राधाबाई, गोपिकाबाई, काशीबाई, अन्नपूर्णा, पार्वती, रमा, आनंदी

Submitted by अशोक. on 21 February, 2012 - 13:19

श्री.सेनापती यांच्या 'पानिपत' धाग्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादांनंतर नक्की जाणवले की मायबोलीच्याच सदस्यांना नव्हे तर ज्या काही बाहेरील लोकाना [जे टंकलेखन येत नाही म्हणून कोणत्याच संस्थळाचे सदस्य झालेले नाहीत] मी तो धागा वाचण्याचा आग्रह केला होता, त्यानीही या विषयाची व्याप्ती तसेच आजच्या जेट नव्हे तर नेट युगातही इतिहासाविषयी विविध वयोगटातील लोक (यात स्त्री/पुरुष दोन्ही आले) किती आस्था बाळगून आहेत हे पाहिल्यावर माझ्याजवळ समाधान व्यक्त केले असून इथून पुढेही हे लोक मायबोलीवर 'पाहुणे' या नात्याने वाचनमात्र का होईना, पण सतत येत राहतील.

"पानिपत" चा इतिहास आपण तपासला, पराभव कारणमीमांसेचेही विश्लेषण केले. या गोष्टी अजूनही व्यापकरित्या या पुढे चालत राहणार आहेत, त्याला कारण म्हणजे आपल्या लोकांच्या हृदयात शिवाजीराजांचे विजय जितक्या अभिमानाने वसले आहेत, तितक्याच तीव्रतेने पानिपत पराभवाचा 'सल'. हे लक्षण मानवी स्वभावाच्या जिवंतपणाची खूण आहे. ब्रिटिशांनी या महाकाय देशावर दीडशे वर्षे राज्य केले हा डाग आपण पुसून टाकू म्हटले तर 'काळ' तसे ते करू देत नाही. उलटपक्षी तो आपल्याला त्यातून 'तेज' प्रदान करतो आणि एकीच्या बळाचे महत्व किती प्रत्ययकारी होऊ शकतो हे स्वातंत्र्यलढ्यादरम्यान घडलेल्या विविध उदाहरणातून विशद करतो.

विजयातून उन्मत्त होऊ नये हे जसे एक सत्य आहे तितकेच पराभावातूनही नाऊमेद होऊ नये असेही शास्त्र सांगते. त्या शास्त्राच्या आधारेच रणातून परतणार्‍या वीरांच्या शारीरिक तसेच मानसिक जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करणारी प्रमुख व्यक्ती कोण असेल तर ती घरातील 'स्त्री'. पानिपतावरून पुण्यात परतलेल्या त्या शतशः विदीर्ण झालेल्या उरल्यासुरल्या सरदांराना आणि सैन्यांना पुढील वाटचालीसाठी स्त्री वर्गाकडूनच "उद्याचा सूर्य आशा घेऊन येईल" अशा धर्तीचा सहारा मिळाला असणार, कारण त्यानंतरही श्रीमंत माधवराव पेशव्यांनी अल्पकाळाच्या कारकिर्दीत मराठी सत्तेवर अबदालीने पाडलेला तो डाग काही प्रमाणात सुसह्य केला, हा इतिहास आहे. माधवरावांना रमाबाईची जशी सुयोग्य आणि समर्थ अशी साथ मिळाली, त्याबद्दल आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने वाचलेले असते. त्याला अर्थातच कारण म्हणजे रणजित देसाई यांची 'स्वामी' हे कादंबरी. या कादंबरीच्या यशाची चिकित्सा इथे करण्याचे प्रयोजन नसून या ललितकृतीने मराठी मनाला इतिहासाची गोडी लावली हे निखळ सत्य आहे.

१९६२ ते २०१२ ~ बरोबर ५० वर्षे झाली 'स्वामी' ला आणि त्या प्रकाशन वर्षापासून आजच्या तारखेलाही आपण 'पानिपत' या विषयावर भरभरून लिहितो आणि वाचतो ही बाब या वेगवान युगातही आपण त्या काळाशी किती घट्ट बांधलो गेलो आहे याचे द्योतक आहे.

या निमित्ताने काही सदस्यांनी अशीही एक प्रतिसादातून/विचारपूसमधून सूचना केली की, पेशवाईतील 'रमा' सारख्या सर्वच स्त्रियांची माहिती आपल्याला इथल्या चर्चेतून मिळाली तर वाचनाचा एक भरीव आनंद घेता येईल. त्यासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. इथे त्या स्त्रियांविषयी काही लिहिण्याच्या अगोदर आपलाच इतिहास नव्हे तर अगदी पौराणिक काळापासून "स्त्री' स्थानाचा त्या त्या घटनेतील सहभाग याचा मागोवा घेत गेल्यास असे दिसते की, 'रामायण = सीता", "महाभारत = द्रौपदी", "कृष्णयुग = राधा". ही प्रमुख नावे. पण यांच्याशिवायही अनेक स्त्रियांनी दोन्ही पक्षांकडून त्या काळात आपली नावे कोरलेली असतात, भले ती या तीन नायिकेंच्या तोडीची नसतील. तीच गोष्ट इतिहासाची. सध्यातरी आपल्या महाराष्ट्राचा इतिहास या मर्यादेतच विचार केल्यास शिवाजी आणि जीजाऊ ही मायलेकराची जोडी समोर येते. सईबाई आणि सोयराबाई या त्यांच्या दोन बायकांची नावे मराठी वाचकाला का माहीत आहेत तर त्या अनुक्रमे संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या माता म्हणून. पण शिवाजीराजे ज्यावेळी अफझलखान याच्या 'प्रतापगड' भेटीसाठी तयारी करीत होते त्यावेळी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आजारपणामुळे त्रस्त झालेल्या सईबाईना देवाज्ञा झाली होती हेही ज्ञात नसते. निदान सईबाई ह्या संभाजीराजेची जन्मदात्री म्हणून किमान नाव तरी माहीत आहे, पण 'पुतळाबाई' ज्या महाराजांच्या शवाबरोबर 'सती' गेल्या त्यांच्याविषयी तरी किती खोलवर आपण जाणून घेतले आहे ? हा प्रश्न स्वतःलाच विचारला तर आपली पाटी त्याबाबत कोरी आहे असे दिसून येते. ह्या तिघींशिवायही "लक्ष्मी", "काशी", "सगुणा", "गुणवंती" आणि "सकवार" अशा ज्या पाच स्त्रिया राजाना पत्नी म्हणून होत्या त्यांचे महाराजांच्या निर्वाणानंतर काय झाले असेल ? इतिहासात त्यांच्याविषयी काय कसल्या आणि किती नोंदी असतील ? सईबाईचे लग्नाच्यावेळी वय होते ७ [महाराज होते ११ वर्षाचे], मग याच न्यायाने अन्यही त्याच वा त्याच्या आगेमागे वयाच्या असणार हेही नक्की. याना मुलेबाळे झाली असतील का ? असतील तर त्यांचे मराठा साम्राज्य विस्तारात किती भाग होता ?

इतिहासाने अशा व्यक्तींचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाठपुरावा केलेला आहे की ज्यांची मुद्रा या राज्याच्या जडणघडणीत [मग ती उजवी असो वा डावी] उमटलेली आहे. पण एक भावुक इतिहासप्रेमी या नात्याने कधीकधी [विशेषतः इतिहासाच्या विविध कोठडीतून त्या काळाचा पाठपुरावा करतेसमयी] मनी कुठेतरी इतिहासात दुय्यम स्थान प्राप्त झालेल्या 'स्त्रियां' च्या विषयी कुतूहल जागृत होते. वाटते, असेल का एखादे एच.जी.वेल्सच्या कल्पनेतील "टाईम मशिन', ज्याचा उपयोग करून त्या काळात सदेह जावे आणि म्हणजे मग अशा विस्मृतीत गेलेल्या स्त्रियांचा मागोवा घेता येईल.

पण वेल्सने कादंबरीरुपाने मांडलेली ती "काल-प्रवासा"ची कल्पना अजून तरी कागदोपत्रीच राहिली असल्याने अभ्यासासाठी जी काही ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत त्यांच्या आधारेच "पेशवाईतील स्त्रिया" ना आपण इथे चर्चेसाठी पटलावर आणू आणि त्या अनुषंगाने त्या त्या पुरुषासमवेत त्यांच्या अर्धांगिनींने इतिहासात दिलेल्या साथीचे अवलोकन केल्यास तो वाचन-आनंद सर्वांना भावेल अशी आशा आहे.

छत्रपतींच्या कारकिर्दीत पेशवेपद भूषविणारे मोरोपंत पिंगळे यांच्यापासून ते बहिरोजी पिंगळे यांच्यापर्यंत त्यांच्या कामकाजांचे स्वरूप 'महाराजांचे प्रशासनातील उजवे हात' अशा पद्धतीचे होते. शाहू छत्रपतींनी सातार्‍याला प्रयाण करून राज्याची सर्वबाबतीतील जबाबदारीची मुखत्यारपत्रे पेशव्यांना दिली आणि त्या जागी बाळाजी विश्वनाथ भटांची नेमणूक केल्यावर खर्‍या अर्थाने 'पेशवे' हेच मराठा राज्याची सर्वार्थाने धुरा वाहू लागले. त्यामुळे या पदावर आरुढ झालेल्या पुरुषांबरोबर त्यांच्या स्त्रियांही अधिकृतरित्या राज्यकारभारात विशेष लक्ष घालू लागल्याचे दाखले आपल्याला सापडतात. म्हणून आपण थेट पहिल्या पेशव्यांच्या घरापासून लेखाची सुरूवात करू या.

१. राधाबाई
बाळाजी विश्वनाथ यांची पत्नी. ज्यांच्याकडे स्वतंत्र अर्थाने 'प्रथम पेशवेपत्नी' या पदाचा मान जाईल. बर्वे घराण्यातील राधाबाई यानी थेट राज्यकारभारात भाग घेतला असेल की नाही यावर दुमत होऊ शकेल पण त्यांचे पेशव्यांच्या इतिहासात नाव राहिल ते त्या "बाजीराव" आणि "चिमाजीअप्पा" या कमालीच्या शूरवीरांच्या मातोश्री म्हणून. राधाबाईना दोन मुलीही झाल्या. १. भिऊबाई, जिचा बारामतीच्या आबाजी जोशी यांच्याशी विवाह झाला तर २. अनुबाई हिचा विवाह पेशव्यांचे एक सरदार व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला. घोरपडे घराणे हे इचलकरंजीचे जहागिरदार होते. आजही त्यांचे वंशज या गावात आहेत.

२. काशीबाई
थोरल्या बाजीरावांची पत्नी. बाळाजी [जे पुढे नानासाहेब पेशवे या नावाने प्रसिद्ध झाले] आणि रघुनाथराव [अर्थातच 'राघोभरारी'] ही दोन अपत्ये. काशीबाई यांची सवत म्हणजेच 'मस्तानी'. बाजीरावापासून मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव प्रथम त्या जोडप्याने 'कृष्ण' असे ठेवले होते. पण बाजीराव कितीही पराक्रमी असले तरी या तशा अनैतिक संबंधातून [ब्राह्मण+मुस्लिम] जन्माला आलेल्या मुलाला 'ब्राह्मणीखूण जानवे' घालण्याची बाजीरावाची मागणी पुण्याच्या सनातनी ब्रह्मवृंदाने फेटाळली होती. त्याला अर्थातच पाठिंबा होता तो राधाबाई आणि बंधू चिमाजीअप्पा यांचा. युद्धभूमीवर 'सिंह' असलेले बाजीराव घरातील पेचप्रसंगासमोर झुकले आणि मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव 'समशेरबहाद्दर' असे ठेवण्यात आले.

मात्र मस्तानीच्या मृत्युनंतर काशीबाई यानीच समशेरबहाद्दरचे आईच्या ममतेने पालनपोषण केले आणि त्याला एक समर्थ योद्धाही बनविले. वयाच्या २७ व्या वर्षी पानिपतच्या त्या युद्धात समशेरही भाऊ आणि विश्वासराव यांच्यासमवेत वीरगती प्राप्त करता झाला. [समशेरचा निकाह एका मुस्लिम युवतीशीच झाला आणि त्यापासून अली समशेर हे अपत्यही. पेशव्यांनी बाजीरावाची ही आठवण जपली, पण अलीला बुंदेलखंड प्रांतातील जहागीरव्यवस्था देऊन. बाजीराव मस्तानीचा हा वंश पुढे कसा फुलला की खुंटला याची इतिहासात नोंद असेलही पण त्याकडे कुणी खोलवर लक्षही दिलेले दिसत नाही.]

३. अन्नपूर्णाबाई
या बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजीआप्पा यांच्या पत्नी. [आपण नेहमी बाजीरावांच्या पराक्रमाच्या शौर्याच्या आणि विजयाच्या कथा वाचत असतो, चर्चा करीत असतो, पण वास्तविक चिमाजीअप्पा हे या बाबतीत थोरल्या बंधूंच्या बरोबरीनेच रण गाजवित होते. अवघे ३३ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या वीरावर स्वतंत्र धागा इथे देणे फार गरजेचे आहे.] ~~ चिमाजी आणि अन्नपूर्णाबाई यांचे चिरंजीव म्हणजेच पानिपत युद्धातील ज्येष्ठ नाव 'सदाशिव' = सदाशिवरावभाऊ पेशवे.

चिमाजीरावांना सीताबाई नावाची आणखीन एक पत्नी होती. पण अपत्य मात्र एकच - सदाशिवराव. चिमाजी पानिपत काळात हयात नव्हते आणि ज्यावेळी सदाशिवरावांनाही अवघ्या ३० व्या वर्षी पानिपत संग्रामात वीरमरण आले त्यावेळी अन्नपूर्णाबाई आणि सीताबाई या हयात होत्या की नाही याविषयी इतिहास मौन बाळगून आहे.

४. गोपिकाबाई
पेशवाई काळातील सर्वार्थाने ज्येष्ठ असे स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे गोपिकाबाई. बाजीरावांची सून आणि नानासाहेब पेशव्यांची पत्नी. सरदार रास्ते घराण्यातील या मुलीकडे राधाबाईंचे लक्ष गेले ते तिच्या देवपूजा, परिपाठ, संस्कार आणि बुद्धीमत्ता या गुणांमुळे. बाळाजीसाठी हीच कन्या पत्नी म्हणून पेशवे घराण्यात आणायची हा विचार तिथेच पक्का झाला होता. गोपिकाबाईनीही तो विश्वास सार्थ ठरविला होता आणि नानासाहेब पेशवेपदावर आरुढ झाल्यावर मराठा राज्यकारभार आणि विविध मसलतीत प्रत्यक्ष भाग घेणारी पहिली "पेशवीण" ठरली.

नानासाहेब "पेशवे' झाल्यापासून गोपिकाबाईंनी आपल्या राजकारणाची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. नानांच्या त्या अंतर्गत सल्लागार जशा होत्या तशाच आपल्या परिवारातील कोणतीही अन्य स्त्री आपल्यपेक्षा वरचढ होणार नाही याकडेही त्या लक्ष देत असल्याने पेशवाईतील प्रमुख सरदार आणि अमात्य मंडळींशी त्या मिळूनमिसळून वागत. राघोबादादा हे नात्याने त्यांचे धाकटे दीर. ते आपल्या पराक्रमाने मराठा राज्यातील आघाडीचे वीर गणले जात असत, त्यामुळे त्यांची पत्नी 'आनंदीबाई' यांच्या महत्वाकांक्षेला आणखीन धुमारे फुटू नयेत याबाबत गोपिकाबाई दक्ष असत. तीच गोष्ट सदाशिवराव [चिमाजी पुत्र] भाऊंची पत्नी 'पार्वतीबाई' हिच्याबाबतही.

पार्वतीबाई यांच्याशी गोपिकाबाईंची अंतर्गत तेढ वाढण्याचे कारण झाले 'विश्वासराव'. नानासाहेब आणि गोपिकाबाईंचे हे चिरंजीव पुढे भावी पेशवे होणार होते. सरदार गुप्ते हे नाशिक प्रांताचे त्यावेळेचे जहागिरदार आणि त्यांच्याच घराण्यातील 'पार्वतीबाई' या त्यावेळी सातार्‍यात होत्या, त्यांच्याकडे गुप्त्यांची कन्या "राधिका" मुक्कामास आली होती. शाहू छत्रपतीही तिथेच वास्तव्याला असल्याने त्यानी तिला [राधिकेला] पाहिले होते व नानासाहेबांना सुचवून गुप्ते घराण्यातील हीच 'राधिका' भावी पेशवीणबाई म्हणून निश्चित केली होती. हा नातेसंबंध गोपिकाबाईना रुचला नव्हता; पण छत्रपतींच्या इच्छेपुढे नानासाहेब नकार देऊच शकत नव्हते. साखरपुडा झाला आणि पुढे त्याचवेळी पानिपताच्या तयारीत सारेच लागल्याने विश्वासरावांचे लग्न लांबणीवर पडले. विश्वासराव त्यात मारले गेले हा इतिहास सर्वश्रुत असल्याने त्याविषयी न लिहिता सांगत आहे की, लग्न न होताच ती १६ वर्षाची राधिका 'विधवा' झाली आणि पुढील सारे आयुष्य तिने विश्वासरावाच्या आठवणीतच गंगानदी काठच्या आश्रमात 'योगिनी' म्हणून व्यतीत केले. [राधिकाबाई सन १७९८ मध्ये अनंतात हरिद्वार इथेच अनंतात विलीन झाल्या.]

या करुण कहाणीचा आपल्या मनावर प्रभाव पडून आपण व्यथित होऊ; पण गोपिकाबाईने 'राधिका' ला आपल्या मुलाचा 'काळ' या नजरेतूनच सातत्याने पाहिले. मुळात त्यांना ती होऊ घातलेली सोयरिक पसंत नव्हतीच म्हणून लग्न जितक्या लांब टाकता येईल तितके ते टाकावे म्हणून नवर्‍यापुढे हट्टाने सदाशिवरावांच्यासमवेत विश्वासरावाला पानिपत युद्धात सहभागी करून घेण्याची मागणी पूर्ण करून घेतली. सार्‍या मराठेशाहीलाच 'पानिपत युद्धात भाऊंचे सैन्य अबदाली आणि नजीबला खडे चारणार' याची खात्री असल्याने विजयाचे सारे श्रेय 'सदाशिवरावा' ला न मिळता त्यातील मोठा हिस्सा 'विश्वासरावा'च्या पारडीत पडावा आणि छत्रपतींनी पुढचे पेशवे म्हणून सदाशिवरावांऐवजी विश्वासराव यालाच वस्त्रे द्यावीत अशीही गोपिकाबाईची चाल होती.

पण पानिपताचे दान उलटे पडले. जे सदाशिवराव डोळ्यात सलत होते ते तर गेलेच पण ज्याच्याबाबत भव्यदिव्य स्वप्ने मनी रचली तो 'विश्वास' ही कायमचा गेला. मग प्रथेप्रमाणे त्या 'भोगाला' कुणीतरी कारणीभूत आहे म्हणून कुणाकडेतरी बोट दाखवावे लागते. 'राधिका' च्या रुपात गोपिकाबाईंना ते ठिकाण सापडले आणि हिच्यामुळेच माझा मुलगा गेला हा समज अखेरपर्यंत त्यानी मनी जोपासला.

गोपिकाबाईंचे दुर्दैव इतके मोठे की, त्याना त्यांच्या हयातीतच पूर्ण वाढ झालेल्या आपल्या तिन्ही मुलांचे मृत्यू पाहणे नशिबी आले. विश्वासराव पानिपतावर धारातिर्थी पडले, दुसरे चिरंजीव माधवराव नि:संशय कर्तबगार झाले आणि पानिपताचे दु:ख आपल्या पराक्रमाने त्यानी कमी तर केलेच पण मुलूखगिरीही नावाजण्यासारखीच केली. राघोबादादा, सखारामपंत बोकिल, रास्ते यांच्या महत्वाकांक्षेला लगाम घातला. रमा समवेत संसारही छानपैकी चालणार, फुलणार असे वाटत असतानाच क्षयाने त्याना गाठले व त्यांचाही मृत्यू पाहण्याचा प्रसंग गोपिकाबाईंवर आला. तर तिसर्‍या मुलाचा - नारायणराव - याचाही पुण्यात अगदी डोळ्यासमोर शनिवारवाड्यात झालेला वध.

पती नानासाहेब तर पानिपताच्या धक्क्यानेच स्वर्गवासी झाले होते आणि एकापाठोपाठ ही तिन्ही मुलेही गेल्याचे जिच्या कपाळी आले ती बाई भ्रमिष्ट झाली नसेल तर ते आश्चर्यच मानावे लागले असते. नारायणरावांच्या खूनानंतर गोपिकाबाईनी पुणे कायमचे सोडले आणि त्या नाशिकच्या आश्रमात येऊन दारोदारी भिक्षा मागून आपली गुजराण करू लागल्या. पण तिथेही त्यांच्या अंगातील जुना पिळ गेला नव्हता कारण भिक्षा मागताना ती त्या फक्त नाशिकातील सरदार घराण्यातील स्त्रियांकडून स्वीकारीत असत. एकदा अशाच फिरतीवर एका वाड्यासमोर आल्या आणि भिक्षेसाठी दिंडी दरवाजावरील घंटा वाजविली असता भिक्षेसाठी आलेल्या स्त्रीला पाहून वाड्यातून दुसरी एक स्त्री भिक्षा घेऊन आली. ती नेमकी होती सरदार गुप्ते यांची 'योगिनी' कन्या राधिका, जी हरिद्वार इथून एक जथ्थ्यासमवेत तीर्थयात्रेवर नाशिकला आली असता सरदार गुप्त्यांनी तिला आपल्या वाड्यावर काही दिवसासाठी आणले होते.

पण दरवाजात भिक्षा घेऊन आलेल्या राधिकेला पाहिल्यावर गोपिकाबाई संतापाने किंचाळू लागल्या. पतीनिधन आणि तीन मुलांचा अंत यामुळे झालेल्या अनावर दु:खाचा तो उद्रेक त्यानी राधिकेवर काढला. आजुबाजूच्या सरदारदरकदारांनी आणि स्त्रियांनी त्याना कसेबसे शांत करून पुन:श्च गोदावरी आश्रमात त्याना पोचते केले. ही घटना जुलै १७७८ मधील....आणि राधिकेचे झालेले 'अशुभ दर्शन' म्हणून प्रायश्चित घेणे गरजेचे आहे अशा भावनेतून गोपिकाबाईनी तिथे गोदावरी घाटावरच उपोषण चालू ठेवले आणि त्यातच त्यांचा ११ ऑगस्ट १७७८ मध्ये अंत झाला. ज्या राधिकेला पाहिले म्हणून त्यानी मृत्युला जवळ केले त्या राधिकेनेच या कधीही न झालेल्या 'सासू' वर गोदेकाठी अंत्यसंस्कार केले.

५. पार्वतीबाई
सदाशिवराव भाऊंची पत्नी; पानिपत संग्रामाच्यावेळी प्रत्यक्ष रणभूमीवर पतीसमवेत गेल्या होत्या. गोपिकांबाईंसारख्या ज्येष्ठ आणि वरचढ स्त्रीसमवेत आपणास राहायला नको व त्यापेक्षा पतीबरोबर युद्धात गेलेले ठीक या भावनेतूनही त्यांचा तो निर्णय होता असा इतिहासकारांनी तर्क काढला आहे. पार्वतीबाईंच्या दुर्दैवाने त्याना पतीच्या शवाचे दर्शन झाले नाही कारण युद्धातील कधीही भरून न येणार्‍या हानीनंतर काही विश्वासू सरदार-सैनिकांनी त्याना पानिपताहून पुण्यात सुखरूप आणले. पण "मृत पती पाहिलेला नाही' या कारणावरून पार्वतीबाईनी स्वतःला 'विधवा' मानले नाही आणि त्यांच्या स्मृतीतच वाड्यावर रमाबाईसमवेत [ज्या आता पेशवीणबाई झाल्या होत्या] राहात होत्या. 'तोतयाच्या बंडा' ला त्या निक्षून सामोरे गेल्या होत्या आणि तो प्रकार माधवरावांच्या मदतीने त्यानी धीटपणे मोडून काढला होता. माधवरावांच्या बहरत जा असलेल्या कारकिर्दीकडे पाहातच त्या शांतपणे १७६३ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी मृत्युला सामोरे गेल्या. त्याना अपत्य नव्हते.

६. रमाबाई
काय लिहावे या पेशवे स्त्री यादीतील सर्वाधिक लोकप्रिय मुलीविषयी ? आज या क्षणी एकही सुशिक्षित मराठा घर नसेल की जिथे 'रमा-माधव' हे नाव माहीत नसेल. इतिहासातील पात्रे कशीही असू देत, पण 'रमा' या नावाने त्यावेळेच्या आणि आजच्याही जनतेत जे नाजूक हळवे असे घर केले आहे त्याला तोड नाही. इतिहासात क्वचितच असे एखादेदुसरे स्त्री व्यक्तिमत्व असेल की जिच्याविषयी इतक्या हळुवारपणे लिहिले बोलले जाते. पेशवे-इतिहास लेखन करणार्‍या सर्व लेखकांच्या लेखणीतून 'रमा' या नावाला जो मान दिला गेला आहे, तो अन्य कुठल्याच नाही. सर्वार्थाने 'प्रिय' अशी स्त्री म्हणजे माधवरावांची पत्नी - रमा. एक काव्यच आहे हे नाव म्हणजे. म्हणून या मुलीच्या निधनाची आठवणही इथे आणणे दुय्यम ठरते.
[हेही सांगणे दुय्यमच की माधवराव आणि रमा याना अपत्य नव्हते.]

७. आनंदीबाई
पेशवे इतिहासातील सर्वात काळेकुट्ट प्रकरण कुठले असेल तर शनिवारवाड्यात गारद्यांनी केलेला 'नारायणराव पेशव्यां'चा निर्घृण खून. तोही सख्ख्या चुलत्या आणि चुलतीकडून. नाना फडणवीस आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी रामशास्त्रींच्या न्यायव्यवस्थेकडून त्या खून प्रकरणाचा छ्डा तर लावलाच पण त्या धक्कादायक प्रकरणाच्या मागे एकटे रघुनाथराव नसून अत्यंत महत्वाकांक्षी असलेली त्यांची पत्नी 'आनंदीबाई' आहेत हेही सिद्ध केले. ["ध" चा 'मा' हे प्रकरण इथे विस्ताराने लिहिण्याचे कारण नाही, इतके ते कुप्रसिद्ध आहे.]

आनंदीबाई ह्या गुहागरच्या ओकांची कन्या. राघोबांशी त्यांचा विवाह (१७५६) झाल्यापासून आपला नवरा 'पेशवे' पदाचा हक्कदार आहे हीच भावना त्यानी त्यांच्या मनी चेतवीत ठेवली होती. गोपिकाबाईंचे वर्चस्व त्याना सहन होणे जितके शक्य नव्हते तितकेच त्यांच्या सरदारांसमवेतही संबंध कधी जुळू शकणारे नव्हते. रघुनाथराव पराक्रमी जरूर होते पण ज्याला सावध राजकारणी म्हटले जाते ते तसे कधीच दिसून आले नाही. विश्वासराव अकाली गेले आणि माधवराव अल्पवयीन म्हणून आपल्या नवर्‍याला - रघुनाथरावाना - पेशवाईची वस्त्रे मिळतील अशी आनंदीबाईंची जवळपास खात्री होतीच. पण छत्रपतींनी वंशपरंपरागत रचना मान्य केली असल्याने माधवराव व त्यांच्यानंतर नारायणराव हेच पेशवे झाल्याचे आनंदीबाईना पाहाणे अटळ झाले. माधवराव निपुत्रिक गेले आणि नारायणराव यांचे वैवाहिक जीवन [पत्नी काशीबाई] नुकतेच सुरू झाले असल्याने रघुनाथराव याना पेशवे होण्याची हीच संधी योग्य आहे असे आनंदीबाईनी ठरवून तो शनिवारवाडा प्रसंग घडवून आणण्याचे त्यानी धारिष्ट्य केले आणि तांत्रिकदृष्ट्या त्या यशस्वीही झाल्याचे इतिहास सांगतो.

पण दुर्दैवाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. अल्पकाळ का होईना, पण रघुनाथराव जरूर पेशवेपदी बसले पण नाना फडणविसांनी त्याना ते सुख घेऊ दिले नाही. 'बारभाईं'नी रघुनाथराव आणि पर्यायाने आनंदीबाईंची त्या पदावरून हकालपट्टी केली आणि एक वर्षाच्या 'सवाई माधवराव' यांच्या नावाने पेशवेपदाची नव्याने स्थापना केली. आनंदीबाई मध्यप्रदेशात धार प्रांतात पळून गेल्या आणि तिथेच त्यानी 'दुसर्‍या बाजीराव' ना जन्म दिला. त्यांच्या जन्मानंतर आठ वर्षांनी धार इथेच रघुनाथरावांचा मृत्यु झाला. त्यानंतर आनंदीबाईंचीही ससेहोलपटच झाली. रघुनाथरावांपासून झालेली दोन मुले आणि सवतीचा एक अशा तीन मुलांना घेऊनच मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात त्यांच्यामुळेच होणार्‍या वादात आणि लढ्यात त्यांचे नवर्‍याच्या मृत्यूनंतरचे आयुष्य गेले. इकडे बारभाईनी 'सवाई माधवरावा' ला पेशवे गादीवर बसवून नाना फडणवीस यांच्याच अखत्यारीत राज्यकारभार चालू केल्याने दुसर्‍या बाजीरावाला निदान त्यावेळी तरी पुण्यात प्रवेश नव्हताच. सवाई माधवरावांनी वेड्याच्या भरात १७९६ मध्ये आत्महत्या केल्याने आणि ते निपुत्रिक वारल्याने त्यांच्या जागी 'पेशव्यां'चा अखेरचा वारस म्हणून नानांनी (आणि दौलतराव शिंद्यांनी) अन्य उपाय नाही म्हणून दुसर्‍या बाजीरावाला पेशवाईची वस्त्रे दिली.

~ मात्र मुलगा मराठेशाहीचा "पेशवा' झाल्याचे सुख आनंदीबाईच्या नजरेला पडले नाही. त्यापूर्वीच ही एक महत्वाकांक्षी स्त्री १२ मार्च १७९४ रोजी महाड येथे नैराश्येतच निधन पावली होती.

अशोक पाटील

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पद्मा ~

इतिहासात ज्या योद्ध्यांना खर्‍या अर्थाने 'थोर पुरुष' म्हणून गौरविले गेले आहे त्यांच्या जन्माविषयी इतके कुतूहल नसते जितके त्यांच्या मृत्युविषयी. त्या व्यक्तीपोटी दाखविल्या जाणार्‍या आदराचेच ते एक प्रतीक मानले पाहिजे. कारण त्यांच्या पराक्रमावर, इतिहास घडविणार्‍या व्यक्तिमत्वावर आपण सर्वार्थाने लट्टू असतो. इतिहासाच्या पटलावर आपल्या शौर्याच्या पाऊलखुणा ठळकपणे उमटविणार्‍या या वीरांना आजच्या हिशोबाने अल्प आयुष्य लाभलेले असते. त्यामुळे त्यांचे मृत्यू खरोखरीचे "नैसर्गिक" होते की त्यामागे काही कपट असेल का ? असे तर्ककुतर्क करीत राहणे हा तर इतिहास संशोधकांचा एक छंदच असतो.

जगज्जेता सिकंदर असो वा ज्युलिअस सीझर असो, नेपोलिअन असो वा शिवछत्रपती असो, या सर्वांच्या मृत्युभोवतालचे प्रश्नचिन्ह आजही गहिरेच राहिले आहे. ज्याअर्थी त्यावर आजही संशोधकांत खल चालतो, सबब आपणही इथे त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधायचे म्हटल्यास फार मर्यादा पडतात.

५ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांची प्राणज्योत मालविली हे सत्य. आता ती ज्योत देवाज्ञेने पंचत्वात विलीन झाली की कुणीतरी जाणूनबुजून मालविली याबद्दल दुमत होत राहतील. [पण एक आहे तुम्ही ज्या सकवारबाईंचे नाव वर टंकले आहे, ते नाव कुणी घेत नाही. घेतले जाते ते सोयराबाईंचे. तेही सोयिस्कररित्या का ? तर त्या राजारामाच्या मातोश्री, आणि काही अमात्यांनी थोरल्या छ्त्रपतीनंतर राजाराम हेच गादीवे वारस असे त्यांच्या डोक्यात भरून दिले होते. संभाजीराजे तर त्यावेळी पन्हाळगडावर नजरकैदेत, साहजिकच महाराजांच्या मनातून ते पुरते उतरले आहेत असा सर्वत्र समज. पण थोरल्या राजांना 'संभाजी' हाच दुसरे छत्रपती व्हावेत असे वाटणे काही गैर नव्हते. संभाजीचा जन्म १६५७ चा तर राजाराम १६६४ चे, म्हणजे दोघात तब्बल ७ वर्षाचे अंतर. त्यामुळे १६८० वेळी राज्यात त्या गृहकलहापासून लांब असणार्‍या सरदार-सैनिकांना २३ वर्षाचे युवराज संभाजी हेच भावी 'राजे' वाटणे साहजिकच. ही बाब सोयराबाई यानांही नक्कीच समजत असणार. तेव्हा त्यांच्या मनी जर 'राजाराम' हाच भावी छ्त्रपती व्हावा असे आले असेल आणि महाराज 'संभाजी' शिवाय अन्य नाव विचारात घेणार नसतील, तर जे अमात्य सेनापती सरदार आज आपल्या बाजूने आहे त्यांची मदत घेऊन राजाराम यालाच छत्रपती बनविण्याच्या निर्धाराने सोयराबाई यानी महाराजांच्यावर विषप्रयोग केला असल्याची शक्यता वर्तविली जात असे.

याला कसलाही ठोस पुरावा नाही, फक्त इतिहासात वेळोवेळी उडणार्‍या या वावड्या असतात, म्हणजेच ऐकीव. सबब आपण ५ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाले आणि त्यांच्यानंतर संभाजीराजे हे मराठा राज्याचे दुसरे छत्रपती झाले या दोनच वास्तवातल्या गोष्टी मान्य करू या.

[अवांतर : प्रतिसादाच्या ओघात वर अलेक्झांडर, सीझर, नेपोलियन आदींचे उल्लेख आले असल्याने आता अशा ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या तथाकथित गूढ मृत्यूंच्या कहाण्यावर इथे एक स्वतंत्र लेख लिहावा असे मनी आले आहे.]

अशोक पाटील

अशोक पाटील साहेब, शिवाजी महाराजांच्या मृयुत्युबाबतही त्या धाग्यावर लिहा, ही विनंती.

छान माहिती आणि इतर चर्चा सुद्धा.

चिमाजी पानिपत काळात हयात नव्हते आणि ज्यावेळी सदाशिवरावांनाही अवघ्या ३० व्या वर्षी पानिपत संग्रामात वीरमरण आले त्यावेळी अन्नपूर्णाबाई आणि सीताबाई या हयात होत्या की नाही याविषयी इतिहास मौन बाळगून आहे.> पुण्याला ॐकारेश्वर मंदिरात अन्नपूर्णाबाईंची समाधी आहे. त्या सती गेल्या होत्या.

श्री. अशोकजी,
शाळेत इतिहास शिकले तो अतिशय संक्षिप्त स्वरुपात होता, कित्येक प्रश्न तेव्हाही पडत होते, इतर अनेक विषयांमुळे ते थोडे दुर्लक्षित राहीले..
त्यानंतर, पेपर मधुन, एखाद्या कादंबरीवजा पुस्तकातून वाचला गेलेला इतिहासच माहीत होता..
आता मराठी, हिंदी आणि इतर टि.व्ही. चॅनल्स इतिहासावर आधारीत मालिका काढून त्यात काल्पनिक घटना रंगविताना दिसतात.. (राणी लक्ष्मीबाई, वीर शिवाजी ही ताजी उदाहरणे आहेत)
तुमच्या लेखांमुळे इतिहासाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी मिळाली.. कित्येक गैरसमजही दूर झाले..
इतिहासाचे माहीत नसलेले कितीतरी पैलू समोर आले..
खुप खुप धन्यवाद..
तुमच्या पुढच्या लेखांच्या प्रतिक्षेत...

सारीका

सारीका >> +१

१०वी चा इतिहासाचा पेपर लिहून संपला आणि मला इतिहास आवडू लागला हा खरा इतिहास आहे !!!

अशोकराव,

संयम आणि संतुलन अंगी बाणवायला तुमचे लेख (व प्रतिसाद) वाचले पाहिजेत! Happy

शिवाजीमहाराजांवरील विषप्रयोगाबाबत मी एकदा काहीसं वाचल्याचं आठवतं. त्यात लेखकाने म्हंटलं होतं की महाराजांच्या पत्रिकेत विषाद्वारे मृत्युयोग होता. तर्ककुतर्क लढविण्याचं बहुधा पत्रिका हे एक कारण असावं.

महाराजांच्या जन्मदिनांकाविषयी संभ्रम आहे. त्यामुळे कुठली पत्रिका खरी धरावी हा प्रश्न पडतो. या वादावरही एखादा लेख लिहावा ही विनंती! Happy

आ.न.,
-गा.पै.

@ चारुदत्त : जरूर. लिहिण्यास सुरुवात केली आहे असे म्हटले तरी चालेल.
@ मोहनराव : अर्थातच. जागतिक पटलावर असलेल्या थोर व्यक्तींच्या 'गूढ मृत्यू' विषयी लिहायचे म्हटल्यास शिवाजीराजे यांच्याविषयी लिखाण ओघानेच आले.
@ रावी : ओंकारेश्वराच्या त्या मंदिराविषयी मला माहिती आहे. मी स्वत:ही तिथे गेलो होतो; आणि 'अन्नपूर्णा' समाधीविषयी खोलवर चौकशी करता पुजार्‍यांकडून फारच त्रोटक माहिती मिळाली. म्हणजे त्या खरोखरी सती गेल्या होत्या की त्यांना आलेल्या नैसर्गिक मृत्युनंतर त्यांची समाधी तिथे बांधली गेली याबद्दल समाधानकारक खुलासे मिळू शकले नाहीत. "त्या सती गेल्या होत्या असे मानले जाते" असे एक उत्तर मिळाले. [एकाने सांगितले की 'अन्नपूर्णा' ही एक देवी असून तिचे नाते धनधान्याच्या विपुलतेशी आहे, तिच्या स्मृतीचे ते ठिकाण आहे]. १७३८ साली खुद्द चिमाजीअप्पा यांच्याच प्रेरणेने हे मंदिर उभे राहिले आणि त्यानंतर तीन वर्षांनी त्यांचे निधन झाले. या जोडीचे एकुलते एक अपत्य सदाशिवरावभाऊ त्यावेळे अवघे ११ वर्षाचे होते, ज्याचे अगदी पुत्रवत असे पालनपोषण नानासाहेब पेशव्यांनी केले हा इतिहास आहे.

[अगदी १९७१ पर्यंत 'ओंकारेश्वर' परिसर हेच 'वैकुंठ' च्या अगोदर अंत्यविधीचे स्थान मानले जात असे.]

@ सारिका : मी मागे म्हटल्याप्रमाणे 'कादंबरी' लेखनाचे महत्व कमी का नाही, तर त्या वाङ्मयप्रकाराने वाचकाला 'इतिहासा'कडे खेचून नेण्याची प्रेरणा मिळते. अन्यथा कित्येकांना पौराणिक कथांच्या जंजाळातच अडकून पडावे लागले असते. मनोरंजन हाच प्रमुख हेतू नजरेसमोर असल्याने कादंबरीकार काय किंवा हल्लीचे सीरिअल्सवाले काय, ते काल्पनिक इमले उभे करण्यात माहीर आहेत. समजा एखाद्या व्यक्तीच्या {स्त्री वा पुरुष पात्र} अतिरंजीत घटनांचे वा अतर्क्य घडामोडीचे 'मसाला' करण केले गेले आणि त्यावर समाजात वादंग निर्माण झाले तर ते त्याना हवेच असते....कारण ? तशा चर्चांमुळे टीआरपी आपसूकच वधारतो आणि कालपर्यंत ज्या मालिकेला हजार प्रेक्षक होते, तर वादाला तोंड फुटल्यामुळे तिला आता एक लाख प्रेक्षक मिळतात. जाहिरातीचे दरही टीआरपीवर असल्याने त्याचा इंडेक्स फुगतो, मग निर्माताही खूषच. असला सगळा पोरकटपण आजकालच्या 'ऐतिहासिक' मालिकांमधून बोकाळला असल्याने तिकडे दुर्लक्ष करणे इतपतच आपल्या हाती असते.

@ गामा पैलवान ~ नवीन लेखात त्याबद्दल जरूर उल्लेख करतो.

सर्वांना धन्यवाद

अशोक पाटील

शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयी ज्या प्रतिक्रिया आहेत त्यात सकवार बाईंचे नाव घेतले आहे, म्हणून संभ्रम निर्माण झाला होता. खुलाशाबद्दल धन्यवाद.
थोर पुरुषांच्या आकस्मिक मृत्यूबाबत खंत वाटते हे मात्र खर. सवाई माधवराव जगले असते तर पेशवाईचा इतिहास बदलला असता असं अजूनही म्हटलं जात.

सोयराबाई नक्की कशा होत्या? मी मराठी वर शिवाजी राजांवर जी मालिका होती त्यात त्या अत्यंत चांगल्या दाखवल्या होत्या. माझ्या आजीच्या गोष्टीत त्या सावत्र होत्या. एका हिंदी चानेल वर शिवाजीची एंक नवीन मालिका चालू आहे, त्यातले १/२ भाग बघितले होते, शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी. त्यात त्या अत्यंत कावेबाज दाखवल्या आहेत. ( त्या हिंदी मालिके विषयी बर्याच उलट सुलट गोष्टी वाचनात आल्या आहेत, त्यात इतिहास स्वताच्या सोयीने दाखवला जातोय आणि ती बंद करा असाही वाचल होत, अजून ती मालिका चालू आहे किंवा नाही माहित नाही.)

शाळेत शिकवलं जाणार इतिहासच पुस्तक बर्याच मुलांना कंटाळवाण वाटत. अशोकजी, तुमच्या सारखं जर ते लिहील तर नक्कीच इतिहास आवडायला लागेल.

हल्लीचे सीरिअल्सवाले काय, ते काल्पनिक इमले उभे करण्यात माहीर आहेत. ऐतिहासिक मालिकांचं चित्रिकरण करतांना एकंदरीतच खर्च खूप येतो. त्यांतही जंगी लढाया वगैरेंचं वेगवान चित्रिकरण आणखी खर्चिक.. त्यामुळेच हे सिरियलवाले युद्धाचे प्रसंग आटोपते घेऊन घरगुती प्रसंग ताणायला घेतात.. थोरल्या बाजीरावांच्या आयुष्यातील मोठा भाग त्यांचा राज्यकारभार व युद्धभूमीशी निगडीत आहे, पण मालिकांद्वारे मस्तानी प्रकरण उगाळून इतकं माथी मारलं जातं की ज्यांना इतिहासाची आवड नाही/ वाचलेला नाही त्यांच्या मनांत थोरल्या बाजीरावांबद्दल वेगळीच प्रतिमा तयार होते.

अतिशय माहितीपूर्ण व इतिहासाबद्दल आवड निर्माण करणारा लेख! अजून माहिती द्या प्लीजच.

अवांतर : प्रतिसादाच्या ओघात वर अलेक्झांडर, सीझर, नेपोलियन आदींचे उल्लेख आले असल्याने आता अशा ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या तथाकथित गूढ मृत्यूंच्या कहाण्यावर इथे एक स्वतंत्र लेख लिहावा असे मनी आले आहे.]

>>>>>>> जरूर लिहा अशोकजी. या लेखाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

तुम्हाला आधीच इतक्या जणांनी सांगितलंच आहे त्यात माझीही भर.. अतिशय उत्तम, संयत आणि माहीतीपुर्ण लेख व तुमच्या प्रतिक्रिया. Happy

सुंदर लेखनशैली आणि माहितीपूर्ण लेख. इतिहास न आवडणार्‍यांना देखिल खिळवून ठेवणारं लेखन आहे तुमचं Happy
कादंबरीकारांना इतिहास रंजक करण्यासाठी काल्पनिक गोष्टींचा आधार घ्यावा लागतो, तुम्ही मात्र वास्तवही तितक्याच रंजकपणे मांडलयं..........

@ पद्मा ~ त्या हिंदी टीव्ही सीरिअलबद्दल मी वाचले होते. पण आजकाल आपल्या सोयीसाठी इतिहासाची मोडतोड करण्याचे खूळ इतके बोकाळले आहे की तो पटकथाकार रोजचे लिखाण 'एकता कपूर' सम निर्मातीला/निर्मात्याला दाखविल्याशिवाय फायनल करीतच नाही. कारण निर्मात्याला नक्की माहीत असते की कसला मसाला इतिहासात मिसळला पाहिजे. वर एका प्रतिसादात श्री.हेम यानी या संदर्भात योग्य मत व्यक्त केले आहे की, ऐतिहासिक घटना दाखविताना टीव्हीवर युद्धाचे प्रसंग तर दाखविता येत नाही [आर्थिक कारण] मग त्यांचा नुसता पुसटसा उल्लेख; व नंतर त्यावर जणूकाय माजघरात वा सोप्यावर बसून गप्पा मारल्यासारखे पात्रांचे अत्यंत नाटकी संवाद. झाला एपिसोड. असे सारे असल्याने मेंदू कुलुपबंद करूनच असल्या मालिका पाहाव्यात [पाहूच नये खरे तर.]

@ हेम ~ धन्यवाद. तुमच्या मताशी १००% सहमत आहे.

@ टोकूरिका, चिंगी, अंबरीष ~ प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
@ काया ~ "रंजन" हे एखादी कलाकृती, मग ती ऐतिहासिक असो वा सामाजिक, यशस्वी करण्यासाठीचा सर्वमान्य मानदंड असला पाहिजे असे पुस्तक प्रकाशित करणार्‍या संस्थांचा असल्याने ते 'लेखक जे लिहितो अगदी तसेच छापेल" असे कधीच नसते. सर्वश्री.श्री.पु.भागवत, राम पटवर्धन या सारखे दिग्गज संपादक आपल्या लेखकांना {त्यात मराठी साहित्यात अगदी प्रतिष्ठित म्हटले लेखकही आलेच} नेहमी सूचना, त्याही लेखी स्वरूपात, देत. पु.ल.देशपांडे यांच्यासारख्या 'महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वा' चे आणि प्रकाशक रा.ज.देशमुख यांच्यादरम्यानचा अनुभवही बोलका आहे. त्यामुळे साहजिकच एखाद्या पौराणिक वा ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर 'कादंबरी' लिहायची झाल्यास त्यात 'रंजनमूल्य' किती आहे याचा लेखाजोखा अगोदर काढला जातोच. [प्रकाशन हा एक धंदा असल्याने ही बाब अगदीच गैर आहे असेही नाही.]

इतिहासातील 'वास्तव' ही रंजकतेने मांडले जाऊ शकते. केवळ रुक्षपणे इतिहासातील घटनाक्रम देत राहिल्यानेच क्रमिक पुस्तकातील इतिहास वाचताना विद्यार्थीवर्ग त्या विषयाकडे आकर्षित होत नाही. [त्यातही प्राथमिक शाळेत इतिहास शिकविणार्‍या शिक्षकांना त्यात किती स्वारस्य असते हादेखील एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. विद्यापीठ पातळीवरील प्राध्यापकांनाही 'सिलॅबस' च्या बाहेर जाऊन काहीतरी ज्यादाची माहिती तो विषय 'स्पेशल' ला घेणार्‍यांना द्यावी असेही वाटत नाही.

थोरल्या बाजीरावांना कर्ज देणार्‍या तीस सावकारांपैकी एक होते बारामतीचे 'बाबूजी जोशी-नाईक'. आपल्या संपत्तीच्या जोरावर त्यानी थेट शाहू छत्रपतींनाही वित्त पुरवठा केला होता व त्या जोरावरच बाजीरावांच्या मृत्युनंतर "मला पेशवेपद मिळावे' अशी या सावकाराने शाहूंच्याकडे रघुजी भोसल्यांमार्फत मागणी केली होती. ती अर्थातच पुरी झाली नाही, म्हणून नंतर या सावकाराने नानासाहेबांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला होता. आता या बाबूजी जोश्याविषयी मी एका ज्येष्ठ म्हटल्या जाणार्‍या प्राध्यापक मित्राकडे चौकशी केली असता त्यानी जणू काही ते नाव पहिल्यांदाच ऐकत असल्यासारखा चेहरा केला. म्हणजे ते शिकलेल्या इतिहासाच्या सिलॅबसमध्ये बाबूजी जोशी-नाईक हे नाव नव्हतेच असा याचा अर्थ. इतिहासाची 'आवड' निर्माण झाली की मग ही छोटी छोटी रंजक ठिकाणे आपल्याला सापडतात. ]

धन्यवाद.

अशोक पाटील

अशोकराव सुंदर लेख आहे. प्रतिक्रीयाही तितक्याच मोलाच्या आहेत.

ऐतिहासीक कादंबर्‍या अतिरंजीत असल्या तरीही जनसामान्यांना इतिहासाची गोडी लावण्याचे महत्वाचे काम त्या बजावतात म्हणून त्यांचे महत्व आहे. शाळेत असताना आमच्या बाई आम्हाला इतिहासाचे पाठ्यपुस्तक निव्वळ वाचून दाखवायच्या - तेदेखील एकसुरात. आवाजात कधीच कुठली भावना नसायची. अशा अवस्थेतही शिवाजी महाराज मनात रुतून बसले पण बाकीचे नायक मात्र मार्कांपुरतेच अभ्यासले गेले माझ्याकडून. इतिहास हा कंटाळवाणा नसतो आणि तोच आपल्या मुळाशी असतो ही जाणीव 'स्वामी'मुळेच झाली. त्यामुळे ऐतिहासीक कादंबर्‍या ह्या मला तरी काही प्रमाणात महत्वाच्या वाटतात. अर्थात काही जण कादंबर्‍यांनाच इतिहास समजू लागतात तसे मात्र होऊ नये.

अशोककाका , लेख खुप आवडला.प्रतिक्रिया एकत्र केल्या तर आणखी एक लेख झाला असता खर तर. Happy

सेनापती मस्त माहिती.

"ऐतिहासीक कादंबर्‍या अतिरंजीत असल्या तरीही जनसामान्यांना इतिहासाची गोडी लावण्याचे महत्वाचे काम त्या बजावतात म्हणून त्यांचे महत्व आहे."

~ अगदी अगदी माधवराव ! नेमके हेच मी माझ्या येथील एका प्रतिसादात प्रतिपादन केल्याचे तुम्हाला वाचायला मिळेल. मी स्वतः अगदी नाथ माधव, हडप, दातार, दांडेकर [आणि पुरंदरेही] वाचत वाचतच मोठा झालो आहे. या विलक्षण क्षमतेच्या किमयागारांनी त्यांच्या शब्दभांडाराची केलेली मुक्त उधळण आजही तितकीच स्मरते आणि पुढील पिढीतील रणजित देसाई, शिवाजी सावंत, ना.सं. इनामदार आणि आजच्या विश्वास पाटलांनी त्यात पुनश्च भर घातली हे निर्विवादपणे मान्य केलेच पाहिजे.

शाळेत "शर आला तो धावुनी आला काळ" आणि "शिवाजीने अफझलखानाचा प्रतापगडावर कोथळा बाहेर काढला" हे दोन्ही प्रसंग एकाच सुरात आणि पट्टीत शिकविणारे शिक्षक लाभले असल्याने त्या वयात इतिहासाविषयी प्रेम वा उत्सुकता वाटणेच शक्य नव्हते. लोकमान्य टिळकांनी 'शिवजयंती' आणि "सार्वजनिक गणेशोत्सव" चालू केले म्हणून तर त्यावेळेच्या विद्यार्थ्यांमध्ये 'शाळेबाहेरील शिवाजी' जाणून घेण्याची उर्मी पैदा झाली हेही सत्यच.

पण प्रौढ वयात पदार्पण केल्यानंतरही दर्यासारंग आणि सावळ्या तांडेल यांच्या कहाण्यात गुरफटून घेणे ठीक नसते. त्यातून बाहेर पडून सत्यासत्येचे भिंग लेवून इतिहासाकडे पाहिल्यास ती शोधयात्रा अजूनही प्रभावी होते. असे झाले की, इतिहासात अमुक एकच गलिव्हर आणि त्याच्याभोवतालचे सारे लिलिपुटीयन्स अशी स्थिती राहत नाही, सर्वांना सम न्याय व स्थान मिळत जाते.

@ सीमा : धन्यवाद. तुम्ही 'प्रतिक्रियां" बद्दल व्यक्त केलेले मत छानच आहे.

अशोक पाटील

निवांत वाचावा म्हणून या लेखाचा दुवा फेवरिट मध्ये सेव्ह केलेला होता.
सर्व प्रतिसादांसह संपुर्ण लेख अशी काही माहीती देऊन गेलाय की असं वाटतंय आता कुणि इतिहासाचा पेपर लिहायला बसवलं तर चांगले मार्क पडतील.
इतिहासम, ना. शास्त्र, भूगोल हे विषय शाळेत असताना दुय्यम ठरतात.. पण त्यांच्यात इतका गोडवा आहे हे शाळा सुटून इतकी वर्ष झाल्यावर प्रकर्षाने जाणवलं ते निव्वळ तुमच्या लेखामुळे. Happy
अनेक धन्यवाद मामाजी. Happy

तुमच्या मुळे इथल्या लोकांचा इतिहास पक्का होणार यात काडीमात्रं शंका नाही. Happy

<<कुठेही जरासे खुट्ट झाले की दहावीस रिकामटेकडे "टु किल द टाईम" साठी एकत्र येत, पानाच्या चंच्या सुटत, सुपारींची देवाणघेवाण होई, मग नाक्यानाक्यावर असलेल्या पारावर शेषशाई नागावर पहुडल्यागत पिचकार्‍या टाकत गप्पा हाणत बसत. >> हे अगदी तेव्हाच्या माबोचं वर्णन करताय तुम्ही >> वरदा हे तेव्हाच्याच काय? आजच्या माबोला सुद्धा फिट्ट बसेल असंच वर्णन आहे. Wink Proud

असो, पण कोणत्या तरी मुद्यावर साधक-बाधक चर्चा, वाद न घालता... चाललेली पाहून मला भरून आले आहे.

या धाग्याची दृष्ट काढा रे कुणितरी.. Proud

आणि # च्या येथे 'तटस्थपणे' हा शब्द लिहायची परवानगी द्या !! >>> चारुदत्त, मी ही विनंती अशोककाकांना केलीय. अशोककाका लिहीणार म्हणजे ’तटस्थपणे’ हा शब्द स्वतंत्रपणे पुन्हा लिहायची आवश्यकताच नाहीये मुळी. Happy

अशोकराव.. खरच फार छान माहिती..

मला दुसर्‍या बाजिराव पेशव्यां बद्दल वाचायला आवडेल.. ते पळपूटे होते अस म्हणतात पण झाशीच्या राणी संदर्भात .. ते झाशीच्या राणीला आपली मुलगीच मानायचे किंवा त्यांचा खूप जिव होता तिच्यावर वगैरे ... मग झाशीची राणी घडायला ते पण कुठेतरी कारणीभूत असतीलच ना... म्हणजे तिच्यावरचे संस्कार किंवा तिचं व्यक्तिमत्व.. अर्थात तिच्यामागे तिच्या वडिलांचाच जास्त सहभाग आहे तरीही . . .

मग ते खरच कसे होते? मला असलेल ज्ञान फारचं कमी आहे म्हणून तुम्हालाच विचाराव म्हणलं

मी जेवढं वाचन केलंय त्याच्या अनुसार दुसरे बाजीराव पेशवे पळपुटे नव्हते तर परिस्थितीने हतबल झाले होते. इंग्रजांनी मराठी सत्तेवर फास आवळत आणले होते आणि त्यांना इतर कुणाकडूनही पाठींबा मिळत नव्हता.
अशोकजी अधिक प्रकाश टाकतीलच.

Pages