चला दांडेलीला...

Submitted by sonchafa on 7 September, 2011 - 15:16

कर्नाटकातल्या अनेक जंगलांपैकी महाराष्ट्रातून पोहोचण्यास तसे सर्वात सोयीचे ठिकाण म्हणजे दांडेली-अणशी व्याघ्रप्रकल्प. म्हणूनच बेळगावपासून अवघ्या ९० कि.मि.वर असलेले दांडेली वन्यजीवप्रेमींसाठी आकर्षण न ठरले तरच नवल. अगदी पुण्या-मुंबईहून भल्या पहाटे स्वतःच्या गाडीने निघाल्यास दुपारी जेवणापर्यंत येथे येऊन पोहोचता येते.

जंगल म्हटले की सर्वात प्रथम कोणाच्याही मनात येते ती जंगल सफारी. सुर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी उघड्या जीपमधून जंगलातल्या कच्च्या रस्त्यांवरून जंगली जनावरांच्या केवळ एका दर्शनासाठी फिरणे हा अनुभव अद्वितीय तर नक्कीच. त्यासाठी जीपचा जाणकार ड्रायव्हर आणि नॅचरलिस्ट यांचे योगदान खूप महत्वाचे असते. पावलांचे ठसे, जनावरांची विष्ठा, वास, यावरून माग घेत जर मग या घनदाट जंगलात तुम्हाला ब्लॅक पँथर, वाघ किंवा हत्ती दिसला तर मात्र तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच ! येथे हरणं, गवे रेडे, माकडं आणि असंख्य पक्षी सफारीत तुम्हाला हमखास बघायला मिळतात. पण सफारी मध्ये केवळ वाघ किंवा बिबळ्या दिसला नाही म्हणून कधीही नाराज होऊ नये तर ही जंगलं वाढवणारे पक्षी दिसले म्हणून खूष सुद्धा झाले पाहिजे.

जीप सफारी प्रमाणेच येथे महत्त्वाची ती कोरॅकल बोट राईड. काली नदीतल्या मगरी तसेच ग्रे किंवा मलाबार पाईड हॉर्नबिल व पाणथळ भागातले अनेक पक्षी बघण्यासाठी नॅचरलिस्ट वल्हवित नेत असलेल्या बोटीतून फिरणे हाही अनुभव तितकाच सुंदर असतो.

ह्यापेक्षाही चित्तथरारक अनुभव घ्यायचा असेल तर मात्र काली नदीत केल्या जाणार्‍या व्हाईट वॉटर राफ्टिंगला पर्याय नाही. वीज निर्मितीसाठी सुपा धरणातून सोडल्या जाणार्‍या काली नदीच्या उसळत्या प्रवाहातून पॅडलच्या सहाय्याने आठ जणांचा राफ्ट दोन-अडीच तास वल्हवत नेणे हे कौशल्याचेच काम खरं ! साधारणतः दहा वर्षापुढील कोणीही व्यक्ती अगदी पोहोता येत नसलं तरी सहभागी होऊ शकते. अर्थात राफ्टिंग करायचच असेल तर मात्र पावसाळ्याचे दिवस म्हणजे १५ जून ते साधारण ऑक्टोबरचा पहिला आठवडा हा काळ सोडूनच येथे आलेलं बरं. कारण या काळात राफ्टिंग बंद असते.

white water rafting.jpg

मलाबार व्हिसलिंग थ्रश, ट्रोगन, हॉर्नबिल, मिनिव्हेट्स, पॅरेडाईझ फ्लायकॅचर, श्रीलंकन फ्रॉगमाउथ हे पक्षीप्रेमींना भुरळ घालणारे पक्षीही दांडेली व परिसरात बघायला मिळतात. अर्थात त्यासाठी लागते ती पक्षीनिरिक्षणाची आवड, पक्ष्यांची माहिती आणि हिरव्यागार उंच झाडात पक्षी अचूक टिपण्यासाठी तीक्ष्ण नजर !

दांडेलीच्या जवळपास आणखी फिरण्यासारखी स्थळं म्हणजे कवळा केव्ह्ज - जिथे दोन-अडीच तासांच्या कठीण ट्रेक नंतर गुहेत दडलेलं एक प्रचंड मोठं शिवलिंग ( stalactites and stalagmites formations )बघायला मिळतं. तसेच ३८० फूट उंचीची भव्य ग्रॅनाईट्ची शिळा बघायची तर सिंथेरी रॉक येथे जाता येतं. मुख्य रस्त्यातून शंभर-एक पायर्‍या उतरून गेल्यावर नदीच्या प्रवाहालगत असणारा हा भव्य दगड आपण निसर्गापुढे खरच किती खुजे आहोत ह्याची जाणीव करून देतो.

जंगलासारख्या ठिकाणी जायचं तर खाण्या-पिण्याची, राहाण्याची चांगली, सुरक्षित सोय वाजवी दरात उपलब्ध असणं ही लॉटरीच म्हणावी लागेल. एखादे प्रसिद्ध व लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हटल्यावर तेथे प्रवाशांचा ओघ हमखास वाढतो. त्यामुळे अनेक सर्व्हिस प्रोव्हायडर्स, होमस्टे अगदी मशरुम्सप्रमाणे वाढत जातात. पण स्वच्छता आणि दर्जेदार सर्व्हिस यात मात्र सातत्य राखणे ही सहजशक्य गोष्ट नाही. वाईल्ड लाईफ व अॅडव्हेंचर टुरिझमचा ३० वर्षांचा अनुभव असणार्‍या जंगल लॉजेस अँड रिसॉर्ट्स ह्या कर्नाटक सरकारच्या कंपनीचा पर्याय यासाठीच इतर प्रायव्हेट रिसॉर्ट्स वर मात करून जातो. टेंटेड कॉटेजेस वा ए.सी. रुम्समध्ये वास्तव्य, सकाळचा नाष्ता ते रात्रीचं जेवण यासाठी व्हेज्/नॉन-व्हेज बुफे, सफारी, बोट-राईड, कॅमेरा तसेच जंगल प्रवेश फी असे एकत्रित पॅकेज येथे उपलब्ध असल्याने रिसॉर्ट ला पोहोचल्यावर इतर काही छुपे खर्च लादले जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच सणासुदीच्या काळात किंवा सुट्यांमध्ये एरवीपेक्षा जास्त दर लावणे, दोन वेगवेगळ्या ग्रुप्सना वेगळ्या रेट्सने पॅकेज देणे ह्या गोष्टी प्रायव्हेट रिसॉर्ट्सच्या बाबतीत घडू शकतात पण गव्हर्मेंट च्या रिसॉर्ट्समध्ये होत नाही. अलिकडेच फॉरेस्ट डिपार्ट्मेंटनी प्रायव्हेट रिसॉर्ट्सना असलेली जंगल सफारीची परवानगी रद्द केल्यामुळे आता फक्त सरकारी कँप्स किंवा रिसॉर्ट्सना सफारीसाठी जीप्स जंगलात नेता येतात. त्यामुळे प्रत्येकाने आपली ट्रिप ठरवताना खूप चोखंदळपणे आणि काळजीपूर्वक निवड करणं आवश्यक आहे जेणेकरून आपली फसवणूक होऊन पदरी निराशा येणे आपणच टाळू शकू.

एवढी खबरदारी घेऊन प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही जंगलात जाल तेव्हा मात्र काही गोष्टींची काळजी तुमच्यातल्या जबाबदार पर्यटकाने नक्की घ्यावी. आपण सफारीला जाताना निसर्गाशी मिळत्याजुळत्या रंगांचे कपडे घालावेत. शांतता पाळावी. मुख्यतः आपण आपल्या घरी नसून त्या वन्यप्राण्यांच्या घरी आहोत ह्याचे भान ठेवून त्यांना आपल्या वागण्याचा त्रास होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. नॅचरलिस्टने दिलेल्या सूचना पाळाव्यात.

निसर्गाचे रक्षण करण्याची सर्वात मोठी जबाबदारी शेवटी आपल्या सर्वांवरच आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीलाही ह्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्यासोबत एकदा अवश्य भेट द्यावी असं दांडेली हे ठिकाण आहे.

गुलमोहर: 

छानच !
बेळगांवहून गोव्याला जाताना एकदा दांडेली मार्गे गेलो होतो. सागाची प्रचंड लागवड दिसली होती. पण मुक्काम करून हे सौंदर्य नव्हतं अनुभवलं.

खरंच सुंदर जागा आहे. Happy
माहिती आणि फोटो शेअर केल्याबद्दल धन्स. Happy
मी पण बेळगांवहून गोकर्णला जाताना येथुन गेलो होतो. Happy

व्वा ! सुंदर ठिकाण आणि सुंदर वर्णन. सोनचाफा बर्‍याच दिवसांनी मायबोलीवर दिसलात. त्या निमित्ताने परत एकदा 'पिसाचं झाड' आठवलं.

सेनापती, जरूर या इथे परत एकदा..
भाऊ, बेळगाव ते गोवा जाताना रामनगर सर्कल पर्यंत दांडेलीचा रस्ता तोच आहे मग मात्र NH4A सोडून दांडेलीचा रस्ता घ्यावा लागतो. तसे रामनगर वरून गोव्याला गेला असलात तर मला विचाराल तर खरं दांडेली तुम्ही पाहिलच नसणार.. हं आता जर दांडेलीमार्गे कारवार पर्यंत जाऊन पुढे गोव्याला गेला असलात तर मात्र दांडेली नक्की पार केलंत.
जिप्सी, मला वाटतं अलिकडेच तुम्ही कर्नाटकात जाणार म्हणून दिनेशदांनी तुम्हाला माझा रेफरन्स दिला होता.. तेव्हा बोलायची वेळ आली नाही. पण तुम्ही ट्रिपचे अपलोड केलेले सूंदर फोटो पाहिले होते.. सद्ध्या इथे येणं फार होत नाही आणि आले तरी मी घाईघाईत जमेल तिथे एक नजर टाकून जात असल्याने बर्‍याच गोष्टींकडे दुर्दैवाने दुर्लक्षच होते. Sad
नादखुळा, धन्यवाद... तुम्ही इथे नवीन दिसत असूनही तुमच्या येण्यापूर्वीचा लेख वाचला आहात.. आणि तो लक्षात ठेवलात त्याबद्दल आणखी एकदा धन्यवाद.. योगायोग बघा.. आत्त थोड्या वेळापूर्वी चहा पीत मी परत त्याच बाल्कनीत उभी होते आणि पिसाच्या झाडावर माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच पाहिलेला तो बी-ईटर आंब्याच्या झाडावर बसलेला पाहिला. मलाही त्या झाडाची परत एकदा आठवण येऊन गेली.. म्हणुनच ताबडतोब प्रतिसाद दिला.. Happy

ओळखी नव्या असल्या तरी आठवणी ह्या जुन्याच असतात. अर्थात, जुन्या मायबोलीवरचं लिखाण तिथले सगळे लोक अताशा लिहित नाहीत. पण ते जेव्हा नवीन लिहितात ना तेव्हा जुन्या आठवणी आपसुक येतात हो. Happy लिहीत रहा.

व्वा मस्त लिहलेय.
छान जागा आहे ही दोनदातरी मी जाऊन आलो असेन इथे पण राफ्टिंगसाठी काही वेळ मिळाला नव्हता. आता व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी आणखी एकदा फेरी मारावी लागेल.

>>एवढी खबरदारी घेऊन प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही जंगलात जाल तेव्हा मात्र काही गोष्टींची काळजी तुमच्यातल्या जबाबदार पर्यटकाने नक्की घ्यावी. आपण सफारीला जाताना निसर्गाशी मिळत्याजुळत्या रंगांचे कपडे घालावेत. शांतता पाळावी. मुख्यतः आपण आपल्या घरी नसून त्या वन्यप्राण्यांच्या घरी आहोत ह्याचे भान ठेवून त्यांना आपल्या वागण्याचा त्रास होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी.<<

हे मात्र खर आहे. पनवेल जवळच्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात मोठे संख्येने अनेक जण येतात पक्षी पहायला.
आणि मोठ्या-मोठ्याने बोलत, मोबाईलवर उच्च आवाजात गाणी लावून दिवसभर फिरत असतात. अशा लोकांना विविध पक्षीच काय पण चिमण्या अथवा कावळे पण दिसत नाहीत. मग बसतात पक्षांच्या नावाने बोडे मोडीत.

कर्नाळा...तिथे राहलय काय आता... Sad हल्लीच एका रविवारी पेणला जाताना पाहिले .. प्रवेशद्वारावर जत्रा भरली होती..

सुंदर जागा व माहिती , सोनचाफा अजुन प्रचि असतिल तर द्या. Happy
मोबाईलवर उच्च आवाजात गाणी लावून दिवसभर फिरत असतात. >> +++१
जंगलात जाउन गाणी लावायची गरजच काय, गेल्या आठवड्यात कोराईगडावर पण हेच द्रुष्य बघितल
खड्या आवाजात विनंती केल्यावरच ते थांबल.

>>कर्नाळा...तिथे राहलय काय आता... <<
@सेनापती
या ठीकाणी ऑक्टोबर ते मार्च या काळा दरम्यान सकाळी ६.३० किंव्हा संध्याकाळी ६.०० या वेळेत भेट दे. इथल्या जंगलात कमीत-कमी १२५ प्रजाती स्थानिक आणि सुमारे २० प्रजातींच्या मोसमी स्थलांतरीत पक्षी निश्चित बघायला मिळतील.

>>हल्लीच एका रविवारी पेणला जाताना पाहिले .. प्रवेशद्वारावर जत्रा भरली होती..<<
तसे आता सर्वच ठीकाणी हवशे, नवशे आणि गवश्यांची गर्दि शनिवार-रविवारी फक्त मजाच करण्यासाठी
भरत असल्यामुळे अभयरण्यच काय पण गड-किल्लेही जत्रेचीच ठीकाण झालेत.

कर्नाळा- पक्षी अभयारण्य

जंगलात जाताना गाणी का लागतात ? हा मलाही पडलेला पण अजून अनुत्तारित अस प्रश्न आहे. ३१ डिसेंबरला दांडेलीला यायचे तर आहे पण तिथे म्युझिक असणार का? असा प्रश्न तेव्हा येऊ इच्छिणार्‍या तरुण पिढीचा नेहेमीच असतो. ज्यांना शांततेत नवीन वर्षाचे स्वागत करायचं आहे त्यांनीच इथे या.. इथे फक्त फोक डान्स, लोकल गवळी नृत्य बघायला या.. असं आम्ही पर्यटकांना सांगतो. जंगल लॉजेस मध्ये कधीच धांग़ड धिंग्याला जागा नाही ही मला ह्यात सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे. पक्षी आणि प्राणी ह्यांना रोजचा दिवस सारखाच.. तुमच्या नवीन वर्षाच्या जल्लोशाची सजा त्यांना हो का ?

कोरॅकल राईड चे व काही पक्ष्यांचे फोटो आहेत पण साईझ लहान कसा करू कळत नाही.. मदत मिळाली तर नक्कि टाकते..