मराठवाडी पद्धतीने चिकन / मराठा पद्धतीने चिकन

Submitted by अल्पना on 25 March, 2009 - 05:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक किलो चिकन (गावरान असल्यास चांगले), अर्धी वाटी सोललेला लसुण, एक इंच आले, एक मोठा कांदा, पाव वाटी किसलेले खोबरे, पाव वाटी दही, कोथिंबीर चिरुन पाव वाटी, धण्याची पावडर ४ चमचे, तिखट ४ चमचे, काळा मसाला ५-६ चमचे, मीठ, हळद.

क्रमवार पाककृती: 

आलं-लसुण, कोथिंबीर एकत्र वाटुन घ्यावे. चिकनला दही, हळद १ चमचा धण्याची पावडर, मीठ व अर्धा खोबर्‍याचा कीस व निम्मे वाटण चोळुन अर्धा तास ठेवावे.
एक कांदा उभा चिरुन थोड्या तेलावर काळसर होईपर्यंत परतुन घ्यावा व वाटुन घ्यावा.
कुकरमध्ये थोड्या तेलावर उरलेल्या वाटणापैकी निम्मे वाटण व निम्मा कीस व अर्धा वाटलेला कांदा परतुन घ्यावा. त्यात थोडी हळद व २ चमचे धण्याची पावडर घालुन परतावे. थोडेसे तेल सुटु लागले की चिकन घालुन परतावे व नंतर त्यात पाणी घालुन शिजवावे. एका शिट्टीमध्ये चिकन शिजते.
एका कढईत थोडे तेल घेवुन त्यात उरलेले वाटण, कीस व कांदा परतावा. त्यात १ चमचा धणे पुड, ४ चमचे तिखट व ५-६ चमचे काळा मसाला घालुन परतावे. छान तेल सुटल्यावर कुकरमधल्या चिकनपैकी थोडे चिकन व रस्सा बाजुला ठेवुन बाकीचे ह्या मसाल्यात घालावे. गरजेप्रमाणे मीठ घालावे. बारिक गॅसवर थोडावेळ उकळु द्यावे.

आईचे मसाल्याचे प्रमाण :
१ वाटी धणे, दिड चमचा जीरे, एकेक चमचा शहाजीरे, लवंगा, दालचीनी, मिरे, खसखस, नागकेसर, अर्धा चमचा सुंठ पावडर, ५-६ बडी विलायच्या, ४-५ तमालपत्र, तेवढेच दगडफुल, एक कांदा वाळवलेला, ३ चमचे खोबरं आणि एक त्रितियांश वाटी तिखट.
इथे चमचा म्हणजे टेबलस्पुन.. :)( मी नेहेमी गडबड करते टीस्पुनच्या जागी टेबलस्पुन अन उलटं वापरते म्हणुन मुद्दाम लिहिलय..)
सगळे पदार्थ थोड्या तेलावर वेगवेगळे भाजुन घ्यायचे व बारिक वाटायचे...
तिखटाचे प्रमाण खाण्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे बदलावे.. - इति आई Happy

वाढणी/प्रमाण: 
४ जण
अधिक टिपा: 

ह्यात चमचा म्हणजे पोहे खायचा चमचा हे प्रमाण ग्रुहित धरले आहे. ( आई तर जवळपास अर्धी वाटी काळा मसाला घालते) हे चिकन भयानक मसालेदार व तिखट असते. त्यामुळेच सुरवातीला थोडासा साधा रस्सा बाजुला काढुन ठेवावा. जास्त तिखट लागल्यास मिक्स करुन खाता येतो. रस्सा बर्‍यापैकी पातळ असतो अन नुसता प्यायला मस्त लागतो.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वाटतेय कृती. चिकनचे तुकडे मोठे मोठेच करायचे की बाईट साइझ ?
इथे गावरान कोंबडी कुठली मिळायला ? फार्मर्स मार्केट मधून फ्री रेंज चिकन आणून करायला पाहिजे.

मस्त वाटतेय. करून बघायला हवी ही कोंबडी.

थोडेसे मोठेच करायचे तुकडे...

शूनू,
गावरान कोंबडी जरी नाही मिळाली तरी इथे चायनीज मार्केटात पिसं काढलेली अख्खी कोबंडी (जशी मुंबईला मिळते) तशी मिळते. पहिल्यांदा भित भित घेतली होती मी एकदा(एकदाच आणली आतापर्यन्त) पण मला चांगली वाटली.

यम्म . मस्त दिसतेय कृती. एकच गोची दिसतेय पण, 'काळा मसाला' हा इतका वेग वेगळा असतो लोकांचा, की चव तीच येइल याची गॅरंटी नाही! यात अपेक्षित असलेला / मराठा पद्धतीचा काळा मसाला काही वेगळा असतो का?

<<'काळा मसाला' हा इतका वेग वेगळा असतो लोकांचा, की चव तीच येइल याची गॅरंटी नाही>> हे लक्षात नाही आले माझ्या लिहिताना...
आई मला पाठवत असते मसाला, त्यामुळे त्याचे प्रमाण माहित नाहीये.. तिला विचारुन मसाल्याचे प्रमाण सांगते तिच्या.

अल्पना मस्तय कृती Happy
काळा मसाला.....आम्ही गोड्या मसाल्यालाच काळा मसाला म्हणतो हा काही वेगळा असेल बहुतेक (रस्सा तिखट असतो म्हणालीयेस त्यावरुन अंदाज)
कधी येत्येस? Wink

श्यामली, येतेय ग मी... नक्की. :), बहुतेक आई गोड्या मसाल्यातच तिखटपण टाकते अन मिरे जास्त टाकते. आज तिच्याशी बोलुन प्रमाण टाकेन.
तिखट म्हणजे तु तो मराठा मटण खानावळीतला रस्सा खाल्ल्लायेस का कधी, त्याच्या खालोखाल असतो.

नागपूरकडे एक वाघमारे यांचा काळा मसाला मिळतो, तोच/तसाच तर नव्हे?

हा मसाला इतर कशात वापरता येतो ? वाळवलेला कांदा - बारीक चिरून उन्हात वाळवावा लागेल का ? किती दिवस ? कांद्या शिवाय बा़कीचे पदार्थ घालून मसाला केला अन आयत्यावेळी कांदा परतून वाटून घातला तर चालेल का ?

हा मसाला आई बहुतेक मसाल्याच्या भाज्यांना वापरते, वांगी, दोडकी वैगरे भरुन करताना, वांगी बटाटा रस्स्यात, अंडाकरीत, गवार वैगरे भाज्यांमध्ये दाण्याचं कुट, कांदा अन हा मसाला घातला तर सरसरीत छान भाजी होते. आमटीमध्ये पण घालता येतो. कटाची आमटी हा मसाला घालुन मस्त होते ( बिना चिंच गुळाची.. मी कालच केली होती)
कांदा ऑप्शनल आहे... नाही घातला तरी चालतो. घालायचा असेल तर उभा चिरुन उन्हात वाळवते आई. मला वाटतं ५-७ दिवास लागतिल वाळायला.

कसलं भारी.. करत बसण्याऐवजी खायला आलं पाहिजे.. Wink

ये की मग दिल्लीला... करुन खाउ घालते.