ह्या वर्षीच्या जून-जुलै मला हिंदूंचे पवित्र स्थान असलेल्या आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कैलास-मानस सरोवराची पवित्र यात्रा करण्याची संधी मिळाली. त्याचे माझ्या तोकड्या भाषेत केलेले हे वर्णन.
आधीचे भाग वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.
http://www.maayboli.com/node/30416
http://www.maayboli.com/node/30637
माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा
(भाग-३ धारचूला ते लीपूलेख पास)
दिनांक १५ जून २०११ (धारचूला ते सिरखा)
सकाळी नाश्ता-पाणी उरकून आणि मोबाईल, आंतरजाल, वर्तमानपत्र, टी.व्ही., रेडिओ अशा सगळ्या आधुनिक यंत्राचा पुढच्या २०-२२ दिवसांसाठी निरोप घेऊन निघालो. जीपने साधारण ४० किलोमीटर प्रवास केल्यावर ‘वाहन’ ह्या सोयीलाही रामराम करायचा होता. आता पुढचा प्रवास एक तर चालत किंवा घोड्यावर. शक्यतो घोड्यावर बसायचं नाही, अस ठरवल तर होत. पण त्या बाबतीत फार हट्ट करायचा नाही, असही ठरवल होत. शेवटी आपण हाती-पायी धड परत येण हे सगळ्यात महत्त्वाच. कारण,‘आपण सलामत तो परिक्रमा पचास!!’
हिमालयात दरडी कोसळणे हा रोजचाच खेळ. त्यामुळे यात्रेचा रस्ता ठरवताना पाऊस, रस्त्याची कामे आणि दरडी कोसळल्याने बंद असलेले रस्ते, असा सगळा विचार करून ठरवतात. पहिल्या बॅचचा रस्ता शेवटच्या बॅचपर्यंत बदलला जाऊ शकतो.
आमच्या माहिती पुस्तकात दिल्याप्रमाणे आमची पायी वाटचाल पांगूपासून सुरु होणार होती. पण आम्ही सुरवात केली ती नारायण आश्रम येथून. त्यामुळे आमचे चालण्याच अंतर जवळ-जवळ ८-९ किलोमीटरने कमी झाल. वा! सुरवात तर छान झाली!
धारचूलापासून जीपने प्रवास करून नारायण आश्रमला पोचलो. नारायण आश्रमची उंची समुद्र सपाटी पासून साधारण ९००० फूट आहे. दिल्लीपासूनच नारायण आश्रमच्या सृष्टीसौंदर्याविषयी ऐकले होते. २८ मार्च १९३७ रोजी कर्नाटकातील नारायण स्वामींनी कैलास मानससरोवर यात्रींसाठी एक विश्रांतीस्थळ आणि स्थानिक लोकांसाठी शिक्षण आणि आरोग्यासाठी उपक्रम सुरु केले. आता त्यांचा इस्पितळ, महाविद्यालय, प्राथमिक शाळा असा बराच विस्तार झाला आहे.
नारायण आश्रम
तिथे गेल्यावर डोळ्यात भरली ती त्यांची शिस्त, व्यवस्था आणि स्वच्छता. जिकडे नजर जाईल तिथे आता हिमशिखरे दिसत होती. पाउस नव्हता. हवा छान होती. आकाशाची निळाई, शिखरांचा शुभ्रधवल रंग आणि त्या पार्श्वभूमीवर आश्रमातील काळजीपूर्वक जोपासलेली रंगीबेरंगी फुले! वा! तिथे दर्शन घेऊन, आणि त्यांनी दिलेला गरम शिरा आणि चहा हा प्रसाद घेऊन सगळे पुढे निघाले.
इथला अजून रोमांचकारी एक कार्यक्रम बाकी होता. तो म्हणजे आपला पोर्टर व पोनीवाला ह्यांची ओळख करून घेण्याचा! आश्रमातून खाली उतरलो तर पोर्टर, घोडे आणि घोडेवाले ह्यांची ही गर्दी झाली होती. त्यांचा ठेकेदार हजर होता. त्याच्याकडेच आम्ही आदल्या दिवशी धारचुलाला पैसे दिले होते. तो प्रत्येकाला एक-एक पोर्टर आणि पोनीवाला देत होता. मी ह्या आधीही हिमालयात ट्रेक केले आहेत. पण कधी पोर्टर केला नव्हता. बहुतेक ठिकाणचे पोर्टर फक्त आपले सामान नेऊन पुढच्या कॅम्पवर पोचवतात. इथे मात्र पद्धत वेगळी असते. तो पोर्टर पूर्ण वेळ आपल्या बरोबर आणि आपल्या वेगाने चालतो. मला माझ्या अप्रतीम(?) वेगाची नीटच माहिती असल्याने मी ठेकेदारला तशी कल्पना दिली होती. त्याने सुरेश नावाचा पोर्टर, रमेश नावाचा पोनीवाला (आणि लकी नावाचा घोडा) ह्यांच्याकडे मला सुपूर्त केले.
पोर्टर, पोनीवाले आणि यात्रींची गर्दी
सुरेशभाईने लगेच माझ्याजवळची छोटी सॅक आपल्या पाठीला लावली आणि शिवशंकराच्या गजरात आम्ही चालायला सुरवात केली. आजचा रस्ता तसा फार लांबचा नव्हता. फक्त ५ किलोमीटर चालायचं होत. पण यात्रेतील ही पहिलीच वाटचाल ( किंवा चालवाट!!) त्यामुळे त्याचा वेगळाच रंग होता. एकत्र सुरवात केली तरी प्रत्येकाच्या वेगाप्रमाणे ग्रुप्स पडत होते. बाकी ट्रेकमध्ये एकटा मेंबर मागेपुढे झाल्यास रस्ता चुकण्याचा संभाव असतो. इथे मात्र जवळ-जवळ प्रत्येकाबरोबर पोर्टर असल्याने, ती भीती नव्हती.
हिमालयाचे सौंदर्य
हे स्थानिक लोक, यात्रांच्या काळात ७-८ वेळा तरी हा रस्ता तुडवतात. बॅचेसच वेळापत्रक अस जुळवलेल असत की पहिली बॅच परिक्रमा संपवून भारतात परत येते तेव्हा तिसरी तिकडे जाते. अश्या एकाआड एक बॅचेस सीमेवर भेटतात. त्यामुळे हे पोर्टर एका बॅचचा यात्री सीमेवर सोडतात आणि दुसऱ्याला परत नारायण आश्रमपर्यंत आणतात. त्याच्या पुढच्या बॅचबरोबर पुन्हा जातात. म्हणजेच १६ बॅचेसपैकी ७ ते ८ बॅचेसबरोबर हे पोर्टर-पोनीवले हा सगळा रस्ता तुडवतात. हा सगळा सृष्टीसौंदर्याने समृद्ध असलेला भाग, उद्योग धंदे नसल्याने गरीब आहे. यात्रेच्या काळात इथले लोक कष्ट करून पैसे मिळवतात.
लहान मुलांना गोळ्या वाटताना यात्री
आजच रस्ता तसा सोपा होता. त्यामुळे त्रास वाटत नव्हता. दोन तास चालल्यावर सुरेशभाईने लांबून दिसणारा कुमाऊ मंडळाचा कॅम्प दाखवला. कॅम्पकडे जाताना सिरखा गाव लागलं. इथल्या सगळ्या घरांना छान कोरीव काम केलेले दरवाजे-खिडक्या असतात. थंडी भरपूर असल्याने सगळ्या बायका लोकरीचे वीणकाम करत असतात. मी व्यवसायाने आर्किटेक्ट आणि छंदाने विणकर आहे. त्यामुळे बांधकामे आणि वीणकाम बघून माझ्या तोंडाला पाणी सुटत होते.
सिरखा गाव
ह्या गावात एस.टी.डी.फोनची सोय होती. मोबाईलच्या प्रसारानंतर खूप दिवसांनी रांग लावून फोन केला. घरी फोन करून खुशाली कळवली. उरलेलं अंतर भराभर कापून सिरखा कॅम्प गाठला. कॅम्पच्या जवळ १९९८ साली झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या यात्रीन्साठी एक स्मारक बांधले आहे.
मालपा मृतांसाठीची यादगारी
युथ होस्टेलच्या ट्रेकना राहायला तंबू आणि बाकी सोयींसाठी ‘होल वावर इज आवर’ ची सोय असते! इथे मात्र पलंग, गाद्या, बाथरूम, शौचालये सगळी अगदी पंचतारांकीत सोय होती. बहुतेक ठिकाणी सहा-सात जणांना मिळून एक खोली असायची. काही कॅम्पवर दहा-बारा जणांचा बंकर असायचा.
कॅम्पवर पोचल्यावर सगळेजण आपल्या आपल्या उद्योगांना लागले. बऱ्याच जणांचे अंघोळी, कपडे धुणे हे आवडते छंद होते. आमच्या बरोबरचे तावडे, चित्रकार होते. ते चित्र काढायला लागल्यावर बघायला ही गर्दी झाली.
चित्रात रमलेले तावडेसाहेब
मी आणि नंदिनी गप्पा मारणे आणि मजा करणे ह्या महत्वाच्या कामाला लागलो. ह्या गप्पात अस लक्षात आल की ती जेष्ठ पौर्णिमेची रात्र होती. त्या रात्री चंद्रग्रहण होत. रात्री गजर लावून उठायचं अस पक्क करून टाकल.
तेवढ्यात कॅम्प समोर सुरेख बर्फाच्छादित शिखरे दिसायला लागली. मावळणाऱ्या सूर्याची किरणांनी त्या शिखरांना पिवळी-तांबूस झळाळी दिली होती. सगळे भान हरपून ते दृश्य बघत राहिले. ती ‘अन्नपूर्णा रेंज’ आहे, अशी बातमी आली. तावडे लगेच ‘ तरीच मला पोट भरल्यासारख वाटलं बर का!!’
अन्नपूर्णा शिखरे
रात्री बारा वाजता उठलो, पण आकाशात ढग होते. त्यामुळे ग्रहण काही दिसू शकल नाही.
दिनांक १६ जून २०११ (सिरखा ते गाला)
यात्रेतल रोजच वेळापत्रक साधारण अस असायचं. सकाळी ५.०० ला चहा / कॉफी. प्रातर्विधी उरकून ६.०० ला नाश्ता. त्याबरोबर बोर्नविटा. तोपर्यंत पोर्टर यायला लागायचे. सामान त्यांच्याकडे सोपवून चालायला सुरवात. कॅम्पवर पोचल्या पोचल्या स्वागताला सरबत किंवा ताक! मग जेवण. जर चालण्याच अंतर जास्त असेल तर रस्त्यात एखाद्या ठिकाणी जेवायची सोय केलेली असायची. दुपारी पुन्हा चहा/ कॉफी. संध्याकाळी सूप. रात्री ७ वाजता जेवण आणि झोप.
यात्रेत सगळीकडे कांदा-लसूण विरहीत जेवण देतात. प्रत्येक जेवणात हिरव्या पालेभाज्या असतातच. रात्री झोपण्याआधी त्या कॅम्पचे व्यवस्थापक ‘सबने खाना खा लिया? कोई भूखा-प्यासा तो नही है? बिना खाना खाये मत सोना.’ अशी चौकशी करून जायचे. इतकी काळजी घेतल्यामुळे आपण कोणीतरी विशेष व्यक्ती झालो आहोत अस वाटायचं!
बहुतेक सगळ्या कॅम्पवर सौर उर्जेवर चालणारे दिवे आहेत. सकाळी /संध्याकाळी थोडा थोडा वेळ दिवे चालवतात. तसेच फोन किंवा कॅमेऱ्याच्या बॅटरी चार्ज करता येतात. हिमालयात जसा दिवस चढेल तशी हवा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी लवकर निघून दुपारपर्यंत पुढच्या कॅम्पपर्यंत पोचणे उत्तम असते. प्रत्येक बॅचच्या एल.ओ.ना सॅटेलाईट फोन दिलेला असतो. ते रोज बॅचची खबरबात दिल्लीला पोचवतात. तिथे आम्ही दिलेल्या इ-मेल आय.डी. वर ही ‘ताजा खबर’ पोचते. ही छान सोय होती. घरी नवऱ्याला रोजच्या रोज हवामानापासून, कधी निघालो, कधी पोचलो सगळी बातमी असायची. आय.टी.बी.पी. वाले तर फोटो पण वेबसाईटवर टाकतात.
सिरखाला मिळालेल्या माहितीनुसार आजचा रस्ता १४ किलोमीटरचा आणि कालच्यापेक्षा थोडा अवघड होता. रुंगलिंग टॉपची अतिशय खडकाळ अरुंद पायवाट चालायची होती. सगळ्या यात्रींचा ‘ओम नमः शिवाय’चा जप चालू होता. कॅम्प सोडल्यावर थोडा वेळ उतार होता. काही यात्री चालत तर काही घोड्यावर स्वार झाले होते. सामुरे गावाजवळ आमचा नाश्ता झाला. इथे आल्यापासून छोले किंवा राजमा आणि पुरी असा नाश्ता बऱ्याच वेळा असायचा. रोज उठून पुऱ्या खायची सवय नसलेल्यांना जरा वैताग यायचा. पण काही इलाज नव्हता.
आम्ही हिमालयाच्या लेकी
नाश्त्याची जागा
सामुरे गावापासून चढण सुरु झाली. गर्द वनराईतून, छोट्या छोट्या झऱ्यातून, चिखलातून चालताना थंडी कुठच्या कुठे पळून गेली. तास-दीड तास चढून गेल्यावर रुंगलिंग टॉप आला. पायवाटेच्या दोन्ही बाजूला अक्रोडाची उंच झाडे होती. अक्रोडाच्या झाडांवर लहान लहान फळ लागली होती. सुरेशभाईच्या म्हणण्याप्रमाणे शेवटच्या बॅचेसना अक्रोड खायला मिळतात. पण तेव्हा पावसाचा त्रास होतो असही ऐकल होत. त्यामुळे ‘पावसाच्या त्रासापेक्षा अक्रोड विकत घेऊ’ अशी चर्चा अक्रोडाच्याच सावलीत केली!
हिरवे अक्रोड
लष्करी स्वागत
आता पुढे होती ती पाय दुखावणारी सरळ उताराची वाट. पाऊस पडून निसरड्या झालेल्या वाटेवरून तोल सांभाळत चालणे म्हणजे कसरत होती. अर्थात सुरेशभाई हात पकडायला होताच. हे लोक आपली इतकी सेवा करतात की त्याचं कौतुक कराव तेवढ कमीच आहे. चिखलाच्या रस्त्यावरसुद्धा ते स्वतः चिखलातून चालतात आणि यात्रींना चांगल्या रस्त्यातून चालवतात.
सगळा उतार संपल्यावर सिमखोला नदीजवळ आलो. ह्या भागात अजून मोसमी पाऊस सुरु झाला नव्हता. नदीला अगदी थोडेसेच पाणी होते. त्यामुळे फार त्रास न होता नदी पार केली. ह्या भागात बिच्छूघास नावाचे झुडूप असते. दिसायला अगदी नाजूक आणि सुंदर. हात लागला की मात्र विंचू चावावा तश्या झिणझिण्या येऊन वेदना होतात. रस्त्यात कुठल्याही अनोळखी झाडांना हात लावू नका, हे आम्हाला खूपवेळा सांगितल होत. पण आमच्यापैकी एकाचा हात त्या झाडाला चुकून लागला. मग कैलास जीवन पासून ते खोबरेल तेलापर्यंत सगळे उपचार झाले. पण दोनेक तासांनीच त्याच्या वेदना कमी झाल्या.
दिल्ली सोडल्यापासून लेकाशी बोलण झाल नव्हत. तो पावणेबाराला शाळेत जातो. त्या आधी फोन पर्यंत पोचता याव म्हणून अधेमध्ये न रेंगाळता सरळ गाला कॅम्पला पोचलो. पण....... तिथला फोन बंदच होता! घर सोडून आता आठवडा झाला होता. आई-बाबा, नवरा ह्यांची आठवण येत होतीच. पण सगळ्यात जास्त मुलाची येत होती. त्याच्या वयाचे मुलगे बघितले की फारच जाणवायचं. पण आता त्याच्याशी बोलण्यासाठी अजून एक दिवस वाट बघयला लागणार होती.
वर कोपऱ्यातले निळे बंकर म्हणजे गाला कॅम्प
कोब्रा लिली
आता चालता चालता हळूहळू सहयात्रींची ओळख होऊ लागली होती. प्रत्येकाची पार्श्वभूमी, स्वभाव, विचार करायची पद्धत, यात्रेला येण्याचा उद्देश, सगळच वेगळ. एका अर्थाने हे महिनाभर ‘बिग बॉस’ च्या घरात राहण्यासारख होत. काही जण अगदी जेवणाच्या रांगेतही ढकला-ढकली करत होते. ह्या उलट काही जण चालताना कोणी दमल तर धीर देऊन, थोड बोलून पुढे जायचे. सुरवातीला सगळे आपल्या प्रांतातल्या, आपली भाषा बोलणाऱ्या लोकांबरोबर असायचे. हळूहळू ही प्रांतांची, भाषांची बंधने ढिली होत होती. एकदा कॅम्पवर पोचल्यावर दुसरी काही करमणूक नसायची. त्यामुळे एकमेकांशी गप्पा मारणे, उद्याच्या मार्गाबद्दल चर्चा करणे हा एकच वेळ घालवायचा मार्ग होता.
जे यात्री आधी ही यात्रा करून आलेले असतात. त्यांना अशा वेळेला खूप महत्व मिळत. आमच्यातले दोन-तीन जण असे अनुभवी होते. गुजराथचा परेशभाई तर आठव्यांदा आला होता. मला वाटलं की थोड्या दिवसांनी त्याला लाइफ मेम्बरशिप देऊन टाकतील!
एक मध्य प्रदेशचे अशोकजी ह्या आधी ९८ साली जाऊन आलेले होते. त्यामुळे सगळे त्याना दुसऱ्या दिवशीच्या रस्त्याबद्दल विचारायला जायचे. ते जी माहिती द्यायचे, त्याची सुरवात नेहमी ‘ सुनो, मै जब ९८ में यात्राके लिये आया था..........’ अशी व्हायची. शेवट ‘ कैसे गये थे, कुछ याद नहीं आ राहा’ असाही व्हायचा!! गुजराथ समाज मध्ये माझी आल्या आल्या ह्यांच्याशी आणि नंदिनीशी ओळख झाली होती. थोडी ओळख झाल्यावर त्यानी मला ‘ अपर्णा, प्लीज मुझे अंकल मत कहना’ अशी मजेदार विनंती केली. माझ्या डोळ्यासमोर अनेक हेयर डायच्या जाहिराती आल्या.(खरतर त्यांना केसच नव्हते. त्यामुळे हेयर डायचाही तसा काही उपयोग झाला नसता!!)
मग मी त्यांना ‘नंदिनीके अंकल’ म्हणायला सुरवात केली. सगळ्या बॅचमध्ये हे नाव आणि त्याच कारण पसरल्यावर ते असले वैतागले की बस रे बस. ‘अब फिरसे नंदिनीके अंकल बोला तो एक चाटा पडेगा.’ पण सगळ्यांच्या हातात हे कोलीतच पडल होत. पूर्ण यात्रा संपेपर्यंत सगळे त्यांना ‘नंदिनीके अंकल’ असच म्हणायचे!!
कॅम्पवर रोज संध्याकाळी भजन व्हायचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या मार्गाबद्दल सूचनाही मिळायच्या. आमचे एल.ओ. नारंग सर चालताना, जेवताना सगळ्यांच्या ओळखी करून घ्यायचे. हळूहळू त्यांच्यासकट सगळ्या पन्नास लोकांची नाळ जुळत होती. चेष्टामस्करी बरोबर एकमेकांना मानसिक धीर देणे, मदत करणे हे सगळ एका कुटुंबासारख चालू झाल होत.
दिनांक १७ जून २०११ (गाला ते बुधी)
आजचा टप्पा जवळजवळ १९ किलोमीटरचा आणि चांगलाच खडतर होता. जे लोक हिमालयात ट्रेकिंग करून आले आहेत, त्यांना माहिती असेलच की, ट्रेकिंगचे आणि शहरातले किलोमीटर वेगवेगळे असतात!! तिथले १९ किलोमीटर संपता संपत नाहीत!
१९९८ च्या आधी मालपा इथेही कॅम्प असायचा, पण १९९८ च्या दुर्घटनेनंतर तिथे कॅम्प नसतो. त्यामुळे चालायला जास्त अंतर आहे. महिती पुस्तका नुसार हे अंतर चालायला ७ ते १२ तास लागू शकतात. आजचा टप्पा झाला की तुमची यात्रा झालीच अस समजतात. आम्हाला निरनिराळ्या ठिकाणी दिलेल्या सूचनांमध्ये सगळ्यात जास्त सूचना ह्याच मार्गाबद्दल होत्या.
रस्त्याच्या अवघडपणाची एवढी प्रसिद्धी ऐकल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसत होतं. सकाळची प्रार्थना जोरात झाली. गालाचा कॅम्प सोडल्यावर पहिले ७ ते ८ किलोमीटर फार अवघड आहेत. कॅम्पनंतर एक किलोमीटर साधासरळ रस्ता आहे.
मग सुरु होते ती ४४४४ पायऱ्यांची अत्यंत अवघड उतरंड!! ४४४४ पायऱ्या?
पायऱ्या...........
ऐकूनच पाय थरथरत होते. त्यातून डोंगरात उभ्या-आडव्या कशाही बसवलेल्या त्या वेड्यावाकड्या पायऱ्या, त्यात भर म्हणून झऱ्यांच पाणी वाहत होत, उजव्या हाताला खोल दरीत सुसाट वाहणारी काली नदी, कठडे इतके कुचकामी की चुकुनही कठडा पकडू नका अस आम्हाला सांगितल होत. चालत असतानाच घोडे, खेचर वर-खाली करत होते. तरी आमच्या नशिबाने आणि शिवशंकराच्या कृपेने पाऊस नव्हता. नाहीतर अश्या अडचणीच्या रस्त्यावर आणखीन वरून पाऊस आल्यावर काय होत असेल ह्याची कल्पनाच भयंकर होती. सगळ वातावरण भीती वाटेल असच होत. प्रत्येक पायरी अक्षरशः तोलून मापून उतरत प्रवास चालू होता. एक पूल जरी इकडे-तिकडे पडल तरी कपाळमोक्ष ठरलेला आणि खालून रौद्ररूप धारण करून वाहणाऱ्या कालीच्या उदरात यात्रा समाप्त!
हा सगळा रस्ता, माझा पोर्टर सुरेशभाईने माझा हात पकडून, काळजीपूर्वक आणि सावकाश उतरवला. सगळ्या पायऱ्या उतरून झाल्यावर लखनपूर इथे नाश्त्याची सोय केली होती. एक-एक यात्री येऊन थोड थांबून, पोटपाणी उरकून पुढच्या रस्त्याला लागत होते. पुढे रस्ता तसा सोपा होता. पण अरुंद होता. डोंगरात बांधलेला रस्ता असल्याने बऱ्याच ठिकाणी उंची कमी होती. काली नदी आता अगदी जवळ होती. कालीच्या प्रवाहाचा ध्रोन्कार ऐकू येत होता. त्या आवाजात एकमेकांशी बोलणही कठीण होत.
काली नदीचा खळखळाट
मागच्या वर्षी एक महाराष्ट्रातले यात्री परिक्रमा संपवून परत येत होते. तेव्हा फोटो काढण्यासाठी नदीच्या बाजूला उभे राहिले, आणि सामान वाहून नेणाऱ्या खेचराने त्यांना धक्का दिला. ह्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, पण कालीच्या प्रवाहामुळे त्यांचा मृतदेहसुद्धा हाती लागला नाही. त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत होत्या. त्यांनी हा धक्का कसा सहन केला असेल देव जाणे.
बिकट वाट वहिवाट !
ह्या प्रसंगामुळे आम्हाला वारंवार ‘डोंगराच्या बाजूला थांबा, नदीच्या कडेला उभे राहू नका.’ अस बजावल होत. मला फोटो काढावेसे वाटले तर सुरेशभाई मला डोंगराला पाठ टेकून उभ राहायला लावायचा. ह्या रस्त्यावर स्थानिक लोक तसेच मिलीटरीचे जवान ये-जा करत असतात. सगळे जण ‘ओम नमः शिवाय’ च्या गजराने आमचा उत्साह वाढवत होते. रस्त्यातल्या घोडे, खेचरांकडे सुरेश बारीक लक्ष ठेवून होता. फार अरुंद वाट असेल तर तो त्याच्या स्थानिक भाषेत बोलून त्यांना थांबवायचा, हातातल्या काठीने त्यांना बाजूला हटवायचा.
काही अंतर चालून गेल्यावर जरा बरा रस्ता आला. एक लाकडी पूल पार केल्यावर आम्ही मालपाला पोचलो. भारत सरकार आणि १९९८ च्या दुर्घटनेत मरण पावलेल्या यात्रींचे नातेवाईक ह्यांनी मिळून तिथे एक शंकराचे मंदीर बांधले आहे. तिथे नतमस्तक होऊन आणि मृतात्म्यांना श्रध्दांजली वाहून पुढे वाटचाल सुरु केली.
मालपाकडे जाणारा पूल
कैलास यात्री स्मारक
रस्त्यात लमारी ह्या छोट्या गावात आय.टी.बी.पी.चा कॅम्प आहे. तिथे चहा आणि चिप्सने स्वागत झाले. महत्वाचे म्हणजे इथे फोनची सोय होती. सगळ्यांनी घरी फोन करून आपापली खुशाली कळवली.
आम्ही आजच्या दिवसाबद्दल जे ऐकल होत, ते त्या ४४४४ पायऱ्या आणि मालपापर्यंतचा अवघड रस्ता ह्याबद्दलच. त्यामुळे मालपा आल्यावर वाटलं की झाल आता. पण पुढे जवळ जवळ ८ किमी अंतर बाकी होत. ते चालण्याची मानसिक तयारीच नव्हती.
लष्करी कविता
आता ते सगळे चढ-उतार प्रचंड वाटायला लागले. अंतर संपता संपेना. देवाच नाव घेत मी एक एक पाउल टाकत होते. जवळच्या बाटलीतल पाणी पीत, सुका मेवा खात चालत होते. आजचा रस्ता म्हणजे हिंदीत ‘ नानी याद आई’ म्हणतात तसा होता. पाय ओढत चालल्यावर बऱ्याच वेळाने कॅम्प दिसायला लागला!! एक पूल पार करून शेवटचा अर्ध्या किलोमीटरचा चढ चढून कशीबशी कॅम्पवर पोचले. पण सगळ अंतर चालत पार केल्याच समाधान वाटत होत.
सर्व यात्रींची अवस्था अशीच झाली होती. सगळे प्रचंड थकल्यामुळे रात्री भजन म्हणायला कोणाच्या अंगात त्राण नव्हत. जेऊन सगळे गुडूप झाले.
दिनांक १८ जून २०११ (बुधी ते गुंजी)
आज गुंजीपर्यंत पोचल की उद्या आराम! गुंजी समुद्रसपाटीपासून साधारण १२००० फुटांवर आहे. इथपासून पुढे विरळ हवेचा त्रास होऊ शकतो. ह्या कॅम्पपर्यंत सगळी व्यवस्था कुमाऊ निगम विकास मंडळ करते. गुंजीपासून पुढे आय.टी.बी.पी. व्यवस्था करते. त्यांची इथे परत एकदा मेडिकल होते. विरळ हवेची शरीराला सवय होण्यासाठी इथे दोन रात्री थांबवतात.
पण ह्या सगळ्यासाठी १९ किलोमीटर चालायचं होत!
सकाळी निघाल्यावर पहिल्या तीन-चार किलोमीटर मध्येच ९५०० फुटांपासून १२००० फुटांपर्यंतची छीयालेखची चढण होती. मला निघायला जरा उशीर झाला होता. आज पोनीवला रमेश मागेच लागला. ‘ दीदी, घोडेपे बैठ जाइये. नहीं तो बहोत पीछे रहोगे’ असा आग्रह झाला. शेवटी मी माझा चलण्याचा पण सोडून त्याच्या लकीवर स्वार झाले. ‘लक्की एक्सप्रेस’ मुळे भरभर वर पोचले. घोड्यावर बसायचे एक तंत्र असते. चढ चढताना मागे झुकून आणि उतरताना पुढे झुकाव लागत. ते तंत्र समजून घेईपर्यंत चढण संपली. आता आमच्या बॅचमधल्या बायकांमधली आजिबात घोड्यावर न बसलेली अशी नंदिनीच होती! ती रोज हेवा वाटण्यासारख्या वेगाने चढत होती.
छीयालेख घाटी आणि त्याचा अपूर्व सौंदर्याने नटलेला परिसर पाहून मन मोहरत होते. हा परिसर ‘फुलोंकी घाटी’ म्हणून प्रसिद्ध आहे. उंचच उंच पाईन वृक्ष आणि रंगीबेरंगी असंख्य फुलांनी फुललेला घाटीचा सपाट प्रदेश आतापर्यंतची दमछाक विसरायला लावत होता. हिरव्यागार मखमली गवताच्या गालिच्यावर सुंदर रंगीबेरंगी फुले आणि त्यावर पडलेल्या पावसाच्या थेंबांवरून परावर्तीत होणारी पावसाची किरणे... सगळा प्रदेश देहभान विसरायला लावणारा होता.
छीयालेख पुष्पपठारावर तुमचे स्वागत आहे
ही सुरेख वाट संपल्यावर आय.टी.बी.पी. ची पहिली चौकी आली. चहा-बिस्कीटे देऊन जवानांनी आमचे स्वागत केले. पारपत्र तपासणी झाल्यावर व जाणाऱ्या यात्रेकरूंची नोंद केल्यावर आम्हाला पुढे गर्ब्याल गावाकडे जायची परवानगी मिळाली.
सुंदर नक्षीकाम केलेल्या घरांनी नटलेले हे एक टुमदार पण दुर्दैवी गाव आहे. गर्ब्याल गावाला पूर्वी ‘छोटा विलायत’ म्हणत असत. सन १९६२ च्या भारत-चीन युद्धापूर्वी गर्ब्याल ही मोठी बाजारपेठ होती. युद्धानंतर तसेच तिबेट चीनच्या ताब्यात गेल्यावर व्यापारी हालचालींवर निर्बंध आले. इथली बाजारपेठ उध्वस्त झाली. अजून दुर्दैव म्हणजे पृथ्वीच्या पोटातील घडामोडींमुळे आणि प्रचंड वृक्षतोडीमुळे इथल्या निसर्गाचे संपूर्ण संतुलन पार बिघडून गेले. इथली जमीन खचू लागली. सुंदर कलाकुसर असलेली घरे चक्क जमिनीत गाडली जाऊ लागली. जिवाच्या भितीने गाव रिकामे झाले. आत्ताही काही माणसे तिथे राहतात, पण बरीच घरे रिकामी, उदासवाणी वाटली.
गरब्याल (सिंकिंग व्हिलेज)
इथल्या सगळ्या गावांमधून जाताना सर्व स्थानिक लोक हात जोडून ‘ओम नमः शिवाय’ म्हणून स्वागत करायचे. कुठून आले वगैरे चौकशी व्हायची. चहाचा आग्रह व्हायचा. मी आजिबातच चहा पीत नसल्याने सगळ्यांना नाराज कराव लागायचं.
गोड, गोंडस छोटी मुले आपल्या बोबड्या भाषेत ‘ओम नमः शिवाय’ म्हणून हक्काने गोळ्या-चॉकलेट मागायची. ही कल्पना आधीच असल्याने मी रोज खिशात गोळ्यांची पिशवी ठेवायचे. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे हसू बघून छान वाटायचं!
गर्ब्याल गावानंतर दोन-अडीच तास चालल्यावर गुंजी कॅम्प दिसायला लागला. आय.टी.बी.पी.चा कॅम्प असल्याने तिरंगा झेंडा डौलात फडकत होता. कॅम्प खूप आधी दिसायला लागतो, पण नदीच्या पलीकडच्या काठाला! ‘ मेरा कॅम्प है उसपार, मै इसपार, ओ मेरे सुरेशभैय्या ले चल पार, ले चल पार’ अस म्हणावस वाटत होत!! एकदा कॅम्प दिसायला लागला की चलण्याच मीटर संपतच. पुढची वाट चालायला नको वाटते. पण चालल्याशिवाय गत्यंतर नव्हते. बराच वेळ पाय ओढल्यावर एकदाचा तो नदीवरचा पूल आला. पुन्हा अर्धा तास चालल्यावर आधी पोचलेल्या यात्रींची ‘ओम नमः शिवाय’ ही आरोळी ऐकून जीवात जीव आला.
अजुनी चालतेची वाट, वाट ही सरेना...
कॅम्पवर सरबत पिऊन ताजेतवाने झाल्यावर गुंजी कॅम्पचा परिसर दिसायला लागला. सगळ्या बाजूंनी उंचच उंच निरनिराळ्या रंगांचे डोंगर दिसत होते. कधी पिवळे-शेंदरी, कधी कोकणातल्या जांभ्या दगडासारखे, कधी चमकदार शिसवी तर कधी राजस्थानातल्या सारखा दिसणारा संगमरवरी. निसर्गाने रंगांची अगदी मुक्त उधळण केली होती.आमच्या बरोबरचे चित्रकार तावडे ह्यांना किती निसर्गचित्र काढू अस होत होत!
सगळ्या कॅम्पवर बायका आणि पुरुषांची राहण्याची वेगवेगळी सोय असते. एका कुटुंबातून आलेल्या लोकांची बरीच पंचाईत होते. कितीही वेगवेगळ ठेवायचं ठरवल तरी काही सामायिक सामान असतच. मग त्या लोकांच्या सारख्या फेऱ्या सुरू व्हायच्या. काही पतीसेवापरायण बायका सगळी सेवा करायच्या. आमच्या बरोबरची गुजराथची पायल नवऱ्याला अगदी पेस्ट लावून ब्रश हातात द्यायची. सकाळ झाली की तिचा नवरा संकेतभाई ‘ पायल, जरा ब्रश आपो तो’ करत दारात हजर!! एकदा हे लक्षात आल्यावर, तो दिसला की मी आणि नंदिनीच ‘पायल, जरा ब्रश आपो तो’ अस ओरडायला लागलो!!
जवळच्या आय.टी.बी.पी. कॅम्प मध्ये एक छोटस देऊळ होत. रोज संध्याकाळी तिथे भजन होत. आम्ही सर्व यात्री मिळून तिथे गेलो. सर्व जवान स्त्रिया व पुरुष मिळून अगदी जोषपूर्ण भजन म्हणत होती. पेटी, ढोलक आणि सगळ्यांचे टीपेला भिडलेले सूर!! यात्रीनीही त्यांच्या सूरात सूर मिसळून बरीच भजन म्हटली. त्या तरतरीत, उत्साही ,चुस्त जवानांची उर्जा आपल्याला मिळाली आहे अस वाटत होत
.
दुसऱ्या दिवशी विश्रांती आणि मेडिकल होती. विरळ हवेमुळे बऱ्याच जणांचा रक्तदाब वाढतो. थोडी विश्रांती झाल्यावर आमच्या बॅचमधले डॉ.शहा सगळ्यांचा रक्तदाब तपासून गेले. सगळे एकदम ओ.के!
आता उद्या काय होतय, ही थोडी काळजी होतीच. पण दिल्लीतल्या मेडिकलमध्ये नापास होऊन परत जाण्यापेक्षा मला गुंजीतून परत जायला चालल असत. अल्मोड्यापासून गुन्जीपर्यंतचा प्रवास खूप सुंदर होता. नाहीतरी विठ्ठलाच्या दर्शनापेक्षा वारकर्यांचा सहवास आणि पंढरपूर पर्यंतचा प्रवास लोभसवाणा असतो, नाही का?
दिनांक १९ जून २०११ (गुंजीतील मुक्काम)
सकाळी १० वाजता सगळ्यांना आपापले मेडिकल रिपोर्ट घेऊन तयार राहायला सांगीतल होत. दिल्लीतून निघताना क्ष-किरण तपासणी आणि अन्य रिपोर्ट जवळ ठेवायला बजावून सांगीतल होत. एखाद्या यात्रीला काही त्रास होऊ लागल्यास आधीचे रिपोर्ट डॉक्टरांना तुलना करायला उपयोगी पडतात.
आम्हाला दुसऱ्या दिवशी पुढच्या कालापानी कॅम्पला न थांबता नबीढांग ह्या भारतातील शेवटच्या कॅम्पवर पोचायचं होत. मेडिकल जर लवकर आटोपली तर कालापानीचे नऊ किलोमीटरचे अंतर आजच पार करावे असा सगळ्यांचा खल चालला होता. त्यामुळे लवकर लवकर मेडिकल संपवावी असे सगळ्यांचे प्रयत्न चालू होते.
चार्जिंगची गडबड
दोन दिवसांच्या मुक्कामात कॅम्पमध्ये केलेला पसारा
सकाळची मोठी बातमी म्हणजे आमच्या नारंग सरांनीच सगळे रिपोर्ट आणले नव्हते!! क्ष-किरण फोटो फार मोठा होता म्हणून त्यांनी दिल्लीतच ठेवला होता. बाकीचे रिपोर्टही सगळे न आणता, थोड्याच रिपोर्टची प्रत ते घेऊन आले होते.
एल.ओ. सरांना पूर्ण यात्रेत अग्रपूजेचा मान असतो. त्यानीच अशी गम्मत केल्यावर आय.टी.बी.पी. वाले डॉक्टर चांगलेच वैतागले. त्यांचा सगळा सैनिकी खाक्या. कोणी त्यांची शिस्त मोडलेली ते खपवून घेत नाहीत. इथे आमच्या एल.ओ. सरांशीच त्याचं वाजल्यावर त्यांनी दणादण लोकांना नापास करायला सुरवात केली. कोणाला न्युमोनियाची शंका, कोणाचा रक्तदाब जास्त तर कोणाच कॉलेस्ट्रॉल जास्त. कॅम्पवर वातावरण एकदम तंग झाल. पण दुपारनंतर परिस्थिती निवळली. माझ्या कमी हिमोग्लोबीन बद्दल त्यांनी काळजी व्यक्त केली. ‘चालण्याचा हट्ट न करता, जास्त चढ असेल तिथे घोड्यावर बसा,’ असा सल्ला दिला. हिमोग्लोबीन कमी असल्याने, विरळ हवेचा जास्त त्रास होऊ शकतो, अस त्या डॉक्टरांच म्हणण होत.
हळूहळू करत त्यांनी सगळ्यांना पास केल! हुश्य! आता मेडिकल नाही. संध्याकाळच्या भजनात सगळी बॅच पुढे जाणार ह्याबद्दल सर्वानी परमेश्वराचे आभार मानले. पण ह्या सगळ्या भानगडीत आमचा कालापानी गाठायचा बेत कुठल्या कुठे उडून गेला.
इथे फोनची सोय होती. ह्यानंतर तिबेटपर्यंत फोन नाही. त्यामुळे घरी फोन करून सगळ्यांशी गप्पा मारल्या. शनिवार असल्याने लेक घरी होता! त्याच्याशी बोलून खूप बर वाटल. माझ्या गप्पांमुळे त्याचा यात्रेचा गृहपाठ चांगला झाला होता. त्यामुळे त्याने सगळी बारीक-सारीक चौकशी केली.
दिनांक २० जून २०११ (गुंजी ते नबीढांग)
आज पुन्हा १८ किलोमीटर चालायचं होत. नबीढांग कॅम्प वरून ‘ओम पर्वताचे’ दर्शन होते. डोंगरात पडलेल्या बर्फामुळे त्या पर्वतावर ‘ओम’ चा आकार निर्माण होतो. दिवस चढेल अशी हवा खराब होते. दर्शन होण्याची शक्यता कमी कमी होते. त्यामुळे लवकरात लवकर पोचण्यासाठी सगळे उत्सुक झाले होते.
इतके दिवस चालताना पावसाने आजिबात त्रास दिला नव्हता. गुंजीची सकाळ मात्र पावसाची उजाडली होती. आय.टी.बी.पी. च्या प्रमुख अधिकाऱ्यांनी त्या पावसातच उभ करून पुढच्या प्रवासाची माहिती दिली. जवानांचे फोटो काढू नका. भारतातले फोटो तिकडे चिन्यांना दाखवू नका, अश्या स्वरूपाच्या सूचना दिल्या.
रोज सकाळी माझं आवरून होण्याआधीच हजर असणारी सुरेश-रमेशची जोडी आज मात्र गायब होती. थोडा वेळ त्यांची वाट बघितली, पण सगळ्यांनी चालायला सुरवात केली. अशी किती वाट बघणार? त्यामुळे त्यांना मनात शिव्या देत सॅक उचलून चालायला सुरवात केली.
सुरेख सजवलेले घोडे
आता विरळ हवा जाणवत होती. थोड चालल तरी जास्त थकायला होत होत. तरी रस्ता तुलनेने सोपा होता. गुंजीपासून नबीढांगपर्यंत वाहनांसाठी रस्ता बांधत आहेत. अजून काही वर्षांनी यात्रेचा हा भाग वाहनाने करता येईल. आत्तामात्र मी त्या रस्त्याशी झुंझत होते. तेवढ्यात नंदिनीचा घोडेवाला आला. त्याने माझी सॅक घेतली. अजून एक तासभर चालल्यावर सुरेश उगवला. ‘दीदी माफ करना. अलार्म नही बजा’ वगैरे सारवासारव करून माझे सामान उचलून चालायला लागला.
आज आमच्याबरोबर सगळ्यात पुढे-मागे दोन-दोन संगीनधारी जवान आणि एक वायरलेसधारी जवान, एक लष्करातील डॉक्टर, लष्करी अधिकारी असा लवाजमा होता. महिला यात्रींच्या सोयीसाठी काही महिला सैनिकसुद्धा ह्या तुकडीत असतात. आता इथून पुढची सगळी वाटचाल अश्या लष्करी शिस्तीत आणि देखरेखीत होणार होती.
जाताना उजव्या हाताला खूप दूर बर्फाच्छादित डोंगर दिसत होता. तो म्हणजे छोटा कैलास किंवा आदि कैलास. तिबेटमधील कैलासाची भारतातील प्रतिकृती. तिथे गौरी कुंड १७,५०० फुटांवर आहे. आदि-कैलासच्या पायथ्याशी पार्वती सरोवर आहे. असे एकूण पाच कैलास आहेत. तिबेटमधील महा-कैलास, आदि कैलास, मणी-महेश, किन्नोर कैलास आणि श्रीखंड कैलास. ह्या सगळ्या कैलासंच दर्शन घेऊन आलेल्या भक्तांना ‘पंचकैलासी’ अस म्हणतात.
आता इतके दिवस सोबत करणारे उंचच उंच पाइन वृक्ष आणि हिरवळ विरळ होत असल्याचे जाणवू लागले होते. डोंगरमाथ्याचे हिरवेपण सरत चालले होते. जिकडे बघावे तिकडे हिमाच्छादित पर्वत दिसत होते. वातावरणातील थंडी चांगलीच जाणवत होती. थंडीपासून बचावासाठी सतत हाताचे पंजे, पावले, कान आणि नाक झाकून ठेवा. एकच जड कपडा न घालता पातळ कपड्यांचे एकावर एक थर घाला, अश्या सूचना आम्हाला वारंवार मिळाल्या होत्या.
साधारण तीन तास चालल्यावर दुरवर डोंगरात कालापानी कॅम्प दिसत होता. इथेच ‘व्यास गुहा’ दिसते. ह्याच गुहेत बसून महर्षी व्यासांनी महाभारत लिहील अस म्हणतात. म्हणून ह्या डोंगराला ‘महाभारत पर्वत’ म्हणतात. आज मात्र पावसाची हवा असल्याने हे दर्शन आम्हाला झाले नाही.
कालापानी कॅम्पमध्ये कालीमातेचे मंदीर आहे. इथूनच काली नदीचा उगम होतो. ही नदी भारत-नेपाळ असे दोन भाग करते. इथे दर्शनानंतर आय.टी.बी.पी.च्या जवानांनी सर्वांना गरमगरम चहा दिला. सगळ्या कॅम्पमध्ये स्वच्छता, टापटीप जाणवत होती. एका बंकरमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांकडे सर्वांनी आपले पारपत्र सुपूर्द केले आणि इमिग्रेशन फॉर्म भरून दिला. भारतातून बाहेर जाण्याचा शिक्का मारून त्यांनी आमची पारपत्र आम्हाला परत केली.
काली मातेचे मंदीर
आता उत्सुकता होती ती ‘ओम पर्वताच्या’ दर्शनाची. पण अजून साधारण दोन हजार फूट चढाई बाकी होती आणि नऊ किलोमीटर अंतर. अजूनही उन्हाचा पत्ता नव्हता. जवान लोक ‘हौसला रखो. अभी मौसम खुल जायेगा.’ असा धीर देत होते. एव्हाना पाऊस थांबला होता पण कडक थंडीचा तडाखा जाणवत होता.
विरळ होत चाललेली झाडे, पाने, फुले ह्यांच्याकडे लक्ष देण्याची फार कोणाची मनस्थिती नव्हती. तरीही सभोवतालचे निरनिराळ्या आकाराचे, रंगांचे डोंगर तसेच इटुकली रंगीबेरंगी फुले लक्ष वेधून घेत होती.
नारंग सर सगळ्यांशी गप्पा मारून मनावरचे दडपण कमी करायचा प्रयत्न करत होते. नारंग सर उगीच शिस्तीचा बागुलबोवा करणाऱ्यातले नव्हते. ‘सगळे यात्री मोठे, समजदार आहेत. आपली आपली जबाबदारी ओळखून चाला, अश्या विचारांचे एल.ओ. मिळाल्यामुळे कोणतीही जबरदस्ती नव्हती.
ज्याच्या दर्शनाची आस घेऊन सगळे धडपडत, घाईघाईने आलो होतो, तो ओम पर्वत काळ्याकुट्ट ढगांच्या आड गेला होता. थंडगार वारा सुटला होता. ‘जोराच्या वाऱ्याने मळभ जाऊन आत्ता तुम्हाला दर्शन होईल. धीर धरा’ असे जवान, पोर्टर सांगत होते. सगळे कितीतरी वेळ त्या भयंकर थंडीत बाहेर दर्शनाची वाट बघत थांबले होते. पण आज निसर्ग आमच्यावर रुसला होता. काळोख झाला तरी ओमचे दर्शन काही झाले नाही.
दुसऱ्या भल्या पहाटे तीन वाजता चालायला सुरवात करायची होती. इथे जमा केलेले सामान एकदम तिबेटमध्ये मिळणार होत. होते नव्हते ते गरम कपडे चढवून आणि सुरेशला पहाटे वेळेवर येण्यासाठी दहादा बजावून रात्री आठ वाजता झोपायचा प्रयत्न सुरू केला होता. दुसऱ्या दिवशीचा प्रचंड थंडीतला प्रवास कसा झेपणार ह्याची खूप काळजी वाटत होती. खूप वर्ष मी ज्या यात्रेची स्वप्न बघितली, त्या यात्रेचा मोठा टप्पा उद्या संपणार होता. पण त्या विचारांनी आनंदी होण्या ऐवजी मला आत्तापर्यंतच्या केलेल्या ट्रेकमध्ये झालेले सगळे त्रास डोळ्यासमोर येत होते. ‘कशाला ह्या भानगडीत पडलो, उगाच सुखातला जीव दुखात टाकला’ असे सर्व बिचारे विचार मनात येत होते. नंदिनीसुद्धा आज खुशीत नव्हती. आत्ता जर कोणी रडायला लागल असत, तर तिला भरपूर कंपनी मिळाली असती!! सुदैवाने तस काही झाल नाही.
दिनांक २१ जून २०११ (नबीढांग ते लिपूलेख पास)
प्रचंड थंडीमुळे झोप काही फार चांगली लागली नाही. पण पहाटे १.३० वाजता चहा आला. सगळे खडबडून उठले. कसेबसे तोंड धुवून, प्रातर्विधी उरकून तयार झालो. काल झोपताना बरेच गरम कपडे अंगावर चढवून झोपले होते. उरलेले आता चढवले. हातमोजे, कानटोपी, पायात लोकरी मोज्यांच्या दोन जोड्या असा जामानिमा केला. एवढे कपडे थंडीला तोंड देण्यासाठी गरजेचेच होते. पण आधीच हवा विरळ, त्यात हे जडजड कपडे घातल्यामुळे श्वास कोंडल्यासारखे वाटत होते. शरीर जागे झाले तरी अजून मेंदू झोपलेला आहे, अशी भावना होत होती.
२.३० वाजता थोडा बोर्नव्हीटा घशाखाली ढकलला. २.३० ही वेळ घरी असताना साखरझोपेची. पण इथे मात्र सगळे कुडकुडत पुढच्या प्रवासासाठी तयार झाले होते. यात्रेत खूप वेळा ५.३०-६.०० वाजता नाश्ता केला होता. यात्रेतील प्रत्येक दिवसागणिक यात्रींचे शरीर आणि मन तेथील प्रदेश, हवामान, वारा, पाऊस, थंडी सगळ्याला तोंड द्यायला तयार झाले होते. धारचूलाची उंची ३००० ते ४००० फूट आणि आता नबीढांगला जवळजवळ १४००० फुटांवर होतो. आता शेवटच्या चढाईची परीक्षा द्यायची होती.
लीपूलेख खिंडीतील नयनरम्य दृश्ये
लीपुलेख खिंड म्हणजे १८००० फुटांच्या वर पसरलेले विस्तीर्ण पठार. भारत आणि तिबेट ह्यांना जोडणारा प्रदेश. त्याच्या दोन्ही बाजूंना आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे सैन्याच्या पहाऱ्याच्या चौक्या सोडल्या तर सगळा निर्मनुष्य प्रदेश आहे. आपल्या बाजूला नबीढांगपर्यंत आणि तिबेटमध्ये सहा किलोमीटरपर्यंत काहीच नाही. बर्फाच्छादित प्रदेशामुळे साधे गवताचे पातेदेखील उगवत नाही.
हा अतिशय लहरी हवामानाचा प्रदेश आहे. सकाळी दहानंतर कधीही सोसाट्याचा वारा सुटून हिमवादळाला सुरवात होऊ शकते. जर त्या वादळात कोणी सापडले तर जीवाशीच खेळ. त्यामुळे आपले जवान भारतातून तीबेटकडे जाणाऱ्या आणि तिकडून परत येणाऱ्या बॅचेसना सकाळी सकाळी साडेसातची वेळ देतात. म्हणजे बॅचेस सुखरूप तिबेटमध्ये तकलाकोट आणि भारतात नबीढांगला पोचतात. लीपुलेख खिंडीच्या भयंकर थंडीत अर्धा तास थांबण अतिशय कठीण असत. त्यामुळे दोन्ही बॅचेसनी वेळ पाळणे हे फार महत्त्वाचे असते.
काळोखाचे साम्राज्य सगळीकडे पसरले होते. आकाशात तारे लुकलुकत होते. लष्कराने चालण्याच्या वाटेवर लावलेले दिवे दिसत होते. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही, अश्या मिट्ट काळोखात चालायला सुरवात केली. प्रचंड हा शब्द कमी पडेल इतकी प्रचंड थंडी होती. लष्कराचे जवान,‘चलिये, भले शाब्बास, बोलिये ओम नमः शिवाय’ अस प्रोत्साहन देत होते. थोड अंतर चालल्यावर पावले हळूहळू जड वाटायला लागली. हृदयाचे जलद गतीने पडणारे ठोके माझे मलाच ऐकू येत होते. पोटातील मळमळ आणि डोकेदुखी जोर धरत होती. नबीढांग ते लीपुलेख हा यात्रेतीळ सर्वात कठीण,अवघड प्रवास असे ऐकले-वाचले होते. पण तो इतका अवघड असेल अस वाटल नव्हत.
शेवटी मी फार धोका न पत्करता घोड्यावर बसले. थोड्या चालण्याने थंडीतही घाम फुटला होता. आता घोड्यावर जास्तच थंडी वाजायला लागली. रात्रीची वेळ, थंडी आणि थकव्याने डोळे मिटू लागले. रमेश सारखा मला उठवत होता. ‘ दीदी, सोना मत. आंखे खुली रखो. बोलो ओम नमः शिवाय’ अस म्हणत होता. अस पेंगत, उठत असताना हळूहळू उजाडायला लागले. आता झोप उडली. सगळीकडे बर्फच बर्फ दिसत होते. नजर जाईल तिथपर्यंत सगळे उघडेबोडके डोंगर बर्फाने झाकलेले होते. सृष्टीतील जिवंतपणाची काही खुण नव्हती.
त्या विरळ हवेची थोडी सवय व्हावी म्हणून बऱ्याच वेळा सगळ्यांना थांबवत होते. आता आम्ही भारत आणि चीनमधल्या ‘नो मॅन्स लॅण्ड’ मध्ये प्रवेश केला होता. जवानांनी आपल्या जवळची शस्त्रे एका जागी ठेऊन दिली. एक जवान तिथे थांबला. आमचा काफिला पुढे चालू लागला. एखाद्या चित्रपटात शोभून दिसेल असच दृश्य होत. प्रदेशात जाण्याचा हा वेगळाच मार्ग होता. निर्वासितांची टोळी पळून चालली आहे असाच ‘सीन’ होता.
मला मी पुण्यात बँकेत डॉलर घ्यायला गेले होते, ती आठवण आली. डॉलरसाठी अर्ज करताना त्या बरोबर विमानाच्या जाण्या-येण्याच्या तिकीटाची प्रत जोडावी लागते. मी ती अर्थातच जोडली नव्हती. मी त्या अधिकाऱ्याला म्हटल, ’अहो, पण मी चालत चीनला जाणार आहे!’ तो उडालाच. सुदैवाने माझ्याकडे विदेश मंत्रालयाच पत्र होत. तेवढ्यावर त्याने मला डॉलर दिले.
साधारण सातच्या सुमारास आम्ही चीनच्या हद्दीवर पोचलो. सुरेश-रमेशच्या जोडीला त्यांचे ठरलेले पैसे व थोडी बक्षिसी दिली. त्यांच्या कष्टांची, सहकार्याची किंमत पैशात करणे अशक्य होते. त्यांनी ‘दिदी, संभालकर जाना. पहाड गिरता है. उपर-नीचे ध्यान रखना. घोडेपे ना बैठनेकी जिद मत करना. ठीकसे वापस आना.’ अश्या खूप आपुलकीच्या सूचना दिल्या. तस पाहता आमच अगदी व्यवहारिक नात. पण गेल्या काही दिवसांच्या सहवासानंतर मैत्र जुळले होते. त्यांचा, तसेच आय.टी.बी.पी.चे अधिकारी, जवान, डॉक्टर सगळ्यांचा भरल्या मनाने निरोप घेऊन आम्ही तीबेटकडून येणाऱ्या पहिल्या बॅचची वाट बघू लागलो.
थोड्याच वेळात पहिली बॅच आली. आम्ही सर्व यात्रीनी त्याचं ‘ओम नमः शिवाय’ च्या गजरात स्वागत केले. हे सगळे लोक अतिशय कठीण समजली जाणारी कैलास-मानसची यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण करून आले, ह्याच कौतुक वाटत होते. सगळे एकमेकांच्या पाया पडत होते. भक्ती आणि भावनांना पूर आला होता. माझ्यासारख्या नास्तिक व्यक्तीलाही ते भारलेल वातावरण स्पर्श करत होत.
पहिल्या आणि आमच्या तिसऱ्या बॅचच्या सामानाचा डोंगर
पहिल्या बॅचबरोबर चीनचे लष्करी अधिकारी आले होते. त्यांनी आमची पारपत्रे ताब्यात घेतली. आम्ही डोक्यावरच्या टोप्या, स्कार्फ काढून ओळख परेडसाठी उभे राहिलो. त्यांच्याकडची कागदपत्रे, आमची पारपत्रे सगळ दहा वेळा बघून त्यांनी ‘मी’ खरच ‘मी’ असल्याची खात्री पटवली आणि आम्ही तिबेटमध्ये पहिले पाउल टाकले!!
ह्या पुढचे भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा!
भाग ४: मुक्काम तिबेट : http://www.maayboli.com/node/31261
भाग ५: महाकैलासची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31407
भाग ६: मानस सरोवराची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31704
भाग ७: तकलाकोट ते लीपुलेख खिंड : http://www.maayboli.com/node/31889
भाग ८: लीपुलेख खिंड ते गाला : http://www.maayboli.com/node/32246
सुरेख चलू आहे प्रवास.
सुरेख चलू आहे प्रवास.
हा भाग पण मस्त.........!!!
हा भाग पण मस्त.........!!!
मस्त अनुभवते आहे यात्रा
मस्त अनुभवते आहे यात्रा तुमच्या सोबत
वाचायला सुरुवात केली तेव्हा
वाचायला सुरुवात केली तेव्हा हा भाग घाईघाईत गुंडाळला जाणार की काय असे वाटत होते पण नंतर वाचण्यात गुंगून गेले अगदी रौद्र सौंदर्य, तरीही मनावर भुरळ घालणारे ! यात्रिक किंवा निसर्ग कुणाच्याही इच्छाशक्तीने दगा दिला तर यात्रा पूर्ण होणे अशक्यच.
व्वा मस्तच. तिनही भाग आज
व्वा मस्तच. तिनही भाग आज एकदमच वाचले. खरतर थोडे अजुन थांबुन सगळे एकदमच वाचायला हवे होते असे शेवट वाचताना वाटले.
पुढचा भाग लवकर लिहा.
एकदातरी यात्रा करणार हे नक्की
मस्तच. एकदम मस्त झालाय हा भाग
मस्तच. एकदम मस्त झालाय हा भाग पण.
प्लीज प्लीज प्लीज तुम्ही हे भाग प्रवासाचे अनुभव या ग्रूपमध्ये लिहीणार का?
मायबोलीवर लॉग इन केल्यावर उजवीकडे दिसतो तो "नवीन लेखन करा" हा पर्याय वापरू नका. पुढचा भाग लिहीण्यासाठी इथे जा http://www.maayboli.com/node/2240 आणि तिथे असलेला "नवीन लेखनाचा धागा" पर्याय वापरून भाग चार लिहा.
मी या आधीचे २ भाग प्रवासाचे अनुभव मध्ये हलवायला सांगितले आहेत.
हेवा वाटतो आहे अनया सुरेख
हेवा वाटतो आहे अनया सुरेख लिहित आहेस. फोटोही सुरेख.
तुम्हां लोकांच्या इच्छाशक्तीचंही कौतुक.
सुरेख लिहीलयस. मस्त अनुभव
सुरेख लिहीलयस. मस्त अनुभव लिहीलेयस , खरोखरच तुमच्या ईच्छाशक्तीला सलाम.
जबरीच !! दोन्ही भाग आत्ता
जबरीच !! दोन्ही भाग आत्ता वाचले.. मस्त झाले आहेत.. !
अनया आमचीही सुरेख यात्रा सुरु
अनया आमचीही सुरेख यात्रा सुरु आहे. मानसरोवर यात्रेला जायच्या इच्छेने परत डोकं वर काढलंय आता.
व्वा! अनघा तुझं कौतुक वाटतं!
व्वा! अनघा तुझं कौतुक वाटतं!
भारी!!! लिखाणाची शैली मस्त
भारी!!! लिखाणाची शैली मस्त आहे..
मस्त. फोटो पण सुरेखच आहेत.
मस्त. फोटो पण सुरेखच आहेत.
अतिशय सुरेख लिहीलय तुम्ही.
अतिशय सुरेख लिहीलय तुम्ही. पहीले दोन्ही भाग छान आहेत. फोटो दिल्यामुळे यात्रा किती खडतर आहे याची थोडी कल्पना येतेय.
सुरेख.
सुरेख.
सॉलिड..... आता खरी उत्सुकता
सॉलिड..... आता खरी उत्सुकता सुरु झाली. चीन मध्ये घुसल्या वर काय होतय ह्याची मला जस्त उत्सुकता आहे. फारच मस्त......
अनया, हा भागही सुरेख. फोटो तर
अनया, हा भागही सुरेख. फोटो तर अप्रतीम.
>>>मागच्या वर्षी एक
>>>मागच्या वर्षी एक महाराष्ट्रातले यात्री परिक्रमा संपवून परत येत होते. तेव्हा फोटो काढण्यासाठी नदीच्या बाजूला उभे राहिले, आणि सामान वाहून नेणाऱ्या खेचराने त्यांना धक्का दिला. ह्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, पण कालीच्या प्रवाहामुळे त्यांचा मृतदेहसुद्धा हाती लागला नाही. त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत होत्या. त्यांनी हा धक्का कसा सहन केला असेल देव जाणे.<<<
ते यात्री माझे नातेवाइक होते.... फार मोठा धक्का होता तो आमच्यासाठी.. तुमची लेखमाला वाचतान्ना तेच सारखे डोळ्यासमोर येत होते.
बापरे इतका सुंदर पण खडतर
बापरे इतका सुंदर पण खडतर प्रवास!! _/\_
प्रवासवर्णन आणि मस्त फोटो याबद्दल खूप खूप धन्यवाद!
वॉव काय आहे हे !! धन्यवाद
वॉव काय आहे हे !! धन्यवाद अनया.
चालत, रडत-खडत, सरपटत कसेही जावे पण जावे एकदातरी असे वाटते आहे वाचून आणि फोटो पाहुन.
ही एक महायात्राच वाटते आहे.
अप्रतिम भाग आहे हा सुद्ध्हा.
अप्रतिम भाग आहे हा सुद्ध्हा. वाचून, फोटो पाहून काटा आला अंगावर.
हे वाचुन वाटतय आता एकदा अशी
हे वाचुन वाटतय आता एकदा अशी कैलास मानस केलीच पाहिजे.
मी नेपाळ वरुन केली आहे. ती पण भन्नाट आहे. पण ही वेगळीच आहे
निव्वळ शब्दातून प्रवास
निव्वळ शब्दातून प्रवास घडवण्याची किमया साधलीय इथे. सुंदर.
रूनी : तुमच्या सुचनेनुसार
रूनी : तुमच्या सुचनेनुसार पुढचा भाग नक्की ‘प्रवासाचे अनुभव’ इथे लिहीन. हे तीनही भाग तिथे हलवता येतील का?
प्रांजू: अरेरे. आम्हाला तिथे हे कळल्यावर खूप हळहळ वाटली होती. तुम्हाला हा धक्का पचवायची शक्ती देण्याची शिवशंकराकडे प्रार्थना.
आरती, रैना, आउटडोअर्स : खरच मनावर घ्या ही यात्रा करण्याच. माझ्यासारख २० वर्षे थांबू नका. आता जानेवारीत प्रक्रिया सुरू होईल.
बाकी सर्वांना प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
अनयाजी सलाम तुम्हाला..
अनयाजी सलाम तुम्हाला..
_/\_
अप्रतिम भाग.
प्रवासवर्णन आणि मस्त फोटो याबद्दल खूप खूप धन्यवाद!
सुरेख ओघवती शैली आहे तुमच्या
सुरेख ओघवती शैली आहे तुमच्या लिखाणाची. वाचतच रहावंसं वाटतं. आमचीही व्हर्च्युअल यात्रा घडते आहे तुमच्यामुळे धन्यवाद.
पुढचा भाग कधी? खुप उत्सुकता
पुढचा भाग कधी? खुप उत्सुकता लागलीये
सुरेख लेखन. मी आणि नंदिनी
सुरेख लेखन.
मी आणि नंदिनी गप्पा मारणे आणि मजा करणे ह्या महत्वाच्या कामाला लागलो. ह्या गप्पात अस लक्षात आल की ती अमावस्येची रात्र होती. त्या रात्री चंद्रग्रहण होत. रात्री गजर लावून उठायचं अस पक्क करून टाकल. >> चंद्रग्रहण पोर्णिमेला असते आणि सुर्यग्रहण अमावस्येला.
अनया, काय प्रतिसाद द्यायचा.
अनया, काय प्रतिसाद द्यायचा. शब्दच सुचत नाहीत. अप्रतिम.................................!.
फार छान लेख
फार छान लेख
Pages