा पुरुषाचे असावे, मानले जावे हेच मला मान्य नाही.
माझेच उदाहरण घ्या, माझ्या अत्यंत आवडत्या पाककलेत मी करियर करु शकलो
नाही, कारण मला ज्यावेळी करियर निवडीचा निर्णय घ्यायचा होता, त्या काळात
असा विचार करणेही शक्य नव्हते.

जिथे समानता असू नये अशीही क्षेत्र आहेत. अपत्यजन्म (संगोपन नाही) हि जबाबदारी
स्त्रीवर निसर्गानेच टाकलीय. त्याला पर्याय नाही. स्त्री पुरुषांना एकमेकांचे आकर्षण
वाटलेच पाहिजे. त्याशिवाय जग कसे हो चालणार ?
पण पुरुषाने स्त्रीचे सोंग घ्यावे (तसा मानसिक प्रॉब्लेम नसल्यास) मला वैयक्तीकरित्या
आवडत नाही. म्हणून मला बालगंधर्व, चाची ४२०, मिसेस डाउटफायर असले चित्रपट
आवडत नाहीत.

एक माणूस म्हणून ओळख मिळाल्यावर, दुसर्‍या माणसाची ओळख, मैत्री होणे अगदी सहज आहे.>> दिनेशदा, माणुस ही ओळख असणे (स्त्री किंवा पुरुष किंवा अजून कोणाची) हेच लिंगनिरपेक्षत्व असु शकेल का?

मुळात ही निरपेक्षता सापेक्ष आहे पण सापेक्षतेच्या फुटपट्ट्या ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या असू शकतात. ह्या सापेक्षतेमुळेच मी नेमकं लेखात काय लिहावं हे न कळल्याने लेख पाठवला नव्हता.

आशा आहे चर्चा उत्तम चालू राहून माझेही काही गोंधळ दुर होतील

आनंदयात्री,
कुठल्याही चर्चेचा हेतू काय असू शकतो?
अनेकविध विचारांची देवाणघेवाण आणि घुसळण.. त्यातून पुढे जाऊ शकणारा एखाद्या विषयाचा शोध.
संपादकीय मधे उपक्रमाचा उद्देश विषयाचा शोध घेणे, त्याची व्याप्ती तपासणे हा आहे हे स्पष्ट केले आहे.
ते वाचणार का?

वैचारिक देवाणघेवाण यापलिकडे काय साधले असं म्हणायचं असेल तर ते प्रत्येक व्यक्तिगणिक बदलते आहे.
कुणाचे आयुष्या आमूलाग्र बदलले इतपत नाट्यमय घटना या उपक्रमातून साधणे अपेक्षित कधीच नव्हते.

या उतार्‍यावरून असे म्हणावेसे वाटत आहे की संपादक मंडळाला या अंकातील अनेक उतारे स्त्री पुरुष समानतेवर लिहिले गेले आहेत हे मान्य झालेले आहे. <<<
अहो मान्य अमान्यचा इथे कुठे संबंध आला?
संपादक मंडळ काय नि कसा विचार करते आणि ते चूक की बरोबर हे मुद्दे सध्या बाजूला ठेवून द्या वेगळ्या बाफसाठी.

तुमचे ठाम मत आहे ते कळले पण ठाम मत असेल तर तुमचा विचार झालेला असेलच याबद्दल. तो विचार इथे चर्चेत मांडलात तर सगळ्यांनाच उपयोग होईल.
तर तो विचार मांडावा ही विनंती.

अहो मान्य अमान्यचा इथे कुठे संबंध आला?
संपादक मंडळ काय नि कसा विचार करते आणि ते चूक की बरोबर हे मुद्दे सध्या बाजूला ठेवून द्या वेगळ्या बाफसाठी.

तुमचे ठाम मत आहे ते कळले पण ठाम मत असेल तर तुमचा विचार झालेला असेलच याबद्दल. तो विचार इथे चर्चेत मांडलात तर सगळ्यांनाच उपयोग होईल.
तर तो विचार मांडावा ही विनंती.>>>>>

मला आपल्या या प्रतिसादाचा 'सूर' भावला नाही, पण माझी आवड निवड महत्वाची नाहीच हे माहीत आहे.

क्रमाने सांगतो मला काय म्हणायचे आहे ते:

तुम्ही या उपक्रमात सहभागी असलेल्या टीमच्या प्रमुख आहात

तुमच्या एका प्रतिसादात तुम्ही असे म्हणाला आहात की लिंगनिरपेक्षता आणि स्त्री पुरुष समानता हे समानार्थी नसले तरीही परस्परसंबंधीत आहेत.

या विधानाचा अर्थ असा होतो की जर एखाद्या / काही लेखात स्त्री पुरुष समानता यावर लिहिले गेले तर संपादक म्हणून तुम्हाला ते लिंगनिरपेक्षता या विषयाशी व्यवस्थित निगडीत आहे हे वाटत आहे.

आणि माझा मुद्दा आहे की या दोन गोष्टी भिन्न आहेत.

म्हणून म्हणालो की मंडळाचा विषयाबदल, संकल्पनेबद्दल दृष्टिकोन काय आहे हे (संपादकीयातील मुद्दे न मांडता) या विशिष्ट मुद्याच्या संदर्भात पुन्हा नोंदवल्यास आवडेल.

तुमच्या यात्रींना दिलेल्या प्रतिसादापर्यंत चर्चेचा सूर शांत होता हे माझे स्पष्ट (व आपल्याला राग येईल असे) मत (जाणीव असूनही) मांडत आहे कारण चर्चेचा उद्देश जर देवाण घेवाण असेल तर ही खालील वाक्ये:

१. हे मुद्दे सध्या बाजूला ठेवून द्या वेगळ्या बाफसाठी.

२. तुमचे ठाम मत आहे ते कळले

हे (व मुद्यांचा सूर) अशा चर्चेसाठी मला तरी पोषक वाटले नाहीत.

क्षमस्व!

मी जो विचार केलेला आहे तोच मी माझ्या प्रथम प्रतिसादात मांडलेला आहे व त्यावर उत्तर देणे हे आता मंडळ करू शकेलच.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

तुम्हाला प्रत्येक पोस्टमधे काहीतरी वावगे का दिसते?

माझा मुद्दा आहे की या दोन गोष्टी भिन्न आहेत. <<
तुम्ही परत परत एवढेच सांगता आहात. पण या भिन्न कशा आहेत हे तुम्ही विशद करत नाही आहात. तेवढेच मी विचारते आहे चर्चेसाठी.

संपादक मंडळाला काय वाटते हा या धाग्यावरच्या चर्चेचा विषय होऊ शकत नाही. मी वरती जे लिहिले ते माझे वैयक्तिक मत आहे. संपादक मंडळाच्या वतीने लिहिलेले नाही.

ठीक आहे, हे तुमचे वैयक्तीक मत आहे जे संपादक मंडळाचे मत असेल असे नाही हे आपणच नोंदवलेत ते उत्तम!

मला कशातही काहीच वावगे वाटले नाही, मी फक्त जे भावले नाही ते स्पष्टपणे मांडले. असो. ती चर्चा माझ्याकडून त्या प्रतिसादात संपली.
========================

या दोन गोष्टी भिन्न कशा आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी उदाहरण दिले होते.

तरी अधिक काही म्हणण्याचा प्रयत्न करून पाहतो.

लिंगनिरपेक्षता : (व तशी मैत्री, ओळख) :

नैसर्गीक लैंगीक परिचयापलीकडे असलेले नाते, जे एका पुरुषाचे पुरुषाशी, पुरुषाचे स्त्री व स्त्रीचे स्त्रीशी असू शकते.

यामध्ये, समोरचा माणूस कोण (पुरुष की स्त्री) यावर वागणे अवलंबून नसते, केलेल्या क्रिया, त्यांच्यामागची कारणमीमांसा हे काहीच अवलंबून नसते. सोसायटीतीन महिलांच्या भिसीत पुरुष आला तर चालत नाही, पण लिंगनिरपेक्षतेमध्ये ते चालेल. ही स्त्री पुरुष समानता झाली नाही तर स्वीकारण्याची प्रवृत्ती झाली, जी लिंगनिरपेक्ष आहे. डोहाळजेवणाला,मंगळागौरीच्या जागरणाला पुरुष (सहसा) नसतात. एखाद्या अड्डास्वरुपी बारमध्ये एखादी घरंदाज स्त्री (सहसा आणि बहुतेकदा) नसते. ती तिथे तशी येणे / येऊ शकणे ही समानता झाली, पण तिच्याकडे कोणीही विशेषकरून न बघणे, तिच्या येण्यात कोणालाही काहीही न वाटणे हे लिंगनिरपेक्षतेचे लक्षण झाल. याचा अर्थ असा नाही की ती तिथे येण्यातील जी समानता आह त्या समानतेमुळे ही लिंगनिरपेक्षता कधीतरी निर्माण होईल. निसर्ग ते कधीच होऊ देणार नाही. पण एखादा असा माणूस असू शकेल ज्याला त्यात काहीच वाटणार नाही, अगदी पहिल्यांदा झाले तरी.

समानता - स्त्री पुरुष समानता म्हणजे (सहसा) स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने संधी उपलब्ध करून देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे किंवा मुळातच तशी संधी उपलब्ध असणे अथवा संस्कृतीच तशी असणे. आता समानता असलेल्या ठिकाणी पुरुष स्त्रीशी वागताना 'दोघे समान' असे समजून वागेल, पण लिंगनिरपेक्ष नाही वागणार.

आशा आहे की मी जे म्हणालो ते मला स्पष्ट करून दाखवता आले.

धन्यवाद!

============================

<<<संपादक मंडळाला काय वाटते हा या धाग्यावरच्या चर्चेचा विषय होऊ शकत नाही>>>

असे आपण कसे काय म्हणू शकाल हे समजले नाही. संपादक मंडळ यात एक चर्चा करणारी संस्था म्हणून का सहभागी होऊ शकत नाही? त्यांचेही काही मुद्दे विस्कळीत असू शकतील ही शक्यताच का नाकारली जात आहे?

-'बेफिकीर'!

बेफिकीर, संपादक मंडळावर हवी तेवढी टिका करा. फक्त ती या धाग्यात नको एवढेच म्हणणे आहे. संपादक मंडळाला सर्व समजते असा पावित्रा मंडळाने कधीच घेतला नव्हता.
इथे चर्चेचा विषय/ फोकस लिंगनिरपेक्षता एवढाच राहू द्या.

टीका नाहीच करायची.

पण संपादक मंडळ दिलखुलासपणे चर्चेत सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करायची होती. असो, तो मुद्दा मी माझ्याकडून संपवतो.

संपादक मंडळ हे ७ सदस्यांचे आहे. आणि त्यातल्या प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात ना? एका मंडळात असण्यामुळे एखाद्या विषयावर ७ जणांचे एकमत होईल असे कसे होईल? होताही कामा नये. जेव्हा विषयासंदर्भात चर्चा आहे तिथे मतभिन्नत असणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे.
आम्ही संपादक मंडळ म्हणून काम करताना विशेषांकाचे संयोजनाच्या पातळीवरचे काम केले. वैयक्तिक मते तिथे येऊन कशी चालतील?
माझ्याशिवाय बाकीचे ६ जण वेगळ्या टाइमझोनमधे आहेत आणि त्यांच्याकडे सध्या रात्र/पहाट आहे. त्यांनी दिलखुलासपणे चर्चेत भाग घेण्यासाठी त्यांचा दिवस तर उजाडायला नको का?

कृपया गैरसमज नसावा.

'स्त्री पुरुष' समानता मुद्दा इथे वाचून अजुन कनफ्युजिंग वाटतय सगळं.
अंकातले लेख चांगले झालेत यात वाद नाही पण अत्ता पर्यंत लेख वाचले त्यात मला स्वतःला जे वाचावेसे वाटत होते ते 'मैत्री' बद्दल मुद्दे थोडे कमीच दिसले.
मला लिहायचं होतं पण विषयामुळे माझ लेख मला स्वतःलाच थोडा कनफ्युजिंग वाटत होता म्हणून लिहिले नाही, अता हा बीबी ओपन केलाय म्हणून जे लिहावेसे वाटत होते ते मुद्दे हे:

१) पूर्णपणे निरपेमैक्ष मैत्री शक्य आहे का ? माझं उत्तर 'नाही'.
मुळात 'निरपेक्ष' म्हणजे नक्की काय , जर निरपेक्ष म्हणायचय तर मग मुलाला 'मित्रं' आणि मुलीला मैत्रीण तरी का म्हणायचं मग Happy ?
'फ्रेन्ड' सारखा एखादा जेंडरलेस शब्द का नाही मग आपल्या बोलण्यात ?
मी निरपेक्ष मैत्री म्हणेन फक्त 'ऑनलाइन' मैत्रीला जिथे, प्रोफाइल मधे मेल्/फिमेल हे मेन्शन सुध्द्दा झालेले नसेल.
पण जर फक्त माझ्या पुरतं बोलायचं झालं तर मला स्वतःला इथल्या फेक आयडीज शी मैत्री करण्यात फारसा इंटरेस्ट आणि विश्वास दोन्ही वाटत नाही :).

२) 'मित्रं' किंवा 'मैत्रीण' 'काही फरक' पडत नाही हे खरच प्रॅक्टिकली कायमच शक्य असेलच असे आहे का ?
अ‍ॅडोलसन्ट स्टेज मधे 'मैत्रीणी-मैत्रीणी' नाइट आउट्स / स्लीप ओव्हर गेट टुगेदर करतात तेंव्हा पालकांना काही वाटत नाही पण तेच जर अजाणत्या वयात नाइट आउट ला 'बॉइज + गर्ल्स' पार्टी असेल तर मुलगा मुलगी दोघांचे पालक (कुठल्याही देशातले)एकदा विचार/ काळजी करतातच ..
अर्थात वयाच्या/ करिअर च्या मॅच्युरिटी नुसार हे ही बदलते, आम्ही इंटिरिअर डिझायनिंग ची सबमिशन्स मोठा मुला मुलींचा गृप एकत्रं जागून करायचो तेंव्हा ना स्टुडनंट्स कॉन्शस होत, ना आमचे पालक !
पण गंमत म्हणजे मॅच्युअर एज मधेही लोक कॉन्शस होतानाची उदाहरण ही पाहिलीयेत.
त्यातली २ उदाहरणं आवर्जून लिहीन , दोन्ही इथे घडलेली (अमेरिकत.)
अ) माझ्या व्यवसायामुळे मध्यंतरी एका हॉलिवुड अ‍ॅक्टर-प्रोड्युसर शी कामा निमित्तं ओळख झाली, तर तो अ‍ॅक्टर बॉलिवुड बद्दल नेहेमी विचारायचा, एक दिवस तो घरी आला आसताना 'बॅन्ड बाजा बारात' लागला होता आणि तो खूप इंटरेस्ट घेऊन, खूप प्रश्न विचारत अगदी मन लाऊन मुव्ही बघत होता.
मधेच एक सीन आला ज्यात अनुष्का रणवीर मिळून चन्दिगड च्या लग्नाचं काम करत असतात, काम करताना उशीर होतो आणि वर्‍हाडी बस पहाटे निघणर असते म्हणून अनुष्का घरी न जाता रात्री रणवीर च्या च बाजुला एकदम कॅज्युअली मैत्रीणीच्या बाजुला झोपु तशी झोपून जाते.
हे बघून त्या हॉलिवुड अ‍ॅक्टर ला सॉलिड वियर्ड वाटलं, त्याची इमिडिएट रिअ‍ॅक्शन " व्हॉट ?? हाउ कम दे आर शेअरिंग अ बेड', हाउ कॅन शी स्लीप नेक्स्ट टु अ गाय , दे आर जस्ट फ्रेन्ड्स नॉट इन रिलेशननशिप "
:).
थोडक्यात फरक पडु शकतो, अगदी कुठल्याही देशातल्या व्यक्तीला काही ठिकाणी मित्रा बरोबरची कम्फर्ट लेव्हल वेगळी वाटते आणि मैत्रीणी बरोबरची वेगळी !
उदाहरण ब ) आमच्या हेना कॉन्फरन्स ला आम्ही जग भरातून ७०-८० लोक जमतो, आमच्या कॉन्फरन्स ला हॉटेल्स वर रहाण्या ऐवजी शेजारी शेजारी असे ७-८ बंगले घेऊन रहातो आणि रुम्स शेअर करतो.
ज्यांनी रुम मेट प्रेफरन्स मेन्शन नाही केला त्यांना रँडमली कोणीही रुम मेट दिले जातात, पण दर वर्षी एक तरी इश्यु होतोच जिथे चुकुन मुलाला आणि मुलीला रुम शेअर करायला देतात आणि ते त्याला नकार देतात ( जे खरं तर अनोळखी नसतात मित्रं मैत्रीणी असतात) पण सेम जेंडर रुम मेट नाही समजल्यावर मग दोघांनाही रुम शेअर करणे कंफर्टेबल नाही वाटत.

३) बेस्ट फ्रेन्ड आणि प्रेमात पडणे मधली थिन लाइन जेंव्हा कॉन्शस करते
.. हे एकतर्फी असेल तर अजुन जास्तं कॉन्शस आणि त्या मैत्रीचा 'द एन्ड' होतो ती स्टेज !
मित्रं + मित्रीण जेंव्हा बेस्ट फ्रेंड्स बनतात, कधी कधी (कदाचित समाजाच्या दबावामुळे/समाजाने बघण्याच्या नजरेमुळे) कधी कधी जर मित्रं मैत्रीण स्वतःच कनफ्युज/कॉन्शस होत असतील लोकांनी त्यांना 'तुम्ही गर्ल फ्रेन्ड -बॉय फ्रेन्ड' का विचारल्यावर.. कुठे तरी शारीरिक आकर्षण वगैरे मुद्दे आले कि मैत्री संपलीच ! ( फिल्मी भाषेत सांगायचं तर जेंव्हा 'इस दोस्ती को क्या नाम दे हम ये बात कुछ और है' स्टेज येते तेंव्हा ती निखळ मैत्री रहात नाही.)

४) "chivalry you know "
तो "मित्रं "आहे म्हणून त्यानी कायम रेस्टॉरन्ट्स ची बिल्स द्ययाची, ड्राइव्ह त्याने करायचं, सौजन्य फक्त त्यानेच दाखवायचं, दरवाजा होल्ड करून तिच्या साथी थांबावं ही आपेक्षा फक्त मित्रा कडूनच होते, कायम त्यानेच तिला प्रोटेक्ट करायचं वगैरे आपेक्षा जर मुली करत असल्या तर ती पण निरपेक्ष मैत्री नाही , असं माझं मतः) .)
५) " आय कॅन्डी' फॅक्टर:
ज्या पोरांना फक्त शोभेला गृप मधे "एक तरी चिकणी मैत्रीण" असावी म्हणून एकहद्या मुलीशी मैत्री केली जाते किंवा मुलींना सुध्दा जेंव्हा एक तरी हंक गृप मधे हवाच म्हणून "त्या" हंक ला स्वभावाने आवडला नाही तरी " आय कॅन्डी' फॅक्टर मुळे गृप मधे स्थान दिल जातं किंवा गृप मधल्या छान दिसणार्‍या मैत्रीणीला मित्रां कडून/ हंक दिसणार्‍या पोराला मैत्रीणीं कडून झुकतं माप दिलं जातं ती सुध्दा निरपेक्ष मैत्री नाहीच माझ्या मते :).

मला हे मुद्दे मांडायचे होते पण अंकातल्या लेखकां इतकं मला नीट मांडता येत नाही म्हणून नाही दिला लेख, जर हा प्रतिसाद इथे अयोग्य/लांब लचक वातला तर संयोजकांनी जरुर सांगा .

लिंबु यांच्याशी सहमत आहे.
निसर्ग नियमानुसार प्रथम स्त्रि वयात येते. वयात आल्यानंतर मित्रांशी (पुरूष) सहजिकच बदल होतोच.
आपल्याकडे शाळेत वर्ग १ ली ते ४ थी मुले, मुली एका बाकावर बसवतात, कालांतराने ५ वी पासुन त्यांना वेगवेगळे बसवितात. काल पर्यंत ज्या मुलाच्या बाकावर बसत असलेली मुलगी आज त्याच्याशीच बोलतान अडखळे, याला घरातील संस्कार ही म्हणायला हरकत नाही (अर्थात चांगले) पुढे मैत्री म्हणुन जरी राहात असतील परंतु त्यांना आपल्या लिंगाची एकप्रकारे जाणीव झालेली असल्याने बोलण्या वागण्यात बदल दिसुन येतात.
मुळात जो लिंगनिरपेक्षा मैत्री या गोष्टीचा उहापोह केला जात आहे. तो म्हणजे अशी मैत्री दिर्घकाल नसते हे मी माझ्या लेखातही मांडले आहेच.

लिंगनिरपेक्षता आणि स्त्री पुरुष समानता हे दोन 'थोडेसेही संबंधीत' नसलेले असे मुद्दे आहेत.
बेफीफीर यांनी वर दिलेल्या मुद्याशीही सहम्त आहे.

बेफिकीर, तुमचे मुद्दे स्पष्ट झाले.
समानतेच्या व्याख्यांमधेच फरक आहे त्यामुळे मुद्दे पटले असं नाही म्हणता येणार.

मला वाटते, अगोच्या लेखातील जेंडर आणि सेक्स याबद्दलचा परिच्छेद वाचावा सगळ्यांनी.
इथे जेंडरलेस आयडेंटिटी अपेक्षित आहे.

एखादे गणित सोडवल्यावर त्याचे उत्तर मी काढलेले आणि माझ्या पुरूष सहकार्‍याने काढलेले - दोन्ही सारखीच येतात. तेव्हा गणित सोडवण्याचे काम मी मुलगी आहे तरी करू शकते म्हणून माझे कौतुक झाले तर हा जेंडर बायस.

मृदुला +१
शास्त्रीय प्रयोगांत जसे 'ऑल अदर पॅरामीटर्स बीइंग सेम' म्हणतात तसे त्या त्या कामासाठी लागणारी शारीरिक / बौद्धिक क्षमता सारखी असेल तर केवळ लिंगामुळे त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू नये.
हीच समानता आणि हीच लिंगनिरपेक्षता. या दोन बाबी त्यामुळे मला निराळ्या वाटत नाहीत.

मला वाटतं बेफिकीर जे म्हणत आहेत (विशेषतः बारच्या उदाहरणावरून) ते लिंगनिरपेक्षता ही वैयक्तिक बाब आहे तर समानता ही सामाजिक - असं असावं. पण सामाजिक बदलांची सुरुवात वैयक्तिक पातळीवरच होते ना?

शास्त्रीय प्रयोगांत जसे 'ऑल अदर पॅरामीटर्स बीइंग सेम' म्हणतात तसे त्या त्या कामासाठी लागणारी शारीरिक / बौद्धिक क्षमता सारखी असेल तर केवळ लिंगामुळे त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू नये.
हीच समानता आणि हीच लिंगनिरपेक्षता. या दोन बाबी त्यामुळे मला निराळ्या वाटत नाहीत.
<<<
चांगली डेफिनेशन स्वाती.
पण विशेषांकात 'मैत्री' जेंडरलेस असणे आपेक्षित होते ना, त्यात 'समानता/ लिंगनिरपेक्ष' आयडेन्टिटी' पण मिक्स झालाय असं मला वाटलं.
असो, पण लेख आवडले अंकातले.

सगळीच मैत्रं जेंडरलेस असतील असे नाही. किंबहुना नसतेच.
पण कधी कधी अशी एखादी मैत्रीण किंवा मित्र सापडते/तो की ते व्यक्ती म्हणून भावतात. मैत्रीण आहे म्हणून तिला हे सांगावे किंवा नये असे काही वाटत नाही. (किंवा मित्र आहे म्हणून.)

मला माझ्या मैत्रिणीबद्दल लिहायचे होते. लिंगनिरपेक्ष म्हणजे भिन्नलिंगीच असे नाही असे दाखवायला. पण एकंदरित आळस, टाइम मॅनेजमेंट. ..:(

वाचकवाचिकाहो,

जगात कुठल्याही दोन गोष्टी सारख्या नसतात. याअर्थी समानता ही एक अमूर्त संकल्पना आहे. गणितात अनंतत्व (इन्फिनिटी) ज्याला म्हणतात त्यासारखी. अनंतत्व म्हणजे काय ते सगळ्यांना ठाऊक असतं. १ ला ० ने भागलं की उत्तर अनंत येतं हे आपल्याला शाळेत सांगतात. मात्र भाग कसा लावायचा हे कोणीच सांगू शकत नाही! Uhoh व्यवहारात 'पुष्कळ' आहे पण 'अनंत' नाही.

तद्वत व्यवहारात 'भिन्नत्व' आहे, पण 'समानत्व' नाही. म्हणून समानता पाहिजे म्हणजे नक्की काय पाहिजे याचा शोध घ्यायला हवा.

तर माझ्या मते स्त्री-पुरुष समानता हा एक दृष्टीकोन आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या समान गुणांचा आणि समान क्षमतांचा समुच्चय हा स्त्रीपुरुषसमानत्वाचा पाया आहे. या पायावर आधारित वर्तणूक नेहमी लिंगनिरपेक्षच असणार.

आता आपण जेव्हा स्त्रीपुरुष मैत्री म्हणतो तेव्हा स्त्री आणि पुरुष वेगळे आहेत असं सूचित करतो. साहजिकच स्त्रीपुरुष मैत्री लिंगनिरपेक्ष असूच शकत नाही. हा आमावस्येच्या चंद्रबिंबासारखा (oxymoron) प्रकार झाला. Happy

तर मग लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख या शब्दप्रयोगास काही अर्थ आहे का? होय. अर्थ आहे. याकरिता तीन प्रकारच्या मैत्र्या लक्षात घेतल्या पाहिजे.

१. स्त्री-स्त्री मैत्री (उदा: भिशी, मंगळागौर)
२. स्त्री-पुरुष मैत्री (उदा: कचेरीतला डबा खाणे)
३. पुरुष-पुरुष मैत्री (उदा: दारूपानाचा अड्डा)

रूढ अर्थाने या तिन्ही मैत्र्या वरपांगी तरी वेगवेगळ्या आहेत. (उदाहरणांबद्दल बेफिकीरांचे आभार :-))

वरील तीनही प्रकरच्या मैत्र्यांत मर्यादा सांभाळाव्या लागतात. विशेषत:क्र. २ च्या बाबतीत फारच सावध राहायला लागतं. प्रत्येक स्त्रीची मैत्री १+२ तर प्रत्येक पुरुषाची मैत्री २+३ या गटात मोडते.

एखादी स्त्री आपल्या मैत्रीतील लिंगनिरपेक्षता १+२ या पायावर तपासून पाहील. तर एखादा पुरुष ती २+३ या पायावर तपासून पाहणार. यामुळे स्त्रीची लिंगनिरपेक्ष मैत्री आणि पुरुषाची लिंगनिरपेक्ष मैत्री या मुळातून वेगवेगळ्या असणारेत.

स्त्रीचा स्त्रीपुरुषसमानत्वाबाबत दृष्टीकोन पुरुषाच्या स्त्रीपुरुषसमानत्वाबाबतच्या दृष्टीकोनापेक्षा भिन्न असतो.

याचं एक उदाहरण सांगतो. माझं लग्न ठरलं होतं तेव्हाची गोष्ट आहे. भावी पत्नीशी बोलत बसलो होतो. बोलताबोलता म्हणाली की माझं बायकांपेक्षा पुरुषांशी चांगलं जमतं. नातेवाईकांकडे किंवा कौटुंबिक पार्टीमध्ये पुरुषांची कंपनी इंटरेस्टिंग असते. फार कमी इंटरेस्टिंग बायका सापडतात. तर मी म्हंटलं की असा विचार एक बाईच करू जाणे. मी पुरुष आहे आणि मला मित्र जास्त आहेत की मैत्रिणी याचा मी विचारही करू शकत नाही. इंटरेस्टिंग आहेत की बोअरिंग हेही तपासून पहात नाही. जे इंटरेस्टिंग आहेत त्यांच्याशी आपसूक मैत्री घट्ट होत जाते. या घटनेतून दोन दृष्टीकोन (किंवा विचारसरण्या म्हणा हवं तर) स्पष्ट दिसतात.

सांगायचा मुद्दा काय आहे की, स्त्री आणि पुरुष यांच्या समानत्वाच्या आकलनात भिन्नपणा आहे. तर मग एक प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे या दोन भिन्न दृष्टिकोनांत समान अंश सापडतो का? याचं उत्तर प्रत्येकाने स्वत:चं स्वत:च मिळवायचं आहे! Happy

मी माझ्या परीने याचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला आहे. स्त्रीचं मन स्त्रीच्या शरीराशी संलग्न होऊन त्या विचारसरणीचं बनतं. तसंच पुरुषाच्या बाबतीतही म्हणता येईल. स्त्रीपुरुषांची मनोरचना वेगवेगळी असल्याने त्यांच्यातल्या समान अंशाचा वेध घेतांना मनाच्या पलीकडे मूळ चेतनेकडे जावं लागणार. या मूळ चेतनेला आत्मा म्हणतात (साभार संदर्भ: अरुंधती कुलकर्णी यांचा लेख - लिंगनिरपेक्ष मैत्री - ओळख : काही विचार-तरंग यातला शेवटचा परिच्छेद)

ज्याला/जिला खरीखुरी लिंगनिरपेक्षता अनुभवायची आहे त्याला/तिला आत्म्याचा वेध घ्यावा लागेल! Happy गंमत म्हणजे आत्मा जसा लिंगनिरपेक्ष असतो तसाच तो वयनिरपेक्ष, वर्णनिरपेक्ष, पंथनिरपेक्ष, इत्यादिही असतो. एका प्रकारच्या निरपेक्षतेचा शोध घेतांना बाकीच्या निरपेक्षताही अनायासे लाभतात. हा अधिलाभ (बोनस) आहे.

आपला नम्र,
-गामा पैलवान

डिज्जे, मलाही सुरवातीला वाटलं की लिंगनिरपेक्ष ओळख पण येतय लेखांत. पण मग टायटल दिसलं, "लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री". Happy

पण मग टायटल दिसलं, "लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री". स्मित
<< माझंच कनफ्युजन झालं मग, अंकाच्या जाहिरातीं मधून कदाचित.(म्हणूनच नाही पाठवलं लिहिलेलं.)
फॉर सम रिझन "मैत्री" बद्दल लिहिणे अपेक्षित आहे असं मला वाटत होतं, नुसती 'ओळख' हा खूपच वाइड सब्जेक्ट आहे, खूप रिलेशन्स बसतील त्यात.. मग स्त्री-पुरुष समानता मुद्दा त्या वाइड सब्जेक्ट मधे नक्कीच येइल .

गामा पैलवान - खूप छान लिहिल पण परत वाचाव लागणार आहे कारण काही मुद्दे किचकट गणितासारखे आलेले आहेत. पण छान लिहिलस.

Pages