राधाबाई, गोपिकाबाई, काशीबाई, अन्नपूर्णा, पार्वती, रमा, आनंदी

Submitted by अशोक. on 21 February, 2012 - 13:19

श्री.सेनापती यांच्या 'पानिपत' धाग्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादांनंतर नक्की जाणवले की मायबोलीच्याच सदस्यांना नव्हे तर ज्या काही बाहेरील लोकाना [जे टंकलेखन येत नाही म्हणून कोणत्याच संस्थळाचे सदस्य झालेले नाहीत] मी तो धागा वाचण्याचा आग्रह केला होता, त्यानीही या विषयाची व्याप्ती तसेच आजच्या जेट नव्हे तर नेट युगातही इतिहासाविषयी विविध वयोगटातील लोक (यात स्त्री/पुरुष दोन्ही आले) किती आस्था बाळगून आहेत हे पाहिल्यावर माझ्याजवळ समाधान व्यक्त केले असून इथून पुढेही हे लोक मायबोलीवर 'पाहुणे' या नात्याने वाचनमात्र का होईना, पण सतत येत राहतील.

"पानिपत" चा इतिहास आपण तपासला, पराभव कारणमीमांसेचेही विश्लेषण केले. या गोष्टी अजूनही व्यापकरित्या या पुढे चालत राहणार आहेत, त्याला कारण म्हणजे आपल्या लोकांच्या हृदयात शिवाजीराजांचे विजय जितक्या अभिमानाने वसले आहेत, तितक्याच तीव्रतेने पानिपत पराभवाचा 'सल'. हे लक्षण मानवी स्वभावाच्या जिवंतपणाची खूण आहे. ब्रिटिशांनी या महाकाय देशावर दीडशे वर्षे राज्य केले हा डाग आपण पुसून टाकू म्हटले तर 'काळ' तसे ते करू देत नाही. उलटपक्षी तो आपल्याला त्यातून 'तेज' प्रदान करतो आणि एकीच्या बळाचे महत्व किती प्रत्ययकारी होऊ शकतो हे स्वातंत्र्यलढ्यादरम्यान घडलेल्या विविध उदाहरणातून विशद करतो.

विजयातून उन्मत्त होऊ नये हे जसे एक सत्य आहे तितकेच पराभावातूनही नाऊमेद होऊ नये असेही शास्त्र सांगते. त्या शास्त्राच्या आधारेच रणातून परतणार्‍या वीरांच्या शारीरिक तसेच मानसिक जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करणारी प्रमुख व्यक्ती कोण असेल तर ती घरातील 'स्त्री'. पानिपतावरून पुण्यात परतलेल्या त्या शतशः विदीर्ण झालेल्या उरल्यासुरल्या सरदांराना आणि सैन्यांना पुढील वाटचालीसाठी स्त्री वर्गाकडूनच "उद्याचा सूर्य आशा घेऊन येईल" अशा धर्तीचा सहारा मिळाला असणार, कारण त्यानंतरही श्रीमंत माधवराव पेशव्यांनी अल्पकाळाच्या कारकिर्दीत मराठी सत्तेवर अबदालीने पाडलेला तो डाग काही प्रमाणात सुसह्य केला, हा इतिहास आहे. माधवरावांना रमाबाईची जशी सुयोग्य आणि समर्थ अशी साथ मिळाली, त्याबद्दल आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने वाचलेले असते. त्याला अर्थातच कारण म्हणजे रणजित देसाई यांची 'स्वामी' हे कादंबरी. या कादंबरीच्या यशाची चिकित्सा इथे करण्याचे प्रयोजन नसून या ललितकृतीने मराठी मनाला इतिहासाची गोडी लावली हे निखळ सत्य आहे.

१९६२ ते २०१२ ~ बरोबर ५० वर्षे झाली 'स्वामी' ला आणि त्या प्रकाशन वर्षापासून आजच्या तारखेलाही आपण 'पानिपत' या विषयावर भरभरून लिहितो आणि वाचतो ही बाब या वेगवान युगातही आपण त्या काळाशी किती घट्ट बांधलो गेलो आहे याचे द्योतक आहे.

या निमित्ताने काही सदस्यांनी अशीही एक प्रतिसादातून/विचारपूसमधून सूचना केली की, पेशवाईतील 'रमा' सारख्या सर्वच स्त्रियांची माहिती आपल्याला इथल्या चर्चेतून मिळाली तर वाचनाचा एक भरीव आनंद घेता येईल. त्यासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. इथे त्या स्त्रियांविषयी काही लिहिण्याच्या अगोदर आपलाच इतिहास नव्हे तर अगदी पौराणिक काळापासून "स्त्री' स्थानाचा त्या त्या घटनेतील सहभाग याचा मागोवा घेत गेल्यास असे दिसते की, 'रामायण = सीता", "महाभारत = द्रौपदी", "कृष्णयुग = राधा". ही प्रमुख नावे. पण यांच्याशिवायही अनेक स्त्रियांनी दोन्ही पक्षांकडून त्या काळात आपली नावे कोरलेली असतात, भले ती या तीन नायिकेंच्या तोडीची नसतील. तीच गोष्ट इतिहासाची. सध्यातरी आपल्या महाराष्ट्राचा इतिहास या मर्यादेतच विचार केल्यास शिवाजी आणि जीजाऊ ही मायलेकराची जोडी समोर येते. सईबाई आणि सोयराबाई या त्यांच्या दोन बायकांची नावे मराठी वाचकाला का माहीत आहेत तर त्या अनुक्रमे संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या माता म्हणून. पण शिवाजीराजे ज्यावेळी अफझलखान याच्या 'प्रतापगड' भेटीसाठी तयारी करीत होते त्यावेळी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आजारपणामुळे त्रस्त झालेल्या सईबाईना देवाज्ञा झाली होती हेही ज्ञात नसते. निदान सईबाई ह्या संभाजीराजेची जन्मदात्री म्हणून किमान नाव तरी माहीत आहे, पण 'पुतळाबाई' ज्या महाराजांच्या शवाबरोबर 'सती' गेल्या त्यांच्याविषयी तरी किती खोलवर आपण जाणून घेतले आहे ? हा प्रश्न स्वतःलाच विचारला तर आपली पाटी त्याबाबत कोरी आहे असे दिसून येते. ह्या तिघींशिवायही "लक्ष्मी", "काशी", "सगुणा", "गुणवंती" आणि "सकवार" अशा ज्या पाच स्त्रिया राजाना पत्नी म्हणून होत्या त्यांचे महाराजांच्या निर्वाणानंतर काय झाले असेल ? इतिहासात त्यांच्याविषयी काय कसल्या आणि किती नोंदी असतील ? सईबाईचे लग्नाच्यावेळी वय होते ७ [महाराज होते ११ वर्षाचे], मग याच न्यायाने अन्यही त्याच वा त्याच्या आगेमागे वयाच्या असणार हेही नक्की. याना मुलेबाळे झाली असतील का ? असतील तर त्यांचे मराठा साम्राज्य विस्तारात किती भाग होता ?

इतिहासाने अशा व्यक्तींचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाठपुरावा केलेला आहे की ज्यांची मुद्रा या राज्याच्या जडणघडणीत [मग ती उजवी असो वा डावी] उमटलेली आहे. पण एक भावुक इतिहासप्रेमी या नात्याने कधीकधी [विशेषतः इतिहासाच्या विविध कोठडीतून त्या काळाचा पाठपुरावा करतेसमयी] मनी कुठेतरी इतिहासात दुय्यम स्थान प्राप्त झालेल्या 'स्त्रियां' च्या विषयी कुतूहल जागृत होते. वाटते, असेल का एखादे एच.जी.वेल्सच्या कल्पनेतील "टाईम मशिन', ज्याचा उपयोग करून त्या काळात सदेह जावे आणि म्हणजे मग अशा विस्मृतीत गेलेल्या स्त्रियांचा मागोवा घेता येईल.

पण वेल्सने कादंबरीरुपाने मांडलेली ती "काल-प्रवासा"ची कल्पना अजून तरी कागदोपत्रीच राहिली असल्याने अभ्यासासाठी जी काही ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत त्यांच्या आधारेच "पेशवाईतील स्त्रिया" ना आपण इथे चर्चेसाठी पटलावर आणू आणि त्या अनुषंगाने त्या त्या पुरुषासमवेत त्यांच्या अर्धांगिनींने इतिहासात दिलेल्या साथीचे अवलोकन केल्यास तो वाचन-आनंद सर्वांना भावेल अशी आशा आहे.

छत्रपतींच्या कारकिर्दीत पेशवेपद भूषविणारे मोरोपंत पिंगळे यांच्यापासून ते बहिरोजी पिंगळे यांच्यापर्यंत त्यांच्या कामकाजांचे स्वरूप 'महाराजांचे प्रशासनातील उजवे हात' अशा पद्धतीचे होते. शाहू छत्रपतींनी सातार्‍याला प्रयाण करून राज्याची सर्वबाबतीतील जबाबदारीची मुखत्यारपत्रे पेशव्यांना दिली आणि त्या जागी बाळाजी विश्वनाथ भटांची नेमणूक केल्यावर खर्‍या अर्थाने 'पेशवे' हेच मराठा राज्याची सर्वार्थाने धुरा वाहू लागले. त्यामुळे या पदावर आरुढ झालेल्या पुरुषांबरोबर त्यांच्या स्त्रियांही अधिकृतरित्या राज्यकारभारात विशेष लक्ष घालू लागल्याचे दाखले आपल्याला सापडतात. म्हणून आपण थेट पहिल्या पेशव्यांच्या घरापासून लेखाची सुरूवात करू या.

१. राधाबाई
बाळाजी विश्वनाथ यांची पत्नी. ज्यांच्याकडे स्वतंत्र अर्थाने 'प्रथम पेशवेपत्नी' या पदाचा मान जाईल. बर्वे घराण्यातील राधाबाई यानी थेट राज्यकारभारात भाग घेतला असेल की नाही यावर दुमत होऊ शकेल पण त्यांचे पेशव्यांच्या इतिहासात नाव राहिल ते त्या "बाजीराव" आणि "चिमाजीअप्पा" या कमालीच्या शूरवीरांच्या मातोश्री म्हणून. राधाबाईना दोन मुलीही झाल्या. १. भिऊबाई, जिचा बारामतीच्या आबाजी जोशी यांच्याशी विवाह झाला तर २. अनुबाई हिचा विवाह पेशव्यांचे एक सरदार व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला. घोरपडे घराणे हे इचलकरंजीचे जहागिरदार होते. आजही त्यांचे वंशज या गावात आहेत.

२. काशीबाई
थोरल्या बाजीरावांची पत्नी. बाळाजी [जे पुढे नानासाहेब पेशवे या नावाने प्रसिद्ध झाले] आणि रघुनाथराव [अर्थातच 'राघोभरारी'] ही दोन अपत्ये. काशीबाई यांची सवत म्हणजेच 'मस्तानी'. बाजीरावापासून मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव प्रथम त्या जोडप्याने 'कृष्ण' असे ठेवले होते. पण बाजीराव कितीही पराक्रमी असले तरी या तशा अनैतिक संबंधातून [ब्राह्मण+मुस्लिम] जन्माला आलेल्या मुलाला 'ब्राह्मणीखूण जानवे' घालण्याची बाजीरावाची मागणी पुण्याच्या सनातनी ब्रह्मवृंदाने फेटाळली होती. त्याला अर्थातच पाठिंबा होता तो राधाबाई आणि बंधू चिमाजीअप्पा यांचा. युद्धभूमीवर 'सिंह' असलेले बाजीराव घरातील पेचप्रसंगासमोर झुकले आणि मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव 'समशेरबहाद्दर' असे ठेवण्यात आले.

मात्र मस्तानीच्या मृत्युनंतर काशीबाई यानीच समशेरबहाद्दरचे आईच्या ममतेने पालनपोषण केले आणि त्याला एक समर्थ योद्धाही बनविले. वयाच्या २७ व्या वर्षी पानिपतच्या त्या युद्धात समशेरही भाऊ आणि विश्वासराव यांच्यासमवेत वीरगती प्राप्त करता झाला. [समशेरचा निकाह एका मुस्लिम युवतीशीच झाला आणि त्यापासून अली समशेर हे अपत्यही. पेशव्यांनी बाजीरावाची ही आठवण जपली, पण अलीला बुंदेलखंड प्रांतातील जहागीरव्यवस्था देऊन. बाजीराव मस्तानीचा हा वंश पुढे कसा फुलला की खुंटला याची इतिहासात नोंद असेलही पण त्याकडे कुणी खोलवर लक्षही दिलेले दिसत नाही.]

३. अन्नपूर्णाबाई
या बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजीआप्पा यांच्या पत्नी. [आपण नेहमी बाजीरावांच्या पराक्रमाच्या शौर्याच्या आणि विजयाच्या कथा वाचत असतो, चर्चा करीत असतो, पण वास्तविक चिमाजीअप्पा हे या बाबतीत थोरल्या बंधूंच्या बरोबरीनेच रण गाजवित होते. अवघे ३३ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या वीरावर स्वतंत्र धागा इथे देणे फार गरजेचे आहे.] ~~ चिमाजी आणि अन्नपूर्णाबाई यांचे चिरंजीव म्हणजेच पानिपत युद्धातील ज्येष्ठ नाव 'सदाशिव' = सदाशिवरावभाऊ पेशवे.

चिमाजीरावांना सीताबाई नावाची आणखीन एक पत्नी होती. पण अपत्य मात्र एकच - सदाशिवराव. चिमाजी पानिपत काळात हयात नव्हते आणि ज्यावेळी सदाशिवरावांनाही अवघ्या ३० व्या वर्षी पानिपत संग्रामात वीरमरण आले त्यावेळी अन्नपूर्णाबाई आणि सीताबाई या हयात होत्या की नाही याविषयी इतिहास मौन बाळगून आहे.

४. गोपिकाबाई
पेशवाई काळातील सर्वार्थाने ज्येष्ठ असे स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे गोपिकाबाई. बाजीरावांची सून आणि नानासाहेब पेशव्यांची पत्नी. सरदार रास्ते घराण्यातील या मुलीकडे राधाबाईंचे लक्ष गेले ते तिच्या देवपूजा, परिपाठ, संस्कार आणि बुद्धीमत्ता या गुणांमुळे. बाळाजीसाठी हीच कन्या पत्नी म्हणून पेशवे घराण्यात आणायची हा विचार तिथेच पक्का झाला होता. गोपिकाबाईनीही तो विश्वास सार्थ ठरविला होता आणि नानासाहेब पेशवेपदावर आरुढ झाल्यावर मराठा राज्यकारभार आणि विविध मसलतीत प्रत्यक्ष भाग घेणारी पहिली "पेशवीण" ठरली.

नानासाहेब "पेशवे' झाल्यापासून गोपिकाबाईंनी आपल्या राजकारणाची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. नानांच्या त्या अंतर्गत सल्लागार जशा होत्या तशाच आपल्या परिवारातील कोणतीही अन्य स्त्री आपल्यपेक्षा वरचढ होणार नाही याकडेही त्या लक्ष देत असल्याने पेशवाईतील प्रमुख सरदार आणि अमात्य मंडळींशी त्या मिळूनमिसळून वागत. राघोबादादा हे नात्याने त्यांचे धाकटे दीर. ते आपल्या पराक्रमाने मराठा राज्यातील आघाडीचे वीर गणले जात असत, त्यामुळे त्यांची पत्नी 'आनंदीबाई' यांच्या महत्वाकांक्षेला आणखीन धुमारे फुटू नयेत याबाबत गोपिकाबाई दक्ष असत. तीच गोष्ट सदाशिवराव [चिमाजी पुत्र] भाऊंची पत्नी 'पार्वतीबाई' हिच्याबाबतही.

पार्वतीबाई यांच्याशी गोपिकाबाईंची अंतर्गत तेढ वाढण्याचे कारण झाले 'विश्वासराव'. नानासाहेब आणि गोपिकाबाईंचे हे चिरंजीव पुढे भावी पेशवे होणार होते. सरदार गुप्ते हे नाशिक प्रांताचे त्यावेळेचे जहागिरदार आणि त्यांच्याच घराण्यातील 'पार्वतीबाई' या त्यावेळी सातार्‍यात होत्या, त्यांच्याकडे गुप्त्यांची कन्या "राधिका" मुक्कामास आली होती. शाहू छत्रपतीही तिथेच वास्तव्याला असल्याने त्यानी तिला [राधिकेला] पाहिले होते व नानासाहेबांना सुचवून गुप्ते घराण्यातील हीच 'राधिका' भावी पेशवीणबाई म्हणून निश्चित केली होती. हा नातेसंबंध गोपिकाबाईना रुचला नव्हता; पण छत्रपतींच्या इच्छेपुढे नानासाहेब नकार देऊच शकत नव्हते. साखरपुडा झाला आणि पुढे त्याचवेळी पानिपताच्या तयारीत सारेच लागल्याने विश्वासरावांचे लग्न लांबणीवर पडले. विश्वासराव त्यात मारले गेले हा इतिहास सर्वश्रुत असल्याने त्याविषयी न लिहिता सांगत आहे की, लग्न न होताच ती १६ वर्षाची राधिका 'विधवा' झाली आणि पुढील सारे आयुष्य तिने विश्वासरावाच्या आठवणीतच गंगानदी काठच्या आश्रमात 'योगिनी' म्हणून व्यतीत केले. [राधिकाबाई सन १७९८ मध्ये अनंतात हरिद्वार इथेच अनंतात विलीन झाल्या.]

या करुण कहाणीचा आपल्या मनावर प्रभाव पडून आपण व्यथित होऊ; पण गोपिकाबाईने 'राधिका' ला आपल्या मुलाचा 'काळ' या नजरेतूनच सातत्याने पाहिले. मुळात त्यांना ती होऊ घातलेली सोयरिक पसंत नव्हतीच म्हणून लग्न जितक्या लांब टाकता येईल तितके ते टाकावे म्हणून नवर्‍यापुढे हट्टाने सदाशिवरावांच्यासमवेत विश्वासरावाला पानिपत युद्धात सहभागी करून घेण्याची मागणी पूर्ण करून घेतली. सार्‍या मराठेशाहीलाच 'पानिपत युद्धात भाऊंचे सैन्य अबदाली आणि नजीबला खडे चारणार' याची खात्री असल्याने विजयाचे सारे श्रेय 'सदाशिवरावा' ला न मिळता त्यातील मोठा हिस्सा 'विश्वासरावा'च्या पारडीत पडावा आणि छत्रपतींनी पुढचे पेशवे म्हणून सदाशिवरावांऐवजी विश्वासराव यालाच वस्त्रे द्यावीत अशीही गोपिकाबाईची चाल होती.

पण पानिपताचे दान उलटे पडले. जे सदाशिवराव डोळ्यात सलत होते ते तर गेलेच पण ज्याच्याबाबत भव्यदिव्य स्वप्ने मनी रचली तो 'विश्वास' ही कायमचा गेला. मग प्रथेप्रमाणे त्या 'भोगाला' कुणीतरी कारणीभूत आहे म्हणून कुणाकडेतरी बोट दाखवावे लागते. 'राधिका' च्या रुपात गोपिकाबाईंना ते ठिकाण सापडले आणि हिच्यामुळेच माझा मुलगा गेला हा समज अखेरपर्यंत त्यानी मनी जोपासला.

गोपिकाबाईंचे दुर्दैव इतके मोठे की, त्याना त्यांच्या हयातीतच पूर्ण वाढ झालेल्या आपल्या तिन्ही मुलांचे मृत्यू पाहणे नशिबी आले. विश्वासराव पानिपतावर धारातिर्थी पडले, दुसरे चिरंजीव माधवराव नि:संशय कर्तबगार झाले आणि पानिपताचे दु:ख आपल्या पराक्रमाने त्यानी कमी तर केलेच पण मुलूखगिरीही नावाजण्यासारखीच केली. राघोबादादा, सखारामपंत बोकिल, रास्ते यांच्या महत्वाकांक्षेला लगाम घातला. रमा समवेत संसारही छानपैकी चालणार, फुलणार असे वाटत असतानाच क्षयाने त्याना गाठले व त्यांचाही मृत्यू पाहण्याचा प्रसंग गोपिकाबाईंवर आला. तर तिसर्‍या मुलाचा - नारायणराव - याचाही पुण्यात अगदी डोळ्यासमोर शनिवारवाड्यात झालेला वध.

पती नानासाहेब तर पानिपताच्या धक्क्यानेच स्वर्गवासी झाले होते आणि एकापाठोपाठ ही तिन्ही मुलेही गेल्याचे जिच्या कपाळी आले ती बाई भ्रमिष्ट झाली नसेल तर ते आश्चर्यच मानावे लागले असते. नारायणरावांच्या खूनानंतर गोपिकाबाईनी पुणे कायमचे सोडले आणि त्या नाशिकच्या आश्रमात येऊन दारोदारी भिक्षा मागून आपली गुजराण करू लागल्या. पण तिथेही त्यांच्या अंगातील जुना पिळ गेला नव्हता कारण भिक्षा मागताना ती त्या फक्त नाशिकातील सरदार घराण्यातील स्त्रियांकडून स्वीकारीत असत. एकदा अशाच फिरतीवर एका वाड्यासमोर आल्या आणि भिक्षेसाठी दिंडी दरवाजावरील घंटा वाजविली असता भिक्षेसाठी आलेल्या स्त्रीला पाहून वाड्यातून दुसरी एक स्त्री भिक्षा घेऊन आली. ती नेमकी होती सरदार गुप्ते यांची 'योगिनी' कन्या राधिका, जी हरिद्वार इथून एक जथ्थ्यासमवेत तीर्थयात्रेवर नाशिकला आली असता सरदार गुप्त्यांनी तिला आपल्या वाड्यावर काही दिवसासाठी आणले होते.

पण दरवाजात भिक्षा घेऊन आलेल्या राधिकेला पाहिल्यावर गोपिकाबाई संतापाने किंचाळू लागल्या. पतीनिधन आणि तीन मुलांचा अंत यामुळे झालेल्या अनावर दु:खाचा तो उद्रेक त्यानी राधिकेवर काढला. आजुबाजूच्या सरदारदरकदारांनी आणि स्त्रियांनी त्याना कसेबसे शांत करून पुन:श्च गोदावरी आश्रमात त्याना पोचते केले. ही घटना जुलै १७७८ मधील....आणि राधिकेचे झालेले 'अशुभ दर्शन' म्हणून प्रायश्चित घेणे गरजेचे आहे अशा भावनेतून गोपिकाबाईनी तिथे गोदावरी घाटावरच उपोषण चालू ठेवले आणि त्यातच त्यांचा ११ ऑगस्ट १७७८ मध्ये अंत झाला. ज्या राधिकेला पाहिले म्हणून त्यानी मृत्युला जवळ केले त्या राधिकेनेच या कधीही न झालेल्या 'सासू' वर गोदेकाठी अंत्यसंस्कार केले.

५. पार्वतीबाई
सदाशिवराव भाऊंची पत्नी; पानिपत संग्रामाच्यावेळी प्रत्यक्ष रणभूमीवर पतीसमवेत गेल्या होत्या. गोपिकांबाईंसारख्या ज्येष्ठ आणि वरचढ स्त्रीसमवेत आपणास राहायला नको व त्यापेक्षा पतीबरोबर युद्धात गेलेले ठीक या भावनेतूनही त्यांचा तो निर्णय होता असा इतिहासकारांनी तर्क काढला आहे. पार्वतीबाईंच्या दुर्दैवाने त्याना पतीच्या शवाचे दर्शन झाले नाही कारण युद्धातील कधीही भरून न येणार्‍या हानीनंतर काही विश्वासू सरदार-सैनिकांनी त्याना पानिपताहून पुण्यात सुखरूप आणले. पण "मृत पती पाहिलेला नाही' या कारणावरून पार्वतीबाईनी स्वतःला 'विधवा' मानले नाही आणि त्यांच्या स्मृतीतच वाड्यावर रमाबाईसमवेत [ज्या आता पेशवीणबाई झाल्या होत्या] राहात होत्या. 'तोतयाच्या बंडा' ला त्या निक्षून सामोरे गेल्या होत्या आणि तो प्रकार माधवरावांच्या मदतीने त्यानी धीटपणे मोडून काढला होता. माधवरावांच्या बहरत जा असलेल्या कारकिर्दीकडे पाहातच त्या शांतपणे १७६३ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी मृत्युला सामोरे गेल्या. त्याना अपत्य नव्हते.

६. रमाबाई
काय लिहावे या पेशवे स्त्री यादीतील सर्वाधिक लोकप्रिय मुलीविषयी ? आज या क्षणी एकही सुशिक्षित मराठा घर नसेल की जिथे 'रमा-माधव' हे नाव माहीत नसेल. इतिहासातील पात्रे कशीही असू देत, पण 'रमा' या नावाने त्यावेळेच्या आणि आजच्याही जनतेत जे नाजूक हळवे असे घर केले आहे त्याला तोड नाही. इतिहासात क्वचितच असे एखादेदुसरे स्त्री व्यक्तिमत्व असेल की जिच्याविषयी इतक्या हळुवारपणे लिहिले बोलले जाते. पेशवे-इतिहास लेखन करणार्‍या सर्व लेखकांच्या लेखणीतून 'रमा' या नावाला जो मान दिला गेला आहे, तो अन्य कुठल्याच नाही. सर्वार्थाने 'प्रिय' अशी स्त्री म्हणजे माधवरावांची पत्नी - रमा. एक काव्यच आहे हे नाव म्हणजे. म्हणून या मुलीच्या निधनाची आठवणही इथे आणणे दुय्यम ठरते.
[हेही सांगणे दुय्यमच की माधवराव आणि रमा याना अपत्य नव्हते.]

७. आनंदीबाई
पेशवे इतिहासातील सर्वात काळेकुट्ट प्रकरण कुठले असेल तर शनिवारवाड्यात गारद्यांनी केलेला 'नारायणराव पेशव्यां'चा निर्घृण खून. तोही सख्ख्या चुलत्या आणि चुलतीकडून. नाना फडणवीस आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी रामशास्त्रींच्या न्यायव्यवस्थेकडून त्या खून प्रकरणाचा छ्डा तर लावलाच पण त्या धक्कादायक प्रकरणाच्या मागे एकटे रघुनाथराव नसून अत्यंत महत्वाकांक्षी असलेली त्यांची पत्नी 'आनंदीबाई' आहेत हेही सिद्ध केले. ["ध" चा 'मा' हे प्रकरण इथे विस्ताराने लिहिण्याचे कारण नाही, इतके ते कुप्रसिद्ध आहे.]

आनंदीबाई ह्या गुहागरच्या ओकांची कन्या. राघोबांशी त्यांचा विवाह (१७५६) झाल्यापासून आपला नवरा 'पेशवे' पदाचा हक्कदार आहे हीच भावना त्यानी त्यांच्या मनी चेतवीत ठेवली होती. गोपिकाबाईंचे वर्चस्व त्याना सहन होणे जितके शक्य नव्हते तितकेच त्यांच्या सरदारांसमवेतही संबंध कधी जुळू शकणारे नव्हते. रघुनाथराव पराक्रमी जरूर होते पण ज्याला सावध राजकारणी म्हटले जाते ते तसे कधीच दिसून आले नाही. विश्वासराव अकाली गेले आणि माधवराव अल्पवयीन म्हणून आपल्या नवर्‍याला - रघुनाथरावाना - पेशवाईची वस्त्रे मिळतील अशी आनंदीबाईंची जवळपास खात्री होतीच. पण छत्रपतींनी वंशपरंपरागत रचना मान्य केली असल्याने माधवराव व त्यांच्यानंतर नारायणराव हेच पेशवे झाल्याचे आनंदीबाईना पाहाणे अटळ झाले. माधवराव निपुत्रिक गेले आणि नारायणराव यांचे वैवाहिक जीवन [पत्नी काशीबाई] नुकतेच सुरू झाले असल्याने रघुनाथराव याना पेशवे होण्याची हीच संधी योग्य आहे असे आनंदीबाईनी ठरवून तो शनिवारवाडा प्रसंग घडवून आणण्याचे त्यानी धारिष्ट्य केले आणि तांत्रिकदृष्ट्या त्या यशस्वीही झाल्याचे इतिहास सांगतो.

पण दुर्दैवाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. अल्पकाळ का होईना, पण रघुनाथराव जरूर पेशवेपदी बसले पण नाना फडणविसांनी त्याना ते सुख घेऊ दिले नाही. 'बारभाईं'नी रघुनाथराव आणि पर्यायाने आनंदीबाईंची त्या पदावरून हकालपट्टी केली आणि एक वर्षाच्या 'सवाई माधवराव' यांच्या नावाने पेशवेपदाची नव्याने स्थापना केली. आनंदीबाई मध्यप्रदेशात धार प्रांतात पळून गेल्या आणि तिथेच त्यानी 'दुसर्‍या बाजीराव' ना जन्म दिला. त्यांच्या जन्मानंतर आठ वर्षांनी धार इथेच रघुनाथरावांचा मृत्यु झाला. त्यानंतर आनंदीबाईंचीही ससेहोलपटच झाली. रघुनाथरावांपासून झालेली दोन मुले आणि सवतीचा एक अशा तीन मुलांना घेऊनच मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात त्यांच्यामुळेच होणार्‍या वादात आणि लढ्यात त्यांचे नवर्‍याच्या मृत्यूनंतरचे आयुष्य गेले. इकडे बारभाईनी 'सवाई माधवरावा' ला पेशवे गादीवर बसवून नाना फडणवीस यांच्याच अखत्यारीत राज्यकारभार चालू केल्याने दुसर्‍या बाजीरावाला निदान त्यावेळी तरी पुण्यात प्रवेश नव्हताच. सवाई माधवरावांनी वेड्याच्या भरात १७९६ मध्ये आत्महत्या केल्याने आणि ते निपुत्रिक वारल्याने त्यांच्या जागी 'पेशव्यां'चा अखेरचा वारस म्हणून नानांनी (आणि दौलतराव शिंद्यांनी) अन्य उपाय नाही म्हणून दुसर्‍या बाजीरावाला पेशवाईची वस्त्रे दिली.

~ मात्र मुलगा मराठेशाहीचा "पेशवा' झाल्याचे सुख आनंदीबाईच्या नजरेला पडले नाही. त्यापूर्वीच ही एक महत्वाकांक्षी स्त्री १२ मार्च १७९४ रोजी महाड येथे नैराश्येतच निधन पावली होती.

अशोक पाटील

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशोकराव,

>> ... [अन् मलाही एकदोन ओळीत खुलासा करणेही जमत नाहीच] ...

अहो, त्यामुळेच तर आम्हाला नवनवीन माहिती वाचायला मिळते. त्याबद्दल धन्यवाद! Happy आपल्या लेखनाबद्दल काय सांगणार! अक्षरश: अवर्णनीय!! असेच लिहीत राहा ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

रमाबाई-माधवराव यांचे नाते 'स्वामी'मधे जसे रंगवले आहे तसे प्रत्यक्षात असेल काय अशी शंका मला नेहमीच येते. एक साहित्यकृती म्हणून ते अत्यंत हृद्य आहे पण त्याबद्दल अस्सल ऐतिहासिक असा काही पुरावा आहे काय? >>> आगाऊ, अगदी अगदी.
टीनएज मधे 'वेगळीच लवस्टोरी' म्हणुन मला स्वामी आवडली होती. पण नंतर जाणत्या वयात वाचल्यावर मला हेच्च वाटत होतं. हा धागा वाचल्यावर पुन्हा तीच शंका उफाळुन आली, पण मी पुढचे वाद टाळण्यासाठी ती मनातच ठेवली. Happy चला आता परिणामांची तयारी ठेवुन मी तुला अनुमोदन तर दिलं. Wink

अरे बाप रे ! मंदार तुझी पोस्ट वाचलीच नव्हती. माझा प्रतिसाद परत तपासायला गेले तर वरची पोस्ट दिसली. शाब्दिक धोपटणार का आता मला? Happy

श्री.राम आणि अन्य काही सदस्यांनी 'रमा' विषयी विस्तृत लिहावे अशी इच्छा आपल्या प्रतिसादात केली आहे. त्याला अनुसरून लिहिण्यापूर्वी हेही लिहितो की, आपल्या मनावर 'कादंबरी' लेखनातील ललित स्वातंत्र्याचा तसेच 'व्यक्तीपूजे'चाही विलक्षण पगडा पडलेला असतो. साहजिकच आहे की, मानवी मनाला 'कल्पनाविलास' खूप भावतो आणि मुळातच आपली मनोवृत्ती 'रोमॅन्टिसिझम' च्या बागेत बागडण्यासाठी अनुकूल असल्याने त्याचा लाभ इतिहासाचा आधार घेऊन "कादंबरी" लेखन करण्यार्‍या लेखकांच्या पथ्यावर पडतो व ते त्या पात्राच्या वयाचा, जाणतेपणाचा, भोवतालच्या परिस्थितीचा, थोरांच्या बंधनाचा विचार न करता आपली लेखणी अशी काही सफाईने आपल्या विचारधारेवर चालवितात की वाचक त्याचे वर्णन वाचताना 'रॅशनल थिंकिंग' न करता 'पोएटिक थिंकिंग' करू लागतो.

मी जर इथे असे लिहिले की, "माधवरावांचे लग्न रमेशी ठरलेच नव्हते. बल्लाळांच्या दुसर्‍या एका उपशाखेतील एका मुलीशी त्यांचा नातेसंबंधाबाबत अगदी लिखापढाईसुद्धा झाली होती. पण अंतर्गत कलहामुळे ते होऊ शकले नाही आणि नाईलाजाने त्यानी नाशिकच्या शिवाजी बल्लाळ जोशी यांची ४ वर्षे वयाची मुलगी रमा हिच्याशी विवाह केला." ~ हे सत्य 'स्वामी' तील वर्णनाशी अजिबात फिट्ट बसत नाही, पण तो इतिहास आहे तर रणजित देसाई याना इतिहासाशी इतके खोलवरचे देणेघेणे नसल्याने 'रमा-माधव' जोडपे म्हणजे अगदी 'लक्ष्मी-नारायणा' चा जोडा असे जे चित्रण केले ते १९६२ मध्ये आणि त्या काळातील वाचकाची सामाजिक जडणघडण विचारात घेतल्यास कादंबरीतील जोडप्याचे काल्पनिक संवाद पूर्णपणे भारावून टाकणारेच होते. [आजही वाटतातच.]

तर वास्तवातील अशी ही ४ वा ५ वर्षे वयाची रमाबाई पेशव्यांच्या वाड्यावर आली म्हणजे काय माधवरावांबरोबर २४ तास संसार करू लागले? होऊच शकत नव्हते, त्यावेळी माधवरावांचे वय होते केवळ ८. आठ+पाच या वयाचे "दांपत्य" आपण या तारखेस नजरेसमोरही आणू शकत नाही. मग त्यांच्या संसाराच्या कल्पना हा लेखनविलासाचा एक भाग बनतो.

गोपिकाबाई यांच्या कडक शिस्तीत रमाबाईचे [पाचसहा वर्षाच्या मुलीला 'बाई' संबोधन देणे बोटांना अवघड वाटते, पण इतिहासकाळातील व्यक्तीरेखांचा तसाच उल्लेख करणे हा प्रघात असल्यामुळेच रमा ला 'बाई' म्हणतो] वाड्यावरील जीवन सुरू होते. ती पतीसेवानिष्ठ असणार यात संदेह नाही. सर्वच स्त्रिया त्याच स्वभावाच्या होत्या आणि असतातही. आनंदीबाईना आपण 'कारस्थानी' म्हणतो, परंतु त्याही तशा आपल्या पतीसाठी झाल्या होत्या हे लक्षात घेणे गरजेचे असते. तर रमाबाईना कडक आणि करारी स्वभावाच्या माधवरावांकडून नेमके सुख मिळाले म्हणजे काय मिळाले असेल याचा मागोवा घेतल्यास जमेच्या बाजूने जवळपास शून्य येईल [माधवरावांची प्रकृती जन्मजात तोळामासा होती; लहानपणापासूनच त्यांच्यावर राजवैद्य औषधोपचार करीत त्यामुळे त्या विविध प्रकारच्या औषधांच्या मार्‍यामुळे ते सतत संतापी स्वभावाचे बनले होते]. कारण ज्या दिवशी माधवरावांनी 'पेशवाई' सूत्रे हाती घेतली [दिनांक १७ जुलै १७६१] त्यावेळी त्यांचे वय होते अवघे १६; म्हणजेच त्या हिशोबाने रमाबाई त्या दिवशी होत्या १३ वर्षाच्या. परत तोच प्रश्न : "मी पेशवीण झाल्ये म्हणजे नेमके काय ?" असे रमाबाईने आपल्या सासुबाईना विचारलेदेखील असेल.

माधवरावांचा मृत्यू झाला आणि रमाबाई त्या चितेवर चढल्या, पतीसमवेत सती गेल्या, त्याना जनतेच्या नजरेत "देवपण' लाभले. पण इतिहासाला ही घटना जशीच्यातशी पटेल ? १८९७ ते १९२४ या कालावधीत इतिहासकार वामनराव खरे यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध झालेल्या ऐतिहासिक लेख संग्रहात 'रमाबाई स्वेच्छेने सती गेली नसून गोपिकाबाईनी तशी आज्ञा केली होती' अशा स्पष्ट उल्लेखाची बखर थैली आहे. पण 'कादंबरी' त असे रोखठोक लिहिले की मग त्या जोडीविषयी वाटणार्‍या 'अमरप्रिती' चे मोरपीस काळवंडून जाणार.

तरीही "रमाबाई सती' गेल्या हे सत्यच असल्याने त्या घटनेविषयी बोलताना लिहिताना आदरच राखणे आपले कर्तव्य असल्याने त्या मागील इतिहासाची खोलवर मीमांसा करणे आवश्यक ठरत नाही.

मृत्युसमयी माधवराव २७ तर रमाबाई २४ वर्षाच्या होत्या. त्याना अपत्य झाले नाही ही बाबही सर्वांना माहीत आहे.

अशोक पाटील

अशोकजी, विस्तृत स्पष्टीकरणासाठी मनापासून धन्यवाद.
माझी शंका अगदीच वृथा नव्हती तर!!!

छान लेख आहे. संयत आणि माहितीपुर्ण.
माबोवर सध्या इतिहासावर लेख येऊ लागल्याने माझी मजा झालीये Happy

अशोकजी, खूपच छान लिहिलंय. ! तुमची लेखनशैली फार सुंदर आहे. अजून वाचत रहावे असे वाटते.

फार चांगली माहिती देत आहात, अशोककाका. आणि मुख्य म्हणजे नॉन-जजमेन्टल पद्धतीने देता हे फार आवडलं.
मन:पूर्वक धन्यवाद. Happy

अप्रतिम लेख आणि अप्रतिम प्रतिसाद.
प्रतिसादकांनी उत्तम भान राखलय आणि लेखकाने सुद्धा फार सुंदर पद्धतीने शंकासमाधान केलय.
मी माबोवर नवीन होतो तेव्हा एक वाक्य नेहमी अनेक प्रतिसादात असायचं ते आज आठवलं.
"अजून येऊ द्या" Happy

मनापासून धन्यवाद!! लेख तर उत्तमच आहे पण प्रतिसादांमधून सुध्दा किती छान माहिती दिली तुम्ही. Happy

अशोकजी,छान लेखन!शिवाजीमहाराजांच्या राण्यांबद्दल जाणून घ्यायलाही आवडेल.

@ कौतुक शिरोडकर ~

धन्यवाद. "अजून येऊ द्या" या छोट्याशा वाटणार्‍या वाक्याचा उपयोग करून तुम्ही जे कौतुक केले आहे त्यास पात्र राहाण्याचा मी जरूर प्रयत्न करीन.

@ धनश्री आणि अंशा ~ नक्की लिहितो, पण इथे नको. ते अवांतर होईल. त्या अनुषंगाने शिवाजीच नव्हे तर त्यापुढील छ्त्रपतींच्या संसारावरही स्वतंत्र धागा तयार करता येईल.

>>त्यापुढील छ्त्रपतींच्या संसारावरही स्वतंत्र धागा तयार करता येईल. <<
माझ्याकडुनहि एक छोटीसी विनंती:

छत्रपति शाहु महाराजांनी पेशव्यांकडे राज्यकारभाराची सगळी सुत्रं दिल्यानंतर, मराठेशाही संपुष्टात येइपर्यंत तात्कालीन छत्रपतिंनी (जवळ्-जवळ ४-५ पिढ्या?) राजकारभारात/मोहिमेत सक्रिय भाग घेतला नाहि. या धोरणामागची पार्श्वभूमी/उद्देश काय होता? शिवाजी महाराजांचे वंशज अगदि निष्प्रभ का/कसे झाले?

पाटिलसाहेब यावर आपले विवेचन वाचायला आवडेल.

@अकु
>>मस्तानी बद्दलचा हा एक वेगळा लेख>>लेख वाचला. पण का कुणास ठावूक मस्तानी छत्रसालाची मुलगी होती हे खरे नाही वाटत. अजून माहिती आहे का मस्तानीची??

वर गणेश दरवाज्याच्या कथेचा एक उल्लेख आहे. काय कथा आहे ही?

<<[पण एक आहे - इतिहासाविषयी कादंबर्‍या जरूर आकर्षण निर्माण करतात, पण 'कादंबरी लेखन' म्हणजे 'इतिहास लेखन' नव्हे हेही वाचकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.] >> खरय.
आत्ता नक्की आठवत नाही. पण अशाच एका मनोरंजन म्हणून वाचलेल्या 'पार्वती' बाईंवरील कादंबरीत (ना. सं. इनामदारांची शिकस्त ?? ) एक उल्लेख आहे. गोपिकाबाई पार्वती बाईंचा मत्सर करायच्या. इतका की जेव्हा त्या दोघी गरोदर होत्या तेव्हा पार्वतीबाई देव दर्शनाला जात असताना गोपिकाबाई मुद्दाम त्यांना सामोऱ्या गेल्या. त्या वेळी अशी समजूत होती की एका घरातील २ बायका गरोदर असताना समोर आल्या तर जिला नंतर गर्भधारणा झालेली असेल तिचा गर्भपात होईल. आणि योगायोगाने पार्वतीबाइंचा गर्भपात झाला. मला आठवत असलेली ही माहिती चुकीची असेल तर क्षमस्व ! पण जर इतर कोणी ते पुस्तक वाचला असेल आणि confirm केलं त्या पुस्तकात असाच लिहिलं असेल तर हे माहिती करून घ्यायला आवडेल कि ह्याला काही ऐतिहासिक पुरावा आहे की नाही.

अशोकजी... फार छान शंका समाधान. म्हंटल ना तुम्ही रेडीरेकनर आहात!!! अगदी सार्थ नाव आहे.

गंगा बाई आणि रमाबाई बद्दल चे विचार पटले. राजेपणाच्या आड असे कीती हुंदके बंद दारा मागे दडलेले असतिल कोण जाणे. आपण या पेशवीणींचा विचार करतो. पण त्या पेशव्याच्या कंचनींचे काय? त्या लग्नाच्या बायका नसल्या तरी बीचार्‍या त्या त्या धन्याला एकनिष्ठ असत. राघोबा आणि नानासाहेबाला अनेक कंचनी होत्या. नानाने मरायच्या आधी जेंव्हा सैन्य पानिपताला होतं तेंव्हा एका ९ वर्षाच्या मुलीशी लग्न केलं होतं. तिच पुढे काय झालं असेल? पेशव्याशी लग्न करायला मिळते आहे, तिच्या बापाची काय मानसिकता असेल? हे म्हणजे थोड्या लाभासाठी मुलगी पणाला लावणे झालेच की!!!

अवांतरः

येसुबाई येवढ्या धीरोद्दात्त, शिवाजी महाराजांच्या लाडक्या. त्या औरंगझेबाच्या कैदेत होत्या तिकडे त्यांचं नक्की काय चाललं होतं? शाहुचे ते दिवस कसे गेले? शाहु येवढा मनाने अधु कसा झाला? सातार्‍याला तो आला तेंव्हा येसुबाई होत्या. पुढे त्यांनी सत्ता पेशव्यांकडे कशी जावु दिली?

अशोकजी नवा धागा सुरु कराच!!!!

अशोकराव,
विपुतून दिलेली उत्तरं आवडली. धन्यवाद.

या लेखमालिकेत शनिवारवाड्याच्या त्या गणपती दरवाजाच्या कथेचा खुलासा तुमच्याकडून ऐकायला आवडेल.

जमल्यास ती कथा विस्तृत लिहा. (कारण गणपती दरवाजा बद्दल बरेच समज-गैरसमज आहेत)

@ मोहन की मीरा ~

"कंचनी" ~ काय बोलू आणि किती लिहू यापेक्षा 'कसे लिहू' हा माझ्यासमोरील यक्ष प्रश्न आहे याबाबतीत, मीरा.

आपल्या इतिहासातील ही काही 'डार्क पेजीस' [बघा इथेही मला त्यासाठी इंग्रजीचा उपयोग करावा लागत आहे] अशी आहेत की ज्याच्याबद्दल लिहून [आय मीन इथे देऊन] नेमके काय साध्य होईल ? नाना, राघोबाच काय पण त्यांच्या पदरी असलेल्या सरदारांच्या 'नाटकशाळा' यावर अगदी वाचू नये असा लेख होईल. पण परत तोच मुद्दा - कशाला या कबरी खोदायच्या ?

नृत्य करीत असलेला मोर पाहून आपण हरखून जातो त्याच्या विलक्षण अशा सौंदर्याने, पण शास्त्रात असेही सांगितले आहेच की, नेमक्या त्यावेळी मागील बाजूने तो मोर उघडानागडा असतो, सबब तिकडे जाऊ नका. हीच बाब ज्यावेळी इतिहासातील व्यक्तींच्या पराक्रमाबद्दलही सत्य असल्याने त्याचा अभ्यास करणे वेगळे आणि त्याबद्दलची माहिती जाहीर चर्चेत घेणे वेगळे.

"बाजीराव-मस्तानी' बद्दल इतके भरभरून लिहिले जाते की पूछो मत ! पण ती सो-कॉल्ड आगळीवेगळी 'मुहब्बत भरी कहाणी' सांगताना हे मोठ्या खुबीने लपविले जाते की, छ्त्रसालाने मस्तानी बाजीरावाला "देताना" ती किती वर्षाची होती ? तर ती होती केवळ १५-१६ वर्षाची आणि त्यावेळी आपले बाजीराव होते चक्क २९ वर्षाचे. लग्नबिग्न कथा म्हणजे सारा बकवास होता. मुळात मस्तानी ही एका इराणी नृत्यांगनेपासून छ्त्रसालाला झालेले अनौरस अपत्य. त्या काळातील समाजव्यवस्था लक्षात घेतल्यास अशा रखेलीच्या अपत्यांना विवाहाचा अधिकारच नव्हता. त्या योग्य वयात आल्या की अशाच कुणातरी सरदार, दरकदार, सावकार, जहागीरदार यांच्या वाड्यावर जाऊन त्याच पदावर आपले आयुष्य गुंतवीत असत. त्याबद्दल त्या सरदार सावकाराची पत्नीही कसली तक्रार करीत नसते, कारण ती समाजाने मानलेली एक रित होती. त्याकडे आजचा चष्मा घालून पाहणे अतार्किक होईल.

म्हणजे याचाच अर्थ असा की, जर बाजीरावांना बुंदेलखंडी मस्तानी मिळाली म्हणजे ध्रुव तारा मिळाला असे मानण्याची आवश्यकता नाही. काशीबाई तिचा दु:स्वास करीत असा एक तर्क हमखास मांडला जातो. ती बिचारी कशाला राऊंच्या अशा मसलतीत लक्ष घालेल ? मुळात पेशव्यांच्या स्त्रियांना पतीच्या राज्यकारभाराच्या धामधुमीत लक्ष घालण्याची अनुमती होती का ? बरे, काशीबाईच्या संसारात काही कमी होते का ? तेही नाही, तिलाही जशी इतर स्त्रियांना होत असत त्याप्रमाणे एक नाही तर तीन मुले झालीच ना. इतकेच नव्हे तर मस्तानीच्या मृत्युनंतर तिच्या मुलाचे - समशेरचे - संगोपन काशीबाई यानीच आपुलकीने केले होते. मग बाजीराव-मस्तानी प्रेम- प्रकरणात काशीबाईच्या फ्रेमला असा काही रंग द्यायचा की पडद्यावर तिला पाहताना "शशीकला' आठवावी.

काही वेळा प्रत्यक्षाहून प्रतिमा भावते हे मानवी स्वभावाचे एक अविभाज्य अंग असल्याने इतिहास 'जशाच्या तसा' स्वीकारणे त्याच्या पचनी पडत नाही.

असो. श्री.सेनापती यांच्या 'पानिपत' लेखामुळे इथल्या अनेक सदस्यांची इतिहासाच्या गुहेत डोकावण्याची इच्छा जागृत झाली हीदेखील एक चांगलीच गोष्ट.

तुम्ही आणि अन्य सदस्यांनी केलेल्या या संदर्भातील सूचना मी नोंदवून ठेवल्या आहेत.

बाकी 'रेडी रेकनर' टॅग बद्दल काय लिहू ? धन्यवाद म्हणतो.
अशोक पाटील

तुम्ही म्हणता ते पटले. खरच ह्या सगळ्याच इतिहासाच्या काळ्या बाजु आहेत. कुठल्याही देशाच्या इतिहासात अशी नासकी पानं आहेतच. मस्तानी बद्दलचा खुलासा खुप काही सांगुन जातो. फक्त बाजीरावाचा तिकडे जास्त कल होता येवढेच. त्याने तिच्या सौंदर्यामुळे आणि गुणांमुळे मोहीत होवुन तिला सखी चा दर्जा दिला.

ती जर छत्रसालाची औरस कन्या असती, तर येवढ्या मानहानीत जगली नसती. त्या वेळच्या पुणेकरांनी जर ह्या प्रकरणा कडे कानाडोळा केला असता तर राजकारण काही वेगळच झालं असत.

खुप खुप धन्यवाद!! फार चांगली माहिती देत आहात, इतिहासाविषयी परत गोडी लावुन कुतुहल तयार केलत Happy

>>त्यापुढील छ्त्रपतींच्या संसारावरही स्वतंत्र धागा तयार करता येईल. <<
माझ्याकडुनहि एक छोटीसी विनंती:

छत्रपति शाहु महाराजांनी पेशव्यांकडे राज्यकारभाराची सगळी सुत्रं दिल्यानंतर, मराठेशाही संपुष्टात येइपर्यंत तात्कालीन छत्रपतिंनी (जवळ्-जवळ ४-५ पिढ्या?) राजकारभारात/मोहिमेत सक्रिय भाग घेतला नाहि. या धोरणामागची पार्श्वभूमी/उद्देश काय होता? शिवाजी महाराजांचे वंशज अगदि निष्प्रभ का/कसे झाले?

पाटिलसाहेब यावर आपले विवेचन वाचायला आवडेल.
>> वेळ मिळाला की नक्कि लिहा, मलाहि वाचायला आवडेल. Happy

मोहन की मीरा ~

"त्या वेळच्या पुणेकरांनी जर ह्या प्रकरणा कडे कानाडोळा केला असता तर....."

~ तसे होणारही नव्हते. त्याला कारण म्हणजे त्यावेळेची राज्याची स्थितीच अशी काही विचित्र होती की, कुठेही जरासे खुट्ट झाले की दहावीस रिकामटेकडे "टु किल द टाईम" साठी एकत्र येत, पानाच्या चंच्या सुटत, सुपारींची देवाणघेवाण होई, मग नाक्यानाक्यावर असलेल्या पारावर शेषशाई नागावर पहुडल्यागत पिचकार्‍या टाकत गप्पा हाणत बसत. समाजजीवन पुसटसाही तरंगही उमटत नसलेल्या डोहासारखे सुस्त होते. आर्थिककरण बिलकुल नव्हते, जे काही वाडवडिलार्जीत शेतीचे, सावकारीचे, इनामदारीचे उत्पन्न येत त्यावरच 'तुका म्हणे ठेवीले अनंते तैसेची रहावे' न्यायानुसार आलेला दिवस ढकलायचा आणि रात्र पडली की मग 'मनोरंजना' साठी बावणखणी गप्पांचे आखाडे. ज्याला आपण वदंता वा अफवा म्हणतो, त्यांच्या जन्माची कहाणीही अशा रिकामटेकड्या मेंदूतूनच उपजली आहे.

अशावेळी 'वाड्या' वर काय घडत्ये, काय शिजत्ये, पडद्यासमोर कोण आले, पडद्यामागे काय हालचाल झाली, काल दिसलेला बुरखा आज कुठे लपला, तुला दिसला की मला सांग गड्या तिला न्हाण आलं न्हवं, वाड्यावरची रंगी आमच्याच आळीत र्‍हातिया, तिच बोल्ली मला .....आदी टाळ कुटणे सुरू होणे नवलाचे नव्हते.

ही पुण्याचीच नव्हे तर त्यावेळेच्या प्रत्येक सुभ्याची [अजून जिल्हावार रचना झाली नव्हते, सुपे होते] स्थिती असल्याने झटदिशी 'मस्तानी' सारखे चवीला चमचमीत व्यंजन समोर आल्यावर त्याकडे पुणेरी पगडी आणि फेट्याने काणाडोळा करणे केवळ अशक्य.

अशोक पाटील

अशोकजी,रमाबाई व गंगाबाईंच्या बद्दल लिहिलेले सविस्तर लेखन आवडले.
<<नाना, राघोबाच काय पण त्यांच्या पदरी असलेल्या सरदारांच्या 'नाटकशाळा' यावर अगदी वाचू नये असा लेख होईल. पण परत तोच मुद्दा - कशाला या कबरी खोदायच्या ?>>एकदम पटले.

<<कुठेही जरासे खुट्ट झाले की दहावीस रिकामटेकडे "टु किल द टाईम" साठी एकत्र येत, पानाच्या चंच्या सुटत, सुपारींची देवाणघेवाण होई, मग नाक्यानाक्यावर असलेल्या पारावर शेषशाई नागावर पहुडल्यागत पिचकार्‍या टाकत गप्पा हाणत बसत. >> हे अगदी तेव्हाच्या माबोचं वर्णन करताय तुम्ही Proud Light 1

Pages