सोलापुर म्हटले की पहिली प्रतिक्रिया बहुदा, 'ते चादरवालं?' किंवा 'बापरे काय तो उन्हाळा!' यापैकी एक हमखास असते. हे ऐकून बहुतेक सोलापुरकर इतके सरावलेले असतात की बर्याच वेळेला स्वतःच अशी ओळख करुन देतात. आपल्याच गावाची नालस्ती करण्यात पुढाकार घेणारे हे महान लोक आहेत. पण त्यात कसलाही न्युनगंड वगैरे काही नाही, ती त्यांची हल्ला टाळण्याची एक पद्धत आहे.
जगाच्या पाठीवर कुठेही दिसणारी आणि सोलापुरचे नाव ठळकपणे मिरवणारी चादर त्याच्या अभिमानाचा विषय जरुर आहे, पण या लोकांना स्वतःची टिमकी वाजवण्याची सवयच नाही. एखाद्या अस्सल सोलापुरीपुढे तुम्ही या चादरींचं कितीही तुफान कौतुक केलत तरी, 'हां, हाये ते' असा एक अत्यंत तोकडा उल्लेख होइल व विषय संपेल. आणि उन्हाळ्याचं म्हणाल तर खर्या सोलापुरी माणसाला त्याचा अजिबात त्रास होत नाही. फारच उन झालं तर तो शांतपणे सगळी कामं सोडून घरात बसतो, टोप्या वगैरे घालणे इथं भ्याडपणाच समजतात.
प्रत्येक गावाचे काही मानबिंदु असतात ( मानबिंदु जितके जास्त तितकी गावाची मान लांब असा निकष लावला तर पुणे म्हणजे एक जिराफ आहे!). सोलापुरचे मानबिंदु दोन-एक तर ४२ च्या चळवळीत फासावर गेलेले चार हुतात्मे आणि दुसरे सिद्धरामेश्वर. स्वातंत्र्य चळवळीत मार्शल लॉ लागू झालेलं हे एकमेव गाव अस प्रत्येक सोलापुरी मुलाने लहानपणापासून एकलेलं असतं. त्यामुळे पुस्तकात लिहीलेला इतिहास हा आपल्या गावात घडला हे एक जोरदार फिलींग इथं सर्वांना असतं. यामुळेच की काय कुणास ठाउक, पण भांडखोरपणा इथे ठासून भरला आहे. दोन सोलापुरी मित्र जेव्हा कोठेही भेटतात तेव्हा प्रथम पोटात गुद्दे मारुन, 'काsss बे माज आलायं का लई' असं कानडी हेलात जोरदार स्वागत करतात. शारिरीक जवळीक ही यांच्या एटीकेट्सचा एक भाग आहे. राजकारणात मात्र या भांडखोरपणामुळे कुठलेच नेतृत्व वा पक्ष इथं एकदम सेटल झालयं असं होत नाही.
मुळात हे एक सर्वार्थाने 'मल्टिकल्चरल' गाव आहे. मराठी,कन्नड,तेलगू आणि सोलापुरी हिंदी (ही एक वेगळी भाषा आहे!) अशा चार भाषा,अनेक पंथ, आणि संस्क्रुती याची ही एक भेळ आहे. त्यामुळे नुसतं सोलापुरात राहतो ह्या वाक्याला काही अर्थ नाही, सोलापुरात कुठं? हे महत्वाचं. ही सगळी विसंवादी पात्र एकत्र राहण्यामागे बसवेश्वरांच्या समन्वयवादी शिकवणीचा मोठाच वाटा आहे.
सोलापुरी मराठीलाही बेळगावप्रमाणे कन्नड हेल आहे. पण त्यातला गोडवा? तेवढं सोडून बोला. फटके मारल्यासारखं बोलण्याची इथे पदधत आहे. उदा. अमेरिकेवरुन परतलेल्या मित्राला 'काsss बे अमेरिकेला जौन बी काळंच की बेss तू', या थाटात चहा पाजतील. अर्थात मनात काही वाईट भावना ठेउन हे मुळीच नसतं. नवीन माणसं असल्या बोलण्याने गांगरतात आणि सोलापुरकरांबद्दल गैरसमज करुन बसतात. इथल्या दुकानदारांचे मराठी आणि धंदा करायची पद्धत तर अवर्णनीय आहे. एक तर जास्त माल दाखवणं हा अपमान समजतात, दुकानात जर काही नसेल तर ते आख्या सोलपुरातच नाही हे पटवतात किंवा 'बोंबेउन मागवलेय' या आश्वासनावर बोळवण करतात. कुठल्याही नव्या गोष्टीने हे एक्साईट होत नाहीत, आणि कमीतकमी शब्दात कशाचेही ग्लॅमर घालवण्यात तज्ञ आहेत. आमचा एक नवीन लग्न झालेला मित्र हौसेने बायकोला घेउन रुम फ्रेशनर घ्यायला गेला. 'ते मिस्ट आहे काय हो' अशा नाजुक विचारण्यावर; 'सिद्ध्या, ते धुरळा उडतयं ते दाखव म्याडमला', या थाटात पार कचरा करुन मालक पोट खाजवायला मोकळे झाले!
सोलपुरी हिंदी ही कचाकचा भांडायसाठी जगातली अत्यंत पावरबाज भाषा. मराठी आणि हिंदी मधल्या 'वेचक आणि वेधक' शब्दांना सणसणीत कानडी फोडणी दिली की हा पदार्थ बनतो. सोलापुरात बेगमपेठ नावाचा भाग आहे. असं म्हणतात की औरंगझेबाने त्याच्या बेगमांना इथं ठेवलं होतं. यावर आमचे संशोधन असे की थोड्या दिवसांनी जेव्हा तो लढाया करुन परत आला तेंव्हा बेगमांचं हिंदी एकून त्याने हाय खाल्ली व त्यातच त्याचा अंत झाला!
खाण्याच्या बाबतीतही सोलपुरात बरीच सरमिसळ आहे. सोलापुरची खासियत म्हणजे शेंगादाण्याची जहाल चटणी आणि ज्वारीची भाकरी. हा पदार्थ जरी सर्व महाराष्ट्रात बनत असला तरी सोलापुरकरांची त्यावर मास्टरी आहे. इडली हा त्यांचा दुसरा वीक पॉईंट, अर्थातच इथे सीमाभागात असल्याचा प्रभाव स्पष्ट आहे. सोलपुरात कित्येक होटेल्स केवळ सकाळी काही तास इडली-चटणी विकतात आणि बाकी वेळा बंद.
सोलापुरकरांचा अत्यंत आवडता विरंगुळा म्हणजे चित्रपट. सिनेमाचे इतके प्रचंड वेड असलेले दुसरे गाव कुठेही नसेल. इथे सिनेमा बघायला पाल़कांची परवानगी घेतली जात नाही (नवीन बालसंगोपनाच्या मागे लागून हा प्रकार अलीकडे सुरु झाल्याचे ऐकीवात आहे,काय चाललय हे?). मल्टीप्लेक्स नाव ही कुणाला माहिती नसल्यापासुन ती इथे आहेत. त्यामुळे सिनेमाला जाउन तिकीट मिळालं नाही म्हणुन परत येणं इथं पाप समजतात.हा नाही तर तो कोणतातरी बघायचाच. त्यामुळे सहसा कुठला सिनेमा इथं फ्लॉप होत नाही. मिथुन,अमिताभ इ.इ. च्या पडत्या काळात सोलापुरी जनतेने त्यांना उदंड सहारा दिला आहे. लोकसंख्येच्या मानाने इथे खुपच म्हणजे जवळपास १५ थेटर्स आहेत. त्यातले काही फक्त कन्नड किंवा तेलुगू सिनेमे दाखवतात आणि सगळेच चालतात. असं आहे म्हणुन थेटर्स स्वच्छ वगैरे अजिबात नाहीत, उलट मुतारी, घाम, पानाच्या पिचकार्या आणि उच्छ्वास यांचा मिळुन येणारा दरवळ नसेल तर सिलेमाचा फीलच येत नाही. पंखे कधितरीच चालतात आणि उकाडा तर कायमचाच म्हणुन लोक शर्ट काढून डोक्याला गुंडाळतात. आवडतं गाणं लागलं की तोच फिरवून नाचतात किंवा धासू डायलॉगला हवेत उडवतात. शांतपणे सिनेमा पाहणे एकदम नामंजूर. त्यामुळे पुण्यात पहिल्यांदा सिनेमा पाहताना माझी जाम गोची झाली होती. तिथे काय सगळेच समीक्षक, त्यामुळे विनोदी प्रसंगालाही लोक दातातल्या दातात हसत होते, मी हैराण. सतत बडबड करीत सिनेमा पाहिला तरचं त्याचे पैसे वसूल होतात यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. जुन्या काळात मुगले आझमच्या प्रिंट्स वरातीतून आणण्यापासून रेफ्युजी रिलीज झाल्यावर बच्चनचा मुलगा आला म्हणुन आख्या थेटरला पेढे वाटण्यापर्यंत या मॅडनेसचे अनेक किस्से आहेत.
मला नक्की खात्री आहे की हा लेख वाचूनही, 'काsss बे लई ल्ह्याय्लास की' या शब्दात माझे 'कौतुक' होईलं, खांद्यावर जोरदार बुक्की बसेल आणि मग आम्ही इडली खायला मोकळे होऊ!
स्वप्ना मग तुला यापुढे
स्वप्ना मग तुला यापुढे सोलापुर की शोलाच म्हणनार मंग
छान लिहीलं आहे. लहानपणीच्या
छान लिहीलं आहे. लहानपणीच्या आठवणीतलं सोलापूर डोळ्यासमोर उभं राहीलं. गड्ड्याची जत्रा हे सोलापूरातलं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. रेल्वे लाईन जवळच्या कापडाच्या मिल्स आणि भोंगे हे सुद्धा सोलापूरचं अजुन एक वैशिष्ट्य. बाकी लोकं प्रेमळ आहेत...काही ठराविक शहरांतल्या सारखी खविस नाहीत. उगाचच टिमक्या वाजवत बसत नाहीत. (हे सुद्धा खरंय). नागपूरात सुद्धा 'बे' या शब्दाचा वापर असाच भरपूर आहे. बाकी अशाप्रकारे सिनेमाचं वेड हे दक्षिणेकडे जास्त दिसतं. तेलुगू आणि लिंगायत कन्नड यांचा प्रभाव अधिक असल्याने अशाप्रकारे (हिरोच्या फोटोला मोठमोठाले हार घालणे) सिनेमाप्रेम ओसंडून वहाणं आलेलं असणार. पाण्याचा प्रश्न सुटला तर रहायला एकदम छान गाव आहे.
बाकी लोकं प्रेमळ आहेत.
बाकी लोकं प्रेमळ आहेत. >शांतीसुधा तुमचा आम्हा सोलापुरकरांविषयी बराच गैरसमज आहे वाटतं.

श्री, गैरसमज
श्री, गैरसमज नाही.....स्वानुभव आहे. सोलापूरातले लोक बघीतले आहेत. कदाचित मला भेटलेले प्रेमळ असतील..आपला अनुभव वेगळा असू शकतो.
काय बे श्री, मी प्रेमळ वाटलो
काय बे श्री, मी प्रेमळ वाटलो नाही का बे ?

भेट तुला दाखवतोच...
शांतीसुधा, अनुमोदन. मल्ली,
शांतीसुधा, अनुमोदन.
मल्ली, मिळुनच श्री यांची भेट घेवु,
बाकी आगावु यांच्या ३ वर्षे
बाकी आगावु यांच्या ३ वर्षे जुन्या लेखाला नवीन फोडणी देवुन त्याचा टी.आर. पी. वाढविण्याचे एक सत्कॄत्य आपल्या हातुन पार पडले.
मल्ली अरे म्हण की मंग
मल्ली अरे म्हण की मंग बिनधास्त आपल्याला काय बी प्रॉब्लेम नै..
मग कधी करायचं गटग?
मग कधी करायचं गटग?
जानेवारी - फेब मधे करणार असाल
जानेवारी - फेब मधे करणार असाल तर मी पण असेन .... :-)....
अरे.. ह्या लेखावर चक्क मी
अरे.. ह्या लेखावर चक्क मी प्रतिक्रियाच नाही दिली?? धिक्कार (माझा)!!
आगाव, सग्गळे सग्गळे पटले.
म्हणजे कसे, भावाला मी पुर्वी कधी विचारले, 'नविन कोणते सिनेमे पाहिलेस?' तर एका शब्दात उत्तर यायचे, 'सगळे'.
भाऊ व त्याचे मित्र ह्यात 'बे' कॉमन. तसेच एकमेकांना बोलवायला हाका मारायचे कष्ट न घेता नुसताच 'ट्टॉक्क' असा आवाज, मग तसा आवाज लगेच सगळीकडुन यायचा व मग सगळे घाईने घराबाहेर यायचे.. (हे बाकी कुठे अस्तित्वात असेल तर माहिती नाही).
चादरीचा अभिमान... तंतोतंत.
नसलेची चटणी .. इथे मरतात लोक ती खायला. व त्यांची ते कडक भाकरी. आजकाल निसर्ग ची मटकी उसळ फार आवडते.
सिद्ध्या, ते धुरळा उडतयं ते दाखव म्याडमला' >> पडलेच.
फक्त बेगमपेठेतले हिंदी कधी ऐकले नाही.
हरीभाईतली भैय्याची भेळ.
सुप्रजा पावभाजी.... जगात तशी पावभाजी कुठे बनत नाही असे आपले मला बापडीला वाटते. तिथुन जाताना काय वास सुटलेला असतो!!!!!!!!!!!!!!!! अरे देवा!!
सोलापुर ची पार्का वरची पाणी
सोलापुर ची पार्का वरची पाणी पुरी>>>>>>>>>>>>>>>> ++१
शेंगाचटणी कायमच हवी वाटणारी.
आता तर निसर्गला फुटबॉल भाकरी
आता तर निसर्गला फुटबॉल भाकरी मिळते. एकदम टम्म फुगलेली. लईच भारी लागते ...:)तोंपासु
एका लेखात सगळे मुद्दे येणे
एका लेखात सगळे मुद्दे येणे शक्य नाही आणि योग्यही नाही. आणखी खूप मुद्दे विसरले आहेत. पण सोलापुरी भाषेचा डोस तुम्ही चांगलाच गळ्याखाली उतरवला आहे आणि हाती घेतलेले इतर मुद्दे पण झकास मांडले आहेत. पुण्यात वा मुंबईत दोन सोलापूरकर त्यांच्या नैसर्गिक मराठीत बोलत असतील तर तिसरा सोलापूरकर ते सोलापूरचे आहेत हे सहज ओळखतो. अस्सल सोलापूरकरही शुद्ध भाषेतही बोलू व लिहू शकतो हे दाखवण्यासाठी हा प्रतिसाद!
आणि काय हो (प्रतिसाद देणार्यांपैकी एक ) विशाल कुलकर्णी, ७०० प्रतिक्रिया मिळवणारा सावरकरांवरील लेख तुमचाच काय? तुम्ही पण मुळचे 'सोलापुरी'च काय?
७०० प्रतिक्रिया मिळवणारा
७०० प्रतिक्रिया मिळवणारा सावरकरांवरील लेख>> याचा आणि विशाल कु. सोलापूरी असायचा काही संबंध नसावा!
@दामोदरसुत : अर्थातच हे
@दामोदरसुत : अर्थातच हे बेणंबी सोलापूरचंच हे...

पण आगाऊ म्हणतो तसं त्या लेखाचा आणि आम्ही सोलापूरकर असण्याचा तसा काही संबंध नाही. आम्ही पुणेकर असतो तरी त्या लेखाला तेवढ्याच प्रतिक्रिया आल्या असत्या
<<<काय बे श्री, मी प्रेमळ वाटलो नाही का बे ?>>>> त्याला काय इच्च्यारतो बे, मला इच्यार मंग सांगतो !
फुटबॉल भाकरी >>> भाकरी टम्म
फुटबॉल भाकरी >>> भाकरी टम्म फुगलेली असल्यामुळे म्हणताय की , फुटबॉलसारखी चिवट ( तोडायला कठीण ) असल्यामुळे म्हणताय.

हे निसर्ग म्हणजे चिंचोळी एमआयडीसी जवळचं का ?
<<<काय बे श्री, मी प्रेमळ वाटलो नाही का बे ?>>>> त्याला काय इच्च्यारतो बे, मला इच्यार मंग सांगतो ! >>> विशालने सांगितलयं बघ मल्ली
हो श्री फुटबॉलसारखी टम्म
हो श्री फुटबॉलसारखी टम्म फुगलेली पण चिवट नाहि. खाऊन बघ म्हणजे कळेल
एक सोलपुरी दुसर्या
एक सोलपुरी दुसर्या सोलापुरीशी बोलताना "काल तो माझ्याकडे आला होता" असे अजिबात म्हणत नाही. "काल त्यानं माझ्याकडे आला होता"
विकु काल त्यानं नाही तेनं
विकु काल त्यानं नाही तेनं माझ्याकडं आला होता किंवा आल्ता बे असं आहे ते
स्वप्ना... २००% सहमत
स्वप्ना... २००% सहमत
हो हो स्वप्ना,विकु(दोन्ही)..
हो हो स्वप्ना,विकु(दोन्ही).. अकरावीत दोन मुलं वर्गात भांडु लागली. मग सर दोघांना रागावले व काय झालं विचारल तेव्हा एकजण (निर्दोष होता तो) म्हणाला, 'तेनं मला मारला सर'. ते ऐकुन सर कापरासारखे पेटले व त्यालाच ओरडले, 'तु आधी नीट बोल'. बिच्चारा
(मग आम्ही बाकीचे फिदीफिदी हसलो).
स्वप्ना... २००% मोदक.
स्वप्ना... २००% मोदक.
आम्च्यात " तेनी आला, तिनि
आम्च्यात " तेनी आला, तिनि गेली" असे म्हणतात
अगदी मुग्धानंद माझ्या आईच्या
अगदी मुग्धानंद
माझ्या आईच्या शाळेतली मुलं तर हेनी मला मारलाय बाई , मी नाई बै हेनी म्हणलाय मी नाई..असं बोलतात मला अगदी भरून पावल्यासारखं होतं ते ऐकलं की 
एक करेक्शन.... मी नाई बै
एक करेक्शन....
मी नाई बै हेनी म्हणलाय मी नाई..
मी नै बै.....
रेल्वे स्टेशनसमोरचा
रेल्वे स्टेशनसमोरचा 'अमृततुल्य' चहा! अहाहा!!!!
वरचे सगळे प्रतिसाद वाचून मला
वरचे सगळे प्रतिसाद वाचून मला देशपांडे गुरुजींचे हास्यकल्लोळ आठवतय.......
छान लिहीलं आहे. खुपशा आठवणीना
छान लिहीलं आहे. खुपशा आठवणीना उजाळा मिळाला.
माझाही स्वानुभव आहे. मलाही भेटलेले सोलापूरकर प्रेमळ आहेत.
लै भारीये... बे चा पाढा.....
लै भारीये...
बे चा पाढा..... हा हा हा ...
Pages