मायबोली शीर्षकगीतः अदभुत प्रवास (योग)

Submitted by योग on 25 January, 2012 - 03:30

"झलक" ला आपण सर्वांनी दिलेल्या प्रतीसादांबद्दल अनेक धन्यवाद व आभार. अगदी झलक देखिल ऊत्कृष्ट "दिसावी" म्हणून मेहेनत घेणार्‍या टीम चे देखिल अभिनंदन व आभार. जेव्हा एखाद्या गीताशी संबंधीत सर्व व्यक्ती त्या गीताला आपलेसे करतात तेव्हाच ते गीत कवीच्या लेखणीतून, संगीतकाराच्या मनातील सुरावटींमधून, वादकांच्या अदाकारीतून, आणि शेवटी गायकांच्या गळ्यातून रसिक श्रोत्यांच्या हृदयाला भिडते असे मला वाटते. "झलक" ला तुम्ही आपलेसे केलेत तसेच संपूर्ण गाण्यालाही आपलेसे कराल अशी आशा आहे.

प्रामाणिकपणे सांगायचे तर मराठी संगीतापेक्षा हिंदी (चित्रपट) संगीताशी माझी अधिक जवळीक आहे. त्यातही पंचम दा (आर.डी.बर्मन) यांच्या संगीत मधुघटातील अमृताचे नित्य प्राशन (तरिही तहान भागत नाही!), किशोरदांच्या (द ग्रेटेस्ट एव्हर- किशोर कुमार) गाण्याची पारायणे, यातच सदासर्वकाळ धन्यता मानणारा मी. शास्त्रीय संगीताचे शिक्षण कुठल्याही गुरूकडून घेतलेले नाही, घरीच बहिणीकडे संगीताचे प्राथमिक धडे गिरवलेले. भल्या भल्यांचे हात अनेक वाद्यांवर अक्षरशः जादूसारखे फिरताना पाहिल्यावर आणि अनेक थोरांच्या गळ्यातील सूर थेट काळजाला हात घालताना ऐकल्यावर स्वतः तोंडात बोटे घालणे वा निव्वळ विस्मयचकीत होणे एव्हडेच काय ते जमते. म्हणायला तबल्याचे शिक्षण, वादन, गायनाची आवड, घरातील सुरेल संस्कार, थोर व गुणीजनांच्या साथ संगतीला बसून ईंद्रीयांवर झालेले संगीतीक संस्कार, थोडाफार अनुभव, अन ईतर दोन चार वाद्ये वाजवता येतात तेव्हडेच काय. अनिताताईंनी त्यांच्या लेखात स्वतःला संगीताच्या सागरात "पाऊलभर" पाण्यात ऊभे केले आहे (एखाद्याने किती लीन आणि नम्र असावे याचे परमोच्च ऊदाहरण!) त्यापूढे मी "चमचाभर" पाण्यात ऊभा आहे असे म्हणावे लागेल. "चुल्लूभर पानी मे डूब मरो" अशी अवस्था अजून झाली नाही हे नशीबच! :) खरी गंमत तर अशी आहे की मायबोली शीर्षकगीताच्या टीम मधिल सर्वच गायकांना देवाने काय सुंदर आवाज दिले आहेत हे बहुतेक त्यांनाही संपूर्णपणे माहित नाही. गळ्यात स्वर आणि देहात ताल हे मनुष्य जन्माला येताना घेवून येतो असे म्हणतात ते शिकवून येत नाही. या शीर्षकगीताच्या निमीत्ताने ती देणगी लाभलेले लोक पुनः एकदा सुरेल वाटचालीवर चालू लागले आहेत हे खूपच छान झाले आणि त्याता काही अंशी माझे योदगान आहे हेच सुखावह आहे. त्यांच्या या सुरेल प्रवासातून ईतरही सर्वांना प्रेरणा मिळेल असे वाटते.

त्यामूळे जे काही ईथे जुळून आलय ते या टीम च्या संपूर्ण सहभाग व सहकार्य केवळ यामूळेच!

तरिही वैयक्तीक, या गीताच्या निर्मीती प्रक्रीयेतील संगीतकार या नात्याने या संपूर्ण प्रवासाबद्दल लिहीण्यासारखे खूप काही आहे. पण थोडक्यात लिहायचे तर एक अतीशय सुंदर, सर्वांगीण, आणि सुरेल अनुभव ज्यातून नविन स्नेहबंध जुळले, जुने अधिक द्रुढ झाले, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. या गीताच्या सुरुवातीपासून (म्हणजे अगदी गीताच्या निवड प्रक्रीयेत सामील झाल्यापासून) ते शेवटचे ध्वनिमुद्रण ते पुढे अंतीम संस्करण ईत्यादी हे सर्व करताना आलेले रोमांचक अनुभव, काही गमतीशीर प्रसंग, एकंदरीत गाणे बनवतानाची, घडतानाची, त्यावर संस्कार होतानाची प्रक्रीया, दृष्टिकोन, ईत्यादी सर्वाबद्दल लिहीणे म्हणजे हा संपूर्ण प्रवास पुन्हा जगण्या सारखेच असेल. आणि संपूर्ण गीत प्रकाशीत होईल तेव्हा तो संवाद अधिक सयुक्तीक ठरेल.

गीतातील सहभागी सर्वच कलाकार आपापले मनोगत लिहीत आहेत आणि त्यातून एकंदर या गीताचा प्रवास, त्यांच्या नजरेतून आपल्या समोर ऊलगडत आहेच. तेव्हा पुनः त्या बद्दल वेगळे लिहायची आवश्यकता भासत नाही. तूर्तास या संपूर्ण प्रवासातील गाण्याखेरीज काही विशेष ऊल्लेखनीय गोष्टी ईथे नमूद करतो:

१. एखाद्या लहान मुलाला लाजवेल असा जिवंत ऊत्साह, उमेद, आणि दर वेळी अधिक चांगले करून दाखवण्याची प्रमोद देव यांची जिद्द ही सर्वांना प्रेरणा देणारी आहे.
२. या सर्व चमूत संगीतातील ज्ञान, अनुभव यात सर्वांच्यात मोठ्या असूनही सर्व सूचनांकडे लक्ष देवून दर वेळी ऊत्तमोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या अनिताताई.
३. मुख्य गाण्या व्यतिरीक्त अक्षरशः कुठल्याही कामासाठी कुठल्याही वेळी हजर असणारा "एव्हर रिलायेबल" भुंगा.
४. घर, संसार, नोकरी, परदेशी जाण्याची धावपळ, या सर्व गोंधळात कुठलिही तक्रार न करता गाण्याचा सराव वा ध्वनीमुद्रणासाठी सदैव तत्पर असलेली रैना.
५. निव्वळ गीत लिहून हात न झटकता या गीताच्या विविध टप्प्यांवर उपयुक्त सूचना देणारे व मुंबईतील ध्वनीमुद्रणांना हजर राहून आम्हाला आधार देणारे गीतकार ऊल्हास भिडे.
६. दिवसभर गाण्याची रीहर्सल करून मग संध्याकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत कुठलिही तक्रार न करता ध्वनिमुद्रणासाठी थांबलेले पुणेकर (स्मिता, विवेक, पद्मजा). ताप, सर्दी, खोकला याने बेजार असून देखिल सर्व जीत ओतून गाणारी, व लागेल ती मदत करणारी आणि आपुलकीने सर्वांची चौकशी करणारी सई.
७. आयत्या वेळी केलेल्या विनंतीला मान देवून या गीतासाठी सराव व तयारी करून आलेले जुने मायबोलीकर मिहीर, अंबर. अडचणीच्या वेळी शब्द टाकून आपल्या मित्राचा स्टूडीयो उपलब्ध करून देणारा अंबर.
८. आपल्या लहान मुलांना ही संधी मिळावी, मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं करावं यासाठी झटणारे सृजन, कौशल, देविका या मुलांचे मायबोलीकर पालक- अमोल, भावना, श्यामली.
९. अक्षरशः प्रत्त्येक शब्द, सूर, ताल, लय हे १००% अचूक, आणि संगीतकाराला अभिप्रेत आहे तसे येईपर्यंत सराव करणारी अगो.
१०. स्काईप च्या सरावा दरम्यान मी केलेल्या सूचना, प्रसंगी टीकांचा आदर ठेवून कायम स्वता:च्या गाण्यात सुधारणा करायला उत्सूक असे जुने जाणते मायबोलीकर- अनिलभाई, पेशवा, व जयश्री.
११. मुलाची शाळा, नोकरी इ. सर्व संभाळून सराव व ध्वनीमुद्रणाला ऊपस्थित राहिलेली वर्षा.
१२. आणि अर्थातच माझ्या या झपाटलेपणाला दिशा देणारी, कायम माझा आधार असणारी, शिवाय गायनाची मेहेनत घेणारी माझी पत्नी सारिका व "बाबांच्या" मायबोली गाण्याला आपलसं करून वर पुन्हा धडक एकाच टेक मध्ये संपूर्ण गाणे आपल्या गोड आवाजात ध्वनिमुद्रीत करणारी माझी छकुली दीया (वय वर्षे पावणे चार).

वरील सर्व नमूद करण्या मागचा हेतू हे "एकमेकांचे कौतूक" नसून या निमित्ताने पडद्यामागील सर्वांचा खटाटोप काही अंशी तरी पडद्यासमोर यावा एव्हडाच आहे.

आपल्या सारख्या सांसारीक माणसाला व्यवहारीक जबाबदार्‍या चुकत नसतातच. त्यातही गेले वर्षभर रोज दुबई-अबू धाबी असे १२० किमी. (एकतर्फी) चा रोजचा प्रवास असला की गाडी चालवून गुडघे गायला लागतात आणि पाठ बोलू लागते. पण गेले चार महिने मात्र हाच प्रवास अधिक सुरेल झाला. किंबहुना या गाण्यावर जास्ती जास्त विचार व संस्कार याच प्रवासात मी करू शकलो हेही खरे. थोडक्यात, आपल्या प्रयत्नांखेरीज ईश्वरी ईच्छे शिवाय कुठलिही गोष्ट पूर्णत्वास जात नसते असा आजवरचा माझा अनुभव आहे, आणि खालील तारखांचा तक्ता याची साक्ष आहे. मायबोली च्या या गीतातच गेले चार महिने माझा ईश्वर मी पहात होतो आणि या प्रवासात आलेल्या सर्व वैयक्तिक, व्यावसायिक, व ईतर अडचणी पार करण्याचे बळ, आणि दृष्टि तो मला देत होता. जोडीला असे वर ऊल्लेख केलेले जीवाभावाचे साथीदार असल्यावर हा मायबोली रथ यशस्वी वाटचाल करणार यात मला तीळमात्र शंका नव्हती.

एकंदर या शीर्षकगीतातील सहभागी सर्वांनी आपल्या अनुभव लेखनात माझी नको ईतकी व्यक्तीगत स्तुती केली आहे. वास्तविक मी त्यास लायक आहे का हे मला ठावूक नाही. पण त्या सर्वांच्या भावनांचा आदर राखून माझ्या गुरूचे (किशोर दा) दोन शब्द एव्हडेच म्हणू ईच्छीतो:

दिये जलते है, फुल खिलते है,
बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है!

आजच्या पैशापासरी जगात मात्र हे असे जीवाभावाचे दोस्त मला या गीताच्या निमित्ताने मिळाले त्यासाठी धन्यवाद मायबोली!

आभार.
-योग

खरे तर अजून फक्त "झलक" प्रकाशीत झाली आहे त्यामूळे संपूर्ण गाण्याबद्दलचे वर लिहीलेले मनातले काही विचार आत्ताच मांडणे थोडे अस्थानी म्हणजे बाळाचा जन्म होण्या आधी बापाने पेढे वाटण्या सारखे आहे :) पण जे काही सुचलय ते लिहीले आहे, गोड मानून घ्याल अशी आशा आहे.

झलक मधील सुरुवातीचा आलाप, धून जसे सर्वांना आवडले तसेच संपूर्ण गाण्याच्या शेवटी यातील सहभागी सर्व गायकांचे सूर एकत्रीतपणे ऐकल्यावर तुमच्याही अंगावर रोमांच ऊभे राहतील आणि मायबोलीकर म्हणून ऊर अभिमानाने भरून येईल, अशी मला खात्री आहे.

असा घडला या मायबोली शीर्षकगीताचा अदभुत प्रवासः

1. मायबोली गणेशोत्सव २०११ मधील "मायबोली शीर्षक गीत" स्पर्धेत ऊल्हास भिडे लिखित गीताची
विजयी प्रवेशिका म्हणून निवडः १२ सप्टेंबर, २०११.
२. हे गीत "जागतिक मायबोलीकर गीत" करण्याबद्दल मायबोली संस्थापकांशी केलेला करारः
२५ सप्टेंबर, २०११.
3. मायबोली शीर्षक गीत भाग घेणे/नाव नोंदणी संबंधी सूचना बातमी फलकः सप्टेंबर ३०, २०११.
४. सहभाग नोंदवण्याची अंतीम मुदतः ८ ऑक्टोबर, २०११.
५. सर्व सहभागी गायकांना पाठवलेला गीताचा (पहिला) कच्चा ट्रॅकः ८ ऑक्टोबर, २०११.
६. भारतात आमचे सहकुटूंब दिवाळी निमीत्त आगमनः १४, ऑक्टोबर १४, २०११.
७. मुंबईकरांबरोबर पहिला सरावः १५ ऑक्टोबर, २०११.
८. पुणेकरांबरोबर पहिला सरावः २२ ऑक्टोबर, २०११.
९. मुंबईकरांबरोबर दुसरा सरावः २४ ऑक्टोबर, २०११.
१०. संगीत संयोजक/वादक यांबरोबर पहिले सेशनः २५ ऑक्टोबर, २०११.
११. गीतातील सर्व संगीत तुकडे, वाद्ये, साज ई. अंतीम बसवणे: २९, ऑक्टोबर २०११.
१२. मुंबईत वाद्यवृंदाचे ध्वनीमुद्रणः १ नोव्हेंबर, २०११.
१३. मुंबईकर मायबोलीकर गायकांचे पहिले ध्वनीमुद्रण (स्त्री गायक व मुले): २ नोव्हेंबर, २०११.
१४. मुंबईकर मायबोलीकर गायकांचे दुसरे ध्वनीमुद्रण (पुरूष गायक): ४ नोव्हेंबर, २०११
१५. दुबई ला परत प्रयाणः ५ नोव्हेंबर, २०११.
१६. दुबई मायबोलीकरांचा पहिला सरावः ७ नोव्हेंबर, २०११.
१७. ईग्लंड मधिल मायबोलीकर गायक (अगो) चा पहिला स्काईप मार्फत ऑनलाईन सराव:
७ नोव्हेंबर, २०११.
१८. दुबई मायबोलीकरांचा दुसरा सरावः ११ नोव्हेंबर, २०११.
१९. अमेरीका मधिल मायबोलीकर गायक (अनिलभाई, पेशवा) याच्याशी पहिला स्काईप मार्फत
ऑनलाईन सराव: ११ नोव्हेंबर, २०११
२०. पुणे मायबोलीकर ध्वनीमुद्रण पूर्व सरावः १८ नोव्हेंबर, २०११.
२१. पुणे मायबोलीकर पहिले ध्वनीमुद्रण: १८ नोव्हेंबर, २०११.
२२. ईग्लंड मधिल मायबोलीकर गायक (अगो) चा स्काईप मार्फत ध्वनीमुद्रणपूर्व सराव:
२२ व २५, नोव्हेंबर, २०११.
२३. ईग्लंड मधिल मायबोलीकर गायक (अगो) चे अंतीम ध्वनीमुद्रण: ७ डीसेंबर, २०११
२४. कुवेत मधिल मायबोलीकर (जयावी) चा पहिला स्काईप मार्फत ऑनलाईन सराव:
१५ नोव्हेंबर, २०११.
२५. कुवेत मधिल मायबोलीकर (जयावी) चे ध्वनीमुद्रण पूर्व ऑनलाईन सराव: २५, ३०, नोव्हेंबर, २०११.
२६. कुवेत मधिल मायबोलीकर (जयावी) चे अंतीम ध्वनीमुद्रण: ३ डीसेंबर, २०११.
२७. अमेरीका मधिल मायबोलीकर गायक (अनिलभाई, पेशवा) याच्याशी स्काईप मार्फत ऑनलाईन
ध्वनीमुद्रण पूर्व सराव: १-१० डीसेंबर, २०११.
२८. अमेरीका मधिल मायबोलीकर गायक (अनिलभाई, पेशवा) यांचे अंतीम ध्वनीमुद्रणः
१२, १५ डीसेंबर, २०११.
२९. दुबई मायबोलीकरांचा ध्वनीमुद्रणपूर्व सरावः ९ डीसेंबर, २०११.
३०. दुबई मायबोलीकरांचे ध्वनीमुद्रण: १७ डीसेंबर, २०११.
३१. मुंबईकरांचे अंतीम ध्वनीमुद्रणः ३० डीसेंबर, २०११.
३२. पुणेकरांचे अंतीम ध्वनीमुद्रण (अंबर, मिहीर): ३१ डीसेंबर २०११.
३३. गाण्याचे मिक्सींग व मास्टरींग चे कामः २ जानेवारी-२४ जानेवारी २०१२.
३४. शीर्षकगीत झलक प्रकाशनः १७ जानेवारी, २०१२.
३५. संपूर्ण शीर्षकगीत प्रकाशनः ३१ जानेवारी, २०१२. :)

आणि ही काही क्षणचित्रे:
mumbai record.jpg
मुंबईतील ध्वनीमुद्रणाच्या तयारीचे क्षण

don.jpg
मुंबई टीम मधिल दोन "डॉन"

viju tambe.jpg
बासरीचा जादूगार- विजू तांबे

sitar.jpg
सितार वादक- ऊमाशंकर शुक्ल

pune studio.jpg
पुणे स्टूडीयोतील अंतीम क्षण.

dubali rehers1.jpg
दुबईतील धम्माल सराव

diya riyaz.jpg
"बाबांच्या" गाण्याचा रियाज

diya dubai record.jpg
रेकॉर्डींग डेब्यू! गालांपेक्षा हेडफोन मोठा.. :)

sarika record.jpg
माझा आधार!

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:

झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगेशजी,
जबरदस्त मस्त लिहिलंय.

"मायबोली च्या या गीतातच गेले चार महिने माझा ईश्वर मी पहात होतो आणि या प्रवासात आलेल्या सर्व वैयक्तिक, व्यावसायिक, व ईतर अडचणी पार करण्याचे बळ, आणि दृष्टि तो मला देत होता." >>>>

डिव्होशन म्हणतात ते हेच. योगेश _______________/\_______________

जोडीला असे वर ऊल्लेख केलेले जीवाभावाचे साथीदार असल्यावर हा मायबोली रथ यशस्वी वाटचाल करणार यात मला तीळमात्र शंका नव्हती. >>>> इतका मस्त टीमलीडर मिळाल्यावर मित्रांची साथ लाभणारच.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

हे सगळं वाचून मला आता अत्यानंदाने भुंग्याची मा SSSS यबोली तान घ्यावीशी वाटतेय.
(काळजी नको .... मनातल्या मनातच घेतो.....;) मा SSSS यबोली ..... मा SSSS यबोली)

योग, डोळ्यात पाणीच आलं रे.......... !!
मागे......"गण गण गणात गणपती"च्या वेळी सुद्धा असाच झपाटला होतास. आत्ताही तेच झपाटलेपण !!
तुझ्या मेहेनतीचं सार्थक झालं असं आत्ताच म्हणावंसं वाटतंय. अर्थात शिर्षक गीत ऐकल्यावर हे उद्गार सगळ्यांच्या तोंडून निघणार आहेतच म्हणा Happy
इजा-बिजा झालं......आता पुढे काय Happy

>>अर्थात शिर्षक गीत ऐकल्यावर हे उद्गार सगळ्यांच्या तोंडून निघणार आहेतच म्हणा
आमेन! वर तारीख दिल्याप्रमाणे, ३१ जानेवारीला कळेलच!!
>>आता पुढे काय
"ईप्रेम"!!!????? Happy ते कधीचं घोळतय....

मस्तं....... Happy

योग...
खरचं जबरदस्त पेशंस आहे तुमचा. गाताना.... कोणीही कितीही चुकलं तरी न कंटाळता सांगण खरचं खुप अवघड काम किती सहजपणे केलंत... बाकी गाण्याची चाल, आयत्या वेळ्ची बसवलेली ती हार्मनी... सगळच उच्चं....
__/\__

वादकांचे फोटो पाहुन छान वाटलं... Happy
दिया तर गोडुच दिसतेय Happy

छान

सुंदर, खरच जयु म्हणते तस डोळ्यात पाणी आल वाचतांना..
ह्म्म ३१ जानेवारी ना.. तोपर्यन्त वाट पहायची?? Sad
फोटो, वर्णन सगळच अप्रतिम..
तुमच्या सगळ्यांसाठी ते दिवस अगदी मंतरलेले असतील ना!!!
बाकिच्यांचे पण अनुभव येउ द्या..

ईप्रेम........ ह्म्म्म्म्म....... माझ्या मनातही अगदी हेच आलं होतं Happy

मस्त ! एकेका शब्दातून तुम्ही सर्वांनी घेतलेले कष्ट दिसताहेत, अन हे ही माहीत आहे की 'बिट्वीन द लाईन्स " ही खुप खुप काही आहेच Happy तुम्हा सगळ्यांना धन्यवाद अन नमस्कारही Happy
दिया कसली गोडुल्ली आहे Happy

फार सुरेख लिहिलेस योग. मला नुसतं घरात बसूनच गायचं होतं. कष्ट नव्हते त्यात जराही. पण तुझी केवढी ती तडतड. तुला रोजचा कम्युट इतका आहे हे ही आज समजले. सारखे देशात फेर्‍या. तिथेही मुंबई-ठाणे-पुणे धावपळ. ग्रेट _/\_ !
दिया फार गोडुली आहे. एका स्काईप सेशनमध्ये बाबांच्या मांडीवर बसून गीताच्या ओळी इतक्या गोड आवाजात गात होती Happy प्रॅक्टिस थांबवून तिच्याशीच गप्पा माराव्या आणि तिचं गाणं ऐकावं असं वाटलं होतं. पण आपल्यामुळे वेळ वाया जाऊ नये म्हणून मोह आवरला.

तरिही वैयक्तीक, या गीताच्या निर्मीती प्रक्रीयेतील संगीतकार या नात्याने या संपूर्ण प्रवासाबद्दल लिहीण्यासारखे खूप काही आहे. >>> गाणे रिलीज होईपर्यंत थांबायची तयारी आहे पण प्लीज लिहीच ह्याबद्दल Happy

सुरेखच लिहिलय ! एकदम प्रेरणादायी...! अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
जाता जाता, पिल्लु खूप गोड आहे हं !

योग, अप्रतिम लिहिलयेस..... तुला काय लिहू नको आणि काय नको असं झालं असेल लिहिताना..... इतका झपाटून इतके महिने काम केलेयेस.. त्याचं चीज होताना तुला कसं वाटत असेल त्याची कल्पना करू शकतो फक्त आम्ही.

रच्याक, सर्वांसाठी एक खूषखबर...

पल्या दोन डॉननी (देवकाका आणि उकाका) मायबोली ट्यून ऑलरेडी रिंगटोन म्हणून घेतलीये मोबाईलवर Happy मी कालच देवकाकांच्या मोबाईलवर ऐकली ती. साला, काय मस्त वाटतं..... Wink

>>मायबोली ट्यून ऑलरेडी रिंगटोन म्हणून घेतलीये मोबाईलवर
छान! कल्पना आवडली. पण प्रताधिकार हक्क वगैरे याचे ऊल्लंघन होवू नये (किमान मायबोलीकरांकडून तरी) म्हणून मायबोली अ‍ॅडमिन व संस्थापक यांची आधी परवानगी घेणे ऊचीत ठरेल.

संपूर्ण गीत प्रकाशीत होईल तेव्हा त्याबद्दल मायबोली संस्थापकांचे भाष्य असेल असे वाटते.

>>पण आपल्यामुळे वेळ वाया जाऊ नये म्हणून मोह आवरला.
मायबोली संगीत गटग होवू घातले आहे तेव्हा आपण सर्व हौशी पुरवून घेवू काय? Happy

>>>पण प्रताधिकार हक्क वगैरे याचे ऊल्लंघन होवू नये (किमान मायबोलीकरांकडून तरी) म्हणून मायबोली अ‍ॅडमिन व संस्थापक यांची आधी परवानगी घेणे ऊचीत ठरेल
योगेश, हे अजिबात पटलं नाही...सगळ्यात आधी म्हणजे हा एक प्रयोग म्हणून आम्ही केलंय...दुसरं, ह्यातून झाली तर मायबोलीची जाहिरातच होणार आहे...आणि तिसरं म्हणजे...आम्हीही ह्या गीतात सहभागी आहोतच..तेव्हा आमचाही काही भावनिक अधिकार(व्यावसायिक नाही...आधीच स्पष्ट करतो) आहे की नाही?
त्यामुळे ह्यात कोणत्याही हक्काचा भंग झालेला नाही असं मला स्वत:ला वाटतंय.

Pages