(हे रूढ अर्थाने 'नाट्यपरीक्षण' नव्हे. माझा नाट्यतंत्राचा अभ्यास नाही, त्यातलं काही कळतं असा दावाही नाही. मला जे जसं दिसलं आणि भावलं ते शब्दात पकडायचा एक प्रयत्न आहे. )
पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक मिनर्व्हा थिएटरचं पुनरुज्जीवन नुकतंच सरकारमधील काही जाणत्या नोकरशहांच्या पुढाकाराने करण्यात आलं आणि त्यानिमित्त पहिलं सरकारी रिपर्टरी थिएटरही सुरू करण्यात आलं. त्याचा शुभारंभ करायचा ठरवला किंग लियर च्या दोन अंकी बंगाली रूपांतराने आणि रिपर्टरीच्या अभिनेत्यांबरोबर मुख्य भूमिका करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं खर्याखुर्या नटसम्राटाला. सौमित्र चट्टोपाध्याय/ चॅटर्जी यांना.
सौमित्र (उच्चारी 'शौमित्र') चॅटर्जी हे बंगाली अभिनयक्षेत्रातलं एक उत्तुंग नाव. सत्यजित रायचं 'find', त्यांचा जवळजवळ मानसपुत्रच म्हणा ना! अत्यंत देखण्या, राजबिंड्या व्यक्तिमत्वाच्या या अभिनेत्याने मेनस्ट्रीममधले सिनेमेही भरपूर केले, अमाप लोकप्रियता मिळवली. अगदी 'सुपरसुपरस्टार' उत्तमकुमार यांच्याबरोबर 'थिंकिंग अॅक्टर' सौमित्र असे 'प्रतिस्पर्धी' प्रसारमाध्यमांनी उभे करण्याइतकी....
आज सौमित्र ७७ वर्षांचे आहेत. हळूहळू पसरणारा पण अंती असाध्य ठरलेला कॅन्सर झालाय. बंगाली सिनेमाच्या सुवर्णयुगाच्या पिढीतले फार थोडे मानकरी आता उरलेत, त्यातले हे एक. बहुतेक सगळे संगी आता सोडून गेलेत आणि हा माणूस मात्र अजूनही तितक्याच उमेदीने, उत्साहाने नाटक-चित्रपटांत अभिनय करतोय, नवीनवी नाटकं बसवतोय आणि आपल्यापेक्षा लहान अशा नव्या पिढीच्या मागे कौतुकाचे चार शब्द बोलून धीर देण्यासाठी उभा आहे. खूप वर्षं किंग लियर करायची त्यांची इच्छा होती ती या नाटकाने पूर्ण झाली.
या वयात, अशा प्रकृतीनिशी, इतर कामं संभाळत हे नाटक करायचं म्हणजे खरोखरच कठीण आहे. त्यामुळे या नाटकाचे प्रयोग अगदी मोजकेच होतात. त्यात परत मध्यंतरीच्या सत्तापालटात (सौमित्रनी स्वतःचं राजकीय 'डावे'पण कधी लपवलेलं नाहीये..) नाटक पुढे चालू रहाणार की नाही अशी एक डळमळीत अवस्थाही आली होती. पण सौमित्रना अडवून आपण स्वतःचंच हसं करून घेऊ हे कळलं बहुदा राजकारण्यांना आणी पूर्ववत प्रयोग सुरू झाले.
पण एकूणच अशा मोजक्या प्रयोगांमुळे तिकिटं मिळवणं हे अशक्यप्राय नसलं तरी अतिअवघड असतंच असतं! तरीही कधी नव्हे ते नोकरशाहीतल्या ओळखी वापरून माझ्या नवर्याने दुसर्या रांगेतली तिकिटं पटकावली आणि अखेर आमचं घोडं गंगेत न्हायलं!
त्या दिवशी संध्याकाळी ६|| च्या प्रयोगाला हाउसफुल्ल गर्दी होती. बंगाली अभिनय आणि कलाक्षेत्रातले बरेचसे 'हूज हू' या गर्दीत होते (इति नवरा. मी ५-७ जण सोडले तर कुणालाही चेहर्याने ओळखत नाही).
नाटक सुरू झालं. सेट होता लाकडाच्या फळ्यांनी उभ्या केलेल्या २-३ लेव्हल्स, प्लॅटफॉर्म आणि एक महाद्वार या स्थावर आणि स्टूल्स, खुर्च्या अशा जंगम वस्तूंचा. राजे-राजवाड्यांचे सेट्स अपेक्षित नव्हतेच पण तरीही हे सेटिंगही फार 'जमलं' होतं असं मला वाटत नाही. अनेक वेळी पात्रांना वावरायला जागा कमी पडत होती आणि त्या सेटमुळे नाटकाच्या मंचनात फार काही महान फरक पडला असंही काही जाणवलं नाही. असो.
शिकारीहून परतलेल्या, स्वतःच्या आयुष्यातील राजशक्तीच्या परमोच्च बिंदूवर असलेल्या राजा लियरच्या रूपात सौमित्र मंचावर आले आणि प्रेक्षागृहात पिनड्रॉप सायलेन्स पसरला. कथानकाने हळूहळू वेग घेतला. सौमित्र छानच अभिनय करत होते पण त्यांचा तो 'जीनियस टच' अजून दिसत नव्हता. राजा कॉर्डेलियाला उद्देशून शापवचन उच्चारतो तो प्रवेश सौमित्र आणखी कितितरी प्रभावी करू शकले असते असं वाटलं. शिवाय पहिल्या अंकात सौमित्रच्या हालचालींवर बंधनं असल्यासारखं वाटत होतं. पात्रांच्या स्थलयोजनेमुळे असावं कदाचित पण त्यांच्या शारिरिक अभिनयाला मोकळीक मिळत नाहीये असंच जाणवत होतं. अगदी स्पष्टच बोलायचं झालं तर फूल आणि ग्लॉस्टर यांची कामं करणारे अभिनेते सोडले तर बाकीच्यांचा अभिनय अतिशय वाईट ते बरा याच रेंजमधला होता. (लियरचे दोन्ही मोठे जावई तर दिसायला इतके भयाण आणि पेद्रू होते की असले जावई मिळणं हीच लियरची सगळ्यात मोठी ट्रॅजेडी आहे या नाटकापूरती तरी असं मला क्षणभर वाटून गेलं ) आणि सौमित्रसमोर तो 'अभिनय' आणखीच उठून दिसत होता. भाषांतर तर कहर बंडल झालंय, अगदी शेक्सपीअरचा आत्मा वरती तळमळावा इतकं. त्यामुळे सुरुवातीला तर मी साशंकच झाले होते कितपत प्रयोग होतोय म्हणून.
नाटकात खरा रंग भरायला सुरूवात झाली ती लियरच्या वादळी पावसातल्या स्वगतांनी. सौमित्र चॅटर्जी रंगमंचावर 'असणं' म्हणजे काय याचा प्रथम साक्षात्कार!. आणि मग इतका वेळ लगाम गच्च धरून थोपवलेला फुरफुरणारा अबलख घोडा सगळी बंधनं झुगारून स्वधर्मानुसार बेफाम उधळावा आणि बघताबघता इतर सर्वजण फक्त उडालेल्या धुरळ्यातून अस्पष्ट दिसणार्या आकारांसारखे रहावेत, आपल्या दृष्टीविश्वात त्याच्याशिवाय आणखी कशालाच, कुणालाच जागा राहू नये असं काहीसं झालं...
या नंतरचा प्रत्येक प्रवेश हा उत्तरोत्तर आणखी 'चढत' गेला. सौमित्रच्या अभिजात अभिनयक्षमतेने तो करारी, कर्तृत्ववान राजा, मुलींच्या वागणुकीत पडणार्या फरकाने दुखावला गेलेला, कधी हट्टी, कधी असमंजस, हळूहळू कोलमडून पडणारा तरीही जळालेल्या सुंभाखालचा पीळ विफलपणे दाखवणारा, वेड-शहाणपण यांची सीमारेषा गाठून आलेला आणि शेवटपर्यंत स्वतःच्या राजत्वाचा मान राखण्याची केविलवाणी धडपड करणारा राजा, मुलींपासून दुरावत गेलेला, त्यांना जोखण्यात केलेल्या चुका फार उशीरा कळताना, त्यांचे अटळ परिणाम उमजत जाताना विवश झालेला बाप फारफार अस्सलतेने मंचावर उभा केला.
आणि मग या दु:खांतिकेचा शेवटचा कळसाचा प्रवेश. पिपासेपायी झालेले गोनोरेल आणि रेगनचे मृत्यू. शेवटी जिचं बापावरचं खरं प्रेम लियरला उमगेपर्यंत खूप उशीर झालेला त्या कॉर्डेलियाचा मृत्यू आणि तिचं प्रेत समोर आल्यावर सर्वार्थाने निर्वाणीचं कोसळणारा तो 'बाप'! हे सगळं पहाताना प्रेक्षकांमधे कुणाचेच डोळे कोरडे राहू शकले नसावेत.
लियरची भूमिका जगातील काही सर्वात आव्हानात्मक भूमिकंमधे गणली जाते. खूप बड्याबड्या अभिनेत्यांनी हे शिवधनुष्य पेलून दाखवलंय. एक लॉरेन्स ऑलिव्हिए सोडला (त्यांनी टीव्हीसाठी ७६व्या वर्षी ही भूमिका केली) तर बहुतेकांनी ही भूमिका मध्यमवयात केली आहे. इथेच सौमित्रच्या भूमिकेचं वेगळेपण मला जाणवलं. ४०-५० च्या वयात लियरचं आव्हान पेलून तुम्ही ती भूमिका अगदी ताकदीने साकाराल (जे सौमित्रला या वयात प्रत्येक प्रयोगात शक्य होत नाही. कदाचित म्हणूनच या प्रयोगात त्यांनी अशी संथ सुरुवात केली असावी). पण वयाच्या ७०-७५ नंतर आयुष्याच्या खरोखरच्या सरत्या संध्याकाळी, वैयक्तिक-व्यावसायिक आयुष्यातलं यश, अपयश, जय, पराजय पचवल्यानंतर, मृत्यू समीप आल्याची चाहूल लागल्यानंतर जी एक 'शहाणीव' एका कर्तृत्ववान माणसाच्या डोळ्यात येते/दिसते - जी सौमित्रच्या डोळ्यात त्या दिवशी दिसत होती - ती एका मध्यमवयीन अभिनेत्याच्या डोळ्यात कशी येणार? या एका बिंदूवर सौमित्रचं माणूसपण आणि राजा लियरचं माणूसपण एकाकार होऊन गेलं. दोघं वेगळे उरलेच नाहीत.
गेली वीसेक वर्षं सौमित्रला स्टेजवर एखाद्या ताकदवान भूमिकेत पहायचं माझं स्वप्न होतं. ते इतक्या सार्थपणे पूर्ण होईल असं वाटलंही नव्हतं. माझ्या मनात झरझर चित्रं सरकत होती. तो अपूर संसार मधला निखळ कवीमनाचा अपू, तो चारुलतातला अवखळ अमल, तो देवी मधला बायकोची फरफट असहायपणे पहाणारा विवश नवरा, तो बुद्धीवान चतुर डिटेक्टिव्ह फेलूदा, तो गणशत्रू मधला तत्वनिष्ठ डॉक्टर, आणि सगळ्यात शेवटी एका श्रेष्ठ शोकांतिकेचा नायक राजा लियर - ज्याचा चेहरा आत्ताच्या सौमित्रमधून मला अजूनही वेगळा काढता येत नाहीये!
एका सन्नाट्यात नाटक संपलं. कर्टन कॉलसाठी परत एकदा पडदा उघडला आणि सौमित्रसकट आख्खी नटमंडळी तिथे येऊन उभी राहिली. सौमित्र विनंतीला मान देऊन अत्यंत मृदूपणे दोन शब्द बोलले. आणि प्रेक्षकांनी जवळजवळ १० मि. कुठेही उपचार अथवा दिखाऊपणा नसणारं उत्स्फूर्त स्टॅण्डिंग ओव्हेशन दिलं या नटसम्राटाला. माझं भाग्य एवढंच की त्या टाळ्या वाजवणार्यांमधे दोन हात माझेही होते!
.
.
उच्च! तुझा खूप हेवा वाटला
उच्च! तुझा खूप हेवा वाटला
छान लिहिलंयस वरदा.
छान लिहिलंयस वरदा.
मस्त!!
मस्त!!
आवडलं लेखन
आवडलं लेखन
मस्त लिहिलं आहेस वरदा, आवडलं
मस्त लिहिलं आहेस वरदा, आवडलं
वॉव.
वॉव.
<< माझा नाट्यतंत्राचा अभ्यास
<< माझा नाट्यतंत्राचा अभ्यास नाही, त्यातलं काही कळतं असा दावाही नाही. >> इतक्या तीव्रतेने लियरचं व्यक्तिमत्व व सौमित्रसारख्या अभिनेत्याचा अभिनय भावणं व तो इतका छान मांडणं याशिवाय नाट्यतंत्राच्या अभ्यासानं आणखी काय साध्य होतं !
छानच !
मस्त लिहिलंयस. असं पहिल्या
मस्त लिहिलंयस. असं पहिल्या दुसर्या रांगेतून नाटक पाहणे म्हणजे काय चैन असते! त्यात पुन्हा असे दिग्ग्ज कलाकार !! नशीबवान आहेस
मस्त लिहिलंयस. मी इकडे जळून
मस्त लिहिलंयस.
मी इकडे जळून कोळसा झालेय. पुण्यवान आहेस बये.
अश्या माणसाने साकारलेला 'लियर' कसा असू शकेल.... काटा आला अंगावर. उफ्फ!
छान लिहिलं आहेस
छान लिहिलं आहेस
फार सुरेख लिहिले आहेस.
फार सुरेख लिहिले आहेस.
सुंदर लिहिलं आहेस वरदा.
सुंदर लिहिलं आहेस वरदा.
छान !
छान !
सगळ्यांना धन्यवाद. माझा
सगळ्यांना धन्यवाद.
माझा भाग्ययोग खरंच चांगला होता. या नाटकाचे फार अनइव्हन रिपोर्ट्स होते, की सौमित्र खूप दमतात, त्यांना पहिली उंची टिकवून ठेवता येत नाही वगैरे. सहज शक्य आहे हे सगळं त्यांची प्रकृती आणि नाटकात लागणारी एनर्जी यांचं प्रमाण लक्षात घेतलं तर - तीन तासाच्या नाटकात हा बाबा जवळजवळ अडीच तास रंगमंचावर असतो! पण त्यादिवशी सगळं येडताक फार अफलातून जमलं होतं.
thespian आणि living legend म्हणजे काय हे मूर्तीमंत, याचि देही याचि डोळा पहाता आलं, या परतं एक सामान्य रसिक आणखी काय मागणार?
सुंदर! अप्रतिम अनुभव तितक्याच
सुंदर! अप्रतिम अनुभव तितक्याच उत्कटतेनं आमच्यापर्यंत पोचवलास. सौमित्र चॅटर्जी माझाही अत्यंत आवडता अभिनेता. त्यामुळे तर तु लिहिलेलं जास्तच आवडलं. मनःपूर्वक आभार.
वरदा, सुरेख लिहिलंस.
वरदा, सुरेख लिहिलंस.
सुरेख लिहिलं आहे
सुरेख लिहिलं आहे
सौमित्र.... वॉव!! अनुभव अगदी
सौमित्र.... वॉव!! अनुभव अगदी जिवंतपणे पकडला आहेस शब्दांत!
सौमित्रना या वर्षीचा
सौमित्रना या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय.

http://www.rediff.com/movies/report/dadasaheb-phalke-award-for-actor-sou...
भारीच्च
भारीच्च
यांच्याबद्दल वर्तमानपत्रातून
यांच्याबद्दल वर्तमानपत्रातून वाचून थोडी माहिती होती.
पण या लेखाने अगदी समोर बसवून ओळख करून दिल्यासारखं वाटलं.
धन्यवाद, देशी.
धन्यवाद, देशी.
वॉव ! सही लिहिलय्स गं
वॉव ! सही लिहिलय्स गं
सौमित्र ना फ्रान्सचा सर्वोच्च
सौमित्र ना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झालाय. http://www.thehindu.com/news/cities/kolkata/soumitra-chatterjee-to-get-f...

सत्यजित राय नंतर बरोब्बर ३० वर्षांनी! त्यानिमित्त हा लेख परत एकदा वर काढावासा वाटला....
अतिशय सुंदर लेखन....
अतिशय सुंदर लेखन....
सौमित्र यांचे हार्दिक अभिनंदन....
वाह किती सुंदर लिहिलंय! त्या
वाह किती सुंदर लिहिलंय! त्या सुरुवातीच्या २ ओळींच्या प्रस्तावनेची काहीच गरज नव्हती.
अतिशय सुरेख!
अतिशय सुरेख!
सौमित्र यांचे आज दुःखद निधन
सौमित्र यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून हा धागा वरती काढत आहे. ___/\___