मायबोलीचा मी गेल्या ८-९ वर्षां पासूनचा सभासद आहे. संगणक क्षेत्राशी संबंधीत असुनही पहीली बरीच वर्षे मी मायबोलीवर अक्षरशः निष्क्रीय होतो. कारण काहीच नव्हतं. अचानकपणे मी गेल्या २-३ वर्षांपासुन मायबोलीवर कार्यरत झालो, आणि याला कारणीभूत होते थोरले बंधु 'परदेसाई'... कार्यरत झालेलो असलो तरी काही ठराविक जागां पुरतंच माझं कार्य मी स्वतः मर्यादीत ठेवलेलं आहे, कारण काहीही नाही...कोकणी फकाणे मधल्या गजाली, विरंगुळा मधल्या असंबद्ध गप्पा आणी अनंताक्षरी... एवढ्या पुरताच माझा संचार मी मर्यादीत ठेवलेला आहे... तसा दररोज, इतर ठिकाणी देखिल फेर-फटका मारत असतोच, फक्त 'प्रतिक्रीया' देणं कटाक्षाने टाळतो...
गणेशोत्सव स्पर्धे नंतर मायबोलीवर असाच फेर्-फटका मारत असताना, 'मायबोली शीर्षक-गीता' साठी 'होतकरू गायक-गायीका'ना सहभागी होण्यासाठी केलेलं आवाहन वाचनात आलेलं होतं. सवयी प्रमाणे वाचून सोडून दिलं, आणी गप्प बसलेलो. असाच एके दिवशी फेर-फटका मारत असताना देवकाका (मान. श्री. प्रमोद देव) यांनी सौ. रैना यांच्या आवाजात ध्वनी-मुद्रीत केलेल्या एका रचनेचा धागा नजरेत आला. त्याच धाग्याच्या आजू-बाजूला सौ. श्यामली यांच्या ध्वनी-मुद्रीत झालेल्या एका रचनेचा धागा देखिल बघितला. दोन्ही धागे वेग-वेगळे उघडून सवडी प्रमाणे (किमान ३-३ वेळा) ऐकून घेतले. ईच्छा नसताना देखिल या दोन्ही ध्वनी-मुद्रणांची मनातल्या मनात तुलना सुरू झालेली होती (अशी नव्याने तयार झालेली ध्वनी-मुद्रणं ऐकून, त्यावर योग्य तो विचार करणे, हा माझ्या प्रशिक्षणाचा एक भाग असल्यामुळे, 'मायबोली' आणी आंतरजालावर इतरत्र मिळू शकणार्या विविध ध्वनी-मुद्रणांच्या कायम शोधात असणार्या माझ्या सारख्याला मिळालेली हि दोन्ही ध्वनी-मुद्रणे विशेष होती...). बर्याच तांत्रीक कारणांमुळे सौ. श्यामली यांच्या रचनेचे ध्वनी-मुद्रण सरस वाटत होतं, आणी त्या तुलनेत देवकाका यांनी ध्वनी-मुद्रीत केलेली रचना, रचनेची चाल आणी सौ. रैना यांचा आवाज या दोन गोष्टी वगळता प्रत्येक बाबतीत 'नवखी' वाटत होती/ प्रकर्षाने जाणवत होती. शेवटी एक दिवस न रहावून देवकाकांच्या वि.पु. मधे त्यांच्या या रचने बद्दल बरीच 'तांत्रीक' माहीती विचारण्याचा मी अक्षरशः आगावूपणा केला (कारण स्पष्ट होतं - मी स्वतः ध्वनी-मुद्रण क्षेत्रात नवखा असलो तरी, अनभिज्ञ नाही, याचा कुठेतरी 'स्व' सुखावत होता...). त्याला देवकाकांकडुन माझ्या अनपेक्षीतपणे प्रतिसाद आला. पुढचे काही दिवस देवकाकां सोबत मी 'विपु-विपु' खेळत होतो. त्यातूनच काकांचा भ्रमण-ध्वनी क्रमांक मिळाला. एक दिवस मनाचा हिय्या करुन रात्री उशीरा (दहा वाजता) काकांना भ्रमण-ध्वनीवर संपर्क केला. मनातल्या शंका, आणी माझ्या जवळची जुजबी माहिती (ज्या आधारावर मी स्वतःला तज्ञ ध्वनीमुद्रक समजतो...), यांची मनसोक्त देवाण्-घेवाण केली. मध्यंतरीच्या काळात काका 'गजाली'वर येऊन आमच्या सर्वांच्या संपर्कात आलेले, त्यामुळे कसलंच दडपण नव्हतं. भ्रमण-ध्वनी वरचं आमचा संवाद संपता-संपता काकांनी मला अगदी सहजपणे, 'अरे, तुला गाण्याची आवड आहे का रे?', म्हणून चौकशी केली. बर्याच गोष्टींना मला स्पष्टपणे 'नाही' म्हणता येत नाही, हि माझी जन्मजात खोड (बरी की वाईट?, याचा अजून तरी विचार केलेला नाही...). त्यालाच अनुसरुन मी काकांना 'गाण्याची खूप आवड आहे, विशेषतः मराठी गाणी फार आवडतात...' असं सांगुन मोकळा झालो...
'अरे, मग मायबोलीच्या गाण्यासाठी तुझं नाव नोंदव ना...!!!'... आता आली का पंचाईत?...
'काका, गाण्याची आवड म्हणजे गाणं ऐकायला खरोखर मनापासून आवडतं. त्यामुळे सूर-तालाचं गणित - म्हणजे सूर/ बेसूर, ताल/ बेताल इ. बद्दल, बर्याच प्रमाणात माहीत आहे. राग, त्याचे सूर, आरोह-अवरोह.. इ.इ. अजीबात ओळखता येत नाहीत...'
'अरे, आम्ही तरी कुठे एवढे संगित शिकलोय !!!... आवड आहे ना, तर लगेच नाव नोंदणी करुन टाक... अरे, काय झालंय, या गाण्यासाठी बर्याच गायीकांनी नावं नोदवलीत, पण गायक फारच कमी पडताहेत, जवळ-जवळ नाहीतच अशी परीस्थिती आहे. तेव्हा तुझं नाव नोंदव लवकर...'
देवकाकांच्या या प्रेमळ विनंतीला नाकारणं मला खरंच जमलं नाही; पण थोड्याच वेळात आपण 'हो'कार देऊन बसलोय, या जबाबदारीच्या जाणीवेने भानावर आलो... आली का पंचाईत?... गेल्या कित्येक वर्षात आपण गाणं म्हटलेलंच नाही. शाळा-महाविद्यालयांच्या स्नेह-संमेलनात(?) बरीच वर्षं 'मराठी गाणी म्हणणारा एकमेव कलाकार' हे लेबल मिरवणारा, त्यानंतर गावी असताना 'ऐन वेळी ठरलेल्या कार्यक्रमांतून गाऊ शकणारा कलाकार' आणी कालांतराने काही कारणांमुळे 'गाणं' सोडुन इतर गोष्टी (गाण्याला आवश्यक असलेल्या) करणारा एक आयोजक, इथ पर्यन्त येऊन पोचलो होतो. आणी पुण्यात आल्यापासून फक्त रेडीओ, वॉकमन, आणी कॉम्प्युटरवर गाणी ऐकणे या पलिकडे, सध्याच्या काळात गाण्याशी कुठलाही संपर्क राहिलेला नव्हता. तरी देखिल मनातल्या एक सुप्त ईच्छेने उचल घेतली, आणी 'आपण सहभागी व्हायचं आहे', याचा निश्चय केला, आणी रुनी पॉटर व योगेश जोशी यांच्या सोबत संपर्क साधून नाव नोंदणी करून घेतली (नाव नोंदणी करताना बंधूंच्या नावाची मदत घेऊनच नाव नोंदणी केली). लगेच दोघांकडूनही सकारात्मक प्रतिसाद आला... (आलेला प्रतिसाद मला अपेक्षीत नव्हता...) 'आता ऑडिशन होवून, आपण या उपक्रमातून निश्चीतच बाहेर पडणार...' याची मनाला १००% खात्री होती... पण कसलं काय?... आवाज, सूर, ताल, शब्दोच्चार... इ.ची ऑडिशन झालीच नाही... त्यामुळे 'शीर्षक्-गीताचो बहुतेक गंमत प्रोजेक्ट दिसताहा...' अशीच मनाकडे खूण-गाठ बांधली, कारण 'ध्वनी-मुद्रण तंत्रज्ञान' शिकताना, सर्वात अगोदर या मुलभूत गोष्टींची जाणीव कितपत आहे?, याची चाचपणी करूनच मग अभ्यासक्रम सुरु झालेला होता (आणि आता येत्या काही दिवसांत अभ्यासक्रम पूर्ण होत आहे...).
नाव नोंदणी झाल्यावर, लवकरच योगेश यांच्या कडून गाण्याची चाल/ धुन समजण्या साठी प्राथमिक स्वरुपातले काही ट्रॅक्स मिळाले. वेळेच्या गणितात कायमच काठावर पास होत आल्यामुळे, माझ्या घरी झालेल्या 'रिहर्सल' पर्यन्तच्या वेळात (किमान ३५ दिवस) मी हे ट्रॅक्स फक्त ३-४ वेळाच ऐकले होते. अगदी पहिल्यांदा वाद्य-संगिताचा ट्रॅक ऐकल्यावर त्यात दोन ठिकाणी 'ताल' अगदी न-कळत मागे-पुढे झालेला ऐकू आला. अगदी लगेच ही गोष्ट मी, योगेशना (आगावूपणे, पण मोघमात) कळवून मोकळा झालो (संधी मिळाल्यावर 'ज्ञान' पाजळायची कोकणी वृत्ती, मधेच उफाळून आली...)...
पुण्यातल्या पहील्याच रिहर्सलला (माझ्या घरी झालेल्या), मी प्रचंड 'निराश' झालो, कारण स्वतः योगेश, स्मिता, सई आणी पद्मजा यांचा 'संगित' विषयातला पाया खरोखरच भक्कम होता (आणी आहे देखिल), आणि या सगळ्यांत मी एक अक्षरशः 'नव-साक्षर' ठरलो होतो. या पूर्वी केलेल्या रेकॉर्डींग्ज मधे रिहर्सलच्या वेळी संगितकाराच्या सहायकांनी केलेली (अक्षरशः) दादागिरी आठवत होतो. आणि ईथे तर प्रत्यक्ष संगितकारच आम्हा प्रत्येकाला 'तीच-तीच गोष्ट' पुनः -पुनः, न कंटाळता, न वैतागता, न चिडता अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगत होते. गाण्याच्या प्रत्येक कडव्याला लावलेली वेग-वेगळी चाल लक्षात ठेवणं मला खरोखरच कठीण जात होतं, सोबत योग्य टायमिंगला मला नेमून दिलेली 'ओळ', चाल/ धून लक्षात ठेऊन व्यवस्थीत सुरात म्हणताना, मी स्वतःच गोंधळत होतो, गडबड करत होतो. शेवटी एकदाची 'रिहर्सल' संपली आणी बायकोने मला विचारलं,'तू हे गाणं सिरीयसली गाणार आहेस का?'... बायकोने विचारलेल्या प्रश्नातली 'खोच' माझ्या लक्षात आली. तिला 'हो...' असं ठामपणे सांगितल्यावर, 'मग इतके दिवस तू करत काय होतास?', या प्रश्नाला मला उत्तर देता आलं नाही...
मधल्या काळात 'दिवाळी' येऊन गेली. दोन वेळा योगेशनी 'दुबई'हून आमच्या प्रगतीची चौकशी केली. एकदा देवकाकांनी मुंबईहून चौकशी केली. योगेशनी गाण्याचे केलेले सुधारीत ट्रॅक्स देखिल मिळाले होते. घरात एकटाच होतो, त्यामुळे मिळालेले सुधारीत ट्रॅक्स ऐकून-ऐकून आत्मसात करायचा प्रयत्न करत होतो. पण माझ्या कडुनच, मना-सारखं मला हवं तसं मिळत नव्हतं. त्यामूळे काही-काळ अक्षरशः चिडचीड सुरु होती. परीणामी प्रत्यक्षात गाण्याचा सराव (आपल्याच गळ्यातला) काहीच होत नव्हता. 'आपण यांना काय आऊट्पूट देणार?', या विचाराने अस्वस्थता वाढत होती. या पूर्वी केलेली तीनही रेकॉर्डींग्ज ही 'लाईव्ह प्रकारातली' (संगीतकार आणी वादकांचा मोठा ताफा, या सोबत केलेली) होती. आणी ईथे तर 'ट्रॅक' सोबत गायचं होतं. माझ्या साठी हा अनुभव नविन होता. ट्रॅक्स मधे मला नेमून दिलेल्या जागेवर योग्य प्रकारे Fill in the Blanks करायचं होतं.
प्रत्यक्ष रेकॉर्डींग बद्दल सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकाराने भावना व्यक्त केल्या आहेत, तेव्हा पुनः एकदा तेच-तेच लिहिणं टाळतो. मात्र जाणवलेली गोष्ट लिहितो. प्रत्यक्ष रेकॉर्डींग पूर्वी झालेल्या प्रत्येक रिहर्सल मधे आम्ही सगळे पद्मजाला 'आवाजाचं फोकसिंग नीट होऊ दे' म्हणून सांगत होतो. पद्मजा देखिल आपल्या परीने प्रयत्न करत होती. प्रत्यक्ष रेकॉर्डींगच्या वेळी मात्र तिने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला. समोर उत्कृष्ट प्रतीचा माईक मिळाल्यावर, तिचा ओरीजीनल आवाज खरोखरच खूलून बाहेर आला. ती स्वतः 'व्हायोलीन' वाजवते, त्यामुळे तिच्या डोक्यातला सूर खरोखरच पक्का आहे, हे जाणवत होतं. माझ्या मते, पुण्यात झालेल्या रेकॉर्डींग मधे तीचा परफॉर्मन्स आम्हा इतर गायकांच्या तुलनेत बराच उजवा होता...
या गाण्याच्या निमित्ताने सई ची पुनः एकदा (किमान ८ वर्षां नंतर) भेट झाली. योगेश, देवकाका, मिलिंद (भुंगा), स्मिता, पद्मजा... या इतर धाग्यांवर कार्यरत असणार्या मायबोलिकरांची ओळख झाली. मी स्वतः आपण होऊन या सगळ्यांना कधी भेटलो असतो?, याची आजही शंका आहे...
मायबोलीच्या अश्या प्रकारच्या पुढच्या उपक्रमांत सहभागी व्हायला निश्चीतच आवडेल, विशेषतः तांत्रीक विभागात काम करायला माझी तयारी असेल. फक्त दररोज हातात किती वेळ ऊरतो, यावर सगळं अवलंबून राहील. संगित विषयक उपक्रमां बाबत मला वाटतं:-
१> होतकरु कवि, गीतकारांना अनुभवी मा.बो. करांकडुन मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळावं...
२> योगेश यांच्या प्रमाणेच मा.बो. वर इतर देखिल 'दडलेले संगितकार' असतील तर, त्यांचा शोध घेऊन त्यांना अशा प्रकारची संधी उपलब्ध व्हावी...
३> इतर कलाकारांच्या बाबत देखिल (वादक, गायक... इ.इ.), वरील प्रमाणेच शोध घेता येईल. मात्र प्रत्यक्ष प्रोजेक्ट मधे योग्य असलेल्या कलाकाराला व्यवस्थीत वाव मिळावा. आणी त्या साठी 'ऑडीशन' व्हावी... असो...
आता प्रतिक्षा आहे ती, पूर्ण झालेलं 'आपल्या मायबोलीचं शीर्षक-गीत' ऐकण्याची...
धन्यवाद...
मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:
झलक मधील गाय़कः
१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक
संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई
ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)
येस... आम्हालाही या पूर्ण
येस... आम्हालाही या पूर्ण गीताची प्रतीक्षा आहे.
हा एकंदर प्रवास छान शब्दबद्ध केला आहे. अभिनंदन आपणां सर्वांचे.
मस्त! अगदी मनापासून!
मस्त! अगदी मनापासून!
अगदी मनापासून लिहिलं आहेस
अगदी मनापासून लिहिलं आहेस विवेक
आता सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे पूर्ण गीताची. फक्त ५ दिवस उरलेत
अगदी मनापासून लिहिलयत,
अगदी मनापासून लिहिलयत, शुभेच्छा लवकरच पूर्ण गीत ऐकायला मिळणार आहे आपल्याला.
खरंच दिलसे.
खरंच दिलसे.
मी संधी चुकवलेली दिसतेय पण
मी संधी चुकवलेली दिसतेय
पण छान. सगळ्या जगभरातून वेगवेगळे लोक गाणार आहेत.. तेव्हा उत्कंठा वाढत आहे...
संधीचा उपयोग केल्याबद्दल अभिनंदन..
विवेक, तुम्ही कथन केलेले
विवेक,
तुम्ही कथन केलेले अनुभव आणि दिलेल्या सूचना आवडल्या.
या निमित्ताने तुमच्यासारखे जुने मायबोलीकर परत अॅक्टिव्ह
झालेत हे पाहून अतिशय आनंद वाटतो.
धन्यवाद... भिडेकाका, डॉक्टर,
धन्यवाद...
भिडेकाका, डॉक्टर, श्यामली, रैना, जयश्री, शैलजा...
खूप बरं वाटलं...
विनय...
पुढच्या काही दिवसांत येतोच आहेस, तेव्हां प्रत्यक्षच बोलुया...
मास्तरांनु.... मस्तंच
मास्तरांनु....
मस्तंच लिहिलय...... __/\__
>>आणि आता येत्या काही दिवसांत
>>आणि आता येत्या काही दिवसांत अभ्यासक्रम पूर्ण होत आहे...).
छान! शुभेच्छा! मग आता "कानांची" काळजी घ्यायला हवी..
अरे वा ! अगदी मनापासून
अरे वा ! अगदी मनापासून
धन्यवाद... पद्मजा, आरती,
धन्यवाद...
पद्मजा, आरती, योगेश...
योगेश...
'कानां'ची सर्वतोपरी काळजी घेणं, गेल्या ३-४ वर्षां पासून सुरु आहे... कारण Sound Recordist होणं, हे उराशी जपलेलं एक स्वप्न आहे... उशीरा का होईना, पण पूर्णत्वा कडे पोचताना, 'ही' महत्वाची गोष्ट योग्य रितीने जपणं देखिल तेवढंच म्हत्वाचं नाही का...:स्मित: ...
मास्तर, छान... पुर्ण गीताची
मास्तर, छान...
पुर्ण गीताची किती प्रतीक्षा करावी लागणार अजुन ?
कान्त... धन्यवाद... सध्याच्या
कान्त... धन्यवाद...
सध्याच्या योजने प्रमाणे, ३१ जानेवारी रोजी पूर्ण झालेलं गीत ऐकता येईल...
विवेकजी, मस्त लिहिलंय. आता
विवेकजी, मस्त लिहिलंय. आता प्रतिक्षा गाण्याची आणि नंतर पार्टीची !
प्रज्ञा१२३... धन्यवाद... पार्
प्रज्ञा१२३...
धन्यवाद...
पार्टी तर देऊयाच... तुमचा चॉईस मला माहीत आहे - शेवाचे/ शेंगदाण्याचे लाडू आणी नारळाची बर्फी (गूळ घालून बनवलेली किंवा बटाटा-साखर घालून बनवलेली)... ...