मराठी अभिजात भाषा : केंव्हा आणि कशी?

Submitted by pkarandikar50 on 6 March, 2009 - 03:24

मराठी अभिजात भाषा : केंव्हा आणि कशी?

सॅन होजेला मराठी साहित्य संमेलन झाल्यानंतर आपल्याकडे जे काही विचार मंथन सुरू झाले आहे त्यातून मराठी भाषा ’अभिजात’ भाषा व्हावी असा विचार मांडला जाऊ लागला आहे. माझ्या मते, एखाद्या समाजांतले अभिजन त्यांच्या रोजच्या व्यवहारांत ज्या भाषेचा प्रामुख्याने वापर करतात ती त्या समाजाची ’अभिजात’ भाषा असे मानले जाते. साहजिकच, आधी आपण महाराष्ट्रांत कोणाला अभिजन समजणार ते ठरवायला हवे. साधारणत: राज्यकर्ते [त्यांत लोकप्रतिनिधी, शासनांतील आणि न्याय-व्यवस्थेतील अधिकारी आणि नोकरवर्ग आले]; उद्योग, व्यापार, अर्थ, शिक्षण, कृषि, संशोधन, समाजकारण, राजकारण, कला, साहित्य, मनोरंजन, प्रसार माध्यमे इ. विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्ती आणि समाजांतील इतर प्रतिष्ठीत व्यक्ती या सर्वांचा या व्याख्येंत समावेश होऊ शकेल. महाराष्ट्रांतले असे अभिजन त्यांच्या दैनंदिन जीवनांत व व्यवहारांत प्रामुख्याने कोणती भाषा आज वापरतात आणि ते वाढत्या प्रमाणांत मराठी कसे वापरतील हे पहावे लागेल.

अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण; उद्योग, व्यापार, वित्त आदि क्षेत्रांमधले राष्ट्रव्यापी आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार पाडण्याची सुविधा; संगणकासारख्या तंत्रज्ञानांचा वाढता वापर; उच्च शिक्षणाच्या सोयी इत्यादि अनेक कारणांमुळे इंग्रजी भाषेचे महत्व आणि वापर वढतच जाणार आहे. त्यांत घट होण्याची शक्यता नाही. भारतासारख्या बहुभाषिक, बहुप्रांतिक देशात संपर्क-माध्यम म्हणून इंग्रजीला आज जे स्थान आहे ते कोणत्याही भारतीय भाषेला प्राप्त होणे दुरापास्त आहे.

मग राहिला राज्य-स्तर. निदान ह्या स्तरावर तरी मराठी भाषेचे महत्व वाढते आहे काय? त्यासाठी काही ठोस आणि नियोजनबद्ध प्रयत्न होत आहेत काय? मराठी भाषेंतली वर्तमानपत्रे-नियतकालीके, दूरदर्शन वाहिन्या, नाटके, चित्रपट, पुस्तके यांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे निदान ’ मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे काय?’ ह्या विषयावर परिसंवाद भरवण्याची वेळ अद्याप आलेली नाही, हे खरे पण तेवढ्याने भविष्याकाळाचे चित्र आशादायी वाटत नाही हेही तितकेच खरे आहे.

उच्चशिक्षित आणि शहरी समाजात वावरणार्‍या आणि आधुनिक ग्राहकवादाचा [किंवा पत्रकारांचा आवडता शब्द -चंगळवाद] मनापासून स्वीकार केलेल्या आजच्या तरुणाईला मराठी भाषेविषयी कितपत आस्था आहे आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे, कितपत ज्ञान आहे? हा वर्ग त्यांच्या रोजच्या व्यवहारांत किती प्रमाणांत आणि कोणती मराठी वापरतो? ह्या वर्गाच्या रोज-व्यवहारांतल्या भाषेला कवी संदीप खरे ’मिंग्लीश’ म्हणतात. [मराठी + इंग्लीश = मिंग्लीश]. हळू हळू प्रसार माध्यमांनीही याच धेडगुजरी भाषेला जाणीवपूर्वक जवळ केले आहे. नित्य सवयीच्या इंग्रजी शब्दांचे सहज, सोपे मराठी प्रतिशब्द रुळलेले नसले तरी अट्टाहासाने अवघड मराठी शब्दच वापरावेत असा माझा आग्रह नाही. पण जिथे अशी अडचण नाही तिथेही ’मिंग्लीश’ काय म्हणून वापरावे?

मराठी वाहिन्यांच्या मराठमोळ्या कार्यक्रमांची शीर्षके आताशा देवनागरी लिपीतल्या इंग्रजी भाषेंत ठेवण्याची पद्धत आली आहे. गुड मॉर्निंग महाराष्ट्र, ग्रेट भेट, एम२जी२, मॉर्निंग न्यूज, लिल चॅम्प्स, प्राईम टाईम अशी डझनावारी उदाहरणे आपल्या परिचयाची आहेत. बातम्या आणि इतर कार्यक्रमांच्या अंतर्गत वापरली जाणारी भाषाही [उच्चारांचे तर सोडूनच द्या] अशीच असते. ’सेहवागची सेंचुरी थोडक्यांत मिस झाली पण त्याने बारा बौंड्रीज आणि चार सिक्सर्स मारल्या आणि नंतर तीन विकेटसही काढल्या. त्याला आजचे 'मॅन ऑफ द मॅच' अवॉर्ड मिळाले’ ह्यांतले किती इंग्रजी शब्द अपरिहार्य असल्याने नाईलाज म्हणून वापरावे लागले? काही वर्षांपूर्वी क्रिकेट सामन्य़ांचे धावते वर्णन मराठीतून देण्याचा एक चांगला प्रयत्न आकाशवाणीने केला होता. त्यामुळे शतक, चौ्कार, षटकार, बळी, सामनावीर, षटके, क्षेत्ररक्षक, अनिर्णित. यष्टीरक्षक असे कितीतरी मराठी प्रतिशब्द निघाले आणि महत्वाचे म्हणजे ते सहजपणे रुळले. ते प्रतिशब्द आज माध्यमांना का नकोसे व्हावेत?

मराठी वर्तमानपत्रांतल्या अगदी ठळक बातम्यांच्या मथळ्यांमधे कितीतरी अनावश्यक इंग्रजी शब्द सर्रास वापरले जातात. लेखांच्या शीर्षकांचेही तसेच! अगदी ताजे उदाहरण घ्यायचे तर लोकसत्तेतल्या ’दि क्युरियस केस ओफ़ स्लमडॉग मिलियॉनर’ हा लेख पहावा. ’दि क्युरियस केस ऑफ बेंजामीन बटन’ नावाचा एक हॉलीवूडपट आला आहे म्हणून केवळ असे शीर्षक घ्यायचे? स्लमडॉगचा आणि त्या बेंजामीनचा अर्थाअर्थी काही संबंध नसताना? मराठी नाटकांची आणि चित्रपटांची नावेही अशीच येऊ लागली आहेत. असे केल्याने आपण आपोआप आधुनिक ठरतो अशी ह्या मंडळींची समजूत आहे काय? का तरूण वर्गाला आकर्षित करून घेण्यासाठी हे धेडगुजरीपण आवश्यक झाले आहे?

हे असेच चालू राहिले तर अधून मधून मराठी शब्दांची फोडणी दिलेल्या इंग्रजाळलेल्या मराठी भाषेला आमची ’मायबोली’ म्हणायची पाळी आपल्यावर येऊ शकते. महाराष्ट्रांतल्या अभिजनांची हीच भाषा झाली तर त्या भाषेलाच ’अभिजात’ मराठी म्हणावे लागेल. मराठी भाषेतून बॅचलर ऑफ मास मिडिया [बी. एम.एम.] चा अभ्यासक्रम सुरू व्हावा म्हणून काही मंडळींनी चळवळ केली, विद्यापीठाने ती मागणी मान्यही केली. पण मला अशी भीती वाटते की बी. एम.एम. चा अभ्यासही अशाच ’मिंग्लीश’ मधून चालवावा लागेल कारण मराठी-माध्यमे तीच भाषा वापरू लागली आहेत! ही पदवी घेउन बाहेर पडणार्‍यांना अशाच धेडगुजरी माध्यमातून नोकर्‍या करायच्या आहेत.

शासकीय व्यवहारात मराठीचा वापर अनिवार्य केल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल का, हासुद्धा एक यक्षप्रश्नच आहे. मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून गेल्या पन्नास वर्षांत 'कारभारात मराठी भाषेचा वापर’ ह्या विषयावर शासनाने प्रसृत केलेल्या परिपत्रकांची आणि शासन- निर्णयांची संख्या भरभक्कम आहे. असे नवे फतवे सारखे का काढावे लागावेत? अलीकडच्या काळांत, अशी काही उदाहरणे पहाण्यांत आली की मातब्बर पुढार्‍यांच्या पुढच्या पिढीतले वारस किंवा आप्त घराणेशाहीच्या प्रथेनुसार मंत्रीपदावर आरूढ झाले खरे पण ते धडपणे मराठी वाचू-बोलू शकत नव्हते कारण त्यांचे सगळे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले होते [काहींनी परदेशी पदव्याही संपादन केल्या होत्या] . अशा अभिजनांना ह्या राज्याच्या राजकारणांत आणि प्रशासनांत प्रवेश करताना मराठी भाषा आत्मसात करावीशी वाटू नये हे चित्र काही आशादायक वाटत नाही. आज अशा मंत्र्यांची आणि आमदारांची संख्या नगण्य असली तरी उद्याचा भरवसा कोणी द्यावा? महाराष्ट्राचे वाढते शहरीकरण आणि लोकसंख्येच्या प्रमाणानुसार होणारी मतदारसंघांची पुनर्रचना यांमुळे ज्यांची मातृभाषा मराठी नाही अशा आमदारांची संख्या यापुढे वाढणार आहे. मग ह्या मंडळींच्या सोयीखातर शासनालाही राज्यभाषेच्या वापराबद्दलचा आग्रह काही प्रमाणांत सौम्य करावा लागेल. मुंबई महानगरपालीकेच्या कारभाराचे स्वरूप ’बहुभाषिक’ आहेच. पुढे जाऊन विधानसभेचा आणि मंत्रालयाचा कारभारही असाच बहुभाषिक होऊ शकतो.

आज मुंबईतच नव्हे तर अगदी पुण्यांतही, रिक्षा, टॅक्सी, उपहारगृहे, सिनेमागृहे, दुकाने अशा रोजच्या व्यवहारांतल्या ठिकाणीसुद्धा मराठीऎवजी चटकन हिंदी भाषेत संभाषण सुरू होते. दोन्ही बाजू मराठी भाषक असतानाही! हे असेच चालू राहिले तर भविष्यांत, दैनंदिन व्यवहारांतही मराठी नामशेष हॊऊन जाईल.

अशा सगळ्या आघाड्यांवर मराठी भाषेची पीछेहाट अशीच सुरू राहिली तर मग ती ’अभिजात’ कशी होणार? अमेरिकेत जाऊन साहित्य संमेलने आणि नाट्य-संमेलने भरवण्याने मराठी भाषेला ते स्थान मिळणार आहे का? मुळांतच अशी संमेलने म्हणजे उत्साह-सोहळे असतात [अगदी महाराष्ट्रातल्या संमेलनांचीही गत तीच असते!]. त्यातून भरीव, ठाशीव किंवा दीर्घकालीन असे काहीतरी निष्पन्न व्हावे अशी खुद्द संमेलनांच्या यजमानांचीही अपेक्षा नसते. मग परदेशांत जाऊन संमेलने भरवल्यामुळे तसे काही साध्य होईल असे तरी का मानायचे? अमेरिकेतली समस्त महाराष्ट्र मंडळे एकत्र येऊन एक द्वैवाषिक संमेलन भरवतात. आपल्या मराठीपणाचे अनुबंध जपण्याचा, नव्या ओळखी-पाळखी करून घेण्याचा आणि मराठी करमणूकीचा, खाद्य-पदार्थांचा आस्वाद घेण्याचा, पु.ना. गाडगीळांच्या किंवा चितळ्यांच्या स्तॉलवर खरेदीचा तो सोहळा असतो. [काहींच्या मते उपवरांच्या सोयरीकी जुळवण्याची ती एक संधी असते!] तिथेही इंग्रजी-मराठी अशा सरमिसळ भाषेत कार्यक्रम पार पडतात याचे मुख्य कारण म्हणजे तिकडच्या तरूण पिढीला संपूर्ण मराठी भाषेत सतत बोलणे-ऐकणे शक्य नसते [वाचणे-लिहीणे दूरच!]. त्याबाबत कुणाची तक्रार असण्याचे कारणही नाही. बी. एम.एम. ची ही ’कन्व्हेन्शन्स’ नियमितपणे भरतात हेच कौतुकास्पद आहे! ’जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स’ चे कार्यक्रमही प्रमुख्याने इंग्रजीतच होतात पण आंतरराष्ट्रीय व्यवहाराची भाषा इंग्रजीच असल्याने तेही क्रमप्राप्त आहे. मला एव्हढेच म्हणायचे आहे की युरोप-अमेरिकेतल्या संमेलनातून मराठी भाषेला ’सुगीचे दिवस’ दिसतील अशी भाबडी आशा कोणी बाळगू नये.

’जी जबाबदारी सर्वांची असते, ती कुणाचीच नसते’ अशा अर्थाचे एक वचन इंग्रजीत आहे. तोच प्रकार मराठी भाषेचे संवर्धन, प्रसार, प्रचार ह्या बाबतीतही घडेल की काय अशी भीती वाटते. ह्या कामांत कोणीतरी पुढाकार घेणे आवश्यक ठरेल आणि ही जबाबदारी शासनानेच घेणे योग्य ठरेल. याचा अर्थ,’जे काही करायचे ते शासन करेल’ असे म्हणून इतरांनी स्वस्थ रहायचे असा होऊ नये, आणि शासनानेही ’आपल्यालाच सगळे कळते आणि आपणच सगळे काही करू शकतो’ ह्या भ्रमांत राहू नये. महत्वाच्या आणि संबंधित क्षेत्रांतल्या अभिजनांचे प्रातिनिधित्व समर्थपणे करू शकतील अशा संस्था आणि संघटनांना शासनाने आपल्या बरोबर घेतले पाहीजे आणि बरोबरीने वागवलेही पाहीजे. महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ , मराठी भाषा विकास संस्था, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, ग्रंथालय परीषद, नाट्य परीषद, प्रकाशक संघटना, नामवंत शिक्षण संस्था यांसारख्या घटकांना सशक्त बनवून त्यांना मराठी भाषा-विकासाच्या कामासाठी प्रवृत्त करण्यासाठीही शासनालाच पुढाकार घ्यावा लागेल. मुंबईत छत्रपतींच्या स्मारकासाठी जे शासन १०० कोटी रूपये खर्चायला तयार होते किंवा सहाव्या वेतन आयोगानुसार कर्मचार्‍यांना पगारवाढ देण्याकरता वार्षिक हजारभर कोटींचा भार उचलू शकते, त्या शासनाला मराठी भाषा विकासाकरिता पाचएकशे कोटी रुपयांची एखादी पंचवार्षिक योजना आखता येणार नाही असे थोडेच आहे? प्रश्न इच्छाशक्तीचा आणि नियोजनाचा आहे, साधनांचा नाही.

काही बाबतीत तर फार मोठ्या खर्चाच्या योजनांची गरज नाही. उदा. मुख्य प्रवाहातल्या एका वृत्तपत्राने थोडा पुढाकार घेऊन सात-आठ प्रमुख दैनिकांच्या संपादकाची एक बैठक बोलवावी, एका वाहिनीने असाच पुढाकार घेऊन उरलेल्या चार-पाच वाहिन्यांसोबत बैठक घ्यावी आणि माध्यमांतून वापरल्या जाणार्‍या मराठी भाषेसंबधी एक ’आचार-संहिता’ बनवावी, जेणेकरून मराठीचे ’धेडगुजरीकरण’ थांबेल. हे करण्यासाठी काही पंचवार्षिक योजनेची गरज नाही. प्रश्न फक्त कोणीतरी एकाने पुढाकार घेण्याचा आहे.

- प्रभाकर [बापू] करंदीकर .

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

करंदीकर तुमच्याशी एकदम सहमत.

पण ५०० कोटी मराठीवर खर्च करण्यापेक्षा ते मुलांच्या शिक्षणावर खर्च केलेले जास्त बरे..

*****&&&*****
What others think about me is none of my business Happy

चान्गला विषय, Happy
अजुन थोडे तपशीलात जाऊन पुन्हा वाचायला हवा आहे!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

शिक्षण किंवा प्राथमिक आरोग्य यांसारख्या योजनांवर कात्री चालवून मराठी भाषा विकासाकरता पंचवार्षिक योजना बनवावी असा माझ्या सूचनेचा अर्थ नव्हता. शासनाच्या विकासेतर खर्चाला थोडी कात्री लावून ही रक्कम उभी राहू शकते. गेली कित्येक वर्षांपासून शासन रोजगार हमी योजनेच्या खर्चाकरता म्हणून व्यवसायकर [प्रोफेशन टॅक्स]वसूल करते. आजमितीला ही रक्कम पंधराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त गोळा होते. रोजगार हमी योजनेवर एवढा खर्च होत नाही. मग उर्वरीत रक्कम सर्वसाधारण महसूलाकडे वळवली जाते. त्यातले दरवर्षी शंभर कोटी रुपये भाषा विकासासाठी देता येणार नाहीत का? भाषा विकास मंडळाचे रूपांतर सार्वजनिक ट्रस्ट मधे किंवा कंपनी कायद्याच्या कलम २५ खालील कंपनीत केले आणि इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम ८०-ग ची सूट मिळवून घेतली तर मराठीप्रेमी करदाते आनंदाने देणग्या देतील. प्रोफेशन टॅक्सवर विशेष सेसही लावता येऊ शकतो म्हणजे मग ती रक्कम आपोआप ह्या महामंडळाकडे जमा होईल. इच्छाशक्ती असेल तर साधनांची आणि पर्यायांची कमतरता पडू नये.

ह्या योजनेतून गावोगावची ग्रंथालये अधिक सुसज्ज आणि आधुनिक करता येतील, जिथे ग्रंथालये नाहीत तिथे नवी सुरू करता येतील, शाळा-कॉलेजांतल्या ग्रंथालयांना मदत करता ये ईल. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच विद्यार्थ्यांनाही हो ईलच. हे काम शिक्षणाचेच आहे.

मराठी भाषेतल्या पाठ्यपुस्तके, गाइडस किंवा मनोरंजन विषयक पुस्तके-नियतकालीके वगळून इतर पुस्तके आणि नियतकालीके यांना करमुक्त केले किंवा कर-परतावा योजना राबवली तर ही पुस्तके आणि नियतकालीके सर्वसामान्य माणसांना परवडू शकेल अशा किंमतीत उपलब्ध होतील आणि पुस्तके विकत घेऊन वाचण्याची आवड वाढेल. शासन दरवर्षी विविध प्रकारच्या पुस्तकांना पारितोषिके देते. अशा पुरस्कारप्राप्त पुस्तकांच्या स्वस्त आवृत्या काढण्यासाठी सबसिडी देता येईल, जेणेकरून कमी किंमतीत ही पुस्तके मिळू शकतील. अशा प्रकारच्या अनेक विधायक योजना संबधित व्यक्ती आणि संस्था सूचवू शकतील.

मराठी भाषेचे प्रमाणित व्याकरण, शुद्धलेखन आणि संगणक- की बोर्ड व सॉफ्टवेयर ह्यासुद्धा मूलभूत गरजा आहेत. ह्या कामासाठीसुद्धा निधि पुरवता येइल. करायचे म्हटले तर करण्यासारखे खूप आहे.

वार्षिक साहित्य संमलने भरवणे [निवडणूकांचे घोळ घालून] ह्या पलीकडे साहित्य महामंडळ फारसे काही भरीव कार्य करताना दिसत नाही. ह्या महामंडळाची घटनाही कालबाह्य झाली आहे. साहित्य प्रसाराचे आणि मराठी भाषा-संवंर्धनाचे काम करणार्‍या [को.म.सा.प. सारख्या] अनेक संस्थांना महामण्डळाच्या घटक-संस्थेचा दर्जा नाही आणि महामंडळाच्या कारभारांत कसलेही स्थान नाही. प्रकाशकांना, प्रसार-माध्यमांना आणि विद्यापीठांना ही कसलेच प्रतिनिधित्व नाही. अशा मक्तेदारी मानसिकतेतून जर महामण्डळ बाहेर पडणार नसेल तर मग 'सरकारी अनुदान हवे असेल तर प्रथम घटना-दुरुस्ती करा आणि साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणूकीची पद्धत बदला ' असे शासन म्हणू शकते. हा काही महामंडळाच्या कारभारांत हस्तक्षेप होणार नाही. जागतिक बँक नाही का कर्ज देताना काही धोरणविषयक सुधारणा करण्याच्या अटी घालत? बँकेच्या अटी तुम्हाला पटत नसतील तर कर्ज न घेण्याचा पर्याय खुला असतोच नाही का? घटना-दुरुस्तीबाबत मंत्रालयांतून सूचनावजा फतवा काढण्याची गरज नाही. दोन-तीन माजी संमेलनाध्यक्ष, एखादे सेवानिवृत्त न्यायाधीश, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मण्डळाचे अध्यक्ष, भाषा विकास संस्थेचे अध्यक्ष, एखादे नामवंत संपादक, प्रकाशक अशा सात-आठ तज्ञांची एक समिती शासनाने याकरता नेमावी. या समितीने व्यापक विचार- चर्चा करून घटनेचा सुधारीत मसुदा महामण्डळाला सुचवावा, तसेच संमेलन अध्यक्षांच्या निवडीबाबत नवी पद्धत सुचवावी आणि अंतिम निर्णय महामंडळाकडे सोपवावा असे मला सुचवावेसे वाटते.

बापू करन्दिकर

प्रभाकर,

पूर्णत: सहमत आहे मी तुमच्या मताशी. पण आपण आपला खारीचा वाटा उचलायला नको का? कमीत कमी आपण तरी ठरवू की मराठीचाच वापर करायचा.

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

लेख आणि नंतरची प्रतिक्रिया आवडली.

चांगला लिहिला आहे लेख. विषयाला धरुन उदाहरणेही चांगली दिली आहेत. कमीतकमी व्याकरणाच्या चुका आणि शाब्दिक ओढाताण न करता संपूर्णपणे मराठीत लिहिलेला लेख वाचून खरंच खूप बरं वाटलं. अर्थात 'मराठी'वर लिहिलं आहे म्हटल्यावर ते अपेक्षित आहे, पण तरीही... Happy

नंतरची प्रतिक्रिया सुध्दा आवडली.

सर्वांना धन्यवाद.
मराठी टंकलेखनाची सवय लावून घेण्याचा प्रयत्न चाललाय पण तूर्त तरी वेग आणि अचूकता ह्या दोन्ही आघाड्यांवर गोते खातोय!
बापू करन्दिकर

बापू, चांगले लिहिले आहे आपण.

उत्तम लेख आहे. मला शेवटचा प्रसारमाध्यमांचा मुद्दा आवडला. शासन नेहमीच उशीरा जागे होते. निदान माध्यमे तरी लवकर जागी होतील अशी आशा. कारण माध्यमांचाच प्रभाव सगळ्यात जास्त असतो. (आता माध्यमांमधे उच्चपदस्थ अमराठी लोक मराठीचा वापर कमी कसा होईल याकडे लक्ष देतात असेही ऐकले आहे Happy )
लोकसत्ता आणि मटा तर कधीच मिंग्रजाळलेले आहे. सकाळ आत्ताआत्तापर्यंत व्यवस्थीत होता. (आंतरजालावरील आवृत्या). जेंव्हा सकाळचा ढाचा नुकताच बदलला तेंव्हापासून तो पण मिंग्रजाळतो आहे. लहानपणी शुद्धलेखनाचा योग्य नमुना म्हणून देखील वर्तमानपत्र वाचायला सांगत. आता मी तरी कोणाला तस सांगू धजत नाही.
माबोवर प्रसारमाध्यमामधे असणारी नंदिनी कदाचित माध्यमांच्या स्थितीवर प्रकाश टाकू शकेल.
शुद्धलेखनाचे जाऊदे, पण मराठी शब्द तरी योग्य ठिकाणी वापरण्याचे प्रमाण वाढले तरी पुष्कळ आहे.
बापूंचीच ६.२८ ची प्रतिक्रिया आवडली. सचीनला अनुमोदन.
अर्थात, जर स्वतःची इच्छा नसेलच मराठी वापरण्याची तर मराठी मरायला टेकेलच. जर भाषा कशी का असेना, भावना पोचल्याशी कारण असच म्हणण असेल, तर मराठीच पाहीजे अस नाही. आणि नवीन शब्द भाषेत आल्याने भाषा समृद्ध होते असच म्हणायच तर ईंग्रजी शब्द किंवा चायनीज शब्द जसेच्या तसे मराठीत आले तरी काही बिघडायचे कारण नाही. तसेही आपण गाथा सारखे शब्द बाहेरूनच उचललेले आहेत Happy
एखाद्या अमराठी शब्दाला मराठीत शब्द आधीच उपलब्ध असेल तरी अजून एक प्रतिशब्द मिळाला मराठीला अस आपण म्हणू शकतो.

चांगला लेख. आजच्या घडीला मराठी वाहिन्या आणि चित्रपटांत पैसा येतोय, तसच मराठी पुस्तकांचा खपही बरा आहे. त्यामुळे चांगलं काहि घडेल अशी अपेक्षा. सरकार निष्क्रिय होतं, आहे आणि राहणारच. काय जे करायचे ते सामान्य लोकच करत आहेत.

Back to top